शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

हंडाभर चांदण्या : एक आकलन

 ॥ "हंडाभर चांदण्या : एक आकलन" ॥

डॉ. गणपतराव ढेंबरे

सहा. प्राध्यापक

मराठी विभाग, श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, ता . रावेर, जि . जळगाव

पिनकोड : ४२५५०८

मोबाईल नंबर : ९४२१०८१२७०

ई-मेल आयडी : dhembregr@gmail.com

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रास्ताविक : -

ग्रामीण जीवन केंद्रवर्ती ठेवून विविध वाङ्मय प्रकारातून आजतागायत लेखन झाले आहे. त्याचबरोबर नाटक या कलाप्रकारातून ग्रामीण जीवन, त्यातील विविध प्रश्न, समस्या यांचे विविधांगी चित्रण झालेले दिसून येते. महात्मा फुले यांचे 'तृतीय रत्न', अण्णा भाऊ साठे यांचे 'इनामदार', व्यंकटेश माडगूळकर यांचे 'तू वेडा कुंभार', मधु मंगेश कर्णिक यांचे 'देवकी', महेश एलकुंचवार यांचे 'वाडा चिरेबंदी', रा. रं. बोराडे यांचे 'पिकले पान', 'विहीर', 'आमदार सौभाग्यवती', राजकुमार तांगडे यांच्या 'काय दिलं स्वातंत्र्याने', 'आकडा', 'हितशत्रू', 'चक्काजाम' इत्यादी नाटकांमधून ग्रामीण माणूस, त्याचे प्रश्न, या प्रश्नामागील व्यवस्था या बाबी उलगडण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. मुळात ग्रामीण जीवन, ग्रामीण माणूस आणि त्याचे प्रश्न यांना नेहमीच दुर्लक्षित ठेवले जाते. ते प्रश्न किंवा समस्या यांच्यातील गंभीरता डावलणारी मानसिकता अतिशय ठाम आहे. ही व्यवस्था चालवणारे दोन आधारस्तंभ म्हणजे राजकीय लोक आणि प्रशासकीय अधिकारी हे होत. भ्रष्टाचार सर्वमान्य झाला आहे. राजकीय दलालांच्या पाठिंब्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांची संवेदनशीलता गेंड्याच्या कातडीसारखी जाड झाली आहे. संवेदनाहीन प्रशासकीय अधिकार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी आजच्या तरुणांना हिंसा आकर्षित करत आहे. जर आपले प्रश्न संविधानिक मार्गाने सुटत नसतील तर असंविधानिक घटना, गोष्टी, माणसे जन्माला येतात. यातून व्यवस्था एकदम उलथून टाकली जाते. व्यवस्थेला जाग येते. पण हे स्वप्नरंजन ठरते. एखाद्या असंविधानिक घटनेनंतर माणसांमधील तात्कालीक क्षोभ थंड होतो व जसे काही घडलेच नाही अशा थाटात व्यवस्था पुन्हा कामाला लागते. सगळे काही पूर्ववत होते. एखादी व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश काही क्षणांसाठी केंद्रवर्ती होतो आणि पुन्हा परिघावर जातो.

आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ग्रामीण जगण्याला तुच्छ समजण्याची सार्वत्रिक मानसिकता आजही कायम आहे. किंबहुना ग्रामीण माणसाचे प्रश्न हे न सोडविण्यासाठीच असतात, ते प्रश्नच नसतात असा ठाम विश्वास व्यवस्थेला झाला आहे. दुष्काळ, पूर, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये माणसे उध्वस्त होतात. या आपत्तींचे तात्कालिक उपाय केले जातात. कायमस्वरूपी या आपत्तीसाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. महाराष्ट्रातील हजारो खेडी दरवर्षी दुष्काळाचा सामना करतात. मराठवाडा, विदर्भ, माण, खटाव, सांगोला या भागात दुष्काळाचे आता काही नवल राहिलेले नाही. या भागातील माणसे चिवटपणे दुष्काळाचा सामना करतात. या माणसांचा नेहमी सृजनावर, सकारात्मकतेवर विश्वास आहे. निसर्गचक्रातील अनियमितता सहजतेने स्वीकारून ही माणसे जगत राहतात. दुष्काळ जितका अटळ आहे किंबहुना त्यापेक्षा पाऊस येणार आहे यावरील आशावाद या माणसांना जिवंत ठेवतो. हजारो वर्षापासून ही माणसे याच मन:स्थितीत जगत आली आहेत. दुष्काळाचे सावट साधारणतः पाच ते सहा महिने चालते. डिसेंबर संपला की कमी पर्जन्यमान असणार्‍या भागातील विहिरी, तलाव, कूपनलिका, धरणांमधील पाणी कमी होते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत जलस्रोतातील उरले-सुरले पाणी संपते. मार्च महिन्यापासून माणसांची हंडाभर पाण्यासाठीची वणवण सुरू होते. पाण्याचे सर्व स्रोत संपल्यावर माणसे गावाची शिव ओलांडून दुसर्‍या गावातील शिवारातून पाणी आणण्यासाठी सज्ज होतात. मुळात खेड्यातील माणसांकडे जगण्याची साधने अतिशय तुटपुंजी असतात. या आपत्कालीन परिस्थितीत स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे बळी पडतात. चार-पाच किलोमीटर पाण्यासाठी वणवण करणार्‍या माणसांचे दुःख सनातन व्यवस्थेला उमगत नाही. हे दुःख, प्रश्न, समस्या यांना माध्यमे अगदी चवबदल पुरते मांडतात. या प्रश्नांच्या, समस्यांच्या मुळाशी पोहोचत नाहीत. या प्रश्नांमध्ये, समस्याग्रस्त अवस्थेत जीवन जगणार्‍या माणसांच्या मनात आपण या व्यवस्थेत नगण्य आहोत ही भावना तयार होते. कधी नशिबावर हवाला ठेवून ही माणसे दुःख उपसत बसतात किंवा दुःखाला, वेदनेला कारुण्याची झालर देवून हीच माणसे अगतिकतेचा आधार घेतात आणि डोक्यावरून खूप पाणी गेल्यावर ही सर्जनशील माणसे हातात हत्यार घेतात. हिंसक होऊन आपल्याला नागवणार्‍या व्यवस्थेच्या तळातल्या प्रतिनिधीला जरब बसवण्याचा निकराचा प्रयत्न करतात. विद्रोह, बंडाचे उलगुलान पेरणारी ही माणसे व्यवस्थेच्या निबीड अंधारात मशाल होतात. व्यवस्था या माणसांना बर्‍याच वेळा नेस्तनाबूत करते. मुळासकट उपटून टाकते. ती शोषित माणसांच्या मनात दहशत पेरत असते. पण ही दहशत सार्वकालिक नसते. पुन्हा कुणीतरी व्यवस्थेला जाब विचारणारा जन्माला येतो. पुन्हा व्यवस्थारूपी यज्ञात विद्रोहींची आहुती दिली जाते. या व्यवस्थेच्या असण्यामागील गुंत्याशी लेखक आपल्या कलाकृतीतून भिडत असतो. त्यातून सकस कलाकृती जन्म घेत असतात.

दत्ता पाटील यांनी 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतून ग्रामीण जीवनातील पाण्याचा प्रश्न मांडला आहे. दुष्काळी स्थितीतील पाण्याच्या प्रश्नामागील अगतिकता थेटपणे न मांडता उपहास, उपरोधातून प्रश्नातील कारुण्य अतिशय टोकदारपणे प्रस्तुत एकांकिकेतून मांडले आहे. लोकसंगीत, लोककलेचा बाज घेऊन प्रस्तुत एकांकिका आकार घेते. हजारो वर्षांच्या लोककलेचा, लोकसंगीताचा आधार घेत प्रधान पात्राच्या निवेदनातून या एकांकिकेला सजीवता प्राप्त होते. निवेदक, सूत्रधार पोटतिडकीने आपली बाजू मांडतो. त्याच्या मांडणीत कुठलाही अभिनिवेश नाही. सरळ व रोखठोकपणे विषयाची मांडणी, समस्येतील मर्मभेदी तार्किकता वाचकाला, रसिकाला एकदम अस्वस्थ करते. माणसांचे साधे प्रश्न न सोडविणार्‍या प्रस्थापित व्यवस्थेतील ढोंगीपणा अलगद उघडा पडतो. लोककलेतील अभिव्यक्तीचा प्रत्यय देणारी ही कलाकृती आहे. पाणी हे जगण्याच्या केंद्रस्थानी असणार्‍या मावळवाडी या गावाची गोष्ट 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतून मांडली आहे. टॅंकर गावात यावा यासाठी गावकरी एक दिवस जे भोगतात त्याचे कलात्मक, प्रत्ययकारी चित्रण प्रस्तुत एकांकिकेतून येते. 

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेचे कथानक : -

‘हंडाभर चांदण्या’ ही एकांकिका दुष्काळावर आधारीत आहे. मावळवाडी या गावात व परिसरात भयाण दुष्काळ पडलेला आहे. गावातील व परिसरातील सगळ्या विहिरी, तलाव, नदी, धरण, कूपनलिका या सर्वांचे पाणी आटून गेले आहे. गावातील बायका पाण्यासाठी दिवसाचा संपूर्ण वेळ खर्च करतात. दिवसभरात दोन-चार हंडे पाणी मिळाल्यास गावातला प्रत्येक माणूस आनंद व्यक्त करतो. गावात पाण्याचा टँकर आल्यास प्रत्येक माणसाच्या दुःखाचा शेवट होईल असे सर्वांना वाटते. मावळवाडी नावाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या एकूण ३०० आहे. त्यातील २१० लहान मुले आणि तरुण आहेत. तर जवळपास ९० इतकी लोकसंख्या म्हातार्‍या माणसांची आहे. म्हातारी माणसे वयोमानानुसार एकेक करून मृत्यू पावत आहेत. मावळवाडी गावातला एक तीस-पस्तीशीतला तरूण संभाजी उर्फ संभा गावातल्या लोकांना आश्वासन देतो की, तो गावात शासनाचा पाण्याचा टँकर घेऊन येणार आहे. गेल्या सात महिन्यांपासून संभा तालुक्याला तहसील कार्यालयात हेलपाटे मारत राहतो. पाण्याचा टँकर गावासाठी मिळावा यासाठी तहसीलदारांना अर्ज करत राहतो. त्या सर्व अर्जांची पोहोच संभाजवळ आहे. गावातले लोक संभाची तालुक्याहून येण्याची वाट पाहतात. गेल्या सहा महिन्यांपासून संभा तहसील कार्यालयात रोज येतो आहे. फक्त सेवानिवृत्त होण्यासाठी आलेले वयस्कर तहसीलदार संभाला पोकळ आश्वासन देतात. परंतु टॅंकर काही पाठवत नाहीत. ते वयोवृद्ध तहसीलदार निवृत्त होतात. नवीन तहसीलदार म्हणून राधिका बावडेकर ही तरुण असलेली स्त्री त्याजागी नियुक्त होते. राधिका बावडेकर एका महिन्यापासून संभाला ओळखते. दिवसभर तहसीलदार राधिका बावडेकर संभाला टाळत राहते. संध्याकाळचे पाच वाजत आलेले असतात. राधिकाला लवकर घरी जायचे असते. तेवढ्यात तिच्या दालनात (ऑफिसमध्ये) संभा प्रवेश करतो. संभाला तहसीलदार राधिका बावडेकरकडून पाण्याचा टँकर मावळवाडीला देण्याचे ठाम, ठोस, निश्चित असे आश्वासन पाहिजे असते. किमान आठवड्यातून एकदा तरी मावळवाडीला पाण्याचा टँकर मिळावा यासाठी संभा आक्रमक झाला आहे. तहसीलदार राधिका संभाला शासकीय कागदपत्रांच्या भाषेत उडवाउडवीची उत्तरे देते. यामुळे संभा प्रथम निराश होतो मात्र नंतर आक्रमक होतो. गावात मुक्कामाला येणार्‍या एस.टी.चे चालक व वाहक गावातीलच असतात. संभासाठी ते थांबलेले असतात. ते दोघेही टँकरसाठी तहसीलदार राधिकाला विनंती करतात. पण ती त्या सर्वांकडे दुर्लक्ष करते. यामुळे संभा टोकाचे पाऊल उचलतो. तो एस.टी.च्या चालक व वाहकाच्या मदतीने तहसीलदार राधिका बावडेकरचे अपहरण करण्याचे ठरवतो. चादरीत बांधून एस.टी. मध्ये टाकून तो तहसीलदार राधिकाला मावळवाडीला घेऊन येतो. यावेळी संध्याकाळचे आठ-साडेआठ वाजत आलेले असतात. ५० घरांचे मावळवाडी गाव एकदम शांत असते. गावाच्या बसस्थानकावर एक हॉटेलवजा टपरी असते. हॉटेलच्या जवळच असलेल्या स्मशानात प्रेत जळत असते. त्याचा उजेड हॉटेलवर आणि गावावर पडला असतो. हॉटेलवाला, मास्तर, गायक, डफडीवाला, गोंधळी, खंजिरीवाला, तुणतुणेवाला सगळे संभाची वाट पाहत असतात. तालुक्यावरून शेवटची एकमेव मुक्कामी एस.टी. येईल. त्यात संभा असेल. तो पाण्याचा टँकर मावळवाडीसाठी कधी येईल याची बातमी सांगेल या आशेवर सगळे गाववाले संभाची वाट पाहत असतात. गावातील सर्व लोक त्या हॉटेलजवळ येऊन बसलेले असतात. मास्तर आणि त्याचे साथीदार गोंधळी गीते गाऊन लोकांचे मनोरंजन करत असतात. गावात लोडशेडींग असल्यामुळे अंधार असतो. गावातल्या सर्व माणसांचे डोळे एस. टी. येणार्‍या दिशेकडे लागलेले  असतात. काहीच वेळात एस.टी. गावात येते. संभा चादरीत गुंडाळलेल्या स्त्रीला चालक व वाहकाच्या मदतीने खाली उतरवतो. गावातल्या लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. गावातल्या लोकांना संभा सांगतो की, ही स्त्री तहसीलदार आहे व ती पाण्याच्या टॅंकरचा प्रश्न सोडविणार आहे. तहसीलदार राधिका संभावर चिडते. बाईमाणसाचे अपहरण करणे वाईट आहे, त्यातल्या त्यात एखाद्या महिला तहसीलदाराचे अपहरण करणे हा आणखी मोठा गुन्हा आहे असे ती संभाला सुनावते. संभाला, गावातल्या लोकांना कायद्याची, पोलिसांची भीती दाखवते. परंतु संभा व गावातले लोक तहसीलदार राधिका बावडेकरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत मावळवाडीला पाण्याचा टॅंकर येत नाही, तोपर्यंत तिची सुटका केली जाणार नाही अशी तंबी संभा देतो. संभा तहसीलदार राधिकाला मोबाईल फोनवरून प्रशासनाला सूचना देण्यास सांगतो. पाण्याचा टँकर उद्यापासून मावळवाडीला देण्याचा आदेश तहसीलदार राधिका बावडेकर प्रशासनाला फोनवरून देतात व स्वतःच्या सुटकेची मागणी करतात. परंतु संभा व गाववाल्यांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. टँकर गावात आल्यावर मानापानाने तहसीलदार राधिका बावडेकरला निरोप देण्याचे संभा व गावकरी ठरवतात. संभा असे जाहीर करतो की,  जोपर्यंत टॅंकर गावात येणार नाही, तोपर्यंत तो पाण्याचा थेंब पिणार नाही. त्या रात्री तहसीलदार राधिका बावडेकर चंद्रा नावाच्या बाईकडे मुक्कामी थांबतात. चंद्राला चार वर्षांपासून नवर्‍याने टाकून दिले आहे. ती एकटी राहते. परंतु पाण्याच्या, जगण्याच्या संघर्षात चंद्रा स्वतःचे दुःख विसरून जाते.

दुसर्‍या दिवसाची सकाळ उजाडते. सगळे मावळवाडी गाव म्हसोबाच्या माळावर जमा होते. सर्वजण टॅंकरची वाट पाहत थांबतात. सर्व लहान-थोर माणसे माळावर जमतात. तहसीलदार राधिकाला तिचा मोबाईल फोन संभा देतो. ती टँकरचा पाठपुरावा करते. त्यानंतर संभा तिचा मोबाईल बंद करतो. तहसीलदार राधिकाला मावळवाडीतील सर्व माणसे नक्षलवादी चळवळीशी संबंधित वाटतात. संभा सर्व गावावर दबाव टाकतो आहे असेही तिला वाटते. तसेच ही सर्व माणसे संभाच्या प्रभावाखाली आहेत असेही तिला वाटते. राधिका बावडेकर मनातल्या मनात विचार करते की, एका तहसीलदाराचे अपहरण ही खूप मोठी बातमी आहे. ते सर्व लोक जे करताहेत तो खूप मोठा गुन्हा आहे. तिला मावळवाडीचे लोक वेडे वाटतात. तहसीलदार राधिका हिने प्रशासनाला आदेश देऊनही दिवसभर पाण्याचा टँकर मावळवाडीला येत नाही. सगळे गावकरी उन्हात टॅंकरची वाट पाहत थांबतात. राधिकाला हे सर्व मूर्खपणाचे वाटते. संभा त्या रात्रीपासून पूर्ण दिवस पाण्याचा थेंबही घेत नाही. संभाचे शरीर थकलेले असते. तो पाण्याच्या टँकरसाठी पाणी पिणे वर्ज्य करतो. दुसरीकडे गावात संभाचे वडील शेवटची घटका मोजत असतात. संभाला वाटते की, बापाने गावात आलेला पाण्याचा टँकर बघावा आणि मग मृत्यूला कवटाळावे. परंतु गावात आलेला पाण्याचा टँकर आलेला न पाहताच संभाचा बाप मृत्यू पावतो. संध्याकाळ होते. संभाच्या बापाची चिता पेटवली जाते. उशिरा रात्री टँकरचा आवाज येऊ लागतो. लोक टँकरच्या दिशेने पळतात. चंद्रा पाण्याचा ग्लास भरुन आणते. तहसीलदार राधिका बावडेकर पाण्याचा ग्लास संभाला देतात. संभा पाणी पितो. येथे 'हंडाभर चांदण्या' ही एकांकिका संपते. या एकांकिकेतील कथानक साध्या, सोप्या व सरळ पद्धतीचे आहे. अत्यंत थेटपणे जीवनानुभव मांडणारे हे कथानक आहे. या कथानकातील कारुण्यता, भीषणता, अगतिकता मांडण्यासाठी लोकगीतांचे, लोकसंगीताचे अत्यंत अचूकपणे उपयोजन केले आहे. त्यामुळे 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेचे कथानक वाचकाला अस्वस्थ करते. कथानक संपूनही संभा आणि त्या सगळ्या पात्रांचे पुढे काय झाले असेल? याबद्दलची उत्सुकता मागे ठेवत हे कथानक संपते. हे कथानक जिथे संपते, तिथेच वाचकांच्या विचारांना, संवेदनेला हात घालण्यात या कथानकाला यश येते.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेचा कालावकाश पूर्ण चोवीस तासांचा म्हणजे पूर्ण एका दिवसाचा आहे. एका दिवसाचे मावळवाडीतील लोकांचे जगणे मांडणारे हे कथानक आहे. 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेचे कथानक तहसील कार्यालय, मावळवाडीतील हॉटेलचा भाग, चंद्राचे घर आणि म्हसोबाचा माळ या स्थल अवकाशात घडत जाते. या एकांकिकेत एकूण सहा प्रवेश आहेत. या सहा प्रवेशातून हे कथानक मांडले आहे.

‘हंडाभर चांदण्या’ या एकांकिकेतील पात्रे : 

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेत काही मुख्य पात्रे, तर काही गौण पात्रे आहेत. या एकांकिकेतील प्रधान पात्र म्हणजे संभाजी उर्फ संभा हे होय. तीस-पस्तीशीतला संभा मावळवाडीतील शाळेत शिपायाची नोकरी करतो. गावाचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी अत्यंत ठाम निश्चयी झालेला संभा या एकांकिकेतून ठसठशीतपणे उभा राहतो. संभाला संपूर्ण व्यवस्थेचे भान आले आहे. चांगले-वाईट यातला फरक त्याला समजतो. राधिका बावडेकर संभाशी वाईट वागते. तरीही संभा तिच्याशी चांगुलपणाने वागतो. तो चांगुलपणा सोडत नाही. गावाच्या भल्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी संभा मृत्युला कवटाळण्याची तयारी दाखवतो.  गावाच्या प्रति संभाचे समर्पण अत्यंत उच्च कोटीचे आहे. संभाला व्यवस्थेतील फोलपणा लक्षात येतो. वडिलांचा मृत्यू होऊनही तो निर्णायक टप्प्यावर टँकरचा प्रश्न मांडत राहतो. गावातील सर्व माणसांचा विश्वास संभाने जिंकलेला आहे .

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील दुसरे प्रधान पात्र म्हणजे तहसीलदार राधिका बावडेकर हे होय. तहसीलदार राधिका बावडेकर ही तरुण स्त्री आहे. तीस-बत्तीस वर्षे वयाची आहे. दिसायला सुंदर आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांचा सर्वसामान्य माणसांकडे पाहण्याचा तुच्छतादर्शक जीवन दृष्टिकोण तिच्याकडे आहे.  प्रशासनातील कागदपत्रांचा खेळ खेळण्यात तिला रस आहे. अर्ज करा, पोहोच द्या, पुढच्या तारखेला या, चौकशी करून प्रश्न सोडवते, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल केस करीन यासारखी उत्तरे तहसीलदार राधिका बावडेकर देते. यातून एका प्रशासकीय अधिकार्‍याची असंवेदनशील, नकारात्मक प्रतिमा उभी राहते. प्रशासकीय अधिकार्‍यांची सततची संशयी मन:स्थिती राधिकाच्या पात्रातून उभी राहते. संभा, मास्तर व  मावळवाडीतील सर्व लोकांकडे राधिका संशयी नजरेने पाहते. तिला हे सर्व नक्षलवादी वाटतात. आपल्या अपहरणामुळे तिला प्रचंड राग आलेला असतो. तिचा तो राग व तिची असहायता या पात्रातून अचूकपणे उभी राहते. मात्र या एकांकिकेच्या शेवटी राधिका बावडेकर या तहसीलदार स्त्रीमधील संवेदनशीलता जागी झालेली दिसते.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील तिसरे महत्त्वाचे पात्र म्हणजे चंद्रा हे होय. चंद्रा ही मावळवाडीतील एक निराधार स्त्री आहे. चार वर्षापासून नवर्‍याने सोडून दिलेली ही स्त्री एकाकीपणे जीवन जगत आहे. स्वतःचे दुःख विसरलेली चंद्रा गावातील पाण्याच्या अभावामुळे अस्वस्थ होते. ती स्वतःच्या दुःखाबद्दल म्हणते, "चार वर्षांपासून टाकून दिले नवर्‍यानं! रिकामे हंडे घेऊन भटकायची सवय झाली आता! कधी मिळालंच पानी, तं डोक्यावरून भरलेला हंडा आणताना पाणी गळत राहतं पायापर्यंत... त्यातच सगळं वाहून जातं जमिनीत!"(पृष्ठ ७९) स्वतःचे दुःख, वेदना अतिशय सहजतेने मांडणारी ग्रामीण स्त्री चंद्राच्या रुपाने एकांकिकेत उभी राहते. स्वतःच्या वासनेलाही मोकळी वाट करून देणारे चंद्रा हे पात्र एकांकिकेत उठावदारपणे उभे राहते. संयत, सूचकपणे संभाशी असणारे संबंध चंद्रा मांडते. संभाला, त्याच्या विचारांना चंद्राने मनापासून स्वीकारले आहे. गावाच्या सुखदुःखात स्वतःचे सुख-दुःख विसर्जित करण्याची चंद्राची समर्पणाची भावना अतिशय उच्च कोटीची आहे. चंद्रा निसर्गाशी एकरूप झाली आहे. रात्रीच्या चांदण्यात वेळेचे गणित मांडणारी चंद्रा ही ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याला मुखर करणारी अभागी स्त्री आहे.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील चौथे महत्त्वाचे पात्र म्हणजे मास्तर हे होय. पन्नास- पंचावन्न वय असणारे मास्तर मावळवाडीतील शाळेत शिक्षक आहेत. विद्यार्थी दिवसभर पाणी शोधायला बाहेर फिरत असतात. तरीपण मास्तरांना पगार मिळतो. मावळवाडीतील सर्वसामान्य माणसांच्या दुःखाशी समरस झालेले मास्तर संभाला लढण्यासाठी प्रेरणा देतात. मास्तर अध्यात्मिक ज्ञान असणारे आहेत. मास्तरांच्या पात्रातून एकांकिकेतील उपरोध आणि उपहास व्यक्त होतो. मास्तर म्हणतात, ''जे जे चांगलं आपण बोलतो, ते ते  गीतेत आधीच लिहून ठेवलंय." यातील विनोद अतिशय मार्मिक आहे. मास्तर गोंधळी गीत गात राहतात. परिस्थितीवरचे मास्तरांचे भाष्य गाण्यातून अभिव्यक्त होते. मास्तरांच्या बोलण्यात एक लय आहे. सर्व परिस्थितीला शब्दबद्ध करण्याची क्षमता मास्तरांमध्ये आहे. विशेषतः देव, धर्म, श्रद्धा, अध्यात्म यांच्याबद्दलचा तिरकस, वास्तववादी दृष्टिकोन मास्तरांचे पात्र मांडते.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील आणखी एक पात्र म्हणजे हॉटेलवाला हे होय. मावळवाडीतील चौकात कोपर्‍याला चहाची टपरी चालविणारा हॉटेलवाला गायक व मास्तरांना आवडीने चहा पाजतो. हॉटेलवाला माणुसकीने संभासाठी दूध राखून ठेवतो.  हॉटेलचा कंदील तो विझवतो. कारण गावात लोडशेडींग आहे. स्मशानातल्या चितेच्या प्रकाशावर तो आपले काम भागवतो. या एकांकिकेत हॉटेलवाला हे पात्र छोट्या भूमिकेत येते. मास्तर अध्यात्मिक विचार बरोबर पटवून देतात असे हॉटेलवाल्याला वाटते. हॉटेलवाल्याचा संभावर मात्र पूर्ण विश्वास आहे.

'हंडाभर चांदण्या’ या एकांकिकेमधून तहसील कार्यालयातील शिपाई, डफडीवाला, तुणतुणेवाला, गोंधळी, मुख्य गायक, कोरसमधील माणसे, एस.टी. बसचे ड्रायव्हर-कंडक्टर,  चितेवर जळणारा रघुआप्पा, संभाचा बाप इत्यादी इतर पात्रे येतात. काही पात्रे अत्यंत छोट्या भूमिकेत असूनही उठावदार झाली आहेत. संपूर्ण मावळवाडी गाव हे एक पात्र म्हणून या एकांकिकेत उभे राहते. समूह मानसिकता व या मानसिकतेतील चीड, राग 'हंडाभर चांदण्या' मधून अभिव्यक्त होते. मावळवाडीतील काही माणसांची नावे या एकांकिकेत येतात. त्यांच्या जगण्याचे संदर्भ येतात. मावळवाडीतील देवांचे सूचक संदर्भ येतात. 'हंडाभर चांदण्या' ही एकांकिका गावातील माणसांच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेवते. पाण्याची अभावग्रस्तता या कलाकृतीतून व्यक्त होते. किंबहुना ‘पाणी  समस्या’ ही एका पात्रासारखी संपूर्ण एकांकिकेत वावरत राहते.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील संवाद आणि भाषाशैली : -

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील संवाद हे बोलीभाषेतून येतात. पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये संवादातून जिवंत होतात. तहसीलदार राधिका बावडेकर आणि संभा यांच्या संवादातून सर्वसामान्य माणूस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संवादावर प्रकाश पडतो. 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील संवाद अतिशय अल्पाक्षरी, खटकेबाज आहेत. संवादामध्ये सूचकता आहे. स्थळ-काळ, भावनांच्या अभिव्यक्तीला संवादामुळे जिवंतपणा येतो. तहसीलदार राधिका बावडेकर आणि चंद्रा यांचे संवाद स्त्री भावविश्व व्यक्त करणारे आहेत. 'हंडाभर चांदण्या'  या एकांकिकेतील संवादांमध्ये काव्यात्म लयबद्धता जाणवते. ही एकांकिका एखाद्या दीर्घ कवितेसारखी वाटते. या एकांकिकेतून येणारी लोकगीते एखाद्या कवितेइतकीच दर्जेदार व सकस आहेत. या संवादातून लोकभावना, समूह मानसिकता अचूकपणे व्यक्त होते. संभा, चंद्रा, मास्तर यांच्या संवादातून एक गंभीर, गूढ आशयविश्व उभे राहते. या एकांकिकेची भाषाशैली ही साधी, सरळ व सोपी आहे. त्यातील काही वाक्ये अतिशय सूचक आहेत. मानवी जीवनातील गूढता अभिव्यक्त करणारी भाषाशैली या एकांकिकेतून व्यक्त होते. तसेच पात्र, स्थळ, घटना-प्रसंगांना जिवंत करणारी भाषाशैलीही येते. एकांकिकेतील भाषेत थेटपणा अनुभवाला येतो. पात्रांच्या कृतीतून भाषा साकारत जाते. पात्रांच्या हालचालीतून, कृतीतून भाषेला एक वेगळे रूप येते. 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील भाषाशैलीचा प्रत्यय देणारी काही वाक्यरचना उदाहरण म्हणून पाहूया.

'अन् शिवीचं काय, कोयड्या मातीतून फुफाटाच उडणार ना बाई'!  (पृ.६१) 

'पदाला लागलं आसल तर पोलिसात कम्प्लेट द्या. अन् मनाला लागलं आसंल तर माफी करा.' (पृष्ठ ६३)

'आपण जे जे चांगलं बोलतो ते ते गीतेत आधीचं लिहून ठेवलंय.' (पृष्ठ ६५)

'जे जे सुंदर ते कधीच आपल्या मालकीचं नसतं.' (पृष्ठ ६७)

'ट्यांकरवरती स्वार होऊन सूर्य यकदा उगवावा फकीरबाबाचा गर्दपिसारा मोर होऊन नाचावा.' (पृष्ठ ७१)

'आमच्या कोयड्या नदीत वाळू उकरलेल्या खड्ड्यात हागायला गेलो तरी नेटवर्क सहज मिळतं या गावात.' (पृष्ठ ७२) 

'ट्यांकर पूर्ण रिकामा होईस्तो त्या महापुरुषांच्या पोटात अन्न ठाशित राहावं लागंल.' (पृष्ठ ७५)

 'सूर्य म्हंजी काही पाण्याचा ट्यांकर नाय लागून गेलाय टक लावून पाहायला.' (पृष्ठ७५,७६)

'गाव तेवढा झोपतं माणसं मात्र जागीच राहत्यात’. (पृष्ठ ७७)

'दुष्काळापेक्षा अब्रू महत्त्वाची.' (पृष्ठ ७७)

'इचार आणि बोलणं यात थोडा टाईम ग्याप घ्या बरं!' (पृष्ठ ७७)

'जे जे आपल्याला चांगलं सुचतं ते ते गीतेत आधीच लिहून ठेवलंय म्हणून!' (पृष्ठ८o)

'जगण्याची लढाई दुसर्‍यांना मारून लढता येत नसते बाई.' (पृष्ठ ८३)

आपल्या स्वार्थासाठी दुसर्‍याचं स्वातंत्र्य बळकावणं हे कोणत्या हुशारीत बसतं तुझ्या?’ (पृष्ठ ८४)

'माणसं मरतानाही गाव उजळून जातात...' (पृष्ठ ९३)

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेत वरील प्रकारची वाक्यरचना येते. यात दोन प्रकारच्या अभिव्यक्ती आहेत. यातील काही वाक्ये जीवनाचा अतिशय खोल, गंभीर अर्थ व्यक्त करणारी आहेत. अंतर्मुख करणारी, विचार करायला लावणारी तात्विक मांडणी या एकांकिकेतून येते.

या एकांकिकेतील भाषाशैलीचा विचार करताना अभिव्यक्तीतील त्रागा, राग, आक्रमकता, अस्वस्थता, चीड, संताप हा संयतपणे मांडला जातो. कुठेही आक्रस्ताळेपणा येत नाही. दुःख, वेदना पचवलेला प्रौढ स्वर या एकांकिकेतून व्यक्त होतो. एकांकिकेतील त्रागा, राग, आक्रमकता, चीड, संताप, वेदना, दुःख, अस्वस्थता ह्या उपरोध आणि उपहासाचे काटेरी रूप घेऊन येतात. भाषेतील शिव्या, आक्रमकपणा, आक्रस्ताळेपणा यापेक्षा या भाषेचे रूप अधिक खोल व परिणाम करणारे ठरते. एकांकिकेतील उपरोध आणि उपहास हास्याची निर्मिती करण्‍यापेक्षा कारुण्याची, वेदनेची थेट उभारणी करतो. उपहास व उपरोध यांची मांडणी अतिशय टोकदारपणे येते. या एकांकिकेच्या सकसतेमागील हे महत्त्वाचे सूत्र आहे.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील काव्यात्मकता :

''रिकामं गाव

डोयामधी पाणी

कोयडा देव

डोईवर आणी

सरला भाव 

सरणावर कोणी

उरलं गाव

मरणावर गाणी" (पृष्ठ ६४)

गावाच्या स्थितीवर लोकगीतातून भाष्य केले जाते. गाव रिकामा झाला आहे. माणसांच्या डोळ्यात पाणी आहे, देव मात्र कोरडाच आहे. देवावरील गावाचा भाव सरला आहे. गाव सरणावर जळतो आहे. मरणावर गाणी रचली जात आहेत. 

"सत्तेची देवाला

सुटली हाव

सोडून पळाले

वार्‍यावर गाव

मातीखाली ओल

माणसाचे मोल

भक्तीचा भाव

काळजाशी खोल."(पृष्ठ ७२)

गावाच्या अगतिकतेच्या भावना वरील लोकगीतातून मांडल्या जातात. देव गावाला वार्‍यावर सोडून देतो. देवालाही सत्तेची हाव सुटली आहे. गावच्या मातीखाली मात्र ओल अजूनही जिवंत आहे. माणसाचे मोल कमी झाले आहे. माणसांच्या भक्तीचा भाव तसाच आहे. माणसे काळजात वेदना घेऊन जगतात. एकांकिकेत समूह मानसिकेतील दुःख वरीलप्रमाणे काव्यात्म पद्धतीने व्यक्त होते.

''अंगणी अंधार

वर तार्‍यांचे झुंबर 

वाळलेल्या तुळशीला 

मंजुळेचा भार

एकलीच जळे

बाई उन्हात वार्‍यात

ढेकळात उभी

काळी विठाई तोर्‍यात.'' (पृष्ठ ७९)

वरील ओळींमधून चंद्राच्या जगण्याचा सूर व्यक्त होतो. चंद्राचे एकाकीपण वरील गीतातून व्यक्त होते. वरील लोकगीतातील लय अस्वस्थ करणारी आहे. निराधार स्त्रीच्या जगण्यातील वेदना शब्दातून व्यक्त होते.

"पाखरं

भुरभूर उडती

माळावरती

पंखावरती

इस्तु घेऊन

राख पेरती." (पृष्ठ ८६)

यासारख्या वरील लोकगीतांच्या ओळींमधून पात्रांची मानसिकता व्यक्त होते. वरील लोकगीते एखाद्या सकस कवितेसारखी वाटतात. एकांकिकेतील घटना-प्रसंगातून पात्रांना व त्यांच्या विद्रोहाला, अगतिकतेला या लोकगीतांच्या माध्यमातून अभिव्यक्ती मिळते. या लोकगीतांमधून लयबद्धता अनुभवाला येते. ताल, ठेका अचूकपणे येतो. एकांकिकेतील भाषा ही एका लयीत व्यक्त होते. ही लोकगीतांची लय वाचकाला, रसिकांना खिळवून ठेवते. 

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील पुरोगामी विचार : -

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतून अतिशय स्पष्टपणे पुरोगामी विचार मांडला जातो. कुठलाही ग्रामीण जीवनानुभव अभिव्यक्त करताना नियतीशरण मानसिकता मांडली जाते. दैव, नशीब यांना दोष देत माणसे जीवन जगतात. एकदा पराभूत होणे स्वीकारले की, माणसे प्रयत्नवाद सोडतात. 'ठेवीले अनंते तैसेची रहावे' हा आळशी विचार स्वीकारला जातो. या विचारसरणीतून व्यक्तिगत तसेच समाजाचे नुकसान होते. 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील माणसे लढणारी आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांची, अधिकारांची जाणीव आहे. संविधानिक मूल्यांवर, जीवनमूल्यांवर निष्ठा असणारी माणसे विचारांच्या बाबत झाडाझडती घेतात. देव, धर्म, धर्मग्रंथांची वास्तवाच्या आधारे चिकित्सा करतात. शब्दप्रामाण्य वर्तणुकीचा पुनर्विचार करणारी माणसे 'हंडाभर चांदण्या’त भेटतात. केवळ दुःख, वेदना कवटाळून बसणारी स्थितिशील मनोभूमिका लेखकाने या एकांकिकेत टाळली आहे. या एकांकिकेतील माणसांच्या वागण्यात लढवय्या कृतिशील विचार दिसतो. चळवळीतील तर्कसंगतता या पात्रांच्या कृतीमागे आहे. दुःख, वेदना, शोषणातून कठोरपणे देव-धर्म, धर्मग्रंथांची चिकित्सा करणारी मांडणी या कलाकृतीतून येते. यामुळे ही कलाकृती पुरोगामी ठरते. ही सगळी चिकित्सा उपरोध आणि उपहासातून केली जाते. हा उपरोध, उपहास सनातन मूल्यांची पुनर्तपासणी करण्यास भाग पाडतो. वास्तवातील देव, धर्म व धर्मग्रंथांच्या रूपाविषयी अत्यंत सूचक भाष्य या एकांकिकेत येते. या संकल्पनांमागील स्वार्थी प्रवृत्तींचाही ही कलाकृती वेध घेते. या मांडणीतील सूचकता, तिरकसपणा या कलाकृतीला कलात्मक बनवतो. वरील विचारांचा प्रत्ययासाठी एकांकिकेतील खालील वाक्ये लक्षात घेऊया. 

'देव कुठं दिसतो आपल्यासाठी खेटा मारताना?’ (पृष्ठ ६५)

'गीतेत आधीच लिहून ठेवलय!' (पृष्ठ ६५)

'इतल्या म्हसोबाच्या माळावर जत्रा भरायची. पण पाणी नसल्यांन एक दिवस जत्रा उठून गेली. नि जाता जाता म्हसोबालाबी घेऊन गेली.' (पृष्ठ ७२)

'अन् यकूनच घाबरलेले लोक देवाधर्माच्या नादाला लागत्यात.' (पृष्ठ ७३)

'देव देवळात राहून काय करील? जिथं भाव तिथे देव.' (पृष्ठ ७५)

'पण देव छोटाच निवडा. वाटीभर पाण्यात त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं म्हंजे बास.' (पृष्ठ ७५) 

'काय काय सांगायचं देवाला? काय करील त्यो एकटा तरी?' (पृष्ठ ७८)

'देव पाऊस पाडत नाय! कारण देवाचं वर आता काही धकत नाय! त्यामुळे समदे देव गावागावात, बांधाबांधावर जागा मिळंल तिकडं येऊन बसलेता.' (पृष्ठ ८४)

'हुशारी वापरून धर्मशाळा बांधता येत्यात. हुशारी वापरून मंदिरं हुभारता येत्यात. हुशारी वापरून धर्मगुरूंचे सत्संग भरवता येत्यात.' (पृष्ठ ८४)

'आस्तिकाचा देवधर्म ह्या नास्तिकाच्या भाग्याला.' (पृष्ठ ९३)

वरील वाक्यांमधून या कलाकृतीतील पुरोगामीपण सिद्ध होते.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील समाजवास्तव : -

'हंडाभर चांदण्या' या कलाकृतीतून केवळ दुष्काळ, पाणीप्रश्न मांडला जात नाही; तर या कलाकृतीतून ग्रामीण समाजवास्तव उभे केले जाते. गावात वीज पोहोचली आहे. परंतु वीजेला लोडशेडिंगचा शाप आहे. "काहीच मिळत नाय तुमच्याकडून आम्हाला! नाही म्हणायला एक यस्टी येते! त्योच ह्या गावाचा सगळ्यात मोठा इकास! तीबी अंधार पडल्यावर येते नि उजेड पडायच्या आत गाव सोडून निघूनबी जाते." या वाक्यातून गावाचा विकास आपणासमोर उभा राहतो. हे वास्तव संभा राधिका बावडेकर या तहसीलदारांना सांगतो. तो म्हणतो, “मावळवाडीमध्ये शाळा आहे. परंतु मुले शिक्षण घेत नाहीत. विद्यार्थी दिवसभर पाणी शोधाय बाहेर फिरत असतात बाई! माळरान तुडवत फिरत्यात. शिक्षकांना पगार मिळतो! तेबी फिरत्यात टाईमपास करत. मलेरिया डॉक्टर डफडी वाजवत फिरतो. आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते ग्रामीण भागापासून कोसो दूर आहेत.’’ या सगळ्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर संभा म्हणतो, "नेटवर्कची काळजी करू नका. आमच्या कोयड्या नदीत वाळू उकरलेल्या खड्ड्यात हागायला गेलो तरी नेटवर्क मिळतं या गावात!” या मांडणीतील विरोधाभास समकालीन वास्तवाचा अचूकपणे वेध घेतो. गावोगाव नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्या नद्यांमधील वाळू उपसली गेली आहे. सगळ्या नद्यांमध्ये जागोजाग खड्डे दिसतात. एक भेसूर चित्र सगळीकडे दिसते. निसर्गाला ओरबाडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मोबाईलसाठी नेटवर्क चांगले भेटते, मात्र पाणी मिळत नाही. ही सर्व मांडणी, सूचकता समकालीन समाजवास्तवाला मुळापासून व्यक्त करणारी आहे.

'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील रंगसूचना व वातावरणनिर्मिती : -

रंगसूचना व वातावरणनिर्मिती हे दोन्हीही संहितानिष्ठ घटक लेखक आणि दिग्दर्शक यांना जोडणारा दुवा असतात. 'हंडाभर चांदण्या' ही एकांकिका वेगवेगळ्या स्थळांवर घडणार्‍या घटनांमधून साकारत जाते. संपूर्ण गाव एकांकिकेच्या केंद्रस्थानी आहे. समूहाची मानसिकता मांडणारी ही एकांकिका आहे. या एकांकिकेच्या संहितेत अतिशय स्पष्ट, दीर्घ रंगसूचना दिल्या आहेत. तहसील कार्यालय, मावळवाडी, म्हसोबाचा माळ, चंद्राचे घर या सगळ्या संदर्भात नेपथ्यविषयक रंगसूचना महत्त्वपूर्ण आहेत. वास्तु, वस्तू, व्यक्ती यांच्या संदर्भातील रंगसूचना महत्त्वाच्या आहेत. लोकगीतांची रचना, लोकवाद्य यांच्या संदर्भातील सूक्ष्म रंगसूचना लेखकाने दिल्या आहेत. एकूणच 'हंडाभर चांदण्या’तील वातावरणनिर्मिती अतिशय स्वाभाविकपणे, सहजतेने साधली जाते. ‘हंडाभर चांदण्या’त कृत्रिमता टाळून नैसर्गिक वातावरणनिर्मिती अनुभवाला येते. तहसील कार्यालयातील घटना संवादातून जिवंत होतात. मावळवाडीतील हॉटेल, म्हसोबाचा माळ ही ठिकाणे एकांकिकेच्या संहितेतून डोळ्यासमोर उभा राहतात. पाण्याचे दुर्भिक्ष या कलाकृतीतून प्रत्ययाला येते. समूह मानसिकतेतील खचलेपणा, हताशीपणा उभा करण्यात लेखकाला यश येते. ग्रामीण खेड्यातील गाव, घर, निसर्ग, चांदणी रात्र, उन्हाच्या झळा देणारा दिवस एकांकिकेत साक्षात उभा राहतो. एकांकिकेतील संवाद, नेपथ्य यातून वास्तवाची भीषणता प्रत्ययाला येते.

'हंडाभर चांदण्या'  या शीर्षकाचे वेगळेपण : -

'हंडाभर चांदण्या' हे एकांकिकेचे शीर्षक अतिशय कलात्मक असे आहे. उपेक्षित माणसांच्या माफक गरजा पूर्ण होत नाहीत. अत्यंत छोट्या गोष्टी माणसांना मोठ्या वाटतात. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पाणी मिळत नसेल तर माणसे सैरभैर होतात. पाण्याच्या अभावामुळे हजारो वर्षापासून विकसित झालेल्या संस्कृती लयाला जातात. 'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील माणसांची तहान हंडाभर पाण्यासाठी आहे. ही तहान भागवणारे पाणी सहजरीत्या मिळत नाही. जीवनात काही क्षण अत्यंत मोलाचे असतात. माणूस ते क्षण जपत राहतो. संभा स्वप्न पाहतो. रात्रीच्या अंधारात मावळवाडीत पाण्याचा टँकर आला आहे. माणसांनी टॅंकरमधून पाण्याचे हंडे भरून घेतले आहेत. रात्र असल्यामुळे आकाशात चांदणे आहे. या चांदण्याचे प्रतिबिंब भांड्यातील पाण्यात उमटते. संभाला वाटते की, आतील पाणी हेंडकाळून चांदणे सांडून जाऊ नये. गावातल्या सर्वांचे स्वप्न म्हणजे ‘हंडाभर चांदण्या’ होय. हे स्वप्न भंग पावू नये असे सर्वांना वाटते. सगळ्यांची तहान भागवणारे पाणी संभाला चांदण्यासारखे शांत, शीतल वाटते. आकाशातील शीतल, शांत, थंड चांदणे मावळवाडीत सारखे पडत रहावे असे सगळ्यांना वाटते.

संभा म्हणतो, "दिवसभर वाट पाहण्याच्या आनंदानं मन भरून गेलयं! आता हंडे, कळशा भरल्या, की मंग समद्यांनी त्या खांद्यावर, डोक्यावर घ्यायच्या. हळू चालायचं बरं का समद्यांनी! मास्तर, सांगून ठीवा समद्यांना! कारण भरलेले हंडे डुचमळायला नको!’’ इतके साधे स्वप्न संभा पाहतो. तो आपल्या अपेक्षांचे स्वप्न जपून ठेवू पाहतो. एक साधा अपेक्षापूर्तीचा, स्वप्नपूर्तीचा क्षण कैद करून ठेवणारा संभा चांदण्यांना हंड्यात कैद करू पाहतो. त्यामुळे ‘हंडाभर चांदण्या’ शीर्षक खूप कलात्मक, सूचक व आशयघन ठरते.

---------------

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...