गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : एक शोध- डॉ. गणपतराव ढेंबरे , रावेर

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : एक शोध

प्रा. गणपतराव ढेंबरे


"हे जग, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. इ.स. १९५८ च्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात अण्णा भाऊंनी हे विधान केले. या विधानातून अण्णा भाऊंनी जगाच्या सक्रियतेची योग्य शब्दांत मीमांसा केली. आज जगभर भांडवलशाहीने उद्दामपणाचा कळस गाठला आहे. विशेषत: १९९० नंतर जग झपाट्याने भांडवलशाहीच्या पंजाखाली गेले आहे. भारतही या संक्रमणातून आज जात आहे. गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गांतील दरी प्रचंड वाढली आहे. भारतामध्ये एकाच वेळी दोन देश निर्माण झाले आहेत. संपत्तीचे ध्रुवीकरण भारताला अराजकतेकडे नेऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज अण्णा भाऊ साठेंच्या विचारांची, मूल्यांची खरी गरज आहे.


शाहीर, लेखक, विचारवंत, राजकीय विश्लेषक, मार्क्सवादी कार्यकर्ता, गुणी कलावंत, समाजसुधारक या विविधांगी भूमिकेतून अण्णा भाऊ साठेंचा विचार आपणाला करावा लागतो. कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेले अण्णा भाऊ साठे हे एक प्रख्यात लेखक झाले. अण्णा भाऊंनी जनसामान्यांच्या जीवनातून, अनुभवातून साहित्य निर्माण केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण, दलित जीवनाचे चित्रण करत असताना येथील सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखाबद्दल त्यांनी वाचा फोडली. सर्वसामान्य दलित, उपेक्षित, भटक्या लोकांचे जीवन साहित्याचा विषय होऊ शकते हे अण्णा भाऊंनी समाजाला दाखवून दिले. त्यांच्या कलाकृतीतून त्यांनी वर्गसंघर्ष मांडला. हा वर्गसंघर्ष मांडत असताना यातून गरीब, दीन दुबळ्यांच्या विजय पराजयापेक्षा त्यांचे जीवन साहित्यातून मांडणे अण्णा भाऊंना महत्त्वाचे वाटले. समकालीन समाजवास्तवाला अभिव्यक्त करणे हा अण्णा भाऊंच्या लेखनाचा स्थायिभाव होता. समकालीन समाजवास्तव अण्णा भाऊंना नेहमीच अस्वस्थ करीत आले. या अस्वस्थतेतून निर्माण झालेल्या साहित्याचा कस अद्वितीय होता.कल्पनेच्या भराऱ्यांपेक्षा वास्तवतेचे चित्रण अण्णा भाऊंना महत्त्वाचे वाटले. अण्णा भाऊ त्यांच्या भाषणात म्हणतात, ''दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्यांच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्यांचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्यांच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरविणाऱ्यांकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरूर आहे."

हे विचार अण्णा भाऊंच्या लेखन प्रेरणा स्पष्ट करतात. आपल्या बांधिलकीचे स्वरूप सांगतात. वाङ्मय हे जगाचा तिसरा डोळा आहे. ते काळाच्या पुढे असते. जगाचे स्वरूप पुढील कालखंडात कसे असेल याचे दिग्दर्शन साहित्य करत असते. अण्णा भाऊंचे साहित्य हे जगातील शाश्वत चिरस्थायी मूल्यांचा शोध घेते.


संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णा भाऊंचे योगदान : -

इ.स. १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी भाषावार प्रांतरचना करण्याचे त्या कालखंडातील राजकीय नेतृत्वाने ठरविले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र हे राज्य निर्माण झाले. मुंबई हे बेट गुजरात राज्यात ठेवावे, की महाराष्ट्रात याबद्दल वाद झाले. बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करण्यात आले व ते शेजारच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्राने केंद्र सरकारविरुद्ध अतिशय तीव्र आंदोलन केल्यामुळे राज्यांच्या पुनर्रचनेच्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हेच आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन या नावाने ओळखले जाते.


संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बेळगाव - कारवार सीमावाद आणि गोवामुक्ती आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या 'समिती'च्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर अण्णा भाऊंनी सामान्यजनांना आपल्याभोवतीच्या राजकीय घडामोडींबद्दल जागृत करण्याचे मोठे कार्य केले. अण्णा भाऊंनी आपली लेखणी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी झिजवली. महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्यावरील प्रशंसापर पद्यरचना अण्णा भाऊंनी केली. या रचनांमधून

आजही उत्स्फूर्तता, जल्लोष, सार्थ अभिमान, जाज्वल्यता दिसते. मराठी भाषा, संस्कृती, महाराष्ट्र मायभूमी यांविषयी अण्णा भाऊ साठेंच्या मनात प्रचंड प्रेम आणि ओढ होती. या प्रेम व ओढीमधून त्यांनी काही रचना केल्या. या रचनांमध्ये शाहिरांनो! महाराष्ट्र देश आमुचा, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळुनी काया, माझी मैना गावावर राहिली, जग बदल घालुनी घाव, साताऱ्याची तऱ्हा या रचनांचा समावेश होतो.


'उठला मराठी देश' ही रचना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. महाराष्ट्रावरील आपल्या इतर रचनांप्रमाणेच या रचनेतही शाहीर मुंबई महाराष्ट्राला मिळावी या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यावर प्राण देणाऱ्या हुतात्म्यांची स्तुती करतात.


'महाराष्ट्रावरून टाक ओवाळुनी काया' ही रचनासुद्धा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. आपल्या समृद्ध परंपरेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रवासीयांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी पूर्ण शक्तिनिशी लढावे आणि मृत्यूला तोंड द्यायची वेळ आली तरी पाय मागे घेऊ नये असे आवाहन शाहीर अण्णा भाऊंनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. व्यक्तिगत दुःखाची सांगड योग्य प्रकारे एखाद्या सामाजिक-राजकीय समस्येशी कशी घातली जाऊ शकते हे 'माझी मैना गावावर राहिली' या लावणीवरून दिसते. ही रचना सर्वांत लोकप्रिय आहे.


कलावंताने आपली सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्य केले पाहिजे. या विचाराचे अण्णा भाऊ साठे होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी डफ हातात घेऊन स्वतःच्या उत्स्फूर्त रचनांचे सादरीकरण अण्णा भाऊंनी केले. समाजाच्या हितासाठी अण्णा भाऊंमधील कलावंत रस्त्यावर उतरला. त्यांची प्रतिभा समाजकल्याणासाठी झिजली. यातच अण्णा भाऊंच्या कार्याचे वेगळेपण आहे.


मार्क्सवादी आणि अण्णा भाऊ साठे: -

अण्णा भाऊ साठे मुंबईच्या भायखळा उपनगरात राहत. त्याकाळी मुंबईत अनेक घडामोडी घडत होत्या. या घडामोडींचे परिणाम अण्णा भाऊ साठेंच्या व्यक्तिमत्त्वावर होत होते. मुंबईच्या कामावर वस्त्यांमधील संप, बंद व मोर्चा यांचे अण्णा भाऊंवर नकारात्मक तर काही सकारात्मक असे परिणाम झाले. या सर्वांचे चित्रण अण्णा भाऊंच्या साहित्य विश्वात होते. एखाद्या व्यक्तींकडून एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या

व्यक्तीची सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक पार्श्वभूमीचे त्या व्यक्तीवरील परिणाम यांच्यावर अवलंबून असतो.


कार्ल मार्क्सचे विचार अण्णा भाऊंना प्रभावी वाटले. प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी कार्ल मार्क्सच्या विचारांचे विश्लेषण अण्णा भाऊंनी केले. त्या काळात कम्युनिस्ट पार्टीच्या सभा आयोजित करणे, प्रचारपत्रके वाटणे, भिंतीवर घोषणा लिहिणे, आणि मोर्चासाठी घोषणाफलक रंगविणे, पोस्टर्स रंगविणे, यांसारखी कामे अण्णा भाऊ करीत होते. या सर्व चळवळीतून अण्णा भाऊंचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडत गेले.


अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्सवादी विचाराचे होते. त्यांनी आपल्या कथेतून दलित माणसांचे सामाजिक मनच व्यक्त केले आहे. समाजव्यवस्थेने तुडविलेल्या उपेक्षित माणसांबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा, प्रेम व तेवढीच सहानुभूती होती. याविषयी अण्णा भाऊ साठे लिहितात, "प्रतिभेला वास्तवाची गरज असते, कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते. अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागत नाही. ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. ''  अशा जीवनवास्तवाला घासून स्पर्श करणारी अण्णा भाऊंची लेखणी या उपेक्षित जगातील माणसांचे चित्रण करते. या माणसांचे प्रश्न सोडविले नाहीत, तर ते लुटारू ,चोर बनू शकतात. असामाजिक कृत्याचा धनी तो होतो. हेच अण्णा भाऊंना सांगायचे आहे. या माणसांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कोणाची? हा गंभीर प्रश्न अण्णा भाऊंचे साहित्य विचारते.


अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याविषयी प्रा. रा. ग. जाधव लिहितात, “अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे साम्यवादाने झपाटलेली एक जळती चूड होती. वाङ्मय म्हणजे त्या चुडीतून उडालेल्या काही ठिणग्या, काही पेटविणाऱ्या काही डागणाऱ्या, काही झोंबणाऱ्या, काही झोंबता झोंबता हसवणाऱ्या आणि त्यामुळेच अण्णा भाऊ साठे यांना कलावंत होता आले. अण्णा भाऊंना मार्क्सवादाचा हा टॉर्च सापडला नसता, तर त्यांच्यातील कलावंत एवढा मोठा झाला नसता." यातून आपणाला असे म्हणता येईल की, अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्सवादी होते. त्यांच्या साहित्य लेखनाच्या प्रेरणा प्रा. रा. ग. जाधवांनी स्पष्ट केल्या आहेत. अण्णा भाऊंच्या लेखनाला मार्क्सवादामुळे एक वैचारिक अधिष्ठान मिळाले.


अण्णा भाऊंच्या लेखनाचा विचार करताना डॉ. बजरंग कोरडे म्हणतात, "अण्णा भाऊंच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे ते मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान इतर कोणत्याही अस्सल मार्क्सवादी लेखकाप्रमाणे अण्णा भाऊ कला हे  समानता प्रस्थापित करणे आणि पिळवणूक व अन्याय यांचा अंत करणे ही उद्दिष्टे साधणारे सामाजिक बदलाचे एक साधन आहे असे मानीत."


 कलेबद्दलच्या वरील विचारांमुळे अण्णा भाऊंनी समकालीन  समीक्षकांच्या मतांचा विचार केला नाही. सामान्य माणसाचे जीवन  साहित्यातून मांडणे अण्णा भाऊंना महत्त्वाचे वाटले. अण्णा भाऊंच्या साहित्यातून वर्गसंघर्ष मांडलेला दिसतो. यापाठीमागे मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान होते.


 दलित साहित्यातील अण्णा भाऊंचे योगदान : -


“जग बदल घालुनी घाव। 

सांगून गेले मला भीमराव ।

गुलामगिरीच्या या चिखलात ।

रुतून बसला का ऐरावत।

अंग झाडुनी निघ बाहेरी । 

घे बिनीवरती धाव " ॥ 


या अण्णा भाऊ साठेंच्या ओळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सार्थ विश्लेषण करतात. जग बदलण्यासाठी घाव घालण्याची गरज आहे. प्रयत्न हाच बदलाचा आत्मा आहे. समाजाच्या कल्याणासाठी परिवर्तन आवश्यक आहे. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अण्णा भाऊ काव्यातून मांडतात. अण्णा भाऊंनी बाबासाहेबांना आपले प्रेरणास्थान मानले होते. बाबासाहेबांचे परिवर्तनवादी विचार अण्णा भाऊंच्या साहित्यातून पदोपदी व्यक्त होतात. दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांचे विचार अनमोल आहेत. हे अण्णा भाऊंनी ओळखले होते.


ज्यांचे अस्तित्वच नाकारण्यात आले होते अशा दलित समाजातील मांग जमातीत अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. गुन्हेगार जमात म्हणून जन्माचीच टाकलेली, उपेक्षिलेली ही जमात. अशा जीवनाची व जगण्याची झालेली होरपळ त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. वाटेगावातील व शाळेतील अस्पृश्यतेचे चटके त्यांनी बालपणापासूनच साहिलेले. ते असह्य झाले आणि त्यामुळेच त्यांचे शिक्षण असे झालेच नाही. अण्णा भाऊ प्रथम शाहीर म्हणून प्रकाशात आले. नव्या युगाचा, नव्या दमाचा तमासगीर म्हणून प्रसिद्ध  पावलेल्या अण्णा भाऊंच्या शाहिरीने या जीवनाचा तळ हलविला. आपल्या  जगण्यातला सारा दाहक अनुभव गाठीशी घेऊन अण्णा भाऊंनी साहित्यलेखन केले. कादंबरी, कथा, चित्रपट कथा, लोकनाट्य, प्रवासवर्णन, लोकगीते यांसारख्या साहित्याच्या विविध प्रकारांत लीलया विहार करणारे अण्णा भाऊ साठे दलित साहित्याचे उद्गाते आहेत. अण्णा भाऊंनी १३ कथासंग्रह, ३ नाटके, १ प्रवासवर्णन, ३५ कादंबऱ्या; त्यांच्या ७ कादंबऱ्यांवर आधारित ७ चित्रपट निघाले. १० प्रसिद्ध पोवाडे, इतके विपुल लेखन अण्णा भाऊंनी केले. विविध वाङ्मय प्रकारांतील त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण व गुणवत्तेने श्रेष्ठ अशा दर्जाचे आहे. अण्णा भाऊ साठेंच्या कथालेखनाविषयी प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. योगेंद्र मेश्राम म्हणतात की, "अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्सवादी विचारांचे होते; पण त्यांनी कथेतून दलित माणसांचे सामाजिक मनच व्यक्त केले आहे.” अण्णा भाऊंच्या साहित्यात दलित जीवनाचे प्रतिबिंब उमटते. दलित जीवनाचे दर्शन अण्णा भाऊंच्या साहित्यात घडते. त्यांचा भाकरीचा आकांत समाजातील सुष्ट, दुष्ट प्रवृत्तींवर प्रहार बनून प्रस्फुटतो. यासंदर्भात आजच्या दलित साहित्यातील विद्रोही क्रांतिमूल्यांची पहिली मुहूर्तमेढ अण्णा भाऊंच्या वाङ्मयात रोवलेली दिसते. विद्रोही दलित साहित्याचे ते पहिले शिल्पकार ठरतात.


अण्णा भाऊंचे कादंबरी वाङ्मय गुणदृष्ट्या अधिक समृद्ध आहे. अण्णा भाऊंनी आपल्या कथांप्रमाणे कादंबऱ्यांतूनही 'माणसानं जगलं पाहिजे' हाच संदेश दिला. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याविषयी प्रसिद्ध समीक्षक प्रा. रा. ग. जाधव लिहितात, “थोर साहित्यिकांचे एक लक्षण असे की, मानवी जीवनविषयक कोणतातरी नैतिक मूल्यभाव तो आपल्या साहित्यातून सूचित करीत असतो. अण्णा भाऊंनी दीनांच्या, पतितांच्या, भणंगभिकाऱ्यांच्या तथाकथित दरोडेखोरांच्या अर्थशून्य मानल्या गेलेल्या जीवनात माणुसकीची अर्थपूर्णता असल्याचे दाखवून दिले. या दलित-पतित जीवन सृष्टीतही मंगल मानवी भावनांचे नि नैसर्गिक मानीव विकारांचे लळित कसे रंगते, हे स्पष्ट केले. दलित पीडित जगाचा पहिला लेखक व भाष्यकार होय." प्रा. रा. ग. जाधवांचे हे मत अण्णा भाऊंमधील कलावंताची ओळख पटवून देणारेच आहे. अण्णा भाऊंनी आपल्या तळपत्या प्रतिभेने मराठी वाङ्मयात मोलाची नवी भर घातली. दलित चळवळींमध्ये वैचारिक बांधिलकीनुसार अनेक गट असले, तरी कोणत्याही गटाने दलित साहित्याच्या क्षेत्रातील अण्णा भाऊंच्या मूलभूत कार्याचे महत्त्व नाकारलेले नाही. त्यांना मराठी साहित्यातील पहिले प्रमुख, लक्षणीय व समर्थ दलित लेखक मानले जाते. एका उपेक्षित जीवनाच्या आविष्काराने साहित्यक्षेत्रात अपूर्वता आणली. मराठी साहित्य अधिक संपन्न केले असे म्हणता येईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या  जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!!


( पूर्व प्रसिद्धी - समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : संपादक महेंद्र शिंदे या पुस्तकात प्रकाशित प्रथमावृत्ती -२०१२)


डॉ. गणपतराव ढेंबरे

श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर

ता. रावेर , जि. जळगाव

पिन कोड -४२५५०८

मोबाईल - ९४२१०८१२७०

ई - मेल - dhembregr@gmail.com

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

दलित कवितेचा नवा- वारसदार

 “दलित कवितेचा नवा - वारसदार " डॉ. गणपतराव ढेंबरे , रावेर


कवी राजेंद्र राक्षे यांचा ' निळ्या वस्तीची कविता' हा कवितासंग्रह नुकताच १७ मे२०११ रोजी प्रकाशित झाला. स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला. या कवितासंग्रहाचे संपादक - महेंद्र शिंदे हे आहेत.इ.स. १९९० पासून राजेंद्र राक्षे कविता लेखन करीत  आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून, दर्जेदार दिवाळी अंकामधून तसेच गुणवत्तापूर्ण वाङ्मयीन नियतकलिकां मधून राजेंद्र राक्षे यांची कविता प्रकाशित झाली आहे. ती नुसती प्रकाशित झाली नसून त्यांच्या कवितेची समीक्षक, अभ्यासक, विचारवंत कार्यकर्ते, चोखंदळ वाचक यांनी जाणीवपूर्वक गांभीर्याने दखल घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, दलित हक्क चळवळीत राजेंद्र राक्षेंचा सहभाग मोलाचा होता. ते एक संवेदनशील कार्यकर्ते होते. इतकं विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे त्यांची कविता या पर्यावरणात घडली त्याचा परिचय करून घेतल्याशिवाय त्यांच्या कवितेची जातकुळी लक्षात येत नाही.


कवी राजेंद्र राक्षे यांचे वयाच्या चाळीसाव्या वर्षे दि. ९ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी श्री.महेंद्र शिंदे यांनी १९९० पासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या कवितांचे संकलन करून हा कवितासंग्रह स्नेहवर्धन प्रकाशनाच्या मार्फत प्रकाशित केला. या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी, विचारवंत, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर याची प्रस्तावना लाभली आहे. कवी राजेंद्र राक्षेंच्या गावी मु.पो. डिकसळ, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे डॉ. यशवंत मनोहर, प्रसिद्ध दलित कवी लहू कानडे यांच्या उपस्थितीत या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. या कवितासंग्रहात एकूण ९९ कविता आहेत. या कविता वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या आहेत. या संग्रहातील कवितांमध्ये प्रेम जाणिवांचा आविष्कार, सामाजिक विषयाची मांडणी, प्रखर विद्रोह, जीवघेणी वेदना, अस्वस्थता प्रकट होते.


एखादी कलाकृती प्रत्ययकारी आणि प्रभावी कधी होते? कलाकृतीमधून अभिव्यक्त होणाऱ्या जीवनाशयाशी तुम्ही किती प्रामाणिक असता यावर कलाकृतीची प्रत्ययकारिता अवलंबून असते. ज्या जीवनाबद्दल तुम्ही लिहित असता. त्या जीवनाबद्दल तुम्हाला किती आस्था आहे, याला फार महत्त्व असते. तुमची त्याविषयीची आस्था कलाकृतीच्या कणकणातून जाणवत असते. कवी 'अस्मिता' कवितेत म्हणतो,


"ते दिवस मुळी आमचे नव्हतेच 

होत्या फक्त क्रांतिकारी स्मृती

 अस्मिता म्हणून....


आपल्या स्वतःचे अस्तित्व नेमके काय आहे, याचा शोध कवी घेतो. 'अस्मितेचा प्रश्न' अधिक कठीण झाला आहे. पण आपली अस्मिता ही किती तकलादू आहे. याचे भान कवीला आहे. समकालीन वास्तव मांडत असतांना कवी म्हणतो,


"स्वातंत्र्यानंतर माझा देश खूप बदललाय

संस्कार देणारे नेतेही संपलेत

गल्ली बोळात पुढारी झालाय सुधारणारे सुधारलेत"


स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक बदलाचे चित्र कवी उभे करतो. संस्कार देणारे आदर्श वाटावे, असे नेतृत्व आज समाजात नाही. पुढाऱ्यांच पीक जोरात आहे. यातून स्वार्थ साधणाऱ्यांनी स्वार्थ साधून घेतला. कवीची सामाजिक जाणीव अत्यंत विद्रोही आहे. म्हणून कवी म्हणतो, - "आजवरच्या संस्कृतीनं नुसतंचविद्रोही बनवलंय. 

"या संस्कृतीत

गुदमरून शिजतोय

कदाचित

या मातीत

जन्म घेतला म्हणून"! 

असे यातनाचे काळोखे आभाळ कवीच्या भावविश्वावर ओथंबून आलेले आहे. "अन कुठली संस्कृती आम्हाला स्वातंत्र्य देईल." असा संस्कृतीला अग्निपरीक्षेला बसविणारा सवाल कवीने विचारलेला आहे. “आम्ही मानव कसे?' या कवितेत जातीच्या हरळीचे मानसशास्त्र कवीने मांडले आहे. जातीने गच्च भरलेल्या आमच्या आस्तित्वाच्या अवकाशात मानवत्वासाठी कशी जागाच उरलेली नाही, या वास्तवाची मांडणी कवीने अत्यंत भेदकपणे केलेली आहे.


"आम्ही मानव कसे ?

जातीलाच शोधण्यात आयुष्य हरवून गेलो

मीही थकलो...

स्वातंत्र्यापासून शतकाकडे वळलो मीही संपलो...

जातीयवाद संपला नाही "!


वास्तव मांडत असताना जातीयवादाची खोली कवी मांडतो. आपण संपलो; पण जातीयवाद नाही, हे वास्तव कवी मांडतो. जातीयवाद संपल्याच्या पोकळ घोषणा कवी करत नाही. जातीयवाद संपेल, असा भंकस आशावादही कवीला व्यक्त करावासा वाटत नाही. 'जग हे अस आहे' एवढ्यावरच कवीची प्रतिभा समाधान मानते. 'संकल्प' कवितेत कवी म्हणतो,


"परिवर्तनाचा बुरखा पांघरून 

गर्भात गुलामीच्या

जन्मभर आम्ही 

निपचित पडतोय

स्वतःच हसतोय 

अन् रडतोयही"


आपल्या गुलामीचा बुरखा कवी फाडून टाकतो. या व्यवस्थे आपल्यावर केलेली मात कवीने येथे व्यक्त केली आहे. आपल्या जीवनाला नेमका सूर सापडला नाही, याची खंत कवी व्यक्त करतो. 'आयुष्यभर गात राहिलो, स्वप्नगीत ना निखारे झाले, ना हित!' आयुष्यभर आपण स्वप्नगीत गात राहिलो, तरी त्यातून काहीच कस घडलं नाही, याची खंत कवीला वाटते.


'मी भगवा आहे' या कवितेत कवीने विषमतावाद माणसाला हीन बनविणाऱ्या वर्णवर्चस्ववादी धर्माचे जोखड फेकून दिले आहे. भगवा धर्मवाद संपला पाहिजे, असं कवीला वाटते. कवी म्हणतो,


"याच भगव्यात

फुले पासून आंबेडकर 

छत्रपतीपासून सावरकर

डोळ्यात तेल घालून

शोधत आहे."


कवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, बुद्धाच्य करुणेची, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, आणि न्याय ही लोकशाहीवादी जीवनपद्धती स्वीकारली आहे. कवी म्हणून भगव्या विचाराला त्यागाची भाषा सांगतो. कवी म्हणतो 'मीच समतेची गर्जना करतो.' ही समता उद्याच्या मांगल्यासाठी आवश्यक असल्याची कवीची धारणा आहे. माणसं धर्मउन्मादात अडकून पडू नयेत, ती केवळ माणूस म्हणून एकमेकांच्या गळ्यात पडावित, अशी कवीची इच्छा आहे.


इथे माणसाचं हजारो वर्षापासून अविरत शोषण करणार व्यवस्था नेस्तनाबूद करण्यासाठी क्रांतिकारी माणसाला क्रांतीच वाट पकडावीच लागेल. संघर्ष करावाच लागेल. त्याशिवाय त्याला परिवर्तनाच्या दिशेने जाता येणार नाही. 'संकल्प' य कवितेत कवीने उपरोधाची अत्यंत जळती धार धरलेली आहे. खरचं कुणाला परिवर्तन हवे आहे? परिवर्तन हा बोलण्याचा विषय आहे काय ? परिवर्तन अशक्य नसते, पण बराक ओबाम म्हणतात, त्याप्रमाणे 'बट चेंज विल नॉट कम इन वुई वेट फॉर" परिवर्तन ही निर्मिण्याची गोष्ट आहे. कवीने असे परिवर्तन निर्माण न करता केवळ परिवर्तनासंबंधी बोलत राहणाऱ्यांचा तिरकस पद्धतीने समाचार घेतलेला आहे. परिवर्तनासाठी कवीचे वेगळ्या संदर्भातील शब्द वापरून सांगायचे, तर कधी वावटळ व्हावे लागते, कधी वादळ बनावे लागते. कवीच्या सामाजिक भावविश्वाचे एक वर्तुळ येथे पूर्ण होते. या भावविश्वात घुसमट आहे, तगमग आहे,पण पराभव वा माघार कवीला मान्य नाही. जीव देण्याच्या संदर्भात कवीने म्हटले आहे. -


"तुझ्यासाठी नाही निदान 

दुसऱ्यांसाठी तरी जगशील ना?"


एकूण कवी लिहितो आहे ती कविता जगण्याची आहे. जगण्याची उमेद देणारी, परिवर्तनासाठी आंदोलन करायला सांगणारी कविता आहे. कवी राजेंद्र राक्षेंच्या कवितेसंदर्भात प्रसिद्ध कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर म्हणतात, "कवी राजेंद्र राक्षे यांना साहित्यिक 'बोले तैसा चाले' या पठडीत नीट बसायला हवा, असे वाटते. ते त्यांच्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भावविश्वात प्रज्वलित केलेल्या मूल्यदृष्टीशी सुसंगत आहे." येथे एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकरूप झाला आहे. या कवितासंग्रहातील अनेक कवितांमध्ये तशा खुणा दिसतात.


"निळ्या वस्तीची कविता” या कवितासंग्रहातून अनेक कविता प्रेमभावनेचा आविष्कार करणाऱ्या आहेत. या प्रेमकवितांमध्ये सुख-दुखाचा नाना छटा साकार झाल्या आहेत. ही प्रेमकविता साधी, सरळ आहे, पण कवीच्या मनाची घुसमट मांडणारी आहे. विवाह हा व्यवहार असतो, हे मान्य करता येईल; पण प्रेम व्यवहारात बसत नाही. प्रेमाला व्यवहारात बसवले जाते, तेव्हा 'प्रेम' 'प्रेत' होऊन जाते कवी म्हणतो,


"अजून हेवा मनाचा

व्याकूळ आज झाला 

स्मृतीच्या पाखरांनो

घन निळा नभ झाला." 


स्मृती जपणं हे मनुष्यात्वाचं लक्षण आहे. खास प्रेमानुभवाच्या स्मृती कवीच्या मनात जागृत आहेत. प्रेमाच्या नानाविध छटा या संग्रहात व्यक्त होतात.


या कवितासंग्रहातील भाषा साधी, सरळ, सोपी आहे. आपला जीवनानुभव जोरकसपणे व्यक्त करण्यावर कवीने भर दिलेला आहे. कवी नवनवीन प्रतिमांची मांडणी करतो. यामध्ये तारुण्याचा चव्हाटा, ठिसुळती हवा, अंधाराच्या पंक्तीत विद्येचा खोडरबर, तात्त्विक इस्टेटी, एकात्मतेचा कुंचला, ठिगळ,चादर, बदाम, चौकट, इस्पिक, किलवर, चार वर्ण, पावलांचे रांडपण, चाबूक नाग, स्वप्नांची चॉकलेट, पश्चात्तापी आयना, मनाचे ठिगळ, जीवन बचाळे, डिवचलेला वृक्ष, डबक्यातले आयुष्य, मैलांचे घटिंगण, रिती सांज, विद्रोहाची हाक, जलालपण इ. यासारख्या ताज्या प्रतिमांच्या मांडणीतून कवी राजेंद्र राक्षेंची कविता आकार घेते. यातील नवता व सौंदर्य वाचकाच्या मनाला भुरळ घालते.


कवी राजेंद्र राक्षे यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यात नवखेपणाचे अनेक पुरावे आहेत. काही कवींच्या काही कवितांचे स्मरणही काही ठिकाणी होते. कवितांची बांधणी सरळ, साधी असली, तरी उत्कट आहे. कवीच्या मनाची आर्तता अनेक कवितांमधून जाणवते. कवी राजेंद्र राक्षेंना आणखी जीवन लाभले असते, तर त्यांनी आपल्या मर्यादांवरती मात केली असती, यात शंका नाही. आजच्या सर्व प्रश्नांच्या गुहांमध्ये ही कविता शिरली असती; पण आता जे हाती लागले आहे, त्यावर आपल्याला समाधान मानणे भाग आहे. तरी 'निळ्या वस्तीच्या कविता' आपल्याला एक भरघोस आश्वासन देतात.


'निळ्या वस्तीच्या कविता' या परिवर्तनात जगणाऱ्या आणि परिवर्तनाशी बोलणाऱ्या कवीच्या कविता आहेत. समाजाच्या एका सुरम्य स्वप्नांची दीपमाळ कवीच्या नजरेत आहे. प्रत्यक्ष वास्तवात मात्र या स्वप्नाच्या जिवावर अनेक मरणे तुटून पडलेली आहेत हे कवीला दिसते, आणि कवीच्या जिवाची तडफड होते. 'निळ्या वस्तीच्या कवितांना' या तडफडीची उत्कट लय आहे. ही कविता या तडफडीपाशी लोळागोळा होऊन पडत नाही. ती या तडफडीला सर्जनशील करण्याची आणि तिच्यातून मार्ग काढण्याची हिंमत बाळगते. या हिंमतीचे मोल महत्त्वाचे आहे. कवी राजेंद्र राक्षे यांची कविता जनहिताचे भान जपणारी व बुडत्यांच्या हाकेला धाऊन जाणारी आस्थेवाईक अभिव्यक्ती आहे. या अशा प्रभावी कवितेला न्याय मिळण्यासाठी श्री. महेंद्र शिंदेनी कवीच्या निधनानंतर ही कविता प्रकाशात आणली. या चळवळीतील कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप  सदिच्छाही देतो.

 

( पूर्व प्रसिद्धी -सक्षम समीक्षा एप्रिल- मे- जून २०१३ )

डॉ. गणपतराव ढेंबरे

मराठी विभाग 

श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , जि.जळगाव पिन-४२५५०८

मोबाईल -९४२१०८१२७०

ई-मेल dhembregr@gmail.com

न संपणाऱ्या दुःखाची वाट - डॉ.गणपतराव ढेंबरे, रावेर

 "न संपणाऱ्या दुःखाची वाट"

'आई' हा प्रत्येकाच्या हृदयाचा एक हळवा भाग असते. अनेक लेखक, कवीनी आईवर रचना केल्या आहेत. मराठी साहित्याचा विचार करता अनेक लेखकांनी आईचे महात्म्य सांगितले आहे. साने गुरुजींची 'श्यामची आई' फ.मु. शिंदे यांची 'आई' कविता तसेच माधव ज्युलियन यांची आईवरची कविता आपल्या लक्षात येते. 

" प्रेमस्वरुप आई। वात्सल्यसिंधु आई बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी " यातून आईचे महात्म्य सांगितले गेले आहे. गोविंदाग्रज आई विषयी लिहितात, "ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही। जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई." दलित कवी वामन निंबाळकर लिहितात, "शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो. "  साने गुरुजींनी 'श्यामची आई' लिहून आईच्या मनाचा अचूक वेध घेतला. मुलांच्या मनावर संस्कार करणारी ही कलाकृती मराठी साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली. तसेच मॅक्झिम गॉर्की यांची 'आई' ही कादंबरी सर्वपरिचित आहे. रशियन क्रांतीमध्ये या पुस्तकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. 'आई' या कादंबरीविषयी प्रो.बो. बुर्सोव लिहितात, "प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात ; आणि त्या प्रसंगांना अनुरूप अशी पुस्तकेही त्या देशाच्या वाङ्मयात आढळून येतात.गोर्कीची 'आई' ही कादंबरी, आम्हा रशियनांच्या दृष्टीने अशा पुस्ताकात मोडते. " ग्रामीण जीवनातील माणसांचे जीवन हे नेहमीच उपेक्षित असते. विशेषतः ग्रामीण स्त्री तिचं जगणं तिच्या व्यथा, वेदना जीव घेण्या असतात. आज जीवन झपाट्याने बदलत आहे. या वेगवान बदलांमध्ये सर्वसामान्य माणूस हरवत चालला आहे. त्याचं जीवन शून्यवत झालं आहे. व्यवस्थेने या माणसाचं जगणं नगण्य ठरवले आहे. हा सर्वसामान्य माणूस म्हणजे कोणता माणूस ? यात ग्रामीण भागातील गरीब, उपेक्षित, शोषित, शेतमजूर, शेतकरी, शहरातील मजूर, झोपडपट्टीतून राहणारा माणूस यांचे जीवन किंमतहिन झाले आहे. अशा माणसाच्या जीवनालाही एक अर्थ असतो. 'दुःखातही जीवन फुलत असते ' या सृजनाचा अर्थ शोधणाऱ्या लेखकांची संख्या कमी झाली आहे. अशा वेळी जी स्त्री कधीच प्रकाशात आली नसतो. तिचं जगणं तिचं सोसणं तिचा सकारात्मक स्वाभिमानी संघर्ष लोकांपुढे कधीच आला नसतं. तो मांडण्यासाठी लेखनाच्या रचनाबंधापेक्षा प्रामाणिक आत्मनिष्ठ दुःखद जीवन 'माझ्या हिरकरणीची वाट' या पुस्तकातून मांडले जाते. हे आपल्या वाटयाला का आले ? याची कारणमीमांसा लेखकाने टाळली आहे. समाज, प्रथा, परंपरा, संस्कार, संस्कृती, स्वार्थी नातेसंबंध, अडाणीपणा, यात दुःखाला नेमकं कोण जबाबदार आहे ? याचे उत्तर हे पुस्तक देत नाही, नियतशरणता' हा स्वाभावधर्म या आत्मकथेतून प्रकटतो. दुःखातही सुख शोधणारी माणसं हा या पुस्तकाचा विशेष आहे.

या पुस्तकाला चरीत्र म्हणावे की आत्मचरित्र असा प्रश्न पडतो. कारण पुस्तकावर महादेव वाळुंज हे नाव आहे म्हणजे हे चरीत्र ठरते. पुस्तकाच्या पहिल्या भागात महादेव वाळुंज यांचे निवेदन येते त्यातून हे चरीत्र आहे असा वाचकाचा समज होतो तर दुसऱ्या भागाची सुरुवात आई सांगते, अशी होते. संपूर्ण पुस्तकभर आत्मनिवेदनपर लेखन येते. आत्मचरीत्रात खुद्द लेखक स्वतःच्या गतजीवनाची कथा स्वतःच निवेदन करतो. मूल्यगर्भ दृष्टीने घेतलेला आत्मशोध ही आत्मचरित्राची मूलभूत गरज असते. वर्तमानकाळाच्या विशिष्ट टप्यावरुन भूतकाळाचा वेध घेत जोवनकथेची रचना करणे, स्व-जीवन विषयक विशिष्ट भूमिकेतून घटना प्रसंग इ. घटितांची निवड करणे, स्व-जीवनाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे निगडित असलेल्या व्यक्तींचे चित्रण करणे आणि अर्थातच गतजीवनाचे निवेदन करणे, हे आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या संकेतव्यूहामधील महत्त्वाचे घटक आहेत. या वरील आत्मचरित्राच्या व्याख्याशी या पुस्तकाचा सहसंबंध कसा आहे ? याचा विचार करताना ठळक गोष्ट म्हणजे हे लेखन लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळूंज यांच्या जीवनाचे सलग कथन आहे. या पुस्तकात लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळूंज यांच्या गतजीवनाची मांडणी केलेली आहे. एकूण मानवी जीवनाच्या व्यापक संदर्भात गतजीवनाचे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून होतो. स्त्रीचं जीवन म्हणजे समन्वय, सहयोग, सहकार्य होय. हे पुस्तक वाचताना  कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी आठवतात. " लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" हे खरंच आहे नांदण्यातून जीवन उभे राहते. स्त्रीच्या सोशीकपणातून संसार फुलतो. पण सोशीकपणातून त्या व्यक्तीच्या व्यथेला वेदनेला, दुःखाला परिसीमा राहत नाही. या पुस्तकातून हे दुःख प्रकट होते.

मुळात स्त्रीचे जीवन परावलंबी असते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबीक, मानसिक परावलंबी असणारी स्त्री आणि तिची अगतिकता या पुस्तकातून अगदी समर्थपणे अभिव्यक्त होते. वाचकाच्या मनात हे पुस्तक चीड निर्माण करते. लक्ष्मीबाईनी बंडखोरी का केली नाही ? हा त्रास. दुःख, शोषण त्यांनी का सहन केले ? या प्रश्नाचे उत्तर त्यांचे परावलंबन हे आहे. तसेच त्या काळातील समाज, रूढी, परंपरा, नातेसंबंध या शोषणाला जबाबदार होते. घरातलं वातावरण धार्मिक होत. परंतु या घरातील माणसं स्त्रियाच्या छळाला छळ म्हणतं नव्हते. देव, धर्म, पूजा, कीर्तन करणारी माणसं दुसन्याचं मन जानत नाहीत .आपल्याच घरातील स्त्रीच्या भावना समजून घेत नाहीत, यात ढोंगीपण दिसतो. तसेच त्या काळातील समाजाच्या व्यक्तीच्या मानसिकतेवर ह्या पुस्तकातून प्रकाश पडतो. स्त्रीला त्रास देणे, छळ करणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. असे समाजाचे मन होते. हे या पुस्तकातून मांडले जाते. या पुस्तकातून एका उपेक्षित स्त्रीचे जीवन येते. तिच्या हालअपेष्टा, वेदना, दुःख वाचकाला अंर्तमुख करते. तत्कालिकन समाजातील रूढी, परंपरा, मान, अपमान, कुटुंब यांचे प्रभावी चित्रण येते. सासरे पोथी वाचत बसलेले होते आणि त्यांचा आवाज आम्हाला ठळकपणे येत होता. पण त्यांना माझ ओरडण्याचा आवाज जात असून ते येत नव्हते. त्यांच्या मदतीची आशा संपली होती. कारण माझा ओरडण्याचा आवाज ऐकून मामंजींनी पोथी वाचायची बंद केली. आणि आपल्या खोलीतील चिमणी बंद करून गप्प पडून राहिले. या प्रसंगातून तत्कालीन कालखंडातील मानसिकतेवर प्रकाश पडतो. पुरुषव्यवस्था शोषणव्यवस्था यांचा चेहरा या आत्मकथनातून स्पष्ट होतो.

एकत्र कुटुंब पद्धतीचे गुण-दोष या आत्मकथनातून मांडले जातात. या मांडणीत स्वाभाविकता दिसते. अज्ञानी, आडाणी माणसांच्या जगण्यातील ताण या पुस्तकातून व्यक्त होतात.  ५० वर्षा पूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रीच्या जीवनाचा वेध हे पुस्तक घेते. आज पर्यंत ग्रामीण साहित्यकृतीतून आलेल्या स्त्री जीवनापेक्षा या पुस्तकातील स्त्रीचे जीवनच वेगळे आहे. या मांडणीला वास्तवाचा आधार आहे. प्रांजळपणे जीवन मांडले आहे. या संपूर्ण कलाकृतीत कोणावरही दोषारोप केलेला नाही. आपल्या दुःखाची सहजतेने उभारणी केली आहे. हे दुःख वाचकाच्या मनात पीळ निर्माण करते. त्या स्त्रीच्या वेदना काळजाला हात घालतात. हे पुस्तक वाचत असताना ग्रामीण भागातील माणसाला आपली आई, आजी, काकू, आत्या, मावशी आपल्याशी बोलत आहे असा भास होतो. यापैकी कोणीतरी मनापासून आपला भूतकाळ आपल्याला सांगत आहे. याचे जाणीव मनात निर्माण होते. ही एक संपूर्ण पिढीची आत्मकथा म्हणता येईल. हा मराठी साहित्यातील अभिनव असा प्रयोग आहे. या पुस्तकाच्या रचनाबंधावरुन याला आत्मचरीत्र म्हणता येईल. या पुस्तकातून लक्ष्मीबाई यांचा सलग जीवनप्रवास आत्मनिष्ठेने मांडला जातो. परंतु या पुस्तकाचे निवेदन कथनात्मक स्वरुपाचे आहे. ही कथा सत्य व वास्तव अशी आहे. म्हणून या पुस्तकाला आत्मकथा म्हणता येईल.

देवावर विश्वास ठेवणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या जीवनाचा विचार करता देवावर आस्था श्रद्धा ठेवल्यामुळे जगण्यात एक सकारात्मक भावना येते. आस्था माणसाला स्थिर करते. लक्ष्मीबाई वाळूंज यांच्या जीवनात त्यांची परमेश्वरावरील गाढ श्रद्धा त्यांना विपरीत प्रसंगात जगण्यासाठी प्रेरक ठरते. याविषयी त्या लिहितात, मी देवीचा हवाला देऊन पोरांना धीर द्यायचे. मी म्हणायचे, "आपण आयुष्यात कोणाचं कधीच वाईट केलेले नाही, तर रासुबाई आपलं काहीही वाईट करणार नाही. देवावर भरोसा ठेवा, काही होत नाही.. यातून लक्ष्मीबाई यांच्या श्रद्धेचे स्वरुप आपल्या लक्षात येते. 'मराठा' जातीतील स्त्रियांचे जीवन हे अप्रकाशित दुर्लक्षित असे आहे. कुटुंबातूनच स्त्रीला दुय्यम मानले जाते. घरण्याच्या ,जातीच्या कुटुंबाच्या श्रेष्ठत्वाच्या भावना स्रीच्या वागणे, बोलण्याशी ,अचरणाशी जोडल्या जातात. संस्कार मूल्यं, परंपरा, धर्म, संस्कृती, नाते संबंध हे स्त्रीच्या शोषणाचे केंद्र बनतात. शोषणाला मोठेपणाचा, ढोंगी खानदानीपणाचा मुलाम चढवून माणसाला गुलाम केले जाते. कुणाला सांगताही येत नाही व सहनही होत नाही अशी अवस्था व्यक्तीची होते. या अवस्थेतून व्यक्तीच्या वाट्याला येते ते फक्त दुःख आणि दुःखच .'माझ्या हिरकणीची वाट ' हे लेखक महादेव वाळूंज यांचे पुस्तक अनेक बाजूनी महत्त्वपूर्ण ठरते. यातील एक भाग म्हणजे लेखनाची फारसी पूर्वपरंपरा नसतांना वेगळ्या विषयांवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या व आज वृद्धत्वकडे झुकलेल्या एका स्त्रीची संघर्षपूर्ण कहाणी म्हणजे महादेव वाळुंज यांचे हे पुस्तक होय. ही स्त्री म्हणजे महादेव वाळूंज यांची माता होय. लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांनी आयुष्यभर जे भोगल, सोसलं याचे आत्मकथन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.

लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांचा जीवनप्रवास हा अत्यंत वेदनामय आहे. अनेक संकटांच्या मालिकेला तोंड देत ठामपणे उभे राहण्यासाठी ही कथा प्रेरणादायी दुःखावर मात करणारी आहे. प्रांजळ आत्मनिवेदन हा लेखनाचा आत्मा आहे. या पुस्तकाची भाषा ओघवती आहे. एकदा पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेवावं असं वाटत नाही. एक भावनिक प्रामाणिकपणे ही आत्मकथा साकरत जाते. ही आत्मकथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते. लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या जीवनातील चढ-उतार वाचकाला विचार करायाला लावतात. सतत सकारात्मक जीवनदृष्टी ठेवल्यामुळे हेही दिवस जातील हा आशावाद जिवंत राहतो. काळ बदलतो जीवन बदलते, माणसं बदलतात.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या मुलांचा शिक्षणासाठीच्या संघर्षाचे चित्रण येते. शैक्षणिक फी साठी करावे लागणारे कष्ट, सोसाव्या लागणाऱ्या यातना यांचे अगदी मोजके परंतु महत्त्वपूर्ण चित्रण येते. आज मराठा समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. ती किती सार्थ आहे. याची जाणीव या पुस्तकाच्या उत्तरार्धातून होते. ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. शेतकरी जीवनातील ताण , तणावाचे सूक्ष्मतेने चित्रण येते. काही अतिशय लहान लहान बारकावे या आत्मकथेतून मांडले जातात. शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था या आत्मकथनातून उलगडत जाते. बदलत्या परिस्थितीत शेतकरी कुटुंबाचे होणारे हाल, आबाळ यांचे चित्रण नकळतपणे मांडले जाते. तो संघर्ष जीवघेणा होता. अस्तित्व पुसता पुसता पुन्हा स्वतःला सिद्ध करणारा होता. पुस्तकाच्या शेवटी लक्ष्मीबाई वाळूंज म्हणतात, "माझ्या वाटचालीत आलेल्या काट्याकुट्यांची फुले झाली, अशी बहरलेली वाट सर्वांना मिळत राहो." यातून आपल्या वाट्याला आलेले आयुष्य, मुलखावेगळं जगणं सोसून सर्वांच्या कल्याणाची आस धारणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांची ही आत्मकथा वेधक, सकारात्मक संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारी आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात या पुस्तकाचे एक खास वेगळेपण आहे. ही 'माझ्या हिरकणीची वाट ' या पुस्तकाचे लेखक महादेव वाळूंज हे आहेत. परंतु पुस्तकातील निवेदन हे आत्मनिष्ठ स्वरुपाचे आहे. ही कथा लक्ष्मीबाई वाळुंज सांगतात आणि महादेव वाळुंज लिहितात, तसे पहिले तर एक मुलांने आपल्या आईचे लिहिलेले हे चरित्रचं आहे. परंतु चरित्राचा रचनाबंध टाळून आत्मनिष्ठपणे ही आत्मकथा साकरत जाते. हा जीवनानुभव जसा सांगितला तसा लिहिण्याचे काम महादेव वाळूंज यांनी केला आहे.

वाङ्मयीनदृष्ट्या या पुस्तकात गुणवत्ता निर्माण झाले ती महादेव वाळुंज यांच्या प्रयत्नातून परंतु यातील जीवनकथा ही सरळ  नाही. या आत्मकथेत प्रचंड संघर्ष भरलेला आहे. हा संघर्ष आज आपणाला नाटयमय वाटतो. परंतु तो संघर्ष जगलेल्या लक्ष्मीबाई वाळुंज व त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय खडतर होता.ग्रामीण जीवनातील आई आणि मुलगी यांच्या नात्यातील विविध पदर या पुस्तकातून उलगडतात. हे पुस्तक वाचून झाल्यावर असं वाटतं की, असं जीवन आता राहिले नाही. परंतु त्याकाळातील स्त्रियांच्या स्थितीगतीवर या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो. त्यामुळे या पुस्तकाला एका ऐतिहासिक दस्तऐवजाचं महत्त्व प्राप्त होते. आपल्या पूर्वंजाच्या जगण्याबद्दलचे भान या पुस्तकातून जागे होते. एक ५०/६० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रीच्या जीवनाचे यथार्थ चित्र या पुस्तकातून येते. त्यामुळे या पुस्तकाला ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व आहे. "त्या काळात आम्ही बायका चावडी समोरुन जाताना पायातील वाहना हातात काढून घेत होतो, असा काळ तेव्हा मी काय बोलणार पंचांसमोर ? " हा प्रश्न तत्कालीन समाजाविषयीचे विश्लेषण करण्यास समर्थ ठरतो. ग्रामीण माणसाचं जगण्याविषयीचे शहणपण या पुस्तकातून येते. असं जर आपण जमिनी विकून खायला लागलो तर मुलांना जमीनी राहणार नाहीत. ते भूमिहीन होतील आणि आयुष्यभर त्यांना मोलमजूरी करुन जगावं लागेल." जमीनीविषयीचा लक्ष्मीबाईचा दृष्टीकोन यर्थाथ ठरतो. लक्ष्मीबाई वाळुंज यांचा जीवनप्रवास म्हणजे कष्ट, दुःख, अपमान, पोरकेपण, अकाली वैधव्य ,आश्रिताचं जिणं यातून हिंमतीने केलेला प्रवास होय."

शिरूर परिसरातील बोलीभाषेचे उपयोजन हे पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगता येते. कुणबी कुटुंबातील खास शब्दप्रयोग, बोलीतील म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर या पुस्तकात केलेला आहे. संवादात्मकता हा ही एक विशेष आपणाला नोंदवता येतो. या आत्मकथनातील काही व्यक्तीरेखा, प्रसंग, घटना संवादातून आकार घेतात. संवाद प्रभावी असल्यामुळे ह्या व्यक्तीरेखा प्रसंग, घटना अधिक ठळक होत जातात. वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. हे संवाद शिरूर परिसरातील बोलीभाषेतून आकाराला येतात. ते जिवंत वाटतात. कठीण प्रसंगात धीरानं वागणारी, कसोटीच्या क्षणी आत्मविश्वासाने जगणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांचा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास वाचत असताना त्यांच्या नात्यातील माणसांचा राग वाचकाला येतो. परंतु या माणसांचं चित्रण खलनायकी पद्धतीने येत नाही. जाणीवपूर्वकता, उरबडवेपणा, उग्रता, भावना पेटवणारे, दुःखाचे भांडवल करणारे असे हे लेखन नाही. या लेखनात संयतपणा, सुसंस्कृतपणा जाणवतो. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगता येईल. तसेच संसार दुःखातून फुलतो. सहकार्य, सहयोगातून सुंदर नातं तयार होते. आणि हे ही दिवस जातील हा आशावाद असल्यामुळे लक्ष्मीबाई हा जीवनसंघर्ष चिकाटीने लढतात. आणि त्यात विजयी होतात. हा भाग या पुस्तकात महत्त्वाचा ठरतो. 

माझ्या प्रेमामुळे आणि समाज काय म्हणेल ? या जगरहाटीमुळे, माहेरची माणसं कात्रीत सापडल्यासारखी झाली होतो. तेरा चौदा वर्षांच्या मुलीचा माहेरी कसा निभाव लागेल ? आणि आत्ताच तिचा संसार मोडला तर कसे दिवस जातील ? विचार करून करून आई-आबा थकायचे, चुलत्यांशी, भावाशी बोलायचे; पण मार्ग काही दिसत नव्हता. याबाबत मला कोणी काही विचारत नसे आणि मीही काहीच बोलत नसे, काय बोलणार ? स्वतःच्या जीवनाची ही समीक्षा लक्ष्मीबाई करतात. आज काळ बदलला. समाज बदलला पण आजही मुलीच्या संसाराची व्यथा आणि कथा बदलली आहे का ? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करतो. या पुस्तकातून तत्कालीन स्त्रियांच्या दुःखाचे प्रभावी, विविधांगी चित्रण येते. आपल्याला छळणाऱ्या माणसांबद्दल लक्ष्मीबाई लिहितात, "एका मस्तीत आणि धुंदीतच वादळासारखी सारी माणसं वावरत होती. जगाशी चांगलं वागणारी ही माणसं माझ्यासाठी कर्दनकाळ होती." यातून माणसांच्या वागण्याचं अचूक वेध घेतला जातो. या पुस्तकातून आपल्या दुःखाला, शोषणाला जबाबदार कोण आहे. याचा शोध घेतलेला नाही. या पुस्तकातील मांडणीमध्ये 'आहे हे असा आहे' अशी किनार आहे. अस्वस्थत हे या लेखनाचे वैशिष्टये आहे. आक्रस्थळेपणा, उरवबडवेपणा, नाटकी अभिनिवेशापेक्षा या पुस्तकातील मांडणीत, संयमी, दुःखाची मांडणी आहे. या पुस्तकातून शांतपणे वेदना वाचकाच्या मनात रुतत जाते. व्यक्तीला पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनातील वेदनेचा काटा खूप खोलवर रुतला आहे. याची जाणीव होते. तीव्र ठणक मनात ठेवून हे पुस्तक संपते. ते पुन्हा पुन्हा वाचताना मनाला नवा आशावाद, संयमी, भान देते.

"दोघी देवावरून आलेल्या असूनदेखील वाईट वाईट बोलायला लागल्या. यातून लक्ष्मीबाईंची मूल्य दृष्टी लक्षात येते. देवांवर विश्वास ठेवून चांगलं वागलं पाहिजे असे त्यांना वाटतं. परंतु सख्या नात्यातील माणसं देव, धर्म करतात पण आपणाला समजून घेत नाहीत. ही खंत लक्ष्मीबाई व्यक्त करतात. ग्रामीण जीवनातील स्त्रियांच्या स्वाभावातील बारकावे, वागण्याच्या तऱ्हा, त्यांच्यातील संवाद हे अत्यंत सूक्षमतेने टिपले आहेत. आजवर या विविध नात्यांवरील लेखन ठोकळेबाज पद्धतीने झालेले आहे. याला हे पुस्तक अपवाद ठरते. सासू-सून, वहिनी नणंद ,यांच्या जगण्याचा या पुस्तकातून यथार्थ शोध घेतला आहे. 'माझ्या हिरकणीची वाट' या पुस्तकातून लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या गतजीवनाची विशिष्ट उद्दिष्टानुसार ,निश्चित सूत्रानुसार रचना केलेली आहे. हे निश्चित सूत्र म्हणजे दुःखाचा, वेदनाचा आत्मशोध मांडणे. लेखक महादेव वाळुंज लिहितात, "आईन भोगलं ते लिहिताना आम्हाला खूप वेदना झाल्या. तिच्या वेदनांची कहाणी लिहिताना क्षणक्षणाला, अक्षरा अक्षराला, शब्दाशब्दाला, वाक्यावाक्याला काळीज तुटलं, काळजाचं पाणी झालं, ते सोसत सोसत आम्ही हे लिहिलं" ही या लेखनामागील प्रेरणा आहे. हेच या लेखनामागील निश्चित असे सूत्र आहे. एखादा दुःखद प्रवास व्यक्ती जेव्हा सांगत असते तेव्हाच तो पुन्हा एकदा जगत असते. त्या यातना, दुःख देतात. त्या एकदा कागदावर उतारल्या की मनातील दुःखाचे सृजनाच्या पावसात रुपांतर होते. या लेखनाचे हेच एक महत्त्व आहे. ग्रामीण जीवनात गरीब असणाऱ्या माणसांना आपली व्यथा कुणाला सांगवीशी वाटते पण सांगण्यासाठी साधन उपलब्ध असत नाही .आज विशेषतः मराठा जातीतील 'स्त्री' ही परिवर्तनाच्या साधनांचा उपयोग करून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आजही ग्रामीण भागातील मराठा जातीतील स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. स्वतः लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज ह्या अशिक्षित असतानाही त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचा नवप्रकाश दाखवला. वाळुंज कुटुंबात शिक्षणामुळे क्रांती घडून आली. परिवाराचा उपजीविकेसाठीचा संघर्ष काहीसा स्थिरावला. जीवन जगत असताना परिस्थिती व्यक्तीला कसं जगण्यासाठी भाग पाडते. या परिस्थितीशी, नियतीशी संयतपणे, धीराने संघर्ष करणारी लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज ह्यांची ही कथा म्हणजे माझ्या हिरकणीची वाट' हे पुस्तक होय. या पुस्तकातून डॉ.महादेव वाळुंज यांचा जीवनप्रवास नकळतपणे ओझरतो येतो. त्यांनी स्वतःचे आत्मकथन लिहिल्यास या पुस्तकाचा पुढील भाग प्रकाशात येईल. आज निराश झालेल्या पराभूत मानसिकतेत जगणाऱ्या ग्रामीण मुलीसाठी लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी, आशावाद जागवणारा ठरु शकतो. आपल्या हातून काहीच होणार नाही असा निराशवाद ठेवणाऱ्या मुलींसाठी हे पुस्तक वाट दाखवणारे आहे.

या पुस्तकातील भाषा सहज साधी सोपी आहे. छोटी-छोटी वाक्यरचना कवितेच्या ओळीसारखी आहे. भावनेचा धागा कायम पकडून ठेवणारी ही भाषा मनाला अस्वस्थ करते. सांगण्यातला प्रामाणिकपणे मनाचा ताबा घेतो. पुस्तकाच्या पहिल्याच भागातील हो वाक्य रचना उदाहरणासाठी लक्षात घेऊ, " गाडीचा वेग कमी करणे म्हणजे आईच्या भेटीचा वेळ लांबणे. तेच मला सहन होत नव्हतं. आईला पाहण्यासाठी लावणारा प्रत्येक क्षण परीक्षा पाहणारा. मनात नाना प्रश्न आणि शंका निर्माण करणारा. सासऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि संवादास प्रतिसाद, होकार नकार यापेक्षा जास्त देणं मला शक्य नव्हतं. मी काही बोलूच शकत नव्हतो. माझ्या नजरेत, मनात, काळजात आणि काळजीत होती फक्त.... आई... आई... आई माझ्या सर्वस्यातून फक्त एकच किंचाळी हंबरडा फोडत होती. आई... आई... आई. या लेखनात आपल्याला काव्यात्मकता जाणवते. वरील परिछेदातील काही ओळी कवितेच्या ओळींची आठवण करून देतात.

"माझ्या हिरकणीची वाट" या पुस्तकातील नायिका लक्ष्मीबाई वाळुंज यांचे जीवन म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर महादेव वाळुंज देतात, ते लिहितात, "मनसोक्त, मनमुराद, भरभरून असं कधीच काही मिळालंच नाही, नाही म्हणायला एक गोष्ट भरभरून मिळाली, ती म्हणजे दुःख, दारिद्र्य, दैना, त्यामुळे तिला जे काही मिळालं ते तिनं नेहमी जिवापाड जपलं, दोन रुपयं रोजानं काम केलेलं त्यामुळे जे मिळाले ते साठवायचं, त्याला जपायचं, सगळं, संपवायचं नाही, ते भविष्यासाठी साठवून ठेवायचं, हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला होता. " लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांच्या जीवन जगण्याची दृष्टी, यातून स्पष्ट होते. सुखातही दुःखाचा विसर न पडणाऱ्या व्यक्ती सजग आयुष्य जगतात. जीवनात हौस, सुख, चैन, चंगळवादापेक्षा उपयुक्तता, गरज, समाधान यांना महत्त्व देणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांचे जीवन म्हणूनचं मार्गदर्शक ठरते. या पुस्तकाच्या लेखनामागील प्रेरणा स्पष्ट करतांना महादेव वाळुंज लिहितात, "आईची कहाणी अतिशय वेदनामय आपल्याला खूप वेदना होतात, पण नकळत उभे राहण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच माझ्या आईची ही कहाणी तिनं सांगितली तशी... तर महादेव वाळुंज यांच्या आई लक्ष्मीबाई वाळुंज लिहितात, "कुणाला दुखावण्यासाठी, दोष देण्यासाठी वा कुणाचा अपमान करण्यासाठी नाही. फक्त सगळ्यांच्या ऋणांची दखल घेण्यासाठी, पोरांच्या आग्रहाखतर, माझ्या माणसांनी चाहूबाजूंनी लावलेल्या हातभारामुळेच माझा उद्ध्वस्त झालेला संसार व अनाथ झालेल्या पिलांचे जीवन फुलू शकलं. त्याची ही कहाणी जशी आठवली तशी. "यातून या पुस्तकामागील उद्देश आपल्या लक्षात येतो. आपल्या जीवनाच्या उभारणीत हातभार लावलेल्या माणसांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक निर्माण झाले आहे. या पुस्तकातील जीवनप्रवास अतिशय खडतर यातनामय, दुःखांनी भरलेला आहे. काही माणसांचं जीवन म्हणजे संकटांची मालिकाच असते. या दुःखाच्या मालिकेतही व्यक्ती स्वतःला, आपल्या कुटुंबाला घडवते. याचा प्रवास म्हणजे हे पुस्तक होय.

आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. यात पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक दिसते. स्त्रियांचे आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. या समीकरणाची उकल हे पुस्तक वाचताना होते. स्त्रीचा स्वाभाव हा संघर्षशील असतो. दुःखातून मार्ग काढत जाण्याची उपजत दृष्टी स्त्री मध्ये असते. त्यामुळे स्त्री खचून जात नाही. परिस्थितीशी ,संकटांशी दोन हात करण्याची अधिक शक्ती स्त्रीमध्ये असते. याची जाणीव या पुस्तकातून होते. हे पुस्तक समस्याग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोहचल्यास त्यांना ते नवी उमेद देऊ शकते. त्यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करु शकते. लक्ष्मीबाई वाळुंज यांचा जीवनप्रवास एक प्रेरक, उत्सह वाढवणारा, असा प्रवास आहे. जीवनाविषयी आस्था निर्माण करणारे हे पुस्तक आहे. दुःखात खंबीरपणे उभा राहण्याची आस या पुस्तकातून व्यक्त होते.

डॉ.महादेव वाळुंज यांना पुढील लेखन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !


डॉ. गणपतराव ढेंबरे,

मराठी विभाग

श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर ता. रावेर, जि.जळगांव

ई-मेल dhembregr@gmail.cor

भ्रमणध्वनी : - ९४२१०८१२७०

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

मराठा इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व : अहल्यादेवी होळकर , डॉ. गणपतराव ढेंबरे , रावेर , जि. जळगाव

'' मराठा इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व : अहल्यादेवी होळकर ''


प्रास्ताविक :-

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संपूर्ण भारत वर्षाच्या लोकमानसात श्रद्धेचे व आदराचे स्थान लोकमाता अहल्यादेवी होळकर यांनी निर्माण केले. भारतामध्ये स्त्रीने राज्यकारभार करण्याची अत्यंत प्राचीन परंपरा आहे. या स्त्री राज्यकर्त्या वेगवेगळ्या कार्यासाठी इतिहासात प्रसिद्ध आहेत. मध्ययुगीन इतिहासात 'स्त्री' राजकारणात वेगवेगळ्या भूमिकेत वावरताना दिसते. माता, पत्नी, बहीण या भूमिकांमध्ये राहून राजकारण करणाऱ्या अनेक स्त्रिया दिसतात. संपूर्णपणे राज्यकर्ती स्त्री म्हणून अहल्यादेवी होळकरांचा विचार करावा लागतो. राजकारणाच्या पटावर मुख्य भूमिकेत अहल्याबाई होळकर यांचे अस्तित्व होते. त्या राजकारणात होत्या; परंतु सत्तेच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांचा सहभाग कधीच नव्हता. पडद्यामागील राजकारणात अहल्याबाई होळकर महत्त्वाची कामगिरी बजावत. युद्धात सहभागी न होताही युद्ध जिंकण्याची कला अहल्याबाईंनी अवगत केली होती.

ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. या सर्व गुणांनी संपन्न अशा अहल्याबाई होळकर होत्या. भारतवर्षात अनेक महान राजे-महाराजे झाले. त्यांपैकी खूपच कमी लोकाभिमुख राजे झाले. या संख्येने कमी पण गुणवत्ता अधिक असणाऱ्या राज्यकर्त्यांपैकी अहल्याबाई होळकर या एक होत. अठरावे शतक हे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचे शतक होय. या शतकात मराठा सत्ता दिल्लीचे तख्त सांभाळत होती. अत्यंत उत्कर्षाचा काळ या शतकात मराठा सत्तेने अनुभवला. ७५% भारत देशावर हुकूमत करण्याची जादू या शतकात घडली. याच शतकात मराठा राजसत्तेला उतरती कळा लागली. या संपूर्ण शतकाची सक्रिय साक्षीदार म्हणून आपल्याला अहल्यादेवी होळकर यांचा विचार करावा लागतो.इ.स. १७३३ मध्ये अहल्याबाई होळकर ह्या होळकर घराण्यात विवाह होऊन इंदूर येथे आल्या. तो पहिले बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वाचा काळ होता. बाजीराव पेशव्यांना माणसाची चांगली ओळख होती. बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकर यांना संधी दिली. पुढे त्यांचे इंदूरला राज्य निर्माण झाले. या परंपरेला अतिउच्च शिखरावर नेऊन ठेवले. 

लोकमाता अहल्यादेवी होळकरांचा जीवनपट :

अहल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ ला 'चौंडी' या गावी झाला. त्यांच्या वडलांचे नाव माणकोजी शिंदे होते. मल्हारराव होळकरांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी विवाहाची तयारी सुरू केली. अहल्यादेवींना सून म्हणून मल्हाररावांनी पसंत केले. इ.स. १७३३ मध्ये खंडेराव होळकर यांचा अहल्यादेवींशी विवाह झाला. या काळात पहिले बाजीराव पेशवे राजकारणाच्या शिखरावर होते. एक अल्लड मुलगी ते यशस्वी शासनकर्ती स्त्री हा प्रवास अहल्यादेवींनी पूर्ण केला. या प्रवासात अनेक चढउतार आले. तरुण वयात आलेले विधवापण त्यांनी नेटाने सोसले. खंबीरपणे अहल्याबाई उभ्या राहिल्या. मालेराव व मुक्ताबाई या मुलांच्या संगोपनात व जनतेचा संभाळ करण्यात अहल्याबाईंचा जीवनप्रवास सुरू होता.

   भालेराव एक सर्वसामान्य वकूब असणारा व्यक्ती होता. त्यांचा मृत्यू वयाच्या बाविसाव्या वर्षी झाला. हा आघात अहल्याबाईंनी सहन केला. या प्रसंगामध्ये अहल्याबाई स्थितप्रज्ञ राहिल्या. कौटुंबिक सुखाचा विचार न करता अहल्याबाई प्रजेच्या सुखासाठी झटू लागल्या. आपल्या प्रजेला शांत, स्थिर, वैभवशाली राजवट अहल्यादेवींनी बहाल केली. एकूण अहल्यादेवींचा जीवनपट लक्षात घेतल्यास असे दिसते की त्या संपूर्ण राजवटीच्या साक्षीदार होत्या. राज्यकारभार चालवत असताना त्यांना कडू गोड अनुभवांना सामोरे जावे लागले. परकीय शत्रूंबरोबरच घरभेदींच्या हल्ल्यालाही तोंड द्यावे लागले.

तुकोजी होळकरांशी कधी संघर्ष करत तर कधी जुळवून घेत अहल्यादेवींनी राज्यशासन केले. तुकोजी व अहल्यादेवी कधी दूर गेले तर कधी एकत्र आले. अहल्यादेवींचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, श्रद्धाळू, कनवाळू स्वरूपाचा असल्यामुळे त्यांना शिलेदार तुकोजी होळकरांशी जुळवून घेता आले. अहल्यादेवींच्या जीवनप्रवासात मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, नाना फडणीस, माधवराव पेशवे यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मल्हाराव होळकर हे गुरूच्या रूपात त्यांना होते. मार्गदर्शक म्हणून मल्हाररावांचे योगदान मोठे होते. महादजी शिंदे हे शिंदेच्या राज्याचे वारसदार होते. पानिपतच्या युद्धात जीव वाचलेले महादजी शिंदे अहल्याबाईंच्या समकालीन होते. महादजी शिंदेंनी जीवनभर अहल्यादेवींशी स्नेह ठेवला. उत्तरेतील राजकारणात परस्परांना पूरक अशी भूमिका अहल्याबाई व महादजी शिंदे यांनी स्वीकारली. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात महादजी शिंदे व अहल्यादेवी होळकरांच्या मनात एकमेकांविषयी संदेह निर्माण झाला. नाना फडणवीसांनी अहल्याबाईंशी कधी नमते घेतले तर कधी चढेल भूमिका घेतली. वाद विकोपाला न जाऊ देण्याचे उपजत शहाणपण अहल्यादेवींच्या जवळ होते. अहल्यादेवींच्या जीवनाचा आपण गंभीरपणे अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनपटावर एवढेच म्हणता येईल की, “अहल्यादेवींचे जीवन ही एक संघर्षगाथा होती. तो एक अखंडितपणे सुरू असलेला 'आहुती यज्ञ' होता."

स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख शासनकर्त्या झालेल्या अहल्याबाई होळकरः -

 अठरावे शतक हे तसे स्त्रियांना बंधनात ठेवणारे शतक होते. स्त्री आणि शूद्र यांच्या जीवनाला फार कमी मूल्य होते. अहल्याबाई होळकर जन्माने 'स्त्री' आणि जातीने 'शूद्र' होत्या. या दुहेरी शोषणव्यवस्थेवर मात करीत अहल्यादेवी राज्यकर्त्या बनल्या. राघोबादादांशी दोन हात करण्याची तयारी दाखवत अहल्याबाईंनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. अठराव्या शतकाच्या एकूण वाटचालीत आपल्या असे लक्षात येते की, अहल्यादेवींच्या मागच्यापुढच्या काळात मराठेशाहीत अनेक कर्तृत्ववान स्त्रिया राजकारणात होत्या. त्या सर्व स्त्रिया सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत राहिल्या होत्या. अहल्याबाईंचे राज्यकारभारात येणे फार वेगळे होते. त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना राजकारणात आणले होते. त्यांच्या उपजत गुणांची दखल घेणारे सासरे अहल्याबाईंना लाभले होते. त्यामुळे त्यांचा राज्यकारभारात फार सहजपणे प्रवेश झाला आणि कारभाराचे शिक्षणही मिळाले.

अहल्याबाईंच्या राज्यकारभाराची प्रेरणा ही स्वार्थी कधीच नव्हती. जनकल्याणासाठी शासन ही गोष्ट त्यांनी महत्त्वाची मानली. अहल्याबाईंनी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी एक प्रतिज्ञा केली होती ती अशी, "माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत."

ही प्रतिज्ञा अहल्यादेवींनी जीवनभर पाळली. या प्रतिज्ञेच्या आधीन राहून त्यांनी राज्यकारभार केला. प्रजेला सुखी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत हे त्यांनी महत्त्वाचे मानले. सामाजिक बांधिलकी अहल्याबाईंनी महत्त्वाची मानली. अहल्याबाईंनी राज्यकारभार केला. परमेश्वराच्या सत्तेला त्यांनी फार महत्त्व दिले. परमेश्वराची सत्ता सर्वश्रेष्ठ सत्ता मानली. त्याच्यापुढे आपल्या कृतीचा लेखाजोखा देण्याची तयारी ठेवून त्या लोककल्याणकारी कार्य करत गेल्या. लोकाभिमुख राजकारण त्या करत गेल्या. म्हणून आजही भारतीय लोकमानसात अहल्याबाईंची प्रतिमा कायम आहे.

अहल्याबाई होळकर यांची लोकविधायक कार्ये : -

संपूर्ण भारतवर्षाला आदर्श वाटावे असे सुंदर रचनात्मक, सेवाभावी काम करून अहल्यादेवींनी भारताच्या इतिहासात अलौकिक स्थान निर्माण केले. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सामान्य लोकांना पोटाशी धरून त्यांच्यासाठी हे राज्य आहे, या भावनेतून राज्य उभे करणारी अहल्यादेवी होळकर ही अद्वितीय स्त्री होय. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या सेवेचा घालून दिलेला मार्ग ज्यांनी त्याच पद्धतीने पुढील काळात अंगीकारला व खऱ्या अर्थाने पुढे नेला. अशा राज्यकर्त्यांमध्ये पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचे नाव आपल्याला घ्यावे लागेल. नुसती महाराष्ट्र, मध्य प्रदेशालाच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाला आदर्श वाटावी अशी सुंदर रचनात्मक सेवाभावी कामे करून अहल्यादेवींनी भारताच्या इतिहासात अलौकिक स्थान निर्माण केले. स्वतःच्या महसूलाचा पैसा अहल्यादेवींनी राज्याच्या उभारणीच्या लोकोपयोगी कामात अधिक गुंतवला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या विहिरी, बारवा खोदल्या.

त्याकाळी दिल्ली ते कलकत्ता या रस्त्याचे मोठे काम त्यांनी पूर्ण केले. दळणवळणाचे महत्त्व अहल्याबाईंनी जाणले होते. रस्ते हे विकासासाठी गरजेचे असतात, हे ओळखून त्यांनी कितीतरी रस्ते तयार केले. सर्व देशभरातील मंदिरे त्यांनी आपली मानली व त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांची कायमची व्यवस्था करण्यासाठी दीर्घकालीन उत्पन्नाचा आधार त्यांनी दिला. गुणी माणसांना अहल्यादेवींनी राज्यात चांगली कामे दिली. त्यांचा आदर केला. स्वतःच्या राज्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनंतफंदी, सगनभाऊ यांच्यासारखे शाहीर, चित्रकार, शिल्पकार, स्थापत्यशास्त्रातील कलावंत यांना मोठा आश्रय देऊन मोठे करण्यासाठी त्यांनी बळ दिले. असे कार्य देशभराच्या लोकांसाठी, कलावतांसाठी केले. त्यांचा खरा इतिहास अजूनही पाहिजे त्या प्रमाणात लोकांसमोर आलेला नाही. येणे महत्त्वाचे आहे. कितीतरी मोठ्या गोष्टी योजनाबद्ध नियोजनाने अहल्याबाईंनी केल्या.

अहल्याबाईंचे फिरणे इंदूर, महेश्वर, उज्जैनच्या परिसरात होते; पण त्यांचे हिमालयाच्या केदारनाथापासून दक्षिणेच्या रामेश्वरापर्यंत आणि पूर्वीच्या जगन्नाथपुरीपासून पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत चालू त्यांचा प्रवास होता.त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर माणसे जोडली होती. एकूण त्यांच्या कार्याची प्रेरणाच मुळी लोककल्याण ही होती. लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अहल्यादेवींनी जीवन वेचले. या त्यागाचे स्मरण भारतवर्षाला कायम ठेवावे लागेल. भारतभर आपण भ्रमण केल्यास आपल्याला असे लक्षात की, अहल्यादेवी होळकरांविषयी अनेक लोककथा आहेत. लोकमानसात त्यांच्या कार्याची मुळे खोलवर रुजली आहेत. ते या कथांमधून आपल्या लक्षात येते. राजमाता अहल्यादेवींचा इतिहास लोकमानसात रुजला गेला आहे. अनेक आख्यायिका संपूर्ण भारतभर अहल्यादेवींविषयी पसल्याचे लक्षात येते.उत्तर भारतामध्ये हिंदी भाषक समाजामध्ये अहल्याबाईंच्या कार्याचा अमीट ठसाउमटलेला आपणांस जाणवतो. विधायक कार्यांतून अहल्याबाई जिवंत राहिल्या. त्यांच्या कार्याचे समाजमानसाने कायम स्मरण ठेवले आहे. विविध धार्मिक क्षेत्रांवर अहल्याबाईंनी केलेले कार्य आजही आपल्या नजरेत येते. तसे काही शेष -अवशेषांच्या खुणाआपल्या लक्षात येतात. 

समारोप : -

अहल्याबाई होळकर यांचे जीवन म्हणजे सत्तर वर्षांचे सुफळ संपूर्ण आयुष्य होय.दुःखाचे आघात सोसत मोठ्या धैर्याने पुढे गेलेले व्यक्तिगत जीवन होय.स्वकीयांकडून सन्मान घेत घेत त्यांच्याशी सामनाही देत देत पुढे गेलेले राजकीय जीवन असा हा जीवनाचा त्रिपदरी गोफ आहे.

संपूर्ण आयुष्यामध्ये अहल्याबाई होळकरांनी कपट कारस्थानी राजकारण केले नाही. त्यांची ओढ ही जनकल्याणकारी कार्ये करण्यात अधिक होती.सत्तेच्या चढाओढीत सहभागी न झाल्यामुळे शांत स्थिर राज्य अहल्याबाईंनी जनतेला दिले. अहल्याबाईंच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले व त्यांच्या अनाक्रमक धर्मशीलतेने माणुसकीचे कार्य केले. लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त केले.

अहल्याबाईंच्या चरित्राचा आढावा घेतल्यास आपणास असे लक्षात येते की, त्यांना समकालीन राजकारणाचे पूर्णपणे भान होते. परंतु त्यांनी राजकारणात रस घेतला नाही. किंबहुना त्यांना महादजी शिंदे, नाना फडणवीस, पवार, भोसले यांनी सहभागी करून घेतले नाही. याचे कारण होळकरांच्या वतीने तुकोजी होळकर युद्धाची, सैन्याची आघाडी सांभाळत होते. दुसरे कारण असे की, अहल्याबाई होळकर या स्त्री असल्यामुळे त्यांचा सहभाग न उतरता त्या जनकल्याणात सहभागी झाल्या.

अहल्याबाई होळकरांनी स्वतःच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी फ्रेंच सेनानी ड्युडूनेक याला फौजेत ठेवले होते. आधुनिक युद्धकला अवगत असणारे सैन्य उभारण्याचा मानस अहल्यादेवींचा होता. इंग्रजी सत्ता भारतवर्षाला गिळंकृत करीत असल्याचे भान अहल्यादेवींना होते. समकालीन राजकारणात मराठा सत्ताकेंद्रामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे इंग्रजांचे आगमन व त्यांची चढाई बाकी नेतृत्वांच्या लक्षात आली नाही. पुढील काळात त्याचे परिणाम अखंड भारतवर्षाला भोगावे लागले.

अहल्याबाई होळकर या काही सर्वगुणसंपन्न देवता नव्हत्या. त्यांनाही माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातील मराठा इतिहासातील त्या एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होत्या. असेच आपणाला म्हणावे लागेल.


"कुणी म्हणे लोकमाता; कुणी म्हणे तिज आई 

पुण्यश्लोक अहल्यादेवी, समाजाची समई.”


डॉ. गणपतराव ढेंबरे , 

मराठी विभाग ,                                                                        श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर,                                    मोबाईल क्रमांक : - ९४२१०८१२७०                                            ई-मेल :-dhembregr@gmail.com

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महात्मा फुले - डॉ.गणपतराव ढेंबरे

" शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महात्मा फुले "

शेतकऱ्यांचे प्रश्न हे न संपणारे आहेत. राजवटी बदलतात. शासनव्यवस्था बदलते, नेतृत्व बदलते; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न बदलत नाहीत. भारतीय इतिहासाचा गंभीरपणे मागोवा घेतल्यास आपल्या लक्षात येते की, कितीतरी राजवटी, शासनव्यवस्था बदलल्या; परंतु शेतकऱ्यांचे शोषण झाले नाही, अशी दुर्मिळच राजवट आपल्याला सापडते. भारताला कधी काळी सोन्याचा धूर निघणारा देश म्हटले जायचे. आजही भारत शेतीप्रधान देश आहे. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ७० वर्षांत भारतीय शेतकऱ्यांवर कोणते परिणाम झाले याचा विचार केल्यास शेतकरीहिताच्या कमी व अहिताच्या अधिक गोष्टी घडल्याचे आपल्या लक्षात येते. आता मुक्त अर्थव्यवस्थेत भारतीय शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहेत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारताच्या संपन्नतेने अनेकांना आकर्षित केले होते. या देशातील माती, पर्यावरण, पाणी, सूर्यप्रकाश, भूगर्भातील संपत्तीने मोघल, इंग्रज यांना आकर्षित केले. मुघल व इंग्रजांनी या देशात शतकानुशतके राज्य केले. या संदर्भात विनोबा भावे यांनी फार समर्पक शब्दांत विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, “मोघल इथं येण्यापूर्वी भारत स्वतंत्र गावांचा स्वतंत्र देश होता. मोघल आल्यानंतर भारत स्वतंत्र गावांचा गुलाम देश झाला. इंग्रज आल्यानंतर भारत गुलाम गावांचा गुलाम देश झाला. इंग्रज गेल्यानंतर भारत गुलाम गावांचा स्वतंत्र देश झाला." या सगळ्या कालखंडात शेतकरी गुलामच होता. आज भारत हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा गुलाम देश आहे. या गुलाम देशातील गुलामांचा गुलाम म्हणून शेतकऱ्यांचे स्थान आहे.

या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अचूक विश्लेषण केल्याचे आपल्या लक्षात येते. आतापर्यंतच्या एकूण भारतीय परंपरेत शेतीचा एवढ्या गंभीरपणे कोणी विचारच केला नव्हता. फुले यांच्या समकालीन सुधारकांनाही कधी शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल विचार करावा असे वाटले नाही. या देशातील एकूण परंपराच अशी की पुस्तकी, शाब्दिक ज्ञानाची ओझी वाहणारे श्रेष्ठ आणि संबंध अर्थव्यवस्थेचा कणा वाहणारा कष्टकरी समाज मात्र उपेक्षित! अप्रतिष्ठित ! महात्मा फुले यांनी शेतकरी कष्टकरी हा प्रतिष्ठित असला पाहिजे आणि शेती ही उत्तम केली पाहिजे यादृष्टीने प्रथमतःच विचार मांडले.महात्मा फुले यांनी आपली बांधिलकी सतत उपेक्षित वर्गाबरोबर जाहीर केली. सर्वसामान्यांचे प्रबोधन, शूद्रांतिशूद्रांच्या मुक्तीचा प्रचार आणि शिक्षण प्रसारातून समाजोद्धार ही महात्मा फुले यांच्या वाङ्मयनिर्मितीमागील प्रधान प्रेरणा होती. महात्मा फुले यांच्या समकालीन कालखंडात बहुजन समाजाचा मुख्य व्यवसाय 'शेती' हाच होता. अठरापगड जातीचे सर्व लोक शेती व्यवसायाशी निगडित होते. शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य, कुचंबणा, शोषण महात्मा फुले यांच्या अनुभवांचा भाग होता. या सर्वांच्या दुःखाला कोण जबाबदार आहे? हा प्रश्न महात्मा फुले यांना नेहमी पडत होता. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महात्मा फुले यांनी चिंतन केले. या चिंतनाचा भाग म्हणजे फुलेंच्या साहित्यकृतीतून व्यक्त होणारा शेतकऱ्यांचा प्रश्नविषयक विचार होय. महात्मा फुलेंच्या साहित्याला सामाजिक संदर्भ आहे. तो संदर्भ लक्षात घेऊन महात्मा फुलेंच्या साहित्याचा विचार करावा लागतो.

आपल्या आजूबाजूच्या समाजाची स्थिति-गती नेमकी कशी आहे याचे अचूक भान महात्मा फुल्यांना होते. शेतकऱ्यांच्या अधोगतीस त्यांचे अज्ञान, अशिक्षितपणा जसा कारणीभूत आहे; तशा अनेक गोष्टीही कारणीभूत आहेत. यातील एक भाग म्हणजे येथील सरकार किंवा शासनप्रणाली. दुसरे कारण म्हणजे लहरी निसर्ग आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील धर्मव्यवस्था. शेतकऱ्यांचे धर्माच्या नावाखाली शोषण केले जाते. वरील सर्व घटकांच्या शोषणव्यवस्था महात्मा फुले यांनी त्यांच्या साहित्यात उलगडून दाखविल्या आहेत. उच्चभ्रू समाजाचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा नेहमीच उदासीन दृष्टिकोण असतो. किंबहुना विरोधच करण्याकडे उच्चभ्रू समाजाचा कल असतो. हा असा दृष्टिकोण असण्यामागे उच्चभ्रू समाजाची मानसिकता व आर्थिक हितसंबंध असतात. याचे परखड विश्लेषण महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांबद्दल अतिशय पोटतिडकीने लिहिले आहे. फुले हे एकमेव असे समाजचिंतक आहेत की, ज्यांनी प्रथमत:च शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. नुसते समजावून घेतले असे नाही तर या प्रश्नांबद्दल एक सहानुभूतिपूर्वक मानवतावादी दृष्टिकोण त्यांनी प्रगट केला. योग्य त्यादृष्टीने ते या प्रश्नांकडे पाहू शकले. महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आस्थेविषयी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात की, "खरे म्हणजे महात्मा फुल्यांचे एकूण लेखनच मुळी शेतकरी, कष्टकरी यांचा आक्रोश शब्दांकित करणारे आहे. 'शेतकऱ्याचा आसूड'मध्ये तर अधिक धारदार, अधिक टोकदार, अधिक स्फोटक आणि विस्तारित स्वरूपात आहे. यादृष्टीने 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ एकूण महात्मा फुले यांच्या वाङ्मयसंभारात मोलाचा ठरावा." वरील विचारात डॉ. कोत्तापल्लेंनी महात्मा फुलेंच्या लेखनाचे मर्म उलगडून दाखविले आहे. महात्मा फुले यांच्या साहित्यामध्ये उपेक्षित कष्टकरी समाज केंद्रस्थानी होता हे यातून लक्षात येते.महात्मा फुले समकालीन कालखंडातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा जसा विचार करतात तसे ते इतिहासातही शेतकऱ्यांच्या दुःखाची मुळे शोधतात. अनेक शतकांपासून शेतकरी दैन्यावस्थेतच जगतो आहे. ऐतिहासिक काळातील त्यांच्या दैन्याचे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण महात्मा फुले यांनी अनेक ठिकाणी केले आहे. त्यांच्या 'इशारा' या ग्रंथात महात्मा फुले यांनी इतिहासामधील शेतकरी जीवनाचा शोध घेतला आहे. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ जोतीरावांनी १८८३ साली लिहिला. शेतकऱ्यांच्या खालावलेल्या परिस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करून आपल्यापरीने त्याची कारणमीमांसा करणारा ग्रंथ पाच प्रकरणांत विभागलेला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, जुन्नर, ओतूर वगैरे भागांत प्रत्यक्ष हिंडून या ग्रंथाचे जाहीर वाचन आपण केले आणि त्यातील तथ्यांश पडताळून पाहिला अशी माहिती लेखकानेच लिहून ठेवली आहे. चक्षुर्वैसत्यम माहितीवर आधारित असे वर्णन असल्यामुळे ते अत्यंत प्रत्ययकारी उतरले आहे. 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथाविषयी भा. ल. भोळे म्हणतात की, “शेतकरी वर्गाचा जीवनक्रम आणि शेतीविषयक प्रश्न यांचे इतके समग्र, सखोल आणि आस्थेवाईक चित्रण जोतीरावांपूर्वी बहुधा कोणीच केले नसावे. विशेषत: मध्यम व कनिष्ठ शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक वस्तुस्थितीचे असंख्य तपशील या ग्रंथाच्या पानोपानी शब्दांकित केले आहेत. या शेतकऱ्यांची दुरावस्था किती भीषण आहे, ती तशी होण्याची कारणे कोणती आहेत आणि त्यांचे निराकरण कोणत्या उपायांनी होऊ शकेल, याचा ऊहापोह जोतीरावांनी या ग्रंथात केला आहे."

या मतावरून आपल्या लक्षात येते की, शेतकरी जीवन हा महात्मा फुलेंचा आस्थेचा व चिकित्सेचा भाग होता. शेतकऱ्यांसमोरील आर्थिक, सामाजिक, धार्मिक प्रश्नांचा विचार महात्मा फुले या ग्रंथात करतात. केवळ प्रश्न मांडून महात्मा फुले थांबत नाहीत तर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते उपाय सांगतात. या ग्रंथात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी सांगितलेले उपाय आजही उपयुक्त असल्याचे आपल्या लक्षात येते. भारतातील शेती ही राज्यकर्त्यांच्यादृष्टीने नेहमीच लुटीचे साधन असलेली दिसते. मुगल राजवट, इंग्रजांच्या राजवटीत शेतकऱ्यांची युद्धकाळात प्रचंड लूट केली गेली. तसेच शेतीवर प्रचंड 'कर' लावून शेतकऱ्यांचे अप्रत्यक्ष शोषणकरण्याचे काम राज्यकर्ते करत होते. स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्यांची ही लूट सुरूआहे. भारतातील अनेक कायदे हे शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत.शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांचे स्वरूप आपण लक्षात घेतले तर असे दिसते की, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, धार्मिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक प्रश्न, मानसिक प्रश्न यांत शेतकरी दबून गेल्याचे आपल्या लक्षात येते. शेती हा व्यवसाय आहे. अशा दृष्टीने भारतीय शेतकरी शेतीकडे पाहत नाहीत. शेतकरी शेतीला मातेच्या श्रद्धेने पूजत आला आहे; यामुळे तोटा झाला तरी तो शेतीपासून अलिप्त होत नाही. पुनःपुन्हा तोच तोट्याचा व्यवसाय तो करत राहतो. यातून शेतकरीवर्गाला असहाय्यतेचे पराभूत जीवन जगावे लागते.वरील सर्व प्रश्नांचा विचार महात्मा फुले अतिशय गंभीरपणे करतात. शेतकऱ्यांच्या ठिकाणी असणारे अज्ञान, अडाणीपण यांच्यामुळे तो नडला जातो, तो भरडला जातो. यातून शेतकऱ्यांनी बाहेर पडले पाहिजे.असे मत महात्मा फुले मांडतात. आजही धर्मव्यवस्था टिकून आहे. ती अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांच्या शोषणास जबाबदार आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात राजकीय नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या रक्ताचा दाखला देऊन मते मागितली व ते विजयी झाले; पण या राजकीय नेतृत्वाने आपल्या बापाचा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. घराबाहेरील लोकांशी दोन हात करणे सहज शक्य असते; परंतु घरभेदी मंडळींशी सामना करणे अतिशय कठीण असते. महात्मा फुलेंच्या कालखंडात शेतकरी विरोधकाची जी भूमिका भट, ब्राह्मण बजावत होते तीच भूमिका आज शेतकऱ्यांच्या रक्तांच्या वंशजांनी बजवावी ही खरी शोकांतिका आहे. घरभेदीशी लढताना शेतकरीवर्गापुढील संघर्ष अतिशय तीव्र झाला आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचे अधिष्ठान स्वीकारून पुढील काळात शेतकऱ्यांनी लढा लढल्यास नवनिर्माण, विधायक विजय फार दूर नाही. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची वास्तव चिकित्सा केली. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा मुक्तिग्रंथ आहे. या ग्रंथाची चिकित्सा करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, "माणसाच्या भौतिक जीवनाचा अन्न, वस्त्र उत्पादन हा आधार आहे. म्हणून मानवी समाजातील शेतकरी समाज निरोगी व बळकट असला पाहिजे. आधुनिक समाज हा औद्योगिक क्रांतीच्या आधारावर उभारलेला असतो; परंतु शेतकरी समाजाचे बळ त्याला आवश्यक असते. हा समाजशास्त्रीय तात्त्विक दृष्टिकोण जोतीरावांनी ध्यानात धरून 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ लिहिला व प्रसिद्ध केला." तर्कतीर्थ जोशींच्या या मतातून फुलेंच्या लेखनाचे स्वरूप आपल्या लक्षात येते. आपले लेखन हे समाजाच्या हितासाठी असावे हे महात्मा फुलेंचे आग्रही मत होते. आपले लेखन हे केवळ साधन आहे, साध्य नव्हे ! या विचारांनी महात्मा फुल्यांनी लेखन केले. समाजाला योग्य दिशा दाखवून प्रश्न मांडण्यासाठी, समस्या सोडवणुकीसाठी महात्मा फुले लेखन करत. वैश्विक पातळीवरील शेतकऱ्यांचे महत्त्व महात्मा फुल्यांनी लक्षात घेतले होते. माणसाच्या भौतिक जीवनाचा आधार शेतकरी हाच आहे. या शेतकऱ्याचे समाजातील स्थान हे महत्त्वाचे असते; परंतु दुर्दैवाने शेती व शेतकऱ्यांकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काही उपाय सुचविलेले आहेत. महात्मा फुले ह्या सुधारणांविषयी म्हणतात, खरोखर या देशातील सर्व लोकांची एकी करून या देशाची उन्नती करणे आहे तर प्रथम त्यांनी आपल्या विजयी व पराजितांमधील चालत आलेल्या दुष्ट धर्मास जलसमाधी देऊन त्या जुलमी धर्माने नीच केलेल्या शूद्रादी, अतिशूद्र लोकांसमक्ष उघडरीतीने आपल्या वेदान्त मतासह जातीभेदाच्या उरावर थयथया नाचून कोणाशी भेदभाव न ठेविता, त्यांच्याशी कृत्रिम करण्याचे सोडून निर्मळपणे वागू लागल्याशिवाय सर्वांची खरी एकी होऊन या देशाची उन्नती होणे नाही." या विचारांमधून महात्मा फुले 'धर्म' या गोष्टीला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जबाबदार मानतात. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी महात्मा फुले खालील उपाय सांगतात. शेतकऱ्यांनी आचरण सुधारावे. उदा. बहुपत्नीत्व, बालविवाहाला नकार, शूद्र शेतकऱ्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी कष्टकरी वर्गातून पुढे आलेले शिक्षक नेमावेत. शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या द्याव्यात. तसेच ते शेतीची अवस्था सुधारण्यासाठी काही उपाय सांगतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना यंत्राद्वारे शेती करण्याचे शिक्षण देणे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे. जमिनीची धूप थांबण्याचा बंदोबस्त करणे. पाणलोटाच्या बाजूने नालीबंधारे बांधणे. तलाव तळी बांधणे. धरणे बांधणे. पाण्याच्या स्रोतांचा शोध घेणे. वनखात्याच्या अतिरिक्त जमिनी कसण्यासाठी देणे. शेतीविषयक प्रदर्शन भरविणे. शेतकऱ्यांमध्ये विविध पिकांसंदर्भात स्पर्धा घेणे. त्यांना बक्षीस देणे. शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. शेतीसंदर्भातील उपयुक्त ग्रंथांची निर्मिती करणे. सैन्य व पोलिस दलातील मनुष्यबळ शेतीसाठी वापरणे. शासनातील अनुत्पादक घटकांवरील खर्च कमी करून शेतीसाठी वापरणे. यासारखे उपाय महात्मा फुले सुचवितात. हे सगळे उपाय आजही फार उपयुक्त असल्याचे आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७o वर्षांत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये महात्मा फुले यांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंब केल्याचे लक्षात येते. पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम, पाटबंधारे विभागाचे काम, पशुपालनाच्या विविध शासकीय योजना यातून महात्मा फुले यांनी सांगितलेले विचारच स्वीकारल्याचे आपल्या लक्षात येते. यातून महात्मा फुलेंच्या दूरदृष्टीपणाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.

भारतातील मागील काही वर्षांतील राजकीय नेत्यांच्या भाषणांचा अभ्यास केल्यास आपल्या हेच लक्षात येते की, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे उपाय सांगितले आहेत तेच उपाय राजकीय नेते पुन्हा नव्याने सांगताना दिसतात. हे उपाय सांगत असताना थोडाफार तपशील इकडे तिकडे होत असला तरी नेत्यांच्या विचाराला महात्मा फुल्यांनी सांगितलेले उपाय दिशा देत असावे असे वाटते. यात महात्मा फुल्यांच्या विचारांची त्रिकालाबाधित सत्यता आपल्या लक्षात येते.

शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे जीवन गंभीरपणे समजावून घेणे गरजेचे आहे. शेतीकडे केवळ एक व्यवसाय म्हणून न पाहता एक सामाजिक गरज म्हणून लक्ष देणे आवश्यक आहे. आजही भारतातील साठ ते पासष्ठ टक्के जनता शेतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असताना शेतीकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांचे जीवन अस्थिर करण्यामध्ये सामाजिक व्यवस्था व मतलबी शासनप्रणालीचा हात आहे. या दोन्हींच्या भूमिका स्वार्थकेंद्रित असल्यामुळे शेतकरी भुकेकंगाल झाला आहे. एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले या दोन्ही व्यवस्थांचा भ्रष्ट चेहरा समोर आणतात. या समाजसुधारकाच्या विचारांचे हत्यार पुन्हा उपसण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याच्या शिक्षित झालेल्या पिढीने बंड करण्याचे दिवस फार लांब नाहीत. हे बंड विनाशक नसून विधायक असेल. जगाच्या पोशिंद्याला न्याय मिळवून देणारे असेल. ते सकारात्मक सर्जनशील बंड असेल. त्याला समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा असेल असे वाटते. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनामिमित्त त्यांच्या विचाराला व कार्याला शतश: अभिवादन करतो..

डॉक्टर गणपतराव ढेंबरे                                                    

मराठी विभाग                                                                         श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर,                                    मोबाईल क्रमांक : - ९४२१०८१२७०                                            ई-मेल : -dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...