मंगळवार, २१ जुलै, २०२०

दीड दमडीचे प्रसिद्धी लेलूप कचाकडी विचारवंत

॥ "दीड दमडीचे प्रसिद्धी लेलूप कचाकडी विचारवंत "॥

                      ॥ १ ॥
आज प्रसिद्धी मिळवण्याची खूप सारी साधने उपलब्ध आहेत. केवळ प्रसिद्धीतून पैसा मिळवता येतो. पैशातून प्रसिद्धी मिळवता येते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कशाचं ही भांडवल केलं जाऊ शकतं. कोणाचं दुःख, वेदनाही विकली जाऊ शकते. कोणावर झालेल्या बलात्कारच्या विषयतून सुद्धा प्रसिद्धीची पोळी भाजण्यात काही लोक अग्रेसर असू शकतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःचे खाजगी आयुष्य पणाला लावणारी मंडळी असतात. काही लोक आयुष्यभर भाषण विकत राहतात. इतिहासाचे एकांगी मांडणीतून, भावनिकतेतून समाजाच्या हाती काहीच लागत नाही. किंबहुना समाजाचं नुकसान होते. महाराष्ट्रभर भाषण विकणाऱ्या लोकांचा आता एक वर्ग तयार झाला आहे. एके काळी भाषण ऐकणे हे मनोरंजनाचे साधन होते. शिवाजीराव भोसले,व. पु. काळे, पु ल देशपांडे, लक्ष्मण देशपांडे ,शंकर पाटील, द. मा. मिरासदार ,बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या माणसांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांचे कलांचे उपयोजन केले. काहींनी एकपात्री प्रयोग ,काहींनी कथाकथन काहींनी इतिहासाचे गौरवीकरण करून  आपले शब्द विकले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या भावनांची भव्य दिव्य स्वरुपातील मांडणी केली. इतिहासातील घटना प्रसंगांना भावनिक रूप देऊन वीरता, कारूण्यमय स्वरूपात  मांडणी करून  वाह - वाह मिळवण्याचे महाराष्ट्रात थोर थोर प्रयोग झाले आहेत. सुरुवातीच्या काळात लोकांकडे फारशी मनोरंजनाची साधनं नव्हती. वेळच वेळ होता. नुसत्या शिळोप्याच्या गप्पा मारत लोक  घंटाभर बसून रहात . या गावगप्पाना  आणखीन जोड मिळण्यासाठी लोकांचा टाईमपास करण्यासाठी ,वरील प्रकारचे महान महान खेळ सुरू झाले. ते बहरत गेले.यातून समाजाला काही मिळत होते का ?या प्रश्नाचे उत्तर देणे अतिशय अवघड आहे. काही विचारवंतांनी समाजाचे दिशा दिग्दर्शन केले असेल. काही विचारवंतांच्या मांडणीतून समाजात मूलभूत बदल झाले असतील . त्या महान विचारवंतांना तूर्तास बाजूला ठेवू .

                   ॥ २ ॥
चमकोगिरी करून झोळ्या भरणारांचा विचार येथे अपेक्षित आहे.  भाषणांचा, प्रसिद्धीच्या वेगवेगळ्या माध्यमांचा, साधनांचा वापर करून काही लोकांनी चुकीचा इतिहास सांगितला. तरुणांची माथी भडकवली. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे जीवन ,दुःख, वेदना सहजतेने मांडून कष्टकऱ्यांच्या जागण्याचे वरवरचे चित्र मांडून कष्टकऱ्यांना विनोदाचे विषय बनवले गेले. यावर या बऱ्याचं कार्यक्रमातून अभिरूचीचे राजकारण लढवले गेले. कष्टकऱ्यांमध्ये भाषा, मूल्य ,जीवनदृष्टी बाबत न्यूनत्व पेरणारी मांडणी करून कष्टकऱ्यांच्या जगण्याला हास्याचा विषय करून उच्चभ्रू समाजाचे मनोरंजन करण्याचे परंपरा फार सनातन आहे. मुळात व्याख्यानमाला किंवा भाषण ऐकण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात नेमका कोणी सुरू केला. याबद्दल मागोवा घेतला असता काही गोष्टी लक्षात आल्या. महाराष्ट्रातील व्याख्यानमालानां दीडशे वर्षांपेक्षा अधिक जास्त मोठी परंपरा आहे. इसवीसन १८७५ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील पहिली व्याख्यानमाला सुरू केली. न्यायमूर्ती रानडे यांच्या वत्कृत्वोजक सभेने  वसंत व्याख्यानमाला सुरू केली. या उपक्रमाचे महाराष्ट्रभर अनुकरण झाले. आज महाराष्ट्रात ४०० च्या वर सार्वजनिक व्याख्यांमलांचे कार्य सुरू आहे. या सर्व व्याख्यानमालांना एकत्र करून संघटना बांधण्याचे कार्य काही लोकांनी केले आहे. वक्तांची विषय वार यादी उपलब्ध व्हावी. व्याख्यांमालांसाठी अनुदान मागण्याचे सुद्धा जोरदार प्रयत्न झाले आहेत. या सगळ्यातून आजच्या घडीला 'महाराष्ट्र सार्वजनिक व्याख्यानमाला समन्वय समिती पुणे ' या संस्थेची स्थापना झालेली आहे. समितीचे मुख्य कार्यालय पुण्यातील 'टिळक स्मारक मंदिर ' हे ठरविण्यात आलेले आहे . या संस्थेच्या अध्यक्षपदी माननीय जयंतराव टिळक, दीपकजी टिळक या लोकांनी आतापर्यंत भूषवले आहे. हा इतिहास सांगण्यापाठीमागे एकूण भाषण ऐकणारा, व देणार्‍यांचे हेतू स्पष्ट व्हावे ही अपेक्षा आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या गरजेतून, अभिरुचीतून व्याख्यानमालांचा  जन्म झाला. या सगळ्या व्यवस्थेवर आजही अभिजनांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व टिकवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था नवनवे रूपे धारण करत आहे. या सगळ्या प्रस्थापित व्यवस्था व अभिजनांच्या अभिरुचीच्या उपक्रमांचा समाज जीवनावर काय परिणाम होतो ?  नेहमी समाजातील अभिजनांच्या अनुकरणातून खालचा समाज स्वतःचे अभिजनीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजनांच हुभे हुभ अनुकरण  इतर  समाजाला करता येत नाही. कोणत्याही क्षेत्रात संख्यात्मक वाढीतून गुणात्मक वाढीकडे दुर्लक्ष होते. जस जसं बहुजन समाज वेगवेगळ्या क्षेत्रात स्थापित होतो तस तसा त्या क्षेत्रातील मूलभूत चौकटीला धक्का पोहोचतो. यातून एक नवीनच अर्धवट व्यवस्था उभी राहते. गेल्या विशेषता पन्नास वर्षातील व्याख्यानमालांचे स्वरूप व त्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करत आहे. 
                        ॥ ३ ॥
हळूहळू व्याख्यानमाला मधून ब्राह्मणी टक्का कमी झाला. शहरातील वाढत्या जागतिकीकरणामुळे नव्या साधनांच्या आगमनामुळे ब्राह्मणी व्यवस्थेचा अशा सामाजिक उपक्रमातील सहभाग कमी झाला. ब्राह्मण लोकांच्या रिकाम्या जागांवर बहुजन स्थापित झाले. आणि नव्या विचित्र जुगाडी व्यवस्थेचे पर्व सुरू झाले. महाराष्ट्रातील मुंबई पुणे शहरात दीर्घ परंपरा असणार्‍या व्याख्यानमाला धडाधड बंद पडत आहेत. पुण्यातील मसापच्या विविध व्याख्यानमालाना किती लोक उपस्थित असतात याविषयी न बोललेलं बरं. शहरातून व्याख्यानमाला हद्दपार होण्याच्या वाटेवर आहेत.  अभिजनांच्या व्यवस्थेविषयी आकर्षण असलेल्या बहुजन या क्षेत्रात मोठ्या संख्येने उतरत आहेत. तालुकावजा शहरात मोठ्या प्रमाणात नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे. शिक्षक, बँक कर्मचारी ,डॉक्टर, वकील, प्राध्यापक, छोटे-मोठे व्यवसयिक ज्यांच्याकडे पैसा आहे पण प्रसिद्धी नाही. समाजात ओळख नाही. समाजात ओळख ,प्रसिद्धी निर्माण करण्याची चाह या वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. प्रसिद्धीचे खाज भागवण्यासाठी अर्धशिक्षित समाजात स्वतःला स्थापित करण्यासाठी ही मंडळी जोमाने कामाला लागले आहेत. तालुका वजा शहरात आजही दोन ते चार टक्के ब्राह्मण टाका शिल्लक आहे.  हा टक्का इतर बहुजन समाजातील व्यवस्थेला अनुकूल असलेल्या लोकांना सोबत घेऊन व्याख्यानमालांचे ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रभर करत आहे. मुळात ब्राह्मणी वृत्तीतून निर्माण झालेली ही व्यवस्था बहुजनांना वेगवेगळ्या कारणासाठी आकर्षित करत आहे . महाराष्ट्रभर प्रसिद्धीचा हव्यास असलेला वर्ग उदयाला आला आहे . या वर्गाची गरज भागवण्यासाठी व्याख्यानमला, संस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे ठरत आहेत. महाराष्ट्रभर तेच ते वक्ते आणि तेच तेच विषय घेऊन काही मंडळी सार्वजनिक पैशाने प्रवास करत आहेत. काही मंडळींनी व्यवस्थेचे गमक लक्षात घेऊन कार्यक्रम हाती घेतले आहेत. काही प्राध्यापक मंडळी, कलावंत मंडळी, बुजुर्ग विचारवंत, लेखक मंडळी या व्याख्यानमालामधून विचारांची प्रभा पाडत आहेत.काही प्राध्यापक मंडळी आपल्या अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून पैसा ,प्रसिद्धी मिळवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. स्वतःचा व्यासंग, विदवत्ता, कलात्मकताची स्वतः जाहिरात करून समाजा मनावर ठसवत आहेत. समाज माध्यमातून आपली हसरी  मुद्रा मिरवून स्वतःला स्थापीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या गावात कुणीचं विचारत नाही. परंतु दूरदूरच्या गावांमध्ये ही मंडळी कला उर्फ सुमार सादरीकरण विकत आहेत. रोजच्या नैमत्तिक कार्याकडे साफ दुर्लक्ष करून, चुकवेगिरी करून मिरवणारे लोक संख्येने वाढत आहेत. बुजूर्ग कलावंत मंडळींना चालू व्यवस्थित कुणी हिंग लावत नाही. अशी मंडळी ढेरपोट्या अवस्थेत विविध कार्यक्रम करत आहेत. साधारण वयस्कर असणारे कलाकार सादरीकरणातून या व्यवस्थेतून थोडा फार पैसा मिळवत आहेत. बुजुर्ग विचारवंत ,लेखक  म्हणून घेणारी पिलावळ महाराष्ट्रभर तयार झाली आहे. अत्यंत सुमार कलाकृती लेखन कार्य केलेले सुमार लोक व्याख्यानमालेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून कला सादर करत आहेत. या सगळ्या मंडळींना लोक सहन का करतात ? त्याला कारण आहे या व्याख्यामालांच्या ,सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात राजकारणी मंडळी व त्यांची पिलावळ असते. ही मंडळी संपूर्ण समाजाला वेठीला धरून हे कार्यक्रम घेतात. राजकारणी मंडळी दादागिरी करून गरीब लोकांना पावत्या, वर्गणी देण्यास भाग पडतात. मोठमोठे श्रीमंत उद्योजक ,व्यापारी, प्रतिष्ठित डॉक्टर ,वकील यांच्या बायकांचा समावेश तुम्हाला या उपक्रमात हटकून दिसतो. घरात बसून कंटाळलेल्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या बायका या उपक्रमांमध्ये दिसतात. आबाल वृद्धांना वेठीस धरून हे सगळे कार्यक्रम घेतले जातात. एखाद्या गावातील मोठी शाळा, महाविद्यालयाला केंद्र करून हक्काचे रसिक, प्रेक्षक मायबाप जमवून हे प्रसिद्ध लोलूप वृत्तीचे लोक आपली खाज भागवून घेतात. यामध्ये एखादी शाळा किंवा महाविद्यालय व्यवस्थापनातील मंडळी आणि राजकारणी मंडळी यांच्या एकत्रीकरणातून हा सर्व सांस्कृतिक, वाङ्मयीन ,व्याख्यानमालांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रमातून होणाऱ्या भाषणाचे, कार्यक्रमांचे स्वरूप हे खास  टिपिकल असते. गेल्या तीस ते चाळीस वर्षात या  प्रसिद्धीचाटू लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे . काही तर स्वतःच्या खर्चाने येतात. पण मला भाषण करू द्या . असं म्हणतात . तुम्ही फक्त बोलवा असा एक सर्वसाधारण गट या मंडळींत असतो. दुसरा गट येण्याजाण्याचे नाममात्र शुल्क घेऊन या भाषणांच्या कार्यक्रमांना हजर राहतो . पण तिसरा गट हा जास्त धूर्त असतो .  गाडीचा खर्च, ड्रायव्हराचा वेगळं खर्च, जेवणाचा खर्च वेगळा, वरून मानधन घेणारा हा वर्ग असतो. या वर्गाचे आयोजकांशी लागेबांधे असतात . हितसंबंधातून या लोकांना हे आर्थिक लाभ भेटत असतात. हे लोक भाषणातून काहीच नवीन सांगत नाहीत. इतिहासातील, समाजसुधारकांच्या जीवनातील घटना-प्रसंग अतिरंजितपणे मांडून ही मंडळी वेळ मारून नेतात. शिवव्याख्याते ,भीमव्याख्याते, धर्मव्याख्याते फक्त भावनिक, जोर जोरात  बोलून भोळ्याभाबड्या लोकांचे रंजन करतात. समोर बसलेल्या समाजाचे मानसशास्त्र, मानसिक जडण-घडण लक्षात घेऊन महापुरुषांच्या जीवन पट अतिरंजित रूपात मांडले जातो. भावनिक होऊन लोकांना हातबल  बनवणारे हे विचारवंत असतात. समाजाच्या भावनांशी खेळून  लोकांना पंगू बनवणारे दिडदमडीचे व्याख्याते, कलावंत समाजाचं मोठं नुकसान करत आहेत. समाजातील सदविवेक, सम्यक विचार मारून भावनिक अस्थिरता निर्माण करत आहेत. असमतोल विचार मांडून समाजाला अस्थिर करत आहेत. हा सगळा खटाटोप कशासाठी ? घटकाभर प्रसिद्धीसाठी ? सेल्फीच्या लाईकसाठी ? फेसबुकच्या लाईकसाठी ? आभासी व्हाट्सअपच्या खोट्या अभिनंदनासाठी ? समाजातील विवेकाचा आपण खून करत आहोत. असे या लोकांना वाटत नाही. एक शिव व्याख्याता शिवाजी महाराजांचे मोठेपण सांगण्यासाठी समकालातील घटना ,प्रसंग सांगतो . समकालातील दंगलीचा प्रसंग सांगतो. हा प्रसंग सांगताना तो एखादी अश्लील कथा रंगवून सांगितल्यासारखी ही गोष्ट सांगतो. समोरच्या समाजाच्या भावनांना हात घालून स्वतःचा मोठेपणा मिळवणारे हे भाषण करणारे समाजद्रोही आहेत. काहीतरी भव्य दिव्य आपण कार्य करत आहोत असे बॅनर, जाहिराती 'स्व'मोठेपण मिरवणारी ही वृत्ती अतिशय घातक आहे. संपूर्ण समाजाच्या भावनांशी खेळून प्रसिद्धी मिळवणाऱ्या नतद्रष्ट लोक समाजाचे दोषी आहेत. समाजात असे नतद्रष्ट लोक उजळ माथ्याने फिरत आहेत. या लोकांना कितीही बोला ते लाजत नाहीत. विशेषतः स्री व्याख्याते ,कलावंत सनातनी विचार मांडतात. समाजातील महापुरुषांच्या नावाने प्रसिद्धीचा कटोरा घेऊन गावोगावी फिरणाऱ्या वृत्तींना आवर घालण्याची गरज आहे. महापुरुषांच्या जीवनातील तेच ते प्रसंग, घटना सांगणे. महापुरुषांच्या विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी न करता सोयीने मांडणी करणारे विद्वान समाजद्रोह करत आहेत.

                    ॥ ४ ॥
 अनेक वेळा विशिष्ट समाजसुधारकांच्या जातीतील अनुयायी  समोर बसलेले असतात. त्यांच्याच जातीतील वक्ता त्यांचेचं दुःख त्यांच्या समोर मांडत असतो. हा सगळा कृतक  सोहळा करून काही लोकांना प्रसिद्धी मिळते. ही मंडळी प्रसिद्धीसाठी काहीही करण्यास तयार असतात. स्वतःचे कार्यक्रम, भाषणे स्वतःचं आयोजित करून प्रसिद्धी मिळवणारे काही अल्पसंतुष्ट विचारवंत  असतात. हे सगळं प्रस्थापित अभिरुचीला अनुकूल असणारं आहे. प्रस्थापित व्यवस्था कायम करण्यासाठी बिनडोक, प्रसिद्धीला हपापलेले लोक साधन म्हणून वावरत आहेत. या मंडळींना आपला उपयोग केला जातो आहे. यातील जाणीवपूर्वकता लक्षात येत नाही.आभासी वास्तवातील प्रसिद्धीसाठी हे लोक जीव ओवाळून टाकत आहेत. खरं तर ही मंडळी समाजावरून ओवळून  टाकण्यासारखी आहेत.
पुरोगामी विचार मांडणारेही चुकीचा इतिहास सांगतात. दाखले आणि तेच ती उदाहरणे देतात. एकांगी मांडणीतून समाजाचे मन जिंकता येते. लोकांना काही वेळासाठी गुंगीचे औषध देणारी भाषणे, कार्यक्रम समाजात विष पेरतात .या विचारातून पेटलेले भूसुरुंग समाजाला उद्ध्वस्त करतात.

                ॥ ५ ॥
 महापुरुषांच्या नावाने सोंग घेऊन काही लोक बोलत राहतात. काही जण माँ साहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, छ.शिवाजी महाराज यांच्या भूमिका घेतात. यातून महापुरुषांचे विटंबन होते. पंरतु अस्मिता टोकला गेल्यामुळे तसे कोणाला वाटत नाही. खोटी वेशभूषा,अलंकार गळ्यात घालतात. लोक त्यांच्या बहूरूपाचा आदर  करतात. अर्धा काम तिथेच होऊन जातं.काहीतरी कर्णकर्कश्य, वेगवेगळे आवाज काढून, नकला करून, मुख्यतः भावनिक आवाहन करून समाजातील भावना अंजरत- गोंजरत  कार्यक्रम घडू लागले आहेत. महानगरातील ,शहरातील लोक या कार्यक्रमांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तालुक्याच्या शहरात जाती, वर्ग, पंथ यांचे बुरुज पक्के असतात. पब्लिक गोळा करण्याचे करणाऱ्या संस्था असतात. अनेकांच्या प्रसिद्धीची खाज ,शूद्र राजकारणी अशा प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत आहे. राजकारणी लोक मॉब जमवून स्वतः ची छबी निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमांचा वापर करतात.धूर्त राजकारणी प्रसिद्धीसाठी हे सगळं करतात . समाजासाठी, जातीसाठी आपण काही तरी करतो आहोत ,ही भावना प्रबळ होण्यासाठी याचा उपयोग होतो .
 पूर्वी लोकांच्या अंगात यायचं. देवी अंगात घुमायची. भीतीपोटी , श्रद्धेपोटी लोक अंगात आलेल्या माणसांचा आदर करत. तसेच आता काही लोकांच्या अंगात महापुरुष येतात. महापुरुषांच्या श्रद्धेपोटी, आदरापोटी या भाषणावाल्या प्रसिद्धीचाटू  लोकांना आदर भेटतो. हे लोक या सामाजिक भावनांचं भांडवल करून तुंबड्या भारतात. अशा लोकांना कोणी अडवत नाही. श्रद्धा ,भावना प्रचंड टोकदार झाल्यामुळे या लोकांची दुकानदारी चालते. या सगळ्या प्रवृत्तीमागे प्रसिद्धी आणि अर्थकारण यांचा प्रभाव आहे. या भावनिक भाषणबाजीचा राजकारणातील भाव वधारला आहे. गेल्या बाजारी असे लोक विविध पक्षाचे आमदार, खासदार ,पदाधिकारी बनत आहेत. हे समकालीन वास्तव भीषण आहे. नवीन शाळा ,महाविद्यालयातील पोरं समाज माध्यमांमधून अशा भिकारचोट लोकांचे विचार  अवगत करता आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचा या सगळ्यात फायदा आहे. मूळ विचारांची चिकित्सा होणार नाही. यासाठी हे लोक फायदेशीर आहेत . या प्रसिद्धलेलूपांची, सगळ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमाची प्रसिद्धी फार जोरात होते. ते अर्धवट लोक स्वतःची प्रतिमा उजळ करून कार्यक्रमाचे निमंत्रण मिळवण्यात पटाईत झाले आहेत. छोट्या छोट्या पेपरच्या मॅनेज बातम्या, फोटो, व्हिडिओ टाकून समाजात आपण फार थोर कार्य करत आहोत असा समज हे लोक करून देत आहेत. या लोकांनी  सांस्कृतिक अभिरुचीचे राजकारण ओळखणे गरजेचे आहे. प्रसिद्धीलोलूप  वृत्ती-प्रवृत्तीना वेळीच आळा घलणे गरजेचे वाटते.
----------------------------------------------
धन्यवाद !!!
-------------------
डॉ. गणपतराव ढेंबरे 
मराठी विभाग ,
श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका रावेर जिल्हा जळगाव 
पिन -४२५५०८
मोबाईल नंबर -९४२१०८१२७० ई-मेल-dhembregr@gmail.com

रविवार, १२ जुलै, २०२०

मराठी अभ्यासक्रम

॥"मराठी वाङ्मयाचे अध्ययन आणि अध्यापना पुढील प्रश्न ? " ॥

                        ॥ १ ॥
इंग्रजांच्या भारतातील आगमनानंतर त्यांनी स्वतःहून गरजेपोटी भारतीय समाजाला शिक्षण देण्यास सुरुवात केली. काही एक योजना बांधून शिक्षणाचा इंग्रजांनी प्रसार केला. विज्ञानाच्या मूलभूत ज्ञान शाखांचे अध्ययन भारतीय समाज करू लागला. मानव्यविद्याशाखांतील ज्ञान भारतीय समाजाला देणे गरजेचे आहे. असे उदारमतवादी इंग्रजांना वाटले. यातून तत्त्वज्ञान, इतिहास ,भूगोल समाजशास्त्र ,तर्कशास्त्र इत्यादी विविध ज्ञानशाखांचे अध्ययन भारतात सुरू झाले. याबरोबरच इंग्रजी साहित्य आणि भाषा यांचे अध्यापन व अध्ययनला प्रारंभ झाला. एकोणिसाव्या शतकात शिक्षित पिढ्या भारतात तयार होऊ लागल्या. या नवशिक्षित पिढ्यांना इंग्रजी वाङ्मयातील उपरेपणाची जाणीव होऊ लागली .यातून अनुवादित ,भाषांतरित साहित्याची लाट आली. इंग्रजीतून, संस्कृतमधून उत्तम वाङ्ममयीन कलाकृतींचे भाषांतर, अनुवाद घडू लागले. या सगळ्या पार्श्वभूमीतून  आधुनिक मराठी साहित्याचा प्रारंभ व विकास झाला. हळूहळू शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले. समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित होत गेला. या साक्षर वर्गाच्या नव अभिरुचीच्या गरजेतून मराठी साहित्याची निर्मिती वेगाने होऊ लागली. या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या वाङ्मय निर्मितीवर इंग्रजांचा त्यांच्या अनुकरणाचा प्रभाव अधिक होता. विसाव्या शतकात शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले होते. मराठी वाङ्मयाची निर्मितीही वेगवेगळ्या प्रेरणामधून संख्यात्मकदृष्टी व गुणात्मकदृष्ट्या वाढत होती. नव्याने अनेक विद्यापीठांची निर्मिती झाली. स्वातंत्र्याच्या टप्प्यावर आपण पोहोचलो होतो.

                          ॥ २ ॥
 स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून स्व देश ,स्व भाषा, स्व संस्कृती यांच्याबद्दलच्या गौरवीकरण्याच्या भावना प्रबळ होत होत्या. यातूनच मराठी वाङ्मय आणि भाषा अशा मिश्र अध्यापन, अध्यायनाला सुरुवात झाली. शिक्षण घेणाऱ्या वर्गाच्या भावना लक्षात घेऊन प्राचीन मराठी वाङ्मयातील कलाकृतींचे अध्ययन व अध्यापन केले जाऊ लागले. संस्कृत भाषेच्या प्रभावातून पंडिती परंपरेतील दुय्यम वाङ्मयीन मूल्य असलेल्या कलाकृतींचे अध्ययन व अध्यापन सुरू झाले.शिक्षण घेणाऱ्या आणि देणाऱ्या वर्गामध्ये उच्चवर्गीय जातींचा भरणा अधिक होता. त्यातून पंडिती वाङ्मयातील आंबट कलाकृतींचे मनःपूर्वक अध्यापन, अध्ययन सुरू झाले. विसाव्या शतकातील मराठी वाङ्मयातील कलाकृतीही अध्ययनाला, अध्यापनला होत्या. हळूहळू विज्ञानाचे महत्व वाढत होते. रोजगाराच्या नव्या संधी तयार होत होत्या. अभियांत्रिकी, मेडिकल, विज्ञानाच्या मूलभूत ज्ञान शाखांमधील रोजगारच्या संधी डोळ्यासमोर ठेवून उच्चवर्णीय जातींचे मानव्यविद्याशाखांच्या अध्ययन-अध्यापनकडे दुर्लक्ष होऊ लागले. हळूहळू या समाजाला सिलिकॉन व्हॅलीचे स्वप्न पडू लागले.
 महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढत होता.१९६० नंतरच्या काळात महाराष्ट्रभर नवीन महाविद्यालय सुरू झाली होती. ही महाविद्यालय सुरू करण्यात उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचा मोठा वाटा होता. काँग्रेसच्या नव राजकारणामुळे सत्ताकारणामुळे ब्राह्मणापेक्षा संख्यात्मक अधिक असणाऱ्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या जातीतून नवे नेतृत्व उभे राहात होते. या नव्या नेतृत्वाने शाळा-महाविद्यालयांच्या स्थापनेला सुरुवात केली. या महाविद्यालयांच्या स्तरावर मराठी वाङ्मयाचे अध्ययन व अध्यापन सुरू झाले.विसाव्या शतकातील लेखक त्यांच्या कलाकृतींचे अध्ययन ,अध्यापन सुरू झाले होते. या नव महाविद्यालयात अध्यापन करणारा  ब्राह्मण वर्ग मोठ्या संख्येने होता. याबरोबरच कृषीक जातीतील श्रीमंत काही लोक अत्यंत कमी प्रमाणात अध्यापनात होते. आता अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अर्ध्या पेक्षा थोडे कमी ब्राह्मण जातीतील तितकेचं कृषीक जातीतील लोक तर १० -२०% इतर उपेक्षित जातीतील लोक होते. वाङ्मयाच्या अध्यापनातील सैद्धांतिक व्यूह अत्यंत स्पष्ट असणारा असा हा आध्यापक वर्ग होता. इसवी सन १९६० ते १९९० या काळात नवशिक्षित सर्व जातीतील वर्ग तयार झाला.लोकसंख्या वाढत होती. त्याला अनुसरून नवे शाळा, महाविद्यालये तयार होत गेले. हळूहळू ब्राह्मण वर्गाने नव्या संधीचा शोध घेतला. नव्या क्षेत्रांचा लाभ व मार्ग दर्शन प्राप्त झाल्याने पारंपारिक क्षेत्राकडे ब्राह्मण वर्गाचा ओढा कमी झाला. नव्या संधीचे मार्ग खुले झाल्यामुळे ब्राह्मण वर्गाचे मोठ्या प्रमाणात स्थांनातर झाले. त्यातून खाली झालेल्या वाङ्मयीन अध्यापनाच्या रोजगाराच्या संधीमध्ये कृषक समाजातील नवशिक्षित वर्ग जोराने शिरू लागला. ब्राह्मण वर्गाने शिक्षणाच्या प्रणालीवर आपले वर्चस्व अजून कायम ठेवले होते. यातून अध्यापनाच्या क्षेत्रातील ब्राह्मणी वर्चस्वाला अजून धक्का पोहोचला नव्हता. ब्राह्मणी अभिरुची लक्षात घेऊन मराठी वाङ्मयाचा अभ्यासक्रम तयार केले जात होते. शिकणारे आणि शिकवणारे संख्येने जास्त कृषक जात समूहातून आले होते. परंतु ब्राह्मणी वर्चस्वाला, अभिरुचीला धक्का देण्याची क्षमता या नवशिक्षित वर्गात नव्हती उरल्यासुरल्या ब्राह्मण वर्गाने कृषीक जातीतील काही लोकांशी युती करून ब्राह्मणी अभिरुची ,वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. केशवसुत ,गोविंदाग्रज ,खांडेकर , फडके ,पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, बोरकर पु. शि . रेगे, व्यंकटेश माडगूळकर ,द मा मिरासदार शंकर पाटील यांच्या बरोबरीनेच कुसुमाग्रज, मर्ढेकर, गाडगीळ यांच्या कलाकृतीचे मराठी वाङ्मयात अध्यापन ,अध्ययन सुरु ठेवलेले दिसते. इसवी सन १९९० नंतर तोंडी लावण्यापुरते ग्रामीण, दलित साहित्यातील एखादी कलाकृती अभ्यासक्रमाला ठेवल्या जात होत्या.
आजही एखाद्या लेखकाला, कलाकृतीला मान्यतेची मोहर हवे असल्यास ब्राह्मणी समीक्षेची, समीक्षकाची पाठीवर थाप हवी असते. कलाकृती, लेखक उत्तम असूनही मान्यतेसाठी ब्राह्मणी नियतकालिकाला शरण जाणारी  मनोभूमिका ही खास प्राचीन अशी आहे. आजही काही नियतकलिकात लेख छापून आल्यास लोक भावूक झालेले आम्ही गेल्या बाजारी पाहिले आहेत . असो !

 पुण्यातील एका ब्राह्मण जातीचे वर्चस्व असलेल्या महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक १९९५-९६ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना एक वक्ता म्हणाला हा शेवटचा पेशवा सत्तेतून जात आहे. हे विधान वाङ्मय अध्यापनाच्या जातीय मानसिकताकडे लक्ष वेधणारे आहे. याला काही लोक साक्ष आहेत. इसवी सन १९९० नंतर महाराष्ट्रात कृषक जातीच्या राजकारणाचा उदय झाला. या जातींनी  सत्तासंबंध राखण्यासाठी शाळा, महाविद्यालय सुरू केली. आता मराठी वाङ्मयाच्या अध्यापनात आणि अध्ययनात अर्ध्या कृषक जातीची संख्या  तर  अर्ध्याला थोड्या कमी उपेक्षित जाती संख्या तर ५-६% ब्राम्हण वर्गाचे लोक होते. मूळच्या कृषक जातींच्या सत्तासंपादनातून नवी अस्मिता तयार झाली होती. ब्राह्मण वर्गातील ५ - ६ % वाल्यांना कृषक जातीतील लोक शाळा-महाविद्यालयात नोकरीवर घेईनासे झाले. आपल्या जातीतील लोक मिळत असताना दुसरे कशाला घ्या ?असा रोखठोक व्यवहार यामागे होता .
                     ॥ ३ ॥

 इसवी सन २००० सालापर्यंत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या मराठी विषयाच्या विभागांमध्ये केवळ ब्राम्हण वर्गाचे वर्चस्व असलेले दिसते . त्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृषक जातींनी या पदाकडे आपला मोर्चा वळवला. इसवी सन २००० सालानंतर महाराष्ट्रातील कृषक जाती व आरक्षणामुळे इतर जातीतील लोक या पदाकडे वळले. किंवा त्यांनी ती पदे मिळवली. इसवी सन २००० नंतर  महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या मराठी विषयच्या विभागांमधील विभागप्रमुखांची नावे डोळ्यासमोर घ्या.

 पारंपारिक पदव्युत्तर व पदवी पातळीवरील शिक्षणात आता बऱ्यापैकी कृषक जाती व उपेक्षित जातीचा टक्का वाढला होता. ब्राह्मणेतर जातींना सत्ता तर मिळाली. पण ती राबवायची कशी ? असा प्रश्‍न होता. यातून मराठी विषयाच्या अध्यापनात उरल्यासुरल्या ब्राह्मणांनी कृषक जातींना  फोडून आपल्या सत्ता वर्चस्वला राखण्याचा प्रयत्न केला. इसवी सन २००० नंतर मराठी विषयाच्या अध्यापनात ,अध्ययनात अर्ध्या कृषक जाती आणि तितक्याचं उपेक्षित जातीतील लोक होते. वाङ्मयाच्या अध्यापनातील ,अध्ययनातील गांभीर्य कमी झाले होते. सांस्कृतिक व्यवस्थेत ब्राह्मणी वर्चस्व राखण्याचे नवे मार्ग निर्माण झाले होते. सुमार विद्यार्थीवर्ग मराठी वाङ्मयाच्या अध्यायनाकडे वळू लागला होता. या पातळीवरही मराठी वाङ्ममयाच्या अध्यापनावर, अभ्यासक्रमावर ब्राह्मणी विचारांचा पगडा होता. महात्मा फुले यांचे पुस्तक अभ्यासक्रमांत लावण्याचे धाडस लोक करू शकत नव्हते. ते धाडस करण्यासाठी कृषक जातीतील नेतृत्व पुढे यावे लागले. २००६-०७ नंतर मराठी वाङ्मयाच्या अध्यापनाचा ,अध्ययनाचा, अभ्यासक्रमाचा दर्जा वेगाने घसरू लागला. संपूर्ण व्यवस्थेत हितसंबंधांचा नवा जन्म झाला. यातून वेगवेगळ्या विद्यापीठातील अभ्यासक्रम निर्माण करणाऱ्या लोकांच्यात हितसंबंधांचा पूल तयार झाला. तुझ्या विद्यापीठात माझे पुस्तक लाव. माझ्या विद्यापीठात तुझे पुस्तक लावतो. असा प्रकार अभ्यासक्रमात होऊ लागला. आणि हा सगळा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादला गेला. काही प्राध्यापक वर्गाने स्वतःची प्रकाशने काढून अभ्यासक्रमातील कलाकृतीबदल ढवळा ढवळ केली. पूर्ण वेळ प्राध्यापकाची नोकरी असताना प्रकाशन व्यवसाय कसा काय करता ? प्रत्येक महाविद्यालयात जाऊन पुस्तके कसे काय विकता ? हा धंदा चालवण्यासाठी अभ्यासमंडळ ताब्येत घेण्यात काही मंडळींना यश आले . या मंडळींना नैतीक वगैरे प्रश्न विचारण्याची सोय कुणाकडे नाही. प्रकाशन व्यवसायातील लाखो रुपयांच्या ऊलाडालीचा अभ्यास मंडळाशी व अभ्यासक्रमाशी जवळचा संबंध आहे.
त्या राजकारणात आपण पडू नये. ती सगळी मोठी माणसं !!

 २००० साला नंतर कृषक जातीतील लोक शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाच्या उच्च स्थनावर पोहोचले. भ्रष्टाचारी, निर्ढवलेली माणसे या सत्ता संबंधावर वर्चस्व राखत आहेत. २००५-०६ नंतर कृषक जातीतील विद्यार्थ्यां कलाशाखांमधून कमी होऊ लागले. अर्ध्या पेक्षा खूप कमी टक्यांपर्यंत हा टक्का खाली आला. अर्ध्या पेक्षा खूप जास्त पर्यंत उपेक्षित जातीचा टक्का आला . किरकोळ संख्येत आता ब्राह्मण जातीतील विद्यार्थी मराठी वाङ्मयाचे अध्ययनात शिल्लक राहिले. उपेक्षित, वंचित विद्यार्थ्यांना दुसऱ्या कोणत्याचं संधी नसल्यामुळे हे या कौशल्यहीन शिक्षणात टिकून राहिले.२०००नंतर विद्यार्थींचा वाङ्मयाच्या अभ्यासक्रमाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन गंभीर राहिला नाही.  काहीही अभ्यासक्रमाला लावा. आम्ही आपले गाईड बाजारातून घेऊन येऊ . एका रात्रीत गाईड वाचू आणि पास होऊ . हा नवा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये तयार झाला. वाङ्मयाचे अभ्यासक्रम, अध्यापन आणि अध्ययन यांचा दर्जा पार मागणी तसा पुरवठा या बाजाराचे रूपत आला. या सर्व प्रक्रियेतून दिवसेंदिवस मराठी वाङ्ममयाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड घटत आहे. कौशल्यहीन, पदवी प्रमाणपत्र देणारा अभ्यासक्रम तयार होत आहे. अत्यंत सुमार कलाकृती अभ्यासक्रमात येत आहेत. या सुमार कलाकृतींसाठी सुमार संदर्भ ग्रंथ अभ्यासक्रमात येत आहेत .केवळ तू मला खुश कर. मी तुला खुश करतो. यापलीकडे लोक जायला तयार नाहीत. कृषक जातीतील हितसंबंधांना प्राधान्य देणारी नवी व्यवस्था बांडगुळासारखी वाढत आहे. वेगाने मराठी वाङ्मयचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थींची संख्या कमी होत आहे. रोजगार मिळणार नसेल तर तो अभ्यासक्रम शिकून तरी काय फायदा ? असा रोखठोक सवाल विद्यार्थी विचारत आहेत. मराठी वाङ्मयाचे अध्यापन करणारा प्राध्यापक वर्ग केवळ स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी झटत आहे. विद्यापीठाच्या व यूजीसीच्या नियमाला अनुसरून बौद्धिक कृती करणारा प्राध्यापक वर्ग पोटभरू झाला आहे. हा वर्ग समाजाला काहीच देऊ शकत नाही. अशा बिकट काळातही प्राध्यापक वर्ग हेवे-दावे ,कंपूशाहीत गुंतून पडला आहे . समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याची क्षमता नसलेला कूपमंडूक प्राध्यापक वर्ग आत्ममग्न झाला आहे.
                  ॥ ४ ॥

 मराठी वाङ्मयाच्या ,भाषेच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी काहीच मौलिक परिवर्तन घडत नाही. किंबहुना कूपमंडूक प्राध्यापक वर्गाला बदल नकोच आहेत. आहे तसे चालू द्या.असं म्हणणारा हा वर्ग फार दिवस ढकलू शकणार नाही असे वाटत.  मोठ्या प्रमाणात सगळ्याच पारंपरिक शिक्षणाच हेच होताना दिसत आहे. नोकरीतील बढती , विविध समित्यांवर नियुक्ती,पगारात वाढ यासाठी महाराष्ट्रभर हजारो ग्रंथ निघत आहेत . हजारो शोधनिबंध छापले जात आहेत. यातून कुणाचं भलं होत नाही. वांझोट्या वाङ्मयीन व्यवहारातून समाजाला काहीच मिळत नाही. पुस्तकांच्या कागदासाठी नुसतीच झाडे तोडली जात आहेत.

 प्रसिद्धी, मानसन्मान मिळवण्यासाठी छोट्या सावलीचे लोक एकत्र आले आहेत. महाराष्ट्रभर वाङ्मय व्यवहारात वावरणाऱ्या लोकांचे लागेबांधे निर्माण झाले आहेत. तुझ्या गळा ,माझ्या गळा, गुंफू हितसंबंधांच्या माळा .असा वर्ग वाढला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील सुमार रद्दीतून भविष्य शोधणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आपण नुकसान करत आहोत. याबद्दल कुठली खंत ना खेद या वर्गात दिसून येतो.
मराठी वाङ्मयाच्या अध्यापनात, अध्ययनात ,अभ्यासक्रमात जातीय मानसिकतेने कळस गाठला आहे. अभ्यासमंडळातील लोक बहुमताच्या जोरावर आपल्या जातीतील लोकांच्या कलाकृती अभ्यासक्रमाला लावत आहेत. आपल्या जातीच्या अस्मितांचे मोठेपण जपणाऱ्या कलाकृती अभ्यासक्रमाला लावल्या जात आहेत. अभ्यास मंडळातील उपेक्षित वर्गातील प्रतिनिधी हातबलपणे हे सगळं पाहात आहेत. त्यांना खूष करण्यासाठी त्यांचीही एखादी ,दुसरी कलाकृती अभ्यासक्रमाला लावून उपकृत केल्याची, दातृत्वाची भावना ही मंडळी जपत आहेत. वाङ्मयीन मूल्य, विचार मूल्य ,दर्जा यांच्यापेक्षा जातीय अस्मितांना महत्त्व देणारे अभ्यास मंडळातील प्रवृत्ती  महाराष्ट्रभर सगळ्या विद्यापीठात सारखीच दिसते.

               ॥ ५॥

 अभ्यासक्रमांच्या अध्ययन , अध्यापनातील जातीय भावना पुढील टप्पावर ही कायम असलेली दिसते. पुढे एम फिल. पीएच.डी पदवीच्या संशोधनातही हीच भावना दिसते. आपल्या जातीचा लेखक संशोधनासाठी घेणे. आपल्या विचारांचा प्रवाह संशोधनासाठी घेणे. यातून वाङ्मयीन मूल्यमापनाची काय अपेक्षा ठेवावी. वाङ्मय व्यवहाराचे गौरवीकरण करण्याकडे सर्वांचा कल असल्याचे दिसून येते. यातून फक्त पदवी पदरात पाडून घेतली जाते. भक्ती सांप्रदायाच्या अध्ययनाबाबतही असाच दृष्टीकोन ठेवणारे लोक दिसतात. मूल्यमापन टाळून महती सांगणारे विद्वान म्हणून वावरतात . माझ्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.म्हणून मी वारकरी संप्रदायावर संशोधन करणार आहे.अशी भूमिका घेणाऱ्यांना संशोधनात फार मौलिक भर घालता येत नाही. उपेक्षित लोक दलित साहित्य ,भटक्या विमुक्तांचे साहित्य संशोधनासाठी घेतात. मुस्लिम समाजातील मुस्लिम समाजाचे, आदिवासी समाजातील आदिवासी समाजाचे साहित्य संशोधन व अध्ययनासाठी घेतात. यातून वाङ्मयीन व्यवहाराचे, संशोधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जातीय, सांप्रदायिक मानसिकतेतून आपण कधी बाहेर  पडणार आहोत ?  याबरोबरच मार्गदर्शकही आपल्यात जातीतला घेणार आहे. असं विद्यार्थी म्हणतात तेव्हां या मागील मनोभूमिका काय असते ?  यातून वाङ्मयाच्या अध्यापनाचे ,अध्ययनाचे ,संशोधनाचे, मूल्यमापनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. समाजातील वेगवेगळ्या सांस्कृतिक ,वाङ्मयीन व्यवहारात आरवणाऱ्या - मिरवणाऱ्यांचा एक  वर्गच उदयाला आला आहे .असा राजकारणी लोकांचे जोडे उचलणारा एक वर्गच तयार झाला आहे .नुसती हांजी हांजी करून फायदा लाटणारा एक मोठा वर्ग  प्राध्यापकांमध्ये तयार झाला आहे. काही विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्माण करणाऱ्या मंडळींनी एकदम राजकारणी लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी राजकारणातील मंडळींच्या सुमार कलाकृती अभ्यासक्रमात लावून टाकल्या. राजकारणी मंडळीपुढे निष्ठा व्यक्त करण्यासाठी  प्राध्यापक वर्गात स्पर्धा सुरू असल्यासारखे दिसते. राजकारणी मंडळींची चरित्र-आत्मचरित्र यांचा काही भाग अभ्यासक्रमात लावून त्यांच्याशी जवळीक साधण्याची प्राध्यापक पांढरपेशा वर्गाची वृत्ती अत्यंत लाळघोटी आहे. ही वृत्ती स्वाभिमान विकणारी वृत्ती आहे.

एकमेकांना सहाय्य करू !स्वार्थाची तळी उचलून धरू ! असा  वागणारा प्राणी तुम्हाला कुठेही भेटू शकतो. सगळ्याच क्षेत्रात या वर्गाचा दबदबा आहे. या वर्गाला उघडे पाडणाऱ्याला ते खिंडीत गाठून चिमकुरे काढतात.
 फायदा, स्वार्थासाठी मिठाची गुळणी धरणारे विद्वान पैशाला पन्नास मिळतात. हे विद्वान अगदी शांत राहून हितसंबंधांचे राजकारण खेळतात. या बोटचेप्या वर्गाच्या वागण्यावर कुणीच काही बोलत नाही. काही मंडळी अगदी शांत ,संयम ठेऊन काटा काढतात . हा वर्ग लय घातक ,बेरकी आहे. एखाद्या ढोंगी महाराजा इतकाच संयम या मंडळीकडे असतो. तुम्ही कितीही आदळ आपट करा ते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू देत नाहीत. राजकारणी कोणत्याही विचारधारेचे, आदर्शांचे सत्तेवर येवो. ही मंडळी त्यांची हुजरेगिरी करण्यासाठी अगदी तयार असतात. मागील भाजपा सरकारच्या काळात प्रत्येक जण लांबून लांबून संघी असल्याचं भासवत होता. त्या काळातील लाळघोटे विद्वान विद्यापीठाच्या व्यवस्थापन सदस्यांसमोर लोटांगण घालताना दिसत होते. सहा महिन्यात सरकार बदलले की लोक सेक्युलर झाले.या बिनलाज्या मंडळींचं काय करावे ? अभ्यास मंडळातील सदस्य निवडीपासून या राजकारणाला रंग भरू लागतात. किती विद्वान,अभ्यासू माणसं अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत जातीपातीवर येतात. मुळात विद्यापीठाचा सत्ताकेंद्रचा परीघ अत्यंत छोटा असतो. या सत्ता केंद्रातील लहान लहान पदे, समित्या, लाभ मिळवण्यासाठी  विद्वानांचे, संवेदनशील अभ्यासकांचे खरे पितळ उघडे पडते. त्यांच्यातला खरा माणूस या ठिकाणी उघडा पडतो. या सर्व वृत्ती-प्रवृत्ती शैक्षणिक प्रक्रियेला दूषीत करून टाकतात. या सर्व वृत्ती प्रवृत्तींचा अभ्यासक्रम निर्मितीत सक्रिय सहभाग असतो. माणसे शेवटी मोठ्या मोठ्या गोष्टी करत छोटी होतात. हे मात्र खरं आहे. काही नाठाळ मंडळी तर केवळ एखाद्या विचारसरणीच्या दावणीला स्वतःला बांधून घेतात. असं काही नुसतं दाखवतात. तर काही भक्त असतात. ते सनातनी विचार मांडत राहतात. या विचारधारेला महत्व देणाऱ्या कलाकृती अभ्यासक्रमात कशा लागतील यासाठी लॉबिंग करतात. हे सगळं राजकारण अभ्यासक्रमातील कलाकृतींच्या समावेशाबाबत असते. वेगवेगळ्या लाभाचे पद मिळवून या मंडळींना अमर वगैरे व्हयचं असतं काय ? हे कळण्यास मार्ग नाही. मराठी अभ्यासक्रम निर्मीतीत अशा मंडळींचा भरणा वाढला आहे. सुमार कलाकृती लावून हजारो विद्यार्थ्यांना छळणारे ,  प्राध्यापकांना शिकवायला भाग पाडणारे लोक संख्येने वाढत आहेत. या मंडळींनी स्वतःचे कंपू तयार करून आपले गट-तट मजबूत केले आहेत. काळ हे गड-तट तोडेल पण तेव्हां वेळ गेलेली असेल. काही अभ्यासक विद्यापीठातील अभ्यासकांशी , अभ्यास मंडळातील सदस्यांशी सलगी करतात .महाविद्यालयातील चर्चासत्रात , वेबीनार मध्ये या मंडळीना बोलवून पाकीट देऊन खूश करतात .मग ज्यांनी बोलवलं होतं त्यांच्या पाकीटाला (मीठाला) जागून त्यांचे सुमार ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून लागतात .वरील लेखातील मते ,विचार अधिक स्पष्ट असले तरी ते कटू सत्य आहेत .


डॉ. गणपतराव ढेंबरे,
श्री.व्ही.एस. नाईक महाविघालय,
रावेर ,ता.रावेर, जि. जळगाव
पिन :-४२५५०८
  मोबा : -९४२१०८१२७० 
ईमेल -dhembregr@gmail.com

शुक्रवार, १० जुलै, २०२०

गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी माणसाच्या अस्तित्वाचा शोध "॥

॥ "गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी माणसाच्या अस्तित्त्वाचा शोध "॥




 अच्युत आठवले आणि आठवणी (२००३) आणि ऑपरेशन यमू (२००४) या  कादंबऱ्यानंतर मकरंद साठे यांची नवीन कादंबरी 'गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी ' ही 2019 मध्ये प्रकाशित झाली. मराठी कादंबरीला नवे वळण व नवी दिशा देणारा कादंबरीकार म्हणून मकरंद साठे यांचा उल्लेख करावा लागतो. आधुनिकोत्तर समाज जीवनावर विज्ञान व तंत्रज्ञान यांचे होणारे परिणाम , आधुनिक  जीवनातील असंगतता  निरर्थकता अशी आशयसूत्र मकरंद साठे यांच्या कादंबरीतून थेटपणे अभिव्यक्त होतात. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीला सलग असे कथानक नाही. काही एक घटना प्रसंगांच्या तुकड्यांमधून त्रोटक कथानक आकार घेते. कादंबरीला नायक म्हटलं तर आहे. आणि म्हटलं तर नाही. कादंबरीतील वेगवेगळी पात्रे वेगवेगळ्या सामाजिक ,आर्थिक , सांस्कृतिक परिवेशात वावरतात. ती एकमेकांशी संबंधित नाही. तरीही ही वेगवेगळी पात्रे एकत्र येतात. या पात्रांना एकत्र आणणारा काळा,अवकाश हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. वास्तव आणि अतिवास्तवाच्या गुंफणीतून ही कलाकृती आकार घेते. जगण्यातील निरर्थकता शोधणारी पात्रे गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीत भेटतात. कादंबरीतील सर्व पात्रे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी आहेत. स्वतःच्या अस्तित्वा बरोबरच जगाचा,जगण्याचे अस्तित्व शोधणारी ही पात्रे आहेत. सत्यकाम अनसूया याला कादंबरीचा नायक म्हणता येईल. परंतु सत्यकामच्या व्यक्तिगत जगण्याला मांडणे हे या कादंबरीचे मुख्य सूत्र नाही. इसवी सन १९९० नंतरच्या भारतीय समाज वास्तवाची मांडणी कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. धार्मिक कट्टरता, जातीयवाद, उच्च मध्यमवर्गीयांचा चंगळवादी, भौतिक सुखाच्या आहारी जाणे, जगण्यातील व्यस्तता, आभासी वास्तवातील हरवलेपण ,आधुनिकता आणि पारंपरिकता यांच्या स्वीकारातील गोंधळ, मूल्यऱ्हास, जगण्यातील जटिलता मांडणारी गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी ही कादंबरी लक्षवेधक ठरते.
                           ॥ १ ॥

या कादंबरीचे कथानक आपल्याला थोडक्यात असे सांगता येईल. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीत एकूण सहा उपकथानके आहेत. सत्यकाम, विभाकर,अगस्ती, गणपती, आयेश,नर्सबेन या मुख्य पात्रांचे चित्रण करणारी सहा उपकथानके यांच्या एकत्रीकरणातून या कादंबरीचे कथानक आकार येते. थोडक्यात या उपकथानकांचा आढावा घेऊ या. सत्यकाम उर्फ आकाश हा अनसूया नावाच्या वेश्येचा मुलगा आहे. तत्वज्ञान विषयातील पीएच.डी.चा अभ्यास सत्यकाम करत आहे. सत्यकामला ' हिंदू षड्दर्शनातील पुरुषप्रधानता आणि त्याचा एकोणिसाव्या - विसाव्या शतकातील वसाहतिक भारतातील वैचारिकतेवर झालेला परिणाम ' या विषयावर सत्यकामला पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करायचे आहे. विद्यापीठाची रिसर्च अँड रेक्गनिशन कमिटी सत्यकामचा सिनॉप्सिस नकारते. सत्यकामचा संशोधन विषय नाकारणेमागे कमिटीतील सदस्यांचा बदललेला वैचारिक दृष्टिकोन कारणीभूत ठरतो. पीएच.डी. मार्गदर्शक स्वतःच्या स्वार्थासाठी सत्यकामला मार्गदर्शन करण्याचे टाळतात. सत्यकाम निराश होतो. शिक्षण सोडून तो गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीत वॉचमन म्हणून काम करू लागतो. तिथे त्याला अगस्ती नावाचा माणूस भेटतो. काहीसे बौद्धिक संतुलन हरवून बसलेला अगस्ती सत्यकामशी संवाद साधतो. सत्यकाम तात्विक दृष्ट्या अगस्तीच्या काही प्रश्नांची उत्तरे देतो. अगस्तीची पत्नी मृदूला हिने आत्महत्या केलेली आहे. अगस्ती आणि मृदूला यांना काव्या नावाचे अबनॉर्मल मुलगी आहे. ती तिच्या मावशीकडे राहते. अगस्तीला एकटेपणा खूप प्रिय आहे. अगस्ती आणि सत्यकाम गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई  सोसायटीत भेटतात. वारंवार भेटतात. चर्चा करतात .

 अगस्तीच्या सोसायटीत राहणाऱ्या रणजीत आणि मेनका या दाम्पत्याचा मुलगा गणपती हा आहे. रणजीत आणि मेनका आयटी क्षेत्रात उच्च महत्वकांक्षा ठेवणारे  दांपत्य आहे. एका अध्यात्मिक बाबाच्या उपदेशावरून हे दांपत्य गणपतीला जन्मला घालते. रणजीत व मेनका दोघेही गणपतीकडे लक्ष देऊ शकत नाहीत. गणपतीला प्रोप्रिओसेप्शन नावाचा आजार होतो. गणपतीला त्याचे आई-वडील गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी मधील फ्लॅटमध्ये कोंडून ठेवतात. अगस्ती गणपतीचा खून करतो. व स्वतः आत्महत्या करतो.

 विभाकर हे कादंबरीतील एका उपकथानकातील पात्र आहे. विभाकर हा मूकबधिर आहे. तो आपल्या असण्यावर समाधानी असणारा असा माणूस आहे. पुण्यात नातेवाईकांकडे येतो. चुकून दंगलीत सापडून त्याच्या दाढीवरून हिंदू लोक विभाकरला मुस्लिम समजून ठार करतात. मूकबधिर असणाऱ्या विभाकरची भेट बसमध्ये नर्सबेन सोबत होते. गुजरात दंगलीत अत्याचार झाल्यामुळे योगायोगाने नर्सबेन पुण्यात येते. ती स्वतःची मुस्लिम ओळख लपवून ठेवते. दंगलीतून वाचते. परंतु या धक्क्यातून आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे येते. त्याच वेळी आगस्ती आत्महत्या करण्यासाठी तिथे आलेला असतो. ते दोघे आत्महत्या करतात. ही आत्महत्या सत्यकाम व आयेशा टेकडीवरून पाहतात.


 आयेशा ही आंतरधर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याची मुलगी आहे. स्वतंत्र विचारांची मोकळ्या वातावरणात वाढलेली ही मुलगी आहे. एका अपघातात आयेशाचे आई-वडील, भाऊ मरण पावतात. ती एकटी पडते. दारूच्या नशेत गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीत येते.  तेथे तिला उच्चभ्रू वेश्य समजून  अयेशावर अत्याचार होतो. सत्यकाम आयेशाची काळजी घेतो. आयेशा आणि सत्यकाम अगस्ती व नर्सबेनची  आत्महत्या डोळ्यांनी पाहतात. सत्यकाम आणि आयेशा ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत तरी  कुणाच्या नजरेला पडले नाहीत. या कादंबरीतील वाक्यामुळे वाचकाच्या मनात आनंत शक्यतामागे ठेवत ही कलाकृती संपते. ही कलाकृती वाचकाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करते. या कलाकृतीचे शीर्षकच अर्थपूर्ण आहे. गार्डन ऑफ ईडन म्हणजे  ख्रिश्चन पुराणांमधील स्वर्गातील बाग होय. या बागेत हे कथानक आकार घेते. या बागेला ऊर्फ साई सोसायटी हा खास भारतीय टच आहे.या कलाकृतीतील मांडणी अत्यंत गुंतागुंतीचा आहे. एखाद्या रहस्यमय कथेप्रमाणे अनुभवाला शब्दबद्ध करणारी ही कलाकृती आहे. या कलाकृतीतील मूकबधिर असणारा विभाकर आणि चार वर्षांचा गणपती या दोघांच्या मृत्यूने ही कादंबरी संपते. विभाकर आणि गणपती हे दोघे काही समान धाग्याने बांधले आहेत. किंबहुना आजच्या समाजातील दोन प्रतीके आहेत. समाजाला आपल्या समकालीन वास्तवाचे आकलन होत नाही. धर्माच्या आधाराने होणार्‍या दंगली ,दंगे यातून माणसे मारली जातात. मारणाराला कळत नाही आपण का मारतो? आणि मरणाराला कळत नाही की आपण का मरतो ? हे दोन्ही अनुत्तरीत प्रश्न आहेत. समाज विभाकर सारखा मूकबधिर झाला आहे. समाजाला मूकबधिर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यातून आभासी वास्तवात समाज गुंतून पडतो. आज समाजातील काही वर्ग कमालीचा आत्मसंतुष्ट झाला आहे. समाजाला आत्ममग्न बनवण्यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. जीवनाचा उद्देश काय आहे ? आपण कशासाठी जगतो आहोत ? निसर्गापासून ,जगण्यापासून फारकत घेतलेला समाजवर्ग गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीतून चित्रित  होतो. मुळात हे का घडले ? पुन्हा पुन्हा का घडवले जाते आहे ? हे कोण घडवत आहे ? समाज वास्तवात घडणाऱ्या घटनांचा व त्या मागील अन्वार्थचा विचार मांडणारी ही कलाकृती आहे. राजकारण आणि तंत्रज्ञान ही जोडगोळी हातात हात घेऊन मार्गक्रमण करत आहे. माणसांच्या भावनांना नियंत्रित करणारे तंत्रज्ञानाचे राजकारण प्रस्तुत  कादंबरीतून मांडले जाते.


                        ॥ २ ॥

आधुनिकतेने अनेक विरोधाभास निर्माण केले आहेत. लेखक लिहितो , "कोपऱ्या-कोपऱ्यावर सिक्युरिटी कॅमेरे, पावलोपावली आधार क्रमांक देण्याची सक्ती, पोलिसी चौकशा आणि बॉडी फ्रिस्किंग अशा गोष्टींची आवश्यकता आजकाल पडू लागली आहे, आणि त्याच काळी या गोष्टींनी आपल्या प्रायव्हसीचा अपलाप होऊ लागल्याने आपण चिंतितही आहोत, हा असाच आणखी एक तिढा. " यावरील विवेचानातून आजच्या समकालीन वास्तवतील विरोधाभास लेखकाने अचूकपणे टिपले आहे. ओळख हरवून बसलेल्या माणसांचे जगणे या कलाकृतीतून येते. एकीकडे प्रचंड सार्वजनिक आणि दुसरीकडे व्यक्तिगततेची आस ठेवणारा समाज समकालात वावरत आहे. या दोन जाणिवांमधील विरोधाभास लेखकाने शोधला आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीचा कालावकाश ६ डिसेंबर १९९२ ते १७ मे २०१८ या परिघात फिरणारा आहे. हा कालखंड भारतीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या पंचवीस तीस वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या चरित्रात राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जे बदल झाले. या बदलांचे पार्श्वभूमी सारखे उपयोजन प्रस्तुत कादंबरीत केले आहे. या सर्व बदलांबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या उपयोजनामुळे माणसाच्या मनोभूमिकेत झालेला बदल ही कादंबरी सूक्ष्मपणे मांडते. जागतिकीकरण आणि भारतातील धार्मिक उन्माद या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक आहेत. याबद्दल लेखक लिहितो ,"समाजात धार्मिक आणि जातीय दुफळ्या वाढल्या. हिंसा वाढली. त्याची उदारीकरणानंतर आलेल्या जागतिकीकरणाशी आणि उत्तर भांडवलशाहीशी गाठ पडली. ती इतकी की २०१४ सली भाजपाचे एकछत्री, स्वतःच्या बळावर बहुमत असलेले आणि मोदी नामक एका व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवणारे सरकार सत्तेत आले."
 जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण यांच्या राजकारणाच्या परस्परसंबंधकडे लेखकाने यातून लक्ष वेधले आहे. समकालीन वास्तवावर काहीसे तिरकस भाष्य लेखकाने या कलाकृतीतून केले आहे. उपरोध आणि उपहासतून या मांडणीला अधिक सूक्ष्मता लाभली आहे. लेखक लिहितो," भारतात एक सोय बरी आहे. ती विशिष्ट घटना दंग्याच्या जवळपास झाली हे लक्षात ठेवले की, नंतर गुगल करून त्या दंग्याची नक्की तारीख वगैरे सहज शोधता येते. २०१४ सालच्या भाजपाच्या विजयानंतर दंगे आणि त्यांना खतपाणी घालणारी नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि धोरणे यात इतकी वाढ झाली की, ही तारीख लक्षात ठेवण्याची भारतीय सोय नजीकच्या भविष्यात कमी होईल किंवा काय अशी भीती नष्ट झाली" या विवेचनातून समकालीन वास्तवावर लेखकाने भाष्य केले आहे. यातील उपरोध अतिशय उच्च कोटीचा आहे. वास्तव आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून या कलाकृतीचा घाट आकाराला येतो. कलाकृतीच्या वाचनातून एक अस्वस्थ विमनस्क अनुभव वाचकाच्या वाट्याला येतो. आत्महत्या करणाऱ्या पात्रांच्या मागे उरलेल्या पात्रांसारखा आपलाही जगण्यावरचा विश्वास उडतो. वास्तव आणि अतिवास्तवाच्या मांडणीतून जगण्यातील सत्य लेखकाने अचूकपणे मांडले आहे. एकीकडे उच्च मध्यमवर्गातील जीवन जगणारी माणसे या कलाकृतीत येतात. ती कमालीची आत्मकेंद्रित जीवन जगणारी माणसे आहेत. आधुनिकतेत ,यांत्रिक एकाकीपणात जीवन जगणारी ही माणसे आहेत. आभासी वास्तवाच्या जाणिवेतून या पात्रांची वर्तन होते. जिवंतपणा ,संवेदनशीलपणा या पासून फारकत घेतलेली पात्रे  या कादंबरीतून चित्रित होतात. वेळप्रसंगी ती पात्रे अति संवेदनशील होतात. महानगरातील उच्चमध्यमवर्गीयांचे जीवन या कलाकृतीतून उभे राहाते. आभासी वास्तवातून प्रेरणा, प्रबलन मिळालेली माणसे जात, धर्म, वंश, भाषा, संस्कृती रंक्षणासाठी रस्त्यावर उतरली आहेत. एकांगी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रक्षोभक वृत्तपत्रे, आगलावा सोशल मीडिया यातून प्रेरणा घेऊन स्वतःची भूमिका जगणं विसरलेली माणसे जथ्यांनी एकत्र येतात. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे रक्त सांडण्यासाठी अतिउत्साही झालेले जथ्थे समाजात वावरत आहेत. हा वर्ग निम्म स्तरातील आहे. एकीकडे  शिक्षित उच्चमध्यमवर्गीय समाज आत्मकेंद्रित होत आहे. तर दुसरीकडे निम्नस्तरीय समाजातील माणसे कळपात आपलं अस्तित्व शोधत आहेत.या आजच्या वास्तवाच्या विरोधाभासकडे ही कलाकृती लक्ष वेधते. मुळात माणसांच्या मूळ प्रवृत्तीला मुखर करणारी ही कलाकृती आहे. माणसाच्या जगण्याला बदलून टाकणारे अर्थकारण या कलाकृतीतून मांडले जाते. विशेषतः गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीच्या निर्मितीची कथा लेखक थोडक्यात परंतु अनेक व्यवस्थांना स्पर्श करून सांगतो. विमानतळ बांधण्याचा घोळ लेखक टोकदारपणे मांडतो. अर्थकारण आणि राजकारण ही एकाच रथाची दोन चाके आहेत. यावर ही कलाकृती भाष्य करते. अर्थकारणातील राजकारणाचा वेध लेखकाने उपहासातून घेतला आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीचे वर्णन करताना लेखक लिहितो ,"त्या सोसायटीत सहा अजस्त्र इमारती होत्या. त्यांची नावे होती - ममताळू, कनवाळू ,वेल्हाळू ,मायाळू,दयाळू आणि सुकाळू या सर्व इमारतींचे काम युरोपातील वातावरण योग्य होईल असे होते. त्या जागेत ऑफिसेसचे दोन अजस्त्र टॉवर्स उभारण्याचे काम चालू होते. त्यांची नावे होती मात्रकृपा आणि पितृकृपा त्यांच्या समोरच्या हिरवळीवर मधोमध देशाचा झेंडा २०१४ सालापासून मोदींचे सरकार आले त्या वर्षापासून दिमाखात फडकू लागला."

 या विवेचनातून समकालीन वास्तवाचे वर्णन येते. आज भारतीय लोकांची मानसिकता दोन ध्रुवांवर लोंबकळत आहे. जगाच्या आधुनिकतेची आवड समाजाला लागली आहे. ते सगळे जीवन स्वीकारता येत नाही. आणि आपले सगळे जुने ,परंपरा ,सगळे जुने विचार सोडता येत नाहीत. या अस्थिर अर्धवट मानसिकतेत उच्चमध्यमवर्गीय भारतीय समाज जगत आहे. दुसरीकडे धर्म, अध्यात्म, परंपरा, तत्वज्ञान याबद्दल भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या जगण्यातून, विरोधाभासातून उभ्या राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक ही कलाकृती करते .समकालीन पिढीचे जगणे मांडणारी ही कलाकृती आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी ही कलाकृती आजच्या भारतीय मानसिकतेतील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते. तात्विकदृष्ट्या अनेक प्रश्नांची उत्तरे भारतीय तत्वज्ञानात शोधणारी आजची पिढी आपल्या आजूबाजूला वावरताना दिसते. आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानातून ,जगण्यातून अनेक प्रश्नांच्या उत्तरे शोधणारी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत. या वास्तवावर या कलाकृतीने बोट ठेवले आहे. प्रस्तुत कादंबरीतील पात्रे तर्काला धरून वागत नाहीत . जगण्यातील असंगतता, तर्कविहीनता या कलाकृतीतून उलगडत जाते. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीतून माणसाचे निराधारपण, नगण्यता व्यक्त होते. कादंबरीतील सत्यकाम,अगस्ती,विभाकर ,गणपती, नर्सबेन आयेशा ही सर्व पात्रे निराधारपण वाट्याला आलेली आहेत.  जगण्यातील नगण्यता अचूकपणे मांडणारी ही कलाकृती आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई  सोसायटी या कादंबरीतून जीवनाचे अमानवीकरण,वस्तूकरण, व्यक्तित्वलोप, परात्मता,संवादशून्यता,जगण्यातील अर्थशून्यता मांडली जाते.आधुनिक जीवनातील विरूपता,भयावहता यांची मांडणी या कलाकृतीतून होते.
       
                          ॥ ३ ॥

 समकालीन राजकीय वास्तव, आर्थिक प्रक्रियेतील गुंतागुंत, सामाजिक स्थित्यंतर यांना कादंबरीतून सूक्ष्मपणे टिपले आहे. भाजपाच्या धार्मिक, सांस्कृतिक दहशतवादचे संदर्भ कादंबरीत उघडपणे येतात. मोदी आणि भाजपाच्या टोकदार प्रतिमांच्या आधारे घडणाऱ्या घटनांचे संदर्भ कलाकृतीत येतात. अनसूया,नर्सबेन,आयेशा, मेनका, मृदूला या पात्रांच्या वाट्याला येणारे शोषण या कलाकृतीतून मांडले जाते. जगण्याचा स्तर वेगवेगळा असला तरी शोषण मात्र सारखे आहे. अनसूया वेश्या आहे. नर्सबेन दंगालीतील अत्याचाराला बळी पडलेली आहे. आयेशा उच्च मध्यमवर्गातील नवशिक्षित तरुणी आहे. आयेशाच्या वाटेलाही अत्याचार येतात. मेनका, मृदूला ह्या उच्च मध्यम वर्गातील स्त्रिया आहेत. स्त्री कोणत्याही स्तरातील असो तिच्यावर अत्याचार करणारी व्यवस्था कायम आहे.स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहाण्याचा दृष्टीकोन कलाकृतीतून मांडला जातो . वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री शोषण  कायम असल्याचे या कादंबरीत मांडले जाते

                                         ॥ ४ ॥

माणसाच्या अस्तित्वाच्या विविध खुणा असतात. माणसाला स्थान , जात, रीती, बोली, परंपरा, धर्म, वंश यासारख्या अनेक ओळखी असतात. यातील काही ओळखी स्वभावीक तर काही ओळखी लादलेल्या असतात. जागतिकीकरणाने माणसांच्या ओळखीचे प्रश्न तीव्र केले आहेत. माणसाच्या सगळ्या ओळखी अदृश्य झाल्या आहेत. काही ठळक ओळखी अगदी ठाम झाल्या आहेत. लेखक लिहितो," आपल्या कादंबरीच्या मर्मस्थानी ज्या २०१८  सालच्या, म्हणजे वरील संभाषण झाले त्या दिवसानंतर त्या सोळा वर्षानंतरच्या, घटना होईपर्यंत ती स्त्री स्वतःबद्दल एवढेच सांगू शकत होती-" मुसलमान... औरत... तेली..." यापलीकडे गुजराती होती हे उघड होते. तिच्या आयुष्यात असे काही झाले होते की, ज्यामुळे या तीन ओळखीच उरल्या होत्या. आधुनिकतेने आणि जागतिकीकरणाने माणसाला अनेक ओळखी एकाच वेळी असण्याची शक्यता निर्माण केली होती. जसे की, माणूस एकाच वेळी जन्माने पुरुष ,भारतीय, मराठी पण लंडनचा रहिवासी, हिंदू ,ब्राह्मण, पण नायजेरियन ख्रिचन , होमोसेक्शुअल पार्टनर असलेला, आय. ए.एस. अधिकार्‍याचा मुलगा, आर्किटेक्ट, नाटकाची आवड असलेला, व पु काळे यांच्या पुस्तकांचा चहाता, फिस्कल  काँझर्वेटिव, तरीही राजकीयदृष्ट्या मोदींचा पाठीराखा, स्त्रीवादी ,साईभक्त, जुनी घड्याळे जमविण्याचा मोठा नाद असलेला, डॉमिनोजचा पिझ्झा आवडणारा, पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा चाहता, मोटारसायकलचे वेड असलेला, ज्याचा पार्टनर व्यवसायाने दुकानदार असा इत्यादी इत्यादी पण या बाईंच्या अशा अनेक ओळखींपैकी  फक्त तीनच तिला आठवाव्या, तीनच महत्त्वाच्या ठराव्यात, असे काही भयाण तिच्या आयुष्यात घडले होते. आधुनिकतेच्या नव्या टप्प्यावर ,ज्या वेळी पोस्ट ट्रुथची सुरुवात झाली त्या टप्प्यावर असे होणे क्रमप्राप्त झाले आहे."

 वरील विवेचनातून आजचे समकालीन वास्तव लेखक मांडतो. नर्सबेनला तिचा भूतकाळ आठवत नाही.तिच्या सगळ्या ओळखी खोट्या ठरल्या आहेत. मागे उरले आहेत फक्त तीन ओळखी,' मुसलमान', 'औरत' आणि 'तेली' ह्या ओळखी होय.त्यात धर्म, जात ,लिंग या तिन्ही ओळखी शिवाय आपलं स्वतःचं असं काहीच मागे उरलेलं नाही. या तीन ओळखी अंतिम सत्य झाल्या आहेत. बाकी सगळा पसारा , तपशील गळून पडला आहे. आपण मिळवलेल्या सगळ्या ओळखी वेगाने अस्पष्ट होत आहेत. मुळात माणसाजवळच्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्या धारणा, जाणीवा, संवेदना यांची मोडतोड होत आहे. सर्व काही हरवून बसलेली पात्रे गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कलाकृतीत भेटतात.

 या कादंबरीतून स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण येते.स्त्री-पुरुष संबंधातील तोचतोचपणा कादंबरीत मांडला जातो. अनसूया या पात्राच्या निमित्ताने बापच मुलीवर बलात्कार करतो.  अनसूया आणि सुभान्या यांच्यातील संबंधांचे चित्रण येते. स्त्री-पुरुष संबंधातील विकृती लेखकाने मांडली आहे. लेखक लिहितो," उद्या तुला अशा ठिकाणी जायचं  की ,त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील... आणि तुझी आई शिंची गेल्याला झाली धा वर्सं त्या छोट्या गावात कोण मिळणार मला ? आं ? पुरुषाच्या शरीराची भूक नको भागायला ? आं ? शिकवणी घेतू तुझी... उद्यापासून काय करायचं त्याची... ये साली आईच्या मुळावर आलेली... वेसवा आणि त्याने तिचा यथेच्छा उपभोग घेतला होता."
  मुलगी आणि बाप यांच्यातील पवित्र नात्याला काळीमा फासणारी नाते कादंबरीतून विकृतीच्या पातळीवर अतिवास्तव स्वरूपात व्यक्त होते. प्रस्थापित मूल्यांचा त्याग करणारी पात्रे कादंबरीतून येतात.  दुसरीकडे  मृदुला आणि अगस्ती यांच्यातील संबंधांचे वर्णन येते. अगस्ती कुठलाच फरक मान्य करत नव्हता. निखळ आनंदापेक्षा यांत्रिकपणे होणारे शरीर संबंध या कलाकृतीत उभे राहतात.

                                   ॥ ५ ॥


 या कलाकृतीच्या काही मर्यादाही सांगता येतात. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ सोसायटी या कादंबरीतून सलग कथानक मांडले जात नाही. खंडित अनुभवाचे तुकड्या तुकड्यांनी मांडलेले वास्तव वाचकाच्या मनावर प्रभावी ताबा मिळवत नाही. सुटा सुटा जीवनानुभव व्यक्त होतो. कादंबरीत आगस्ती आणि सत्यकाम यांच्यातील तात्विक चर्चा प्रदीर्घ स्वरूपाचे आहे. ती काहीशी कंटाळवाणी झाली आहे. कादंबरीतील तात्विक संदर्भ, तत्त्वव्यत्यांचे विचार सर्वसामान्य माणसाच्या ,वाचकांच्या पचनी पडणार नाहीत. समकालीन राजकीय घटना घडामोडींचा संदर्भ थेटपणे कलाकृतीत येतात. संदर्भांच्या मूळ गाभेची सविस्तर मांडणी कलाकृतीत येत नाही. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कलाकृतीत सत्यकाम, अगस्ती, नर्सबेन,आयेशा, विभाकर, गणपती या सर्वांची उपकथानके येतात. ही सर्व उपकथानके स्वतंत्र वाटतात. मूळ कथानकाशी सर्व उपकथानकांचा सांधा नीट न जोडला गेल्यामुळे या उपकथानकांचे स्वतंत्रपण वाचकांच्या लक्षात येते. अतिशय उच्च मध्यमवर्गीय मानसिकतेचे चित्रण उत्तम पद्धतीने येते. निम्नस्तरातील, गरीब वर्गातील समाज चित्रण सूक्ष्मपणे येत नाही. अनसूया आणि तिचे वडील यांच्यातील संवाद कृतक वाटतो. त्याच्यातील जिवंतपणापेक्षा तो कृत्रिम वाटतो. लेखकाच्या मध्यमवर्गीय जगण्याचा स्तर आणि या गरीब शोषित वर्गाच्या जगण्याचा स्तर यातील तफावत फार लवकर लक्षात येते. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीतून धार्मिक उन्मादाचे चित्रण संदर्भासह येते. वर्ग जाणीव अस्पष्टपणे व्यक्त होते. या कादंबरीतून जातीयतेचे चित्रण येत नाही. समकालीन वास्तवातील जातीय मानसिकता कादंबरीतून चित्रित होत नाही.

 या सर्व कादंबरीच्या मर्यादा असल्या तरी गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीतून धर्म आणि टेक्नॉलॉजी यांच्यातील साम्य- भेदावर, जगण्याच्या आवर्तावर प्रकाश टाकला जातो.धर्म आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. लेखक या विषयी लिहितो,"माणूस आधी निसर्गाच्या तावडीतून सुटण्यासाठी टेक्नॉलॉजी, देव, संस्कृती अशांचा  शोध लावतो. मग त्याला या टेक्नॉलॉजी, देव, संस्कृतीपासून सुटका करून घेण्याची ओढ लागली. आज हा प्रश्न उभा राहिला आहे. व्हर्चुअल रिऑलिटीपासून सुटका कशी.... स्वतःच बनवलेल्या या वास्तवापासून सुटका कशी. म्हणजे खरंतर स्वतःपासून सुटका कशी करून घ्यायची हा!" वरील विचारसूत्र हे कादंबरीचा गाभा उलगडून दाखवणारे आहे. धर्म माणसाला भौतिक जगापासून दूर घेऊन जातो. शेवटी धर्म आणि तंत्रज्ञान माणसाला आत्मकेंद्री बनवते. यातून माणूस खरं जगणं हरवून बसतो. या वास्तवावर कलाकृती अचूकपणे बोट ठेवते.


डॉ.गणपतराव ढेंबरे 
मराठी विभाग 
श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका ,रावेर जिल्हा, जळगाव पिन -४२५५०८
मोबाईल नंबर -९४२१०८१२७० 
ई-मेल -dhembregr@gmail.com

गुरुवार, ९ जुलै, २०२०

कोरोना आणि शिक्षणक्षेत्रातील आणीबाणी " ॥

॥ "कोरोना आणि शिक्षणक्षेत्रातील आणीबाणी "॥ 
                                    ॥१ ॥

 शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञान, कौशल्य, संवेदना, भावना, विचार, सृजन, माहिती या सर्वांना वृद्धिंगत करणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. आज कोरोना महामारीमुळे शिक्षणप्रणालीच्या अखंड निरंतरतेला बाधा पोहोचली आहे. कोरोना महामारीमुळे लाखो विद्यार्थी आणि हजारो शिक्षक घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करण्याची इच्छा आहे. शिक्षकांना ज्ञान देण्याची इच्छा आहे. परंतु दोघांच्या प्रत्यक्ष संवादावर मर्यादा आली आहे. आपण गेल्या ३०-४० वर्षांपासून जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे काही मूलभूत क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहोत. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कृषी, पिण्याचे पाणी, महिला सक्षमीकरण या सर्व मूलभूत क्षेत्राकडे जाणिवपूर्वक, हेतूपुरस्कृत आपण दुर्लक्ष करत आहोत. अनेक समस्यांची, प्रश्नांची आपणाला सोपी उत्तरे हवी आहेत. राजकारणी, प्रशासन केवळ दैनिक कामकाज हाताळत आहेत. भविष्याचा अंदाज बांधणार्‍या नेतृत्वाची प्रशासन, शासन, राजकारणाच्या क्षेत्रात अत्यंत वानवा आहे. केवळ पायापुरती पाहण्याची वृत्ती सार्वजनिक झाली आहे. यातून नव्या समस्यांना, प्रश्नांना सामोरे जाण्याची कुठलीही नीती आपल्याजवळ समाज म्हणून आज घडीला नाही. कोरोना महामारीमुळे आता शिक्षण व्यवस्थेचे काय नियोजन करावे? या संदर्भात शासनाकडे कुठलेही ठाम धोरण नाही. कोणतीही प्रभावी योजना नसल्यामुळे कोरोना महामारीत शिक्षण प्रणालीला कुलूप घालून जबाबदारी स्वीकारल्याचा भास हा पोकळ आहे. सगळी शिक्षण व्यवस्था बंद ठेवणे, म्हणजे सर्जनशील बुद्धिमत्तेवर जाणीवपूर्वक गंज चढवण्यासारखे आहे. तुमच्या हजारो मुलांच्या जिज्ञासेला काही काळ कुलूपबंद करण्याची तयारी शासन, प्रशासन स्तरावर दिसत आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद राहील्यामुळे कोणते असे मोठे नुकसान होणार आहे? कोणते असे उत्पादन थांबणार आहे? कोणता असा करोडोंचा शासनाचा कर बुडणार आहे? त्यामुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवणे हाच कोरोनावर मात करण्याचा अंतिम उपाय आहे. असा समज संपूर्ण समाजाचा झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याशी मीही सहमत आहे. परंतु संपूर्ण ज्ञानप्रक्रिया थांबविण्याची वेळ आपल्यावर का आली? या मागील प्रक्रियेची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे.
                                    ॥ २ ॥

कोरोनापूर्व काळातील आपल्या शिक्षण प्रणालीतील काही मुलभूत प्रश्नांकडे मी आपले लक्ष केंद्रित करू इच्छितो. जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणाली असणार्‍या देशांमध्ये एका वर्गात किती विद्यार्थी असतात? किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक असतात? याचे प्रमाण किती असावे? याबद्दल निश्चित धोरण आहे. जगातील काही देशांचे उदाहरण आपण पाहूया. जगातील प्रथम क्रमांकाचे शिक्षण असलेला देश फिनलँडमध्ये एका वर्गात साधारणतः १० विद्यार्थी असतात. या १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असतो. अमेरिकेमध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो. या १५ ते २० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे प्रमाण असते. चीनमध्ये २० ते २५ विद्यार्थ्यांचा १ वर्ग असतो. व तेवढ्याच विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असतो. भारतात साधारणतः प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत ६० ते १२० विद्यार्थ्यांचा १ वर्ग असतो आणि तेवढ्याचं विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असतो. काही जण आपल्या लोकसंख्येकडे बोट करू शकतात. परंतु चीनची लोकसंख्या आपल्याएवढीच आहे. मग चीनने हे कसं काय शक्य केले? याचे उत्तर आपला शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोण हे आहे. या सगळ्याचा कोरोना महामारीशी काय संबंध ? असे आपणाला वाटेल. आपल्याकडे विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असत्या, तर कदाचित २५ ते ३० विद्यार्थी एका वर्गात बसून सर्व कोरोनाबद्दलची खबरदारी घेऊन प्रत्यक्ष शिक्षण सुरू करता आले असते. टॉयलेट, सेनिटायजर, पाणी या सर्व साधनांना घेऊन आपण शिक्षणव्यवस्था सुरु करु शकलो असतो. हे न करण्यापाठीमागे एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे आपण आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६% टक्के वाटा शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित होते. पण आपण केवळ दोन ते तीन टक्के खर्च करत आहोत. म्हणून ही परिस्थिती भारतात उभी राहिली आहे. समाज या स्थितीकडे उघडे डोळे ठेऊन बघत नाही. कारण श्रीमंतांनी स्वतःसाठी वेगळी बेटे तयार केली आहेत. मध्यमवर्गही श्रीमंतांच्या पावलावर पाऊल ठेवत नव्या व्यवस्थेच्या शोधात आहे. गरीब ,वंचित, शोषित वर्गाला पर्याय नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक शिक्षण प्रणालीवर विसंबून राहावे लागते. त्यांना या व्यवस्थेत कोणीही दाद देत नाही.
                                  ॥३ ॥

भारतामध्ये सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. चळवळी केल्या आहेत. कित्येक शतकांच्या अथक प्रयत्नानंतर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे पुन्हा हजारो-लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. श्रीमंत ,नवमध्यमवर्ग, मध्यमवर्ग यांच्याकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सर्व साधने उपलब्ध आहेत. हा वर्ग ऑनलाइन शिक्षण प्रणालीत स्वतःला सहज सामावून घेऊ शकतो. खेड्यात राहणार्‍या दलित, शोषित, आदिवासी, शेतकरी, मजूर या समाजसमूहाला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य आहे का? हा वर्ग आजही रोजच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहे. हा वर्ग ऑनलाइन शिक्षणप्रणालीची साधने कशी मिळवणार? हजारो-लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे समाजात पुन्हा नवी जातीव्यवस्था ,उच्च-नीच उतरण निर्माण करण्यासारखेच आहे. विजेचा अभाव, नेटवर्क नसणे यासारख्या अडथळ्यांवर विद्यार्थी कसे मात करणार? या अभावग्रस्ततेतून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते. शिक्षणासाठी चांगला मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणारा बीड जिल्ह्यातील गरीब विद्यार्थी व्यवस्थेचा बळी ठरू शकतो. त्या हजारो विद्यार्थ्यांच्या अपूर्णतेबद्दल, अभावग्रस्ततेबद्दल आपण विचार करायला पाहिजे.
                               ॥४ ॥
खूप वेळ मोबाईल पाहून मुलांचे डोळे दुखतात. विषय नीट समजत नाही. थेट संवादाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस कमी होऊ शकतो. शिक्षण प्रक्रियेपासून, अध्ययनापासून विद्यार्थी दूर जाऊ शकतो. पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी चिंतातुर झाले आहेत. पालक आपल्या चिमुकल्या मुलांवर ऑनलाइन शिक्षणासाठी दबाव टाकत आहेत. आज घराघरात मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठीचा तणाव निर्माण झाला आहे. पालक-पाल्य यांच्यात काहीशा संघर्षाच्या, तणावाच्या भावना जन्म घेत आहेत. यातून पालक आणि पाल्य यांच्या नात्यासंदर्भात गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहू शकतात. मुलांना आई-वडील आवडत नाहीत. कारण ते मुलांकडून ऑनलाइन शिक्षण घेण्याचा आग्रह धरतात. मुलांना ऑनलाइन शिक्षण सहज, सोपे, सुलभ वाटत नाही. कृत्रिम, त्रोटक ऑनलाइन शिक्षणामुळे मुले तणावात येतात. या सर्वांना पुढे मानसोपचाराची गरज लागू शकते. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा अध्ययनातील रस कमी होऊ शकतो. मुलांना सोपे विषय अवघड वाटू शकतात. यातून मुले शिक्षणापासून, अध्ययनापासून दूर गेल्यास त्याला जबाबदार कोण ?
                                 ॥ ५ ॥

 शिक्षक आणि मुले वर्गात समोरासमोर प्रत्यक्ष संवाद करत असतात. शिक्षक मुलांचा चेहरा वाचत असतो. आपल्या विद्यार्थ्याला विषय समजतो की नाही याबद्दल खात्री करून घेतो. मुलांना विषय न समजल्यास शिक्षक पुन्हा परत एकदा तोच विषय मुलांसमोर ठेवतो. तोच विषय वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाइनच्या कोरड्या अध्यापनात शिक्षकाकडे  हा पर्याय असत नाही. मुळात अध्ययन ही एक सर्जनशील, जिवंत प्रक्रिया असते. शिक्षक व विद्यार्थी यांच्या संवादांमध्ये भावना, संवेदना असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद शब्दांपलिकडचा असतो. तो ऑनलाईनमध्ये असत नाही. ऑनलाईन अध्यापनात व्याख्यान पद्धतीचा वापर करावा लागतो. मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखांच्या अध्यापनासाठी ऑनलाइन अध्यापन पद्धती योग्य ठरू शकते. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, आरोग्यशास्त्र या विद्याशाखांसाठी ऑनलाइन अध्यापनाला मर्यादा आहेत. प्रात्यक्षिक ऑनलाईन कसे शिकवणार? हा ही प्रश्न आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती काही विद्याशाखांसाठी आवश्यक असते. संगीत, नाटक, ललित कला, अभिनय या विद्याशाखांचे अध्ययन-अध्यापन ऑनलाईन कसे होणार? शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, समाजकार्य, पत्रकारिता, जनसंज्ञापन,  संगणकशास्त्र, ग्रंथालय माहितीशास्त्र यांचे अध्यापन ऑनलाईन कसे करावे? हे सर्व विषय ऑनलाइन शिकवता येऊ शकत नाहीत.

 कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय राबवणे अत्यंत अवघड आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, कला, अभियांत्रिकी, आरोग्य, कृषी, औषधनिर्माण शास्त्र, समाजकार्य, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, जनसंज्ञापन, पत्रकारिता या सर्व विद्याशाखांचे ऑनलाइन अध्यापन कसे काय शक्य आहे? या सर्व विद्याशाखांचा मुख्य भाग हा प्रात्यक्षिकांवर अवलंबून असतो. प्रात्यक्षिकांचे ऑनलाइन अध्यापन किती प्रमाणात यशस्वी होऊ शकते? प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ मुलांनी ऑनलाइन पाहून त्यांच्या ज्ञानात किती भर पडेल? याबद्दल शंका वाटते. सैद्धांतिक, संकल्पनांचे अध्यापन ऑनलाइन पद्धतीने करता येऊ शकते. परंतु या अध्यापनाला काही मर्यादा आहेत.
                                    ॥ ६ ॥

 ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व त्याची साधने शाळा, महाविद्यालयांकडे फारशी उपलब्ध नाहीत. केवळ तुटपुंज्या साधनांवर ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. शिक्षकांवर ऑनलाईन शिक्षणाचे ओझे टाकणे हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरू शकते. शिक्षकांचे ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात कुठलेही प्रशिक्षण झालेले नाही. सर्वांना नविन तंत्रज्ञान अवगत आहे असे गृहीत धरणे काही लोकांवर अन्याय करणारे ठरू शकते. शिक्षण हे पंचज्ञानेंद्रियांच्या एकत्रित संवेदनेतून साध्य केले जाते. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या सर्वांबरोबरच संवेदना, भावना, मन, मेंदू यांच्या एकत्रित प्रतिसादातून शिक्षणाची सृजनात्मक प्रक्रिया घडत असते. ऑनलाइन शिक्षण हे कोरडे, रुक्ष असते. डोळे आणि कान या दोन ज्ञान इंद्रियांवर ताण देऊन दिलेले ऑनलाइन शिक्षण अपूर्ण ठरते. पूर्वी अस्पृश्यता पाळण्याच्या काळात वर्गाबाहेर बसून विद्यार्थी ज्ञान ग्रहण करीत असत. त्यांना कधी-कधी फळ्यावरील अक्षरे नीट दिसत नसत. शिक्षक काय बोलले ते नीट ऐकू येत नसे. यातून ज्ञानग्रहण करणार्‍या मुलांवर अन्याय होत असे. ऑनलाइन शिक्षणामुळे आपण नवी अस्पृश्यता शिक्षण क्षेत्रात जन्माला घालतो आहोत का? असा प्रश्न पडतो. 

                                        ॥ ७ ॥
समाजाची शिक्षकांकडे पाहण्याची दृष्टी संकुचित स्वरूपाची दिसते. शिक्षकांना फुकटचा भरपूर पगार मिळतो. शिक्षकांना फार कमी काम असते. कोरोना काळात शिक्षक घरात बसून फुकटचा पगार घेत आहेत. या संकुचित मानसिकतेच्या परिणामातून प्रशासकीय अधिकार्‍यानी शिक्षकांची ड्युटी दारू दुकानासमोरील गर्दीला शिस्त लावण्यासाठी लावली. यातून भारतीय समाजाच्या भविष्यातील अधोगतीचे चित्र स्पष्ट होते. चेक नाक्यावर शिक्षकांना ड्युटी लागते. सर्वे करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक होते. सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांची नेमणूक केली जाते. यातून समाजातील विशिष्ट वर्ग शिक्षकांकडे नकारात्मक भावनेने पाहतो आहे. असे दिसते. या सर्वांचा परिणाम शिक्षकांच्या मानसिकतेवर होणार नाही का? उद्या कोरोनाचा काळ संपल्यावर अध्यापन करणार्‍या शिक्षकांना समाजातील आपली नगण्यता पुन्हा आठवणार नाही का? शिक्षकांच्या मानसिकतेचा समाज, प्रशासकीय अधिकारी कधी विचार करणार ?  ज्या समाजात शिक्षकाला किंमत असत नाही. तो समाज ज्ञान, कौशल्यापासून दूर जातो. गुलाम बनतो. विचार प्रक्रियेला गती देणारा शिक्षक जेव्हा कमजोर होतो. तेव्हा समाजातील विचारप्रक्रिया मंद होते. समाजाची विचारप्रक्रिया मंद झाली की, तो गुलाम बनतो. हे भविष्य सांगण्यासाठी कुणाचीही गरज लागणार नाही.

                                     ॥ ८ ॥
 कोरोना काळात काही शिक्षकांनी उत्तम प्रयोग केले. कोरोना पूर्वकाळात शिक्षक आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असत. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक सुलभ, सोपी साधने निर्माण केली आहेत. वेबसाईट, युट्युब वरील चैनल, फेसबुक लाईव्ह, गुगल मीट, संपर्क लाईव्ह या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करण्याचे नवे मार्ग काही शिक्षकांनी सहजपणे हाताळले. शिक्षक या साधनांकडे कदाचित लवकर वळाले नसते. कोरोनाच्या आपत्तीमुळे, गरजेपोटी शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान अवगत केले. ब्लॉग लिहून एखाद्या विषयाच्या नोट्स मुलांना छोट्याश्या लिंकद्वारे देणे सहज-सोपे झाले. अभ्यासक्रमाच्या अनेक पुस्तकांच्या पीडीएफ मुलांपर्यंत सहज पोहोचवता येतात. लाखो संदर्भ ग्रंथ पीडीएफ स्वरूपात मुलांना देता येतात. अभ्यास विषयासंदर्भातील उत्तम व्हिडिओ मुलांना शेअर करता येतात. या सगळ्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला गती आली. मुलांमध्ये ज्ञानग्रहणाची जिज्ञासा जागृत होऊ शकते. कोरोनामुळे शिक्षकांना थोडा निवांतपणा मिळाला. यातून या वेळेचा चांगला वापर शिक्षकांनी केला. ऑनलाइन नव्या साधनांचा परिचय शिक्षकांना झाला. भविष्यात सर्व शिक्षक या ऑनलाईन साधनांचा सुयोग्य, गरजेपुरता वापर करतील. कोरोनामुळे शिक्षकांना उत्तम प्रयोग करण्याची संधी मिळाली. 
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबद्दल जागरूकता वाढली. जगभरातील अभ्यासकांमध्ये सुसंवाद घडू लागला. विचारांचे आदान-प्रदान घडू लागले. प्रदेश, भाषा यांच्यातील अंतर कमी झाले. ऑनलाइन कौशल्याधारित कोर्समुळे शिक्षकांमध्ये कौशल्य निर्माण झाले. हे सगळे प्रयोग आज सुरू आहेत. कोरोनाच्या स्थितीमुळे या नव्या तंत्रज्ञानाला गती मिळाली. हे नवतंत्रज्ञान हाताळण्याचा वेग वाढला. कोरोना आपत्ती ही इष्टापत्ती ठरली. थोड्याच दिवसात ऑनलाइन शिक्षणासाठी शासन-प्रशासन, विद्यापीठ शाळा, महाविद्यालयांवर, शिक्षकांवर दबाव टाकू शकतात. हे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्या अगोदर वरील काही मुद्द्यांचा विचार समाजमनाने करावा. यासाठी हा लेखप्रपंच केलेला आहे.

डॉ. गणपतराव ढेंबरे 
सहायक प्राध्यापक,
श्री .व्ही. एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका रावेर जिल्हा जळगाव पिन -4255O8 
मोबाईल नंबर -9421O81270 ई-मेल -dhembregr@gmail.com

मंगळवार, ७ जुलै, २०२०

कोरोना आणि समाज मन

" कोरोना आणि समाज मन  "

डॉ . गणपतराव ढेंबरे , रावेर

कोरोनामुळे काही नवे दृष्टिकोन समाजाला मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे २०२० हे महिने कोरोनाच्या दहशतीचे होते. या काळात समाज व्यक्तित्वाचा सिक्स सेंस दहशतीच्या सावटाखाली होता . समाजाने कोरोणाची खूप भीती घेतेली होती. त्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चिथावणीखोर प्रसारणाची अधिक जोड होती. समाजमानसाचा सिक्स सेंस येथे फार गलितगात्र झाला होता. यातून पळापळ झाली. हळूहळू समाजाचा कोरोना आजाराबद्दलचा दृष्टीकोन बदलत गेला. समाज मन थोडं धीट झालं. या आपत्तीकडे लोक उघडे डोळे ठेवून बघायला लागले. दहशतीचे सावट कमी झाले.समाज मन स्थिर होऊ लागले. याला कारण ज्यांना कोरोना झाला होता. ते बरे झालेले वीर सांगू लागले , घाबरण्यासारखे काही नाही . आजार काही विशेष नाही. या वीरांनी समाजात आजाराबद्दल नव्या कहाण्या पेरल्या. माणसं आजाराला सहज मानू लागली. या आजाराने महासत्ता होणाऱ्या या देशाचे डोळे खाडकन उघडले.


 गेल्या ७० वर्षात सार्वजनिक आरोग्याचे तीन-तेरा वाजले होते. भांडवलदार वर्गाने सार्वजनिक आरोग्य यंत्रणा साम-दाम-दंड-भेद सगळं वापरून रसातळाला नेली. खाजगी दवाखान्यांचे नवे कारखाने उभे राहिले. ज्याच्याजवळ पैसा त्याला या यंत्रणेचा लाभ मिळू लागला. नवश्रीमंत, मध्यमवर्ग या खाजगी दवाखान्याकडे वाळला. काही वर्गाची ही सुविधा , सेवा वापरण्याची अवकात नसतानाही मरणाच्या भीतीपोटी तो वर्गही या यंत्रणेकडे वळला. राजकारणी मंडळींनी सार्वजनिक आरोग्याचे करता येईल तितकं वाटोळं केले. खाजगी दवाखाने सेवा नव्हती तो उद्योग होता. कुठलेही बंधन मर्यादा नसलेला व्यवसाय होता. सरकारी यंत्रणाच्या नियत्रांणापलीकडचा लुटणारा व्यवसाय होता. या लोकांनी गुंतवलेल्या हजारो कोटी रुपयांतून सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला. हा प्रश्न जाणीवपूर्वक उभा केला गेला. सरकारी दवाखान्याची गरज काय? असा भ्रम तयार करण्यात या यंत्रणेला यश आले. हे सगळं चित्र उभे राहत असताना सरकारी दवाखान्यातील यंत्रणेने बद्दल खरं-खोटं चित्र बनवले गेले. अव्यवस्था, हलगर्जीपणा, अस्वच्छता असे रूप सरकारी आरोग्य यंत्रणेचे बनवण्यात आले. यात काही प्रमाणात तथ्यं होते. मागे डोळ्यांच्या खाजगी डॉक्टरांनी षड्यंत्र करून काही रुग्णांना आंधळे केले. यातून या रुग्णांना डॉ.तात्याराव लहाने यांनी बरे केले.  परंतु सरकारी यंत्रणेवरचा विश्वास संपवण्यात या लोकांनाही यश आले होते.पुढील काळातील कोरोनाचीअवस्था कशी असेल? याबद्दल काही शक्यता वाटतात. त्यातली एक शक्यता म्हणजे स्वाईन फ्लूसारख्या आजार हळूहळू नष्ट होईल. समाज पुन्हा पूर्वपदावर येईल. दुसरा अंदाज म्हणजे हाहाकार माजवणारा असेल. रुग्ण वाढतील. सगळी यंत्रणा कोलमडून पडेल. माणसं मुंगीसारखी मारतील. देशात अराजक येईल. यंत्रणा नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही.
 तर तिसरी शक्यता म्हणजे सरकार या सगळ्यावरती नियंत्रण ठेवेल. हळूहळू हा रोग आटोक्यात येईल. तीन ते पाच टक्के लोकांचा मृत्यू होईल. समाज पुन्हा पूर्वपदावर येईल. कोरोनाच्या परिणामांची चर्चा आत्ताचं करण्यात काही अर्थ नाही. काही काळ गेल्यानंतर कोरोणाच्या दृश्य-अदृश्य परिणामांची चर्चा करता येईल. लोकांचे खूप हाल झाले. हे मात्र खरं आहे .


कोरोनाचा समाजातील वेगवेगळ्या घटकांवर परिणाम झाले. कोरोनाच्या काळात लोकांचे प्रचंड हाल झाले. यात गरीब लोकांचा अधिक समावेश होता. विशेषतः शहरातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या वाट्याला प्रचंड वेदना आणि अवहेलना आली.चालत जाणारे लाखो मजूर , त्यांची लहान मुले , म्हातारी माणसे , गरोदर महिला यांना या महामारीचा अधिक फटका बसला. प्रशासन आणि राजकीय मंडळींनी या गरीब माणसांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. भीतीतून होणारा गावाकडचा प्रवास जीवघेणा ठरला. काहींचा या प्रवासातच अंत झाला. यंत्रणेकडून परिस्थिती हाताळण्याच्या कुठलेचं सूत्रबद्ध नियोजन दिसले नाही. बेफिकिरी , दुर्लक्ष यातून गरीब माणसाला माणूस न समजणारी असंवेदनशील वृत्ती अधिक ठळक झाली. या कोरोना काळात समाजाच्या मानसिकतेत बदल झाला. प्रेम , सद्भाव , माया , संवेदना यांची जागा संशयाने घेतली. संशयातून माणसं स्वार्थी झाली. आपण , आपले कुटुंब ह्या पलिकडे न जाणारी स्वर्थी वृत्ती या काळात वाढली. समाजातील काही लोक स्वतःच्या मूल्यांवर ठाम होते. त्यांनी संवेदना ठेवून लोकांची मदत केले.पायी , मिळेल त्या वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांना पाणी , अन्नधान्य ,फळे वाटप करून मदत केली. या चांगल्या विचारांच्या लोकांनी माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध केले .

 कोरोना आणि शेतकरी या बद्दलचे चित्र वेगळे होते. कोरोनाआल्यामुळे शेतकरी थांबला नाही. शेतीची कामे सुरू राहिली. पिकांची लागवड , कापणी ,काढणी सुरू राहिली. भाजीपाला , धान्य ,फळे , दूध यांचे वितरण शेतकऱ्यांच्या कष्टातून सुरू राहिले. भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे या काळात प्रचंड नुकसान झाले. वाहतूक व्यवस्था कोलमडली. यामुळे नाशवंत भाजीपाला शेतातच खराब झाला. कष्टाने पिकवलेला माल मातीमोल होताना पाहून शेतकरी हतबल झाला. परंतु शेतक ऱ्यांनी उमेद हरली नाही.  शेतकऱ्याने नव्या हंगामात पुन्हा कंबर कसली. नव्याने लागवड केली. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. हे शेतकऱ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. भविष्यात पुन्हा समाजाला जिवंत ठेवण्यासाठी धान्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी केली.  शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मात्र कुणालाच नाही ? भाजीपाल्याचे नुकसान झाले त्याला काहीच मिळाले नाही . भाव कमी मिळाला तरी त्याला जाबा विचारावासा वाटत नाही . त्याला व्यवस्थेत कुठलेचं स्थान मिळत नाही.  शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला कधी कळणार ? हा खरा प्रश्न आहे . 

कोरोनामुळे  शिक्षणावरही प्रचंड आघात झाला. ज्ञान प्रक्रिया वृद्धीगंत करणारी व्यवस्था कोलमडून पडली. शिक्षण घेणार्‍या प्रत्येकाचे एक वर्ष वाया जाणार की काय ?  असा संभ्रम निर्माण झाला. ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही अल्प प्रयत्न झाले. परंतु त्याला मर्यादा आहेत. सर्वांना परवडेल अशी यंत्रणा कधी अस्तित्वात येणार हा खरा प्रश्न आहे.

 सर्व चित्राच्या पार्श्वभूमीवर हे कधी संपेल ? पुन्हा पहिल्यासारखे जीवन रुटीन कधी सुरू होईल ? पुन्हा मित्र एकत्र येऊन गरम गरम चहा घेतील. सोबत गप्पांची मैफिल गावोगाव रंगेल. कोरोना काळावर हिररेन मतमतांरे मांडले जातील.पुन्हा आपले सांस्कृतिक सण उत्सव आपण जोमाने साजरे करू . तो आपणासाठी सुदिन ठरेल. संशयाचे मळभ दूर होऊन आपण पुन्हा मोकळा श्वास घेऊ.  पुन्हा अपेक्षांचा आभाळ भरून येईल. विश्वासाचा वारू जोरात दौडेल !! पुन्हा माणसं जवळ येतील. शब्दाशिवाय संवाद पुन्हा जवळीक निर्माण करेल. मनाला पुन्हा नवी उमेद येईल !! पुन्हा आनंदाने गाणे आपण सर्वजण गाऊ !!

 देशदूतच्या दर्जेदार विशेषांकांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
 धन्यवाद !!!
डॉ . गणपतराव ढेंबरे ,
रावेर  ,
मोबईल नंबर-९४२१०८१२७०

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...