शुक्रवार, १० जुलै, २०२०

गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी माणसाच्या अस्तित्वाचा शोध "॥

॥ "गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी माणसाच्या अस्तित्त्वाचा शोध "॥




 अच्युत आठवले आणि आठवणी (२००३) आणि ऑपरेशन यमू (२००४) या  कादंबऱ्यानंतर मकरंद साठे यांची नवीन कादंबरी 'गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी ' ही 2019 मध्ये प्रकाशित झाली. मराठी कादंबरीला नवे वळण व नवी दिशा देणारा कादंबरीकार म्हणून मकरंद साठे यांचा उल्लेख करावा लागतो. आधुनिकोत्तर समाज जीवनावर विज्ञान व तंत्रज्ञान यांचे होणारे परिणाम , आधुनिक  जीवनातील असंगतता  निरर्थकता अशी आशयसूत्र मकरंद साठे यांच्या कादंबरीतून थेटपणे अभिव्यक्त होतात. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीला सलग असे कथानक नाही. काही एक घटना प्रसंगांच्या तुकड्यांमधून त्रोटक कथानक आकार घेते. कादंबरीला नायक म्हटलं तर आहे. आणि म्हटलं तर नाही. कादंबरीतील वेगवेगळी पात्रे वेगवेगळ्या सामाजिक ,आर्थिक , सांस्कृतिक परिवेशात वावरतात. ती एकमेकांशी संबंधित नाही. तरीही ही वेगवेगळी पात्रे एकत्र येतात. या पात्रांना एकत्र आणणारा काळा,अवकाश हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. वास्तव आणि अतिवास्तवाच्या गुंफणीतून ही कलाकृती आकार घेते. जगण्यातील निरर्थकता शोधणारी पात्रे गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीत भेटतात. कादंबरीतील सर्व पात्रे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी आहेत. स्वतःच्या अस्तित्वा बरोबरच जगाचा,जगण्याचे अस्तित्व शोधणारी ही पात्रे आहेत. सत्यकाम अनसूया याला कादंबरीचा नायक म्हणता येईल. परंतु सत्यकामच्या व्यक्तिगत जगण्याला मांडणे हे या कादंबरीचे मुख्य सूत्र नाही. इसवी सन १९९० नंतरच्या भारतीय समाज वास्तवाची मांडणी कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. धार्मिक कट्टरता, जातीयवाद, उच्च मध्यमवर्गीयांचा चंगळवादी, भौतिक सुखाच्या आहारी जाणे, जगण्यातील व्यस्तता, आभासी वास्तवातील हरवलेपण ,आधुनिकता आणि पारंपरिकता यांच्या स्वीकारातील गोंधळ, मूल्यऱ्हास, जगण्यातील जटिलता मांडणारी गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी ही कादंबरी लक्षवेधक ठरते.
                           ॥ १ ॥

या कादंबरीचे कथानक आपल्याला थोडक्यात असे सांगता येईल. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीत एकूण सहा उपकथानके आहेत. सत्यकाम, विभाकर,अगस्ती, गणपती, आयेश,नर्सबेन या मुख्य पात्रांचे चित्रण करणारी सहा उपकथानके यांच्या एकत्रीकरणातून या कादंबरीचे कथानक आकार येते. थोडक्यात या उपकथानकांचा आढावा घेऊ या. सत्यकाम उर्फ आकाश हा अनसूया नावाच्या वेश्येचा मुलगा आहे. तत्वज्ञान विषयातील पीएच.डी.चा अभ्यास सत्यकाम करत आहे. सत्यकामला ' हिंदू षड्दर्शनातील पुरुषप्रधानता आणि त्याचा एकोणिसाव्या - विसाव्या शतकातील वसाहतिक भारतातील वैचारिकतेवर झालेला परिणाम ' या विषयावर सत्यकामला पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करायचे आहे. विद्यापीठाची रिसर्च अँड रेक्गनिशन कमिटी सत्यकामचा सिनॉप्सिस नकारते. सत्यकामचा संशोधन विषय नाकारणेमागे कमिटीतील सदस्यांचा बदललेला वैचारिक दृष्टिकोन कारणीभूत ठरतो. पीएच.डी. मार्गदर्शक स्वतःच्या स्वार्थासाठी सत्यकामला मार्गदर्शन करण्याचे टाळतात. सत्यकाम निराश होतो. शिक्षण सोडून तो गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीत वॉचमन म्हणून काम करू लागतो. तिथे त्याला अगस्ती नावाचा माणूस भेटतो. काहीसे बौद्धिक संतुलन हरवून बसलेला अगस्ती सत्यकामशी संवाद साधतो. सत्यकाम तात्विक दृष्ट्या अगस्तीच्या काही प्रश्नांची उत्तरे देतो. अगस्तीची पत्नी मृदूला हिने आत्महत्या केलेली आहे. अगस्ती आणि मृदूला यांना काव्या नावाचे अबनॉर्मल मुलगी आहे. ती तिच्या मावशीकडे राहते. अगस्तीला एकटेपणा खूप प्रिय आहे. अगस्ती आणि सत्यकाम गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई  सोसायटीत भेटतात. वारंवार भेटतात. चर्चा करतात .

 अगस्तीच्या सोसायटीत राहणाऱ्या रणजीत आणि मेनका या दाम्पत्याचा मुलगा गणपती हा आहे. रणजीत आणि मेनका आयटी क्षेत्रात उच्च महत्वकांक्षा ठेवणारे  दांपत्य आहे. एका अध्यात्मिक बाबाच्या उपदेशावरून हे दांपत्य गणपतीला जन्मला घालते. रणजीत व मेनका दोघेही गणपतीकडे लक्ष देऊ शकत नाहीत. गणपतीला प्रोप्रिओसेप्शन नावाचा आजार होतो. गणपतीला त्याचे आई-वडील गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी मधील फ्लॅटमध्ये कोंडून ठेवतात. अगस्ती गणपतीचा खून करतो. व स्वतः आत्महत्या करतो.

 विभाकर हे कादंबरीतील एका उपकथानकातील पात्र आहे. विभाकर हा मूकबधिर आहे. तो आपल्या असण्यावर समाधानी असणारा असा माणूस आहे. पुण्यात नातेवाईकांकडे येतो. चुकून दंगलीत सापडून त्याच्या दाढीवरून हिंदू लोक विभाकरला मुस्लिम समजून ठार करतात. मूकबधिर असणाऱ्या विभाकरची भेट बसमध्ये नर्सबेन सोबत होते. गुजरात दंगलीत अत्याचार झाल्यामुळे योगायोगाने नर्सबेन पुण्यात येते. ती स्वतःची मुस्लिम ओळख लपवून ठेवते. दंगलीतून वाचते. परंतु या धक्क्यातून आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे येते. त्याच वेळी आगस्ती आत्महत्या करण्यासाठी तिथे आलेला असतो. ते दोघे आत्महत्या करतात. ही आत्महत्या सत्यकाम व आयेशा टेकडीवरून पाहतात.


 आयेशा ही आंतरधर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याची मुलगी आहे. स्वतंत्र विचारांची मोकळ्या वातावरणात वाढलेली ही मुलगी आहे. एका अपघातात आयेशाचे आई-वडील, भाऊ मरण पावतात. ती एकटी पडते. दारूच्या नशेत गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीत येते.  तेथे तिला उच्चभ्रू वेश्य समजून  अयेशावर अत्याचार होतो. सत्यकाम आयेशाची काळजी घेतो. आयेशा आणि सत्यकाम अगस्ती व नर्सबेनची  आत्महत्या डोळ्यांनी पाहतात. सत्यकाम आणि आयेशा ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत तरी  कुणाच्या नजरेला पडले नाहीत. या कादंबरीतील वाक्यामुळे वाचकाच्या मनात आनंत शक्यतामागे ठेवत ही कलाकृती संपते. ही कलाकृती वाचकाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करते. या कलाकृतीचे शीर्षकच अर्थपूर्ण आहे. गार्डन ऑफ ईडन म्हणजे  ख्रिश्चन पुराणांमधील स्वर्गातील बाग होय. या बागेत हे कथानक आकार घेते. या बागेला ऊर्फ साई सोसायटी हा खास भारतीय टच आहे.या कलाकृतीतील मांडणी अत्यंत गुंतागुंतीचा आहे. एखाद्या रहस्यमय कथेप्रमाणे अनुभवाला शब्दबद्ध करणारी ही कलाकृती आहे. या कलाकृतीतील मूकबधिर असणारा विभाकर आणि चार वर्षांचा गणपती या दोघांच्या मृत्यूने ही कादंबरी संपते. विभाकर आणि गणपती हे दोघे काही समान धाग्याने बांधले आहेत. किंबहुना आजच्या समाजातील दोन प्रतीके आहेत. समाजाला आपल्या समकालीन वास्तवाचे आकलन होत नाही. धर्माच्या आधाराने होणार्‍या दंगली ,दंगे यातून माणसे मारली जातात. मारणाराला कळत नाही आपण का मारतो? आणि मरणाराला कळत नाही की आपण का मरतो ? हे दोन्ही अनुत्तरीत प्रश्न आहेत. समाज विभाकर सारखा मूकबधिर झाला आहे. समाजाला मूकबधिर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यातून आभासी वास्तवात समाज गुंतून पडतो. आज समाजातील काही वर्ग कमालीचा आत्मसंतुष्ट झाला आहे. समाजाला आत्ममग्न बनवण्यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. जीवनाचा उद्देश काय आहे ? आपण कशासाठी जगतो आहोत ? निसर्गापासून ,जगण्यापासून फारकत घेतलेला समाजवर्ग गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीतून चित्रित  होतो. मुळात हे का घडले ? पुन्हा पुन्हा का घडवले जाते आहे ? हे कोण घडवत आहे ? समाज वास्तवात घडणाऱ्या घटनांचा व त्या मागील अन्वार्थचा विचार मांडणारी ही कलाकृती आहे. राजकारण आणि तंत्रज्ञान ही जोडगोळी हातात हात घेऊन मार्गक्रमण करत आहे. माणसांच्या भावनांना नियंत्रित करणारे तंत्रज्ञानाचे राजकारण प्रस्तुत  कादंबरीतून मांडले जाते.


                        ॥ २ ॥

आधुनिकतेने अनेक विरोधाभास निर्माण केले आहेत. लेखक लिहितो , "कोपऱ्या-कोपऱ्यावर सिक्युरिटी कॅमेरे, पावलोपावली आधार क्रमांक देण्याची सक्ती, पोलिसी चौकशा आणि बॉडी फ्रिस्किंग अशा गोष्टींची आवश्यकता आजकाल पडू लागली आहे, आणि त्याच काळी या गोष्टींनी आपल्या प्रायव्हसीचा अपलाप होऊ लागल्याने आपण चिंतितही आहोत, हा असाच आणखी एक तिढा. " यावरील विवेचानातून आजच्या समकालीन वास्तवतील विरोधाभास लेखकाने अचूकपणे टिपले आहे. ओळख हरवून बसलेल्या माणसांचे जगणे या कलाकृतीतून येते. एकीकडे प्रचंड सार्वजनिक आणि दुसरीकडे व्यक्तिगततेची आस ठेवणारा समाज समकालात वावरत आहे. या दोन जाणिवांमधील विरोधाभास लेखकाने शोधला आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीचा कालावकाश ६ डिसेंबर १९९२ ते १७ मे २०१८ या परिघात फिरणारा आहे. हा कालखंड भारतीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या पंचवीस तीस वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या चरित्रात राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जे बदल झाले. या बदलांचे पार्श्वभूमी सारखे उपयोजन प्रस्तुत कादंबरीत केले आहे. या सर्व बदलांबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या उपयोजनामुळे माणसाच्या मनोभूमिकेत झालेला बदल ही कादंबरी सूक्ष्मपणे मांडते. जागतिकीकरण आणि भारतातील धार्मिक उन्माद या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक आहेत. याबद्दल लेखक लिहितो ,"समाजात धार्मिक आणि जातीय दुफळ्या वाढल्या. हिंसा वाढली. त्याची उदारीकरणानंतर आलेल्या जागतिकीकरणाशी आणि उत्तर भांडवलशाहीशी गाठ पडली. ती इतकी की २०१४ सली भाजपाचे एकछत्री, स्वतःच्या बळावर बहुमत असलेले आणि मोदी नामक एका व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवणारे सरकार सत्तेत आले."
 जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण यांच्या राजकारणाच्या परस्परसंबंधकडे लेखकाने यातून लक्ष वेधले आहे. समकालीन वास्तवावर काहीसे तिरकस भाष्य लेखकाने या कलाकृतीतून केले आहे. उपरोध आणि उपहासतून या मांडणीला अधिक सूक्ष्मता लाभली आहे. लेखक लिहितो," भारतात एक सोय बरी आहे. ती विशिष्ट घटना दंग्याच्या जवळपास झाली हे लक्षात ठेवले की, नंतर गुगल करून त्या दंग्याची नक्की तारीख वगैरे सहज शोधता येते. २०१४ सालच्या भाजपाच्या विजयानंतर दंगे आणि त्यांना खतपाणी घालणारी नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि धोरणे यात इतकी वाढ झाली की, ही तारीख लक्षात ठेवण्याची भारतीय सोय नजीकच्या भविष्यात कमी होईल किंवा काय अशी भीती नष्ट झाली" या विवेचनातून समकालीन वास्तवावर लेखकाने भाष्य केले आहे. यातील उपरोध अतिशय उच्च कोटीचा आहे. वास्तव आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून या कलाकृतीचा घाट आकाराला येतो. कलाकृतीच्या वाचनातून एक अस्वस्थ विमनस्क अनुभव वाचकाच्या वाट्याला येतो. आत्महत्या करणाऱ्या पात्रांच्या मागे उरलेल्या पात्रांसारखा आपलाही जगण्यावरचा विश्वास उडतो. वास्तव आणि अतिवास्तवाच्या मांडणीतून जगण्यातील सत्य लेखकाने अचूकपणे मांडले आहे. एकीकडे उच्च मध्यमवर्गातील जीवन जगणारी माणसे या कलाकृतीत येतात. ती कमालीची आत्मकेंद्रित जीवन जगणारी माणसे आहेत. आधुनिकतेत ,यांत्रिक एकाकीपणात जीवन जगणारी ही माणसे आहेत. आभासी वास्तवाच्या जाणिवेतून या पात्रांची वर्तन होते. जिवंतपणा ,संवेदनशीलपणा या पासून फारकत घेतलेली पात्रे  या कादंबरीतून चित्रित होतात. वेळप्रसंगी ती पात्रे अति संवेदनशील होतात. महानगरातील उच्चमध्यमवर्गीयांचे जीवन या कलाकृतीतून उभे राहाते. आभासी वास्तवातून प्रेरणा, प्रबलन मिळालेली माणसे जात, धर्म, वंश, भाषा, संस्कृती रंक्षणासाठी रस्त्यावर उतरली आहेत. एकांगी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रक्षोभक वृत्तपत्रे, आगलावा सोशल मीडिया यातून प्रेरणा घेऊन स्वतःची भूमिका जगणं विसरलेली माणसे जथ्यांनी एकत्र येतात. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे रक्त सांडण्यासाठी अतिउत्साही झालेले जथ्थे समाजात वावरत आहेत. हा वर्ग निम्म स्तरातील आहे. एकीकडे  शिक्षित उच्चमध्यमवर्गीय समाज आत्मकेंद्रित होत आहे. तर दुसरीकडे निम्नस्तरीय समाजातील माणसे कळपात आपलं अस्तित्व शोधत आहेत.या आजच्या वास्तवाच्या विरोधाभासकडे ही कलाकृती लक्ष वेधते. मुळात माणसांच्या मूळ प्रवृत्तीला मुखर करणारी ही कलाकृती आहे. माणसाच्या जगण्याला बदलून टाकणारे अर्थकारण या कलाकृतीतून मांडले जाते. विशेषतः गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीच्या निर्मितीची कथा लेखक थोडक्यात परंतु अनेक व्यवस्थांना स्पर्श करून सांगतो. विमानतळ बांधण्याचा घोळ लेखक टोकदारपणे मांडतो. अर्थकारण आणि राजकारण ही एकाच रथाची दोन चाके आहेत. यावर ही कलाकृती भाष्य करते. अर्थकारणातील राजकारणाचा वेध लेखकाने उपहासातून घेतला आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटीचे वर्णन करताना लेखक लिहितो ,"त्या सोसायटीत सहा अजस्त्र इमारती होत्या. त्यांची नावे होती - ममताळू, कनवाळू ,वेल्हाळू ,मायाळू,दयाळू आणि सुकाळू या सर्व इमारतींचे काम युरोपातील वातावरण योग्य होईल असे होते. त्या जागेत ऑफिसेसचे दोन अजस्त्र टॉवर्स उभारण्याचे काम चालू होते. त्यांची नावे होती मात्रकृपा आणि पितृकृपा त्यांच्या समोरच्या हिरवळीवर मधोमध देशाचा झेंडा २०१४ सालापासून मोदींचे सरकार आले त्या वर्षापासून दिमाखात फडकू लागला."

 या विवेचनातून समकालीन वास्तवाचे वर्णन येते. आज भारतीय लोकांची मानसिकता दोन ध्रुवांवर लोंबकळत आहे. जगाच्या आधुनिकतेची आवड समाजाला लागली आहे. ते सगळे जीवन स्वीकारता येत नाही. आणि आपले सगळे जुने ,परंपरा ,सगळे जुने विचार सोडता येत नाहीत. या अस्थिर अर्धवट मानसिकतेत उच्चमध्यमवर्गीय भारतीय समाज जगत आहे. दुसरीकडे धर्म, अध्यात्म, परंपरा, तत्वज्ञान याबद्दल भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या जगण्यातून, विरोधाभासातून उभ्या राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक ही कलाकृती करते .समकालीन पिढीचे जगणे मांडणारी ही कलाकृती आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी ही कलाकृती आजच्या भारतीय मानसिकतेतील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते. तात्विकदृष्ट्या अनेक प्रश्नांची उत्तरे भारतीय तत्वज्ञानात शोधणारी आजची पिढी आपल्या आजूबाजूला वावरताना दिसते. आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानातून ,जगण्यातून अनेक प्रश्नांच्या उत्तरे शोधणारी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत. या वास्तवावर या कलाकृतीने बोट ठेवले आहे. प्रस्तुत कादंबरीतील पात्रे तर्काला धरून वागत नाहीत . जगण्यातील असंगतता, तर्कविहीनता या कलाकृतीतून उलगडत जाते. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीतून माणसाचे निराधारपण, नगण्यता व्यक्त होते. कादंबरीतील सत्यकाम,अगस्ती,विभाकर ,गणपती, नर्सबेन आयेशा ही सर्व पात्रे निराधारपण वाट्याला आलेली आहेत.  जगण्यातील नगण्यता अचूकपणे मांडणारी ही कलाकृती आहे. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई  सोसायटी या कादंबरीतून जीवनाचे अमानवीकरण,वस्तूकरण, व्यक्तित्वलोप, परात्मता,संवादशून्यता,जगण्यातील अर्थशून्यता मांडली जाते.आधुनिक जीवनातील विरूपता,भयावहता यांची मांडणी या कलाकृतीतून होते.
       
                          ॥ ३ ॥

 समकालीन राजकीय वास्तव, आर्थिक प्रक्रियेतील गुंतागुंत, सामाजिक स्थित्यंतर यांना कादंबरीतून सूक्ष्मपणे टिपले आहे. भाजपाच्या धार्मिक, सांस्कृतिक दहशतवादचे संदर्भ कादंबरीत उघडपणे येतात. मोदी आणि भाजपाच्या टोकदार प्रतिमांच्या आधारे घडणाऱ्या घटनांचे संदर्भ कलाकृतीत येतात. अनसूया,नर्सबेन,आयेशा, मेनका, मृदूला या पात्रांच्या वाट्याला येणारे शोषण या कलाकृतीतून मांडले जाते. जगण्याचा स्तर वेगवेगळा असला तरी शोषण मात्र सारखे आहे. अनसूया वेश्या आहे. नर्सबेन दंगालीतील अत्याचाराला बळी पडलेली आहे. आयेशा उच्च मध्यमवर्गातील नवशिक्षित तरुणी आहे. आयेशाच्या वाटेलाही अत्याचार येतात. मेनका, मृदूला ह्या उच्च मध्यम वर्गातील स्त्रिया आहेत. स्त्री कोणत्याही स्तरातील असो तिच्यावर अत्याचार करणारी व्यवस्था कायम आहे.स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहाण्याचा दृष्टीकोन कलाकृतीतून मांडला जातो . वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री शोषण  कायम असल्याचे या कादंबरीत मांडले जाते

                                         ॥ ४ ॥

माणसाच्या अस्तित्वाच्या विविध खुणा असतात. माणसाला स्थान , जात, रीती, बोली, परंपरा, धर्म, वंश यासारख्या अनेक ओळखी असतात. यातील काही ओळखी स्वभावीक तर काही ओळखी लादलेल्या असतात. जागतिकीकरणाने माणसांच्या ओळखीचे प्रश्न तीव्र केले आहेत. माणसाच्या सगळ्या ओळखी अदृश्य झाल्या आहेत. काही ठळक ओळखी अगदी ठाम झाल्या आहेत. लेखक लिहितो," आपल्या कादंबरीच्या मर्मस्थानी ज्या २०१८  सालच्या, म्हणजे वरील संभाषण झाले त्या दिवसानंतर त्या सोळा वर्षानंतरच्या, घटना होईपर्यंत ती स्त्री स्वतःबद्दल एवढेच सांगू शकत होती-" मुसलमान... औरत... तेली..." यापलीकडे गुजराती होती हे उघड होते. तिच्या आयुष्यात असे काही झाले होते की, ज्यामुळे या तीन ओळखीच उरल्या होत्या. आधुनिकतेने आणि जागतिकीकरणाने माणसाला अनेक ओळखी एकाच वेळी असण्याची शक्यता निर्माण केली होती. जसे की, माणूस एकाच वेळी जन्माने पुरुष ,भारतीय, मराठी पण लंडनचा रहिवासी, हिंदू ,ब्राह्मण, पण नायजेरियन ख्रिचन , होमोसेक्शुअल पार्टनर असलेला, आय. ए.एस. अधिकार्‍याचा मुलगा, आर्किटेक्ट, नाटकाची आवड असलेला, व पु काळे यांच्या पुस्तकांचा चहाता, फिस्कल  काँझर्वेटिव, तरीही राजकीयदृष्ट्या मोदींचा पाठीराखा, स्त्रीवादी ,साईभक्त, जुनी घड्याळे जमविण्याचा मोठा नाद असलेला, डॉमिनोजचा पिझ्झा आवडणारा, पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा चाहता, मोटारसायकलचे वेड असलेला, ज्याचा पार्टनर व्यवसायाने दुकानदार असा इत्यादी इत्यादी पण या बाईंच्या अशा अनेक ओळखींपैकी  फक्त तीनच तिला आठवाव्या, तीनच महत्त्वाच्या ठराव्यात, असे काही भयाण तिच्या आयुष्यात घडले होते. आधुनिकतेच्या नव्या टप्प्यावर ,ज्या वेळी पोस्ट ट्रुथची सुरुवात झाली त्या टप्प्यावर असे होणे क्रमप्राप्त झाले आहे."

 वरील विवेचनातून आजचे समकालीन वास्तव लेखक मांडतो. नर्सबेनला तिचा भूतकाळ आठवत नाही.तिच्या सगळ्या ओळखी खोट्या ठरल्या आहेत. मागे उरले आहेत फक्त तीन ओळखी,' मुसलमान', 'औरत' आणि 'तेली' ह्या ओळखी होय.त्यात धर्म, जात ,लिंग या तिन्ही ओळखी शिवाय आपलं स्वतःचं असं काहीच मागे उरलेलं नाही. या तीन ओळखी अंतिम सत्य झाल्या आहेत. बाकी सगळा पसारा , तपशील गळून पडला आहे. आपण मिळवलेल्या सगळ्या ओळखी वेगाने अस्पष्ट होत आहेत. मुळात माणसाजवळच्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्या धारणा, जाणीवा, संवेदना यांची मोडतोड होत आहे. सर्व काही हरवून बसलेली पात्रे गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कलाकृतीत भेटतात.

 या कादंबरीतून स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण येते.स्त्री-पुरुष संबंधातील तोचतोचपणा कादंबरीत मांडला जातो. अनसूया या पात्राच्या निमित्ताने बापच मुलीवर बलात्कार करतो.  अनसूया आणि सुभान्या यांच्यातील संबंधांचे चित्रण येते. स्त्री-पुरुष संबंधातील विकृती लेखकाने मांडली आहे. लेखक लिहितो," उद्या तुला अशा ठिकाणी जायचं  की ,त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील... आणि तुझी आई शिंची गेल्याला झाली धा वर्सं त्या छोट्या गावात कोण मिळणार मला ? आं ? पुरुषाच्या शरीराची भूक नको भागायला ? आं ? शिकवणी घेतू तुझी... उद्यापासून काय करायचं त्याची... ये साली आईच्या मुळावर आलेली... वेसवा आणि त्याने तिचा यथेच्छा उपभोग घेतला होता."
  मुलगी आणि बाप यांच्यातील पवित्र नात्याला काळीमा फासणारी नाते कादंबरीतून विकृतीच्या पातळीवर अतिवास्तव स्वरूपात व्यक्त होते. प्रस्थापित मूल्यांचा त्याग करणारी पात्रे कादंबरीतून येतात.  दुसरीकडे  मृदुला आणि अगस्ती यांच्यातील संबंधांचे वर्णन येते. अगस्ती कुठलाच फरक मान्य करत नव्हता. निखळ आनंदापेक्षा यांत्रिकपणे होणारे शरीर संबंध या कलाकृतीत उभे राहतात.

                                   ॥ ५ ॥


 या कलाकृतीच्या काही मर्यादाही सांगता येतात. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ सोसायटी या कादंबरीतून सलग कथानक मांडले जात नाही. खंडित अनुभवाचे तुकड्या तुकड्यांनी मांडलेले वास्तव वाचकाच्या मनावर प्रभावी ताबा मिळवत नाही. सुटा सुटा जीवनानुभव व्यक्त होतो. कादंबरीत आगस्ती आणि सत्यकाम यांच्यातील तात्विक चर्चा प्रदीर्घ स्वरूपाचे आहे. ती काहीशी कंटाळवाणी झाली आहे. कादंबरीतील तात्विक संदर्भ, तत्त्वव्यत्यांचे विचार सर्वसामान्य माणसाच्या ,वाचकांच्या पचनी पडणार नाहीत. समकालीन राजकीय घटना घडामोडींचा संदर्भ थेटपणे कलाकृतीत येतात. संदर्भांच्या मूळ गाभेची सविस्तर मांडणी कलाकृतीत येत नाही. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कलाकृतीत सत्यकाम, अगस्ती, नर्सबेन,आयेशा, विभाकर, गणपती या सर्वांची उपकथानके येतात. ही सर्व उपकथानके स्वतंत्र वाटतात. मूळ कथानकाशी सर्व उपकथानकांचा सांधा नीट न जोडला गेल्यामुळे या उपकथानकांचे स्वतंत्रपण वाचकांच्या लक्षात येते. अतिशय उच्च मध्यमवर्गीय मानसिकतेचे चित्रण उत्तम पद्धतीने येते. निम्नस्तरातील, गरीब वर्गातील समाज चित्रण सूक्ष्मपणे येत नाही. अनसूया आणि तिचे वडील यांच्यातील संवाद कृतक वाटतो. त्याच्यातील जिवंतपणापेक्षा तो कृत्रिम वाटतो. लेखकाच्या मध्यमवर्गीय जगण्याचा स्तर आणि या गरीब शोषित वर्गाच्या जगण्याचा स्तर यातील तफावत फार लवकर लक्षात येते. गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीतून धार्मिक उन्मादाचे चित्रण संदर्भासह येते. वर्ग जाणीव अस्पष्टपणे व्यक्त होते. या कादंबरीतून जातीयतेचे चित्रण येत नाही. समकालीन वास्तवातील जातीय मानसिकता कादंबरीतून चित्रित होत नाही.

 या सर्व कादंबरीच्या मर्यादा असल्या तरी गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी या कादंबरीतून धर्म आणि टेक्नॉलॉजी यांच्यातील साम्य- भेदावर, जगण्याच्या आवर्तावर प्रकाश टाकला जातो.धर्म आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. लेखक या विषयी लिहितो,"माणूस आधी निसर्गाच्या तावडीतून सुटण्यासाठी टेक्नॉलॉजी, देव, संस्कृती अशांचा  शोध लावतो. मग त्याला या टेक्नॉलॉजी, देव, संस्कृतीपासून सुटका करून घेण्याची ओढ लागली. आज हा प्रश्न उभा राहिला आहे. व्हर्चुअल रिऑलिटीपासून सुटका कशी.... स्वतःच बनवलेल्या या वास्तवापासून सुटका कशी. म्हणजे खरंतर स्वतःपासून सुटका कशी करून घ्यायची हा!" वरील विचारसूत्र हे कादंबरीचा गाभा उलगडून दाखवणारे आहे. धर्म माणसाला भौतिक जगापासून दूर घेऊन जातो. शेवटी धर्म आणि तंत्रज्ञान माणसाला आत्मकेंद्री बनवते. यातून माणूस खरं जगणं हरवून बसतो. या वास्तवावर कलाकृती अचूकपणे बोट ठेवते.


डॉ.गणपतराव ढेंबरे 
मराठी विभाग 
श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका ,रावेर जिल्हा, जळगाव पिन -४२५५०८
मोबाईल नंबर -९४२१०८१२७० 
ई-मेल -dhembregr@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...