सोमवार, २५ मे, २०२०

सातपाटील कुलवृत्तांत आकलन आणि आस्वाद

''सातपाटील कुलवृत्तांत आकलन आणि आस्वाद ''

                             ॥ १ ॥
प्रास्ताविक : -

 सातपाटील कुलवृत्तांत ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे. ही कादंबरी केवळ सातपाटील घराण्याचा कुलवृत्तांत सांगत नाही तर बारावे शतक ते आजचा काळ या प्रदीर्घ काळाचा विविधांगी शोध प्रस्तुत कादंबरीत घेतला आहे. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, भूगोल, सांस्कृतिक विश्व, अध्यात्म या सर्वांना स्पर्श करणारी अभिजात कलाकृती म्हणजे सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी होय. बारावे शतक ते एकविसाव्या शतकाच्या प्रदीर्घ काळाच्या अवकाशात या कादंबरीचे कथानक आकार घेते. या कादंबरीला एकूण सात नायक आहेत. या सात नायकांपेक्षा यातील नायिका  कादंबरीत महत्त्वाच्या ठरतात. कादंबरीत लौकिक नायक -नायिकांच्या चित्रणापेक्षा  माणसाच्या जगण्यातील सत्व, वृत्ती- प्रवृत्तींचा यथार्थ अवलोकन करणारी अशी ही कादंबरी आहे. काळ बदलतो. माणसं बदलतात. परंतु जीवनातील सुखदुःखे बदलत नाहीत. माणसांच्या जगण्यातील शाश्वत मूल्यधरणांचा तटस्थ शोध प्रस्तुत कादंबरी घेते. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी संघर्ष होतो. या संघर्षात माणसाच्या मूळ प्रवृत्ती उघड्या पडतात. या प्रवृत्तींची मूळ कहानी म्हणजे ही कादंबरी होय.

 भूतकाळाचे प्रत्येकाला अकर्षण असते. आज आपण जे काही आहोत त्या असण्याचा अर्थ लावण्यासाठी माणूस भूतकाळात डोकावत असतो. कुटुंब, समाज, राज्य, देश, पृथ्वी अवकाश या सर्वांच्या आकलनासाठी भूतकाळ महत्त्वाचा ठरतो. भूतकाळात डोकावण्याचे विविध प्रवृत्ती असतात. त्यापैकी पहिली प्रवृत्ती म्हणजे आज आपण मागासलेले ,कमकुवत, गरीब आहोत? या दृष्टीने आपण भूतकाळात डोकावून पाहतो. दुसरी प्रवृत्ती आज आपण फार प्रतिष्ठित,श्रीमंत,अभिमानी आहोत. परंतु आपला भूतकाळ कसा होता? याची शोध घेण्याची प्रवृत्ती असते. एकूण माणसाच्या आजच्या अवस्थेचा, वागण्याचा, मूल्यांचा अर्थ लावण्यासाठी संपूर्ण समाजाचा भूतकाळ तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे शोधणे महत्त्वाचे असते. सातपाटील कुलवृत्तांतमध्ये लेखक रंगनाथ पठारे भावनिक न होता जीवनाचा शाश्वत संपूर्ण अर्थ लावतात. एक माणूस म्हणून ,समाज म्हणून, आपण कसे उत्क्रांत झालो? याची मांडणी म्हणजे प्रस्तुत कादंबरी होय. भूतकाळाबद्दल माणूस हळवा होतो. भावनाशील होतो. त्यातून भूतकाळाचे सोयीचे अर्थ लावण्याची प्रवृत्ती दिसते. ही प्रवृत्ती रंगनाथ पठारे यांनी टाळली आहे. स्वतःच्या अहंकाराला, अस्मितांना बळ पुरवणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना भूतकाळाचे वस्तुनिष्ठ आकलन नको असते. ते आपला भूतकाळ नाकारतात. भूतकाळाचे गौरवीकरण करून स्वतःचे मोठेपण सिद्ध करणाऱ्या प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला असतात. भूतकाळाचा सोयीचा अर्थ लावणारे अनेक आपल्याला समाजात दिसतात. या प्रवृत्तींना टाळून आपल्या भूतकाळातील सत्य प्रकाशित करणारी कलाकृती म्हणून आपल्याला सातपाटील कुलवृत्तांतकडे पाहता येते. 

                                      ॥ २ ॥
 सातपाटील कुलवृत्तांतचे आशयविश्व :

मानवी जीवन कधीही एकरेषीय असत नाही. जगण्यातील जटिलता, गुंतागुंत उलगडणारी ही कादंबरी आहे. समकालीन जगण्यातील प्रश्नांची, समस्यांची उत्तरे आपल्याला या कादंबरीतून मिळतात. मानवी जीवन कसे कसे बदलत गेले? या प्रत्येक टप्प्यांचा अर्थ शोधणारी ही कादंबरी आहे. जगण्याच्या साधनांचा अवकाश, ही साधने मिळवण्यातील संघर्ष या कादंबरीतून मांडला जातो. माणसातील प्रेम, सकारात्मकता, स्त्री-पुरुष नात्यातील ओलं,स्वार्थ, हिंसा, रक्ताच्या नात्यातले रंग, मैत्री, विश्वास या सर्वांच्या मूलभूत अस्तित्वाला मुखर करणारी ही कलाकृती आहे. जगण्यातील शौर्य, वीरता केवळ युद्धातील माणसं मारण्यात असत नाही. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवणे हे सुद्धा शौर्य, वीरता असते. सातपाटील कुलवृत्तांत मधील प्रत्येक नायक त्याच्या काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला आहे. प्रत्येक नायकापुढे समस्या, संघर्ष वेगवेगळा आहे. त्यांनी  संघर्षाला यशामध्ये परावर्तित करण्याची कला अवगत केलेली आहे. सातपाटील कुलवृत्तांत या महाकादंबरीत सात नायक, त्यांच्या अवतीभोवतीची शेकडो पात्रे या पात्रांना आकार देणारे कालातीत शेकडो प्रसंग आणि घटना यांच्या सहितत्त्व  मीलनातून या कादंबरीतील आशयद्रव्य आकार घेते. विपरीत परिस्थितीतही माणसं जगण्याचा मार्ग शोधतात. माणसाच्या प्रारंभापासूनच्या  जगण्यातील आदिम तत्त्व उलगडत जाणारी ही कादंबरी आहे. कुळ, वंश, जात, धर्म, प्रदेश यांच्या अस्मितांपेक्षा माणसाच्या मूलभूत गरजा त्याच्या बेगडी मूल्यांवर मात करतात. अन्न-वस्त्र-निवारा- मैथुन या मूलभूत गरजांवर माणूस स्वतःला सिद्ध करतो. म्हणूनच सातपाटील कुलवृत्तांतमधील नायक मनगटाला मनगट लागलं की बाकी फिजूल गोष्टींना झुगारून रत होतात. माणसांच्या मूलभूत प्रवृत्तीकडे स्वतःला झोकून देतात. अशा रसरसून जगणाऱ्या नायकांची ही कथा मुळातून वाचण्यासारखे आहे.

 सातपाटलांच्या कुलवृत्तांतचा बिंदूतून सिंधू संस्कृतीला थेट भिडण्याचा लेखकाचा प्रयत्न वाचकाला अंतर्मुख करतो. अज्ञाताचा शोधात माणूस त्याच्या अस्तित्वापासून जगत आला आहे. देवनाथच्या अज्ञाताच्या शोधाचे  प्रयोजन केवळ आपल्या कुलाचा शोध घेणे हे नाही तर माणसाच्या असण्याचे, गतीचे रहस्य शोधणे हे देवनाथच्या प्रवासाचे प्रयोजन आहे. सातपाटील कुलवृत्तांत हा केवळ पठारे घराण्याचा इतिहास नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाचा कुलवृत्तांत कादंबरीतील कुलवृत्तांशी  साम्य सांगणारा असू शकतो. देवनाथ आपल्या अस्तित्वाच्या मूळांशी तटस्थ सम्यक वृत्तीने पोहोचतो. या प्रवासात त्याच्या हाताला अगदी ठाम निष्कर्ष लागतात.आपला मुळ पुरुष अफगाणिस्तानातील होता. आपल्या घराण्यातील स्त्रिया या अफगाण पठाण होत्या. आरेनाबाई ,अफूबाई या अफगाण पठाण वशंच्या होत्या. त्या अस्खलित पुश्तू भाषा बोलणाऱ्या होत्या. आपल्या डीएनएमध्ये अफगाण वंश आहे. ही गोष्ट इतिहासाच्या कसोटीवर खरी ठरू शकते.याचे भान देवनाथला आहे.
 आज समकालीन वास्तवात असंख्य लोक वंश,धर्म कुळी यांच्या शुद्धतेच्या गोष्टी करतात. वंश, धर्म,कुळी, जात, भाषा, परंपरा, आहार, आचारधर्म यांचा आधार घेऊन भेदभाव केला जातो. हा भेदभाव करण्यासाठीचे आधार, प्रमाणके अत्यंत दुर्दैवी, जुजबी आहेत. आपली ही मानसिकता सुद्धा आपल्याला आपल्या डीएनएतून मिळाली आहे. विशिष्ट गटाच्या शूद्र राजकारणातून आपल्या वांशिकतेच्या, कुळीच्या,जातीच्या,परंपरेच्या,आहार घेण्याच्या पद्धती,आचारधर्माचे महात्म्य सांगितले जाते. खास शहाण्णव कुळीची महात्म्य सांगणाऱ्यांना ही कादंबरी धडकन जमिनीवर आणते. मी या विश्वाच्या अवाढव्य गरगरत्या चक्रात माणूस म्हणून जन्माला आलो आहे, हेच केवळ सत्य आहे. माणूस म्हणून आपली जागा या विश्वात केवळ नगण्य अशी आहे. त्यात कसले वंश आणि कसले कुलीन असणे? जात, धर्म,वंश यांना अर्थ तो किती?  देव सुद्धा आपण एका भीतीतून किंवा या विश्वाच्या अवाढव्य असण्याच्या धारणेतून कोणता तरी नियंता मानण्याच्या नजरेतून निर्माण केलेली गोष्ट होय. फार तर देव हा मानवाने निर्माण केलेला युटोपिया असू शकतो. बाकी त्याला कसा अर्थ देणार?मुळात हे विश्व फार मोठी आहे. हा शाश्वत विचार मांडणारी सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी होय.
                                     ॥३॥
एखादी कादंबरी अभिजात कशी असते? याचा प्रत्यय सातपाटील कुलवृत्तांत या कादंबरीत येतो. आज जग कोरोना व्हायरस किंवा विषाणूने  अगदी हादरून गेले आहे. मानवी जीवनाचा अर्थ सांगताना लेखक लिहितो, " पृथ्वीभोवती वातावरण आहे, म्हणजे वायूंचे आवरण आहे. या वातावरणात फक्त वायू आहेत, असे दिसत नाही. त्यात व्हायरस किंवा विषाणू सुद्धा आहेत,हे मी आधी म्हणालो आहे. अर्थात तो फक्त मी म्हणण्याचा प्रश्नच नाहीय. विषाणू पृथ्वीवरील वातावरणाचे अनभिषिक्त स्वामी असतात. आपल्यासारख्या आगुंतुकांना इथून हाकलणे हेच त्यांचे जीवितकार्य असते.  आपल्या मरणानिशी ते संपते. वातावरणातील या असंख्या आणि अजरामर जिवंत/ मृत विषणूशी संघर्ष हेच आपले जीवन असते. विषाणू समजा कितीही मेले असे मानले तरी आणखी पद्मावधी जिवंत असताच.माणसांसकट सारे सजीव त्यांच्या दुनियेत जगत असतात. ही दुनिया त्यांची आहे. तिथे कोणत्या जाती, धर्म, वंश आणि त्यांच्या अरण्यांच्या बाता? विषाणू हेच केवळ सत्य. बाकी सगळे भ्रम. तरीही मानवी प्रजातीवर प्रेम करावे अशीच ती आहे. विषाणूंशी लढा देणारे तिच्याइतकी श्रेष्ठ लढाऊ प्रजाती या पृथ्वीतलावर आणखी दुसरी नाही. "


या कादंबरीतील वरील विचार कादंबरीला अभिजातता प्रदान करतात. लेखक हा द्रष्टा असतो. भूत, वर्तमान आणि भविष्य या त्रिकलाचे दर्शन लेखक घडवत असतो. प्रस्तुत कादंबरीत त्रिकालाचे अत्यंत सम्यक चित्रण आलेले आहे. प्रस्तुत कादंबरीचे  आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. ते म्हणजे कादंबरीतील अनेक घटना प्रसंगांच्या निमित्ताने लेखक अत्यंत कमी शब्दात तात्विक, दार्शनिक विचार मांडतो. उदाहरणार्थ - 'पटत नसलेली गोष्ट सारखी करत राहणं हे रोज डोक्याला खिळा ठोकून घेण्यासारखे आहे '. पृष्ठ ८४, 'जिंकणारा आणि हरणारा यांच्यात अगदी थोडं अंतर असतं. ' पृष्ट ९९ , 'फौजीला जात नसते '. पृष्ठ ३७९, 'जीवन आपल्या आकलनाच्या पलीकडे असते '. पृष्ठ ५९७, 'ज्याच्याजवळ बळ आणि विद्या त्याने राज्य करावे ' पृष्ट ५४२, ' सत्य नेहमी तापदायक असते. आणि ते सहसा राहाटीला धरून नसते ' पृष्ट५४८, 'आपल्याला काय हवे हे वेळीच कळणे आणि ते करायला मिळणे यात जगण्याचे सर्वश्रेष्ठ सुख असते'. पृष्ठ६७९ , 'आयुष्यात कर्तबगारीचे काही जमत नसेल तर अशी पूर्वजांची महती माणसाच्या जगण्याला भावनिक बळ पुरवत असते '. पृष्ट६८६, 'कुतूहल असणे आणि त्याची पूर्ती करण्यासाठी धडपडणे यात आपल्या मानवीपणाचे सार दडलेले आहे'. पृष्ट७०८, 'लिहिणे हे ऐकीव गोष्टींवरून रचणे नसते. ते त्या गोष्टींना आपल्या आत घेऊन आपल्या असण्याचा भाग बनवून आपले करून रचणे असते'. पुष्ट७१३, ' ज्याला आरंभ असतो त्याला अंतही असतोच ' पृष्ट७४०, 'कुणबी मातला आणि मराठा झाला ' पृष्ट७६५ यासारखी कितीतरी वाक्ये या महाकादंबरीत आहेत. गेम्स ऑफ थ्रोन वेबसीरजचा अनुभव देणारी ही कलाकृती आहे. यातील तात्विक मांडणी कलाकृतीला अभिजातता प्रदान करते.
                                    ॥ ४ ॥

इतिहासातील घटना,व्यक्ती, वर्ष, स्थळ, काळ यातून कादंबरीतील जीवन जिवंत होते. लेखकाचे इतिहासाचे आकलन खास त्याचे स्वतःचे आहे. इतिहासाच्या भव्य-दिव्य पटावर आपली पात्रे नगण्य असणार याची जाणीव ठेवून या कादंबरीतील पात्रे लेखक उभी करतो. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती,घटना यांची चित्रातील पार्श्वभूमी सारखा लेखकाने अत्यंत कलात्मकतेने उपयोग केला आहे. इतिहासाची जुजबी आकलन असणाऱ्यालाही ही कादंबरी आनंद देते. लेखकाचे इतिहासाबद्दल यातील संचिताबद्दलचे आकलन, चिंतन या कादंबरीला वाचनीय बनवते. वाचकाची उत्कंठा या महाकाय कादंबरीत कुठेही कमी होत नाही. वाचकाला गुंतवून ठेवणारी कादंबरी आहे. वाचकाच्या मनावर चेटूक करणारी कादंबरी आहे. लेखक म्हणतो, "अधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं त्या वेगाच्या नजरेत काळा हा स्थळापासून सुटा,स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो.त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने तो सार्वभौम. तो त्याच्या मर्जीनेच फक्त वाहतो. गोष्टीला स्थळही आवश्यक असतं. स्थळ आणि काळ यांच्या चार  मितींच्या अवकाशात गोष्ट घडत असते. स्थळाच्या तीन मिती आणि  काळाची एक, तरीही गोष्टीला नियत करण्यात ही काळाची मिती सर्वात प्रमाथी म्हणून आधी काळ सांगतो. "

 वरील लेखकाचे विवेचन प्रत्येक सातपाटलाच्या वृत्तांतामागे आहे. श्रीपतीचा काळा  हा  १२८९ रामदेवराव जाधवांचा काळ आहे. स्थळ पैठण आणि पैठणपासून जवळच असणारे डोंगरकिनी गाव हा  पहिल्या सातपाटलांचा जीवन अवकाश होय. डोंगरकिनी वरून श्रीपती वांबोरीला येतो. या काळात मोठ्या राजकीय घडामोडी पडद्यामागे घडतात. यातून श्रीपतीचा जीवनपट बदलतो.  पलायन व प्रवास हे श्रीपतीच्या जीवनाचे प्राक्तन ठरते. दुसरा सातपाटील साहेबराव हा होय.याचा काळ इ.स. १४९०  निजामशाहीचा काळ होय.  अहमदनगर या प्रदेशातील राजकारणातून साहेबराव आर्यांनासोबत खराडी, पुणे गावाकडे प्रस्थान करतो. तिसरा सातपाटील दशरत याचा काळ इ.स. १७४०पूर्व पेशवाईचा काळ होय.करंजे, सातारा येथे दशरथ सातपाटलाचा विस्तार होतो. चौथा सातपाटील जानराव याचा काळ उत्तर पेशवाईचा इ.स. १८१८ दुसर्‍या बाजीरावाचा काळ होय. गाव साल्पी  जिल्हा अहमदनगर येथे तो रूजण्याचा प्रयत्न करतो. पाचवा सातपाटील रखमजी आणि पिराजी काळ इ.स. सन१८५७ च्या बंडानंतरचा साल्पी गावात सर्व सामान्य माणसासारखे जीवन जगणारे सातपाटील यांचा वृत्तांत कादंबरीत येतो.सहवा सातपाटील शंभूराव याचा काळ इ.स. १९१४ पहिल्या महायुद्धानंतरचा काळ होय. स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेला तो काळ होता. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन शंभूराव जगतो. साल्पी गावाचा विस्तार होतो. बदलत्या काळात सातपाटील घराणे गरीबीच्या खाईत लोटले जाते.शेवटचा सातपाटील देवनाथचा काळा हा१९४७नंतरचा  स्वतंत्र भारताचा काळ होय.  शेवटचा सातपाटील कोथरूड ,जिल्हा पुणे येथे वास्तव्य करतो. अशा वेगवेगळ्या सातपाटलांच्या स्थळ आणि काळ यांच्या अवकाशात ही कादंबरी आकार घेते. काळ कसा बदल जातो आणि माणसाचे अस्तित्व कसे मिटत जाते. याचा प्रदीर्घ शोध प्रस्तुत कादंबरीत उभा राहतो. या कादंबरीतून सात नायकांबरोबरच वेग वेगळ्या नायिकांचे जीवन चित्रीत होते. यात यमी,रोहीणी,  आर्याना ऊर्फ आरेनाबाई, आफिया उर्फ आफूबाई,काळीबाई,  उल्फी,तेजबाई भिमाबाई, देऊबाई, अंजी या कादंबरीतील सर्व नायिका वेगवेगळ्या काळात संघर्ष करत जीवन जगतात. किंबहुना सातपाटील घराण्याचा वंश विस्तार करताना या नायिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वरील सर्व सातपाटील व त्यांच्या नायिका इतिहासातील घडामोडींमध्ये अत्यंत नगण्य भूमिकेत जीवन जगल्या असतील. म्हणून ही कादंबरी बारावे शतक ते विसाव्या शतकापर्यंतच्या सर्वसामान्य माणसांच्या इतिहासासाची, जगण्याची कादंबरी ठरते. इतका मोठा कालावकाश या कादंबरीतून अत्यंत कलात्मक रीतीने चित्रित झाला आहे. म्हणून ही कलाकृती मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कलाकृती ठरते. सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीमध्ये स्त्री-पुरुष नात्यातील अनेकविध पदर उलगडत जातात. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारी पात्रे या कादंबरीत भेटतात. मूल्यांच्या रक्षणासाठी त्याग करणारी ही माणसं विशेष वाटतात. असाधारण इच्छाशक्तीतून आपल्या भावनांचे दमन आनंदमय करणारे श्रीपती आणि रोहिनी मात्र आपल्याला अंतर्मुख करतात. आरेना आणि साहेबराव यांच्यात  सर्मपण दिसते. आरेना शय्येत सुद्धा पुढाकार घेणारी होती. ती ज्ञातास्वाद होती. निस्वार्थी आरेना साहेबरावच्या जीवनाला सुंदर आकार देते. दशरतचा आफिया अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वीकार करते. आफगाणपनाचा त्याग करून ती मराठा होते.पिराजी आणि कोल्हाटी समाजातील उल्फी यांच्यातील नातं हे सर्मपणाचे आहे. जातीपेक्षा स्त्री-पुरुष यांच्यातील सुंदर नातं समजून घेणारी ही पात्रे आहेत. शंभूराव तेजाबाई यांच्यात स्त्री-पुरुष समागमाचा आनंद नसतानाही हे दोघे स्वतःचा संसार फुलवतात. ही जोडी नवरा-बायकोच्या नात्या पलीकडे  जाते. उल्फी- अँथनी ब्लॅकस्मिथ, भिमाबाई- क्याप्टन लेसिंग या सर्वच पात्रांमध्ये लौकिक स्त्री- पुरूष नात्यापलीकडील समानतेचे, समजूतदारपणाचे आदिम नातं स्पष्ट करणारी ही कलाकृती आहे.
                                ॥ ५ ॥
सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीच्या मर्यादा : -

 १ .सातपाटील कुलवृत्तांतमध्ये समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण येत नाही. समाजातील वेगवेगळ्या घटकांपेक्षा नायक- नायिकांच्या वर्णनात, शृंगारीक वर्णनात लेखकाने कादंबरीचे काही पाने खर्ची घातली आहेत.

 २ .समाजातील जात वास्तव त्या  काळातील जातीव्यवस्थेचे सूक्ष्म चित्रण ही कलाकृती करत नाही.

 ३ .कादंबरीची भाषा पहिल्या सातपाटला पासून ते सातव्या सात पाटलापर्यंत सारखीच आहे. रसिकाचे अनुनय करणारी, रसिकांना शरण जाणारी भाषाशैली लेखकाने वापरली आहे . त्या त्या काळातील शब्दकळा कादंबरीत क्षमतेने उभी राहत नाही. वाचकाला आवडेल असं रसिक अनुनय करणारी भाषा प्रस्तुत कादंबरीत येते .

 ४ . इतिहास, सांस्कृतिक विश्व, परंपरांचे तकलादू चित्रण या कादंबरीत येते. अत्यंत सूक्ष्मतेने, चिकित्सकपणे हे घटक कादंबरीत उभे राहत नाहीत .

५ . देवनाथचे भावविश्व, कौटुंबिक विश्व कलाकृतीत उभे  राहत नाही. देवनाथ सातपाटील हा शेवटचा भाग कादंबरीतील मूळ कथानकापासून वेगळा वाटतो. या भागातील सैद्धांतिक, तात्विक मांडणी पहिल्या सहा भागांपेक्षा वेगळा असल्यामुळे सातवा भाग कादंबरीला चिकटवल्या सारखा वाटतो. तो कादंबरीशी एकरूप वाटत नाही.

६ . साहेबराव -आरेनाबाई ,दशरत आफूबाई या दोन सातपाटलांच्या जीवनप्रवासात साम्य दिसते. तोच तो पणा जाणवतो. कथानकातील साम्य  वाचकाला सुमार वाटते.

७ .श्रीपती, साहेबराव, दशरत, जानराव, रखमजी आणि पिराजी, शंभूराव, देवनाथ या सातपाटलांच्या कुलवृत्तांतमध्ये बऱ्याच रिकाम्या जागा राहील्या आहेत याची जाणीव होत राहाते. काही तरी मधले दुवे सुटले आहेत असा भास निर्माण होतो. ही या कादंबरीचे मर्यादा सांगता येते.

८ .या कादंबरीची आणखी एक मर्यादा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडाला दुय्यम मानले गेले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सातपाटील घराण्यातील माणसांच्या अवस्थेचे चित्रण या कादंबरीतून येत नाही. शिवाजी महाराज पूर्व काळ व त्यांच्या नंतरचा काळ यातील भेद, बदललेली मूल्यव्यवस्था, समाजव्यवस्था यांचे चित्रण या कादंबरीतून येत नाही. शिवाजी महाराजांच्या काळापेक्षा पेशवाईच्या उत्तरार्धावर  लेखकाने लक्ष केंद्रीत केले आहे.

९ .दशरत सातपाटील या भागांमध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन येते. दशरत जखमी होतो.सोहेल खान दशरतला झोरावर समजतो. एवढ्या मोठ्या युद्धात दशरथ झोरावर यांचे समोरा समोर येणे हा योगायोग. ते दोघांचे जुळ्या भावांसारखे असणे. हा  कादंबरीतला योगायोग न पटणारा आहे. दशरथचे अफगाणिस्तानला जाऊन आफियाला  घेऊन  येणे. हे अद्भुतरम्य कादंबरीतील वर्णन वाटते. सातपाटील कुलवृत्तांत ह्या कादंबरीच्या ऐतिहासिक, गंभीर मांडणीला धक्का पोहोचवणारे सुमार लेखन वाटते. कादंबरीच्या मांडणीतील सुमारपणाची जाणीव होते.

१० . काहीतरी भव्य दिव्य लेखन केल्याचा भास ही कादंबरी निर्माण करते.ऐतिहासिक पार्श्वभूमी कादंबरीत येते. लेखकाने ऐतिहासिक मांडणी सूक्ष्मतेपेक्षा ,स्थूलपणे केली आहे.त्यामुळे एका महाकादंबरीकडून सुमार कलाकृतीकडे कादंबरीचा प्रवास होतो.कादंबरीमध्ये कुठेही कलात्मकता अनुभवाला येत नाही. सरळ, साधेपणाने गोष्टीरूपात सांगितलेला इतिहास ,गोष्ट ,कहाणी असं या कादंबरीतील कथनाचे स्वरूप आहे. कलात्मकतेच्या अभावातून येणारे सुमारपण कादंबरीत जाणवते.  चोखंदळ वाचकांची निराशा करणारी कादंबरी आहे. सर्वसामान्य वाचकाची उत्कंठा वाढवणारी  सुमार शैली लेखकाने या कादंबरीत वापरली आहे.

                                   ॥ ६ ॥
 समारोप : -

 वरील सर्व मर्यादा सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीच्या मान्य करूनही ही कादंबरी मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कादंबरी ठरते. या कादंबरीच्या लेखनातील जाणीवपूर्वकता लक्षात येते. लेखनातील प्रतिभेबरोबरच चिंतन, अभ्यासातील सातत्य, विषयातील अस्था, गांभीर्य लक्षात येण्यासारखे आहे. इतिहास, इतिहासाची साधने, मानववंशशास्त्र, संस्कृती अभ्यास, भाषाशास्त्राचा अभ्यास या कादंबरीतून सूक्ष्मतेने अभिव्यक्त होतो. ही एका वाचकाला गुंतवून ठेवणारी कलाकृती आहे. लेखकाचे प्रयत्नपूर्वक वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचे कसब अत्यंत चांगले आहे. विषयाचा अवकाश मोठा आहे. या व्यापक अवकाशात असणारी गुंतागुंत लेखकाने सहजतेने मांडली आहे. साधी, सोपी भाषाशैली या कादंबरीत आहे. कधी तृतीयपुरुषी तर कधी प्रथमपुरुषी निवेदनाचे अत्यंत सहजतेने उपयोजन केले आहे. मराठी कादंबरी काहीशी आर्वातात सापडली आहे.  सातपाटील कुलवृत्तांत या कादंबरीने आशय-विषयाच्या ताजेपणातून मराठी कादंबरीला नवी ऊर्जा दिली आहे. या कादंबरीचे  सर्व वाचक, अभ्यासक, समीक्षक स्वागतच करतील असा आशावाद व्यक्त करतो. लेखक रंगनाथ पठारे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! ! धन्यवाद !!!


कादंबरीचे शीर्षक : - सातपाटील कुलवृत्तांत

 लेखक : - रंगनाथ पठारे

 प्रकाशन : - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

पहिली आवृत्ती : - २० जुलै २०१९

 पृष्ठसंख्या : - ७९६

 मूल्य : - १०००

 डॉ. गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव
पिन : -४२५५०८
 मोबाईल क्रमांक -९४२१०८१२७०
ई-मेल dhembregr@gmail.com

रविवार, १० मे, २०२०

उभं आडवं आकलन आणि मूल्यमापन

"उभं आडवं आकलन आणि मूल्यमापन "

  डॉ. गणपतराव ढेंबरे
                                      ॥१॥

 प्रास्ताविक : -

उभं आडवं हे राहुल कोसम्बी यांचे वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. शब्द प्रकाशनाने जून २०१६ मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आत्तापर्यंत तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यातून या पुस्तकाबद्दल जाणकारांच्या मनात असलेली उत्सुकता दिसून येते. उभं आडवं हे राहुल कोसम्बी यांचे वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. लेखकाने काहीएक निमित्ताने केलेलं हे लेखन आहे. या पुस्तकातील लेखन हे ठराविक साचेबंदपणातून मुक्त आहे. समाजशास्त्र,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र,राजकारण, संस्कृती, साहित्य, समकालीन प्रश्न, चळवळीचा उदय व अस्त यासारख्या विविध विषयांच्या बहुविध पैलूंची उकल करणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक राहुल कोसंबी यांचे प्रगाड चिंतन यातून अभिव्यक्त होते. लेखकाचा वाचनाचा व्यासंग अतिशय दांडगा आहे.संशोधनपर ग्रंथ, प्राचीन संदर्भ ग्रंथ,इंग्रजी संदर्भ ग्रंथांच्या वाचनातून प्रस्तुत ग्रंथातील लेख समृद्ध आहेत. समकालीन समाजातील विविध प्रश्‍नाला थेट भिडण्याची सहज लेखनशैली  प्रस्तुत पुस्तकातून आकाराला येते. कुठलाही अभिनिवेश न ठेवता समस्यांच्या, प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेणारी तटस्थ वस्तुनिष्ठता या लेखनात अनुभवाला येते. पुस्तकाचं शीर्षक काहीसं विचित्र असले तरी लेखकाने समाजातील समस्यांचा उभा अक्ष व त्याचा विस्तारणारा आडवा अक्ष यांच्यातील विस्तृत व्यापक आशयक्षेत्र वाचकांसाठी खुले केले आहे. भोवती घडणाऱ्या घटितांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक,सामाजिक विश्लेषण या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. समकालीन समाजातील विविध समस्या हा लेखकाच्या आस्थेचा विषय आहे. या समस्यांची चिकित्सक मांडणी या लेखनातून येते. शोषितांच्या अवस्थांतराचा ऐतिहासिक, संशोधनात्मक शोध राहुल कोसंबी घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कार्ल मार्क्स यांच्या सैद्धांतिक मांडणीचे अत्यंत सकसपणे केलेले आकलन प्रस्तुत ग्रंथाच्या पाना पानावर जाणवते. समकालीन शोषींतांची अवस्था आणि त्यामागील कारणमीमांसा यांचा सैद्धांतिक व्यूह या पुस्तकातून उभा राहतो. समकालीन वास्तवाचे तीव्र संवेदनशील आकलन या आकलनातील गांभीर्य आणि त्याची सैद्धांतिक व्यूहांशी केलेली जोडणी वाचकाला नवे ऐतिहासिक वास्तवाचे भान देते.समाजशास्त्रीय रुक्षतेतपेक्षा राहुल कोसंबी आपल्या वेगवेगळ्या लेखातून जिवंत संवेदनशील मांडणीचा निखालस आनंद देतात. वैचारिक लेखनाकडे वाचक लवकर आकर्षित होत नाही. परंतु राहुल कोसंबी यांचे लेखन याला अपवाद ठरते. निखळ वैचारिक आनंद देणारे शुद्ध लेखन असे उभं आडवंच्या लेखनाचे स्वरूप आहे.
                                    ॥२ ॥
उभं आडवं या ग्रंथातील लेखांचे स्वरूप आणि विशेष : -

'उभं आडवं 'या पुस्तकात एकूण बावीस लेख आहेत. वेगवेगळ्या विषयांवर, प्रश्नांवर, समस्यांवर हे लेख आहेत. राहुल कोसंबी यांनी वेगवेगळ्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे. या लेखांमध्ये कालानुक्रम आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे लेखकाची वैचारिक दैनंदिनी होय. या दैनंदिनीच्या प्रत्येक पानावर एखाद्या विषयाची ऐतिहासिकता ,समकालीनता त्यांच्यातील गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत आनंद तेलतुंबडे यांचा एक विचार मांडलेला आहे. "विचारमंथन करत राहणे हे आपले कर्तव्य आहे, हा विचारवंताचा संघर्ष आहे असे मी मानतो आणि संघर्ष मग तो कोणाचाही, कशासाठीही असो कधी वाया जात नसतो अशी माझी श्रद्धा आहे. " या विचारांशी स्वतःला जोडून घेत वैचारिक संघर्षाचा प्रत्यय या पुस्तकातून येतो. समकालीन विचारमंथनाला दिशा देणारे असे हे पुस्तक आहे.
                              ॥३॥
या पुस्तकातील पहिला लेख 'देशीवाद नेमाडे आणि जातिव्यवस्था 'हा आहे. या लेखात भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवाद सिद्धांताच्या मर्यादा राहुल कोसंबी यांनी सांगितल्या आहेत. या लेखात देशीवाद या साहित्य सिद्धांताचे स्वरूप, व्याप्ती, मर्यादा स्पष्ट केली आहे. देशीवादाने साहित्यनिर्मितीच्या पातळीवर जरी स्वतःला सिद्ध केले असले तरी सिद्धांताच्या पातळीवर पूर्ण स्पष्टीकरण करण्यास देशीवाला अपयश आल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतो.देशीवाद सिद्धांताच्या पातळीवर जातीसमर्थक ठरतो तर साहित्यिक आविष्कारण्याच्या पातळीवर जाती समर्थक ठरत नाही. असे मत लेखक मांडतो. देशीवादावर अभ्यासकांनी घेतलेले आक्षेप आणि त्यातील सत्यता राहुल कोसंबी वस्तुनिष्ठपणे मांडतात. देशीवादाचे समर्थक व विरोधकांच्या विचार दृष्टिकोनाचा सम्यक लेखाजोखा पहिल्या लेखात लेखकाने मांडला आहे.या पुस्तकातील दुसरा लेख हा 'भ्रामक विजयोन्माद आणि अपूर्ण क्रांती ' असा आहे. मे २००६ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने बहुमत मिळून सत्ता संपादन केले. या विजयातून दलित समाजात सुरू झालेल्या चर्चा, विचारातील भावनिकता, अस्मिता यातील फोलपणा स्पष्ट करणारा हा लेख आहे.या विजयाला लेखकाने भ्रामक म्हटले आहे. संपूर्ण परिपक्व क्रांती अजून अपूर्ण असल्याचे ठाम मत लेखक प्रस्तुत लेखात नोंदवतो. मायावतींनी निवडणूक जिंकली याला काही विचारवंतांनी सामाजिक क्रांती म्हटले परंतु ही सामाजिक क्रांती नसून स्वार्थी, नीतीशून्य, राजकीय तडजोड आहे असा अनुमान लेखक नोंदवतो. सामाजिक क्रांती हा एक अमुलाग्र आणि अपरिवर्तनीय बदल असतो. मायावतींचा निवडणूक विजय हा केवळ तात्कालिक नीतीशून्य, भावनिक, अस्मितावादी बदल आहे. असे लेखकाला वाटते. लेखक मायावतींच्या राजकारणाची भावनिक न होता तटस्थ वस्तुनिष्ठ मांडणी करतो.या पुस्तकातील तिसरा लेख
'नामदेव ढसाळ आणि राजा ढाले ' हा आहे. दलित पँथरच्या शीर्ष नेतृत्वाने दलित चळवळीला कोणते योगदान दिले याची वस्तुनिष्ठ सत्यता तपासणारा हा लेख आहे. दलित पँथरचा उदय आणि अस्त यातील पँथरचे वेगळेपण त्याच्या सकारात्मक बाजू लेखकाने प्रस्तुत लेखातून मांडल्या आहेत. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित चळवळीला काय दिले याचा वस्तुनिष्ठ इतिहास लेखकाने मांडला आहे. लेखक दलित चळवळी बद्दल लिहितो, ''दलित चळवळीलाही इतक्या वर्षांनंतर  स्वतःला मिळालेला तत्त्वज्ञानात्मक धूसरतेचा शाप मिटवता आलेला नाही. विशुद्ध आंबेडकरवादीच का असेना पण दलितांच्या मुक्तीबाबतीत दलितांच्या अवस्थेचे निश्चित आकलन, त्यासाठीचा दृष्टिकोण आणि कृतीकार्यक्रमा बाबत अजूनही संभ्रमता आहे. " असे ठोस निर्णयन दलित चळवळीबाबत लेखक नोंदवतो. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या बद्दल लेखक निर्णयकीपणे लिहितो की, " ढाले आणि ढसाळांनी तत्त्वज्ञान आणि त्यागाच्या बाबतीत जेवढी हेळसांड आणि निरर्थकता प्रसवली तेवढी त्याआधी आणि त्यानंतर कुणीही केलेली नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाच्या सम्मीलनाला काळानेच दिलेल्या मूक होकारालाही त्यांना दुर्लक्षित केले आणि आता तीस चाळीस वर्षानंतर तर या दोन नेत्यांच्या लहरी प्रवाहातूनच दिशाहीनतेच्या अनेक वाटा पसरल्या " या विचारातून राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या दलित चळवळीतील  दिशाशून्यतेचे योगदान लेखक दाखवून देत
                               ॥४॥
चौथा लेख"सर्वव्यापी जनचळवळीच्या शोधात " हा आहे.
 या लेखात २०११ वर्ष संपल्यानंतर २०१२ मध्ये नव्या वर्षात प्रवेश करताना लेखकाच्या मनातील,भविष्यातील सर्वव्यापी जनचळवळ जन्माला यावी असा आशावाद व्यक्त करणारा हा लेख आहे. समकाळातील सर्वसामान्य माणसाचे हित पाहणाऱ्या नव्या सर्वव्यापी चळवळीचा उदय कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावे असे लेखकाला वाटते. लेखक याबद्दल लिहितो ''पण हे सर्व करताना ऊठसूट कॅन्डलमार्च - टोपीमार्च काढणाऱ्या जनतेनेही या साक्षात्कारी जनक्षोभाला आपल्या नवमध्यमवर्गीय जात- वर्ग - लिंग जाणीवेच्या पलीकडे नेऊन एका सर्वव्यापी जनचळवळमध्ये रुपांतरीत केले पाहिजे. "असा ठाम आशावाद लेखक या लेखातून व्यक्त करतो.पाचवा लेख 'ब्राह्मणीकरण आभास आणि वास्तव ' हा आहे. विख्यात समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवासन यांनी ब्राह्मणीकरण ही संकल्पना पहिल्यांदा वापरली. मोतीराम कटारे यांनी मुक्त शब्द नियतकालिकाच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप नोंदवले. सर्व प्रकारचे भेद करणे हे ब्राह्मणीकरण्याचे पहिले लक्षण कटारे नोंदवतात. राहुल कोसंबी यांनी ब्राह्मणीकरण या संकल्पनेची व्याप्ती इतिहास आणि वास्तव त्यांचे विविधांगी कंगोरे प्रस्तुत लेखात मांडले आहेत. मोतीराम कटारे यांनी ब्राह्मणीकरण्याची प्रक्रिया व त्याचे साहित्यातील अधिक्षेप यांची मांडणी केली आहे. या मांडणीचा वस्तुनिष्ठपणे राहुल कोसंबी शोध घेतात. मोतीराम कटारे यांच्या मांडणीतील एकांगीपणा राहुल कोसंबी उघडा करतात.या पुस्तकातील सहावा लेख'एफडीआय :काही निरीक्षणे काही शक्यता ' हा आहे. एफडीआय ही अर्थशास्त्रीय घटना आहे. एफडीआयच्या भारतातील आगमनामुळे दलित शोषितांच्या जगण्यावर, अस्तित्वावर काय परिणाम होईल याचा शोध म्हणजे प्रस्तुत लेख होय. परदेशी गुंतवणुकीचा भारतातील शिरकाव व त्यामागील अर्थकारण लेखक या लेखात स्पष्ट करतो. भविष्यात परदेशी गुंतवणुकीचे कोणकोणते परिणाम होतील ते लेखक सूक्ष्मपणे मांडत जातो. भारतातील भविष्यातील एफडीआयमुळे कुणाच्या वाट्याला काय येईल याचा अंदाज लेखक मांडतो. शहरी ग्राहक व हतबल शेतकरी यांच्या वाट्याला केवळ फसवणूक येणार आहे. दोघांचे प्रचंड शोषण केले जाणार आहे.याचे दिशादिग्दर्शन प्रस्तुत लेखातून लेखकाने केले आहे.सातवा लेख 'डॉ. विलास सारंग यांचे जाति -आकलन वास्तव आणि विपर्यास ' हा आहे .या लेखामध्ये डॉ. विलास सारंग यांच्या 'मॅनहोलमधला माणूस ' या पुस्तकातील विचारांचा एकांगीपणा, जातीय मानसिकता यातील वास्तव राहुल कोसंबी स्पष्ट करतात. लेखकाने डॉ.विलास सारंग यांच्या जाती वास्तवाच्या आकलनाची अपरिपक्वता, अपूर्णता केवळ तर्काने नव्हे तर परिपूर्ण सिद्धांत मांडणीतून स्पष्ट केली आहे. राहुल कोसंबी जात वास्तवाचे स्वरूप स्पष्ट करताना लिहितात, '' हे जातिवास्तव  वेगवेगळ्या गटांवर वेगवेगळा परिणाम परिणाम साधते. अल्पजन गटाला ते मर्यादित करते तर वंचित गटाला ते असंस्कृत बनवते. या दोन्ही अवस्थांची कारणे आपल्याला त्यांच्या सामाजिक - राजकीय -आर्थिक आणि सांस्कृतिक अभावग्रस्ततेत पाहायला हवीत " असे ठाम विचारमंथन लेखक या लेखातून मांडतो.
                               ॥५॥
आठवा लेख'आरक्षण, जातिव्यवस्था आणि जागतिकीकरण ' हा आहे. आरक्षण देण्यामागची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्यापक सैद्धांतिक मांडणी सुरुवातीला स्पष्ट करून आजच्या काळातील आरक्षणाचे वास्तव अत्यंत टोकदारपणे राहुल कोसंबी यांनी मांडले आहे. प्रस्तुत लेखातील निरीक्षणे अत्यंत ठाम व सूक्ष्म आहेत. जागतिकीकरणामुळे जातीव्यवस्थेचे रूप बदलले. जागतिकीकरणामुळे आरक्षण व्यवस्थेचा अवकाश संकुचित झाला. जागतिकीकरणामुळे खाजगीकरणाचा विस्तार झाला. जागतिकीकरणामध्ये आरक्षणला कुठले स्थान उरले नाही. १९९० नंतर आरक्षणाचे राजकारण भारतीय पातळीवर परमोच्च स्थानाला पोहोचले. यातील जटीलता, त्यातील समाजजीवनावरील परिणामकारकता यांचा यथार्थ शोध लेखकाने प्रस्तुत लेखात घेतला आहे. राहुल कोसंबी लिहितात, " दलितविरोधी योजनांमुळे आकसत चाललेला विकासाचा पर्याय आणि मध्यमजातीयांचे विखारी राजकारण यांचा पुरेपूर अनुभव घेऊनही शहरी मध्यमवर्गीय दलितांचा आर्थिक अजेंडा अजूनही आरक्षणापलीकडे जात नाही आणि त्यातही त्यांची वृत्ती मागे राहिलेल्या आपल्या सर्वात गरजू बांधवांकडे जात नाही.याउलट इतर मध्यम जातियांबरोबर तेही बाबासाहेबांच्या आरक्षणापाठीमागच्या मूलभूत तर्काला हरताळ फासण्यास मागेपुढे पहात नाहीत.आकडेवारीवरून हे सिद्धच होते की, दलितांच्या आरक्षणाचा फायदा दलितांमधल्या ठराविक जातीतल्या ठराविक लोकांनाच झाला आणि याचा परिणाम म्हणून या जातीत नवा 'पेटी बुजर्वा ' वर्ग जन्माला आला. ज्याने नंतरच्या दलित चळवळीचे नेतृत्व करून तिला क्रांतिकार्यपासून ढवळून तिच्यातला जातिनिर्मूलनाचा कार्यक्रम बदलवून चळवळीला जाती वापरण्यापर्यंत कलुषित केले. वरील राहूल कोसंबी यांचे मत आरक्षणाच्या समकालीन वास्तवाला अधिक ठळकपणे मांडणारे आहे.नववा लेख'डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ ' हा आहे.दिनांक २४ मार्च २०१३ च्या आणि २५ मार्च २०१३ च्या लोकसत्ता वृत्तपत्रातील डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्याविषयी बदनामी करणारे वृत्त लेखन केले गेले. लोकसत्तातील विचारातील कलुषितपणा स्पष्ट करण्यासाठी राहुल कोसंबी यांनी डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ हा लेख लिहिला आहे. डॉ.आनंद तेलतुंबडे हे दलित आणि डाव्या चळवळीतले एक सुप्रसिद्ध नाव आहे. लेखक लिहितो, " डॉ.आनंद तेलतुंबडे दलितांचे सर्वोच्च आदराचे स्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उगीचच टीका करताना आणि दलितांना मार्क्सवादी खुंटीला बांधण्याचा आग्रह करताना दाखवायचे, त्याच्या पुष्टीकरणासाठी तद्दन अनैतिक मार्ग अवलंबण्याचे त्यांच्या या तथाकथित टीकेने कुठल्या तरी सुशिक्षितांचे कल्पित वर्तुळ नाराज झाल्याची बतावणी मारायची आणि हे कमी म्हणून की काय याला माओवादी वलय द्यायचे यातून चंद्रपूरच्या या खास प्रतिनिधीला नेमकं काय साधायचे आहे? " असा प्रश्न लेखक वाचकांसमोर ठेवतो. यातून जातीयवादी मीडिया कसे? काम करतो ,यातील कार्यकारणभाव लेखक स्पष्ट करतो. दहवा लेख -'संस्कृती,साहित्य आणि सामाजिक बदल 'हा आहे. संस्कृती ,साहित्य आणि सामाजिक बदल यांच्यातील अनुबन्ध स्पष्ट करणारा हा लेख आहे. आपण जे काही विचार मांडतो त्या पाठीमागील वैचारिक मनोभूमिका स्पष्ट करताना लेखक म्हणतो, ''आधुनिक सामाजिकशास्त्रे आणि मी जो एक दृष्टिकोन मार्क्सवाद- आंबेडकरवाद सर्वात परिष्कृत मानून ऐतिहासिक आणि समकालीन सामाजिक प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी वापरतो आहे त्यांचा विकासचा इतिहास पाहता त्यांनी शे- दीडोश वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा वेगवेगळ्या देशातील विविध विचारवंतांनी आपापल्या भोवतालची परिस्थिती समजून घेण्याच्या प्रयत्नात अतिशय समृद्ध केलेली आहे."वरील  विश्लेषणमुळे लेखकाचा संस्कृती, साहित्य यांना तपासून घेण्याचा दृष्टीकोन आपल्या लक्षात येतो. सामाजिक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात कसे उमटते? याचा शोध सखोलपणे घेता येतो. शेवटी सामाजिक बदल आणि साहित्य संस्कृतीचे अंग ठरतात. संस्कृती संकल्पनेचा ऐतिहासिक मागोवा लेखकाने घेतला आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी संस्कृतीची संकल्पना कोणत्या बाजूने मांडली आहे याचा शोध या लेखात लेखकाने घेतला आहे .                                                       ॥६॥

आकरावा लेख -'दलित स्त्रियांवरील 'अदृश्य अत्याचार ' हा आहे. भारतभर दलित स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांच्या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण प्रस्तुत लेखात येते. भारतात दर दिवशी दलितांवर होणारे जातीय अत्याचाराचे आकडे अस्वस्थ करणारे आहेत. लेखक लिहितो, " शिक्षण आणि दलित चळवळीतून मिळालेल्या नव्या भानातून ज्यांनी-ज्यांनी सनातनी अन्याय आणि शोषणाला नकार दिला त्यांना जातीय अत्याचाराला सामोरे जावे लागले "असे निरीक्षण लेखक नोंदवतो. हे निरीक्षण अंतर्मुख होऊन सर्वांना विचार करायला लावणारी आहे. बारावा लेख 'उच्चतर भांडवलशाही आणि भाषा 'हा आहे . उच्चतर भांडवलशाहीमध्ये भाषेचे स्थान बदलत जाते.उच्चतर भांडवलशाहीमध्ये भाषा ही एक क्रयवस्तू ठरते.भाषेच्या सर्वव्यापी भांडवली क्रयवस्तूकरण आणि उत्तर आधुनिक ,उत्तर - संरचनावादी आणि खास करून विरचनावादी सिद्धांतामुळे निर्माण झालेल्या अर्थहीन आणि दिशाहीन पोकळीतून भाषेच्या मूलतत्त्ववादीकरणाची प्रक्रिया वेग घेते  असे निरीक्षण लेखक नोंदवतो. जगात अनेक भाषा मृत्यू पावत आहेत. भाषांमधील ज्ञानसंचय नष्ट होत आहे. याला भांडवली व्यवस्था कशी जबाबदार आहे याचे विश्लेषण प्रस्तुत लेखात येते.  तेरावा लेख -'नामदेव ढसाळ् आणि दलित चळवळ ' हा आहे. नामदेव ढसाळ यांचे दिनांक १५ जानेवारी २०१४ ला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लेखकाने प्रस्तुत लेख लिहिला आहे. दलित पॅंथरची स्थापना ते शिवसेना प्रवेश या संपूर्ण प्रवासाचा, कारकीर्दीचा लेखाजोगा लेखकाने प्रस्तुत लेखात मांडला आहे. भावनिकता टाळून नामदेव ढसाळ यांचे दलित चळवळीतील योगदान लेखकाने स्पष्ट केले आहे  .चौदावा लेख -'कॉम्रेड शरद पाटील : अनन्यता आणि अंतर्विरोध 'हा आहे. या लेखात कॉम्रेड शरद पाटील यांच्या संशोधन कार्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.कॉम्रेड शरद पाटील यांच्या 'मार्क्सवाद- फुले -आंबेडकरवाद ' या सम्मीलित तत्त्वज्ञानाच्या मांडणीतील मर्यादा आणि विशेष स्पष्ट करणारा हा लेख आहे. पंधरावा लेख' दलित अत्याचार : भारतातील दुर्लक्षित बीभत्सता 'हा आहे. दलित अत्याचारामागे कोणती उच्चवर्णीय मानसिकता कार्य करते याचा शोध घेणारा हा लेख आहे. दलित अत्याचारमागील घटनांच्या तळाशी जाऊन लेखक विश्लेषण करतो. दलित अत्याचारमागील राजकीय, अर्थशास्त्रीय संदर्भ लेखक या लेखात मांडतो. भारतभरातील ऑनर किलिंग प्रकरणात दलितांचा बळी घेतला जातो. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील दलित अत्याचारांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण राहुल कोसंबी यांनी या लेखात मांडले आहे.

                            ॥७॥  

 सोळावा लेख -'लोकसभेची निवडणूक आणि राजाची निवड ' हा आहे. इसवी सन २०१४ मध्ये मोदी सरकार सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने निवडले गेले. मोदींची निवड आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय भांडवलदार वर्गाच्या पाठिंब्याने झाली. जादुई इमेज मेकिंग निर्माण करून मोदींनी अभूतपूर्व यश मिळवले. सर्वात कमी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण बहुमत प्राप्त सरकार म्हणजे मोदी सरकार होय.असे निरीक्षण लेखकाने प्रस्तुत लेखात नोंदवले आहे. सतरावा लेख -'कसोटीचा काळ 'या शीर्षकाचा आहे. मोदींच्या सत्तास्थापनेतून सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला कोण कोणत्या गोष्टी येतील ,याबद्दलचा भविष्यातील अंदाज लेखक आपल्यासमोर मांडतो. अनेक स्वायत्त संस्थांवर आर.एस.एसच्या लोकांचा पगडा बसला आहे. धर्मांध राजकारणाच्या स्वतःच्या गतिकीनुसार धार्मिक दंगलींना आणि अल्पसंख्याक आणि जातीय अत्याचार यांमध्ये प्रचंड वाढ होईल असे भाकीत लेखक मांडतो. आठरावा लेख - 'मोतीराम कटारे यांच्या लेखावरील प्रतिक्रिया ' या शीर्षकाचा आहे. मोतीराम कटारे यांनी 'स्वप्नाळू क्रांतीचा बौद्धिक दहशतवादी  शिलेदार 'असा डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्यावर लेख लिहिला. याचा प्रतिवाद करणारा लेख राहुल कोसंबी यांनी मुक्त शब्द मध्ये लिहिला. विचारवंतामध्ये विचारांचे मंथन, संघर्ष कसा असू शकतो याचा प्रत्यय देणारा हा लेख आहे. अत्यंत मुद्देसूदपणे मोतीराम कटारे यांचे विचार लेखकाने साधार खोडून काढले आहेत. मोतीराम कटारे यांनी डॉ. आनंद तेलतुंबडे याची अत्यंत कमीत कमी पुस्तके वाचली आहेत.समग्र डॉ.आनंद तेलतुंबडे यांचे लेखन मोतीराम कटारे यांनी वाचले असते तर त्यांच्या एकांगी मांडणीत समतोल साधला गेला असता.असे निरीक्षण लेखक राहुल कोसंबी यांनी नोंदवले आहे. मोतीराम कटारे यांनी लिहिलेला लेख संदर्भहीन असा आहे. कटारे यांच्या मांडणीतील अपुरेपणा स्पष्ट करताना लेखक लिहितो, " करारेंचा  कोणत्याही भेसळीविनाचा हा विशुद्ध दलितवाद त्यांना सर्वच पूर्वास्पृश्यांपासून तोडून पहिल्यांदा फक्त महार या जातीकडे आणि नंतर त्यांच्यातही फक्त बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अल्पसंख्य शिक्षित शहरी नवमध्यमवर्गकडे घेऊन जातो. कटारे याच अल्पसंतुष्ट- अल्पसंख्य वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना आता जातिनिर्मूलन नको आहे, तर उलट जातीच्या ओळखीवर मिळणाऱ्या फायद्यांवर मक्तेदारी हवी आहे. याचा अल्पसंतुष्ट- अल्पसंख्य वर्गाची मक्तेदारी ! "कटारे कोणत्या मानसिकतेतून लिहितात ,त्यांच्या लेखनाचा दृष्टिकोण लेखकाने येथे स्पष्ट केला आहे.  एकोणावीस लेख' दलित नवमध्यमवर्ग आणि पुरुषसत्ताक दृष्टी 'हा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या उदात्त मूल्यांच्या आधार घेऊन बाबासाहेबांनी दलित समाजाला जगण्याची नवी ऊर्जा दिली. आरक्षणाच्या अल्प अंमलबजावणीतून दलित समाजात नवा मध्यमवर्ग निर्माण झाला. हा समाज बाबासाहेबांच्या विचारांना, बौद्ध धम्माचा मार्ग अनुसरण करणारा आहे . तरी या नव्या मध्यमवर्गाची जीवनदृष्टी पारंपरिक आहे. हिंदू पुरुषसत्ताक व्यवस्थेचे संस्कार या वर्गाच्या मानसिकतेवर खोलपणे झाले आहेत . कुटुंबातील स्त्रियांच्या  समाजातील, साहित्यातील चळवळीतील स्थानाबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या वर्गाचा आहे. या दलित नवमाध्यमवर्गाच्या पुरुषसत्ताक दृष्टीवर चिकित्सकपणे लेखक राहुल कोसंबी बोट ठेवतात .या मांडणीला 'भारतीय जनता ' या मासिकातील प्रज्ञा दया पवार यांच्या 'अफवा खरी ठरावी म्हणून ' या कथासंग्रहा वरील परीक्षणाचा आधार राहुल कोसंबी यांनी घेतला आहे. दलित स्त्रियांना नियंत्रित करणार्‍या पुरूष सत्तेचे स्वरुप, त्यातील व्यापकता लेखक या लेखातून स्पष्ट करतो.
                                 ॥८॥
वीस क्रमांकाचा लेख  -' दलित साहित्य आणि राजकारण ' हा आहे . बाबासाहेबांच्या हयातीतच आधुनिक दलित साहित्य चळवळीला सुरुवात झाली होती. त्या काळात दलित साहित्य चळवळीला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले होते. इसवी सन १९७२ नंतर दलित पँथरच्या चळवळीला सुरूवात झाली . दलित साहित्य आणि राजकारण यांच्यात एक अतूट असं नातं आहे . दलित साहित्य चळवळीत सक्रिय असणारे लेखक आणि कवी यांनी नंतर दलित आंदोलनाचे नेतृत्व केले. हे लेखक, कवी पुढे सक्रिय राजकारणात आले. या एकूण प्रवासात त्यांची भूमिका नीती, मूल्यात्मकता यांच्यात कोणते बदल झाले याची चिकित्सा करणारा हा लेख आहे.दलित साहित्य चळवळीच्या अरिष्टग्रस्ततेची समीक्षा लेखक या लेखातून करतो. या आरिष्टग्रस्ततेचे विश्लेषण लेखकाने या लेखात मांडले आहे. दलित राजकारण, चळवळ, साहित्य चळवळीच्या विविध आरिष्टग्रस्ततेबद्दलची लेखकाने वस्तुनिष्ठ मांडणी केली आहे. ऐतिहासिक आढावा घेऊन समकालीकतेची खोलपणे विस्तृत मांडणी केली आहे. दलित साहित्य आणि राजकारणाचे विविधांगी दृष्टिकोणची वस्तुस्थिती लेखकाने या लेखात मांडली आहे.लेख क्रमांक एकवीस - ' हिंदू डावे ' या शीर्षकाचा आहे. दिनांक ८ मार्चच्या 'मी मराठीच्या ' पुरवणीत राम जगताप यांनी 'गरज हिंदू डाव्यांची ' असा लेख लिहिला होता. या लेखाची वस्तुनिष्ठ चिकित्सा 'हिंदू डावे ' या लेखात लेखक राहुल कोसंबी यांनी केली आहे. डाव्या चळवळीला हिंदू हे विशेषण का ? लावले गेले याचा आढावा लेखक या लेखात घेतो. जागतिकीकरणाच्या विविधांगी प्रक्रियांमुळे डाव्या चळवळीचा अवकाश आक्रसत गेला. डाव्या चळवळीच्या स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. डाव्यानी आपली भूमिका धर्माच्या बाबतीत बदलली का? ती सौम्य झाले का? असे प्रश्न उपस्थित करणारा, या पाठीमागील छुप्या राजकारणाचा वेध घेणारा हा लेख आहे.बावीसावा लेख -'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समाजशास्त्रीय योगदान ' हा आहे. भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू होतो. एतद्देशीय अभ्यासकाने केलेल्या समाजशास्त्रीय अभ्यासला एक विशेष महत्त्व असतो. जातिव्यवस्थेच्या समाजशास्त्रीय अभ्यासाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभ केला. शास्त्रीय दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचे प्रारूप शोधण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या आधी जातीव्यवस्थेचा अभ्यास युरोपीय खलाशी , प्रवासी, व्यापारी राज्यकर्ते यांनी केलेला होता.
 बाबासाहेबांनी ९ मे १९१६ रोजी परिसंवादात वाचलेला 'कास्टस इन इंडिया :देअर मेकॉनिजझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट ' हा शोधनिबंध अत्यंत महत्वाचा आहे. इसवी सन १९३५ ला लिहिलेले भाषण 'जातीव्यवस्थेचे उन्मूलन ' हे ही महत्त्वाचे ठरते. ' शूद्र पूर्वी कोण होते? ' , ' अस्पृश्य मूळचे कोण होते? ' या दोन ग्रंथातून बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेचे स्वरूप विशेष स्पष्टपणे मांडले आहेत. बाबासाहेबांच्या मांडणीतील वेगळेपण आणि त्यांचे महत्त्व लेखक राहुल कोसंबी यांनी या लेखात मांडले आहे.''बाबासाहेबांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या - दुसऱ्या दशकातच येणाऱ्या १०० वर्षांवर कायमस्वरूपी छाप पाडतील असे जातीव्यवस्थेबाबतचे अनन्य आणि मूलगामी सिद्धांत दिले, ज्यांच्या मांडणी आणि आशयाची पुनरावृत्ती पुढे अनेक वर्ष अनेक महनीय समाजशास्त्रज्ञांनीकडून सातत्याने होत राहिली."असे अत्यंत महत्त्वाचे विधान लेखक या लेखात करतो. बाबासाहेबांच्या समाजशास्त्रीय योगदानाचे मूल्यमापन करणे अत्यंत अवघड व कठीण गोष्ट आहे.अत्यंत गंभीरतापूर्वक, प्रचंड वाचन व व्यासंगातून राहुल कोसंबी यांनी या लेखाची मांडणी केली आहे.
                                  ॥९॥
राहुल कोसंबी यांच्या लेखनाच्या मर्यादा : -

१. अत्यंत अवघड समाजशास्त्रीय संकल्पनांची अधिक रेलचेल असलेले  लेखन आहे.  सर्वसामान्य वाचकाच्या आकलनापलिकडचे हे कठीण लेखन आहे.
२. पल्लेदार वाक्यरचना, मोठमोठे वाक्य लेखांमध्ये येतात. कधीकधी संपूर्ण परिछदाचे एकच वाक्य होते. त्यामुळे वाचकाला हे लेखन जड वाटते.
३. वारंवार तेच ते येणारे संदर्भ दिसतात.काही लेखांच्या मांडणीत पुनरावृत्ती दिसते.
४. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले हा लेख आणि नामदेव ढसाळ आणि दलित चळवळ या लेखांमधील विवेचनात खूप साम्य आहे. तीच गोष्ट डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ, आणि मोतीराम कटारे यांच्या लेखावरील प्रतिक्रिया या दोन्ही लेखांमध्ये खूप सारखेपणा दिसतो.
 ५. 'कॉम्रेड शरद पाटील : अनन्यता आणि अंतर्विरोध 'या लेखातून समग्र कॉम्रेड शरद पाटील यांची सैद्धांतिक भूमिका स्पष्ट होत नाही. लेखकाचे कॉम्रेड शरद पाटलांविषयीचे शेरेवजा अभिप्राय या लेखातून मांडला जातो.
६. संपूर्ण पुस्तकाच्या लेखांमध्ये दलित समाजातील मध्यमवर्ग चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नोकऱ्यांमधील आरक्षणातून हा वर्ग जन्माला आला आहे. असे लेखकाचे निरीक्षण आहे. लेखक दलित समाजातील या मध्यम वर्गाची संख्या १० ते २० टक्के गृहीत धरत आहे. मुळात हा वर्ग बौद्ध धम्माचे अनुसरण करणारा वर्ग आहे. हा वर्ग विपश्यनेकडे वाळला आहे. या आत्मकेंद्रित वर्गाने आपल्या जातीतील खालच्या वर्गातील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे. असे आक्षेप लेखक नोंदवतो.
 मुळात हा वर्ग मोठ्या संख्येने तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे.याला वेगळा वर्ग मानताचं येत नाही. मुळात ग्रामीण जीवनाशी नाळ असलेला हा वर्ग आहे. भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण वेळ खर्ची पडणारा असा हा समाज घटक आहे. त्यामुळे या समाज घटकाचा वेगळा वर्ग आपल्याला मानता येत नाही. एक ते दोन टक्का केवळ उच्च नोकरीवर असणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीतून लेखक अंदाज बांधून या वर्गाविषयी काहीएक आकस ठेवून ही मांडणी करतो की काय? असे कधीकधी वाटते. एकूण या संपूर्ण मांडणीमध्ये  लेखकाने स्थूलपणे  समाजाच केलेले निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून मांडलेले निष्कर्ष असे या लेखनाचे स्वरूप वाटते. मुळात भारतात वर्गांचा जन्मच होऊ शकत नाही.जात माणसं विसरत नाहीत. त्यामुळे दलितांमध्ये असा काही वर्ग निर्माण झाला आहे असे आपल्याला म्हणता येत नाही. केवळ असा वर्ग निर्माण झाल्याचा आभास आपल्याला होतो. परंतु तो वर्ग प्रत्यक्षात आहे असे आपणाला म्हणता येत नाही.
                                  ॥ १० ॥
समारोप : -
वरील मर्यादा मान्य करूनही राहुल कोसंबी यांनी केलेल्या लेखनाचे महत्त्व आपणास नाकारता येत नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शोषित, वंचित वर्गाची अवहेलना होते. भांडवली व्यवस्थेने सर्व समस्यांचे संचलन करण्यास सुरुवात केली आहे. मार्क्सवाद आणि आंबेडकर वादाच्या एकत्रीकरणातून या प्रक्रियेला काही पर्यायी व्यवस्था देणे शक्य आहे का? याची सैद्धांतिक मांडणी राहुल कोसंबी करतात. आरक्षणातून दलित समाजात नवा मध्यमवर्ग उदयाला आला आहे. या वर्गाची स्वार्थी, आत्मकेंद्रित, आत्ममग्न अवस्थेचे विशेष राहुल कोसंबी यांनी मांडले आहेत. या वर्गाने जातीअंतापेक्षा भांडवली व्यवस्थित जातीचे भांडवल वापरण्यास सुरुवात केली आहे. या वर्गाची चिकित्सा राहुल कोसंबी करतात. राहुल कोसंबी यांच्या उभं आडवं  या लेखनाबद्दल हरिश्चंद्र थोरात लिहितात, अपारंपारिक आणि निर्भय अशी स्वच्छ, सुस्पष्ट आणि तडजोड न करणारी डावी भूमिका 'उभं आडवं ' च्या केंद्रस्थानी आहे. ती चुकूनही सोयी , गैरसोयी आणि तडजोडी यांचा विचार करीत नाही. यामुळे राहुल कोसंबी यांच्या लेखनात रोखठोक निर्भीड परखडपणा आलेला आहे. वरील विश्लेषणातून राहुल कोसंबी यांच्या लेखनाचे सामर्थ्य आपल्या लक्षात येते.


पुस्तकाचे शीर्षक - उभं आडवं
लेखक - राहुल कोसम्बी
प्रकाशन - शब्द पब्लिकेशन , मुंबई
तिसरी आवृत्ती -डिसेंबर २०१७
पृष्ठसंख्या -३१२
मूल्य -तीनशे पन्नास रूपये

डॉ . गणपतराव ढेंबरे ,
सहायक प्राध्यापक,
श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , ता . रावेर,जि. जळगाव
पिन  -४२५५०८
मोब .नं  -९४२१०८१२७०
ई- मेल  - dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...