रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

अभिरूचीचे बदलते रंग अर्थात मिर्झापूर वेब सिरीज॥

 ॥ "अभिरुचीचे बदलते रंग : अर्थात मिर्जापूर वेब सीरीज "॥



वेब सिरीजच्या इतिहासात मिर्झापूरच नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. पहिला सीजन आणि दुसरा सीजन नंतर रसिक तिसऱ्या सीजनची फार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. भारतभर तरुण वर्गाच्या पसंतीला उतरलेली ही वेब सिरीज एखाद्या जादू सारखी आहे. एखादं आवडतं पुस्तक संपुच नये असं वाटतं. तसं ही वेब सीरीज संपू नये असं वाटतं. अतिशय वेगवान कथानक, उच्च अभिनयातून साकार झालेली पात्रे ,खटकेबाज संवाद, आशयगर्भ भाषा, गुंतागुंतीचं कथानक, व्यापक जीवन चित्रणचा शोध, सत्तासंघर्ष ,स्त्री-पुरुष संबंधातील तटस्थ सत्यता ,मानवी नात्यातील स्वार्थ त्यागी-भोगी वास्तव दर्शकाला खिळवून ठेवते. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाचं या वेब सिरीजन वेडं लावलं आहे.


 ही वेब सीरीज पाहताना अनेक नवे प्रश्न मनात उभे राहिले. समाजाच्या अभिरुचीचा स्तर बदलला आहे का? अश्लीलता  सर्वमान्य झाली आहे का? व्यसनाधीनता समाजमान्य होत आहे का? स्त्री-पुरुष नाते संबंधातील नवता अभिरुचीला गती देत आहे का? या सगळ्या प्रश्नांबरोबरच या वेबसीरीजच्या  लोकप्रियतेमागे  कोणतं रहस्य दडला आहे? हे शोधणे महत्त्वाचा ठरते.


 मिर्झापूर उत्तर प्रदेशातील एक शहर आहे. विंध्याचल जिल्ह्याच्या मुख्य शहर म्हणजे मिर्झापूर होय. हा जिल्हा तीन राज्यांच्या सीमांना लागून आहे. बिहार ,छत्तीसगड, झारखंड राज्याच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत. मिर्झापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अफूची शेती केली जाते. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी वृत्तीचे सखोल चित्रण मिर्झापूर वेबसिरिज मध्ये येते. अफूचा वैध/ अवैध व्यापर , देशी कट्टे ,बंदुका यांचा व्यापार या भागात मोठ्या प्रमाणात चालतो. या व्यवसायातील सत्तासंघर्ष, सत्तास्पर्धा टिकवण्यासाठी काय काय केले जाते. याचे चित्रण या वेबसीरिज मध्ये येते. मिर्झापूर ही वेब सीरीज सात कुटुंबा भोवती फिरते. या सगळ्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे त्रिपाठी कुटुंबाच्या तीन पिढ्या. बाबूजी, अखंडानंद त्रिपाठी, फुलचंद उर्फ मुन्ना त्रिपाठी हे बहुबली कुटुंब या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. मिर्झापूरची सत्ता म्हणजे पूर्वांचलवर सत्ता पर्यायाने उत्तर प्रदेशच्या राजकीय सत्तेतील सर्वात मोठी भागीदारी, लाभार्थी सत्ता होय.  ही सत्ता अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीनभैयाच्या हातात आहे. मुन्नाला मिर्झापूरची गादी खुणावते आहे. बाबूजी अपंग असले तरी त्यांचा सल्ला कालीनभैया विचारात घेतो. मुन्ना त्रिपाठी हा तरुण आहे.कालीन भैय्याच्या पहिल्या पत्नीचा मुन्ना हा मुलगा आहे. भावनांवर नियंत्रण नसलेला हिंसक तरूण म्हणजे मुन्ना त्रिपाठी होय. मुन्नाला वाटत राहतं तो लायक असून त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही. मुन्ना कालीन भैय्यावर नाराज आहे. मिर्झापूर शहरावर त्रिपाठी कुटुंबाची पूर्ण सत्ता आहे. या सत्तेला आव्हान देण्याचे काम वकील असणारा पंडित करतो. पंडित कुटुंबात दोन मुले आहेत. बबलू पंडित आणिगुड्डू पंडित यांचा बाप मुन्नाच्या विरुद्ध केस लढविण्यचं ठरवतो. मुन्ना वकील पंडित कुटुंबावर हल्ला करतो. या हल्ल्यामध्ये मुन्नाला गुड्डू पंडित चोप देतो. हाच या सीरीजमधला मुख्य केंद्रबिंदू आहे. मुन्नाला पंडित बंधूचा बदला घ्यायचा आहे. कालीनभैय्या पंडित बंधूंना स्वतःकडे कामासाठी ठेवून घेतो. पंडित बंधूमध्ये एका अतिशय बुद्धिमान हुशार चलाख आहे. तर दुसरा शक्तिशाली बलवान आहे. पंडित बंधू कालीनभैय्याचा व्यापार वाढवून देतात. कालीनभैय्याला प्रचंड नफा कमवून देतात. पंडित बंधू कालीनभैय्याच्या अगदी विश्वासातले होतात. अगदी जवळ जातात. रतीचरण शुक्ला हा एकेकाळी त्रिपाठी कुटुंबाचा भाग होता. परंतु मिर्जापुरची गादी मिळवण्यासाठी रतीचरण शुक्ला त्रिपाठी कुटुंबावर हल्ला करतो. बाबूजी शुक्लाला माफ करतो. कारण त्याने त्याचा जीव वाचवलेला असतो.  बाबूजी शुक्लाला जोनपुरची संपूर्ण कारभार देतो. शुक्लाला मिर्झापूरची गादी मिळवायची आहे. पंडित बंधू अकस्मातपणे शुक्लाला ठार करतात.  मुन्ना कालीनभैय्यावर कंपाउंडर या पात्रामार्फत हल्ला करतो. तो हल्ला असफल होतो. यातून मुन्ना अस्वस्थ होतो. मुन्ना कालीनच्या मनात पंडित बंधूबद्दल संशय निर्माण करतो. कालीनभैया मुन्नाला पंडित बंधूना मारण्याचा आदेश देतो. मुन्ना भर लग्नात बुद्धिमान, हुशार, शांत ,संयमी बबलू पंडितला ठार करतो. मुन्ना गुड्डू पंडीतच्या पत्नीला स्वीटीलाही ठार करतो. स्वीटी ही गुप्ता इन्स्पेक्टरची मुलगी आहे. तिच्यावर मुन्ना एकतर्फी प्रेम करत असतो. स्वीटीची बहिण गोलू ऊर्फ गजगामिनी गुप्ता आणि बलवान गुड्डू पंडित त्रिपाठी कुटुंबाचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न करतात. रतीचरण शुक्ला मरण पावल्यामुळे त्याची जागा त्याचा मुलगा शरद घेतो. तो अतिशय हुशार, चलाख आहे. तरुण आहे. तो त्रिपाठी कुटुंबाचा विश्वास जिंकतो. शरद शुक्लाला  मिर्झापूरची सत्ता हवी आहे. शरद शुक्ला मुख्यमंत्र्यांचा बंधू जे.पी. यादवशी संधान बांधून मिर्झापूर मिळवण्याचा प्रयत्न करतो. जे. पी. यादव आणि शरद शुक्ला मुख्यमंत्र्यांचा अपघात घडवतात. त्यात मुख्यमंत्री यादव ठार होतो.


 निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्याची मुलगी माधुरी यादव मुन्नाच्या संपर्कात येते. माधुरी विधवा आहे. ती मुन्नाच्या प्रेमात पडते. वडिलांच्या मृत्यूनंतर माधुरी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेते. माधुरी व कालीन जे .पी ला राजकारणातून संपून टाकतात. त्रिपाठींच्या विरोधात लाला गुड्डू पंडित व गोलूला मदत करतो. कारण लालाच्या मुलीच्या लग्नात बबलू त्रिपाठीला मुन्ना मारतो. तेव्हा तो लालाच्या जावयाला म्हणजे शबनमच्या नवऱ्यालाही त्या ठिकाणी मारतो. बिहारच्या संपूर्ण राज्यवर त्यागी कुटुंबची पकड आहे. उंचीने कमी असलेला छोटा ददा आणि त्याची दोन जुळे मुले भरत आणि शत्रुघ्न यांच्या संपर्कात शरद शुक्ला आहे. त्या कुटुंबातील एक भाऊ गोलूच्या प्रेमात पडतो. अफूच्या व्यापारातून त्यागी कुटुंबात संघर्ष घडून येतो. या संघर्षामध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाला ठार करतो. गुड्डू पंडित व गोलू उर्फ गजगामिनी गुप्ता आपला प्रतिशोध पूर्ण करतात. ते मुन्ना त्रिपाठीला  ठार करतात. अखंडानंद त्रिपाठीची दुसरी पत्नी बिना नोकर राजासोबत अनैतिक संबंध ठेवते. त्यातून तिला मुलगा होतो. बाबूजी बीनाला राजशी असलेले संबंध तोडायला लावतात. मुन्ना कालीन भैय्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मुकबुलचा भाचा बाबर आणि त्याच्या आईला  ठार करतो. यातून मकबुल बाबूजीला मारण्यासाठी येतो. परंतु बिना मकबुलला विनंती करून सासरा बाबूजीला ठार करते. कारण त्याने तिच्यावर बलात्कार केलेला असतो.  मुन्नाची पत्नी माधुरी यादव उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री बनते. शरद शुक्ला जखमी कालीनभैयाला वाचवण्याचे नाटक करतो. बिना आपल्या मुलासाठी मिर्झापूरची गादी चालवू पाहते. त्यागी कुटुंबातील शिल्लक राहिलेला शत्रुघन त्यागी सत्तासंघर्षसाठी तयार होतो. गुड्डू पंडित आणि गुलू आपला प्रतिशोध पूर्ण करून पुढे काय करतात? या विचित्र क्लायमॅक्सवर मिर्झापूरचा दुसरा सिझन संपला आहे. आता पुढे काय? ही उत्सुकता जिवंत ठेवत ही वेब सिरीज तिसऱ्या भागाकडे मार्गक्रमण करते. या संपूर्ण 2020 च्या दिवाळीत अनेक तरूण एकमेकांना एकच प्रश्न विचारत होते. काय रे? मिर्झापूर पाहिली  का? संपूर्ण भारतभर मिर्झापूरची प्रचंड क्रेझ होती. पूर्वी दिवाळीत लोक दिवाळी अंकाचे, त्यातील साहित्याची चर्चा करायचे. १९९०नंतर चित्रपटांची चर्चा व्हायची. अमुक चित्रपट पाहिला का? असं विचारलं जायचं. नंतर टीव्ही सिरीयलचे समाज मनावर गारुड  होतं. आता जमाना वेबसीरीजचा आहे.


आज माध्यमांच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. आज अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य चौथ्या आसमानवरती आहे. नव्या माध्यमातून वेब सिरीज अभिव्यक्तीचं, अभिरुची नवं रूप घेऊन येत आहेत. स्टार कलावंत,स्टर लेखक, स्टार अभिनेते यांच्यापेक्षा काहीतरी वेगळा करण्यासाठी धडपडणार्‍या तरुणांनानी वेबसीरीज सुरू केल्याआहेत. आपल्या भावनांना, विषयाला ,आशयाला, कलेला सादर करण्याचे वैश्विक कलामंच खुला झाला आहे. यातून फारसे प्रसिद्ध, परिचित नसलेले चेहरे काहीतरी सकास घेऊन स्वतःच्या भाषेत पुढे येत आहेत. वेगवेगळ्या भाषेतून वेबसिरीज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहेत. प्रदेश, भाषा, राज्य, राष्ट्र, यांच्या सीमा आता छोट्या पडू लागल्या आहेत. सकस दर्जेदार काहीतरी वेगळेपण असणाऱ्या कलाकृती स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहेत. मिर्झापूरने स्वतःचं अस्तित्व रसिकांमध्ये निर्माण केले आहे. अभिव्यक्तीतील थेटपणा रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. भाषेतील मिर्झापूर थेट बोलीरूप रसिकांना भयानक आवडले आहे. रसिक चुत्यासारखा वेबसीरीज पाहात आहेत. भारतातील तरुण वर्ग पगलाके ही वेब सिरीज पाहत आहे.


 गेम ऑफ थ्रोन ह्या वेबसीरीजचा प्रभाव  मिर्जापुरवर असल्यासारखे वाटते. सत्तासंघर्ष ,स्त्री-पुरुष संबंधातील जटिलता, कुटुंबाच्या नात्यातील ओलावा आणि रुक्षता , जगण्यातील क्रूरता , सर्वसामान्य माणसाचा हाताशपण या वेबसीरीज मधून येते.  मिर्झापूर ही वेबसीरीज त्रिपाठी, शुक्ला, पंडित, यादव, त्यागी , गुप्ता, लाला या सात कुटुंबांची कथा आहे. सत्ता ही कधीही एकटे असत नाही. सत्ता संघर्ष घेऊन येते. संघर्ष नातेसंबंध ,मूल्य, भावना यांचे अस्तित्व पुसून टाकतो. शेवटी नातेसंबंध, मूल्य पुस्तकी ठरतात. ते रॅपर प्रमाणे चिकटवल्या सारखे वाटतात. अंतीम सत्य म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेकांचा बळी देणे महत्त्वाचे ठरते. ही वेबसिरीज तरुण वर्गाच्या पसंतीला का आली? या वेबसीरीजमध्ये संघर्षातील जटीलता, नात्यातील फोलपणा, स्त्री-पुरुष संबंधातील अतिथेट चित्रण , मिर्जापुरी भाषा, अभिनयातील साधेपण, वास्तवाचे अचूक चित्रण , सत्तासंघर्ष, गुन्हेगारीकरणाचे उदात्तीकरण, बटबटीत हिंसा या सगळ्याच्या मिलाफातून मिर्झापूर रसिकांच्या पसंतीला उतरली आहे.  हिंसा, चटपटीत अश्लीलतेकडे चुकलेले स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण लोकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले. भाषेतला थेटपणे ,संवादातील खटकेबाजपणा रसिकांना भुरळ घालतो. दैनंदिन जीवनात शिव्या, अश्लील शब्द सर्रास वापरले जातात. तेच मिर्झापूर मध्ये मुक्तकंठाने अभिव्यक्त होतात. मिर्जापुरमध्ये कथानकाचा भाग म्हणून व्यसनाधीनतेचे चित्रण मोठ्या प्रमाणात येते. दारू मादक पदार्थांच्या सेवनातील क्रेझ उत्तम पद्धतीने चित्रित होते. समाजामध्ये व्यसनाधीनता समाजमान्य होत आहे. किंबहुना व्यसनाधीनतेबद्दल सुप्त आकर्षण वाढत आहे. तरुण वर्गाला व्यसनाधीनता हवीहवीशी वाटते. वेबसीरीज मधील चित्रण तरुण वर्गाच्या अभिरुचीला अचूक कुरवाळते. अश्लीलता, व्यसनाधीनता समाजमान्य होत आहे. समाजाच्या  अभिरुचीचे नवे प्रारूप या वेबसिरीजच्या निमित्ताने पुढे येते.

 क्या करे जमाना बदल रहा है !!

 हम भी तो बदल रहे है !!


डॉ. गणपतराव ढेंबरे , रावेर , जि. जळगाव

मोबा .नं-९४२१०८१२७०

ईमेल -dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...