गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा

 इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा 



डॉ. गणपत रामदास ढेंबरे,

मराठी विभाग,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर ,ता.रावेर ,जि.जळगाव,

पिन कोड - ४२५५०८

मोबाईल नंबर -९४२१०८१२७०

ई-मेल-dhembregr@gmail.com

इ.स.१९७५ ते इ.स.२००० या कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पद्मा, इंदिरा संत या जेष्ठ

कवयित्रींपासून आजच्या उषाकिरण अत्राम या आदिवासी कवयित्रीपर्यंतच्या अनेक पिढ्यांच्या, विविध वयोगटांतल्या, विविध वर्गातून आलेल्या कवयित्रींचे काव्यलेखन प्रकाशित झालेले दिसते. या कालखंडात स्त्रियांना कुटुंबाकडून, समाजाकडून विस्तृत परिसर मिळाला. शिक्षण,वाचन भोवतीये सजग होत चाललेले सामाजिक,राजकीय वातावरण यांच्या प्रभावामुळे त्या मुक्तपणे आविष्कार करू लागल्या. आपला आविष्कार निःसंकोचपणे जगापुढे ठेवता यावा असे खुले, मोकळे सांस्कृतिक वाङ्मयीन वातावरण महाराष्ट्रातील स्त्रियांना लाभले. या काळात प्रकाशन व्यवसायही फोफावला. प्रयोगशील आणि संचारी बनला. त्यातील स्पर्धा आणि अहमहमिका वाढली. त्यामुळे काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणात प्रकाशित होऊ लागले.

या कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या कवयित्री कविता लिहित आहेत. परंतु अभ्यासाच्या सोयीसाठी इ.स. १९७५ नंतर ज्यांचे काव्यलेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे अशाच कवयित्रींचा विचार केला आहे. इंदिरा संत, शांता शेळके, अनुराधा पोतदार, शिरीष पै, निर्मला देशपांडे, पद्मा, वृंदा लिमये, संजीवनी मराठे, पद्मा लोकूर, सुहासिनी इर्लेकर,सरिता पदकी,  अंजली ठकार या कवयित्रींचे काव्यसंग्रह इ.स. १९७५ नंतर प्रकाशित झाले असले तरी ते अभ्यासासाठी विचारात घेतलेले नाहीत. इ.स. १९७५ नंतर प्रभा गणोरकर,रजनी परुळेकर,वासंती मुजुमदार, उषा मेहता,सुशीला पगारिया, सुलभा हेर्लेकर,अनुराधा पाटील, मलिका अमर शेख, नीरजा, अंजली कुलकर्णी, आसावरी काकडे, हेमा लेले,अश्विनी धोंगडे,मृणाल चिंचाळकर,ज्योती लांजेवार, अरुणा ढेरे,यशोधरा साठे,हेमा अंतरकर, सुनंदा भोसेकर,प्रज्ञा लोखंडे,संजीवनी खोजे, सुमती लांडे,श्रद्धा पराते, संजीवनी बोकील इ.कवयित्रींचे काव्यलेखन आकार घेऊ लागले. कवितेविषयीच्या जाणिवा,कवितेतून व्यक्त होणाऱ्या वृत्तिप्रवृत्ती आणि कवितेचे स्वरूप या बाबतीत पूर्वी कधीही आढळले नव्हते,एवढे वैविध्य या स्त्रियांच्या काव्यलेखनात आढळते. या काळातल्या कवयित्रींनी आपल्या आधीच्या व समकालीन  कवयित्रींचे संस्कार घेतले.त्याचबरोबर आशय आणि अभिव्यक्ती या बाबतीत आपल्या स्वतःच्या नव्या वाटा शोधण्याचाही मनःपूर्वक प्रयत्न केलेला दिसतो. इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेविषयी प्रभा गणोरकर लिहितात,"स्वातंत्र्योत्तर काळात इ.स. १९६० नंतर आणि पुढे इ.स. १९७५ नंतर भारतीय समाजजीवनात जी स्थित्यंतरे होत गेली,समाजवास्तव बदलत गेले त्यांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या काळातल्या कवितेवर होत गेलेले दिसतात आणि ते नव्या पिढीच्या कवयित्रींच्या कवितेतून दिसतात असे नाही, तर इ.स. १९६० पर्यंतच्या काळात सुप्रतिष्ठित झालेल्या इंदिरा संत किंवा शांता शेळके, शिरीष पै इ. कवयित्रींच्या कवितेतूनही जाणवतात. बदलत्या जीवनजाणिवा आणि कवितेविषयीच्या बदललेल्या कल्पना यांचे कवितेत उमटलेले मुख्य चिन्ह म्हणने पूर्वी कविता व्यक्ती आणि समाज,व्यक्ती आणि निसर्ग,व्यक्ती आणि प्रीती किंवा ईश्वर अशा सुट्या, विलग अनुभूतींमध्ये विभागली जात असे.१९६० नंतर कवितेतील अनुभूतीचे स्वरूप असे एकारलेले दिसत नाही.अनेक बहुपदरी अनुभव एकत्रितपणे व्यक्त करणारी ही कविता आहे. तिच्यातील संवेदनाविश्व नुसते व्यापकच नव्हे, तर गुंतागुंतीचेही आहे. कवितेचे हे बदललेले स्वरूप ज्येष्ठ पिढीच्या कवयित्रींनाही जाणवलेले दिसते. यंत्रयुगामुळे निर्माण झालेली भीषण वास्तवता त्यांना विशेष भेडसावत नसावी. ह्या वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या बीभत्साचेही आवाहन त्यांच्यापर्यंत पोचत नसावे, जीवनात जे सत् आहे व सुंदर आहे, त्याच्यावरील त्यांच्या श्रद्धेला अद्यापि ढळ पोहोचलेला दिसत नाही... आपल्या जीवनाबाहेरील जगताचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न त्या सहसा करत नाहीत...' असे ज्या या ज्येष्ठ कवयित्रींबद्दल रा.श्री.जोग यांनी म्हटले होते त्या कवयित्रींची १९७५ नंतरची  कविता या मर्यादा ओलांडणारी आहे, असे निश्चितच म्हणता येईल. अर्थात आपल्या पिंडधर्माशी,प्रकृतीशी, अनुभवांशी व जीवनजाणिवांशी त्यांची कविता प्रामाणिकच राहिली आहे, तरीही बदलत्या काळानुसार  बदललेल्या वास्तवाचा वेध त्यांनी आपल्या परीने घेतलेला दिसतो. हे वास्तव नेहमीच सामाजिक होते असे नाही. किंबहुना सामाजिक वास्तव एकूण कवयित्रींच्या कवितेतून थेटपणाने क्वचित अवतरले आहे. कवयित्रींच्या कवितेतील वास्तव हे त्यांच्या भावविश्वात प्रतिबिंबित झालेले,अप्रत्यक्ष वास्तव आहे. बदललेल्या सामाजिक वास्तवाविषयीच्या कधी त्या प्रतिक्रिया आहेत. पूर्वीच्या आत्मकोषातून बाहेर पडल्याची ती खूप आहे. "१


इ.स. १९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप वरील विवेचनातून आपल्या लक्षात येते.इ.स.१९७५ नंतरचे सांस्कृतिक पर्यावरण स्त्रीच्या अभिव्यक्तीसाठी पोषक ठरत गेले आणि कविता हे अभिव्यक्तीचे सहज रूप असल्यामुळे स्त्रियांच्या काव्यसंग्रहांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. इ.स.१९७५ हे 'आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष ' म्हणून घोषित झाल्यामुळे विविध गटांमध्ये तसेच विविध देशांमध्ये विखुरलेल्या स्त्रियांचे वैचारिक आदान-प्रदान सुरू झाले. त्यातून स्त्रीमुक्तीच्या तत्त्वज्ञानाचे नवे विचार,नव्या विचारांच्या संदर्भात सामाजिक वास्तवाचे नवे भान अशी जागृतता येऊ लागली.स्त्रियांच्या काव्यामधून नवी संवेदनशीलता व्यक्त होऊ लागली. स्त्रियांसाठीची नियतकालिकेही निघू लागली.इ.स. १९७५ पूर्वीही काही कवयित्रींनी नवी जाणीव अधूनमधून व्यक्त केली होती. पण एक प्रवाह म्हणून लक्ष वेधणारी कविता मुख्यतः इ.स.१९७५ आणि नंतर दिसते.


या कवितेचे स्वरूप प्रभा गणोरकर सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त करतात. त्या लिहितात, "इ.स. १९७५ नंतरच्या कवितांतही आत्माविष्काराची जाणीव अधिक प्रभावी आहे हे स्पष्ट  आहे. तथापि इ.स.१९७५ पर्यंत कवितांमध्ये क्वचितच आढळणारे सामाजिक संदर्भ तीव्र असे सद्य:स्थितीचे भान इ.स. १९७५नंतरच्या अनेक कवयित्रींनी प्रकट केलेले आहे. किंबहुना या काळातली स्त्रियांची कविता जी वैशिष्ट्ये घेऊन अवतरली आहे त्यांचा,त्यांच्याभोवतीच्या समाजस्थितीशी जवळचा संबंध आहे. या कवयित्री आणि त्यांची कविता त्यांच्या अस्तित्वविषयक प्रश्नांशी नाळेने जोडलेल्या आहेत. इ.स.१९७५ नंतरच्या कालखंडातील स्त्रियांच्या कवितेत मानवी संबंधामध्ये आलेले दुरावा, .बदल स्त्री- पुरूषांच्या नात्यांमध्ये झालेला बदल,कवीला हस्तिदंती मनोऱ्यात राहून चालत नसते याचे आलेले भान,अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या विखुरलेल्या, बुजबुजलेल्या, कोरड्या, बुजबुजलेल्या, कोरड्या,अलिप्त मानवसमूहात वावरताना येणारे असह्य एकाकीपण आणि परात्मता ,भोवतीच्या आर्थिक-सामाजिक स्तरांमधल्या मानवी जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती,स्वतःच्या माणूस म्हणून, स्त्री म्हणून असणाऱ्या जगण्याचा, अस्तित्वाचा विचार करताना पडणारे प्रश्न,वाटणारे भय, येणारे नैराश्य आणि उद्वेग, शहरे- महानगरे,खेडी यात जगणाऱ्या माणसांना आलेली अवकळा, अवतीभोवती सतत अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे मनावर उठणारे ओरखडे,दहशत,हिंस्त्रता,दंगली यांनी  ग्रासलेला रक्तपिपासू वर्तमानकाळ, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येऊन सुटू न शकलेले सामाजिक प्रश्न, अशा अनेक पदरी जाणिवांचे संदर्भ सतत येत राहतात. ते प्रकट करताना या काळातील स्त्रीची कविता शब्दांचा, प्रतिमांचा अत्यंत प्रभावी वापर करताना दिसते. " २


वरील विवेचनातून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप थोडक्यात विशद होते.सामाजिक प्रश्नांची जाण असलेली ही कविता आहे.विशेषतः स्त्रियांच्या जीवनाला केंद्रवर्ती ठेवणारी ही कविता आहे. स्वतःचा आत्मशोध घेणारी ही कविता आहे. आत्मभान आल्यामुळे स्वतःच्या जीवनाची उचित समीक्षा ही कविता करते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, अस्वस्थ मनाचे संवेदनशीलपणे प्रकटीकरण करणारी ही कविता आहे. स्वतःचा वेगळा चेहरा असलेली ही कविता स्वतःची भाषाशैली, प्रतीके, प्रतिमांची मांडणी करते. स्त्रियांच्या प्रश्नांबरोबरच स्त्रीविशिष्ट अनुभवाच्या प्रकटीकरणाला ही कविता महत्त्व देते.  आपल्या अस्तित्वाचा विशेष शोध हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपणाला इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप सांगता येईल.


इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेच्या प्रेरणा :-


समकालीन समाजवास्तव, झपाट्याने बदलणारे समाजजीवन,शिक्षणाचा होणारा प्रसार,बदलती आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि जातीय समीकरणे, समाजात असलेले स्त्रीचे स्थान, स्त्री म्हणून येणारे विविध पातळ्यांवरील अनुभव अशा अनेकविध घटकांचा विचार कवयित्रींच्या निर्मितीप्रेरणा मांडताना करावा लागतो. इ.स.१९७५ नंतर आपल्याकडे जी स्त्रीवादी विचारसरणी आढळते ती पाश्चात्य स्त्रीवादी चळवळीतून आणि स्त्रीवादी दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन आलेली असली तरी त्यामागे भारतीय स्त्रीमुक्तीचा वैचारिक स्रोत त्याला बळ देणारा ठरतो.म.फुले,पं.रमाबाई,आगरकर, महर्षी कर्वे,डॉ.आंबेडकर,म.गांधी, यांनी येथील परिस्थितीतून स्त्रियांना गुलामगिरी,शोषण,समाजातील हीन दर्जा यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.भारतीय स्त्रीच्या विकासामध्ये फार मोठा वाटा प्रथम पुरुषांनीच उचलला. पाश्चात्य स्त्रीवादामुळे प्रभावित झालेल्या भारतीय स्त्रीचळवळीचा उगम १९व्या शतकातील समाजसुधारणांमधून झालेला दिसून येतो.एकोणिसाव्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाला महत्त्व

दिले गेले. शिक्षणामुळे स्त्रीला तिच्या सामर्थ्याची जाणीव झाली.आधुनिक मराठी कवितांच्या स्त्रियांच्यासंवेदनशीलतेचा आविष्कार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रूपात झाला आहे.भिन्न प्रकृतिधर्माच्या कवयित्रींवर स्वीवादाचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होणे स्वाभाविक आहे.सर्व स्वीवादी जाणिवेचे प्रकटीकरण करणाऱ्या कवयित्रींच्या लेखनामागे काही समान प्रेरणा असलेल्या दिसतात.या समान प्रेरणा म्हणजे भारतीय समाजसुधारकांच्या चळवळी, स्त्रीमुक्तीची चळवळ,शिक्षणाचा प्रसार,म.फुले यांचे कार्य य विचारधारा, वाङ्मयीन चळवळींच्या उदयाची प्रेरणा इत्यादी प्रेरणा आपणाला ठळकपणे सांगता येतील.

 स्त्रीमुक्ती चळवळ :-

स्वातंत्र्योत्तर काळात युवकांच्या अनेक चळवळी उदयास आल्या. ह्यामध्ये दलित तरुणांच्या चळवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दलितांनी जातीअंताच्या लढ्यासाठी आक्रमक आणि विद्रोही पवित्रा घेतला. समाजातील अनेक स्तर कार्यप्रवण बनले.सन १९६०नंतर स्त्रियांची चळवळ हळूहळू संघटित होऊ लागली. सन १९७५ ते १९८५ ह्या आंतरराष्ट्रीय महिला दशकात स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांविषयी जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. ह्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळीचा पाया रोवला गेला.स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, आपल्या शरीरावर आपला अधिकार असायला हवा, नवऱ्यालाही 'नाही' म्हणण्याचा अधिकार हवा, स्त्रीला एक व्यक्ती म्हणून पुरुषाच्या बरोबरीने, समानतेने वागवले पाहिजे अशा प्रकारचे विचार स्त्रीमुक्ती चळवळीत मांडले गेले. ही चळवळ सुरूवातीला पुरुषांच्या वर्चस्वाविरूद्ध टीका करण्यात गुंतली.परंतु पुढे चळवळ या विचारातून बाहेर पडून व्यापक झाली.


उच्चवर्गीय स्त्रिया व कनिष्ठवर्गीय स्त्रिया त्या-त्या वर्गातील पुरूषांपेक्षा दुय्यम असतात. त्यांचे शोषण होत असते.त्यांच्या शोषणाचे स्वरूप वर्गीय स्थानाप्रमाणे बदलते. कनिष्ठवर्गीय स्त्रीस वर्गीय शोषण सहन करावे लागते.म्हणूनच स्त्री-मुक्ती चळवळीला वर्गसमाज नष्ट करण्यामध्ये रस आहे. त्याचबरोबर पुरुषी वर्चस्व नष्ट करण्यामध्येही रस आहे.हे पुरुषी वर्चस्व केवळ काही दुष्ट बुद्धीच्या बलात्कारी,हिंसक पुरूषांमुळे निर्माण झालेले नसून या समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व रचनेतूनच हे पुरुषी वर्चस्व आपोआप अस्तित्वात येते आणि म्हणूनच ते मानसिकतेचा, संस्काराचा भाग होऊन बसते. जातिव्यवस्था जशी जनमानसात रूजून बसलेली असते तशी पुरुषप्रधान व्यवस्था सुद्धा पुरूषांच्या व स्त्रियांच्याही मनात घट्ट बसलेली असते आणि म्हणूनच ती नैसर्गिक वाटते.वरील विचारांना छेद देण्यासाठी स्त्रीवादी चळवळीचा जन्म झाला. स्त्रियांना व्यक्ती म्हणून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जगभरात स्वीवादी चळवळ आकार घेऊ लागली. स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळावेत या मागणीसाठी काम करणारे स्त्रियांचे गट व संघटना तयार होऊ लागल्या.युरोपात प्रथम स्त्रीवादी चळवळ आकाराला आली.

भारतातील स्त्री-मुक्ती चळवळीची सुरूवात पुरूष समाजसुधारकांकडून झाली.राजा राममोहन रॉय,गोपाळराव हरी देशमुख,महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर,म.ज्योतीबा फुले,म.गांधी, धोंडो केशव कर्वे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांनी स्त्री-मुक्तीचा विचार मांडला.यातून भारतात स्त्रीमुक्ती चळवळीला प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांसाठी अनेक गोष्टी अनुकूल झाल्या.विविध कायदे हे स्त्री सुधारणांसाठी निर्माण झाले.अनेक राजकीय पक्षांनी स्त्रियांना आपल्या पक्षात सामावून घेतले. सामाजिक स्तरावर विविध आंदोलनाचे नेतृत्व स्त्रियांनी केले. यातून स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. आत्मभानातून स्त्रियांनी स्त्रीवादी चळवळीला बळकट करण्यासाठी विविध साधनांचेउपयोजन सुरू केले. या स्त्रीवादी विचारधारेतून, स्त्री-मुक्ती चळवळीतून स्त्रीवादी साहित्याने वैचारिक बळ

प्राप्त केले.स्त्रियांच्या साहित्याला एक निश्चित अशी दिशा स्त्री-मुक्ती चळवळीतून प्राप्त झाली.म्हणून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनामागे स्त्री-मुक्ती चळवळ ही एक प्रेरणा ठरते.काव्यातील आशय व अभिव्यक्तीला या चळवळीतून बळ मिळाले.आत्मशोध घेण्यास या चळवळीमुळे कवयित्रींना प्रेरणा मिळाली.एकूणच इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या साहित्यलेखनामागे स्त्री-मुक्ती चळवळीचा इतिहास, परंपरा,विचारधारा,कार्य ही एक प्रधान प्रेरणा आहे असे म्हणता येईल.


महात्मा फुले यांचे कार्य व विचारधारा:-


महात्मा ज्योतीबा फुले ह्यांनी केलेले स्त्रियांसाठीचे समाजकार्य क्रांतिकारक ठरते.महात्मा ज्योतीबा फुले ह्यांनी इ.स.१८४८ मध्ये पुण्यात मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली.स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांना घरी शिकवून शिक्षिका बनविले.महात्मा फुले ह्यांनी विधवांचे केशवपन केले जाऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणला.अनैतिक संबंधातून गरोदर असलेल्या महिलांसाठी त्यांनी प्रसुतीगृह चालवले.महात्मा फुले यांच्या कार्याविषयी बाबा आढाव म्हणतात, "स्त्री-शिक्षणाबरोबरच जोतीरावांनी स्त्री-स्वातंत्र्याचा कैवार  घेतलेला आहे. काही लोभी पुरूष आपल्यास जास्ती सुख व्हावे,अथवा आपल्या घरात दोनदोन,तीनतीन लग्नाच्या बायका करून नांदतात व त्याविषयी आपण काही हेकड पुरूषांनी केलेल्या धर्मग्रंथांचा आधारही दाखवितात,त्याचप्रमाणे जर काही स्त्रियांनी आपल्या मनःकामना तृप्त करण्याकरिता दोनदोन,तीनतीन लग्नाचे नवरे करून एक घरात नांदू लागल्यास आपणा सर्व पुरूषांस त्याविषयी काही विधिनिषेध वाटणार नाही काय ?"

'तुम्हास जर स्त्रियांचे तसे आचरण आवडणार नाही,तर आपणा सर्व पुरूषांचे त्याच मासल्याचे आचरण स्त्रियांस तरी कसे आवडेल? कारण स्त्री आणि पुरूष एकसारखे.एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र असता स्त्रियांस एकतऱ्हेचा नियम लागू करणे व लोभी,धाडशी पुरूषांस दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. उदाहरण,'स्त्रियांचे ते पुरूषांचे आणि पुरुषांचे ते हुं हुं' त्याचप्रमाणे काही धाडशी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असे आपमतलबी लेख करून ठेविले आहेत.'                                           


(सार्वजनिक सत्यधर्म-जोतीराव फुले) 'मानवाला बुद्धीचे वरदान आहे. स्त्रीपुरूषांच्या बुद्धीमध्ये कमी-जास्त काही नाही.जगातील सर्व धर्मपुस्तके पुरूषांनी लिहिलेली आहेत.त्यांनी 'गोमा' करून स्त्रियाचे नैसर्गिक मानवी हक्क काढून घेतले व स्त्रीला गुलाम बनविले.वास्तविक,स्त्री पुरूषापेक्षा श्रेष्ठ आहे.मानवी संस्कृतीत प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.अपत्यप्रेमाचे वरदान स्त्रीला निसर्गत: मिळाले आहे.ती याबाबतीत पुरूषापेक्षा श्रेष्ठ आहे.'जोतीरावांनी याच भूमिकेवर पुढे पंडिता रमाबाईचा, बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांचा गौरव केलेला आहे.ताराबाई शिंद्यांनी त्या काळात 'स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक खरमरीत भाषेत प्रसिद्ध केलेले आहे. " ३


वरील विवेचनावरून महात्मा फुले यांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार आपल्या लक्षात येतात.समकालीन काळात पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांच्या लेखनाचा पुरस्कार करणारे महात्मा फुले हे इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या साहित्याची प्रेरणा ठरतात. म्हणून १९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणांपैकी महात्मा फुले हे एक प्रधान प्रेरणा आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचारधारा :-


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या समान अधिकाराचा पुरस्कार केलेला दिसतो.हिंदू स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी 'हिंदू कोड बिल'तयार केले. परंतु ते संसदेत मांडले गेले नाही म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.मंगला वरखंडे लिहितात,"म.फुले,म.गांधी,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ.नी भारतीय संदर्भात स्त्रीमुक्तीचा जो विचार केला आहे,तसेच स्त्री मुक्तीच्या संदर्भात ज्या विविध चळवळी झाल्या आहेत,सुधारणावादाचे प्रबोधनाचे जे प्रयत्न झाले आहेत त्यातील सत्यांश घेऊन समकालीन प्रश्नांची सोडवणूक करणारी व भविष्यातील स्त्री पुरुष समरसतेचे स्वप्न साकार करणारी जीवनपद्धती सुचविणारी नवी स्त्रीवादी आचारसंहिता देणे हे भारतीय स्त्रीवादी मांडणीचे उद्दिष्ट असले पाहिजे. "४


 यातूनन आपल्याला असे दिसते की, स्त्रीवादी साहित्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आपल्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे असे मंगला वरखेडेंना वाटते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या हक्कांविषयी लिहितात,"आजच्या जगात संपत्तीच स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे.जोवर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाही,तोवर त्यांची गुलामगिरी संपणार नाही. त्यादृष्टीने हिंदू कोड बिलात मी तरतूदही केली होती,पण ते बिल मंजूर होऊ शकले नाही.यापुढे आता येणारे बिल कोणत्या स्वरूपात येते व त्यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याची,हक्कांची काय तरतूद आहे याकडे महिलावर्गाने फार बारकाईने पाहिले पाहिजे.इतकेच नव्हे, तर आपल्या हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी आपले मनोदौर्बल्य टाकून कंबर कसली पाहिजे,तरच त्यांची सुधारणा व प्रगती होईल. "५


 कोल्हापूर येथे दि.२५ डिसेंबर १९५२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणात वरील विचार मांडले होते. हिंदू कोड बिलाचे महत्त्व बाबासाहेबांनी येथे सांगितले. स्त्रियांच्या प्रती असणारी बाबासाहेबांची संवेदनशीलता व कळकळ आपल्या लक्षात येते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी सौदामिनी राव लिहितात, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जसे दलितांचे नेते,भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, तसेच ते स्त्रियांचे कैवारी होते.डॉ.बाबासाहेब स्वतः दलित असल्यामुळे दलितांप्रमाणेच समाजात हीन वागणूक देण्यात येणाऱ्या स्त्रियांबद्दल बाबासाहेबांना अपार सहानुभूती होती.कुटुंबातील स्त्रियांचे हाल कमी व्हावेत म्हणून,त्यांनी स्त्रियांना घटस्फोट,पोटगी,पुनर्विवाह, वडिलार्जित संपत्तीत वारसा,दत्तक घेणे वगैरे हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला.तर स्त्रियांना ज्ञानसाधनेचा हक्क नाकारून अज्ञानाच्या अंधःकारात खितपत ठेवणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून प्रौढ,कुमारिका,विधवा,परित्यक्ता, पतिता आणि इतर स्त्रियांना ज्ञानसाधनेचा मार्ग उपलब्ध करून देणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला."६


वरील विवेचनावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार व कार्य आपल्या लक्षात येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे इ.स.१९७५ नंतरच्या वाङ्मयीन प्रवाहांच्या निर्मितीची प्रधान प्रेरणा आहेत.स्त्रीवादाला अपेक्षित असणारा स्त्री-मुक्तीचा ध्यास बाबासाहेबांच्या विचारातून व्यक्त होतो.म्हणून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचारधारा ही एक प्रधान प्रेरणा आहे.

शिक्षणाचा प्रसार :-

 महात्मा ज्योतीबा फुले यांनी इ.स.१८४८मध्ये मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली.शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते. शिक्षणातून व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.स्त्रियांच्या शिक्षणाची गरज ओळखणारे डॉ.धोंडो केशव कर्वे आणि त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.कर्वे यांच्या कार्याविषयी विलास खोले लिहितात,"भारतवर्षीय महिला विद्यापीठ (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) हे कर्वे यांच्या स्त्रीविषयक कार्याचे चिरस्थायी स्वरूपाचे स्मारक आहे.ज्या स्त्रीशिक्षणाचा त्यांनी जन्मभर ध्यास घेतला.त्या कार्याचा सर्वोच्च आविष्कार महिला विद्यापीठाच्या रूपाने झाला.भारतातील पहिले आणि प्रदीर्घ काळ एकमेव असे स्थान असणारे हे विद्यापीठ स्थापून त्यांनी ऐतिहासिक महत्त्वाचे शैक्षणिक कार्य पार पाडले.सामाजिक जीवनात स्त्रीला पुरूषाच्या बरोबरीचे जे स्थान आज प्राप्त होऊ लागले आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात स्त्रीने पुरूषांच्या बरोबरीचे जे स्थान आज निर्विवाद प्रस्थापित केले आहे, ते स्थान तिला लाभण्याजोगी परिस्थिती उत्पन्न होण्यासाठी महर्षी कर्वे यांचे कार्य पायाभूत स्वरूपाचे ठरले आहे,हे विसरता येणार नाही. केवळ पाच विद्यार्थिनींच्या आधारे पहिले पाऊल टाकणारे विद्यापीठ आज वयाची नव्वदी पार करून प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. विधवांचे पुनर्विवाह,त्यांचे शिक्षण,एकंदर स्त्रीशिक्षण,अनाथबालिकाश्रमाची उभारणी,निष्काम-कर्म-मठाचा उपक्रम,कन्या विद्यालयाचा प्रारंभ असे स्त्रियांच्या उन्नतीचे क्रमशः पार पाडलेले एकेक कार्यक्रम हे पवित्र धर्मकार्य वा राष्ट्रकार्य आहे,अशा विचाराने कवें यांनी हाती घेतले; आणि या सर्वांवर कळस चढला तो स्वतंत्र महिला विद्यापीठाच्या रूपाने यासाठी निःस्वार्थ भावनेने आणि त्यागी व समर्पणशील वृत्तीने समाजातील विरोधी शक्तींना न जुमानता अविश्रांत कार्य करणारे अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रियांच्या सुस्थितीचे आणि प्रगतीचे जे स्वप्न पाहिले होते,ते विद्यापीठाच्या रूपाने साकार झाले. "७


वरील विवेचनातून महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची आपणाला जाणीव होते.स्त्री-शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्त्रियांना आत्मभान प्राप्त झाले.त्या अधिक सजग झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले.यातून आपण आपले अनुभव साहित्यातून मांडले पाहिजेत असा विश्वास स्त्रियांमध्ये निर्माण झाला.शिक्षणाचा प्रसार ही स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा ठरते.असे आपणाला म्हणता येईल.


इतर प्रेरणा :-

ताराबाई शिंदे यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'स्त्री-पुरुष तुलना'( सन-१८८२) हा निबंध लिहून भारतीय स्त्रीवादी विचारसरणीचा पाया रचला असे म्हणता येईल. या निबंधातून त्यांनी स्त्री-पुरुष विषमतेची चर्चा केली.ही एक इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रीवादी कवितेची प्रेरणा सांगता येईल. त्याचबरोबर इ.स. १८८२ मध्ये पंडिता रमाबाईंनी 'आर्य महिला समाज' ही पहिली स्त्रियांची संघटना स्थापन करून स्त्री- मुक्तीच्या कामाला संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले.रूढी परंपरामुळे स्त्रियांचे शोषण करणाऱ्या बालविवाह, विधवांचे केशवपन इ.जाचक रूढींविरुद्ध जनमत तयार करण्याचे काम त्यांनी केले.त्याचबरोबर 'शारदासदन ' ( इ.स.१८२१) आणि 'मुक्तीसदन ' ( इ.स.१८९६) या संस्थातून स्त्रियांना सुतारकाम, लोहारकाम,चुना मळणे,छपाई, शिवणकाम,भरतकाम, परिचारिकेचे काम शिकवून स्वावलंबनासाठी अर्थार्जनासउपयुक्त ठरणारी कौशल्ये शिकविण्यावर भर दिला.तसेच हंटर कमिशन समोर साक्ष देताना पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची गरज आग्रहाने मांडली.'आर्य महिला समाजात जे पुरुष पत्नीला घेऊन येतील त्यांनाच सभेला बसण्यास अनुमती असे.स्त्री-पुरुष समानतेचा असा नवा आदर्शच त्या रूढ करू पाहत होत्या. हे त्यांचे कार्य व विचार स्त्रीवादी साहित्याला प्रेरणादायी ठरणारे आहे असे आपणाला म्हणता येईल.

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात जे विविध वाङ्मयप्रवाह निर्माण झाले त्यामध्ये ग्रामीण साहित्य,दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य हे प्रवाह महत्त्वाचे आहेत. हे वाङ्मयप्रवाह आपल्या प्रश्नांना घेऊन व्यक्त झालेले दिसतात.हे प्रश्न 'न्याय','समता' आणि 'स्वातंत्र्यासाठी' निर्माण झालेले दिसतात.ह्या प्रवाहात साहित्याइतकेच समाजदर्शनही व्यक्त झालेले आढळते. हे प्रवाह निखळ वाड्मयीन प्रवाह नसून ते सामाजिक स्थित्यंतराचे प्रवाह आहेत,सामाजिक परिवर्तनाचा आशय ह्या प्रवाहांमध्ये व्यक्त होताना दिसतो.हे प्रवाह समकालीन आहेत.त्यांचा एकमेकांवर प्रभाव आहे.

दलित चळवळीतून दलित साहित्याला प्रेरणा मिळाली. ग्रामीण साहित्य चळवळीतून ग्रामीण साहित्याला दिशा मिळाली.तर स्त्रीमुक्ती चळवळीतून स्त्रीवादी साहित्य आकाराला आले. या सर्व चळवळी व साहित्यप्रवाह एकमेकांशी संवादी आहेत.या साहित्यप्रवाहांनी माणसाला 'माणूस' म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली.या सर्व प्रवाहांनी माणसाच्या शोषणाला विरोध केला.'न्याय','समता', आणि स्वातंत्र्यासाठी हे प्रवाह स्वागतशील आहेत.समकालीन साहित्यप्रवाहाची, साहित्य चळवळीची प्रेरणा इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रीवादी साहित्याने घेतली आहे.

अशा प्रकारे आपणाला इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेच्या प्रेरणा सांगता येतात. वरील सर्व प्रेरणा कमी-अधिक फरकाने कवयित्रींच्या लेखनासाठी कारणीभूत ठरतात. या प्रेरणांशिवाय कवयित्रींच्या काव्यलेखनामागे काही व्यक्तीगत गोष्टी,विचार,व्यक्ती ह्या प्रेरणादायी ठरत असतात.स्थूलमानाने कवयित्रींच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या प्रेरणांचा आढावा वरीलप्रमाणे घेता येतो.


संदर्भ टिपा : -


१.गणोरकर प्रभा, 'स्त्री साहित्याचा मागोवा ' खंड -२ इ.स.१९५१ते इ. स. २०००,(संपा. मंदा खांडगे आणि इतर) साहित्यप्रेमी भगिनी मंडळ,पुणे, प्रथमावृत्ती ,डिसेंबर २००२,पृ.६९


२.तत्रैव,पृ.९१,९२


३.आढाव बाबा,'महात्मा फुले गौरव ग्रंथ ',डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले आणि राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती ,मुंबई , ( संपादक - हरी नरके ) ,सुधारित तृतीयावृत्ती - २००६, पृ. ८,९


४. वरखेडे मंगला,'स्त्रीवादी समीक्षा: संकल्पना व उपयोजन ',का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्था,धुळे ,प्रथमावृत्ती,१९९९ ,पृ.४


५. आंबेडकर बाबासाहेब, ' बोल महामानवाचे ' , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे ( खंड एक ) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन , ( अनुवाद आणि संपादन डॉ. नरेंद्र जाधव) , ग्रंथाली प्रकाशन , प्रथमावृत्ती , २०१२ , पृ. ३१९


६.राव सौदामिनी ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ ',(संपा. दया पवार) ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई ,तृतीयावृत्ती ,२००६ ,पृ. ११४


७.खोले विलास ,महर्षी धोंडो केशव कर्वे , (महाराष्ट्र चरित्र - ग्रंथमाला (संच)), श्री.गंधर्व -वेद प्रकाशन,पुणे , प्रथमावृत्ती २०१०,पृ.११२



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

रविवार, ३० जुलै, २०२३

पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या पराभवाची कारण मीमांसा अर्थात : दयन "

 "पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या पराभवाची कारणमीमांसा अर्थात : दयन "

"विद्याविना मती गेली , 

मतीविना नीति गेली

 नीतीविना गति गेली ।

 गतीविना वित्त गेले ,

वित्तविना शूद्र खचले ,

 इतके अनर्थ एका अविद्येने केले" ।

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शुद्रांच्या पराभवाची कारणमीमांसा वरील काव्यपंक्तीतून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडली आहे. आज पारंपरिक शिक्षण घेतलेल्या शूद्रांच्या पराभवाची कारणमीमांसा करणे खूप गरजेचे झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यांच्यात व्यस्त प्रमाण झाल्यामुळे उच्चशिक्षित युवकांच्या वाट्याला अतिशय दयनीय परिस्थिती आली आहे.

"पारंपारिक शिक्षणामुळे मती भ्रमित झाली

 भ्रमित मतीमुळे नीतीची वाट लागली आती गतीमुळे 

होते नव्हते ते वित्त पणाला लागले ,

नोकरी विना शूद्र पुन्हा खचले 

इतके अनर्थ एका अतिविद्याने केले " ।

या ओळींची प्रचिती देणारी 'दयन' नावाची कादंबरी लोक वाङ्मय गृहने जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित केली. या कादंबरीचे लेखक युवराज मेघराज पवार हे आहेत. एम.ए.,बी.एड, एम. फिल.,पीएच.डी. , नेट-सेट या उच्च शिक्षण शिक्षणातील सर्व पदव्या प्राप्त करूनही प्राध्यापकाची नोकरी न मिळालेल्या डॉक्टर गणेश मोहन जाधव या तरुणाच्या शोकात्म अंताची ही कथा आहे.

सी.एच.बी. प्राध्यापक व्यवस्था हे आजचे वास्तव आहे. उच्च शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड म्हणजे सी.एच.बी. प्राध्यापकाची व्यवस्था होय. जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सी.एच.बी. व्यवस्था आणली. हजारो तरुणांच्या जीवनाची राख रांगोळी केलेली ही व्यवस्था दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांवर या व्यवस्थेमुळे अन्याय होतो. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. केवळ पदवीचा कागद हातात घेऊन फिरणारे हजारो तरुण आपल्या आजूबाजूला दिसतात. तर दुसरीकडे सी.एच.बी. प्राध्यापक हा शिक्का पडलेली हजारो माणसं स्वतःच सत्व हरवून बसतात. मानसिक, कौटुंबिक, आर्थिक जीवघेण्या संघर्षात हे तरुण जगत राहतात. या तरुणांच्या वाट्याला अतिशय मानहानीकारक जीवन भोग येतो. या भोगातील विविध पदर दयन कादंबरीतून मांडले जातात. या कादंबरीतील संवेदना ,सूक्ष्मता वाचकाला अस्वस्थ करणारी आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील वास्तवाचे विदारक रूप कोणत्या दिशेने जात आहे. याविषयीचे अस्वस्थ करणारे कथन दयनमधून येते.

या कादंबरीचा संपूर्ण आशय व्यक्त करण्यासाठी लेखकाने कादंबरीच्या सुरुवातीला एक कविता दिली आहे. ही कविता कादंबरीचा आशय नेमकेपणाने मुखर करणारी आहे.एका सी.एच.बी. करणाऱ्या प्राध्यापकाची जीवनकथा मांडताना लेखक लिहितो ,

" एक बायको दोन पोरं , 

पोसण्याचा पडतो घोर ,

 बाप आणेल काहीतरी 

आसुसलेली दोन पाखरं

 बाप दिसतात फोडतात हंबर 

अलवार होतो काळजाचा झुंबर "

सी.एच.बी. प्राध्यापकाचे कौटुंबिक वास्तव या रचनेतून येते. संसार नीट उभा करता येत नाही. प्राध्यापकाची झूल पांघरलेला नायक  नेहमी उघडा पडतो. ही झूल त्याची मानसिक कोंडी करते. पूर्ण वेळ नोकरी मिळत नाही . परंतु समाज प्राध्यापकाच्या झूलीसकट नायकाकडे पाहतो. त्याच्याकडून उच्च नीती मूल्यांची ,राहणीमानाची अपेक्षा करतो. खोटी प्रतिष्ठा मिरवणारा नायक कुटुंबाची दोन वेळेची भूक भागू शकत नाही. यातून पती-पत्नी मधील संघर्ष टोकाला पोहोचतो. नायकाचा काहीच दोष नसताना कुटुंबाचे विघटन होते. शौकात्मक जगणं वाट्याला आलेला नायक भ्रमिष्ट होतो. आणि येथेचं कादंबरीचा शेवट होतो.

आपल्या महापुरुषांनी शिक्षण घेण्याचा आग्रह धरला आहे.' शिका संघटित व्हा ! आणि संघर्ष करा ! ' या शिकवणीपुढे प्रश्नचिन्ह उभी करणारी ही कादंबरी आहे. लेखक लिहितो ,

"मायबाप हो... !

तुम्हीच म्हणतात, 

शिका 

शिकलो ,

 विद्वानांच्या पंगतीत बसा 

बसलो .....

 सांगा ....!

 बोला ,

 मी कुठे चुकलो ....? "

पारंपारिक शिक्षण घेतले. या शिकणातून कुठलेही कौशल्य अवगत झाले नाही. पुस्तकी विद्वान होण्याची प्रक्रिया पार पडली. कुठलाही शिक्षणाचा गंध नसणारी कौटुंबिक पार्श्वभूमी नायकाला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यातून वाट्याला आलेली जीवघेणी होरपळ दयन मधून मांडली जाते.

'कापूसवाडी ' या बंजारा समाजाच्या तांड्यातून गणेश जाधव या नायकाचा जीवन प्रवास सुरू होतो. बंजारा समाज हा एक उपेक्षित समाज आहे.गावकुसाबाहेरील दलित समाजापेक्षा डोंगरदऱ्यातील बंजारा समाजाचे प्रश्न भिन्न आहेत. अतिशय तुटपुंजा साधनांवर गुजराण करणारा हा समाज आहे. या समाजाचे मराठी साहित्यातील चित्रण अतिशय अल्प आहे. दयन या कादंबरीतून 'कापूसवाडी' या बंजारा समाजाच्या तांड्याचे अतिशय सूक्ष्म चित्रण येते. या तांड्यातील माणसांचे स्वभाव, परंपरा,संस्कृती,बोलीभाषा,पेहराव, जगण्याच्या धारणा या कादंबरीतून व्यवस्थितपणे चित्रित होतात. डोंगरदऱ्यातील तांड्यावरून उच्च शिक्षणाचा प्रवाहात येणे हीच एक मोठी बाब आहे . गणेश हा नायक उच्च शिक्षण क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करतो. परंतु त्याच्या वाट्याला अपयश येते.

 इसवी सन १९९० नंतर महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांनी स्वतःच्या राजकारणाचे बस्तान बसवण्यासाठी पारंपारिक पदव्या देणारी बी.ए. बी. कॉम.,बी.एस्सी.चे शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू केली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार झाला. कापूसवाडी सारख्या तांड्यातून पोरं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली. शासनाला आज ही महाविद्यालय,शिक्षक,विद्यार्थी यांचं ओझं वाटू लागला आहे. आर्थिकदृष्ट्या शासनाला ही व्यवस्था झेपत नाही. अशी बोंब मारली जात आहे. यातून अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद आहे. कधी खूपच दबाव आला तर 25% किंवा 40% पदभरती केली जाते. या भरती व्यवस्थेतही प्रचंड भ्रष्टाचार व वशीलेबाजी आहे. जर शासन पगार देत असेल तर ही पदे शासनाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्यास अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. परंतु शासन चालवणारे  हेच संस्थाचालक असल्यामुळे ते बोटचेपी भूमिका घेतात. गुणवत्ता,दर्जा यांचे हनन होत. एक पोटभरून व्यवस्था जन्माला येते. या व्यवस्थेचा पंचनामा दयनमधून मांडला जातो.

मुळात पारंपारिक शिक्षणाचा भाग असणाऱ्या या महाविद्यालयांची समाजाला खरंच किती गरज आहे? कौशल्यहीन,कारकूनी शिक्षण व्यवस्थेतून गणेश सारख्या अनेकांचे केवळ शोषण होत आहे. या व्यवस्थेत अमुलाग्र बदलाची गरज आहे. परंतु शासन,धोरणकर्ते,अभ्यासक या प्रश्नांकडे डोळेझाक करतात. यातून दयन पुन्हा पुन्हा घडत राहते. हे थांबलं पाहिजे. असं कुणालाचं वाटत नाही. परंतु या व्यवस्थेतून भरडल्या गेलेल्या लाखो तरुणांचा विचार कोण करणार? या आजच्या समकालीन शैक्षणिक वास्तवावर दयन अचूक बोट ठेवते. अस्वस्थ करते. झोप उडवते. या कादंबरीतून कलात्मक पद्धतीने प्रश्न मांडले जातात. ते अतिशय बोचरे संवेदनशील असे आहेत.

 महात्मा फुले 'शेतकऱ्यांचा आसूड ' या ग्रंथात लिहितात,"बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कुणाच्या जीवावर ओढावी?व्यापारधंदा करावा, तर मला लिहिता वाचतां मुळीचं येत नाही. आपला देश त्याग करून जर परदेशात जावे,तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही. " अगदी अशीचं अवस्था आजच्या तरुण शिक्षितांची झाली आहे. दयन कादंबरीतून या हातबल तरुणाचे अतिशय तरल संवेदनशील चित्र उभे राहिते. 

उच्च शिक्षण क्षेत्रात अनुदानित, विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित अशी जात व्यवस्था उभी. पूर्णवेळ फुल पगारी ,पूर्णवेळ शून्य पगारी , सी.एच.बी., विनाअनुदानित सी.एच.बी., अर्धवेळ परंतु काम पूर्ण वेळ अशी नवी वर्ग व्यवस्था,जात व्यवस्था उच्च शिक्षण संस्थांमध्ये जन्माला आली आहे. एकीकडे सहा अंकी पगार घेणारा श्रीमंत प्राध्यापक तर दुसरीकडे तासाचे 120 रुपये आठवड्याला केवळ नऊ तास घेऊन महिना 5000 रुपये कमावणारा गरीब प्राध्यापक यातील दरी प्रचंड वाढली आहे. समान काम असमान वेतन हे धोरण सगळीकडे दिसते.

प्राचार्य,श्रीमंत प्राध्यापक,अनुदानित शिक्षकेत्तर कर्मचारी ,संस्थाचालक या सी. एच. बी. प्राध्यापकांकडे अतिशय तुच्छतेने पाहतात. किंबहुना आरक्षणाचा लाभ घेऊन आलेला पेटी बुजुर्वा वर्ग ही या वर्गाकडे तुच्छतेने भावनेने पाहतो. या सगळ्यातून सी.एच.बी. वाल्या प्राध्यापकांची मानसिक घुसमट होते. विद्यार्थी शिक्षक हे अतिशय पवित्र नातं आहे. परंतु सी.एच.बी. वाल्या प्राध्यापकांकडे विद्यार्थी दुय्यमत्त्वच्या भावनेने पाहतात. एकीकडे श्रीमंत प्राध्यापक वर्गाने समाजात श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले आहे. त्यामुळे समाज प्राध्यापक वर्गाकडे चंगळवादी ,कमी काम जास्त दाम घेणारे ,फुकटे, मजा मारणारे , दारूकुट्टा वर्ग म्हणून पहात आहे. परंतु यात भरडला जातो तो सी.एच.बी. वाला प्राध्यापक वर्ग. प्राध्यापकाची झुल या सी.एच.बी. वाल्यांना समाजापासून तोडते. हा वर्ग मुक्यांचा मार खात ससेहोलपट जीवन जगत राहतो. या मानसिक कोंडमाऱ्याची  व्यथा दयनमधून सक्षमपणे चित्रित होते.

 पूर्णवेळ फुल पगारी असलेला प्राध्यापक वर्ग सी.एच.बी. प्राध्यापकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. आपल्याला व्यवस्थेचे सर्व लाभ मिळतात. एकदा आपलं पूर्ण वेळ पगारी पदावर काम झालं की, नव्या येणाऱ्या आपल्याच बांधवांवर काय वेळ आहे? याकडे सहजतेने पाहणारा स्वार्थी, अप्पलपोट्या उच्चशिक्षित प्राध्यापकांचे वर्तन चीड आणणारे आहे. किंबहुना व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे वैचारिक,नैतिक वजन असणारा हा वर्ग स्व केंद्रीत संकुचित झाला आहे. याचे चित्रण दयन कादंबरीतून येते. प्राध्यापक डॉक्टर गणेश जाधव या नायका सोबत काम करणारे फुल टाइम पगारी प्राध्यापक अतिशय बेजबाबदारपणे , असंवेदनशीलपणे वागतात. काही तुच्छतेने वागतात. काही प्राध्यापक केवळ कोरडी सहानुभूती दाखवतात. काही प्राध्यापक पोकळ बड्या बड्या वैचारिक सिद्धांताचा चोथा चघळत राहतात. यातून आजचं समकालीन उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक वर्गाचं येणारं चित्र हे अस्वस्थ करणार आहे.

 जे सी.एच.बी. वाले प्राध्यापक आहेत तेही आपल्या प्रश्नांकडे फार चिकित्सने पाहत नाहीत. केवळ वरच्यावर सोशल  मीडियात हा वर्गही गुंतून पडला आहे. व्हाट्सअप विद्यापीठातून वांझ चर्चा करणाऱ्या प्राध्यापकांचे चित्र दयांमध्ये सूक्ष्मपणे येते. या प्राध्यापकांच्या मानसिकतेचे,वैचारिकतेचे चित्रण लेखक युवराज पवार यांनी अतिशय उत्तमपणे केलेले आहे.

 बंजारा समाजाच्या बोली भाषेचे उपयोजन हे या कादंबरीचे वैशिष्ट्य ठरते. अनेक ठिकाणी संवादामध्ये बंजारा बोली येते. विशेषतः जामनेर परिसरातील तावडी बोलीतून येणारे संवाद ,शब्द म्हणी ,वाक्प्रचार कादंबरीला भाषिक दृष्ट्या समृद्ध करतात. बंजारा समाजातील कुटुंब व्यवस्था ,गावगाडा या कादंबरीतून ताकदीने येतो. तसेच या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अहिराणी बोलीभाषा काही संवादात अतिशय चपखलपणे वापरली आहे. या भाषेच्या वापरामुळे काही पात्र जिवंत झालेल्या आपल्याला दिसतात. या वेगवेगळ्या भाषेतील मिश्र वापरातून कादंबरीच्या भाषिक सौंदर्यामध्ये भर पडलेली दिसते.त्याचबरोबर कादंबरीमध्ये वर्तमानपत्रातील बातम्यांचे उपयोजन उत्तमपणे केले आहे. त्या बातम्यांची भाषा आणि त्यातून उभा राहणारे वास्तव हेही एक  वेगळे परिमाण या कादंबरीला प्राप्त करून देते.शासनाचे विविध जीआर यातून येणारी भाषा ,शब्दछल कादंबरीला भाषिकदृष्ट्या वेगळेपण प्राप्त करून देतो.

बंजारा समाजातील कुटुंब व्यवस्था , गावगाडा या कादंबरीतून ठळकपणे येतो. बंजारा समाजाच्या जातीय धारणांचे प्रभावी चित्रण कादंबरीत येते. आपला जावई गणेश याने वडार लोकांची खोली भाड्याने घेणे त्याच्या सासर्‍याला आवडत नाही. बंजारा जातीचा अभिमान असणाऱ्या सासऱ्याला गणेशचे बटाटे विकणे हा व्यावसाय कमी प्रतीचा वाटतो. कादंबरीचा नायक गणेश याला शिक्षण घेत असताना आपल्या जातीचे भान येते. ' हे लेवा,गुजरायचे पोरं पयशाले काय समजता? हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहतो. यातून समाजातील जातीय दृष्टिकोन समजतो.

विभाग प्रमुख असणारे प्राध्यापक शिंदे सर गणेश जाधव याने मुलींच्या इरेजर ,पेन्सिल ,शॉपनर ,स्टीलची स्केल स्वतःच्या लहान मुलांसाठी घेतो. तेव्हा प्राध्यापक शिंदे म्हणतात , "मुलींनो ते चोर ,गुन्हेगार जमातीतले आहेत. त्या जातीचाच वारसा ते पुढे नेत आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हा प्राध्यापक शिंदे यांचा जातीय दृष्टिकोन अस्वस्थ करणार आहे. गणेश या नायकाचे रेशन दुकानातून भंगी समाजातील स्त्री कडून धान्य स्वीकारणे. हे त्याच्या प्रगल्भपणाचे लक्षण कादंबरीतून दिसून येते. जातीपेक्षा संवेदन जपणारी,वास्तव स्वीकारणारी माणसंही या कादंबरीतून नकळतपणे चित्रित होतात.

 गणेशचा सासरा त्याच्यावर नसाब बसवतो. त्यावेळी त्याची सासू जनसीबाई  म्हणते, " जेंच्या घरचं आपल्याले चालत नि, आश्या वडर भंगीची खोयली या भाड्यानं  भाड्यानं घेल हाये. तेच्यात मह्या पोर्गीला राह्यानं पळू राहलं. मह्या पोर्गीला बाटवलं येनं.  जात पंचायतचे नसाब. हामचं काईच नि  चुकेल. सगळा गुन्हा येचा हाये. भाड्यानं खोयली घेतली नस्ती तं ,  कश्याले मार पळली अस्ती. सांगा. तुमी आता न्याव करा हामचा? "

वडार आणि बंजारा दोन्ही जाती भटच्या विमुक्त मध्ये येतात. परंतु बंजारा समाज वडार आणि भंगी समाजाला कमी लेखतो. या जातीय व्यवस्थेच्या रूपाकडेही ही कादंबरी लक्ष वेधते.  दयन या कादंबरीतील भावजीवन अतिशय ताकदीने उभे राहते. विशेषतः कादंबरीचा नायक गणेश ,त्याची पत्नी अंजू आणि त्यांची मुलं टिल्लू आणि गोलू यांची मनस्थिती ,त्यांच्या भावना अतिशय परिणामकारकपणे या कादंबरीतून चित्रित झाल्या आहेत. किंबहुना हे या कादंबरीचे यश आहे. या कादंबरीच्या यशाविषयी प्रसिद्ध समीक्षा प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे लिहितात , "कादंबरीकराचे निवेदन ,नायक गणेश जाधवचे कथन आणि त्याची बायको अंजूचे स्वगत या तिन्ही गोष्टी बेमालूनपणे एकमेकांत मिसळलेल्या आहेत. हेही या कादंबरीचे मोठे वैशिष्ट्य आहे. गणेशची मुले रडतात, रुसतात ,हट्ट करतात,आनंदी होतात किंवा कधी कधी बापाची गरीबी ओळखून समजतदारपणे वागतात तेव्हा जी भाषा वापरतात ती खास त्यांची आहे. त्या भाषेला स्थळकाळाचे संदर्भ आहेत. तसेच पराकोटीच्या आर्थिक दुरावस्थेत सापडलेल्या नायकाच्या कुटुंबाचे सामाजिक संदर्भही आहेत. प्रसंगाचे निवेदन आणि संवाद यांच्या तळाशी नायकाच्या अगतिकतेचे अस्तर सतत कायम राहते. अनुभवाची तीव्रता आणि भाषिक जाणीव यांचा प्रत्यय असा एकजिनसी होतो,हे या कादंबरीचे यश आहे. "

वरील विश्लेषणातून या कादंबरीचे स्वरूप स्पष्ट होते. कादंबरीचे विविध वैशिष्ट्य या विश्लेषणातून आपल्या लक्षात येतात. लेखकाने कुटुंबाचे भावविश्व,लहान मुलांचे भावविश्व  खूप सूक्ष्मतेने,चित्रमय पद्धतीने चित्रित केले आहे. कादंबरीचे कथानक आपल्या कुटुंबात,शेजारी जवळ कुठेतरी घडत आहे असा प्रत्यय येतो. ते सगळं संवेदनशीलपणे वाचन करणार्‍याला अस्वस्थ करते. हे या कादंबरीचे प्रधान वैशिष्ट्य सांगता येईल. कादंबरीचा शेवट अतिशय कलात्मक विद्रोही स्वरूपाचा आहे. भ्रमिष्ट झालेला नायक गणेश व्यवस्थेवर वार करण्यासाठी  कुऱ्हाड हाती घेतो. ही व्यवस्था आपण बदलू शकत नाही. या व्यवस्थेने आपला बळी घेतला. या व्यवस्थेच्या शोषणाचे सर्व स्तर लक्षात आलेला नायक गणेश अगतिकतेच्या अस्वस्थतेत भ्रमिष्ट होतो. हा या कादंबरीचा शेवट अतिशय कलात्मक स्वरूपाचा आहे. बदलत्या मूल्यवस्थेत अपयशी ठरलेला नायक सगळेच गमावून बसतो. या कादंबरीतून  वाचकाला विषण्य संवेद्य अनुभवाची प्रचीती येते. 

कादंबरीच्या या सकारात्मक बाजू असल्या तरी या कादंबरीला काही मर्यादाही आहेत.आपल्याला त्या नोंदवता येतात. या कादंबरीतील पात्र संख्या अतिशय अल्प आहे. कादंबरीत एकच एक कथानक मांडले जाते. कादंबरी वाङ्मय प्रकारात मुख्य कथानकाला जोडून विविध उपकथनके येत असतात. परंतु दयन या कादंबरीतून उपकथनकेच येत नाहीत. त्यामुळे पात्र संख्या कादंबरीत कमी राहते. नायक स्वतःच्या दुःखात इतका बुडून गेला आहे की,समकालातील विविध घटकांचे जगणे , त्यांचे प्रश्न ,समस्या यावर तो फारसा विचार करत नाही. या कादंबरीतून समकालातील व्यापक संदर्भ , जीवनस्तरसह उभा राहत नाही. कादंबरीतून संस्थाचालक आणि प्राध्यापक यांच्या संबंधाचे चित्रण नीटपणे येत नाही. त्रोटक स्वरूपात हे चित्रण येते. भ्रष्टाचार ,पैशांची देवघेवचे चित्रण येत नाही. महाविद्यालय परिसराचे वास्तव चित्रण कादंबरीतून उभे राहत नाही. सर्व कथानक गणेशच्या मनोभूमीके भोवती पिंगा घालत राहते. कादंबरीतून जातव्यवस्थची विविध रूप सकसपणे उभी राहात नाहीत. अल्प प्रमाणात जातिव्यवस्थेचे चित्रण येते. गणेशचा एम.ए. चा शिक्षणप्रवास , सेंडापच्या दिवसाचा तपशीलवार वर्णन कादंबरीच्या मुख्य कथानकाचा भाग होत नाही. उगाच ठिगळ लावल्यासारखा हा भाग वाटतो. वरील सर्व मर्यादा मान्य करूनही एका ज्वलंत प्रश्नाला ,समस्येला उजागर करणारी ही कादंबरी आहे. आजचे उच्चशिक्षण व्यवस्थेतील वास्तव फार भयानक आहे. याची प्रचिती देणारी ही कादंबरी आहे. लेखक युवराज मेघराज पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!

 धन्यवाद !!!

 डॉ.जी.आर.ढेंबरे 

मराठी विभागप्रमुख 

श्री.व्ही.एस.नाईक कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,रावेर तालुका- रावेर,जिल्हा- जळगाव पिनकोड - 425508

 मोबाईल नंबर -94210812 70 ई-मेल-dhembregr@gmail.com

----------------------------------------------

बुधवार, १२ जुलै, २०२३

भुरा -

 भुरा एक आत्मशोधाचा प्रवास ॥



 ऑगस्ट 2021 मध्ये लोक वाङ्मय गृहाने प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे भुरा हे आत्मकथन प्रकाशित केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली यांच्या फ्रेंच भाषा विभागात प्राध्यापक शरद बाविस्कर प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिकावं हे अनेकांचे स्वप्न असते. प्राध्यापक शरद बाविस्कर या विद्यापीठात शिकून त्याच विद्यापीठात अध्यापन करत आहेत. त्यांचा हा प्रवास धुळे जिल्ह्यातील रावेर या गावातून सुरू होतो. रावेर ते नवी दिल्ली या प्रवासात भुराकडून शरद कडे झालेला हा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे.  भुराच्या वाटेला अतिशय जीवघेणा  दुखरा  भोगवट आला आहे. हा भोगवटा अतिशय संवेदनशीलपणे या आत्मकथनातून उलगडत जातो. भुरा ते शरद हा प्रवास विविध अंगी स्वरूपाचा आहे. केवळ भौतिक बदल म्हणून या प्रवासाकडे पाहता येत नाही. हा प्रवास मानसिक , तात्त्वीक , वैचारिक परिवर्तनाचा प्रवास आहे. दैववादी , नियतिशरण भुराकडून पुरोगामी विवेकवादी विज्ञानवादी शरदकडे झालेला हा प्रवास अतिशय सुंदर असा आहे. इसवी सन 1980 नंतरच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे हे आत्मकथन आहे. या आत्मकथनातून शेतकरी ,मजूर ,उपेक्षित वर्गातील  एका हजारातून स्वतःला सिद्ध करणार्‍या भुराची ही कथा मनोवेधक अशी आहे. त्याची सिद्ध होण्याची ही व्यथा आहे. सफल परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रवास भुरातून मांडला जातो. या आत्मकथनातून जगभरातील तत्त्ववेत्यांच्या तत्त्वज्ञानाचा सार  मांडला जातो. भुराच्या जगण्यातले वास्तव मांडत असताना जगण्याची विविध पैलू तत्त्वज्ञानातून मांडले जातात.हे आत्मकथन अंतर्मुख करणारे आहे. या आत्मकथनातून केवळ भावनिक आव्हान येत नाही तर स्वतः ला सिद्ध करण्याची सर्जनशील निर्मीतीप्रक्रिया अलगदपणे उभी राहते.


या आत्मकथेतून  केवळ सहानुभूतीचा फार्स उभा राहत नाही. ही आत्मकथा लढण्याचे प्रेरक तत्व घेऊन उभी राहाते. ही आत्मकथा भान हारपलेल्या माणसासाठी प्रेरणादायी ठरते. त्याला जगण्यासाठी , लढण्यासाठी सिद्ध करते. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य होय. भुरा या आत्मकथनातील हे अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे. बहुजन समाजाला खरं स्वातंत्र्य शिक्षणातून मिळू शकते. शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम आहे. या मांडणीला भुरा या आत्मकथनातून मान्यता मिळते. दहावी इंग्रजी विषयात नापास झालेला भुरा त्याच विषयात विशेष प्राविण्य मिळवतो. जगाचा प्रवास करून येतो. ही झेप वाचकाला थक्क करणारी आहे. 12 ते 15 तास अभ्यास करून एखादी भाषा ,विषय आत्मसात करणं यातून भुराची जिद्द पराकोटीचे असल्याचे दिसून येते. एखादी भाषा आत्मसात कशी करावी ? भाषा शिकणे म्हणजे काय ? या प्रक्रियेतील भुराला सापडलेले सत्व या आत्मकथनाचा गाभा आहे. केवळ भाषा हे शोषणाचे साधन ठरू शकत नाही. कोणतीही भाषा आत्मसाथ करत येते.फक्त त्यासाठी तुमच्याकडे असावी लागते जिद्द. ही जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. या यशाची प्रचिती भुरातून होते. 

 व्यसनाधीन असलेले वडील ,मोठा भाऊही त्याच वाटेने निघालेला ,गरिबी , दारिद्र्य , समाजातील उपेक्षित स्थान . यातून भुराच्या वाट्याला प्रचंड अवहेलना येते. ही अवहेलना प्रेरणा मानून भुरा स्वतःला घडवत जातो. किंबहुना जास्त त्वेशाने या परिस्थितीवर हल्ला चढवतो. स्वतःला सिद्ध करतो.  हे आत्मकथन रस्ता भटकलेल्या , दिशाहीन ,उपेक्षित तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरक  ठरू शकते. अति भव्यता ,उच्चतेचा आग्रह माणसाला निर्मितीचा पराकोटीचाआनंद देत असतो. हा आनंद , ही स्वतःची घडण प्रक्रिया , निर्मिती प्रक्रिया या आत्मकथनातून उभी राहते. जीवनातील एक महत्त्वाचे तत्व भुराला लहानपणी आई सांगते. 'झिजिन मरणं , पण थिजी न नही मरणं ' या तत्त्वातून भुरा स्वतःला घडवत राहतो. या आत्मकथनातील काही वाक्य अतिशय तात्विक आहेत. मानवी जीवनाबद्दलचे ,नातेसंबंधबद्दलचे व्यवस्थेबद्दलचे  अतिशय महत्त्वपूर्ण विधाने या आत्मकथेतून येतात. याला कारण  लेखकाचा चिंतनाचा विषय तत्त्वज्ञान हे आहे.ही विधाने , ही मांडणी या आत्मकथनातून प्रभावीपणे येते . वाचकाला  विचार प्रवृत्त करते. भुराकडे असलेल्या अंतर्मुख वृत्तीमुळे तो स्वच्छ स्वतःकडे ,समाजाकडे , जीवनाकडे ,व्यवस्थेकडे तटस्थने पाहतो. सम्यक आकलनातून भुरा शाश्वत सत्याकडे जातो.


 कळपापासून वेगळं राहण्याची किंमत भुराला जास्त मोजावी लागते. भुरा बालपणात ती किंमत जास्त देतो.  ती किंमत मोजण्याच्या प्रक्रियेतच भुराला जगण्याचे प्रेरक तत्व सापडतात.


 1990 च्या दशकात  ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधने फार कमी होती. त्यातून प्रत्यक्ष माणसांच्या जगण्यात , वागण्यात ,शोषणात मनोरंजन शोधण्याची मानसिकता खेड्यात होती. या मानसिकतेतून  कुणाची आपण अवहेलना करतो आहोत याचे भानच लोकांकडे नव्हते. यातून कोणाचे तरी भावविश्व उध्वस्त होत आहे. ही जाणिवचं लोकांना नव्हाती.  या सगळ्या प्रक्रियेतून लेखक शरद बाविस्कर यांना  भुरा हे नाव मिळते. असे शोकात्म  जगणं वाट्याला आलेला भुरा त्याची फार मोठी किंमत देतो. स्वतःचा शरदचा प्रवास निश्चित करतो. व्यवस्थेत शिरल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी तडजोड करणारे हजारो भेटतात. भुरा व्यवस्था प्रवेशानंतरही आपली पार्श्वभूमी विसरत नाही. तो वैचारिक भूमिकेवर ठाम राहातो. प्रसंगी त्याची किंमत मोजण्यासाठी भुरा सज्ज होतो.


 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संघर्षात आपल्या भूमिकेवर ठाम राहणारा भुरा अतिशय मोठा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले ,छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा घेऊन जीवनातील मार्गक्रमण करणारा भुरा वाचकाला वैचारिक ऊर्जा व भान देतो.  भुरा या आत्मकथनात एक गोष्ट प्रकाशाने जाणवते आणि ती म्हणजे नायकाला सापडलेले वैचारिक सूत्र ही होय. वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडून सम्यक वैचारिक दृष्टिकोन घेऊन भुरा पुढील वाटचाल करतो. वैचारिक स्पष्टतेतून आलेले सम्यक भान या आत्मकथनातून अभिव्यक्त होते.


 दहावी नापास झाल्यावर भुरांमध्ये विद्रोह जन्म घेतो. हा विद्रोह सृजनशील निर्मितीचा आहे. दैववाद , नियतीशरणता नाकारून भुरा विवेकवादी होतो. या आत्मकथनातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडण्याचा प्रवास ही अधोरेखित होतो. स्वाध्याय , आसाराम ,रामदासी बैठका या प्रकारांमधून समाजाला मानसिक गुलामगिरीत ढकलले जाते. या वास्तवावर लेखक शरद बाविस्कर यांनी प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भागातील पोरं-पोरी मागे पडत असतील तर त्यासाठी बऱ्याच दृष्टीने आपली विषमतावादी व्यवस्था जबाबदार आहे. ग्रामीण भागातील तकलादू  शिक्षण तर 99% विद्यार्थ्यांना निकामी करतं असं वाटतं. हे लेखकाचे चिंतन शिक्षण व्यवस्थेच्या समग्र प्रक्रियेवर भाष्य करणारे आहे. आजच्या समकालीन वास्तवावरती , शिक्षण व्यवस्थेतील एकूण व्यवस्थेवरती हे चिंतन प्रहार करते. असे आपल्याला म्हणता येईल. शिक्षणाचे लोकशाहीकरण केले पाहिजे. असे लेखकाला मनापासून वाटते. आज वास्तवात मात्र शिक्षणाची विषमतावादी  व्यवस्था स्थिर रूप धारण करत आहे. यातून बहुजन समाजातून एखादाही भुरा पुढे येईल की नाही ? याबद्दल शंका वाटते. जीवनातील निरार्थकता टाळून एक निश्चित दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी एक संकल्प जवळ असावा लागतो. भुराने निरर्थकतेवरती मात केली आहे. भुराचा संकल्प अतिशय संघर्षमय असा आहे. भुरा आत्मकथनातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक ,सामाजिक ,आर्थिक , राजकीय ,शैक्षणिक ,धार्मिक ,जातीय व्यवस्थेचे आकलन अतिशय उच्च कोटीचे आहे. या आकलनातील चिंतन चिरस्थायी स्वरूपाचे आहे. लेखक म्हणतो , 'आपल्या समाजात आढळणारी वाईट गोष्ट अशी की , नियोजित पद्धतीने हस्तक्षेप करून सांस्कृतिक ठेकेदार त्यांच्या बैठकांच्या माध्यमातून छुपा पद्धतीने दैववादाला आणि आपआप वादाला सतत खत पाणी घालत असतात. त्यामुळे बहुसंख्या समाज बंदिस्त आणि अपरिवर्तनीय जीवनाविषयी चीड न येता निमूटपणे त्याचा स्वीकार करत असतो. अशी निरर्थक कर्मकांडे मला मुक्तीच्या मार्गातील अडथळे वाटतात.' हे लेखकाचे आकलन अतिशय सत्यनिष्ठ स्वरूपाचे आहे. संपूर्ण भारतभर सांस्कृतिक ठेकेदार मानसिक गुलामगिरी उत्साहात पेरत आहेत. राजकीय सत्तेच्या आश्रयामुळे या ठेकदारांचे बळ प्रचंड वाढले आहे. विवेकवादी ,विज्ञानवादी दृष्टिकोनाची , सम्यकवादी विचारांची पिछेहाट मोठ्या प्रमाणात होत आहे. या वास्तवावर हे आत्मकथन अचूकपणे भाष्य करते.


समकालीन राजकीय , सामाजिक , आर्थिक ,धार्मिक सांस्कृतिक पर्यावरणात समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याची ताकद असलेले हे आत्मकथन आहे. याआत्मकथनातून समकालीन अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी अचूकपणे मिळतात. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. भुरा हे एक अतिशय वैचारिक अशी आत्मकथन आहे. प्रा. शरद बाविस्कर यांच्या लेखन कार्याला खूप खूप शुभेच्छा !!!


धन्यवाद !


 डॉक्टर गणपत रामदास ढेंबरे , 

रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव पिनकोड 425508

 मोबाईल नंबर 9421081270 ई-मेल - dhembregr@gmail.com

मंगळवार, ११ जुलै, २०२३

भोत - कविता

 ॥      भोत ॥


असं का होत असेल

 आम्ही तिथं पोहोचले की, 

पंगत उठत असेल 

आम्ही महाप्रयासाने 

त्यांची पायरी गाठली की,

 ते आम्हाला प्यादेमात देतात 

बाकी काही नाही 

चोख्या तुझी पायरी तिथंचं 

जोहार म्हणं  नाही तर 

खुशाल रंडका चाळा 

नियती, कर्माचा 

पापपुण्याचा फेरा 

पुन्हा उरावर घात

करण्या रिंगण खेळ 

मांडणारे, मोडणारे न्यायधीश 

पुन्हा आमचे नवरे 

खरं खोटं 

गेला बाजार 

आमची ठासली, 

पुन्हा आमची लढाई 

आमच्याशी 

तुक्या वाणी फुकाचा

फुले तुझा शिक्षणाचा मळा

 सुकून गेला 

 तो पुन्हा फुलवण्यासाठी 

 भिमा तुझा 

शिकण्याचा सल्ला  पडला महाग

आम्ही शिकलो, 

ते म्हणाले हे out Dated 

पुन्हा लायनीत लागा 

साला, होतो तिथंच आहे 

भोग म्हणावा का जागतिकीकरणाचा तिढा


पुन्हा


तुमचा कर्मसिद्धांत, वांझोट्या घराला व्यवस्थेच्या रूपाला, शाहू तू 

भोत म्हणावं का ?


भोत म्हणून माझी 

कैफियत

मांडण्यासाठी खाजगीकरण, भंडवलीकरणचा गुताडा सोडवण्यासाठी


पुन्हा


भोत भरण्याची विद्या


भोत शिवण्याची विद्या


भोताची व्यवस्था


उलगडत बसावं का?


पुन्हा रांडमुंड


माळावर


मी गात बसावं

माझं भोताचं गाणं 

आम्हाला आमची आपबीती 

सांगावी लागलं

नाही तर

 आम्हीचं ठरू भोत 

म्हणून

घाई घाईनं भोत भरतो 

व्यवस्थेच्या म्हैशीला पान्हा फुटतो 

पण


भोताच्या निर्जीव तोंडला फेस ना येतो


वाळूत मुता 

फेस ना पाणी


आमची दाद पुकार

 कंदीलाच्या उजेडात


पुन्हा भादवा पेटावा


भोत उरात घेऊन


वरात तुझ्या दारात


बसा परत भोत शिवतं


आम्ही ठरवलं


तुम्हाला फाट्यावर मरायचं 

पण तुमची ताकद, इगद खंडीभर

 तुम्ही बडवता अंडं आमची 

जुपता पुन्हा नांगराला 

ते चिटकती गुचीडा, सारखे 

जांघात नको तिथं 

आम्हाला घुसता येईला का ? 

गुचीड़ होऊन रक्त पिऊन चांगला जाडजुड रक्तबीज

वांझ भोताचा 

असण्याचा खेळ  

मला उलगडत नाही 

भोत व्यवस्थेचा भोग 

की 

आणखी काही !

खुशाल पेटव दिवटी 

लय गेले त्या वाटनं 

तू चाल 

भोत बोलतो, चालतो, हसतो 

त्याला ओळख

 मी तुझ्या गांडीजवळ

 मला ओळख

 मी भोत तो भोत

 शेवटी सगळे भोत 



डॉ. जी. आर. ढेंबरे , रावेर

रविवार, ३० एप्रिल, २०२३

TDM एका पिढीचा ऐतिहासिक दस्तऐवज

 TDM एका पिढीचा ऐतिहासिक दस्तऐवज !!!


दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला TDM हा चित्रपट नुकताचं पाहिला. भूतकाळातील स्मृतींना पडद्यावर चित्रित करणे अतिशय कठीण असते. काळाचे चक्र मागे फिरवून इ.स.1995 च्या जगण्याला चित्रपटातून मांडणे अतिशय आव्हानात्मक होते. भाऊराव कऱ्हाडे यांनी हाच विषय अतिशय ताकदीने चित्रपटातून मांडला आहे. इ.स. 1990 नंतर जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाले. खाजगीकरण ,उदारीकरण , भांडवलीकरण हे शब्द व व्यवस्था नव्याने उदयाला आल्या. या नव्या व्यवस्था जन्माला येत असताना जुनं काहीतरी झपाट्याने मोडलं गेले. हे मोडलेलं बालपण ,तरूणपण ,कुटुंबातील नाती ,सांस्कृतिक भावविश्व ,प्रेमाचे बदललेले स्वरूप एका पिढीच्या डोळ्यादेखत संपत गेले. 1990 नंतरची पिढी या बदलांना परिवर्तनाला अनुभवत होती. परंतु आपल्यासोबत नेमकं घडलं काय ? हे टिपण्याची ,लिहिण्याची , मांडण्याची शक्ती नसलेल्या माणसांना या मागच्या काळात घेऊन जाणारा हा चित्रपट आहे.

जागतिकीकरणा आधीचा ग्रामीण महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र यात खूप अंतर आहे. जागतिकीकरणाने काही समस्या निर्माण केल्या. तसेच यातून काही संधीही जन्माला आल्या. अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलल्यामुळे सर्वसामान्य माणसाला नवे स्वप्न ,नव्या आशा खुणवू लागल्या. या नव स्वप्नांच्या पूर्तीसाठी या पिढीला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. या पिढीचा प्रतिनिधी असलेला बाबू थोरात या नायकाची भावनिक संघर्षमय जीवन कहाणी TDM मध्ये मांडली जाते.1995 या वर्षात घडणार हा चित्रपट आपल्याला मागच्या काळात घेऊन जातो.भूतकाळातील समाजकारण ,राजकारण ,अर्थकारण ,कला,संस्कृती ,चित्रपट,धार्मिकता ,जातीयता ,भावनिकता या चित्रपटातून उभी करण्यासाठी खूप परिश्रम कष्ट घेतले आहेत. TDM मध्ये भाऊराव कऱ्हाडे यांनी अतिशय मेहनतीने , कष्टाने ,अभ्यासपूर्ण पद्धतीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

अतिशय सरळ पद्धतीने या चित्रपटाचे कथानक साकार होते. ही कथा केवळ नायक असलेल्या बाबूची नाही. तर ही कथा अख्या एका पिढीची आहे. जी पिढी केवळ भूतकाळातील स्मृतींना हळवेपणाने जपते. काहीतरी अनमोल हरवून गेल्याची खंत ही पिढी बोलून दाखवते. आपल्या वाट्याला आलेला भोग नेमका काय होता ?  या भोगाची तरल भावस्पर्शी कथा TDMमधून मांडली जाते. गरीब शेतकरी कुटुंबातील बाबू थोरातच्या वाटेला आलेले जीवन चित्रपटातून उभे राहते.शेतीमातीला माता समजणारी बाबूच्या आई-वडिलांची पिढी आणि शेती विकून काहीतरी नवा करण्याचे धाडस करणारी तरुण पिढी. या दोन पिढ्यांमध्ये संघर्ष उभा राहतो. जुन्या पिढीला बदल ,घडलेले परिवर्तन अवाक करून जाते. दोन पिढ्यातील नात्यातील दुरावा यातून वाढत जातो. हा दुरावा या चित्रपटातून अस्वस्थपणे मांडला जातो. या दुराव्याचे चित्रण सदर चित्रपटातून अतिशय उत्तम पद्धतीने साकारले जाते. 

ट्रॅक्टर हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे साधन होय. कोणत्याही काळात साधनांच्या अपूर्णतेतून ,अभावातून संघर्ष जन्माला येतो. बाबुला जागतिकीकरणाचे नवे जग साद घालत आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर असणाऱ्या बाबुला स्वतः चा ट्रॅक्टर घेऊन वाळू धंदा करून झटपट श्रीमंत व्हायचा आहे. या झटपटच्या वेगात सगळंच हरवून जाण्याची वेळ बाबूवर येते. या सगळ्या संघर्षात बाबू हाताश होतो. मोडून पडतो. तो पुन्हा आशावादी होतो. स्वतःला सावरतो. बाबूच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेम होय. जीवनात सगळं हरवलं तरी चालेल पण प्रेम जिंकलं पाहिजे. हे वाक्य फार महत्त्वाचे आहे. या वाक्यातून प्रेरणा घेऊन बाबू नवा मार्ग अनुसरतो. जब जिंदगी झंड होती है ! तो पुना बंबईही याद आती है ! या प्रवासातील नजाकत TDM मध्ये खास अनुभवण्यासारखी आहे. बाबू आणि नीलम यांच्या सफल प्रेमची कथा म्हणजे TDM हा चित्रपट होय. या प्रेम कथेत ट्रॅक्टर हे साधन अतिशय महत्त्वाचे ठरते. गरीब नायक आणि श्रीमंत घरातील नायिका  हा पारंपारिक व्यूह या चित्रपटाच्या मांडणीला आहे. परंतु या मांडणीमध्ये भूतकाळातील काही संदर्भ खूप देखणेपणाने मांडले जातात. प्रेम भावनेतील तरलता ,नाजूकता हळुवारपणे चित्रपटातून येते. रोमँटिक दृश्य मांडणीतील भाऊरावचे वेगळेपण नजरेत भरणारे आहे. रोमँटिक भावनांमधील काही क्षण वेडं लावणारे आहेत.बाबू आणि नीलम यांच्या प्रेमाला सजातीय गरीब- श्रीमंतीच्या संघर्षाची किनार आहे. नीलम आणि बाबू या पात्रांचा देखाणा अभिनय आनंददायी आहे. विशेषतः बांबूची भूमिका,अभिनय अतिशय ताकदीचा आहे. किंवा तेवढ्यासाठी TDM हा चित्रपट पाहावा. पैसे वसूल करून देणारा हा चित्रपट आहे. बाबू ,नीलम ,भिकू शेठ,मेंबर ,बाबूचा बाप,चेअरमन ,बाबूची बहीण ,तिचा शिक्षक पती हे सगळेचं पात्र उत्तम अभिनयातून आपल्याला मागच्या काळात घेऊन जातात. भिकूशेठ ,मेंबर या पात्रांनी चित्रपटात खास ग्रामीण झिंग आणली आहे. ग्रामीण बेरकीपणा उत्तमपणे ताकदीने उभा केला आहे. चित्रपटातील संवाद अतिशय खटकेबाज आहेत. ध्यानात राहणारे आहेत.चित्रपटातील पिंगळा गाणं , आणि त्याचं चित्रण चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटातील सर्वच गाणी कथानकाशी एकरूप झालेली आहेत. चित्रपटातील गाणी कथानकाच्या भावनिकेतला उंच परिमाण प्राप्त करून देतात. 

विहीर खोदण्यासाठी सुरंग लावले जातात. या सुरुंगासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. भिकूशेठ या ट्रॅक्टर मालकाकडे बाबू रोजंदारीवर काम करतो. भिकूशेठ श्रीमंत शेतकरी आहे. नीलम ही कॉलेजला जाणारी भिकूशेठ ची मुलगी आहे. नीलमवर बांबूचे प्रेम आहे. सुरुवातीला नीलम बाबुला भाव देत नाही. परंतु बाबू मधील कष्ट करणारा माणूस नीलमला भावून जातो. तो तिला आवडतो. ती त्याच्या प्रेमात पडते. या कथानकात कुठेही फारसा संघर्ष येत नाही. बाबुला बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेऊन खर्च करावा लागतो. यातून फायनान्स कंपनीच्या हप्ते बाबू भरू शकत नाही. यातून फायनान्सवाले बाबूचा ट्रॅक्टर ओढून घेऊन जातात. आर्थिक ओढाताणीतील बाबू खचत जातो. 1995 च्या काळातील तरुण पिढीच्या कोंडमाऱ्याची कथा TDM मधून उभी राहते. 

सहकारी सोसायटी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहजतेने कर्ज मिळवून देण्यासाठी असतात. परंतु राजकारण ,ठग प्रवृत्तीचे शोषक सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटण्यासाठी वेगवेगळी आयुध वापरतात. ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या सहकारी सोसायटी ह्या सक्षमपणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उभ्या राहत नाहीत. गावगाड्यातील टगे या संस्थांवर ताबा मिळवतात. TDM मधील चेअरमन ,मेंबर हे अतिशय ठसठशीतपणे या प्रवृत्तींचा प्रतिनिधित्व करतात. बाबुला वेळेवर सहकारी सोसायटीकडून कर्ज मिळाले असते तर काहीतरी सकारात्मक घडले असते. परंतु तसे होत नाही. या विविध प्रवृत्तींचे TDM मध्ये सकस चित्रण येते. भाऊराव यांना ग्रामीण भागातील ग्राउंड लेव्हल वरील असलेल्या समृद्ध अनुभवातून या कलाकृतीत हे चित्रण  प्रत्ययकारी झाल्याची जाणीव होते. 

TDM  मध्ये १९९५ च्या काळातील हिंदी ,मराठी चित्रपट ,गाणी यांचा प्रभाव ग्रामीण भागातील माणसांवर कसा होता ? हे अतिशय छानपणाने मांडला आहे.  मोठ्या आकाराच्या कॅसेट ,टेप रेकॉर्डर ,मोठे साऊंड ,व्हिडिओ कॅसेट ,व्हीसीआर मोठ्या आकाराचे टीव्ही या सगळ्यांशी निगडित असलेल्या आठवणी ,स्मृती TDM मधून जिवंत होतात. तो काळ पुन्हा अनुभवण्यासाठी TDM  ही एक पर्वणीस ठरते. या चित्रपटावर सैराट ,बबन ,ख्वाडा या चित्रपटांची छाप आहे. नायिकेचे ट्रॅक्टर चालवणे. मोठ्या दगडांमध्ये बांधलेली विहीर त्या विहिरीत पोहणे. नायकाचा आंघोळीचा सीन , गुलाबाची फुलं पावलांच्या ठशावर ठेवणे. नायकाचा मित्र म्हणून मुस्लिम पात्र घेणे. काही चित्रपटातील प्रसंगांवर सैराट ,बबन ,ख्वाडाची छाप दिसते. भाऊराव यांनी या मर्यादेवर मात केल्यास मराठी चित्रपटासाठी  महत्त्वाचे ठरू शकते. तोच तोच पणा टाळून नवं काहीतरी देण्याची तयारी भाऊराव यांनी ठेवल्यास मराठी चित्रपटाला उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निश्चित आहे.



मर्यादित पात्रांचा वापर ही या चित्रपटाची मर्यादा वाटते. दलित समाजजीवन हे ग्रामीण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग आहे. विशेषतः वाळू भरणारे मजूर हे दलित वर्गातील असतात. परंतु तसे चित्रण TDM मध्ये येत नाही. चित्रपटातून मांडल्या जाणाऱ्या आशयाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या जीवनाचे कलाकृतीतून चित्रण येत नाही. चित्रपटातून येणाऱ्या बाजारपेठा आजच्या काळातील वाटतात. इ.स.1995 च्या काळातील बाजारपेठ चित्रपटातून नीटपणे उभी राहत नाही. कापड दुकानातील साडीला लावलेला बारकोड ही गोष्ट त्या काळात अस्तित्वात नव्हती. परंतु ती चित्रपटातून येते. बाबू आणि नीलम यांचे प्रेम त्रोटकपणे चित्रीत होते. ते एकजीव रूपात हळवेपणाने उभे राहत नाही. चित्रपटातील काही संवादांमध्ये शहरी पुणेरी मराठी बोली येते. नीलम, बाबूची बहीण ही पात्र जास्त प्रमाण भाषेत बोलताना दिसतात. शिरूर परिसरातील ग्रामीण बोली चित्रपटात नीटपणे येत नाही. प्रमाण भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात येतात. ही या चित्रपटाचे मर्यादा वाटते. विहीर खोदण्यासाठी सुरुंग पेरणारा बाबू वाळू धंद्यात यशस्वी होतो. विहीर फोडून पाणी देणारा सुजनशील नायक निसर्ग ओरबाडणाऱ्या विकृत व्यवस्थेचा हस्तक होतो. यातील बोच लक्षात घेण्यासारखे आहे. वाळू धंद्यातील बारकावे ,वृत्ती प्रवृत्ती ह्या TDM मधून अचूकपणे टिपल्या जात नाहीत. वरवरचे चित्रण येते.  ही या चित्रपटाची मर्यादा वाटते. इ.स. 1995 च्या काळातील कपडे ,ड्रेस ,फॅशन अतिशय चपखलपणे चित्रपटातून येते. विशेषतः पॅरेगॉन स्लीपर चप्पलचा चित्रपटातील वापर दाद देण्यासारखा आहे. त्या काळातील लग्न ,वेगवेगळ्या प्रथा , परंपरा नीटचपणे चित्रपटातून येतात. लग्नात होणारी भांडण ,हुंडा पद्धती , त्या काळातील मानापानासाठी होणारा अवाढव्य खर्च या सगळ्या बाबी चित्रपटातून उत्तम पद्धतीने साकार झालेल्या आहेत. TDM मध्ये TDM नावातील सस्पेन्स अगदी कटप्पाने बाहुबलीला का मारले ? यासारखा आहे. ग्रामीण जीवनातील दुर्लक्षित , सर्वसामान्य माणसचं जगणं , त्यांच्या वृत्ती ,प्रवृत्ती यावर चित्रपट येणे हीच अतिशय उल्लेखनीय बाब आहे.मराठी माणसांच्या अभिरूचीचा दर्जा श्रेष्ठ आहे. हे या चित्रपटातून सिद्ध होते. क्षुल्लक ,हिंसक चित्रपट मोठ्या प्रमाणात येत आहेत. KGF, भोला या चित्रपटांच्या तुलनेत TDM हा अतिशय कल्पकतेने साकारलेला मराठी चित्रपट आहे. भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपट मांडणीला एक खास ग्रामीण शैलीचा सुगंध आहे. हा सुगंध असाचं दरवळत राहो ! भाऊसाहेब व त्यांच्या टीमला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!! ...

---------------------------------------------

 डॉ.गणपतराव ढेंबरे 

रावेर ,तालुका रावेर ,जिल्हा जळगाव 

पिनकोड -  425508

 मोबाईल नंबर - 94210812 70 

ई-मेल -  dhembregr@gmail.com

----------------------------------------------

रविवार, २ एप्रिल, २०२३

उन्हाच्या कटाविरुद्ध

 ॥ १ ॥


'उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखी त्वेषानं फुलणारी कविता '


डॉ.गणपतराव ढेंबरे, रावेर


'उन्हाच्या कटाविरुद्ध 'हा नागराज मंजुळे यांचा कवितासंग्रह आहे. माइंड अँड मीडिया ,प्रकाशन ,पुणे यांनी नोव्हेंबर २०१० मध्ये प्रकाशित केलेला हा कवितासंग्रह आहे. भूतकाळातील सुप्त जाणिवांचा आत्मशोध म्हणजे प्रस्तुत कवितासंग्रहातील कविता होय. या कवितासंग्रहात एकूण ५४ कवितांचा समावेश आहे. हा कवितासंग्रह प्रसिद्ध होण्याच्या आधी कवितेविषयी गंभीर असणाऱ्या विविध नियतकालिकातून नागराज मंजुळे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. कवितारती ,मौज ,अस्मितादर्श ,मिळून साऱ्याजणी ,परिवर्तनाचा वाटसरू, सकाळ दिवाळी अंक , लोकमत दिवाळी अंक ,जाणीव दिवाळी अंक , कलात्म , कला कलाकल्पतरूंचे आरव या नियतकालिकातून नागराज मंजुळे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

'उन्हाच्या कटाविरुद्ध ' यासंग्रहाला इसवी सन २०११ चा भैरू रतन दमानी पुरस्कार मिळाला आहे. याच कवितासंग्रहाला नारायण सुर्वे काव्य प्रतिभा (२०१४ ) तसेच दया पवार स्मृती पुरस्कार (२०१४ ) हे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.


भूतकाळातील अस्तित्व शोधाची ही कविता आहे. जागतिकीकरणातून वाटेला आलेलीआत्ममग्नता या कवितेतून ठळकपणे अभिव्यक्त होते. प्रेम भंगाचे अतिउ दुःख मांडणारी ही कविता आहे. एकटेपणा ,एकाकीपणा यातून अस्वस्थ होणाऱ्या मानवी मनाचा कोलाहल या कवितेतून मुखर होतो. जातीयतेतून पोळलेल्या विदीर्ण मानसिकता या कवितेतून येते. अतिशय प्रामाणिक असणाऱ्या प्रियकराच्या तुटत जाण्याची व्यथा या काव्यसंग्रहातून मांडले जाते. वरील काही ठळक आशयसूत्रे नागराज मंजुळे यांच्या कवितेतून अभिव्यक्त होतात. आत्मशोधातून वाट्याला आलेले जगणे आणि त्यातून तुटत गेलेले भावविश्व नागराज मंजुळे यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. इ.स. १९९० नंतरच्या व्यापक सामाजिक परिघातील व्यक्तिगत कोंडी आणि त्यातून खोल मनातील भळभळणारी जखम नागराज मंजुळे यांच्या कवितेतून मांडली जाते.




                     ॥ २ ॥

काव्य निर्मिती विषयक प्रगल्भ जाणीव : -


नागराज मंजुळे यांची काव्यनिर्मिती विषयीची समग्र जाणीव अतिशय प्रगल्भ आहे. स्वतःच्या काव्य निर्मितीचे मर्म सांगताना कवी म्हणतो , " माझ्या हाती 

नसती लेखणी

 तर ......

तर असती छिन्नी

 सतार ..... बासरी 

अथवा कुंचला

 मी कशानेही 

उपसतच राहिलो असतो

 हा अतोनात कोलाहल मनातला "

( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ०४ ) 


जर स्वतःला कविता लिहिता आली नसती तर आपल्या मनातला अतोनात कोलाहल आपण उपसतचं राहिलो असतो. वेगवेगळ्या कलांमधून स्वतःला मोकळं करत गेलो असतो. असा ठाम विश्वास कवीला आहे. लेखणी ऐवजी छिन्नी ,सतार ,बासरी , कुंचला आपण हातात घेतला असता. या विविध कलांच्या माध्यमातून मनातला अस्वस्थपणा आपण अभिव्यक्त केला असता. ही कवीची प्रामाणिक कबुली कवीच्या अभिव्यक्तीचे मर्म उलगडून दाखवणारी आहे.


'मित्र ' या कवितेत कवी म्हणतो ,

"एकसारख्या प्रकृतीचे 

आम्ही दोघे मित्र

 एकमेकांचे जिवलग

 एकच ध्येय 

एकच स्वप्न घेऊन

 जगणारे 

पुढे 

त्याने आत्महत्या केली

 आणि मी कविता लिहिली "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ३७ )


 मित्राचे आत्महत्या करणे. आणि स्वतः कविता लिहिणे या दोन्ही कृती कवीला समान वाटतात. जीवनातील सर्व पर्याय संपल्यानंतर माणसाला मृत्यूचा  पर्याय आश्वासक वाटतो. मृत्यूच्या गाढ निद्रेतील सुख त्याला प्राप्त होते. कवी कविता लिहितो म्हणजे तो एका अर्थाने आत्महत्याच करतो. ही आत्महत्या असते , स्वप्नभंगाची , अगतिकतेची ,अस्वस्थतेची , मनात खोल साचलेल्या दुःखाची  तीव्रता कमी करण्यासाठी कवी कविता लिहितो. आपल्या काव्य निर्मितीची प्रेरणा कवी येथे मांडतो. आपल्या कवितेतील प्राणांतिक सूर आपण कशासाठी आळवत आहोत.याची प्रामाणिक कबुलीच कवीने येथे दिली आहे. कवी म्हणतो,

"तसा जीवघेण्या विषण्णतेत

  मरण कागदावर लिहित

 मी जगतच होतो "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ४३)


 एकीकडे कवी आपल्या  काव्य निर्मितीच्या कार्याची तुलना आत्महत्ये सारख्या गोष्टीशी करतो. तर दुसरीकडे कवी आपल्या काव्य निर्मिती विषयी म्हणतो , जीवघेण्या विषण्णतेत मरण कागदावर लिहित राहण्याची वेळ आपल्यावर आली आहे. जीवनाचा अर्थ हरवून बसलेली विषण्णता कवितेच्या रूपात अर्थपूर्ण होते. जीवघेण्या विषण्णतेतील विविध टोकदार कांगोरे कविता रुपातून आकाराला येतात.


  कवितेचे स्वतःच्या आयुष्यातील स्थान शोधताना कवीला कविता सावलीसारखी वाटते. अतीव दुःखाच्या उन्हातली सावली बनून कविता कवीची सोबत करते. कवी 'सावली'या कवितेत म्हणतो,

" उजेडताना मी 

माझ्यावर 

कवितेनं

 धरली सावली 

कुणास ठाऊक 

कशी मनात 

अंकुरली कविता 

पृथ्वीला

 कशी सुचली झाडे "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ५४ ) उजाडताना ,लख्ख प्रकाशात कविता माझ्यावर सावली धरते. समकालीन जगण्यातल्या उन्हाच्या कटाविरुद्ध कवीला काव्य निर्मिती सावली सारखी वाटते. पृथ्वीवरती झाडांचे जे अस्तित्व आहे.अगदी तेच कवीच्या जीवनातील कवितेचे स्थान आहे. अगदी सहज नैसर्गिकपणे कविता मनात अंकुरत असल्याची भावना कवीच्या काव्यनिर्मितीचे स्वरूप विशद करते. आपली कविता ही नेमकी कुणासाठी आहे ? याचे उत्तर 'या शुभ्र कागदासाठी 'या कवितेतून कवी देतो. 


"ही कविता 

आपल्या कोरड्या तळाचे सुस्कारे ऐकणाऱ्या उद्ध्वस्त आडासाठी आहे ही कविता 

खोलवर ओल शोधून 

थकलेल्या हताश झाडासाठी आहे"

 (उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ७२) 

 आपली कविता ही मनाच्या कोरड्या तळातून शब्दरूप घेऊन येते. जगण्याचे प्रामाणिक सुस्कारे आपल्या कवितेतून येतात.  हे प्रामाणिक सुस्कारे ऐकणाऱ्या उद्ध्वस्त आडासाठी आहेत. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आतोनात धडपडणाऱ्या माणसाचे प्रयत्न म्हणजे आपली कविता होय . ही जाणीव कवीने कवितेतून मांडली आहे.



॥ ३ ॥


कवी आपली कविता कोणासाठी आहे ? हे मांडताना म्हणतो,  

"ही कविता 

आटलेल्या झऱ्यासाठी 

तुटलेल्या तार्‍यासाठी

 एकांतात केलेल्या

 निरार्थक हातवाऱ्यांसाठी आहे " 

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ७२) 

आपली कविता ही उपेक्षितांसाठी आहे. ज्यांच्या स्वप्नांचे ,आशा - आकांक्षांचे आभाळ चोरीला गेले आहे. त्यांच्यासाठी आपली कविता आहे. असे कवीला वाटते.आटलेल्या झऱ्यासाठी ,तुटलेल्या तार्‍यासाठी , आणि एकांतात केलेल्या निरर्थक हातवाऱ्यांसाठी आपली कविता आहे. ही जाणीव कवितेच्या प्रेरक तत्त्वांचा वेध घेणारी आहे.


" ही कविता आहे 

कफनाआडच्या 

निर्घृण नि:शब्दतेसाठी 

आहे ही कविता 

कफनासारख्या 

या शुभ्र कागदासाठी "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ७२)

 आपली कविता ही कफनाआडच्या , निर्घृण नि:शब्दतेसाठी आहे. काही भावना संवेदना शब्दातीत असतात. या भावना , संवेदना केवळ काळजाच्या स्पंदनातून जाणवतात. या कफनासारख्या शुभ्र भावना अतिशय नितळपणे या कवितेतून अभिव्यक्त होतात.


                    ॥ ४ ॥



 मराठी कवितेत स्वतःच्या काव्य निर्मिती प्रक्रियेविषयीची संवेदना फार कमी प्रमाणात अभिव्यक्त झालेली आहे. नागराज मंजुळे आपण कविता का लिहितो ? कुणासाठी लिहितो ? कशासाठी लिहितो ? कधी लिहितो ? याविषयी अतिशय सजगपणे आपल्या कवितेतून भाष्य करतात. उपेक्षित , वंचितांच्या जगण्याला शब्दबद्ध करणारी ही कविता कमालीची व्यक्तिगत तर दुसऱ्या बाजूने  समष्टीची कविता आहे. समकालीन समाज वास्तव ,त्यातील विविधांगी जीवनपटाला या कवितेतून अविष्कृत होतो. जागतिकीकरणाने सर्वसामान्य माणसांच्या अस्तित्वच शून्यवत केले आहे. एकूण कणा मोडलेल्या गर्भगळीत माणसांचा अगतिकपण या कवितेतून येते. 

कवी लिहितो ,

 "आत्महत्याऐवजी 

मी पडून राहिलो रात्ररात्र 

टीव्हीच्या अश्लील उजेडात 

एम टीव्ही ,स्टार मुव्ही ,डिस्कवरी .... वहात गेलो वाहिन्यातून 

अन दचकलो झुरमुळणारा पांढरा मलूल स्क्रीन पाहून 

काळजातल्या दुखऱ्या रिक्ततेसारखा लांडग्यांच्या झुंडीतून सुटून 

पळत सुटावं पाडसानं तसा 

मी पळत सुटतो गर्भगळीत 

माणसामाणसाआड दडतो "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ -७०) 


जागतिकीकरणात टीव्हीच्या माध्यमामुळे लोक स्वतःच दुःख विसरून जातात. वाहिन्यांच्या सुळसुळाटात माणसं टीव्हीच्या स्क्रीनला चिकटून राहतात. परंतु कवीचं मन या सगळ्यात रमत नाही. भांडवलदारांच्या झुंडी लांडग्यांच्या रूपात वावरत आहेत. या झुंडीपासून बचाव करण्यासाठी कवी माणसांच्या आड दडतो. परंतु या भय घेऊन जगणाऱ्या माणसांचे असणे कवीने अचूकपणे टिपले आहे. जागतिकीकरणाच्या युगात जाहिरातींचे स्थान महत्त्वाचे आहे. मुळात आजचे जग हे जाहिरातीचे जग आहे. आपलं मन कुणापुढे मांडावं. या भ्रमात असणारा कवी म्हणतो , "जाहिरातींच्या या बोलघेवड्या युगात कोण ऐकेल माझ्या स्पंदनांची विराणी आणि मी तर कुठवर 

काळीज काढून ठेवावं कुणाकुणाच्या तळहातावर "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ७१) 


आपल्या स्पंदनांची विराणी ऐकण्यासाठी कुणालाच वेळ नाही. आजच्या जगात सगळा जाहिरातींचा बाजार आहे. स्वतःचे सत्व हरवत जाणाऱ्या समाजात आपण कुठपर्यंत स्वतःला सिद्ध करत राहावं. असा प्रश्न कवीला पडतो .



 नागराज मंजुळे यांच्या कवितेतून गरिबी ,दारिद्र्य ,बेकारी यांचे अतिशय वास्तववादी चित्रण येते. समकालीन वास्तव मांडताना कवी म्हणतो , "उपचाराअभावी 

विझत चाललेले आईचे डोळे 

खचलेला आशाळभूत बाप 

भूक ... बहीण ... हुंडा 

डिग्री .... नोकरी..... वशिला

 लाच "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ३५ ) दवाखान्यात नेण्यासाठी घरातल्या माणसांकडे पैसे नाहीत. त्यामुळे अत्यंत जवळच्या माणसाचं मरण डोळ्यांनी अनुभवणारी माणसं काळजात रूतून बसतात. अतिशय कमी शब्दात समकालीन जगण्यातील अस्वस्थता ,आगतिकता भेदकपणे कवीने मांडली आहे. समकालीन जगण्यातले तीव्र प्रश्न एका एका शब्दातून प्रत्ययी होत घायाळ करतात. ही कविता समकालीन वास्तवाला नेटकेपणाने शब्दबद्ध करते.



 समकालीन वास्तवातील भयानता , काळजाला पीळ पाडणारे अनुभव चित्रमय शैलीत नागराज मंजुळे कवितेतून मांडतात. काही प्रश्न कवितेत ते लिहितात ,

"मुलीच्या शाळेचा खर्च ,आईची औषधं 

दलालाचे इतके अन् खाटेचे भाडं वेगळच 

तुम्ही करून पाहिला आहे का कधी वेश्येचा संभोगरत हिशोब "

(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ६३)


 हा वेश्येचा संभोगरत हिशोब अंगावर येणार आहे. शोषित घटकाच्या जगण्यातले वास्तव अस्वस्थ करणारे आहे. एक वेश्या गिऱ्हाईका सोबत संभोग करत असताना मनात कोणता हिशोब मांडते. हा हिशोब काळजाच्या तळाला हलवून जाणार आहे. वेश्येचा खर्च कधी आपला होऊन जातो. हे आपल्यालाच कळत नाही. समाजातील दुर्लक्षित घटकांचे जगणे नागराज मंजुळे यांच्या कवितेतून ठळकपणे व्यक्त होते.


 भुकेचा वास्तव मांडताना कवी म्हणतो ,

" ' बा 'ची वाट पाहून

 रात्र पडते पोटात पाय घेऊन पोरांसहित तेव्हा 

भुकेजल्या चुलीसाठी काटे तोडताना तळहातात मोडलेला काटा उपसून मुक्यानंच टिपं गाळणारी 

आश्राप माझी ..... सोशिक कविता "

( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ३१ )

 पोटात भूक घेऊन झोपणारी लहान मुलं या कवितेतून येतात. भुकेजल्या चुलीसाठी कुणी तरी काटे तोडत राहते. या गरीब माणसांची भूक आपल्या आश्राप कवितेतून नागराज मंजुळे मांडतात. 



गरिबी आणि श्रीमंती यातील दरी मांडताना कवी लिहितो ,

" छत्रपती शिवाजी पुलापर्यंत 

तुझी फोर व्हीलर येऊ शकेल 

खाली झोपडपट्टीत अजूनही

 एक पाऊलवाटच नाक धरून उकिडर्यातून वाट काढत खाली येते पुलावरून पहाशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती

 विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगऱ्यांसारखी दिसतील "

( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ -१० )


 'तुझ्या येण्याअगोदर एक पत्र ' या कवितेत कवीने आपल्या प्रियसीला लिहिलेले पत्र आहे. प्रियसीने आपल्याला भेटण्यास आपल्या घरी येण्याअगोदर काही गोष्टी समजून घ्याव्यात. असे नायकाला वाटते. अतिशय कथनात्मक पद्धतीने कवीने हा अनुभव मांडला आहे. प्रियसीची फोर व्हीलर केवळ छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच येऊ शकते. झोपडपट्टीत जाणारी वाट अजूनही उकिरड्यातून जाते. विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगार्‍यासारखी दिसतात. गरिबी , दारिद्र्य , झोपडपट्टीतील जगणं अतिशय थेटपणे कवितेतून उभे राहते. प्रियसीचा इंडिया आणि कवीचा भारत यांना विभागणारी व्यवस्था कवीने कवितेतून उभी केली आहे. आपल्या स्वतःच्या दहा बाय दहाच्या घरात प्रेयसीचा जीव गुदमरू शकतो. नायकाच्या घरातील कण्हत - धुपत पेटणारी चूल ,काळा कुळकुळीत चहा सगळं किळसवाणं वास्तव कवीने कवितेतून चित्रमय शैलीतून चित्रित केले आहे.



॥     ॥



केवळ गरीबी ,उपासमारी ,दारिद्र्य कवीच्या वाट्याला येत नाही. तर त्या जोडीला जातीयतेचे चटके कवीच्या वाट्याला येतात. या चटक्यांचे चित्रण कवीने आपल्या कवितेतून ताकदीने उभे केला आहे.

 प्रियकर आणि प्रियसी यांच्या नात्यात जात ,धर्म येतो. आणि ती त्याचे प्रेम नाकारते. कवी लिहितो ,

"पुढे एक समीकरणच झालं 

ती आणि पाऊस

 पण अचानक एक दिवस

 तिच्या घरात वाद उसळला 

पावसात भिजल्यावरून ..... पावसाच्या जातीवरून ..... धर्मावरून चिखलमाखल्या वाटेला भिऊन की  काय 

तिने पावसात भिजल्याचं साफ नाकारलं "

( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ २९ )


 प्रियसीने प्रेम नाकारणे जीवघेणे असते. कवीने हा अनुभव ताकदीने या कवितेत उभा केला आहे. पावसाला ही जातीचा ,धर्माचा रंग असावा का ? तिने शेवटी पावसात भिजल्याचा साफ नाकारले. यातून नायकाचे जीवन पाचोळा होऊन जाते. मरणकाळा सोसण्यासाठी ती त्याला एकट्याला वाऱ्यावर सोडून निघून जाते. यातील करूण वास्तव कवीने या कवितेतून मांडले आहे.


  भूतकाळातील प्रेमभंगाचे दुःख अतिशय तरलपणे कवीने आपल्या कवितेतून मांडले आहे. 'मागे मागे तू ' या कवितेत भूतकाळातील तिच्या आठवणी अतिशय अस्वस्थ करणारे आहेत. फ्रॉकची ओटी करून फुले वेचताना ती नायकाकडे गजरा मागते. वासना विरहित प्रेम अनुभव या कवितेतून कवीने उभा केला आहे. तिच्या आठवणींच्या फुलांची ओटी उधळून गेल्याची खंत कवी व्यक्त करतो. कवीच्या मनातले तिचे असणं स्मृतीतून परागंधा होते. यात काहीतरी मूल्यवान हरवल्याचं नोंद कवीने या कवितेतून केली आहे. कवी म्हणतो , "आता तुझा चेहरा आठवत नाही नुसताच गंध येतो ओटीतल्या फुलांचा गजऱ्यासाठी पुढे केलेला हात असतो आणि नुसताच किणकिणाट बांगड्यांचा 

आता फुल बरसात असतील नसतील तिथं झाडही असेल नसेल " 

(उन्हाच्या  कटाविरुद्ध पृष्ठ १६ )


 ही कविता भूतकाळातील अवघड वयातली मनोभावना मांडणारी कविता आहे. आता तिचा चेहरा नीट आठवत नाही. परंतु तिच्या ओटीतल्या फुलांचा गंध मात्र अभिशापासारखा पाठलाग करत राहतो. आठवणींचा पाठशिवणीचा खेळ मनात काहूर माजवत राहतो. यातील अस्वस्थ मानसिकता कवीने कागदावरती अचूकपणे उतरवली आहे. एकीकडे तिचा चेहरा नीटसा आठवत नाही. तर दुसरीकडे तिचा चेहरा प्राणांतिक आठवत राहतो. तिच्या आठवणींच्या यात्रेत हरवलेला एक निरागस माणूस नागराज मंजुळे यांच्या कवितेतून उभा राहतो. कवी लिहितो ,

" तुझा चेहरा आठवतोय प्राणांतिक 

तर तुझे हजार रात्रींच्या झोपेने जडावलेले श्लील डोळेच 

पुरासारखे वेढतायेत मला चहूबाजूंनी "


( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - १४ )

 प्रियसीचा हजार रात्रींच्या झोपेने जडावलेले डोळे नायकाला आठवणींच्या पुरात वेढतायेत. तिच्या देहाच्या सर्व सीमा ओलांडून आतोनात जवळ आलेली प्रियसी आठवणींचा डोह घेऊन येते. या अस्वस्थ डोहात स्वतःच अस्तित्व नगण्य झालेला नायक रूक्मांगंदा असणाऱ्या तिच्या आठवणींचा भाग बनतो.




 उन्हाच्या कटाविरुद्ध या काव्यसंग्रहातील प्रतीके प्रतिमांचे स्वरूप : -

 एखाद्या कवीच्या कवितेतून येणाऱ्या प्रतिमा , प्रतीके ,प्राकथा ,उपरोधकता व उपहास , नादमयता ,लयबद्धता , सुचकता इत्यादी वाङ्मयीन मूल्यामुळे ती कविता काळाच्या कसोटीवर श्रेष्ठ ठरत असते. नागराज मंजुळे यांच्या उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितासंग्रहात प्रतिमा , प्रतीके यांचे अतिशय नाविन्यपूर्ण उपयोजन केलेले आहे.कवितेची सुई , पाठीत रुतलेली खुजी घरे ,बोन्साय ,स्वप्नबीजं , वांझोटी भूमी ,स्वप्नांचा खत-पाणी , चुरगळलेली माणसं 'रुक्मगंधा , कातरवेळी 'दर्शनातुर डोळे , 

दुर्बोध नृत्यमग्न लिपी , मायाळू अंधार , सावळी सावळी ,निद्रिस्त लावण्यपाश , स्वप्नांचा खच , बेइमान फुलपाखरू , निष्पर्ण झाड ,स्वप्नाळू चांदणी , आळवावरचं पाणी , पेंगणारी घरे , विरहिणी नागीन ,हेतूंचे जंतू , हातवीर्य सूर्य , चौथं पान पळसाला ,अनैतिक संस्कृती ,जन्मंधांच्या दृष्टीभर , पाऊसस्पर्श , मरणकाळा , पाचोळा , कातर सांजसूर्य , उपाशी प्रश्न ,अवेळीचा पाऊस , नादमय सांजसुर्य , इंद्रनील जखम ,निष्पर्ण खोड , आठवआभाळ , पाऊसवेडी भूमी , भुकेचे प्रचंड कुरण ,सनकी आकाश ' गुढगर्भ अडगळीत, उखणलेल्या अंगणाला , आठवचंद्र , पडदानशीन आशय , गर्दुल्या गोसाव्यांचा वांझ आशीर्वाद , वेश्येचे उद्ध्वस्त गर्भाशय ,प्रसववेणा , बेशर्म जगणं ,ओसाडाचं गळ्यात लोढणं , उखाणलेल्या ओट्यावर ,पोरकी पाखरं , सुकलेली तुळस ,धसकटलेल्या जगण्याला ,दुःखविभोर सांज, वांझोटा धुरळा ,आयुष्याचा गारठणारा कॅनव्हास ,गाईचं मौन , इत्यादी प्रतीके , प्रतिमांचे उपयोजन नागराज मंजुळे यांच्या कवितेत येते. विशेषतः ग्रामीण जगण्यातले संदर्भ असणारे प्रतीके ,प्रतिमा त्यांच्या कवितेतून येतात. निसर्गातील शाश्वत सत्य प्रतिमा प्रतिकांमधून मांडले जाते.  वैविध्यपूर्ण प्रतिमा ,प्रतीकांचा वापर हे मंजुळे यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्ये सांगता येईल.



 सकारात्मक ,आशावादाची मांडणी करणारी कविता :-


 प्रखर वास्तवाला कवेत घेणारी  नागराज मंजुळे यांची कविता सकारात्मक आशावाद मांडणारी कविता आहे. व्यवस्थेने आपल्या वाट्याला दुःख ,वेदना , शोषण दिले आहे.  समतावादी जगाच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे मंजुळे यांची कविता आहे. कवी म्हणतो ,

" कधीतरी दिवस जातीलच 

इथेही फुले फुलतील 

स्वप्न साकारतील "

( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - १२ )

 आज जी काही व्यवस्था आहे ती नक्कीच बदलणार आहे. याबद्दल कवी प्रचंड आशावादी , सकारात्मक आहे . समतापूर्ण व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? हे सांगण्यासाठी कवी लिहितो ,

"मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी "

( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - १२ )

 स्वतःच्या स्वप्नांची आहुती देण्यासाठी कवी सज्ज होतो. आपल्या उपेक्षित , शोषित चुरगळलेल्या माणसांसाठी कवी गाडून घेण्याची घोषणा करतो. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून समाज परिवर्तनासाठी कवी त्यागासाठी सज्ज झाला आहे .उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं त्वेषानंआपण फुललं पाहिजे असे कवीला वाटते. नागराज मंजुळे यांची सकारात्मक आशावाद मांडणारी कविता मराठी कविता विश्वात आगळीवेगळी ठरते.

 'उन्हाच्या काटाविरुद्ध ' या काव्यसंग्रहाला काही मर्यादाही आहेत.  यामध्ये विशिष्ट अनुभवाच्या मांडणीतील तोच तो पणा जाणवत राहतो. काव्यसंग्रहातील कवितांच्या क्रमाला कोणताही मूल्यात्मक आधार नाही. कवितासंग्रहातील प्रेमानुभव मांडणाऱ्या ,व्यक्तिगत जीवन अनुभव मांडणाऱ्या ,सामाजिक आशयाच्या कविता अशी वर्गवारी करणं गरजेचं वाटतं.

 प्रतिमा प्रतीकांच्या वापराबद्दलही तोच तोपणा दिसून येतो. आत्ममग्न मानसिकता कवितेतून प्रत्ययाला येते. यासारख्या काही मोजक्या मर्यादा या काव्यसंग्रहाच्या नोंदवता येतील. इ.स. २०१० नंतरच्या महत्त्वाच्या कवितेत नागराज मंजुळे यांच्या कवितेचा समावेश करावा लागतो.


 नागराज मंजुळे यांना काव्य निर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! धन्यवाद !!!

 डॉ.गणपतराव ढेंबरे 

मराठी विभाग 

श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय , रावेर ,तालुका रावेर ,जिल्हा जळगाव पिनकोड ४२५५ ०८

मोबाईल नंबर - ९४२१०८१२७० ई-मेल : dhembregr@gmail.com

बुधवार, २२ मार्च, २०२३

रौंदाळ म्हणजे गोड साखरेची कडू कथा

 गोड साखरेची कडू कथा म्हणजे रौंदाळ 

रौंदाळ हा सन 2023 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट होय.गजानन नाना पडोळ दिग्दर्शित हा चित्रपट मार्च 2023 मध्ये प्रदर्शित झाला. भाऊसाहेब शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा मांडणारा हा चित्रपट आहे. एकीकडे ऊस पिकावर  प्रक्रिया करणाऱ्या भांडवलदारांची आणि दुसरीकडे ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची ही कथा आहे. ग्रामीण ,समाजकारण,राजकारण , अर्थकारण यांना केंद्रवर्ती  ठेवणारी या चित्रपटाची कथा आहे. बदलते अर्थकारणामुळे समाजाची मूल्यव्यवस्था बदलली आहे. मध्यम उत्पादन गटातील शेतकऱ्यांचा जगणं मांडणारा हा चित्रपट आहे.आजच्या तरुण शेतकऱ्याची ही कथा आहे.शिवा जाधव या तरुणाचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न आहे. दुर्दैवाने शिवाची ती संधी हुकते. आजोबांच्या मार्गदर्शनामुळे शिवा शेती करणे सज्ज होतो. चांगली शेती पिकवण्यासाठी शिवा काबाडकष्ट घेऊ लागतो. प्रचंड मेहनत, कष्टाने पिकवलेला शेतीमाल जेव्हा कवडीमोल भावाने विकावा लागतो. तेव्हा या स्थितीवर मात करण्यासाठी शिवा विद्रोह करतो. चित्रपटातील एक वाक्य शेतकऱ्यांच्या स्थिती ,गतीवर भाष्य करणाऱ्या आहे. शेतकऱ्याला माल पिकवता येतो. परंतु विकता येत नाही. या वाक्यातून वास्तवावर भाष्य केले जाते. इतर पिकातून पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही . म्हणून ऊसासारख्या एक रक्कमी  पैसे देणाऱ्या पिकाच्या लागवडीकडे शिवा वळतो. सहकारी साखर कारखान्याचे राजकारण ,भ्रष्टाचार ,अर्थकारणातील गुंते,शोषणव्यवस्था यांचा बिसूर चेहरा रौंदाळ मधून मांडला जातो. सहकारी संस्थांचा उदय आणि विस्तार हा बहुजनांच्या विकासासाठी झाला होता. सुरुवातीला अतिशय आदर्श मूल्य उराशी बाळगून या सहकारी संस्था चालवल्या गेल्या. जागतिकीकरणानंतर या सहकारी संस्थांचे अर्थकारण बदलले. या संस्था राजकारणाचा अड्डा बनल्या.  सभासदांचे हित जोपासण्यापेक्षा त्यांचे शोषण ,अडवणूक करण्यासाठी या संस्था एक साधन होऊन बसल्या. सहकार महर्षी ,सहकार सम्राट , सहकार भाग्यविधाते,जाणते सहकार राजे यासारख्या उपाध्या धारण करणाऱ्यांच्या हाताचे बटीक बनलेल्या सहकारी संस्था अचानक फायद्यातून तोट्यात गेल्या. गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेअर्समधून उभ्या राहिलेल्या या संस्था कवडीमोल भावाने निलाव झाल्या. सर्वसाधारण सभासदांचे आर्थिक नुकसान झाले. पैसा ,जमीन यांचे  मातीमोल भावाने निलाव झाले. या सगळ्या अर्थकारणातून उभ्या राहिलेल्या सरंजामी सुभेदारांच्या घराणेशाहीच्या मगरूरेची मांडणी रौंदाळ या चित्रपटातून येते. भारत स्वतंत्र झाला. असला तरी या लोकशाही देशात काही समाज घटकांची मानसिकता मध्ययुगीन कालखंडातील असल्याचे दिसून येते. या भागाचे आपण मालक आहोत. राजे आहोत. या भ्रमात वावरणारे राजकारणी ,भांडवलदार हे सर्वसामान्य माणसाला अतिशय हिनतेची वागणूक देतात. या वर्गाचे प्रतिनिधी म्हणजे रौंदळ चित्रपटांमधील खलनायक बिट्टूशेठ आणि विक्रम ( अण्णा ) शिंदे हे होय. अहमदनगर जिल्ह्यातील राजुर सहकारी साखर कारखान्याचे मालक बनलेले श्री. विक्रम शिंदे यांचा मुलगा बिट्टू शेठ यांची पात्रे सरंजामी ,घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवा जाधव हे या चित्रपटातील मुख्य पात्र आहे. या सर्वसामान्य कुटुंबातील शिवाने घेतलेला बदला म्हणजे रौंदळ हा चित्रपट होय. भांडवलदारी सरंजामी मानसिकतेतील विकृत माणसं गरीब , फाटक्या , दीन , दुबळ्यांनाचा कसा छळ करू शकतात. यावर हा चित्रपट अतिशय अचूकपणे प्रकाश टाकतो. अडवणूक ,छळ ,लाचारी करण्यासाठी माणसांना कसं हातबल केलं जातं. याची ही मन हेलावणारी कहाणी आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात ,तालुक्यात सरंजामी मानसिकता असणारे हे राजकारणी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला कमी जास्त प्रमाणात भेटतील. या मानसिकतेचा उगम हा आपल्या समाज व्यवस्थेत आहे. जातीयव्यवस्थेत या मानसिकतेची मूळे आहेत. रौंदळ मध्ये जातीव्यवस्थेचे चित्रण प्रभावीपणे येत नाही. अतिशय सोप्या पद्धतीने सरळपणे अँग्री यंग मॅन ची ही कथा बनली आहे. या चित्रपटातून ग्रामीण राजकारणातील बारकावे ,जातीय व्यवस्था यातले ताणे -बाणे या चित्रपटातून आले असते तर या चित्रपटाला मोठी उंची गाठता आली असती. सरळ दक्षिणात्य चित्रपटाचा बाज या चित्रपटाला टाळता आला असता. व्यापक सामाजिक पट या चित्रपटातून उभा राहत नाही. या चित्रपटातील आणखी एक मर्यादा म्हणजे राजकारणातील गट तट नीटपणे या चित्रपटातून येत नाहीत. विक्रम (अण्णा) शिंदे यांना पराभूत करणारा आमदार संपूर्ण चित्रपटात एकदाही येत नाही. हिंगणी गावातून 90% मतदान केलेल्या लोकप्रिय आमदाराचे पात्र संपूर्ण चित्रपटात एकदाही येत नाही. ते पात्र , गट तटाचे राजकारण चित्रपटात नीटपणे उभे राहत नाही. ही उणीव , मर्यादा चित्रपट पाहताना जाणवते. सोशल मीडिया हा आजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. याचे पुसट चित्रण चित्रपटातून येते. पत्रकाराचे हत्या ,आजोबांची मारहाण हे प्रसंग त्रोटकपणे येतात. या प्रसंगांची पुसटता  रसिकाला मानवत नाही. प्रचंड हिंसक ,आती शक्तिशाली शिवा कडक वाटतो. चित्रपटाचा हिंसक शेवट चित्रपटातील कलात्मकतेला मर्यादित करतो. शिवा आणि नंदी यांच्यातील प्रेम कथा काहीशी हलकीफुलकी वाटते. चित्रपटातील काही विशेषतः रोमँटिक गाणे उगाचच टाकल्यासारखे वाटतात. गावातील पात्र मोजकीच वापरली गेली आहेत. राजकारणाचा पट उलगडण्यासाठी विविध पात्रे आली असती तर चित्रपटातील कथानक रसिकाला खेळून ठेवू शकले असते. परंतु अतिशय कमी पात्रांच्या वापरातून गाव ,ग्रामीण राजकारण सक्षमपणे उभे राहत नाही.चित्रपटातील गाण्यांवर सैराट , बबन सारख्या चित्रपटांची छाप वाटते. नंदीच्या अभिनयावर बबन चित्रपटातील टेलरिंग काम करणाऱ्या अभिनेत्रीचा प्रभाव जाणवतो. बिट्टूशेठचा अभिनय अतिशय देखणा झाला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. विशेषतः आजोबांचा अभिनय रसिकांना भावणारा आहे. ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचा प्रभाव घेऊन जगणारे ,जागोजागी संत वचने मांडणारे आजोबा प्रभावी वाटतात. चित्रपटातील भाषेला खास नगरी टच आहे. पुणे-अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची बोलीभाषा मनाला भुरळ घालते. संवादातील नगरीबाज , ठसकेदारपणा खुमुसदार आहे. चित्रपटाची भाषा भडका उडवणारी लक्षात राहणारी आहे. अहंकार नकां करू ,सोन्याची लंका होती रावणाची , पार गेली. तुम्ही आम्ही कोण ? यासारख्या ग्रामीण बोलीतील संवाद खास अध्यात्मशरण पात्राचे अंतरंग उलगडून दाखवणारे आहेत. विक्रम अण्णा शिंदे ,बिट्टू शेठ तुम्हाला तुमच्या गावात ,तालुक्यात कुठे भेटल्यास दिग्दर्शकाला दोष देऊ नका. ही प्रवृत्ती सार्वत्रिक झाली आहे.सध्याच्या कोणत्याही राजकारणाची छबी  या खलपात्रात कुठेही दिसू शकते. हे वास्तव उभा करणारा रौंदळ मराठीतील आगळावेगळा चित्रपट आहे. दुर्लक्षित विषयाला काहीसे कलात्मकपणे उभे करण्याचे धाडस दिग्दर्शकांनी दाखवले आहे. त्याबद्दल दिग्दर्शकाचे मनःपूर्वक अभिनंदन !  खास ग्रामीण जीवन,माती ,माणसं यांच्या व्यथा, कथांवर दिलेली ही फोडणी काळजाला भिडणारी आहे.रौंदळ म्हणजे तुडवून नाश करणं. या चित्रपटात शिवाने बिट्टूशेठ ,विक्रम अण्णा यांचा पार रौंदळ करून टाकला आहे. व्यवस्थेने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जगण्याचे रौंदळ करून टाकले आहे. सर्वसामान्य माणसांच्या भावना ,स्वप्न यांना पायदळी तुडवणारी रौंदळ व्यवस्था हे आजचे समकालीन वास्तव आहे. हे वास्तव दिग्दर्शकाने अचूक टिपले आहे. साखर कारखान्यातील एकूण व्यवस्था कामगार ,मजूर ,शेतकरी , कारखानदार यांचे चित्रण अतिशय चपखलपणे उभे राहिले आहे.रौंदाळने मराठी चित्रपटाला एका नव्या विषयाचे दिशा दिग्दर्शन दिले आहे. मराठी चित्रपट कुठेतरी ऐतिहासिक ,धार्मिक ,भावनिक आशय विश्वात गुंतून पडला आहे. रौंदळसारखा चित्रपट ग्रामीण भागातील वास्तवावर प्रकाश टाकणार आहे. समकालीन जगण्याला अभिव्यक्त करणारा रौंदाळ हा चित्रपट मराठी चित्रपटासाठी दिशादर्शक ठरू शकतो. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील अंकिता चित्रपटगृहात जाऊन अगदी ठरवून हा चित्रपट पाहिला. शो सुरु करण्यासाठी आम्ही दोन मित्रांनी पाच तिकीट घेतली. पण चित्रपट पाहिल्यानंतर पैसा वसूल झाला. अशीच आमच्या दोघांची भावना होती. रौंदळच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा !!!

धन्यवाद !

 डॉक्टर गणपत रामदास ढेंबरे , 

रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव पिनकोड 425508

 मोबाईल नंबर 9421081270 ई-मेल - dhembregr@gmail.com

सोमवार, ६ मार्च, २०२३

ग्रामीण कविता संकल्पना आणि स्वरूप

ग्रामीण कविता संकल्पना आणि स्वरुप

डॉ.जी.आर.ढेंबरे, रावेर

प्रस्तावना :-

    मराठी साहित्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विशेषत: इ.स.1960 नंतर जे ठळक वाङ्मयप्रवाह उदयाला आले, त्यापौकी ग्रामीण साहित्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे. मराठी वाङ्मयाच्या समृद्धीमध्ये ग्रामीण साहित्याने भर टाकलेली आहे. ग्रामीण साहित्यनिर्मितीमागे ग्रामीण जाणीव असते. ग्रामीण जीवनाचे प्रश्न, ग्रामीण माणसाची सुख-दु:खे, आशा-आकांक्षा ह्यांचे प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात उमटत असते. आजच्या उद्योगप्रधान, यंत्रनिष्ठ शहरी संस्कृतीपेक्षा ग्रामीण जीवन अत्यंत वेगळे आहे. ग्रामीण जीवन कृषिनिष्ठ आहे. कृषी निसर्गावर अवलंबून आहे. कृषी आणि निसर्ग यांचे अतूट असे नाते आहे. शेती, शेतकरी, निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा शोध ग्रामीण साहित्य घेते. ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष चित्रण ज्या साहित्यातूनझाले आहे अशा साहित्याचा शोध घेत आपणांस थेट ज्ञानेश्वर कालापर्यंत जाता येऊ शकते. 'दृष्टांतपाठा' मधून आलेल्या काही कथांमधून शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण नकळत का होईना पणझाले आहे असे सांगता येऊ शकते. याच पद्धतीने नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांच्या अभंगांमधून ग्रामीण जीवनाच्या काही छटा प्रकट होताना दिसतात. शाहिरी वाङ्मयामधून तर ग्रामीण भाव-भावना प्रकट होताना दिसतातच. असे असले तरी जाणीवपूर्वक ग्रामीण जीवनदर्शन घडवू इच्छिणाज्या साहित्याचा सलग प्रवाह 1920 नंतरच दिसतो असे म्हणावयास हरकत नाही. येथून पुढे कथा, कविता आणि कादंबरी या तीन वाङ्मय प्रकारांमध्ये भरघोस निर्मितीला प्रारंभ झाला. आजतागायत ही निर्मिती होतच आहे. ग्रामीण साहित्याने मराठी वाङ्मयामध्ये मोलाची भर घातली आहे, हे मान्य करावयास हरकत नाही. ग्रामीण कवितेची सुरूवात कधीपासून झाली ? याविषयी वेगवेगळ्या समीक्षकांची वेगवेगळी मते आहेत. कुणी भा.रा.तांबे यांच्यापासून तर कोणी केशवसुतांच्या काही कवितांपासून ग्रामीण कवितेचा प्रारंभ सांगतात. या प्रारंभाविषयीचा विचार आपल्याला सविस्तरपणे करता येतो.


ग्रामीण कवितेची संकल्पना :-

    इ.स.1975 नंतरच्या मराठी कवितेतील एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे ग्रामीण कविता हा होय. इ.स.1975  पूर्व मराठी कवितेतील बहिणाबाई चौधरी, आनंद यादव, ना.धों.महानोर यांच्या कवितेतून ग्रामीण संवेदनशीलतेची विविध रूपे प्रकट झाली होती. ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण स्त्री, ग्रामीण जीवनातील प्रश्न, समस्या ह्या जाणिवा या कवितेतून व्यक्त  झाल्या. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितांचा आशय व अभिव्यक्ती यामध्ये अमूलाग्र बदल झाला. एकंदरीत 'ग्रामीणता' साकार होण्यामध्ये कृषिनिष्ठ संस्कृती, निसर्गसन्मुखता, त्यातून निर्माण झालेले लोकमानस हे घटक महत्त्वाचे ठरतात. यातून जगण्याची एक 'रीत' साकार होत जाते. या रीतीचे चित्रण ज्या साहित्यात आढळते, ते ग्रामीण साहित्य असे म्हणता येईल. कृषिजीवनात असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. किंबहुना ही कृषिसंस्कृतीच कुठल्या तरी अर्थव्यवस्थेची अंकित बनून राहिली आहे. इ.स.1975 नंतर ग्रामीण साहित्याच्या प्रवाहाने चळवळीचे स्वरूप धारण केले. त्याची नाळ बहुजन समाजाच्या प्रश्नांशी, त्याच्या भावभावनांशी जोडली गेली. भाषा, विषय यांचे कुठलेही दडपण न घेता ग्रामीण लेखक, कवी आपल्या अनुभवविश्वाला शब्दरूप देऊ लागला. हे जाणीवपूर्वक घडले. ग्रामीण साहित्य सुरूवातीपासून वेगळ्या अनुभवविश्वाबरोबरच आपल्या जीवनवादी जाणिवा आविष्कृत करत आहे. ग्रामीण साहित्याप्रमाणे ग्रामीण कवितेनेही ग्रामजीवनातील वास्तवाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामजीवन अनुभवलेल्या कवींच्या अनुभूतींचे शब्दरूप म्हणजे ग्रामीण कविता होय. ग्रामीण जीवनातील प्रश्न, समस्या यांचा शोध कवींनी ग्रामीण कवितेत घेतला आहे. मराठी ग्रामीण कवितेचा विचार करीत असताना प्रथम कोणत्या स्वरूपाच्या कवितेला आपण 'ग्रामीण कविता' म्हणणार आहोत हे स्पष्ट केले पाहिजे. या संदर्भात विश्वास जहागीरदार यांनी केलेले विवेचन विचारात घेणे उपयुक्त ठरेल. ते लिहितात, ''ग्रामीण कविता म्हणजे ग्रामीण संवेदनशीलतेने घडविलेली कविता. कलावंताची संवेदनशीलता म्हणजे अनुभव घेण्याची त्याची पद्धती बाह्य वास्तव, सभोवताली घडणाज्या घटनांच्याबद्दल विशिष्ट जाणिवा निर्माण करत असते आणि त्या कवितेच्या बुडाशी असतात. ग्रामीण कवितेमध्ये बाह्य वास्तव हे खेडे, निसर्ग आणि पारंपरिक मूल्ये यांतून घडलेले ग्रामजीवन आहे आणि त्यात आकाररूपाला आलेली संवेदनशीलता त्या जीवनातील अनुभवाविषयीच्या प्रतिक्रिया देत असते. अशा कवितेच्या निर्मितीच्या बुडाशी असलेली संवेदनशीलता ही ग्रामीण संवेदनशीलता आहे आणि अशी कविता ग्रामीण आहे, असे स्थूलमानाने म्हणता येईल. हे एकदा निश्चित झाले की केवळ बोलीभाषेत लिहिलेली कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे किंवा केवळ निसर्गविषयक जाणिवा व्यक्त करणारी कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे हे वेगळे स्पष्ट करण्याची आवश्यकता नसावी.''1 

    वरील विवेचनातून ग्रामीण कवितेची संकल्पना स्पष्ट होते. ग्रामीण संवेदनशीलता ग्रामीण कवितेत महत्त्वाची असते. ग्रामीण कवीचे अनुभवविश्व खेड¶ाभोवती केंद्रीत झालेले असते. ग्रामीण जीवन, निसर्ग, पारंपरिक मूल्ये यांना ग्रामीण कवितेत महत्त्वाचे स्थान असते. ग्रामीण जीवनात घडत असलेल्या परिवर्तनाबद्दलचा अनुकूल, प्रतिकूल दृष्टीकोन ग्रामीण कवितेतून व्यक्त होत असतो. ग्रामजीवनावर प्रभाव असणारे परंपरागत घटक म्हणजे कृषी, निसर्ग व ग्रामीण समाजव्यवस्था या सर्वांच्या प्रभावातून ग्रामीण जीवनाची खास अशी शौली आकाराला येते. अशा जीवनपद्धतीचा आविष्कार हा ग्रामीण साहित्यात झालेला असतो. इ.स.1975 नंतर महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची धुरा ग्रामीण नेतृत्वाकडे राहिली. या नेतृत्वाने ग्रामीण भागासाठी विविध योजना अंमलात आणल्या. याचा परिणाम ग्रामीण भागावर झाला. हरितक्रांतीमुळे शेती व्यवसायाचे स्वरूप बदलून गेले. शेतीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टीकोन बदलत गेला. शेतीचे मोठ¶ा प्रमाणात व्यवसायीकरण झाले. यातून ग्रामीण अर्थकारणाचे नवे पर्व सुरू झाले. यातून नवे गुंतागंुतीचे प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची, गुंतागुंतीच्या जीवनाची मांडणी करणाज्या कवितेला ग्रामीण कविता असे म्हणता येईल. 

    ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करताना गणेश देशमुख लिहितात ''ग्रामीण-शहरी जीवन व साहित्यातील हा ठळक भेद ग्रामीण साहित्याशी समांतर असणाज्या विशेषणाद्वारे प्रकटत नसल्याने 'ग्रामीण' हे विशेषणच त्यासाठी वापरावे लागते. कारण नागरी व शहरी जीवनपद्धती, मूल्ये, परंपरा, भाषा इ. या सर्वच दृष्टीने, सामाजिक पातळीवरही हा भेद ठळकपणे जाणवतो. कृषिकेंद्रितता, समूहप्रधानता, निसर्गसन्मुखता, स्वाभाविकता, स्वावलंबित्व, कार्य-विभाजनाची प्रवृत्ती, स्थितिशीलता, कुटुंब, ग्रामसंस्थांचा प्रभाव, भाषिक पृथगात्मता, मौखिक साहित्य परंपरा, प्रदेशाविशिष्ट अशी जीवनशौली इ. वौशिष्ट¶ामुळे ग्रामीण समाजाला आपला असा ठळक चेहरा प्राप्त झाला आहे. या सामाजिक व सांस्कृतिक संचिताचा प्रत्यय ग्रामीण साहित्यातून यावा, अशी अपेक्षा असते. या इतिहासकालीन वौशिष्ट¶ाबरोबरच 'आधुनिक' अशी जीवनवौशिष्ट¶े ग्रामीण साहित्यातून प्रकटत असतात. या सर्वांचे दर्शन ग्रामीण साहित्यातून घडत असल्यामुळे ग्रामीण साहित्याची संकल्पना विस्तृत व वौशिष्ट¶पूर्ण मानावी लागते. केवळ 'ग्रामासंबंधी', 'खेड¶ासंबंधी' असे या संकल्पनेचे स्पष्टीकरण त्याचमुळे परिपूर्ण वाटत नाही. 'ग्रामीण' ही संज्ञा व संकल्पना स्वीकारून साहित्याकडे बघत असताना ग्रामीण समाजाची उपरोल्लिखित सर्व वौशिष्ट¶े, ऐतिहासिकता व आधुनिकता इ. संदर्भ अभिप्रेत असतात.''2 वरील विवेचनात देशमुखांनी सांगितलेली सर्व वौशिष्ट¶े ग्रामीण कवितेला लागू पडतात. कृषिकेंद्रितता, समूहप्रधानता, निसर्गसन्मुखता, स्वाभाविकता, कार्य-विभाजनाची प्रवृत्ती, स्थितिशीलता, कुटुंब, ग्रामसंस्थांचा प्रभाव, भाषिक पृथगात्मता, मौखिक साहित्य - परंपरा, प्रदेशाविशिष्ट अशी जीवनशौली इ. वौशिष्ट¶े ग्रामीण समाजाला वेगळेपण प्राप्त करून देतात. या वेगवेगळ्या वौशिष्ट¶ांचा शोध ग्रामीण कविता घेते. या विविध घटकांमुळे ग्रामीण जीवनात निर्माण होणाज्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचे कार्य ग्रामीण कविता करते. 

    ग्रामीण कविता म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना ग्रामीण कवितेतील महत्त्वाचे कवी इंद्रजित भालेराव आपली साहित्यनिर्मिती प्रक्रिया स्पष्ट करतात. ते लिहितात, ''घरी उपासमार होईल इतकी गरीबी नसली तरी शेतमजूर लावूनच सगळी कामे करून घ्यावीत इतकी तेव्हा श्रीमंतीही नव्हती. माझ्या सगळ्या बहिणीही तेव्हा लग्न होईपर्यंत आणि नंतर माहेरपणाला आल्यावरही शेतात कामं करायच्या. त्यांच्यासोबत मीही तेव्हा राबायचो. त्यामुळे कष्ट इतके स्वाभाविक वाटतात की, त्याचं भांडवल करण्याचं मनातही येत नाही. माझ्या कवितेला मातीचा अस्सल गंध आहे असे जे समीक्षक म्हणतात त्याचेंही कदाचित हेच कारण असावे. प्रत्यक्ष भोगलेलं आणि पाहिलेलं शेतकरी जीवनाचं वास्तव हीच माझ्या कवितेची मुख्य भूमिका आहे असं वाटतं''3 भालेरावांच्या वरील विवेचनातून शेतकरी जीवन ही त्यांच्या काव्याची प्रेरणा आहे हे स्पष्ट होते. शेतकरी आणि माती यांच्यातील संबंधाचा शोध ग्रामीण कविता घेते. ग्रामीण कवितेतील अनुभवविश्वाचे केंद्र विशिष्ट प्रदेशातील शेतकज्यांचे, कुणब्याचे जीवन आणि त्याच्या जीवनाशी निगडित भूमी आहे. हा शेतकरी बहुधा अल्पभूधारक वा शेतमजूर आहे. या शेतकज्याचे भावविश्व, त्याच्या आशाआकांक्षा, स्वप्ने, त्याच्या जीवनातील अनेकविध ताणतणाव, प्रश्न, व्यथावेदना, त्याच्या जीवनातील मूल्यभाव, आध्यात्मिकता इत्यादींचा आविष्कार ग्रामीण कवितेत झाला आहे. 

    ग्रामीण कवितेत शेतकज्याचे जीवन केंद्रस्थानी असते. शेतकज्याची भूमीची, मातीची ओढ, तिच्याशी निष्ठा, निसर्गाची ओढ, शेतकज्याच्या जीवनातील सुखदु:खे, त्यांतील चढउतार, त्याचे होणारे तज्हेतज्हेचे शोषण, त्याचे शोषण करणारी जागतिकीकरणासारखी आधुनिक व्यवस्था, त्याच्या जीवनातील नातेसंबंध, शेतकज्याच्या जीवनातील प्रेमानुभव, आई-बाप, शेतकरी स्त्रियांचे जीवन, शेतकज्याच्या भोवतालचे गावगाड¶ातील जीवन व त्याचा भोवतालच्या जीवनाशी असलेला संबंध अशी अनेक आशयसूत्रे इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेतून अभिव्यक्त होतात. इ.स.1975 नंतरची ग्रामीण कविता ही शेतकज्यांच्या जीवनावर, तेथील निसर्गावर, मातीवर, त्याचप्रमाणे गावावर, प्रदेशावर, गावाकडील माणसांवर, आई-वडिलांवर श्रद्धा असलेली कविता आहे. ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करताना आनंद यादव लिहितात, ''ग्रामीण विभागाशी संबंधित असे जीवनानुभव ग्रामीण साहित्यातून व्यक्त होतात. 'ग्राम' म्हणजे खेडेगाव, तेथील जीवनपद्धती, तेथील समाज, त्या समाजाची कृषिप्रधान संस्कृती, तेथील विशिष्ट निसर्गाशी, मातीशी त्याचा असलेला वौशिष्ट¶पूर्ण संबंध, त्या संस्कृतीला लाभलेली इतर वौशिष्ट¶े, तेथील मानवी जीवनाला त्या प्रदेशानुसार लाभलेली आर्थिक, सामाजिक, धार्मिक, ज्ञानात्मक, औद्योगिक वौशिष्ट¶े आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्न आणि समस्या, तसेच कालौघात होत जाणाज्या स्थित्यंतराचे तेथील जीवनसंस्कृतीवर होणारे संस्कार यांचा आविष्कार ग्रामीण साहित्यात होत असतो.''4 वरील विवेचन ग्रामीण साहित्याच्या विविध पौलूंवर प्रकाश टाकणारे आहे. ग्रामीण कवितेची संकल्पनाही वरील विषय-सूत्रांच्या आधारे स्पष्ट करता येईल. कृषीप्रधान संस्कृती, मातीशी असलेला वौशिष्ट¶पूर्ण संबंध, विशिष्ट प्रदेशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, ज्ञानात्मक जीवन व त्यासंबंधित असणाज्या प्रश्न, समस्यांची प्रभावी मांडणी करणाज्या कवितेला ग्रामीण कविता असे म्हणता येईल. ग्रामीण कवितेची संकल्पना अचूकपणे व वस्तुनिष्ठपणे सांगता येणार नाही. परंतु तिच्या वेगवेगळ्या वौशिष्ट¶ांचा शोध आपणाला घेता येतो. 


इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेचे स्वरूप :-

    ग्रामीण संवेदना प्रकट करणाज्या कवितेतून ग्रामीण जीवनातील विविधरूपे थेटपणे अभिव्यक्त झाली आहेत. या कवितेतून इ.स.1975 नंतरच्या महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा शोध मांडला आहे. शेती हा ग्रामीण भागाचा नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भारतातील सुमारे 70% लोकांचा व्यवसाय शेती किंवा शेतीवर अवलंबून असणारे उद्योग हाच आहे. त्यामुळेच भारत 'कृषिप्रधान देश' म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील खेडे हे पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय तेथे उपलब्ध असतो. अशा या शेतीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करणे हाच दिनक्रम तेथील बहुतेक लोकांचा असतो. म्हणूनच आपल्या कृषिप्रधान देशात बहुतेक सण, उत्सव हे कृषी व्यवस्थेशी निगडित असल्याचे दिसून येते. अशा या ग्रामीण भागातील छोट¶ाशा खेडेगावात राहणारा माणूस, त्याची जीवनपद्धती, ग्रामीण समाज इ. चे वर्णन रविकिरण मंडळातील कवींनी अत्यंत कल्पनारम्य असे केले होते. ही परिस्थिती पुढील कालखंडात बदलली. ज्या खेड¶ाचा पूर्वी गौरव होत असे, तीच खेडी आता अंतर्विरोधाचे केंद्र बनली आहेत. खेड¶ातील माणसांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. शेती व्यवसाय हा दिवाळखोरीचा बनत चालला आहे. विशेषत: कोरडवाहू शेती करणाज्या शेतकज्याचे जीवन असह्य व अगतिक झालेले दिसते. लहान शेतकरी, शेतमजूर जीवनाला कंटाळून आत्महत्या करताना दिसतात. त्यामुळे कधीकाळी वौभवसंपन्न असणारी खेडी आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. बदलांच्या रेट¶ात ग्रामीण माणूस होरपळून निघत आहे. वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लहरी निसर्ग, शहरात वाढणाज्या रोजगाराच्या संधी व त्यामुळे शहराकडे धावणारा तरूण वर्ग, रक्त आटेपर्यंत कष्ट करूनही हाती काहीही न लागल्यामुळे उदास झालेला शेतकरी वर्ग शेतीकडे उदास नजरेने पाहू लागला. हरितक्रांतीमुळे बियाण्यांच्या नवनवीन जाती बाजारात आल्या आहेत. त्यामुळे कधी सुकाळ आलाच तर प्रचंड उत्पादन होऊन शेतमालाच्या किंमती घसरत आहेत. व्यापारी व दलाल पिळवणूक करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागला. अशा या बदलत्या खेड¶ाचे, ग्रामीण माणसाच्या जीवनाचे व हतबल बनलेल्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेतून येते. 

    वर नमूद केलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, मानसिक पातळीवर इ.स.1975 नंतरची ग्रामीण कविता आकार घेते. इ.स.1975 नंतरच्या काळात ग्रामीण कवितेने वौशिष्ट¶पूर्ण वळण घेतलेले दिसते. आरंभापासून इ.स.1975 पर्यंत संख्यात्मकदृष्ट¶ा अल्प असणारी ग्रामीण कविता आधुनिक ग्रामीण साहित्य चळवळीच्या उदयानंतर मात्र विकासाबरोबरच बरीच विस्तारलेलीही दिसते. ग्रामीण साहित्याच्या चळवळीने व आजूबाजूच्या परिस्थितीने निर्माण केलेल्या वातावरणातून आत्मभान आलेली ग्रामीण तरूण कवींची एक पिढीच या काळात उदयाला आलेली दिसते. विट्ठल वाघांची कविता या पिढीची प्रातिनिधिक कविता असली तरी त्यानंतर दमदार अशा ग्रामीण कवितांचे बरेच संग्रह मागील दोन दशकात प्रकाशित झालेले दिसतात. या काळात ग्रामीण कवितेच्या प्रवाहावर ज्यांचा भविष्यात निश्चित असा ठसा उमटेल असे महत्त्वाचे कवी म्हणजे इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, संतोष पद्माकर पवार, शंकर वाडेवाले, नारायण सुमंत, राजन गवस, प्रकाश होळकर, दासू वौद्य, अजय कांडर, केशव देशमुख, प्रकाश किनगावकर इ. कवी सांगता येईल. 

    इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेचे हे स्वरूप लक्षात घेतल्यास आत्मभान आलेल्या ग्रामीण तरूण पिढीची ही कविता आहे हे सहजपणे लक्षात येते. ग्रामीण जीवनातील दैन्य, दारिद्र¶, शोषण यावरच आपले लक्ष केंद्रित करणारी ही ग्रामीण कविता प्रखर वास्तववादी असल्यामुळे, ग्रामीण साहित्याच्या 'समर्थपणाचा' प्रत्यय देणारी आहे. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप स्पष्ट करताना वासुदेव मुलाटे म्हणतात, ''माणसाचे शोषणकर्ते बदलू लागले आहेत, बदलले आहेत. म.फुल्यांच्या काळात असणारा शोषकवर्ग आता तेवढासा समर्थ राहिलेला नाही. मूळचा खेडूत खेड¶ातून आलेला, लोकशाहीच्या नावाखाली राजकारण करून विविध सत्तास्थाने, अर्थस्थाने बळकावणारा हा शोषकवर्ग आहे. तो अधिक धूर्त, अधिक चाणाक्ष आणि वेळप्रसंगी कोणत्याही मार्गाचा, नीती-अनितीचा अवलंब करणारा आहे. या नव्या शोषकाकडून आपले शोषण, आपली पिळवणूक थांबवणे हे अधिक अवघड काम आहे. कारण अन्याय करणारा हाच मुळी शेतकज्यांच्या घरातला आहे. घरातलाच माणूस जर अन्याय करीत असेल तर दाद तरी कुणापुढे मागायची ? आणि विरोध तरी कुणाला करायचा ? स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याची गोड फळे खायला मिळतील अशा भ्रमात असणाज्या मंडळींचा भ्रमनिरास झालेला होता. अपेक्षाभंग झालेला होता. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली व तारूण्यात पदार्पण केलेली पिढी बेकार बनून दिशाहीन अवस्थेत फिरत होती. या उद्रेकाचा स्वर इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण साहित्यात उमटू लागला. आणि आता इ.स.1990-92 च्या काळातील ग्रामीण साहित्याने गांभीर्याने विद्रोहाचा सूर आळवायला सुरूवात केली आहे. आता रान पेटून उठले आहे.''5

    वरील विवेचनात वासुदेव मुलाटे इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप स्पष्ट करतात. इ.स.1975 नंतरच्या मराठी कवितेत समकालीन प्रश्नांचे प्रतिबिंब उमटते. शोषणाचा तीव्र निषेध ही कविता व्यक्त करते. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेत विद्रोह व्यक्त होतो. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, विट्ठल वाघ, इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतून विद्रोहाचा सूर ठळकपणे व्यक्त होतो. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेचे स्वरूप तपासत असताना या कालखंडातील महत्त्वपूर्ण बाबींचे संदर्भही समजून घेणे आवश्यक ठरते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या धोरणांचा प्रभाव समाजजीवनात उमटला आहे. दुष्काळ, नापिकी, शेतीमालाला हमीभाव नाही, यामधून होत जाणाज्या शेतकज्यांच्या आत्महत्या पाहावयास मिळतात. तर दुसरीकडे विज्ञान, तंत्रज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रगतीने गाव-माणसांचा बदललेला चेहरा लक्षणीय आहे. आज शिक्षण खेड¶ापाड¶ापर्यंत पोहोचले आहे, भ्रष्ट व्यवस्थेत सुशिक्षित बेकार तरूणांचे जीवन गुंतागुंतीचे बनले आहे. तसेच अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण, नौराश्य इत्यादींच्या अनुषंगाने ग्रामीण माणूस अस्वस्थ आहे. गावपातळीवरील निवडणूका, नात्यागोत्याचे राजकारण, जातीयता, धर्मांधता, हुंडापद्धती, व्यसनाधीनता, महागाई, निसर्गाचा लहरीपणा, सावकारशाही इत्यादी गोष्टींनी ग्रामजीवन ढवळून निघालेले दिसून येते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माणूस यांच्या प्रश्नांची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामीण कवी आपले अनुभव शब्दांकित करीत आहेत. ग्रामीण कवितेतून ग्रामीण जीवनाचे आकलन करून तेथील माणसांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामजीवनातील संस्कृती, जाणिवा, भावना, प्रश्न, त्यावरील उपाय यांचे वास्तव व भेदक चित्रण या कवितेतून येताना दिसते. 

    नारायण कुलकर्णी - कवठेकर, उत्तम कोळगावकर, विट्ठल वाघ, सोपान हाळमकर, राजन गवस, जगदीश कदम, इंद्रजित भालेराव, जयराम खेडेकर, प्रकाश होळकर, नारायण सुमंत, सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, शंकर वाडेवाले, केशव देशमुख, अजय कांडर, प्रवीण बांदेकर, महेश मोरे, प्रदीप पाटील, सुरेश शिंदे, एकनाथ पाटील, कैलास दौंड, ऐश्वर्य पाटेकर, संजीव दुधाट, मनोज बोरगावकर, पी. विट्ठल, मधुकर कवडे, गुंफा कोकाटे, प्रमोदकुमार आणेराव, विलास पाटील, रमेश इंगळे उत्रादकर, रवींद्र इंगळे चावरेकर, रमेश चिल्ले, भगवान देशमुख, वसंत सावंत, संजय कृष्णाजी पाटील, ज्ञानेश्वर मुळे, संतोष पद्माकर पवार, प्रतिमा इंगोले, रायभान दवंगे, पुरूषोत्तम पाटील, अशोक कौतिक कोळी, अशोक नीलकंठ सोनवणे, देविदास चौधरी, लक्ष्मण बारहाते, लक्ष्मण महाडिक, कल्पना दुधाळ, रफीक सूरज, दासू वौद्य, संदीप जगताप, प्रकाश किनगावकर इत्यादी कवी ग्रामीण अनुभवविश्व मोठ¶ा सामथ्र्यांनिशी अभिव्यक्त करीत आहेत. या बदलांचा शोध इ.स.1975 नंतरची ग्रामीण कविता घेते.

संदर्भ टिपा :-


1]    जहागीरदार विश्वास; 'म.सा.पत्रिका (ग्रामीण साहित्य विशेषांक)', जुलौ - डिसें. 1980, पृ.89 

    (अंक - 214-215)

2]    देशमुख गणेश, 'ग्रामीण समाजजीवन व साहित्य, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, 2008, 

    पृ.283, 284.

3]    भालेराव इंद्रजित, 'पीकपाणी', मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, चौथी आवृत्ती, ऑगष्ट, 

    2001, पृ.48.

4]    यादव आनंद, 'मराठी वाङ्मयकोश', खंड चौथा, (समन्वयक संपादक :- विजया राजाध्यक्ष), 

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती - 2002, पृ.113.

5]    मुलाटे वासुदेव, साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह, (संपा.डॉ.शरणकुमार लिंबाळे), 

    दिलीपराज प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 2007, पृ.80.




डॉ.प्रा. गणपतराव ढेंबरे

(मराठी विभाग)

श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर

ता. रावेर, जि. जळगांव

भ्रमणध्वनी- 9421081270

ई-मेल : dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...