रविवार, ३० जुलै, २०२३

पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या पराभवाची कारण मीमांसा अर्थात : दयन "

 "पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या पराभवाची कारणमीमांसा अर्थात : दयन "

"विद्याविना मती गेली , 

मतीविना नीति गेली

 नीतीविना गति गेली ।

 गतीविना वित्त गेले ,

वित्तविना शूद्र खचले ,

 इतके अनर्थ एका अविद्येने केले" ।

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शुद्रांच्या पराभवाची कारणमीमांसा वरील काव्यपंक्तीतून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडली आहे. आज पारंपरिक शिक्षण घेतलेल्या शूद्रांच्या पराभवाची कारणमीमांसा करणे खूप गरजेचे झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यांच्यात व्यस्त प्रमाण झाल्यामुळे उच्चशिक्षित युवकांच्या वाट्याला अतिशय दयनीय परिस्थिती आली आहे.

"पारंपारिक शिक्षणामुळे मती भ्रमित झाली

 भ्रमित मतीमुळे नीतीची वाट लागली आती गतीमुळे 

होते नव्हते ते वित्त पणाला लागले ,

नोकरी विना शूद्र पुन्हा खचले 

इतके अनर्थ एका अतिविद्याने केले " ।

या ओळींची प्रचिती देणारी 'दयन' नावाची कादंबरी लोक वाङ्मय गृहने जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित केली. या कादंबरीचे लेखक युवराज मेघराज पवार हे आहेत. एम.ए.,बी.एड, एम. फिल.,पीएच.डी. , नेट-सेट या उच्च शिक्षण शिक्षणातील सर्व पदव्या प्राप्त करूनही प्राध्यापकाची नोकरी न मिळालेल्या डॉक्टर गणेश मोहन जाधव या तरुणाच्या शोकात्म अंताची ही कथा आहे.

सी.एच.बी. प्राध्यापक व्यवस्था हे आजचे वास्तव आहे. उच्च शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड म्हणजे सी.एच.बी. प्राध्यापकाची व्यवस्था होय. जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सी.एच.बी. व्यवस्था आणली. हजारो तरुणांच्या जीवनाची राख रांगोळी केलेली ही व्यवस्था दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांवर या व्यवस्थेमुळे अन्याय होतो. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. केवळ पदवीचा कागद हातात घेऊन फिरणारे हजारो तरुण आपल्या आजूबाजूला दिसतात. तर दुसरीकडे सी.एच.बी. प्राध्यापक हा शिक्का पडलेली हजारो माणसं स्वतःच सत्व हरवून बसतात. मानसिक, कौटुंबिक, आर्थिक जीवघेण्या संघर्षात हे तरुण जगत राहतात. या तरुणांच्या वाट्याला अतिशय मानहानीकारक जीवन भोग येतो. या भोगातील विविध पदर दयन कादंबरीतून मांडले जातात. या कादंबरीतील संवेदना ,सूक्ष्मता वाचकाला अस्वस्थ करणारी आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील वास्तवाचे विदारक रूप कोणत्या दिशेने जात आहे. याविषयीचे अस्वस्थ करणारे कथन दयनमधून येते.

या कादंबरीचा संपूर्ण आशय व्यक्त करण्यासाठी लेखकाने कादंबरीच्या सुरुवातीला एक कविता दिली आहे. ही कविता कादंबरीचा आशय नेमकेपणाने मुखर करणारी आहे.एका सी.एच.बी. करणाऱ्या प्राध्यापकाची जीवनकथा मांडताना लेखक लिहितो ,

" एक बायको दोन पोरं , 

पोसण्याचा पडतो घोर ,

 बाप आणेल काहीतरी 

आसुसलेली दोन पाखरं

 बाप दिसतात फोडतात हंबर 

अलवार होतो काळजाचा झुंबर "

सी.एच.बी. प्राध्यापकाचे कौटुंबिक वास्तव या रचनेतून येते. संसार नीट उभा करता येत नाही. प्राध्यापकाची झूल पांघरलेला नायक  नेहमी उघडा पडतो. ही झूल त्याची मानसिक कोंडी करते. पूर्ण वेळ नोकरी मिळत नाही . परंतु समाज प्राध्यापकाच्या झूलीसकट नायकाकडे पाहतो. त्याच्याकडून उच्च नीती मूल्यांची ,राहणीमानाची अपेक्षा करतो. खोटी प्रतिष्ठा मिरवणारा नायक कुटुंबाची दोन वेळेची भूक भागू शकत नाही. यातून पती-पत्नी मधील संघर्ष टोकाला पोहोचतो. नायकाचा काहीच दोष नसताना कुटुंबाचे विघटन होते. शौकात्मक जगणं वाट्याला आलेला नायक भ्रमिष्ट होतो. आणि येथेचं कादंबरीचा शेवट होतो.

आपल्या महापुरुषांनी शिक्षण घेण्याचा आग्रह धरला आहे.' शिका संघटित व्हा ! आणि संघर्ष करा ! ' या शिकवणीपुढे प्रश्नचिन्ह उभी करणारी ही कादंबरी आहे. लेखक लिहितो ,

"मायबाप हो... !

तुम्हीच म्हणतात, 

शिका 

शिकलो ,

 विद्वानांच्या पंगतीत बसा 

बसलो .....

 सांगा ....!

 बोला ,

 मी कुठे चुकलो ....? "

पारंपारिक शिक्षण घेतले. या शिकणातून कुठलेही कौशल्य अवगत झाले नाही. पुस्तकी विद्वान होण्याची प्रक्रिया पार पडली. कुठलाही शिक्षणाचा गंध नसणारी कौटुंबिक पार्श्वभूमी नायकाला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यातून वाट्याला आलेली जीवघेणी होरपळ दयन मधून मांडली जाते.

'कापूसवाडी ' या बंजारा समाजाच्या तांड्यातून गणेश जाधव या नायकाचा जीवन प्रवास सुरू होतो. बंजारा समाज हा एक उपेक्षित समाज आहे.गावकुसाबाहेरील दलित समाजापेक्षा डोंगरदऱ्यातील बंजारा समाजाचे प्रश्न भिन्न आहेत. अतिशय तुटपुंजा साधनांवर गुजराण करणारा हा समाज आहे. या समाजाचे मराठी साहित्यातील चित्रण अतिशय अल्प आहे. दयन या कादंबरीतून 'कापूसवाडी' या बंजारा समाजाच्या तांड्याचे अतिशय सूक्ष्म चित्रण येते. या तांड्यातील माणसांचे स्वभाव, परंपरा,संस्कृती,बोलीभाषा,पेहराव, जगण्याच्या धारणा या कादंबरीतून व्यवस्थितपणे चित्रित होतात. डोंगरदऱ्यातील तांड्यावरून उच्च शिक्षणाचा प्रवाहात येणे हीच एक मोठी बाब आहे . गणेश हा नायक उच्च शिक्षण क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करतो. परंतु त्याच्या वाट्याला अपयश येते.

 इसवी सन १९९० नंतर महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांनी स्वतःच्या राजकारणाचे बस्तान बसवण्यासाठी पारंपारिक पदव्या देणारी बी.ए. बी. कॉम.,बी.एस्सी.चे शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू केली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार झाला. कापूसवाडी सारख्या तांड्यातून पोरं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली. शासनाला आज ही महाविद्यालय,शिक्षक,विद्यार्थी यांचं ओझं वाटू लागला आहे. आर्थिकदृष्ट्या शासनाला ही व्यवस्था झेपत नाही. अशी बोंब मारली जात आहे. यातून अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद आहे. कधी खूपच दबाव आला तर 25% किंवा 40% पदभरती केली जाते. या भरती व्यवस्थेतही प्रचंड भ्रष्टाचार व वशीलेबाजी आहे. जर शासन पगार देत असेल तर ही पदे शासनाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्यास अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. परंतु शासन चालवणारे  हेच संस्थाचालक असल्यामुळे ते बोटचेपी भूमिका घेतात. गुणवत्ता,दर्जा यांचे हनन होत. एक पोटभरून व्यवस्था जन्माला येते. या व्यवस्थेचा पंचनामा दयनमधून मांडला जातो.

मुळात पारंपारिक शिक्षणाचा भाग असणाऱ्या या महाविद्यालयांची समाजाला खरंच किती गरज आहे? कौशल्यहीन,कारकूनी शिक्षण व्यवस्थेतून गणेश सारख्या अनेकांचे केवळ शोषण होत आहे. या व्यवस्थेत अमुलाग्र बदलाची गरज आहे. परंतु शासन,धोरणकर्ते,अभ्यासक या प्रश्नांकडे डोळेझाक करतात. यातून दयन पुन्हा पुन्हा घडत राहते. हे थांबलं पाहिजे. असं कुणालाचं वाटत नाही. परंतु या व्यवस्थेतून भरडल्या गेलेल्या लाखो तरुणांचा विचार कोण करणार? या आजच्या समकालीन शैक्षणिक वास्तवावर दयन अचूक बोट ठेवते. अस्वस्थ करते. झोप उडवते. या कादंबरीतून कलात्मक पद्धतीने प्रश्न मांडले जातात. ते अतिशय बोचरे संवेदनशील असे आहेत.

 महात्मा फुले 'शेतकऱ्यांचा आसूड ' या ग्रंथात लिहितात,"बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कुणाच्या जीवावर ओढावी?व्यापारधंदा करावा, तर मला लिहिता वाचतां मुळीचं येत नाही. आपला देश त्याग करून जर परदेशात जावे,तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही. " अगदी अशीचं अवस्था आजच्या तरुण शिक्षितांची झाली आहे. दयन कादंबरीतून या हातबल तरुणाचे अतिशय तरल संवेदनशील चित्र उभे राहिते. 

उच्च शिक्षण क्षेत्रात अनुदानित, विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित अशी जात व्यवस्था उभी. पूर्णवेळ फुल पगारी ,पूर्णवेळ शून्य पगारी , सी.एच.बी., विनाअनुदानित सी.एच.बी., अर्धवेळ परंतु काम पूर्ण वेळ अशी नवी वर्ग व्यवस्था,जात व्यवस्था उच्च शिक्षण संस्थांमध्ये जन्माला आली आहे. एकीकडे सहा अंकी पगार घेणारा श्रीमंत प्राध्यापक तर दुसरीकडे तासाचे 120 रुपये आठवड्याला केवळ नऊ तास घेऊन महिना 5000 रुपये कमावणारा गरीब प्राध्यापक यातील दरी प्रचंड वाढली आहे. समान काम असमान वेतन हे धोरण सगळीकडे दिसते.

प्राचार्य,श्रीमंत प्राध्यापक,अनुदानित शिक्षकेत्तर कर्मचारी ,संस्थाचालक या सी. एच. बी. प्राध्यापकांकडे अतिशय तुच्छतेने पाहतात. किंबहुना आरक्षणाचा लाभ घेऊन आलेला पेटी बुजुर्वा वर्ग ही या वर्गाकडे तुच्छतेने भावनेने पाहतो. या सगळ्यातून सी.एच.बी. वाल्या प्राध्यापकांची मानसिक घुसमट होते. विद्यार्थी शिक्षक हे अतिशय पवित्र नातं आहे. परंतु सी.एच.बी. वाल्या प्राध्यापकांकडे विद्यार्थी दुय्यमत्त्वच्या भावनेने पाहतात. एकीकडे श्रीमंत प्राध्यापक वर्गाने समाजात श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले आहे. त्यामुळे समाज प्राध्यापक वर्गाकडे चंगळवादी ,कमी काम जास्त दाम घेणारे ,फुकटे, मजा मारणारे , दारूकुट्टा वर्ग म्हणून पहात आहे. परंतु यात भरडला जातो तो सी.एच.बी. वाला प्राध्यापक वर्ग. प्राध्यापकाची झुल या सी.एच.बी. वाल्यांना समाजापासून तोडते. हा वर्ग मुक्यांचा मार खात ससेहोलपट जीवन जगत राहतो. या मानसिक कोंडमाऱ्याची  व्यथा दयनमधून सक्षमपणे चित्रित होते.

 पूर्णवेळ फुल पगारी असलेला प्राध्यापक वर्ग सी.एच.बी. प्राध्यापकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. आपल्याला व्यवस्थेचे सर्व लाभ मिळतात. एकदा आपलं पूर्ण वेळ पगारी पदावर काम झालं की, नव्या येणाऱ्या आपल्याच बांधवांवर काय वेळ आहे? याकडे सहजतेने पाहणारा स्वार्थी, अप्पलपोट्या उच्चशिक्षित प्राध्यापकांचे वर्तन चीड आणणारे आहे. किंबहुना व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे वैचारिक,नैतिक वजन असणारा हा वर्ग स्व केंद्रीत संकुचित झाला आहे. याचे चित्रण दयन कादंबरीतून येते. प्राध्यापक डॉक्टर गणेश जाधव या नायका सोबत काम करणारे फुल टाइम पगारी प्राध्यापक अतिशय बेजबाबदारपणे , असंवेदनशीलपणे वागतात. काही तुच्छतेने वागतात. काही प्राध्यापक केवळ कोरडी सहानुभूती दाखवतात. काही प्राध्यापक पोकळ बड्या बड्या वैचारिक सिद्धांताचा चोथा चघळत राहतात. यातून आजचं समकालीन उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक वर्गाचं येणारं चित्र हे अस्वस्थ करणार आहे.

 जे सी.एच.बी. वाले प्राध्यापक आहेत तेही आपल्या प्रश्नांकडे फार चिकित्सने पाहत नाहीत. केवळ वरच्यावर सोशल  मीडियात हा वर्गही गुंतून पडला आहे. व्हाट्सअप विद्यापीठातून वांझ चर्चा करणाऱ्या प्राध्यापकांचे चित्र दयांमध्ये सूक्ष्मपणे येते. या प्राध्यापकांच्या मानसिकतेचे,वैचारिकतेचे चित्रण लेखक युवराज पवार यांनी अतिशय उत्तमपणे केलेले आहे.

 बंजारा समाजाच्या बोली भाषेचे उपयोजन हे या कादंबरीचे वैशिष्ट्य ठरते. अनेक ठिकाणी संवादामध्ये बंजारा बोली येते. विशेषतः जामनेर परिसरातील तावडी बोलीतून येणारे संवाद ,शब्द म्हणी ,वाक्प्रचार कादंबरीला भाषिक दृष्ट्या समृद्ध करतात. बंजारा समाजातील कुटुंब व्यवस्था ,गावगाडा या कादंबरीतून ताकदीने येतो. तसेच या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अहिराणी बोलीभाषा काही संवादात अतिशय चपखलपणे वापरली आहे. या भाषेच्या वापरामुळे काही पात्र जिवंत झालेल्या आपल्याला दिसतात. या वेगवेगळ्या भाषेतील मिश्र वापरातून कादंबरीच्या भाषिक सौंदर्यामध्ये भर पडलेली दिसते.त्याचबरोबर कादंबरीमध्ये वर्तमानपत्रातील बातम्यांचे उपयोजन उत्तमपणे केले आहे. त्या बातम्यांची भाषा आणि त्यातून उभा राहणारे वास्तव हेही एक  वेगळे परिमाण या कादंबरीला प्राप्त करून देते.शासनाचे विविध जीआर यातून येणारी भाषा ,शब्दछल कादंबरीला भाषिकदृष्ट्या वेगळेपण प्राप्त करून देतो.

बंजारा समाजातील कुटुंब व्यवस्था , गावगाडा या कादंबरीतून ठळकपणे येतो. बंजारा समाजाच्या जातीय धारणांचे प्रभावी चित्रण कादंबरीत येते. आपला जावई गणेश याने वडार लोकांची खोली भाड्याने घेणे त्याच्या सासर्‍याला आवडत नाही. बंजारा जातीचा अभिमान असणाऱ्या सासऱ्याला गणेशचे बटाटे विकणे हा व्यावसाय कमी प्रतीचा वाटतो. कादंबरीचा नायक गणेश याला शिक्षण घेत असताना आपल्या जातीचे भान येते. ' हे लेवा,गुजरायचे पोरं पयशाले काय समजता? हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहतो. यातून समाजातील जातीय दृष्टिकोन समजतो.

विभाग प्रमुख असणारे प्राध्यापक शिंदे सर गणेश जाधव याने मुलींच्या इरेजर ,पेन्सिल ,शॉपनर ,स्टीलची स्केल स्वतःच्या लहान मुलांसाठी घेतो. तेव्हा प्राध्यापक शिंदे म्हणतात , "मुलींनो ते चोर ,गुन्हेगार जमातीतले आहेत. त्या जातीचाच वारसा ते पुढे नेत आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हा प्राध्यापक शिंदे यांचा जातीय दृष्टिकोन अस्वस्थ करणार आहे. गणेश या नायकाचे रेशन दुकानातून भंगी समाजातील स्त्री कडून धान्य स्वीकारणे. हे त्याच्या प्रगल्भपणाचे लक्षण कादंबरीतून दिसून येते. जातीपेक्षा संवेदन जपणारी,वास्तव स्वीकारणारी माणसंही या कादंबरीतून नकळतपणे चित्रित होतात.

 गणेशचा सासरा त्याच्यावर नसाब बसवतो. त्यावेळी त्याची सासू जनसीबाई  म्हणते, " जेंच्या घरचं आपल्याले चालत नि, आश्या वडर भंगीची खोयली या भाड्यानं  भाड्यानं घेल हाये. तेच्यात मह्या पोर्गीला राह्यानं पळू राहलं. मह्या पोर्गीला बाटवलं येनं.  जात पंचायतचे नसाब. हामचं काईच नि  चुकेल. सगळा गुन्हा येचा हाये. भाड्यानं खोयली घेतली नस्ती तं ,  कश्याले मार पळली अस्ती. सांगा. तुमी आता न्याव करा हामचा? "

वडार आणि बंजारा दोन्ही जाती भटच्या विमुक्त मध्ये येतात. परंतु बंजारा समाज वडार आणि भंगी समाजाला कमी लेखतो. या जातीय व्यवस्थेच्या रूपाकडेही ही कादंबरी लक्ष वेधते.  दयन या कादंबरीतील भावजीवन अतिशय ताकदीने उभे राहते. विशेषतः कादंबरीचा नायक गणेश ,त्याची पत्नी अंजू आणि त्यांची मुलं टिल्लू आणि गोलू यांची मनस्थिती ,त्यांच्या भावना अतिशय परिणामकारकपणे या कादंबरीतून चित्रित झाल्या आहेत. किंबहुना हे या कादंबरीचे यश आहे. या कादंबरीच्या यशाविषयी प्रसिद्ध समीक्षा प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे लिहितात , "कादंबरीकराचे निवेदन ,नायक गणेश जाधवचे कथन आणि त्याची बायको अंजूचे स्वगत या तिन्ही गोष्टी बेमालूनपणे एकमेकांत मिसळलेल्या आहेत. हेही या कादंबरीचे मोठे वैशिष्ट्य आहे. गणेशची मुले रडतात, रुसतात ,हट्ट करतात,आनंदी होतात किंवा कधी कधी बापाची गरीबी ओळखून समजतदारपणे वागतात तेव्हा जी भाषा वापरतात ती खास त्यांची आहे. त्या भाषेला स्थळकाळाचे संदर्भ आहेत. तसेच पराकोटीच्या आर्थिक दुरावस्थेत सापडलेल्या नायकाच्या कुटुंबाचे सामाजिक संदर्भही आहेत. प्रसंगाचे निवेदन आणि संवाद यांच्या तळाशी नायकाच्या अगतिकतेचे अस्तर सतत कायम राहते. अनुभवाची तीव्रता आणि भाषिक जाणीव यांचा प्रत्यय असा एकजिनसी होतो,हे या कादंबरीचे यश आहे. "

वरील विश्लेषणातून या कादंबरीचे स्वरूप स्पष्ट होते. कादंबरीचे विविध वैशिष्ट्य या विश्लेषणातून आपल्या लक्षात येतात. लेखकाने कुटुंबाचे भावविश्व,लहान मुलांचे भावविश्व  खूप सूक्ष्मतेने,चित्रमय पद्धतीने चित्रित केले आहे. कादंबरीचे कथानक आपल्या कुटुंबात,शेजारी जवळ कुठेतरी घडत आहे असा प्रत्यय येतो. ते सगळं संवेदनशीलपणे वाचन करणार्‍याला अस्वस्थ करते. हे या कादंबरीचे प्रधान वैशिष्ट्य सांगता येईल. कादंबरीचा शेवट अतिशय कलात्मक विद्रोही स्वरूपाचा आहे. भ्रमिष्ट झालेला नायक गणेश व्यवस्थेवर वार करण्यासाठी  कुऱ्हाड हाती घेतो. ही व्यवस्था आपण बदलू शकत नाही. या व्यवस्थेने आपला बळी घेतला. या व्यवस्थेच्या शोषणाचे सर्व स्तर लक्षात आलेला नायक गणेश अगतिकतेच्या अस्वस्थतेत भ्रमिष्ट होतो. हा या कादंबरीचा शेवट अतिशय कलात्मक स्वरूपाचा आहे. बदलत्या मूल्यवस्थेत अपयशी ठरलेला नायक सगळेच गमावून बसतो. या कादंबरीतून  वाचकाला विषण्य संवेद्य अनुभवाची प्रचीती येते. 

कादंबरीच्या या सकारात्मक बाजू असल्या तरी या कादंबरीला काही मर्यादाही आहेत.आपल्याला त्या नोंदवता येतात. या कादंबरीतील पात्र संख्या अतिशय अल्प आहे. कादंबरीत एकच एक कथानक मांडले जाते. कादंबरी वाङ्मय प्रकारात मुख्य कथानकाला जोडून विविध उपकथनके येत असतात. परंतु दयन या कादंबरीतून उपकथनकेच येत नाहीत. त्यामुळे पात्र संख्या कादंबरीत कमी राहते. नायक स्वतःच्या दुःखात इतका बुडून गेला आहे की,समकालातील विविध घटकांचे जगणे , त्यांचे प्रश्न ,समस्या यावर तो फारसा विचार करत नाही. या कादंबरीतून समकालातील व्यापक संदर्भ , जीवनस्तरसह उभा राहत नाही. कादंबरीतून संस्थाचालक आणि प्राध्यापक यांच्या संबंधाचे चित्रण नीटपणे येत नाही. त्रोटक स्वरूपात हे चित्रण येते. भ्रष्टाचार ,पैशांची देवघेवचे चित्रण येत नाही. महाविद्यालय परिसराचे वास्तव चित्रण कादंबरीतून उभे राहत नाही. सर्व कथानक गणेशच्या मनोभूमीके भोवती पिंगा घालत राहते. कादंबरीतून जातव्यवस्थची विविध रूप सकसपणे उभी राहात नाहीत. अल्प प्रमाणात जातिव्यवस्थेचे चित्रण येते. गणेशचा एम.ए. चा शिक्षणप्रवास , सेंडापच्या दिवसाचा तपशीलवार वर्णन कादंबरीच्या मुख्य कथानकाचा भाग होत नाही. उगाच ठिगळ लावल्यासारखा हा भाग वाटतो. वरील सर्व मर्यादा मान्य करूनही एका ज्वलंत प्रश्नाला ,समस्येला उजागर करणारी ही कादंबरी आहे. आजचे उच्चशिक्षण व्यवस्थेतील वास्तव फार भयानक आहे. याची प्रचिती देणारी ही कादंबरी आहे. लेखक युवराज मेघराज पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!

 धन्यवाद !!!

 डॉ.जी.आर.ढेंबरे 

मराठी विभागप्रमुख 

श्री.व्ही.एस.नाईक कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,रावेर तालुका- रावेर,जिल्हा- जळगाव पिनकोड - 425508

 मोबाईल नंबर -94210812 70 ई-मेल-dhembregr@gmail.com

----------------------------------------------

बुधवार, १२ जुलै, २०२३

भुरा -

 भुरा एक आत्मशोधाचा प्रवास ॥



 ऑगस्ट 2021 मध्ये लोक वाङ्मय गृहाने प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे भुरा हे आत्मकथन प्रकाशित केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली यांच्या फ्रेंच भाषा विभागात प्राध्यापक शरद बाविस्कर प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिकावं हे अनेकांचे स्वप्न असते. प्राध्यापक शरद बाविस्कर या विद्यापीठात शिकून त्याच विद्यापीठात अध्यापन करत आहेत. त्यांचा हा प्रवास धुळे जिल्ह्यातील रावेर या गावातून सुरू होतो. रावेर ते नवी दिल्ली या प्रवासात भुराकडून शरद कडे झालेला हा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे.  भुराच्या वाटेला अतिशय जीवघेणा  दुखरा  भोगवट आला आहे. हा भोगवटा अतिशय संवेदनशीलपणे या आत्मकथनातून उलगडत जातो. भुरा ते शरद हा प्रवास विविध अंगी स्वरूपाचा आहे. केवळ भौतिक बदल म्हणून या प्रवासाकडे पाहता येत नाही. हा प्रवास मानसिक , तात्त्वीक , वैचारिक परिवर्तनाचा प्रवास आहे. दैववादी , नियतिशरण भुराकडून पुरोगामी विवेकवादी विज्ञानवादी शरदकडे झालेला हा प्रवास अतिशय सुंदर असा आहे. इसवी सन 1980 नंतरच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे हे आत्मकथन आहे. या आत्मकथनातून शेतकरी ,मजूर ,उपेक्षित वर्गातील  एका हजारातून स्वतःला सिद्ध करणार्‍या भुराची ही कथा मनोवेधक अशी आहे. त्याची सिद्ध होण्याची ही व्यथा आहे. सफल परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रवास भुरातून मांडला जातो. या आत्मकथनातून जगभरातील तत्त्ववेत्यांच्या तत्त्वज्ञानाचा सार  मांडला जातो. भुराच्या जगण्यातले वास्तव मांडत असताना जगण्याची विविध पैलू तत्त्वज्ञानातून मांडले जातात.हे आत्मकथन अंतर्मुख करणारे आहे. या आत्मकथनातून केवळ भावनिक आव्हान येत नाही तर स्वतः ला सिद्ध करण्याची सर्जनशील निर्मीतीप्रक्रिया अलगदपणे उभी राहते.


या आत्मकथेतून  केवळ सहानुभूतीचा फार्स उभा राहत नाही. ही आत्मकथा लढण्याचे प्रेरक तत्व घेऊन उभी राहाते. ही आत्मकथा भान हारपलेल्या माणसासाठी प्रेरणादायी ठरते. त्याला जगण्यासाठी , लढण्यासाठी सिद्ध करते. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य होय. भुरा या आत्मकथनातील हे अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे. बहुजन समाजाला खरं स्वातंत्र्य शिक्षणातून मिळू शकते. शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम आहे. या मांडणीला भुरा या आत्मकथनातून मान्यता मिळते. दहावी इंग्रजी विषयात नापास झालेला भुरा त्याच विषयात विशेष प्राविण्य मिळवतो. जगाचा प्रवास करून येतो. ही झेप वाचकाला थक्क करणारी आहे. 12 ते 15 तास अभ्यास करून एखादी भाषा ,विषय आत्मसात करणं यातून भुराची जिद्द पराकोटीचे असल्याचे दिसून येते. एखादी भाषा आत्मसात कशी करावी ? भाषा शिकणे म्हणजे काय ? या प्रक्रियेतील भुराला सापडलेले सत्व या आत्मकथनाचा गाभा आहे. केवळ भाषा हे शोषणाचे साधन ठरू शकत नाही. कोणतीही भाषा आत्मसाथ करत येते.फक्त त्यासाठी तुमच्याकडे असावी लागते जिद्द. ही जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. या यशाची प्रचिती भुरातून होते. 

 व्यसनाधीन असलेले वडील ,मोठा भाऊही त्याच वाटेने निघालेला ,गरिबी , दारिद्र्य , समाजातील उपेक्षित स्थान . यातून भुराच्या वाट्याला प्रचंड अवहेलना येते. ही अवहेलना प्रेरणा मानून भुरा स्वतःला घडवत जातो. किंबहुना जास्त त्वेशाने या परिस्थितीवर हल्ला चढवतो. स्वतःला सिद्ध करतो.  हे आत्मकथन रस्ता भटकलेल्या , दिशाहीन ,उपेक्षित तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरक  ठरू शकते. अति भव्यता ,उच्चतेचा आग्रह माणसाला निर्मितीचा पराकोटीचाआनंद देत असतो. हा आनंद , ही स्वतःची घडण प्रक्रिया , निर्मिती प्रक्रिया या आत्मकथनातून उभी राहते. जीवनातील एक महत्त्वाचे तत्व भुराला लहानपणी आई सांगते. 'झिजिन मरणं , पण थिजी न नही मरणं ' या तत्त्वातून भुरा स्वतःला घडवत राहतो. या आत्मकथनातील काही वाक्य अतिशय तात्विक आहेत. मानवी जीवनाबद्दलचे ,नातेसंबंधबद्दलचे व्यवस्थेबद्दलचे  अतिशय महत्त्वपूर्ण विधाने या आत्मकथेतून येतात. याला कारण  लेखकाचा चिंतनाचा विषय तत्त्वज्ञान हे आहे.ही विधाने , ही मांडणी या आत्मकथनातून प्रभावीपणे येते . वाचकाला  विचार प्रवृत्त करते. भुराकडे असलेल्या अंतर्मुख वृत्तीमुळे तो स्वच्छ स्वतःकडे ,समाजाकडे , जीवनाकडे ,व्यवस्थेकडे तटस्थने पाहतो. सम्यक आकलनातून भुरा शाश्वत सत्याकडे जातो.


 कळपापासून वेगळं राहण्याची किंमत भुराला जास्त मोजावी लागते. भुरा बालपणात ती किंमत जास्त देतो.  ती किंमत मोजण्याच्या प्रक्रियेतच भुराला जगण्याचे प्रेरक तत्व सापडतात.


 1990 च्या दशकात  ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधने फार कमी होती. त्यातून प्रत्यक्ष माणसांच्या जगण्यात , वागण्यात ,शोषणात मनोरंजन शोधण्याची मानसिकता खेड्यात होती. या मानसिकतेतून  कुणाची आपण अवहेलना करतो आहोत याचे भानच लोकांकडे नव्हते. यातून कोणाचे तरी भावविश्व उध्वस्त होत आहे. ही जाणिवचं लोकांना नव्हाती.  या सगळ्या प्रक्रियेतून लेखक शरद बाविस्कर यांना  भुरा हे नाव मिळते. असे शोकात्म  जगणं वाट्याला आलेला भुरा त्याची फार मोठी किंमत देतो. स्वतःचा शरदचा प्रवास निश्चित करतो. व्यवस्थेत शिरल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी तडजोड करणारे हजारो भेटतात. भुरा व्यवस्था प्रवेशानंतरही आपली पार्श्वभूमी विसरत नाही. तो वैचारिक भूमिकेवर ठाम राहातो. प्रसंगी त्याची किंमत मोजण्यासाठी भुरा सज्ज होतो.


 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संघर्षात आपल्या भूमिकेवर ठाम राहणारा भुरा अतिशय मोठा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले ,छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा घेऊन जीवनातील मार्गक्रमण करणारा भुरा वाचकाला वैचारिक ऊर्जा व भान देतो.  भुरा या आत्मकथनात एक गोष्ट प्रकाशाने जाणवते आणि ती म्हणजे नायकाला सापडलेले वैचारिक सूत्र ही होय. वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडून सम्यक वैचारिक दृष्टिकोन घेऊन भुरा पुढील वाटचाल करतो. वैचारिक स्पष्टतेतून आलेले सम्यक भान या आत्मकथनातून अभिव्यक्त होते.


 दहावी नापास झाल्यावर भुरांमध्ये विद्रोह जन्म घेतो. हा विद्रोह सृजनशील निर्मितीचा आहे. दैववाद , नियतीशरणता नाकारून भुरा विवेकवादी होतो. या आत्मकथनातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडण्याचा प्रवास ही अधोरेखित होतो. स्वाध्याय , आसाराम ,रामदासी बैठका या प्रकारांमधून समाजाला मानसिक गुलामगिरीत ढकलले जाते. या वास्तवावर लेखक शरद बाविस्कर यांनी प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भागातील पोरं-पोरी मागे पडत असतील तर त्यासाठी बऱ्याच दृष्टीने आपली विषमतावादी व्यवस्था जबाबदार आहे. ग्रामीण भागातील तकलादू  शिक्षण तर 99% विद्यार्थ्यांना निकामी करतं असं वाटतं. हे लेखकाचे चिंतन शिक्षण व्यवस्थेच्या समग्र प्रक्रियेवर भाष्य करणारे आहे. आजच्या समकालीन वास्तवावरती , शिक्षण व्यवस्थेतील एकूण व्यवस्थेवरती हे चिंतन प्रहार करते. असे आपल्याला म्हणता येईल. शिक्षणाचे लोकशाहीकरण केले पाहिजे. असे लेखकाला मनापासून वाटते. आज वास्तवात मात्र शिक्षणाची विषमतावादी  व्यवस्था स्थिर रूप धारण करत आहे. यातून बहुजन समाजातून एखादाही भुरा पुढे येईल की नाही ? याबद्दल शंका वाटते. जीवनातील निरार्थकता टाळून एक निश्चित दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी एक संकल्प जवळ असावा लागतो. भुराने निरर्थकतेवरती मात केली आहे. भुराचा संकल्प अतिशय संघर्षमय असा आहे. भुरा आत्मकथनातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक ,सामाजिक ,आर्थिक , राजकीय ,शैक्षणिक ,धार्मिक ,जातीय व्यवस्थेचे आकलन अतिशय उच्च कोटीचे आहे. या आकलनातील चिंतन चिरस्थायी स्वरूपाचे आहे. लेखक म्हणतो , 'आपल्या समाजात आढळणारी वाईट गोष्ट अशी की , नियोजित पद्धतीने हस्तक्षेप करून सांस्कृतिक ठेकेदार त्यांच्या बैठकांच्या माध्यमातून छुपा पद्धतीने दैववादाला आणि आपआप वादाला सतत खत पाणी घालत असतात. त्यामुळे बहुसंख्या समाज बंदिस्त आणि अपरिवर्तनीय जीवनाविषयी चीड न येता निमूटपणे त्याचा स्वीकार करत असतो. अशी निरर्थक कर्मकांडे मला मुक्तीच्या मार्गातील अडथळे वाटतात.' हे लेखकाचे आकलन अतिशय सत्यनिष्ठ स्वरूपाचे आहे. संपूर्ण भारतभर सांस्कृतिक ठेकेदार मानसिक गुलामगिरी उत्साहात पेरत आहेत. राजकीय सत्तेच्या आश्रयामुळे या ठेकदारांचे बळ प्रचंड वाढले आहे. विवेकवादी ,विज्ञानवादी दृष्टिकोनाची , सम्यकवादी विचारांची पिछेहाट मोठ्या प्रमाणात होत आहे. या वास्तवावर हे आत्मकथन अचूकपणे भाष्य करते.


समकालीन राजकीय , सामाजिक , आर्थिक ,धार्मिक सांस्कृतिक पर्यावरणात समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याची ताकद असलेले हे आत्मकथन आहे. याआत्मकथनातून समकालीन अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी अचूकपणे मिळतात. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. भुरा हे एक अतिशय वैचारिक अशी आत्मकथन आहे. प्रा. शरद बाविस्कर यांच्या लेखन कार्याला खूप खूप शुभेच्छा !!!


धन्यवाद !


 डॉक्टर गणपत रामदास ढेंबरे , 

रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव पिनकोड 425508

 मोबाईल नंबर 9421081270 ई-मेल - dhembregr@gmail.com

मंगळवार, ११ जुलै, २०२३

भोत - कविता

 ॥      भोत ॥


असं का होत असेल

 आम्ही तिथं पोहोचले की, 

पंगत उठत असेल 

आम्ही महाप्रयासाने 

त्यांची पायरी गाठली की,

 ते आम्हाला प्यादेमात देतात 

बाकी काही नाही 

चोख्या तुझी पायरी तिथंचं 

जोहार म्हणं  नाही तर 

खुशाल रंडका चाळा 

नियती, कर्माचा 

पापपुण्याचा फेरा 

पुन्हा उरावर घात

करण्या रिंगण खेळ 

मांडणारे, मोडणारे न्यायधीश 

पुन्हा आमचे नवरे 

खरं खोटं 

गेला बाजार 

आमची ठासली, 

पुन्हा आमची लढाई 

आमच्याशी 

तुक्या वाणी फुकाचा

फुले तुझा शिक्षणाचा मळा

 सुकून गेला 

 तो पुन्हा फुलवण्यासाठी 

 भिमा तुझा 

शिकण्याचा सल्ला  पडला महाग

आम्ही शिकलो, 

ते म्हणाले हे out Dated 

पुन्हा लायनीत लागा 

साला, होतो तिथंच आहे 

भोग म्हणावा का जागतिकीकरणाचा तिढा


पुन्हा


तुमचा कर्मसिद्धांत, वांझोट्या घराला व्यवस्थेच्या रूपाला, शाहू तू 

भोत म्हणावं का ?


भोत म्हणून माझी 

कैफियत

मांडण्यासाठी खाजगीकरण, भंडवलीकरणचा गुताडा सोडवण्यासाठी


पुन्हा


भोत भरण्याची विद्या


भोत शिवण्याची विद्या


भोताची व्यवस्था


उलगडत बसावं का?


पुन्हा रांडमुंड


माळावर


मी गात बसावं

माझं भोताचं गाणं 

आम्हाला आमची आपबीती 

सांगावी लागलं

नाही तर

 आम्हीचं ठरू भोत 

म्हणून

घाई घाईनं भोत भरतो 

व्यवस्थेच्या म्हैशीला पान्हा फुटतो 

पण


भोताच्या निर्जीव तोंडला फेस ना येतो


वाळूत मुता 

फेस ना पाणी


आमची दाद पुकार

 कंदीलाच्या उजेडात


पुन्हा भादवा पेटावा


भोत उरात घेऊन


वरात तुझ्या दारात


बसा परत भोत शिवतं


आम्ही ठरवलं


तुम्हाला फाट्यावर मरायचं 

पण तुमची ताकद, इगद खंडीभर

 तुम्ही बडवता अंडं आमची 

जुपता पुन्हा नांगराला 

ते चिटकती गुचीडा, सारखे 

जांघात नको तिथं 

आम्हाला घुसता येईला का ? 

गुचीड़ होऊन रक्त पिऊन चांगला जाडजुड रक्तबीज

वांझ भोताचा 

असण्याचा खेळ  

मला उलगडत नाही 

भोत व्यवस्थेचा भोग 

की 

आणखी काही !

खुशाल पेटव दिवटी 

लय गेले त्या वाटनं 

तू चाल 

भोत बोलतो, चालतो, हसतो 

त्याला ओळख

 मी तुझ्या गांडीजवळ

 मला ओळख

 मी भोत तो भोत

 शेवटी सगळे भोत 



डॉ. जी. आर. ढेंबरे , रावेर

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...