सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

महानुभाव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य

 महानुभाव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य 


डॉ.गणपतराव ढेंबरे 

सहयोगी प्राध्यापक,

मराठी विभाग,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, ता.रावेर ,जि. जळगाव 

पिन -४२५५०८

मोबाईल नंबर -९४२१०८१२७० ई-मेल-dhembregr@gmail.com


प्रस्तावना : - 

साहित्य कोणत्याही काळातील असले तरी राजकीय घडामोडी सांस्कृतिक पर्यावरण आणि समाजजीवन यांच्या प्रभावापासून ते अलिप्त राहू शकत नाही. महानुभाव संप्रदाय हा एक मराठी सांस्कृतिक पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक होय. महानुभाव संप्रदायाचे तत्त्वज्ञान ,अचारधर्म, विचार प्रणालींचा प्रभाव महाराष्ट्रीय समाज जीवनावर दृढ काळासाठी झाला. किंबहुना आजच्या समाजाच्या धारणा, मूल्य, विचारधारांवर महानुभव संप्रदायाचा प्रभाव आहे. बाराव्या  शतकातील एकूण समाजजीवनाच्या सांस्कृतिक विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या महानुभव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य ठळकपणे अधोरेखित करणे. हे या संशोधन लेखाचे उद्दिष्ट आहे.


 मध्ययुगीन कालखंडात मराठी समाजाचे समीक्षण केले असता, महानुभव संप्रदाय आणि समाजजीवन परस्परोपजीवी असल्याचे लक्षात येते. भारतावर झालेल्या इस्लामी आक्रमणाने या देशात केवळ राजकीय स्थित्यंतर घडवून आणले नाही. तर भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनावरही या आक्रमणाचे खोलवर परिणाम झाले. इस्लामी सत्ता या देशात स्थिर होण्यापूर्वी कित्येक परकीयांनी या देशात वेळोवेळी निरनिराळ्या भागात आपली राज्य स्थापन केली होती. परंतु या राजवटीमुळे सांस्कृतिक व सामाजिक जीवनात स्थित्यंतर झाले नाही. प्रदेशातून आलेले हे राज्यकर्ते भारतातील जीवन आणि संस्कृती यांच्याशी लवकरच समरस झाले. कालांतराने त्यांचे परकेपण इतिहास जमा झाले. या राजसत्तांपैकी कित्येकांनी भारतीय राजनीतीनुसार 'राजधर्मा 'चे पालन केले. इस्लामी राजवटीचे उद्दिष्ट वेगळे होते. यातून राजकीय संघर्षा बरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक ,सामाजिक क्षेत्रातही संघर्षाचे वातावरण महाराष्ट्रभर निर्माण झाले. या संघर्षप्रवन कालखंडात महानुभव संप्रदायाचे सामाजिक ,सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्य अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.



महानुभाव ग्रंथकारांची साहित्य निर्मितीचे स्वरूप : -

 तेराव्या शतकातील महानुभवांच्या वाङ्मय निर्मितीने मराठी वाङ्मयाला समृद्ध केले. मराठीत गद्य चरित्र लेखनाचा मुहूर्तमेढीचे श्रेय महानुभाव संप्रदायाचे आहे. म्हाइंभट्टांने स्मरणशक्तीतून आणि सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेऊन लिहिलेले 'लीळाचरीत्र ' हे चरित्रलेखनाचा आदर्श तर ठरलेच, पण उभ्या मराठी वाङ्मयाचा मानदंड बनून राहिले. यादवकालीन सांस्कृतिक जीवनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ एक महत्त्वाची सामग्री ठरला आहे. कवी नरेंद्र, भास्करभट्टासारखे रसिक कवी, दामोदर पंडित, विश्वनाथ पंडित महदंबा, केशिराज व्यास यांच्या साहित्यरचनेतून मराठी वाङ्मयात मोलाची भर पडली.  मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांची सुदृढता विकसित करण्यात महानुभव संप्रदायाचा मोठा वाटा आहे.


 महानुभव संप्रदायातील विविध ग्रंथकारांनी संख्यात्मक दृष्ट्या व गुणात्मक दृष्ट्या सकस अशी ग्रंथ निर्मिती केली. या ग्रंथ निर्मितीचे स्वरूप विविधांगी असे आहे. रचनात्मकदृष्ट्या व आशयदृष्ट्या ही वाङ्मय निर्मिती सकस व बहुकेंद्रीय अशी आहे. महानुभाव संप्रदायातील ग्रंथकारांनी प्रबंधकाव्ये,चरित्रे,दैनंदिनी, प्रवासवर्णन,स्थलवर्णन,आख्याने लापनिका, दृष्टांत,धवळे,पदे,आरत्या, धुवे असे अनेक गद्य व पद्य वाङ्मयप्रकार अतिशय नीटसपणे, कलात्मकपणे हाताळलेले दिसतात. यातील काही ग्रंथांना गीता आणि भागवतग्रंथ यातील विचारांचा आणि विषयांचा आधार आहे. या ग्रंथ निर्मितीच्या केंद्रस्थानी श्रीचक्रधर श्रीगोविंद प्रभू आणि श्रीदत्तात्रेय हे आहेत. मराठी ललित गद्याची मुहूर्तमेढ महानुभावांनी रोवली. यादवकालीन राजकीय,धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे दर्शन महानुभव संप्रदायाच्या साहित्यातून घडते. त्या काळातील मराठी भाषा,बोली,म्हणी, वाक्प्रचार,लोककथा,मिथके यांचे समृद्ध दर्शन महानुभाव साहित्यातून घडते. आजही तेराव्या शतकातील महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी महानुभाव संप्रदायाचे साहित्य एक प्रधान साधन मानले जाते. इतिहास, लोकपरंपरा,लोकभाषा,समाजशास्त्र,

तत्त्वज्ञान,तत्कालीन राजकारण, अर्थकारण यांच्या अभ्यासासाठी महानुभाव संप्रदायाची ग्रंथसंपदा एक महत्त्वपूर्ण ठेवा ठरते. सर्व महानुभाव साहित्य पंथनिष्ठेवरच आधारलेले आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. पंथांच्या प्रवर्तकांची चरित्रे,लीळा,वचने, आख्यायिका,पंथीय तत्त्वज्ञान आणि आचारधर्म जतन करण्यासाठी महानुभाव वाङ्मयाची निर्मिती झाली.


महानुभाव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य : - 

 सर्वसामान्य जनतेच्या अध्यात्मिक विकासाचा मार्ग मोकळा करून देणे हे महानुभाव संप्रदायाचे प्रमुख उद्दिष्ट होते.ज्ञान आणि भक्ती या दोन तत्त्वांच्या पायावर महानुभाव संप्रदायाची स्थापना झालेली होती. या संप्रदायाने जनसामान्यांचा आध्यात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. समतावादी महानुभाव संप्रदाय समाजातील सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय ठरला. समत्त्वदृष्टीने सर्वांना योग्य होईल असा आत्मविकासाचा साधन मार्ग उपलब्ध करून देण्याचे महानुभाव संप्रदायाचे कार्य त्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे मानावे लागेल. महानुभाव संप्रदायाची उभारणी ही समन्वयाच्या उदात्त भूमिकेतून झाली होती. त्यामुळे विविध तत्त्वविचार,ग्रंथ,आचारधर्माचा समन्वय साधून हा संप्रदाय लोकप्रिय झाला. नाथ संप्रदायातून विशुद्धारणाचे महत्त्व,समत्वदृष्टी,जनसाधारणांच्या उन्नतीसाठी लोकभाषेचा पुरस्कार इत्यादी गोष्टी महानुभाव संप्रदायाने स्वीकारल्या होत्या. त्याचबरोबर वैष्णव परंपरेतून कृष्णभक्ती,अवतारांची कल्पना,मायाविचार इत्यादी तात्त्वीक गोष्टींचा स्वीकार महानुभाव संप्रदायांनी केला.महानुभाव संप्रदायाने काही गोष्टी जैन परंपरेतून घेतल्या होत्या. या वेगवेगळ्या परंपरेतील उदात्त मूल्य, विचार,ज्ञान यांच्या समन्वयातून महानुभाव संप्रदायाची उभारणी झाली होती.

 अहिंसा तत्त्वाचे महत्त्व महानुभाव संप्रदायात विशद करण्यात आले आहे. अहिंसा हे महानुभवीय चतुसूत्रीतील महत्त्वाचे तत्त्व होय. या अहिंसेचे पालन अशा रीतीने करावे की, 'तुमचेनि मुंगी रांड न होआवी' ,आपणास 'मारिता पूजीता समानचि असावा ' ,अशी तत्त्वे महानुभाव संप्रदायातून येतात. ही विचारधारा जैन ,बौद्ध तत्त्वविचारांशी साम्य राखणारी आहे. जगाला अहिंसेचे महत्त्व पटत आहे. लोक हिंसेचा मार्ग टाळत आहेत. महानुभावांनी अहिंसेचे तत्त्व अतिशय काटेकोरपणे सांगून आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता. सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात अहिंसा महत्त्वपूर्ण असते. शांती, अहिंसा या चिरतत्त्वांचा अनुनय महानुभाव संप्रदाय सांगतो. 

महानुभाव संप्रदायाने विचार प्रचारासाठी लोकभाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा स्वीकार केला. संस्कृतमध्ये  ग्रंथरचना करावी हा शिष्टमान्य संकेत रूढ असण्याच्या या काळात चक्रधरस्वामी व नागदेवाचार्य यांनी आपल्या ग्रंथकारांना कटाक्षाने मराठीतच ग्रंथरचना करण्यास सांगितले.'आपल्या स्वामीचा सामान्यु परिवारू ' नागविला जाऊ नये, काठिन्यात चुकवून त्याला परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी 'महाराष्ट्रीय निरूपिले कीं गा' असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मराठी भाषेला महानुभाव आपली धर्मभाषा मानत होते. सर्वसामान्यांपर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी मराठी भाषेचा जोरदार पुरस्कार महानुभावांनी केला. मराठी भाषेचा त्यांनी आग्रह धरला. महानुभावांना मराठी भाषेचा अभिमान होता. सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी मराठी भाषेचा आग्रह महानुभवांनी धरला. बहुजन समाजाच्या मागासलेपणामागे संस्कृत भाषेचा दुराभिमान कार्यरत होता. हे मर्म महानुभावांनी ओळखले होते. केसोबासांनी नागदेवांना एकदा संस्कृतात  प्रश्न विचारला असता 'पंडिता :केशवदेया : तुमचा आस्मात कस्मात मी नेणें गा: मज चक्रधरे निरूपिली मऱ्हाटी : तियाची पुसा ': या शब्दात नागदेवाचार्यांनी मराठी भाषेविषयी आंतरिक कळवळा व्यक्त केला. अशाच एका प्रसंगी  संस्कृत अभिमानी केसोबासांना उद्देशून ते म्हणाले, 'नको गा केशवदेया I येणे माझिया म्हातारिया नागवतिल ' हे उद्गार महानुभाव संप्रदायाचे मराठी भाषेवरील प्रेम अभिव्यक्त करणारे आहेत. गद्य आणि पद्य या दोन्ही स्वरूपात महानुभवांनी केलेले कार्य मराठीच्या इतिहासात अद्वितीय आहे. महानुभाव संप्रदायांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आध्यात्मिक पातळीवर त्याग केला. वैचारिक पातळीवर महानुभावांनी जातीव्यवस्था नाकारली. महानुभाव संप्रदाय हा एक ज्ञानमार्ग होता. व्यासंगी असणाऱ्या महानुभावांनी जाती व्यवस्थेतील फोलपण लक्षात घेऊन जातीव्यवस्था नाकारण्याचे कार्य केले. तत्कालीन सामाजिक चौकटीला स्वीकारून धर्म सुधारण्याचा मार्ग महानुभावांनी स्वीकारला होता. तात्त्विक पातळीवर महानुभवांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला. महानुभव संप्रदायांमध्ये विविध जातीतील अनुयायींचा समावेश असल्याचे दिसून येते. संप्रदायातील दीक्षितांनाच केवळ 'चातुर्वर्ण्य चरेद् भैक्ष्यम ' असा विचार मांडून महानुभवांनी आपले पुरोगामीत्त्व सिद्ध केल्याचे दिसून येते. महानुभावांनी स्त्रिया,शूद्र,सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय केली. महानुभाव पंथाने धर्मशास्त्र व साहित्याचे दार समाजातील उपेक्षितांसाठी खुले केले.


 महानुभाव संप्रदायांनी स्त्रियांना साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. महदंबा,उमाईसा यासारख्या विदुषी स्त्रिया महानुभाव संप्रदायाच्या उदारमतवादी विचारप्रणालीतून निर्माण झाल्या. उत्तम साहित्यकृती स्त्रियांनी त्या काळात निर्माण केल्या. स्त्रियांना महानुभावांनी  विचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले. महानुभाव संप्रदायाचे हे सामाजिक कार्य काळाच्या खूप पुढे होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार कृतीत उतरवणारा महानुभाव संप्रदाय विवेकवादी ज्ञानवादी ठरतो. या योगदानातून महानुभाव संप्रदायाने आद्य मराठी कवयित्री महदंबा घडवली.असे आपल्याला म्हणता येईल. परकीय आक्रमणांनी दूषित झालेल्या पर्यावरणात आपल्या विचारांची साहित्यकृतींच्या संवर्धनासाठी महानुभवांनी लिपींचे उपयोजन केले. चक्रधर स्वामींच्या नंतर ६०-७० वर्षांनी मात्र मराठीतील हे गद्य पद्य भंडार सकळ,सुंदर इत्यादी लिपींच्या माध्यमातून बंदिस्त झाले. सुमारे सातशे वर्षे मराठी समाज या ज्ञान ठेव्यापासून वंचित राहिला. अर्थात अशा बंदिस्तपणामुळे हे वाङ्मय विपर्यस्त बनले नाही. ते मूळ स्वरूपात अभंग,अखंड राहिले. यातून तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे महानुभाव संप्रदायाचे सांस्कृतिक कार्य मोलाचे वाटते.


 समारोप : -

 प्रस्तुत लेखात महानुभाव संप्रदायाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. एक धार्मिक संप्रदाय म्हणून या संप्रदायाकडे पाहता येत नाही. तर तेराव्या शतकातील एक प्रबोधन चळवळ म्हणून महानुभाव संप्रदायाकडे पाहता येते. महानुभाव संप्रदायाचे मराठी संस्कृतीसाठीचे योगदान भव्य दिव्य आहे. साहित्यनिर्मिती,सामाजिक सुधारणा,धर्म सुधारणा या संदर्भात महानुभव संप्रदायाने उदारमतवादी,विवेकशील, ज्ञाननिष्ठ परंपरा जन्माला घातली. महानुभाव संप्रदायाची सामाजिक, सांस्कृतिक फलश्रुती मोठी आहे. महानुभाव संप्रदायातील ग्रंथकारांनी आपल्या परतत्त्वस्पर्शी प्रतिभेने मराठी साहित्याची थोर परंपरा निर्माण करून महाराष्ट्रातील लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. समूहमनाला आवाहन करणाऱ्या महानुभाव साहित्याची तथा लोकसाहित्याची परंपरा आजही दुःखितांचे,शोषितांचे पतितांचे  दुःख कमी करण्याचे कार्य करते. महानुभावांच्या पारमार्थिकृत साहित्याने महाराष्ट्र संस्कृतीची जडण - घडण केलेली आहे.अभिजात वाङ्मयनिर्मितीचे कार्य महानुभावांनी केले. महानुभाव सांप्रदायाचे वाङ्मय हे बहुस्तरीय विविधांगी स्वरूपाचे आहे. वाङ्मयनिर्मितीतील विपुलता,अभिजातपणा लक्षात घेण्यासारखा आहे. महानुभाव संप्रदायाने समन्वयवादी भूमिका ठेवली. विविध विचार,तत्त्व यांचे मनोमिलन महानुभवांनी घडवून आणले. मराठी भाषेच्या उपयोजनातून महानुभवांनी या भाषेला समृद्धता, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. जातीव्यवस्थेला महानुभवांनी नकार दिला. महानुभवानी स्त्री स्वातंत्र्य, प्रतिष्ठा यांचा आग्रह धरला. सांकेतिक लिपींचे निर्मिती कार्य महानुभावांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करते. या ठळक मुद्द्यांच्या आधारे महानुभावांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य विशद करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.


 संदर्भ ग्रंथ : -

१. कुलकर्णी श्रीधर रंगनाथ ,मध्ययुगीन मराठी साहित्य एक पुनर्विचार ,राजहंस प्रकाशन ,पुणे, १९९५

२. गोसावी र. रा. पाच भक्तीसंप्रदाय, मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे,आवृत्ती दुसरी,१९९८ 

३. भावे विनायक लक्ष्मण ,महाराष्ट्र सारस्वत ,पॉप्युलर प्रकाशन ,मुंबई, सहावी आवृत्ती १९८२

४. सरदार गं.बा., संत वाड्मयाची सामाजिक फलश्रृती, लोकवाङ्मय गृह प्रकाशन ,मुंबई ,नववी आवृत्ती २०१४

५. तुळपुळे शं.गो.,स्मृतीस्थळ,अनमोल प्रकाशन ,पुणे ,दुसरी आवृत्ती १९९०

६. नशिराबादकर ल.रा., प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ,फडके प्रकाशन, कोल्हापूर ,सहावी आवृत्ती १९९७

----------------------------------------------

रविवार, १० एप्रिल, २०२२

सरदार एक संघर्षची गाथा

 सरदार एक संघर्षची गाथा 


डॉ.गणपतराव ढेंबरे , रावेर


प्रास्ताविक : -

 साहित्य आणि इतिहास ही अभिव्यक्तीची दोन स्वायत्त माध्यम आहेत. भाषा हे त्या दोहोंचेही माध्यम आहे. तर मानवी जीवन हे त्यांचे आशयद्रव्य आहे. साहित्य आणि इतिहास या स्वतंत्र विद्याशाखा आहेत. साहित्य ही एक ललित कला आहे. तर इतिहास हे एक सामाजिक शास्त्र आहे. या दोनही विद्याशाखांचे प्रयोजन,उपयोजन,इतिहास, स्वरूप आणि महत्त्व हे स्वतंत्र आहे. या दोनही विद्याशाखांचे परसरांशी निर्मितीपासूनच संवादी असे नाते आहे. या दोनही ज्ञानशाखांचे अंतिम उद्दिष्ट हे मानवी जीवनाचा शोध घेणे हेच आहे. किंबहुना मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठीच या विद्याशाखांचा जन्म झाला आहे. साहित्य आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधाविषयी राजा दीक्षित म्हणतात, साहित्य आणि इतिहास याचा परस्परांशी काहीच संबंध नाही, अशी भूमिका घेतली जाणे शक्य आहे. विशेषत साहित्यातील कलावादी आणि इतिहास क्षेत्रातील शास्त्रवादी असा संबंध नाकारू शकतात. परंतु साहित्य आणि इतिहास यांचे परस्परसंबंध आहेत. किंबहुना ते निकट असे मानले तर त्याची अनेकपदरी उकल शक्य आहे. यावरून आपल्याला असे लक्षात येते की साहित्य आणि इतिहास याच्यामध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे. या दोन विद्याशाखांच्या परस्पर संबंधाचा विचार केल्यास या दोन विद्याशाखांच्या स्वरूपावर ,प्रश्नावर प्रकाश टाकला जाऊ शकतो. असे म्हणता येईल. इतिहास हो मानवी जीवनाची कथा आहे.


इतिहासामध्ये चार गोष्टींना महत्त्व असते. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या त्या चार गोष्टी होय. साहित्याची निर्मिती हा कलावंतांच्या प्रतिभेचा विकास असतो. साहित्यकृतीमध्यही व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या घटनांना महत्त्व असते. मुळात मानव हाच साहित्य व इतिहास या दोहोंचा केंद्र विषय आहे. इतिहास हा साहित्यकथा वस्तू पुरविणारा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. इतिहासाबद्दल प्रत्येक मानसाच्या मनात प्रचंड जिज्ञासा असते. साहित्य निर्मिती करणारा कलावंत आपल्या इतिहासाचा नवा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असता इतिहासातील व्यक्तीचे भावजीवन आपल्या कल्पना शक्तीने उभा करण्याचा प्रयत्न साहित्यकृतीत होत असतो. इतिहासाच्या अंगाने विचार केल्यास साहित्य हा इतिहासाचा महत्त्वपूर्ण साधन स्रोत आहे. साहित्याचा सामाजिक संदर्भ ही अर्थपूर्ण वस्तुस्थिती असल्याने इतिहासाच्या दृष्टिने ती महत्त्वाची ठरते. मुळातच साहित्यामध्ये तत्कालीन समाज जीवनाचे चित्रण असते. आज 'तळाकडून इतिहास ' हा नवा प्रवाह आता इतिहास लेखनात महत्त्वाचा ठरत आहे. या प्रवाहाचा विचार करीत असतांना साहित्याच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.


आजच्या समकालीन समाजाच्या प्रश्नांचा समस्यांचा शोध घेत असताना आपल्या लक्षात येते की, या प्रश्नाचे , समस्यांचे मूळ आपल्या इतिहासात आहे. आपला इतिहास आज नीट समजून घेतल्यास आपल्या पुढील समस्या,प्रश्न सोडविण्याची शक्यता पुढे येऊ शकते. मराठीमध्ये इतिहासाचा शोध घेण्याच्या लेखकांची मोठी परंपरा असल्याचे आपल्या लक्षात येते. या संदर्भात हिंदीतील प्रसिद्ध लेखक राजेंद्र गोहन भटनागर म्हणतात,           " नियंत्रणा बाहेर जाणाऱ्या वर्तनमान परिस्थितीवर उपाय असा शाश्वत इतिहास मी शोधत होतो. इतिहासात डोकवताना मला फार मागे जावं लागल नाही. अगदी नजिकच्या भूतकाळात माझा शोध संपला. वर्तमानाला नवीन दृष्टी देण्याची ताकद या इतिहासात आहे. हे मला जाणवलं" लेखकाने वरील विधान 'सरदार' या कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेबदल केलेले आहे. भारतीय स्वतंत्र्य लढ्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होय.



'सरदार ' एक ऐतिहासिक कादंबरी :-


हिंदीतील राष्ट्रीय इतिहासावर आधारलेल्या कथा -कादंबऱ्या आणि नाट्यलेखनासाठी प्रसिद्ध असलेले लेखक डॉ. राजेंद्र मोहन भटनागर यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवन चरित्रावर 'सरदार' नावाची हिंदी भाषेतून कादंबरी लिहिली आहे. या हिंदी भाषेतील कादंबरीचा केशव अनंत आगाशे यांनी मराठीत फेब्रुवारी २०१० मध्ये अनुवाद केला आहे. राजहंस प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अनुवाद करण्यामागचा हेतू स्पष्ट करताना केशम अनंत आगाशे म्हणतात, " सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढयातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व ! या लोहपुरुषाविषयी नवीन पिढीला फारशी माहिती नाही जाणून घेण्याची उत्सुकताही नाही. डॉ. राजेंद्र मोहन भटनागर यांनी वल्लभभाई पटेलांच्या चरित्रावर आधारित 'सरदार' ही अप्रतिम कादंबरी लिहिली आहे. या साहित्यकृतीचा आस्वाद मराठी वाचकांनाही घेता यावा या हेतूनं मी अनुवाद करण्याचा निर्धार केला. या निर्धारातून उत्तम अशी कलाकृती केशन आगाशेनी निर्माण केली आहे. ही कलाकृती एक ऐतिहासिक कादंबरी आहे.


कादंबरी या गद्य कल्पितकथेचा एक उपप्रकार म्हणजे ऐतिहासिक कादंबरी होय. कादंबरी साहित्यप्रकार इतिहासाशी संवाद साधता तेव्हा ऐतिहासिक कादंबरीची निर्मिती होते. ऐतिहासिक कादंबरी दूरवरच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे चित्रण करीत असते. भूतकाळाचे वास्तव दर्शन घडविणे ही इतिहासाची प्रतिज्ञा असते. विशिष्ट घटना का आणि कशी घडली, हे जाणून घेण्यात इतिहासाला रस असतो. या घटनांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या अनुभवांचा , जाणिवांचा नवा अन्वयार्थ लावण्याचे कार्य ऐतिहासिक कादंबरी करीत असते. ऐतिहासिक कादंबरीमध्ये इतिहासात घडलेल्या घटनांना आणि समस्यांना महत्त्वाचे स्थान असते. तिच्या पार्श्वभूमी आणि पात्रे इतिहासातील असतात. 'सरदार ' या कादंबरीमध्ये लेखकान सरदार वल्लभभाई पटेलांच्या समग्र जीवनाचा शोध घेतलेला आहे. सुरुवात या कादंबरीची सुरुवात ही मॅट्रिकची परीक्षा नापास झालेले वल्लभ नावाच्या मुलापासून होते. तर कादंबरीचा शेवट भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यू प्रसंगाने झाला आहे.


'सरदार' कादंबरीचा पट सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील ठळक घटना , आहे प्रसंगाच्या आधारे लेखकाने उभा केला आहे. सरदारांचे शालेय जीवन, त्यांचे बॅरिस्टर होण्याचे ध्येय , वेगवेगळी आंदोलने,सत्याग्रह प् इंग्रजांशी सतत संघर्ष, तुरुंगवास, शेतकयाचे प्रश्न , फाळणीच्या काळातील आणि स्वतंत्र्य प्राप्तीच्या नंतरच्या हिंदू मुसलमानाचे प्रश्न , सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा, अपेक्षा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील संस्थानिकांचे प्रश्न अनेक घटना, प्रसंग कादंबरीच्या कथानकात लेखकाने मांडले आहेत.


सरदार कादंबरीमध्ये इतिहासातील अनेक व्यक्ती व घटनांवर प्रकाश टाकला आहे. या कादंबरील महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू विठ्ठलभाई पटेल,बॅ.जीना,डॉ. राजेंद्रप्रासाद, लॉर्ड माउंटबॅटन,व्ही.पी.मेनन, गोपाल स्वामी अय्यंगार इ. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय व्यक्तीच्या परस्परसंबंधावर त्यांच्या स्वाभावाचे विश्लेषण करत कादंबरी आकार घेते. बारडोलीचा सत्याग्रह, इ.स. १९२१ चे असहकार आंदोलन, नागपूर झेंडा सत्याग्रहाचे आंदोलन इ.स.१९३१च्या कराची काँग्रेसचे अधिवेशन, इ.स. १९४२चे चले जाव आंदोलन, भारताचे स्वातंत्र्य, महात्मा गांधीची हत्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील संस्थानिकाच प्रश्न आणि सरदार वल्लभभाई पटेलांची ऐतिहासिक कामगिरी या आधुनिक इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचा मांडणी करत सरदार कादंबरी साकार होते.


'सरदार' कादंबरीत वरील ऐतिहासिक व्यक्ती, घटनांचा उल्लेख येतो तसेच ही कलाकृती सरदार वल्लभभाई पटेलांचे भावजीवन वाचकांपुढे मांडते. हे भावजीवन मांडत असताना सरदारांचे कौटुंबिक जीवन ,त्याच्या व्यक्तीगत जीवनातील संघर्ष, मानसिक पातळीवर चाललेले संघर्ष ही कादंबरी चित्रित करते. सरदार वल्लभभाई पटेलांची व्यक्तीरेखा या कलाकृतीची मध्यवर्ती व्यक्तीरेखा आहे. लेखकाने सरदारांची व्यक्तीरेखा उभी करत असताना त्यांच्यातील परिस्थितीचे अचूक आकलन, त्वरीत निर्णय घेण्याची व ते राबवण्याची क्षमता, उत्तम प्रशासक, कठोर शिस्तीमुळे पक्षातील सहकाऱ्यांवर व प्रशासकीय यंत्रणेवर असलेलो विलक्षण जरब, चाणाक्ष बुद्धी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणाचीही गय न करण्याचे धैर्य, एक सच्चा गांधीवादी या सरदारांच्या जीवनातील मूल्यांचे योग्य विश्लेषण व वर्णन प्रस्तुत कादंबरीत केलेले आहे. या विश्लेषणातून व वर्णनातून सरदार वल्लभभाई पटेलांची व्यक्तीरेख वाचकाच्या मनात उभी राहाते.


सरदार वल्लभभाई पटेलांचे ऐतिहासिक कार्य समाजमनापर्यंत आजही म्हणावे तितके पोहोचलेले नाही. विशेषत सरदार वल्लभभाई पटेलांचे व्यक्तीगत भावजीवन , कौटुंबिक जीवन लोकापर्यंत पोहोचलेले नाही. साहित्य इतिहासातील घटनांचा शोध घेण्या बरोबरच व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचा अर्थ लावण्यासाठी प्रयत्नशील असते. सरदार कादंबरीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचे बालपण , त्यांचे कुटुंब पत्नी झवरेबांशी  असलेले नाते, कुटुंबातील सदस्यांशी सरदारांचा असलेला स्नेह , मुलगी मणीबेन ,मुलगा डाह्याभाई यांचा पिता म्हणून असणारी सरदार पटेलांची भूमिका , म. गांधींशी वैचारिकदृष्ट्या बांधले गेलेले वल्लभभाई, जवाहरशी असलेले वैचारिक मतभेद ,आणि भारत या राष्ट्राच्या उभारणीसाठी अनंत प्रकाराचे विचारवलये असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे विश्लेषण या कलाकृतीला जिवंत करते. किंबहुना वाचकाला पुन्हा एकदा इतिहास व सरदार वल्लभभाई पटेल समजावून देण्याचे कार्य पार पाडण्यात या कलाकृताला यश येते.



सरदार ही एक चरित्रात्मक कादंबरी : -


चरित्रात्मक कादंबरी म्हणजे प्रत्यक्षात होऊन गेलेल्या एका व्यक्तीचे जीवन चित्रित करणारी कादंबरी होय. सरदारा वल्लभभाई पटेल यांच्या संपूर्ण चरित्राची मांडणी लेखक राजेंद्र भटनागर यांनी 'सरदार' कादंबरीत केली आहे.  


चरित्रात्मक कादंबरीचे नाते चरित्र व कादंबरी या दोन साहित्यप्रकाराशी लागत असल्यामुळे चरित्र व चरित्रात्मक कादंबरी आणि कादंबरी व चरित्रात्मक कादंबरी या दोन्ही दृष्टींनी या साहित्यप्रकाराचा विचार करायला हवा.'वल्लभाई पटेल चरित्र व काळ' , लेखक त्र्यं.र. देवगिरीकर ,प्रकाशक भारत ग्रंथ माला, पुणे - २,२ ऑक्टोबर १९७१ या चरित्राचा विचार करता राजेंद्र भटनागर लिखित 'सरदार ' कादंबरीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील बहुतेक घटना, प्रसंगाचे चित्रण आलेले आहे. हे चित्रण लेखकाने इतिहासाशी प्रतारणा न करता केलेले आहे.


सरदार वल्लभभाई पटेलांचे बालपण 'सरदार' कादंबरीत नीटपणे उभे राहत नाही. चरित्रात्मक कादंबरी म्हणून सरदारांचे भावजीवन त्यांच्या जगण्यातील ताण - तणाव, विचारातील द्वंद ,५५० संस्थानाचे विलीनीकरणाचा भाग कलाकृतीत फारसा प्रभावीपणे येत नाही. चरित्रात्मक कादंबरीचा नायक व  संबंधित व्यक्ती ही सत्यात पडून गेलेली असते. आणि या व्यक्तीच्या जीवनातील घटिते ही बहुश: सर्वपरिचित असतात. त्यामुळे चरित्रात्मक कादंबरीकाराच्या सृजनशीलतेवर  बंधने असतात. ही चरित्रात्मक कादंबरी वाङ्मय प्रकाराची मर्याद मान्य करून 'सरदार' या कलाकृतीचे वेगळेपण आपल्या नजरेत भरते.काळव परिस्थितीचा विचार करताना तत्कालीन इतिहास कथन करावा लागतो जेथे इतिहास नाही. तेथे परिस्थिती काय सांगणार परिस्थिती हो इतिहास घडत असत आणि इतिहासाची निर्मिती व्यक्त करीत असतात. चरित्र परिस्थिती इतिहास व काळ यांचा असा हा अन्यान्य संबंध आहे. चरित्रात्मक कादंबरीत इतिहास


घटना असंग आणि लेखकाच कल्पनाशक्ती यांच्या माध्यमातून चरित्र नायकाचे जीवन मांडलेले असते. प्रदेवगिरीवर सरदार वल्लभभाई पटेल "सरदार


कार ने साधना करणार साधनतेची आसक्ती त्यांना नको त्यांना एकच होते. ते म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे स प्रतिषिय सरदार कदवरीत उमटते, लेखक राजेंद्र भटनागर यांनी सरदारांना वरील रूपातच रेखाटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे राजकारणात सक्रिय होते परंतु ते नव्हते ते संसारी असून संन्यस्त होते. अनेकांचे संसार त्यांनी उभे केले परंतु स्वतःचा संसार त्यांनी उभारला नाही. अखंड भारत देशाला घरमानु महान नेत्याच्या कर्तृत्वाची कथा म्हणजे सरदार हो कादंबरी होय.


'सरदार' या कलाकृतीविषयी या कादबरीचे अनुवाद के अआगाशे म्हणतात "एक होतातडफदार बैरिस्टर बल्लभभाई पटेल नावाचा आवाज युक्तिवाद परतून खटले जिंकू पाहणारा पण योगायोगान त्याची गाठ पडली एका अवलियाशी मोहनदास करमचंद गांधीशी आणि मग चमत्कार घडला वल्लभभाई बदलले त्यांनी वकिली सोडली, अहिंसक सत्याग्रहाचे नेतृत्व स्वीकारले आणि दीनदुबळ्या, असाहाय्य शेतकन्यांचे ते तारणहार 'सरदार' बनले. त्या कांतिकारक परवाची ही अनोखी कथा "५ के अ आगशे वरील प्रमाणे अत्यंत काव्यमय शब्दात या कलाकृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. 'सरदार' या कादबरीची एक उणीव बाटते ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनपटान संस्थानाच्या विलीनीकरणाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु या कलाकृतचाच अर्थत कमा विश्लेषण आले आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या कार्याविषय, डॉ जयसिंगराव पवार म्हणतात, " संस्थानाच्या विलीनीकरणासुरदारल मनन व लॉर्ड माउंटबॅटन या त्रयीला दिले पाहिजे, सरदार पटेलांची हुशारी, कारारीपणा, राजकारणपटुत्व या गुणांचा राष्ट्राला ऐन मोक्याच्या वेळी मीठा लाभ झाला.. भारत त्यांच्या ऐतिहासिक व अमोल सेवेबद्दल नेहमीच ऋणी आणि कृतज्ञ राहील. " असे प्रभावी विचार डॉ. पवारांनी सरदार वल्लभभाई पटेलांविषयी व्यक्त केले आहेत. परंतु सरदार कादंबरीमध्ये या प्रकरणाचे सखोल विश्लेषण केले असते तर कलाकृतीची अनन्यसाधारण झाली असते असे म्हणता मंचल


'सरदार' कलाकृतीची भाषाशैली विषयाची गंभीर अभिव्यक्त करण्यात यशस्वी झाली आहे. सखाराचा जीवनपट मांडत असताना इतिहास जिवत करण्याचे


सानथ्यं या कलाकृतीच्या भाषेत आह अनुवादक के अ आगाशे यांनी सरदार फलाकृतीचा अनुवाद अत्यंत गंभीरपणे व सहजतने केला आहे. मूळ कलाकृतीतील


विचार भावनाप्रधानता 'सरदार' मध्ये निश्चितपणे आलेली आहे. मूळ लेखकाच्या कलाकृती निर्मितीमागील उद्देशाला थाका न पचवता हो कलाकृती


रसिकापर्यंत पोहचली आहे. यात कोणतीही शंका नाही.




.समकालीन भारतीय राजकारणाची वाटचाल पारात पात भारतीय स्वातंत्र्य लहानलेल्या नेतआदर्श नाही अशा समकालीन समाजासाचा शोध घेत असतो. समाजाच्या सद्यकालीन प्रश्नांचा समस्यांचा उलगडा की नजर


इतिहास शोधला जातो. याचाच एक भाग म्हणजे हिंदी लेखक राजेंद्र भटनागर यांचो 'सरदार' ही कादंबरी होय सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी अभ्यामक


भा. ल. भोळे म्हणतात, "पटेलांची स्वतंत्र भारतात एकूण उपेक्षाच होत आली आहे. त्यांना 'भारतरत्न' हा किताब मिळायला त्यांच्या मृत्युनंतर ४४ वर्ष जावी लागली है


त्याचच निदर्शक म्हणावे लागेल. शेकडो पुस्ताकाच्या माध्यमातून पटेलाच्या जीवन व कार्याची माहिती वाचकापर्यंत जाण्याची आहे


अभ्यासक भील यांनी व्यक्त केलेला अशावाद सरदार' सारखी कादंबरी वाचनात आल्यावर योग्य असल्याची आपली पटते.


सरदार सारखी सरदार वल्लभभाई पटलांचे जीवन समर्थपणे पेलणारी कलाकृती महाराष्ट्राच्या अभ्यासा


समारोप :


सरदार वल्लभभाई पटेलाचे कार्य, विचार, आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल असे वाटते.


संदर्भ टिपा:


दीक्षित राजा, मराठी वाङ्मयकोश खंड चौथा (समन्वयक संपादक विजया राजाध्यक्ष) महाराष्ट्र राज्य साहित्य आि


संस्कृती मंदळ मुंबई प्रथमावृत्ती २००२.४३


भटनागर राजेंद्र मोहन, 'सरदार' (अनु. के अ आगाशे) राणहस प्रकाशन


तंत्रव पृ.११,


पुणे प्रथमावृत्ती २०१०५.०४


दवांगकर वल्लभभाई पटेल चरित्र व काळ, भारत ग्रंथ माला प्रकाशन, पुणे २१९७१.०५


४)


७)


भटनागर राजेंद्र मोहन न मलपृष्ठ


पवार जयसिंगराव, आधुनिक हिंदुस्थानचा इतिहास', विद्या प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती १९९९.२३३


भा. ल. भोळे, लोहपुरूष (लेखक भास्कर महाजन), तेजस प्रकाशन खिरोदा प्रथमावृत्ती २०१० पृ. ५. ६


२)


३)


प्रा. गणपतराव टेंबरे (मराठी विभाग)


महाविद्यालय, रावेर ता. रावेर, जि. जळगांव


भ्रमणध्वनी क्र. ९४२१०८९२७०


प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील प्रा. एस. डी. धापसे


श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान ई-मेल: dhembregr@gmail.com

रविवार, २ जानेवारी, २०२२

बोलीभाषा संशोधनापुढील आव्हाने डॉ. गणपतराव ढेंबरे , रावेर

 बोलीभाषा संशोधनापुढील आव्हाने


डॉ.गणपतराव ढेंबरे ,रावेर


प्रस्तावना : -


भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, तसेच ते संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यमदेखील आहे. भाषा हा मानवाचा अत्यंत महत्त्वाचा आविष्कार आहे. मानवी संस्कृतीत भाषा या संस्थेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या संपर्कक्रियेसाठी व सहकार्यासाठी मानव अनेक प्रकारच्या संदेशवहनाच्या पद्धती किंवा व्यवस्था वापरतो. 'भाषा' ही मानवाची सर्वात महत्त्वाची संदेशवहन पद्धती म्हणावी लागेल. मानवी समाज व संस्कृती यांचा ती एक अविभाज्य घटक आहे. आपण एकाच समाजात वावरत असलो, एकच भाषा बोलत असलो, तरी अनेक कारणांमुळे समाजात वेगवेगळे स्तर निर्माण होतात. शिक्षण, व्यवसाय, नागरी वा अनागर वातावरण, जाती-जमाती, कौटुंबिक वातावरण, देश - विदेशचा प्रवास इत्यादी अनेक कारणांमुळे समाजात लहान-मोठे गट अस्तित्वात येतात. प्रत्येक भाषेत अनेक प्रकारची विविधता असते. भाषेत विविधता निर्माण होण्यामागे अनेकविध कारणे असतात.


मराठी भाषेपुरतेच बोलावयाचे झाल्यास ही भाषा म्हणजे निरनिराळ्या बोलींचा एक संग्रह आहे. भाषा ही शेवटी बोलींचा एक समूह असतो. भाषेला आपल्या समृद्धीसाठी बोलींच्याच शब्द भांडाराकडे लक्ष द्यावे लागते. नवनिर्मिती आणि अभिनव आविष्कार यांची क्षमता बोलीत असते तेवढी प्रमाण भाषेत नसते. दैनंदिन आणि पारंपरिक संस्कृती यात बोलींचे वर्चस्व असते. बोली म्हणजे काय ? 'बोली' हा Dialect या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून आपण वापरतो. Language या शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून 'भाषा' असा शब्द आपण वापरतो. बोली म्हणजे काय ? याविषयी विजया चिटणीस माडगूळकर म्हणतात, “बोली म्हणजे परभाषकांना जवळजवळ पूर्णपणे कमी-अधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या, तर तद्भाषकाना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषांचा समूह होय." यावरून आपणाला असे म्हणता येईल, की काही समान वैशिट्य असलेल्या आणि त्याच भाषेच्या इतर बोलींपेक्षा एकमेकींशी अधिक साम्य असलेल्या बोलींचा एकंदर समूह म्हणजे बोली होय. एकाच प्रदेशात बोलली जाणारी मूळ बोली काळाच्या ओघात त्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बदलते आणि तिच्यातून एकमेकांशी नाते असणाऱ्या पण वेगवेगळ्या अशा नव्या बोली निर्माण होतात.


बोलीभाषा संशोधनाची आज गरज निर्माण झाली आहे. आपले सांस्कृतिक संचित जतन करणे आवश्यक आहे. बोलीभाषा संशोधनाचे महत्त्व सांगताना झाडी बोलीचे अभ्यासक हरिचंद्र बोरकर म्हणतात, “आज नवनवीन क्षेत्रात ज्ञानाचा विस्तार झपाट्याने होत आहे. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादींमध्ये दररोज नवीन शब्दावली आवश्यक वाटत आहे. त्याच तत्परतेने पाश्चात्य शब्दांना योग्य पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भाषावैज्ञानिक व भाषाकोविद यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी संस्कृतचे भांडार वापरून नवे शब्द रचण्याचा आटापिटा भाषावैज्ञानिकांनी सतत चालविलेला दिसून येतो, पण त्याकरिता योग्य शब्द आपल्या बोलीत पूर्वीपासूनच उपलब्ध असतानाही ते माहिती नसल्यामुळे भाषावैज्ञानिकांची फसगत होत आहे, असे दिसून येते. " वरील शब्दात हरिश्चंद्र बोरकर बोलीभाषा संशोधनाचे महत्त्व सांगतात. आज बोलीभाषा संशोधनापुढे वेगवेगळी आव्हाने निर्माण झाली आहेत.


१) बोलीभाषांचे अस्तित्व : - 


जग आज एक खेडं बनलं आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमधील अंतर नाहीसे झाले आहे. वेगवेगळ्या देशांतील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. दळणवळणाची, परस्परसंपर्काची साधने मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे संवाद साधणे सुलभ झाले आहे. हा संवाद नेमक्या कोणत्या भाषेत साधला जातो? या प्रश्नाचे उत्तर अर्थात इंग्रजी हे आहे. याचे परिणाम आज ठळकपणे पुढे येत आहेत. वेगवेगळ्या देशांतील बोलीभाषा संपण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रक्रियेविषयी भालचंद्र नेमाडे म्हणतात, “आपल्याला असं दिसेल, की हे जे स्वतःला जागतिकीकरणाचे अध्वर्यू म्हणवतात, त्या देशांमधल्या भाषांची परिस्थिती आपण बघू या. Atlas of World Languages, Dead Languages, Red Book या पुस्तकांमधील आकडेवारी घेतली तर उत्तर अमेरिकेत कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समधल्या भाषा या शंभर वर्षापूर्वी १८७ होत्या, रेड इंडियन, एस्किमो यांच्या धरून आज त्यातल्या ३८ उरल्या आहेत, बाकीच्या नाहीशा झाल्या. अलास्कामध्ये २० भाषा होत्या. आज तिथे २ भाषा राहिल्या आहेत. ही जागतिकीकरण करू इच्छिणाऱ्या गोऱ्या लोकांची कर्तबगारी. लॅटिन अमेरिकेत बरंच युरोपी सांस्कृतिक दडपण अजूनही आहे. तिथे ४०० भाषा होत्या. आता फक्त १०८ भाषा राहिल्यात. पुढील वीस वर्षात झपाट्यानं या पण नाहीशा होतील, अशी भीती आहे." भालचंद्र नेमाडे यांनी दिलेली आकडेवारी लक्षात घेता यापुढील काळात बोलीभाषा नष्ट होणार असतील तर त्यांचे संशोधन कसे केले जाईल, हा प्रश्न आहे. जिवंत स्वरूपात भाषा अस्तित्वात नसेल तर तिचे संशोधन करणे. संशोधनाच्या आधारे निष्कर्ष काढणे अत्यंत कठीण होऊ शकते.


विकासाची प्रक्रिया आज ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागापर्यंत पोहोचत आहे. उपेक्षित मागास, आदिवासी, भटके विमुक्त आज मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. मुख्य प्रवाहापासून कित्येक शतके दूर असणाऱ्या या लोकसमूहाचा शहरांशी, शासकीय यंत्रणांशी संपर्क येत आहे. हे लोक प्रमाणभाषा अवगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी या लोकांसाठी आवश्यक आहेत. ग्रामीण, आदिवासी, दलित, भटके विमुक्त, डोंगरी भागातील लोक मुख्य प्रवाहात सामील झाल्यामुळे आज ते त्यांचे मूळ स्थान सोडून शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पहिल्या पिढीने आपली मातृभाषा व प्रमाणभाषा दोन्हींचा वापर सुरू ठेवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीत हा संवाद केवळ प्रमाणभाषेवर येऊन थांबला. यामुळे बोलींच्या अस्तित्त्वाला धोका पोहोचला आहे. या संदर्भात श्रीधर रंगनाथ कुलकर्णी म्हणतात, "मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा होऊन बसला आहे. शिक्षण आणि प्रसारमाध्यमे यांच्या वाढत्या प्रसारामुळे बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. या दोन्ही बाबी बोलींच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या ठरत आहेत. आणखी काही काळ लोटला तर कित्येक बोली इतिहासजमा होण्याची संभावना स्पष्टपणे दिसत आहे. आजच्याही परिस्थितीत कोणत्याही बोलीची सामग्री गोळा करण्यासाठी दळणवळणाच्या आधुनिक साधनांपासून अंतरावर असलेल्या व लौकिक अर्थाने मागासलेल्या भागांतूनच निखालस सामग्री मिळण्याची शक्यता आहे. याबाबतीत अधिक विलंब लागला तर महाराष्ट्राच्या व मराठी भाषेच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे हे अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार आपल्या हाती लागणार नाहीत, ही जाणीव ठेवून बोलींच्या अभ्यासास अग्रक्रम मिळाला पाहिजे." वरील श्रीधर रंगनाथ कुलकर्णीच्या मताप्रमाणे मराठीच्या बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्यातील अंतर कमी झाले आहे. बोलीभाषेत प्रमाणभाषेतील शब्दांचे प्रमाण वाढले आहे. बोलीभाषेतील अनेक भाषिक लकबी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काळात बोलीभाषा व प्रमाण मराठी भाषा यांच्यातील अंतर सूक्ष्म होत जाईल. तसे बोलींच्या अभ्यासास व बोलींच्या सामग्री जमा करण्यास मर्यादा येतील. बोलीभाषेच्या संशोधकांपुढे हे एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे.


२)  बोलींच्या क्षेत्रमर्यादेची निश्चिती : -

बोलींच्या अभ्यासात मूळ साधनाचा संग्रह करणे महत्त्वाचे असते. बोलीतील शब्दसंग्रह, बोलीचे व्याकरण, बोलीभाषेतील विशिष्ट लकबी, बोलींची स्वनिम प्रक्रिया या विविध घटकांचा अभ्यास बोलीभाषेच्या संशोधनात केला जातो. एखादी विशिष्ट बोली संशोधनासाठी निश्चित करण्यासाठी त्या बोलीचे भौगोलिक क्षेत्र अथवा विशिष्ट व्यवसाय किंवा समाज यांची क्षेत्रमर्यादा निश्चित करणे एक अवघड बाब असते. कारण बोली हा जिवंत व्यवहार आहे. बोलींची क्षेत्रमर्यादा अगदी काटेकोरपणे ठरविता येत नाही. बोलींच्या क्षेत्राचे हवाबंद कप्प्यांमध्ये वर्गीकरण करता येत नाही. बोलींचे भौगोलिक क्षेत्र अथवा विशिष्ट व्यवसाय किंवा समाज यांच्या क्षेत्रमर्यादा वस्तुनिष्ठपणे ठरवता येत नाहीत. हे बोलींच्या अभ्यासकांपुढील आव्हान आहे. या संदर्भात कैलास सार्वेकर म्हणतात, “राजकीय नकाशात सीमारेषा अचूकपणे दाखविता येतात तशा बोली भूगोलात दाखविता येत नाहीत. अमूक एक भाषा अमूक एका ठिकाणी संपते आणि अमूक ठिकाणपासून दुसरी भाषा सुरू होते, असे दाखविणे अशक्य असते. मात्र बोलीतील बदल हळूहळू घडलेला दिसतो. तसेच एका भाषेचा प्रभाव तिच्यालगत बोलल्या जाणाऱ्या बोलीवर पडलेला दिसतो. इंद्रधनुष्याचे रंग वेगवेगळे असले,तरी एक रंग कुठे संपतो व दुसरा रंग कुठे सुरू होतो ते स्पष्ट रेषेत दिसत नाही. रंग भिन्नता मात्र स्पष्ट होत जाते. बोलींचेही काहीसे तसेच असते." बोलींची क्षेत्रमर्यादा ठरवत असताना येणाऱ्या अडचणी या मतातून अभिव्यक्त होतात. एकाच बोलीतील उपबोलींच्या क्षेत्रमर्यादा ठरवत असताना अभ्यासकापुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. संशोधन हे वस्तुनिष्ठ, काटेकोर असते. असे गृहित धरल्यास क्षेत्रमर्यादा ठरवत असताना ढोबळ लक्षणे लक्षात घेऊन क्षेत्रमर्यादा गृहित धरावी लागते. हे बोलीभाषा संशोधनापुढील आव्हान आहे, असे म्हणता येईल. 


३)  संदर्भ साधने : -


मराठी बोलीभाषांचे संशोधन करत असताना मराठीतील दर्जेदार संदर्भ ग्रंथाची उणीव भासते. प्रत्यक्ष मराठीतील बोलींचा अभ्यास करून बोलींच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरतील असे संदर्भ ग्रंथ अत्यंत कमी आहेत. प्रा.अ.का. प्रियोळकर - कोकणी बोली, हरिश्चंद्र बोरकर - झाडी बोली, कैलास सार्वेकर खानदेश - बोली, रमेश सूर्यवंशी - अहिराणी बोली, हरिहर मातेकर - मराठवाडी बोली, कुलकर्णी सु. बा.  - पोवारी बोली, भिल्ली बोली, वऱ्हाडपांडे वसंत - नागपुरी बोली, दे. गं. सोटे - वैदर्भी बोली, ए.एम.घाटगे - कोकणी, कुडाळी, कुणबी इत्यादी बोलीभाषांचे अभ्यासक आहेत. याशिवाय भाषाविज्ञानाचे काही अभ्यासक यात मिलिंद मालशे, र. ना. वरखेडे, अशोक केळकर, कृ. पा. कुलकर्णी, कल्याण काळे, अंजली सोमण, श्रीरंग संगोराम, विजया चिटणीस, स. गं. मालशे, दत्तात्रय पुंडे, वसंत स. जोशी, विद्यागौरी टिळक, मु. श्री. कानडे, रमेश धोंगडे, अश्विनी धोंगडे, ना. गो. कालेलकर इत्यादी अभ्यासक व त्यांचे ग्रंथ दृष्टीसमोर येतात. मराठीतून बोलींच्या संशोधनासाठी उपयुक्त असे संदर्भ ग्रंथ मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. हे मराठी बोलींच्या संशोधनापुढील आव्हान आहे. 


४) बोलीभाषा संशोधनाचे आव्हान : -

बोलीभाषा संशोधन हे कठीण, किचकट व अधिक वेळ लागणारे कार्य आहे. बोलीभाषांचे संशोधन करत असताना अभ्यासकाला प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्य करून (Field Work) सामग्री जमा करण्यासाठी या भौगोलिक क्षेत्रात प्रत्यक्ष मुलाखती,वेगवेगळी साधने वापरून माहिती संकलित करावी लागते. या माहितीचे संकलन व विश्लेषण करत असताना अभ्यासकाचा वेळ, परिश्रम, पैसा खर्च होत असतो. याचा वास्तवस्थितीत विचार करता नवोदित अभ्यासक बोलीभाषा संशोधनाकडे वळत नाहीत. त्यापेक्षा एका लेखकाचा अभ्यास, विशिष्ट कालखंडाचा अभ्यास, विशिष्ट वाङ्मयप्रकाराचा अभ्यास, समीक्षा- विचार, सौंदर्यशास्त्र, साहित्यप्रवाह यांच्यावर संशोधन करत असताना संदर्भग्रंथ व आधारभूत ग्रंथ संकलित करणे व सर्व ग्रंथांच्या आधारे प्रबंध लेखन करणे ही सर्व प्रक्रिया चार भिंतींच्या आत होते. असा संशोधनाचा सुलभ मार्ग उपलब्ध असताना अभ्यासक उन्हातान्हात, पावसात पायपीट कशासाठी करेल? हा खरा प्रश्न आहे. बोलीभाषांचे संशोधन करून विशेष काही फायदा मिळणार नसेल तर लोक कशासाठी बोलीभाषा संशोधन करतील हे बोलीभाषा संशोधनापुढील आव्हान आहे. 


५) बोलीभाषा माहिती संकलनात येणाऱ्या समस्या : -

बोलीभाषेच्या संशोधनासाठी क्षेत्रीय कार्य करत असताना वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. बोलीभाषांचे संशोधन करत असताना प्रत्यक्ष लोकांची भाषा संकलित करणे आवश्यक असते. बोली बोलणारे लोक अभ्यासकांकडे संशयाने पाहतात. माहिती देण्यास टाळाटाळ करतात. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या  लोकांना हे संशोधन शासकीय योजनेचा भाग वाटते. या लोकांना अभ्यासकांकडून आर्थिक लाभाची अपेक्षा असते. अभ्यासासाठी निवडलेल्या क्षेत्रातील लोक माहिती अचूकपणे, गांभीर्याने देतीलच याची खात्री देता येत नाही. माहिती, सामग्री अचूकपणे जमा न झाल्यास संशोधनास अडथळा निर्माण होऊ शकतो. काही बोलीभाषांची सामग्री

संकलित करत असताना दुभाषिकांची मदत घ्यावी लागते. तसा दुभाषिक मिळणे अवघड असते. मिळाल्यास तो गंभीरपणे मदत करीत याची खात्री देता येत नाही.

एखाद्या बोलीभाषेचे संशोधन करण्यासाठी अभ्यासक तयार झाल्यास त्याला पदरची गुंतवणूक संशोधनासाठी करावी लागते. शासन, विद्यापीठातील भाषा विभाग, शासनाचा भाषा संचालनालय विभाग यांच्याकडून अभ्यासकांना भरीव अशी आर्थिक शिष्यवृत्ती मिळाल्यास बोलीभाषा संशोधन अधिक वेगाने होऊ शकते. परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे अभ्यासक इच्छा असूनही बोलीभाषा संशोधनाकडे वळत नाहीत.


६) संस्थांचा अभाव : -


केंद्रीय भारतीय भाषा संस्थान मैसूर, भारतीय भाषा परिषद कोलकाता, डेक्कन कॉलेज पुणे,विद्यापीठातील भाषा विभाग यांच्यामार्फत बोलीभाषा संशोधनासाठी मार्गदर्शन व साह्य मिळू शकते. परंतु खास मराठी बोलींच्या संशोधनासाठी एखादी संस्था असल्यास बोलीभाषा संशोधनाकडे नवीन अभ्यासक आकर्षित होऊ शकतात. परंतु अशा संस्थांचा अभाव असल्यामुळे बोलीभाषा संशोधनापुढे आव्हान निर्माण होते. 


७) बोलीभाषांबद्दल असणारा न्यूनगंड : -


बोलीभाषा या कमअस्सल, कमी प्रतीच्या आहेत, असा न्यूनगंड बाळगल्यामुळे बोलींपेक्षा अवाजवी महत्त्व प्रमाणभाषेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे बोलींच्या संशोधनाकडे अभ्यासक वळत नाहीत. बोलीभाषांचे संशोधन हे कमी प्रतीचे काम नसून, भाषा संशोधनातील मूलगामी कार्य आहे, असा विश्वास अभ्यासकांमध्ये निर्माण होणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून मराठी विषयातून हजारच्या संख्येत लोकांनी पीएच. डी. पदवीचे संशोधन केले आहे. त्यापैकी केवळ ४१ प्रबंध हे बोलीभाषा संशोधनाचे आहेत. ०१ प्रबंध दिल्ली विद्यापीठ व ०१ प्रबंध देवी अहिल्याबाई विद्यापीठातून बोलीभाषा संशोधनावर आहे. "ही संख्या वसंत विष्णू कुलकर्णी यांच्या 'मराठी प्रबंध सूची' या ग्रंथातून घेतली आहे. हा ग्रंथ फेब्रुवारी २०११ ला प्रकाशित झाला आहे." ४३ हा आकडा एकूण मराठी बोलीभाषा संशोधनासाठी फार मोठा आहे, असे म्हणता येणार नाही.


८) बोलीभाषकांचे बोली संचिताविषयी असलेले अज्ञान : -

वेगवेगळ्या बोली बोलणाऱ्या लोकांना आपली बोलीभाषा एक सांस्कृतिक संचित आहे, याची जाणीव नसते. बोली हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. याची जाणीव निर्माण झाल्यास हुषार, बुद्धिमान, तज्ज्ञ अभ्यासक बोलींच्या संशोधनाकडे वळतील.


निष्कर्ष : -


१) जागतिकीकरण, दळणवळणाच्या साधनांचा झालेला विकास यामुळे बोलीभाषांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. 


२) बोलींची क्षेत्रमर्यादा निश्चित करणे कठीण असते. बोलीभाषा संशोधनापुढील ते एक आव्हान आहे.


 ३) बोलीभाषा संशोधन करत असताना उपयुक्त आणि दर्जेदार संदर्भग्रंथाची कमी जाणवते.


४) तज्ज्ञ मार्गदर्शक व अभ्यासकांची संख्या अल्प असल्यामुळे नवोदित संशोधकांना उपयुक्त मार्गदर्शन मिळत नाही.


५) बोलीभाषा संशोधन हे वेळखाऊ, कठीण, किचकट स्वरूपाचे असते. त्या तुलनेत इतर विषयांवर संशोधन करणे सहज ,सोपे, सुलभ असते. त्यामुळे संशोधक बोलीभाषा संशोधनाकडे वळत नाहीत.


६) बोलीभाषा माहिती संकलनात वेगवेगळ्या समस्या जाणवतात. 


७) बोलीभाषा संशोधनासाठी आर्थिक पाठबळ मिळत नाही. शासन, विद्यापीठ, विविध प्रकारच्या संस्था भरीव स्वरूपात आर्थिक मदत बोलीभाषा संशोधकांना करत नाहीत. त्यामुळे संशोधक संशोधनाकडे पाठ फिरवतात.


८) बोलीभाषा संशोधनाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांचा अभाव आहे. त्यामुळे विपुल प्रमाणात संशोधक निर्माण होत नाहीत.


९) बोलीभाषांबद्दल समाजात न्यूनगंड असतो.


१०) बोलीभाषिकांचे बोली संचिताविषयी अज्ञान असल्यामुळे हुषार, तज्ज्ञ, जिज्ञासू बुद्धिमान अभ्यासक बोली संशोधनाकडे वळत नाहीत.


समारोप : -

 मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास होणे काळाची गरज आहे. कारण आधुनिकीकरणामुळे बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सीमारेषा पुसट होत आहेत. आज बोलींची सामग्री गोळा करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. दृक - श्राव्य साधनांद्वारे बोलींची सामग्री जमा केली पाहिजे. वेगवेगळ्या बोलींचे नमुने आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे जमा केल्यास दीर्घकाळासाठी अभ्यासकांना ही सामग्री उपलब्ध होऊ शकते. बोलींच्या अभ्यासाचे एक निश्चित ध्येयधोरण ठरविण्याची गरज आहे. शासकीय मदतीवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आणि साहित्य संस्थांनी बोलींच्या अभ्यासाला अग्रक्रम देण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या बोलींचा अभ्यास झाल्यास अनेक बोलींच्या स्वरूपावर प्रकाश पडू शकतो. बोलीभाषा संशोधनापुढे अनेकविध आव्हाने असले, तरी सकारात्मक विचार करून बोलीभाषा संशोधन गांभीर्याने करण्याची गरज आहे.


संदर्भ टिपा : -


१) चिटणीस विजया, वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती, डॉ. कल्याण काळे, डॉ. अंजली सोमण, (संपा.) गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक, प्रथमावृत्ती १९८२ पृ. १६०, १६१


२) बोरकर हरिश्चंद्र, झाडीबोली मराठी शब्दकोश, विजय प्रकाशन,नागपूर, प्रथमावृत्ती - २००० पृ. प्राक्कथन / पंचवीस


३) नेमाडे भालचंद्र, साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मय गृह,प्रकाशन, मुंबई, सहावी आवृत्ती - २००९ पृ. १७ 


४) कुलकर्णी श्रीधर रं., सामाजिक भाषाविज्ञान, प्रा.डॉ.प्रभाकर जोशी, प्रा.सौ.चारूता गोखले, (संपा.) निराली प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती १९९९, पृ.२१


५) सार्वेकर कैलास, बोली: समाज, साहित्य आणि संस्कृती, प्रतिभास प्रकाशन,परभणी, प्रथमावृत्ती २०१०, पृ. १९. 


६) कुलकर्णी वसंत विष्णू, 'मराठी प्रबंध सूची', साहित्य प्रसार केंद्र  नागपूर, प्रथमावृत्ती २०११, पृ. २१४, २१५, २१६, २१७


( पूर्व प्रसिद्धी - ग्रंथ - बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा -संपादक प्रा.डॉ. म.सु. पगारे आणि डॉ. आशुतोष पाटील , प्रशांत पब्लिकेशन्स् ,जळगाव ,प्रथमावृत्ती , -२०१२ )


डॉ. गणपतराव ढेंबरे

मराठी विभाग,

श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , जि .जळगाव

पिनकोड -४२५५०८

मोबाईल -९४२१०८१२७०

ई - मेल - dhembregr@gmail.com

मराठी बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व डॉ. गणपतराव ढेंबरे

 मराठी बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व 


डॉ.गणपतराव ढेंबरे, रावेर


प्रस्तावना : -


भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. तसेच ते संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यमदेखील आहे. सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या संपर्कक्रियेसाठी व सहकार्यासाठी मानव अनेक प्रकारच्या संदेशवहनाच्या पद्धती किंवा व्यवस्था वापरतो. 'भाषा' ही मानवाची सर्वात महत्त्वाची संदेशवहन पद्धती म्हणावी लागेल. मानवी समाज व संस्कृती याचा ती एक अविभाज्य घटक आहे. आपण एकाच समाजात वावरत असलो, एकच भाषा बोलत असलो तरी अनेक कारणांमुळे समाजात वेगवेगळे स्तर निर्माण होतात. शिक्षण व्यवसाय, नागरी वा अनागर वातावरण, जाती-जमाती कौटुंबिक वातावरण, देशविदेशाचा प्रवास इत्यादी अनेक कारणांमुळे समाजात लहान मोठे गट अस्तित्वात येतात. या गटांची भाषापद्धती भिन्न असते. आपण जी भाषा म्हणतो ती तर शेवटी एकसंघ असते काय ? मराठी भाषेपुरतेच बोलावयाचे झाल्यास ही भाषा म्हणजे निरनिराळ्या बोलींचा एक संग्रह आहे. अस्तित्वात असलेल्या बोलींपैकीच एखादी बोली प्रतिष्ठा पावते व तिला प्रमाण भाषेचे स्थान लाभते. या प्रमाण भाषेत साहित्य व्यवहार होतो. पण नित्याच्या व्यवहारात ही प्रमाणभाषा काटेकोरपणे योजली जातेच असे नाही. तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची ढब वेगळी असते. परंतु त्यामुळे भाषा बदलत नाही. एकच व्यक्ती निरनिराळ्या मानसिक अवस्थेत अथवा भिन्न प्रसंगाच्या संदर्भात वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग करीत असली तरी तिची एकंदरीत भाषापद्धती बदलेलच असे नाही. परंतु सामाजिक व सास्कृतिकदृष्ट्या निरनिराळ्या स्तरांवर असलेल्या व्यक्तीच्या भाषेत मात्र अंतर पडल्याचे निदर्शनास येईल.


प्रमाणभाषा आणि बोली यांच्यातील साभ्यभेद स्पष्ट करताना प्रा.अ.का. प्रियोळकर म्हणतात, " ज्या कारणांनी इतर देशात प्रमाण भाषा अस्तित्वात आल्या. त्याच कारणांनी आपल्या महाराष्ट्रातही ग्रांथिक भाषा निर्माण झाली. हिंदुस्थानातील इतर प्रांतामध्येही आपल्याप्रमाणे अनेक बोली आहेत. तेथे ज्या ग्रांथिक भाषा पुढे आल्या त्यांच्या बाबतीत निराळा प्रकार नाही. एखाद्या विशिष्ट भागाचे राजकीय महत्त्व आणि त्या बोलीत एखादा मोठा शब्दसृष्टीचा ईश्वर निर्माण होणे. यापैकी कोणतीही एक किंवा दोनही प्रमाण भाषेला रूप देतात. " महाराष्ट्रात प्रमाण मराठी भाषेच्या निर्मितीपाठीमागे या दोनही गोष्टी कारणीभूत असल्याचे आपल्या लक्षात येते. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. राजकीयदृष्ट्या या शहराला काहीएक महत्त्व आहे. साहित्यनिर्मितीचा विचार करता पुणे, मुंबई हीच शहरे केंद्रस्थानी असल्याचे आपल्या लक्षात येते. म्हणून प्रमाण मराठी भाषा निर्मितीपाठीमागे प्रा. प्रियोळकरांचा विचार आपल्याला मान्य करावा लागतो. प्रमाण भाषा म्हणजे काय ? या प्रश्नांचा शोध घेतल्यास आपल्या हेच लक्षात येते की, एकभाषिक समाजातील सर्व व्यक्तींना बव्हांशी समजली जाणारी, समाजातील 'शिष्ट' लोकांनी लेखनासाठी मान्य केलेली, अशी भाषा म्हणजे प्रमाणभाषा होय." या भाषेला 'शिष्टमान्य ' भाषा असेही म्हणता येईल. प्रमाणभाषेची शिष्टमान्यता ओळखण्यासाठी ज्यांना मान्य अशी ही भाषा असते, ते 'शिष्टजन' किंवा 'प्रतिष्ठित म्हणजे नक्की कोण ? हे सांगणे अवघड असते. काळानुसार या 'शिष्ट' व 'प्रतिष्ठित' लोकांमध्ये बदल होत असतो. थोडक्यात ज्या काळात जे वर्गाची राजकीय सांस्कृतिक सत्ता असते. त्या वर्गाचे लोक म्हणजे प्रतिष्ठित किंवा शिष्ट लोक होय. आणि या लोकांच्या भाषेला प्रमाण भाषेचे स्वरूप प्राप्त होत असते.


प्रमाणभाषा ही लिखित स्वरूपात असल्यामुळे बोलभाषेचे क्षणभुंगुरत्व या भाषेला नसते. ही सर्व समाजाला समजू शकणारी असल्यामुळे या भाषेद्वारा होणारे विनिमयाचे क्षेत्र फार मोठे असते. मुद्रणकलेमुळे आज प्रमाण भाषेच्या व्यवहाराचे क्षेत्र फार मोठे झाले आहे. प्रमाणभाषा ही समाजाच्या दैनंदिन वैचारिक व भावनिक जीवनाचा, लेखनाद्वारे आविष्कार दाखविणारी असते.


प्रमाण भाषा म्हणजे काय ? या विषयी ना.गो. कालेलकर म्हणतात, "एकाच प्रदेशातील अनेक स्थानिक बोलींपैकी जी बोली साहित्यनिर्मिती किंवा बौद्धिक चळवळ या बाबतीत प्रारंभापासून आघाडीला असते ती बोली, किंवा ज्या भागात राजसत्तेचं किंवा शैक्षणिक चळवळींच केंद्र असतं त्या भागातील बोली प्रमाण बोली ठरते. " थोडक्यात प्रमाण भाषा म्हणजे काय तर, स्थानिक बोली कितीही असल्या तरी त्या ज्या व्यापक प्रदेशात बोलल्या जातात तो ज्या शासनाखाली असतो, त्या शासनाच्या व्यवहारासाठी निवडली गेलेली विशिष्ट बोलीच प्रमाणभाषा समजली जाते. आणि तिचे शिक्षणात ,प्रसारमाध्यमात, साहित्य क्षेत्रात व सामान्य एकत्रित जीवनात सर्वत्र वर्चस्व असते. विशेषतः लेखनातल्या एकरूप वापरामुळे ही प्रमाण भाषा रूढ व्हायला मदत होते. असे आपणाला म्हणता येईल. 


मराठीच्या प्रमुख बोली : -


भाषा ही शेवटी बोलींचा एक समूह असतो. प्रत्येक बोली ही भाषा असली तरी प्रत्येक भाषा बोली नसते. भाषेला आपल्या समृद्धीसाठी बोलींच्याच शब्द भंडाराकडे लक्ष द्यावे लागते. नवनिर्मिती आणि अभिनय आविष्कार यांची क्षमता बोलीत असते तेवढी प्रमाण भाषेत नसते. दैनंदिन जीवन आणि पारंपारिक संस्कृती यात बोलींचे वर्चस्व असते. बोली म्हणजे काय ? बोली हा Dialect या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून आपण योजतो. Language या शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून 'भाषा' असा शब्द आपण वापरतो. वास्तविक भाषा व बोली समानार्थक शब्द आहेत.  Language किंवा भाषा हा ग्रांथिक किंवा प्रमाण (Standard) स्वरूप प्राप्त झालेल्या बोलीला उद्देशून आपण वापरात असतो. या प्रमाण किंवा ग्रांथिक बोलीपासून जे भिन्न असे बोली प्रकार असतात त्यांना आपण 'बोली (Dialects) असे म्हणतो.


बोली म्हणजे काय ? या विषयी विजया चिटणीस माडगूळकर म्हणतात, "बोली म्हणजे परभाषकांना जवळजवळ पूर्णपणे कमीअधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या तर तद्‌भाषकांना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषांचा समूह होय." काही सामान्य वैशिष्ट्य असलेल्या आणि त्याच भाषेच्या इतर बोलींपेक्षा एकमेकांशी अधिक साम्य असलेल्या बोलींचा एकंदर समूह म्हणजे बोली होय. एकाच प्रदेशात बोलली जाणारी मूळ बोली काळाच्या ओघात त्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बदलते आणि तिच्यातून एकमेकांशी नाते असणाऱ्या पण वेगवेगळ्या अशा नव्या बोली निर्माण होतात. त्या बोली त्यांच्या त्यांच्या भागांच्या नावांनी ओळखल्या जातात. त्या भिन्न भिन्न बोलींमध्ये ध्वनी, शब्द, वाक्य इत्यादी बाबतीत काही भेद असले, तरी त्यांच्यामुळे त्या बोलणानऱ्या लोकांच्या विनिमयात अडथळा येत नाही. विनिमयात अडथळा येण्याइतक्या त्या भिन्न झाल्या, म्हणजे मात्र त्यांना स्वतंत्र भाषा म्हणणं आवश्यक होते.


महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशात पसरलेला (आणि महाराष्ट्राबाहेरही स्थायिक झालेला) मराठी समाज जी भाषा बोलतो तिला आपण मराठी म्हणतो. परंतु महाराष्ट्रात सर्वत्र सारख्याच रूपाची मराठी बोलली जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडून बोलल्या जातात त्या मराठीच्या विविध बोली. यातील एक बोली प्रमाण बोली आहे. इतर बोली या प्रमाण बोलीपासून स्वनिमप्रक्रिया , व्याकरणप्रक्रिया आणि शब्दसंग्रह यांच्या बाबतीत कमी अधिक दूर आहेत. मराठीच्या बोलींचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान जॉर्ज गिअर्सन या भारतीय भाषांचे सर्वेक्षण करणाच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे जातो. हिंदुस्थानच्या भाषिक पाहणीचे काम इंग्रज सरकारने इ.स. १८९४ मध्येच हाती घेतले होते. हे काम ग्रिअर्सनकडे सुपूर्द करण्यात आले. त्याने इ.स. १८९८ ते १९२७ या काळात 'लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' चे १ ते ९ खंड प्रकाशित केले. त्याने आपल्या पाहणीत हैदराबाद व म्हैसूर ही संस्थाने व मद्रास इलाखा वगळता हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशातील मिळून १७९ भाषा व ५४४ पोटाभाषांचा तपशीलवार अभ्यास सादर केलेला आहे. मराठी व तिच्या बोली याबाबतचा ग्रिअर्सनने केलेला अभ्यास 'लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' च्या सातव्या खडात समाविष्ट असून तो इ.स. १९०५ प्रसिद्ध झालेला आहे, त्याने मराठी भाषेचे 

१) दख्खनची मराठी 

२)  वऱ्हाड आणि मध्य प्रांताची मराठी आणि 

३) मध्य व उत्तर कोकणातील मराठी, अशी तीन रूपे मानलेली आहेत. ग्रिअर्सनचे काही निष्कर्ष आज चुकीचे आणि काही वादग्रस्त ठरतात.


शिवाय आजच्या मराठीचे बोलीसमूह पाहता त्याचे विवेचन अपुरही वाटते. तथापि या अभ्यासाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ग्रिअर्सने केलेले विवेचन लक्षात घेतल्याखेरीज कोणत्याही मराठी बोलीचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे म्हणता येणार नाही. मराठी बोलीचा समग्र एकत्रित अभ्यास म्हणून ग्रिअर्सनने केलेल्या कार्याचे महत्त्व निर्विवाद आहे. मराठीच्या प्रमुख चार बोली आहेत. वऱ्हाडी बोली. अहिराणी बोली, डांगी बोली, कोकणी बोली यांचा त्यात समावेश होतो. या प्रत्येक बोलीच्या अनेक उपबोली आहेत. यातील वऱ्हाडी बोलीचा विचार केल्यास प्रदेशानुसार तिचे दोन भाग पड़तात 

१) घाटावरची वऱ्हाडी बोली 

२ ) घाटाखालची वऱ्हाडी बोली, 

अशी दोन रूपे दिसतात. याशिवाय वऱ्हाडीचे स्थानिक वैशिष्ट्यांनुसार नागपुरी, हळबी, बालाघाटी इ.भेद दिसतात, तर धंदा, जात व जमात यांच्या वैशिष्ट्यानुसार कोष्टी,धनगरी, झारपी, कुणबी,पोवारी असे भेद दिसतात. अहिराणीचे 'बागलाणी आणि नंदुरबारी असे सूक्ष्म प्रादेशिक भेद दिसून येतात. 'बागलाणी' बोली नाशिक जिल्ह्यातील बागलाण, कळवण, मालेगाव या तालुक्यात बोलली जाते. नंदुरबारी' नंदुरबार, तळोदे या भागात बोलली जाते. जातीजमातीनुसार अहिराणीचे पावरी, भिल्ली लाडशिक्की असेही उपभेद होतात.डांगी बोली ही एक मराठीची प्रमुख बोली आहे. डांगीचे तेथील भिल्ल, कुणबी , वारली इत्यादी जमातीनुसार वेगवेगळी बोलीरूपे दिसून येतात. कोकणी ही मराठीच्या संदर्भातील वादग्रस्त बोली होय. कोकणी मराठीची बोली आहे की स्वतंत्र भाषा याबद्दल वाद आहे. कोकण या प्रदेशावरून येथील बोलीला कोकणी हे प्रादेशिक नाव पडलेले आहे. कोकणीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तीन रूपे आहेत. १) उत्तर कोकणी २) मध्य कोकणी ३) दक्षिण कोकणी अशी तीन रूपे होय. वरील प्रादेशिक भेदाच्या अंतर्गत कोकणीचे पुन्हा दमणची कोकणी, बाणकोटी, घाटी, संगमेश्वरी, कुडाळी, गोमंतकी इ. स्थानिक उपभेद आहेत.


या प्रादेशिक व स्थानिक भेदांशिवाय कोकणीचे, समाजातील भिन्न भिन्न स्तरांनुसार जातीनुसार भेद होतात, उदा. चित्पावनी बोली, गौड सारस्वतांची बोली, ठाकरी बोली, कुणबी बोली इ. बोलींचा समावेश होतो. खिश्चन मिशनरी लोकांची एक वेगळी बोली कोकणीत दिसते. तिला 'किरिस्ताव बोली' असे म्हणतात. कोकणीच्या सहा बोलींचा अभ्यास डॉ. सु. मं. कत्रे यांनी केलेला आहे. तो खालील प्रमाणे, 

१ ) कर्नाटक किंवा चित्रापुर सारस्वतांची कोकणी

२) गौड सारस्वतांची कोकणी

३) श्री. वालावलीकर उर्फ गोयबाब यांच्या लेखानातून प्रामुख्याने प्रत्ययाला येणारी गोव्याच्या उच्चवर्णीय

हिंदूची कोकणी

४) मंगरूळ आणि दक्षिण कर्नाटक जिल्हातील खिश्चनांची कोकणी 

५) उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील खिश्चनांची कोकणी

६) गोव्यांच्या खिश्चनांची कोकणी


डॉ. सु.मं. कत्रे यांचे हे विश्लेषण द.दि.मुंडे यांनी सांगितले आहे.


वरील प्रमाणे मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. प्रमाण बोलीइतके या प्रत्येक बोलीला महत्त्व आहे. कारण बोली ह्या त्या त्या भाषकांचा सामाजिक सांस्कृतिक वारसाच असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा मराठी माणसाचा, त्यांच्या संस्कृतीचा परिचय करून घेण्याचे एक साधन म्हणून मराठीच्या बोलीकडे पाहिले पाहिजे. 



मराठी बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व : -


ग्रिअर्सेन नंतर मराठीच्या समग्र बोलींचा एकत्रित असा अभ्यास झालेला नाही. लोकशाही राज्यात लोकांच्या भाषेला महत्त्व असते. हे महत्त्व केवळ प्रशासकीय कामकाजापुरते नसते तर सामाजिक व सांस्कृतिक दृष्टयाही असते. प्रदेश भाषा आणि संस्कृती यांचा निकटचा संबंध असतो. महाराष्ट्रातील समाजाचा अभ्यास करण्यासाठी बोली अभ्यासाची मदत होऊ शकते. महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती असणाऱ्या प्रदेशातील बोलींचा अभ्यास केल्यास मराठी भाषेच्या विकासात निश्चित हातभार लागेल.


कोणतीही बोली सहजासहजी नष्ट होत नाही. कारण ते दैनंदिन व्यवहारातलं नैसर्गिक साधन असते. ते साधन मौखिक असते आणि जिवंत असते. आता तर आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या प्रसारमाध्यमांनी बोलींना महत्त्व दिले आहे. एकीकडे आपण लोकनाट्य, लोकसाहित्य ह्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रसारमाध्यम अधिकधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा वेळी बोलींच्या अभ्यासाला महत्व प्राप्त होणे आवश्यक आहे. बोलींचे महत्त्व काळाच्या ओघात कमी होईल. कारण बदलत्या युगात शिक्षणाचा प्रसार होईल व जागृत समाजात लोकांना व्यापक विनिमयाच्या प्रमाणभाषेचा अधिकाधिक वापर करावाच लागेल. भाषेच्या दृष्टीनी समाज अधिकाधिक संघटित होत जाईल. पण नित्य व्यवहारासाठी स्वतःच्या भागातील प्रमाण बोली वापरणे आणि लेखनासाठी आणि सांस्कृतिक व्यवहारासाठी प्रमाणभाषा वापरणं यातही सामाजिक ऐक्याचं द्विविध स्वरूप आणि प्रगतीच प्रतिबिंबित होते. या सर्व पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाची गरज आहे. बोली भाषेचे संचित असते. याविषयी डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, म्हणतात, "तसे पाहिले तर मराठी भाषेच्या बोली म्हणजे आपल्या भाषेचे जिवंत झरे, एका परीने ते आपल्या भाषेचे 'संचित ' असून या संचिताद्वारे 'प्रारब्ध' आकाराला येते,भाषेचे भवितव्य घडविले जाते तेही याच बोलीत साठविलेल्या संचिताच्या बळावर आजच्या प्रमाणभाषेत न आढळणारे भाषेचे कितीतरी ऐतिहासिक विशेष बोलींनी जपून ठेवलेले आहेत.


 बोलीतील संचितांचा अभ्यास व संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक भाषाविज्ञान पध्दतीने मराठीच्या वेगवेगळ्या बोलींचे संशोधन केल्यास प्रमाणभाषेच्या आधारेने न गवसणारे भाषाविकासाचे निश्चित स्वरूप आपल्याला सांगत येईल. मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कारण आधुनिकीकरणामुळे बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सीमारेषा पुसट होत आहेत. आजच्या परिस्थितीत कोणत्याही बोलीची सामग्री गोळा करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. दृक-श्राव्य साधनाद्वारे बोलींची सामग्री जमा केली पाहिजे. एकाच बोलीचा अभ्यास करत असताना मर्यादित भौगोलिक क्षेत्राचा वापर करणे आवश्यक वाटते. त्या मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील व्यवसाय व समाजानुसार सामग्री जमा करणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या बोलींचे नमुने आज उपलब्ध असणाऱ्या आधुनिक इलेक्ट्रोनिक साधनाद्वारे जमा केल्यास दीर्घ काळासाठी अभ्यासकांना ही सामग्री उपलब्ध होऊ शकते. यातून पुन्हा पुन्हा सामग्री गोळा करण्याचे कष्ट कमी होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये अनेक अशा जाती-जमाती आहेत की त्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. अशा जाती-जमातीतील शिक्षणाचे प्रमाण अत्यअल्प आहे. या जाती-जमाती, भटक्या जाती समूहाच्या बोलींचा अभ्यास व संशोधन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे संशोधन त्या त्या जाती-जमातीतून आलेल्या नवशिक्षित तरुणांनी केल्यास बोलींच्या अभ्यासाला गती मिळू शकते. या बोलीच्या अभ्यासातून त्या त्या समाजाचे सांस्कृतिक विश्व प्रकाशात येऊ शकते. मराठीच्या काही बोलींचे अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. अत्यंत परिश्रमपूर्वक बोलीचे स्वरूप विशेष अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेले आहेत. हे अभ्यास मराठीच्या मुख्य बोलींचे जास्त प्रमाणात झाले आहेत. बोलींर्तगत उपबोलींच्या अभ्यासाचे क्षेत्र आजही आंधारात आहे. त्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.


मराठीच्या वेगवेगळ्या बोलींचा तुलनात्मक अभ्यास व संशोधन होणे महत्त्वाचे वाटते. वेगवेगळ्या बोलींची स्वनिमप्रक्रिया ,व्याकरण प्रक्रिया आणि शब्दसंग्रह या तीनही घटकांचा तुलनात्मक अभ्यास करणे महत्त्वाचे वाटते. बोलींच्या शब्दकोशाची निर्मिती होणे आवश्यक वाटते. मराठी भाषेच्या संवर्धनास्तव बोलीभाषेचा शब्दकोश है एक वरदान ठरणार आहे. विविध क्षेत्रातील व विभिन्न परिसरातील शब्द एकत्र येऊनच मराठीचे शब्दभांडार समृद्ध होऊ शकेल. एका बाजूला मराठी शब्दसंपदा तोकडी आहे म्हणून ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूने ग्रामीण शब्दांना अशिष्ट मानायचा हा दुटप्पीपणा बंद करणे आवश्यक आहे. बोलींच्या शब्दकोशा विषयी डॉ. हरिचंद्र बोरकर म्हणतात, " भाषेला प्रवाही करण्याचे कार्य बोली करीत असतात. बोली शब्दकोश यासाठी महत्त्वाचे साधन ठरते. भाषेतील शब्दकोशात अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती दिल्या जातात. ज्याचे मूळ कळू शकत नाही अशा शब्दांना 'देशी' या सदरात समाविष्ट करून भाषावीद मोकळे झालेल असतात. या देशी शब्दाचा खरा 'देश' या बोली-कोशावरून कळू शकतो. जसे जसे अनेक बोलींचे कोश तयार होतील तसतसा या देशी शब्दांचा मूळ 'देश' कोणता ते सापडेल आणि ग्रांथिक मराठीतील या बेवारशी शब्दांची योग्य व शास्त्रीय विल्हेवाट लावणे शक्य होईल." वरील मतावरून बोलींच्या शब्दकोशाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. बोलींच्या शब्दकोशामुळे आपल्या भाषेतील अनेक शब्दांची व्युत्पत्ती उलगडून दाखवण्यास मदत होऊ शकते, बोलींच्या शब्दकोश एक बोली दुसरीपेक्षा किती प्रमाणात भिन्न आहे. हे समजण्यास उपयुक्त ठरू शकतात. बोली व प्रमाणभाषा यांच्यातील भेद स्पष्ट करण्यासाठी मूलभूत संदर्भसाधन म्हणून बोलींचे शब्दकोश उपयुक्त ठरू शकतात. बोलींच्या अभ्यासामुळे संतसाहित्याचे अध्ययन सुलभ होऊ शकते. संतवाङ्मयाच्या पुनर्अध्ययानाची गरज असल्याचे मत डॉ. हरिचंद्र बोरकर यांनी मांडले आहे. ते म्हणतात, "मुकुंदराज - ज्ञानेश्वरांपासून तर तुकाराम - रामदासपर्यंत आपल्या सर्व संतानी लोकभाषेतूनच रचना केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या रचनांचे यथार्थ अर्थनिवेदन होण्यासाठी संस्कृतच्या गहन अरण्यात फिरण्यापेक्षा लोकबोलींच्या उद्यानात विहार करणे अधिक लाभकारी ठरणार आहे." आपण संत साहित्याचा अभ्यास करताना कोणताही शब्द शोधताना तो संस्कृतमध्ये शोधतो. संत साहित्य आणि बोलींचा संबंध अत्यंत घनिष्ट आहे. बोलींमध्ये संतानी वापरलेल्या शब्दाचा शोध घेता येतो. यातून संत साहित्यातील वेगवेगळ्या बोलीतील शब्दांचा शोध घेणे शक्य होऊ शकते.


महाराष्ट्रा बाहेरील मराठी जनांच्या बोलींच्या अभ्यासाचे क्षेत्र अजूनही मोठ्या प्रमाणात उपेक्षित आहे. धार बडोदा, तंजावर, इंदोर, ग्वाल्हेर या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या मराठी बोलींचे अभ्यास नीटपणे झालेले नाहीत. ते होणे महत्त्वाचे वाटते. बोलीच्या अभ्यासामुळे बोलीभाषेत असणान्या लोकसाहित्यावर प्रकाश पडू शकतो. किंबहुना बोलींच्या सर्वधनामुळे लोकसाहित्याचे संचित पुढील काळासाठी आपण जतन करू शकतो. शिक्षणाचे माध्यम मराठी असावे किंवा इंग्रजी याबद्दल वाद आहेत. प्राथमिक शिक्षण बोलींच्या माध्यमातून दिले गेल्यास मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. प्रमाण मराठी विदर्भातील ,कोकणातील, खानदेशातील मुलांना आकलनास जड जाते. मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून अध्यापन केल्यास मुले फार लवकर अनेक गोष्टी आत्मसात करू शकतात. हे संशोधनातून पुढे आले आहे. आज बोलींचा अभ्यास हा मातृभाषा शिक्षणातील हल्लीच्या समस्या निरनिराळ्या बोली आणि पाठ्यपुस्तकातील भाषा यांचा समन्वय, द्विभाषिक पध्दतीचे शिक्षण इत्यादी गोष्टींचा विचार करण्यासाठी होणे आवश्यक आहे. पूर्वी शिक्षण एका विशिष्ट समजापुरतच मर्यादित होतं. ते आता सर्वव्यापी झालेले आहे. अनेक स्तरांवरची मुलं आपआपल्या भाषिक सवयी घेऊन एका वर्गात बसून 'मातृभाषा' नामक प्रमाणभाषा पुस्तकांच्या द्वारा शिकतात आणि त्यामुळे अनेक शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या विषयी विजया चिटणीस माडगूळकर म्हणतात, "ग्रामीण भागातील शाळा, झोपडपट्टीतल्या शाळा इत्यादी अनेक समस्यांवर बोलींचा अभ्यास करणे, बोली प्रमाणभाषा यांच्यातल्या नात्याचं सुस्पष्ट चित्र लक्षात घेणे हेच उपाय आहेत. " बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व यातून आपल्या लक्षात येते. या संदर्भात भालचंद्र नेमाडे म्हणतात, "आपल्या अत्यंत जवळची, रोजची, स्थानिक संस्कृती सांभाळून ठेवणे ह्यात आपल्या नैतिक हक्काचं सामर्थ्य अधिक आहे. मोठमोठ्या राष्ट्रीय संस्कृती ह्या त्यांच्या पोटातल्या लहान लहान संस्कृतिमुळेच टिकतात. मराठी वाचवयाची मला फिकीर नाही. कारण मराठी अशी वेगळी कोटी नाही. ती खानदेशी, वऱ्हाडी, नागपुरी, झाडी, कोकणी, अशा लहान लहान बोलींनी टिकवून ठेवली आहे. मी घरात खानदेशी बोलतो, तसं घरात कोकणी बोलणाऱ्यांना मराठी मेल्याची चिंता नाही. कारण कोकणी टिकली तर मराठी टिकेलच आणि मराठी टिकली तर महाराष्ट्र टिकेल, महाराष्ट्र टिकला तर हिंदुस्थान असा हा सारा व्यूह आहे. ह्या आपल्या हजारो वर्षांपासूनच्या समृद्ध अशा परंपरांना चिकटून राहणं हा अपला नैतिक हक्क आहे. " यातून बोलींचे अस्तित्त्व किती महत्त्वाचे आहे. ते समजते.


समारोप : -

बोली ह्या समाजाची ओळख असतात. या बोलींच्या अभ्यासाचे एक निश्चित ध्येयधोरण योजण्याची गरज आहे. शासकीय मदतीवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आणि साहित्य संस्थांनी बोलींच्या अभ्यासास अग्रक्रम देण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या बोलींचा अभ्यास झाल्यास अनेक बोलींच्या स्वरूपावर प्रकाश पडू शकतो. यापुढील काळात बोलींच्या अभ्यासाची गरज लक्षात घेऊन मराठी बोलींचा अभ्यास केला जाईल असा आशावाद व्यक्त करतो.


____________________________


संदर्भ टिपा: -



१) प्रियोळकर अ.का.ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती १९६६ 

पृ. ३६ 


२ )  कालेलकर ना.गो.भाषा आणि संस्कृती,मौज प्रकाशन गृह, मुंबई तिसरी आवृत्ती १९९९, पृ.६४


३) चिटणीस विजया, वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती, 

डॉ.कल्याण काळे,डॉ.अंजली सोमण, (संपा.) गोखले एज्युकेशन सोसायटी नासिक, प्रथमावृत्ती १९८२

पृ.१६०,१६१


४) पुंडे द.दि. ,वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती डॉ. कल्याण काळे, डॉ. अंजली सोमण, ( संपा) गोखले एज्युकेशन सोसायटी नासिक, प्रथमावृत्ती १९८२ ,पृ. १९७


५ )कुलकर्णी श्रीधर रं. , सामाजिक भाषाविज्ञान प्रा.डॉ.प्रभाकर जोशी,

 प्रा.सौ.चारुता गोखले (संपा.) निराली प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती १९९९ पृ. २० 


६)बोरकर हरिश्चन्द्र ,झाडी बोली : मराठी शब्दकोश, विजय प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती २००० 

पृ.प्राक्कथन २५


७) तत्रैव पृ. २६


८) चिटणीस विजया, उनि, पृ. १७६


९)नेमाडे भालचंद्र, साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण,लोकवाङ्मय गृह, प्रकाशन ,मुंबई, सहावी आवृत्ती- २००९,पृ.२०


डॉ.गणपतराव ढेंबरे

 मराठी विभाग,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर

ता. रावेर, जि. जळगाव,

पिन कोड -४२५५०८

भ्रमणध्वनी ९४२१०८१२७०

 ई-मेल :- dhembregr@gmial.com

आंबेडकरी चळवळ : इतिहास आणि भवितव्य डॉ. गणपतराव ढेंबरे

 आंबेडकरी चळवळ : इतिहास आणि भवितव्य

डॉ.गणपतराव ढेंबरे


ज्या चळवळी लोकांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणतात त्यांना समाजशास्त्रीयदृष्ट्या सामाजिक चळवळी' म्हणतात. समाज घटकांच्या सामुदायिक प्रश्नांना घेऊन चळवळी आकार घेत असतात. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामुदायिक कृतीच्या स्वरूपात जेव्हा संप, मोर्चे, घोषणा, सभा मिरवणुका अशा कृती होऊ लागतात तेव्हा सामाजिक चळवळीचे दृश्य स्वरूप पुढे येते. मात्र या दृश्य स्वरूपाच्या सामुदायिक कृतींच्या आधी परिवर्तनाचा विचार अस्तित्वात असतो. हा विचार एखाद्या व्यक्तीने दिलेला असतो. अशा चळवळींना त्या व्यक्तीचे वैचारिक नेतृत्व लाभते. ती व्यक्ती आपल्या वैचारिक तत्त्वज्ञानातून आणि कृतियुक्त कार्यक्रमातून अशा चळवळींचे प्रतिनिधित्व करते. ही चळवळ जेव्हा पसरते तेव्हा या व्यक्तीला अनेक अनुयायी लाभतात व ते या चळवळीचा प्रसार करतात. वरील सर्व विश्लेषण हे सामाजिक चळवळीची निर्मितिप्रक्रिया उलगडून दाखवते. आंबेडकरी चळवळीची निर्मिती ही समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांच्या आधीन राहणाऱ्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी झाली आहे.

उपेक्षित, मागासलेल्या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंबेडकरी चळवळीची निर्मिती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समग्र जीवनातूनच एक तत्त्वज्ञान निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व लाभल्यामुळे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीला रंग, रूप, आकार प्राप्त झाला आणि ती विलक्षण गतिमान होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन, ग्रंथलेखन करून, सभासंमेलनांतून प्रभावी भाषणे करून मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी शाळा-महाविद्यालये सुरू करून वृत्तपत्रे चालवून आंबेडकरी समाजाला जागृत केले, त्यांना संघटित केले. आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्यास प्रवृत्त केले. आंबेडकरी चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक नेतृत्व लाभले. त्यांनी आपल्या वैचारिक तत्त्वज्ञानातून आणि कृतियुक्त कार्यक्रमातून चळवळीची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायी लाभले. या अनुयायींनी बाबासाहेबांचा विचार प्राणपणाने जिवंत ठेवला.

मला या संस्कृतीचा कंटाळा आला आहे, असे नमूद करून 'आय एम ॲट  वॉर विथ सिव्हिलायजेशन', 'या संस्कृतीबरोबर माझे सतत युद्ध सुरू आहे' असे जाहीर करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, विषमतावादी, अन्यायकारक संस्कृतीबरोबर सतत युद्ध केले. किंबहुना त्या संस्कृतीला परिपूर्णपणे बदलण्याची साधने बाबासाहेबांनी निर्माण केली. समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यात सत्यशोधक चळवळीइतकीच आंबेडकरी चळवळीनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय समाजात शेकडो वर्षांपासून उपेक्षितांचे जीवन नशिबी आलेल्या दलित जातींच्या लोकांना जागृत करून त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त करून देण्याचे अत्यंत कठीण असे कार्य आंबेडकरी चळवळीने केले आहे. या चळवळीच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी दलितांना आत्मनिर्भर बनविले आणि सामाजिक विषमता व भेदभाव यावर आधारित असलेल्या येथील समाजात ताठ मानेने व सन्मानाने जगण्याचे तत्त्वज्ञान दिले.

आंबेडकरी चळवळीचा इतिहास : -

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला इ.स. १९२४ पासून व्यापक स्वरूप प्राप्त होत गेले. असे समजले जात असले तरी प्रत्यक्षात त्याच्याही अगोदर त्यांनी समाज जागृतीच्या आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ३० जानेवारी १९२० रोजी त्यांनी 'मूकनायक' या नावाचे पाक्षिक सुरू केले होते. 

अस्पृश्यांच्या व्यथा-वेदना बोलक्या करणे, त्यांची दुःखे वेशीवर टांगणे आणि त्यांच्यात जागृती घडवून आणणे हा 'मूकनायक' सुरू करण्यामागील त्यांचा मुख्य उद्देश होता. या पत्राच्या पहिल्याच अंकात त्यांनी असे म्हटले होते की, “युगानुयुगे चालत आलेले दास्य, दारिद्र्य यांपासून बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले पाहिजे. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.” यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'मूकनायका'च्या निर्मितीचे प्रयोजन स्पष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संस्थेची स्थापना केली. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारतीय इतिहासात न्याय मागणीसाठी सर्वात प्रदीर्घ केला गेलेला सत्याग्रह होय. दि. २७ मार्च १९२७ मध्ये बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे भरविण्यात आले होते. त्या अधिवेशनाच्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी २० मार्च १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्यावर एक विशाल मोर्चा काढला. त्यानंतर अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी त्या तळ्याचे ओंजळभर पाणी प्राशन केले. बाबासाहेबांच्या अनुयायांनीदेखील त्यांच्या कृतीचे अनुकरण केले.

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या एकूण अनुभवातून बाबासाहेबांनी चिंतन केले. या चिंतनातून त्यांनी एक क्रांतिकारी कृती केली ती म्हणजे दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी 'मनुस्मृती'चे जाहीररीत्या दहन करण्यात आले. 'मनुस्मती' या हिंदूंच्या धर्मग्रंथात अस्पृश्यतेच्या प्रथेचे आणि अस्पृश्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे समर्थन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले होते की, "मनुस्मृतीत शूद्र जातींची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तींचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून असमतेची धुळवड मात्र घातलेली आहे." हा बाबासाहेबांचा विचार मनुस्मृतीचे दहन करण्यापाठीमागचा कार्यकारणभाव स्पष्ट करतो.

हिंदुत्वावरील आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यानुसार बाबासाहेब व त्यांचे अनुयायी यांनी अमरावतीचे अंबाबाई मंदिर, पुण्याचे पर्वती मंदिर, नाशिकचे काळाराम मंदिर अशा निरनिराळ्या ठिकाणी मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह केला. यांपैकी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळविण्यासाठी झालेला सत्याग्रह खूपच गाजला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हजारो अनुयायांनी ३ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिराच्या ठिकाणी सत्याग्रह केला. हा सत्याग्रहदेखील प्रदीर्घ काळ चालला. या सगळ्या संघर्षातून बाबासाहेबांच्या मनात धर्मांतराचा निर्णय ठाम होत गेला.

दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे डॉ. आंबेडकर यांच्याच अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची एक परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेत बोलताना बाबासाहेबांनी असे उद्गार काढले की, "दुर्दैवाने मी हिंदू म्हणून अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही, परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही." या घोषणेनुसार दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर मुक्कामी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सर्व आणि सांस्कृतिक चळवळींबरोबरच बाबासाहेबांनी राजकीय स्वरूपाच्या चळवळींना सुरुवात केली होती.

इंग्लंडच्या सरकारने भारताच्या घटनात्मक प्रश्नासबंधी विचारविनिमय करण्यासाठी इ.स. १९३० ते १९३२ च्या दरम्यान तीन गोलमेज परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ असल्याखेरीज अस्पृश्यांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळणार नाही, असे त्यांचे प्रतिपादन होते. इ.स. १९३२ इंग्लंडचे त्या वेळचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 'जातीय निवाडा' घोषित केला. त्यामध्ये भारतीय समाजातील इतर काही विभागांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या घोषणेविरुद्ध महात्मा गांधींनी ‘'येरवडा’ जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण थांबविण्यासाठी बाबासाहेब व महात्मा गांधींमध्ये एक करार झाला; तो 'पुणे करार' या नावाने प्रसिद्ध आहे.

पुणे कराराच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या मागण्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यापक पाठिंबा मिळाला होता. अखिल भारतीय पातळीवर बाबासाहेबांचे नेतृत्व प्रकाशझोतात आले होते. देशाचे स्वातंत्र्य जवळ आल्याची चाहूल बाबासाहेबांना लागली होती. लोकशाहीप्रधान राष्ट्रामध्ये राजकीय पक्ष ही एक अपरिहार्य गरज आहे. हे बाबासाहेबांनी ओळखले होते. यातून बाबासाहेबांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. इ. स. १९३६ मध्ये बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी असे म्हटले होते की, “सनातनी व प्रतिगामी स्वरूपाच्या सर्व शक्तींना आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे." या विचारातून बाबासाहेबांचे राजकीय पक्ष स्थापन करण्यापाठीमागचे उद्दिष्ट आपल्या लक्षात येते. इ.स. १९४२ मध्ये बाबासाहेबांनी पुन्हा एकदा नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' असे नाव या नवीन पक्षाचे ठेवण्यात आले. या पक्षाने अस्पृश्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

इ.स.१९५४ साली झालेल्या निवडणुकांतील पराभवानंतर बाबासाहेबांनी “मी लावलेले रोपटे जरी कोमेजून गेले असले तरी त्याची मुळे शाबूत आहेत" असे विधान केले. या विधानामधून बाबासाहेब पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सज्ज झाले होते हे आपल्या लक्षात येते. इ.स. १९५२ व १९५४ मध्ये झालेल्या निवडणुकांत पराभव झाल्यानंतरसुद्धा इ.स. १९५७ साली होणाऱ्या निवडणुका नव्या उमेदीने लढविण्यासाठी व संसदीय लोकशाहीला आणखी समृद्ध करण्यासाठी 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली व तशा प्रकारचा ठराव ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्लीत त्यांच्या घरी झालेल्या फेडरेशनच्या कार्यकारिणीत पास करण्यात आला होता; परंतु दुर्दैवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि आंबेडकरी चळवळीची दिशा बदलली.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी ३ ऑक्टोबर १९५७ ला 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची रितसर स्थापना केली. पक्षाच्या अनुयायांमध्ये ऐक्य फार काळ टिकले नाही. पक्ष स्थापनेनंतर एका वर्षाने पक्षात उभी फूट पडली. पक्ष दोन ध्रुवांमध्ये विभागला गेला. एका बाजूला कर्मवीर दादासाहेब गायकवाड, डॉ. आर. डी. भंडारे, बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे, एन. शिवराज इ. तर दुसऱ्या बाजूला ॲड.बी.सी.कांबळे, दादासाहेब रूपवते, प्रा. एन. एम. कांबळे, आवळे बाबू, ए.जी. पवार इ. अशी नेत्यांची वाटणी झाली आणि रिपब्लिकन पक्षाची घडी बसण्याआधीच विसकटली. रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली. पुढच्या काळात पक्ष वेगवेगळ्या गटा-तटांत विभागला गेला. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष स्थापनेचे जे ध्येय धोरण ठरविले होते ते वास्तवात येण्याची शक्यता पूर्णपणे मावळली.

आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात दोन घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली घटना म्हणजे दलित पँथरची स्थापना तर दुसरी घटना म्हणजे नामांतराचा लढा. या दोन घटनांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित समाजात जागृती, चेतना, अस्मितेची जपणूक करण्याचे कार्य केले. मुळात आंबेडकरी चळवळीतील राजकीय चळवळीची अवस्था बिकट असताना, दुहीचे राजकारण खेळले जात असताना आंबेडकरी चळवळीतील सांस्कृतिक चळवळ, सामाजिक चळवळ ही खऱ्या अर्थाने ऐन उमेदीत होती. किंबहुना कर्तृत्वाच्या शिखरावर चढण्यास सज्ज झाली होती. यातील आंबेडकरी साहित्य चळवळीने एक स्वतःचे स्थान,अस्तित्व निर्माण केले होते.

आंबेडकरी सामाजिक चळवळीचा विचार करता वेगवेगळ्या आंबेडकरी अनुयायींच्या ताकदीवर सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आंबेडकरी चळवळ कार्य करताना दिसते. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे नेते सामाजिक चळवळीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पुढील काळात आंबेडकरी चळवळीचे स्वरूप कसे असावे याबद्दल मी काही मते नोंदविण्याचा प्रयत्न करीत आहे. ती अपूर्ण असू शकतील याची मला जाणीव आहे.

आंबेडकरी चळवळीचे भवितव्य : -

बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीने आपले स्थान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. स्वार्थकेंद्रित व्यवस्थेत समाज विकासाचे मोठे कार्य चळवळीला पार पाडावयाचे आहे. आंबेडकरी विचारधारेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिलेले वैचारिक अधिष्ठान हे मोलाचे आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही चतु:सूत्री या वैचारिक अधिष्ठानापाठीमागे आहे. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार आंबेडकरी विचारधारेने महत्त्वाचा मानला आहे. 'बहुजन 'हिताय, बहुजन सुखाय' हे अंतिम ध्येय आंबेडकरी विचारधारेने स्वीकारले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यास ही चळवळ सज्ज आहे.

आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांनी प्राप्त करून दिलेले सर्वसमावेशकतेचे तत्त्व मागे पडता कामा नये. केवळ विद्रोह, द्वेष यांच्यापेक्षा विधायक, सर्वमंगल, प्रेम यातून भारतीय समाजाचे पुनर्निर्माण शक्य आहे. गौतम बुद्धांचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारून दलित चळवळीला जागतिक परिमाण प्राप्त करून दिले आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये विचारवंत, लेखक, कलावंत, समीक्षक यांची खूप मोठी फौज असल्याचे दिसते. सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या या विविध व्यक्ती सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय होण्याची गरज आहे. सांस्कृतिक चळवळीत काम करणारे सर्वजण हे सृजनशील कार्य करीत असतात. समाज परिवर्तन हे अंतिम ध्येय मानणाऱ्या या विचारवंतांनी पुढील काळात सर्व आंबेडकरी चळवळींना दिशादिग्दर्शनाचे कार्य केल्यास विधायक सामाजिक बदल घडू शकतो. विचारवंत, लेखक, सृजनशील कलावंत, सच्चे कार्यकर्त्यांनी स्वतःला कोणत्याही नेत्यांच्या पक्षाच्या दावणीला बांधून घेऊ नये, स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची गरज आहे. केवळ हितसंबंधींची राखण करण्याच्या नादात स्वतःला व समाजाला विकावे हा समाजद्रोह आहे. आपल्या जबाबदारीचे भान राखणे फार महत्त्वाचे आहे.

दलित चळवळीला धोका आहे तो स्वयंघोषित पुढारी, कार्यकर्ता यांच्यापासून हे स्वत:ला चळवळीतील पुढारी, नेते, कार्यकर्ता म्हणून घेतात. यांचे चळवळीत येण्याचे ध्येय स्वार्थ साधणे हे आहे. ही सर्व मंडळी श्रेय लाटण्यासाठी वेळप्रसंगी कोणतीही वैचारिक तडजोड करण्यास तयार असतात. यांच्यापासून आंबेडकरी जनतेला धोका आहे. यांना बरोबर घेऊन चालणे विश्वासघाताचे ठरू शकते. यांना चळवळीतून बाजूला केल्याशिवाय नवनिर्माण अशक्य आहे. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणारी मंडळी ही राजकारणापासून अलिप्त असणारी असावी. सर्वसामान्य जनतेचा नेतृत्वावरील उडालेला विश्वास कायम होण्यासाठी चळवळीतील नेतृत्व हे स्वच्छ चारित्र्याचे, राजकारणापासून अलिप्त असणारे असल्यास याचा फायदा चळवळीला होऊ शकतो.


आंबेडकरी चळवळीने संघटना मजबूत करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यातील दुसऱ्या घटकाचा विचार करण्याची गरज आहे. चळवळीला एक निश्चित धोरण ठरवून योजनाबद्ध कार्यक्रम आखून संघटन वाढविण्याची गरज आहे. संघटन वाढल्यास सर्व पातळीवर दबावगट म्हणून कार्य करणे सोपे जाऊ शकते. संघटनेची बांधणी करत असताना बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यावर भर देणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहचल्याशिवाय नवसमाजाचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. बाबासाहेबांची वैश्विक विचारधारा सर्वश्रुत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या विचारधारेप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन चालणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळीने सर्वसमावेशक धोरण स्वीकारले पाहिजे. किंबहुना आंबेडकरी चळवळीनेच राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची गरज आहे.


सर्व घटकांना बरोबर घेऊन चालल्यास एक तर संघटना अधिक मजबूत होईल व चळवळ व्यापक होऊ शकते. आंबेडकरी चळवळीने एक निश्चित कृतिशील कार्यक्रमपत्रिका ठरविण्याची गरज आहे. यातून समाजातील चेतना जागृत राहण्यास मदत होते. समाजाच्या विकासासाठी सतत सक्रिय राहणे गरजेचे असते. सुप्त अवस्थेत कोणत्याही चळवळीचा विकास थांबत असतो. हे टाळण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविल्यास संघटनेत चलनवलन होऊन तिला जिवंतपणा प्राप्त होत असतो.


आंबेडकरी चळवळीने आक्रमक परंतु विचारी (सम्यक) लोकमत निर्माण करणे गरजेचे आहे. अंतिमतः नीतिमान समाजव्यवस्था निर्मितीचे बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यास चळवळीने सज्ज होण्याची गरज आहे.



( लेख पूर्व प्रसिद्धी - प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक - ॲड. महेंद्र शिंदे स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे प्रथमावृत्ती - ६ डिसेंबर २०१२ )

डॉ. गणपतराव ढेंबरे

मराठी विभाग ,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय , रावेर जि . जळगाव

पिनकोड - ४२५५०८

मोबाईल नंबर - ९४२१०८१२७०

ई - मेल - dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...