ग्रामीण कविता संकल्पना आणि स्वरुप
डॉ.जी.आर.ढेंबरे, रावेर
प्रस्तावना :-
मराठी साहित्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विशेषत: इ.स.1960 नंतर जे ठळक वाङ्मयप्रवाह उदयाला आले, त्यापौकी ग्रामीण साहित्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे. मराठी वाङ्मयाच्या समृद्धीमध्ये ग्रामीण साहित्याने भर टाकलेली आहे. ग्रामीण साहित्यनिर्मितीमागे ग्रामीण जाणीव असते. ग्रामीण जीवनाचे प्रश्न, ग्रामीण माणसाची सुख-दु:खे, आशा-आकांक्षा ह्यांचे प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात उमटत असते. आजच्या उद्योगप्रधान, यंत्रनिष्ठ शहरी संस्कृतीपेक्षा ग्रामीण जीवन अत्यंत वेगळे आहे. ग्रामीण जीवन कृषिनिष्ठ आहे. कृषी निसर्गावर अवलंबून आहे. कृषी आणि निसर्ग यांचे अतूट असे नाते आहे. शेती, शेतकरी, निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा शोध ग्रामीण साहित्य घेते. ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष चित्रण ज्या साहित्यातूनझाले आहे अशा साहित्याचा शोध घेत आपणांस थेट ज्ञानेश्वर कालापर्यंत जाता येऊ शकते. 'दृष्टांतपाठा' मधून आलेल्या काही कथांमधून शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण नकळत का होईना पणझाले आहे असे सांगता येऊ शकते. याच पद्धतीने नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांच्या अभंगांमधून ग्रामीण जीवनाच्या काही छटा प्रकट होताना दिसतात. शाहिरी वाङ्मयामधून तर ग्रामीण भाव-भावना प्रकट होताना दिसतातच. असे असले तरी जाणीवपूर्वक ग्रामीण जीवनदर्शन घडवू इच्छिणाज्या साहित्याचा सलग प्रवाह 1920 नंतरच दिसतो असे म्हणावयास हरकत नाही. येथून पुढे कथा, कविता आणि कादंबरी या तीन वाङ्मय प्रकारांमध्ये भरघोस निर्मितीला प्रारंभ झाला. आजतागायत ही निर्मिती होतच आहे. ग्रामीण साहित्याने मराठी वाङ्मयामध्ये मोलाची भर घातली आहे, हे मान्य करावयास हरकत नाही. ग्रामीण कवितेची सुरूवात कधीपासून झाली ? याविषयी वेगवेगळ्या समीक्षकांची वेगवेगळी मते आहेत. कुणी भा.रा.तांबे यांच्यापासून तर कोणी केशवसुतांच्या काही कवितांपासून ग्रामीण कवितेचा प्रारंभ सांगतात. या प्रारंभाविषयीचा विचार आपल्याला सविस्तरपणे करता येतो.
ग्रामीण कवितेची संकल्पना :-
इ.स.1975 नंतरच्या मराठी कवितेतील एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे ग्रामीण कविता हा होय. इ.स.1975 पूर्व मराठी कवितेतील बहिणाबाई चौधरी, आनंद यादव, ना.धों.महानोर यांच्या कवितेतून ग्रामीण संवेदनशीलतेची विविध रूपे प्रकट झाली होती. ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण स्त्री, ग्रामीण जीवनातील प्रश्न, समस्या ह्या जाणिवा या कवितेतून व्यक्त झाल्या. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितांचा आशय व अभिव्यक्ती यामध्ये अमूलाग्र बदल झाला. एकंदरीत 'ग्रामीणता' साकार होण्यामध्ये कृषिनिष्ठ संस्कृती, निसर्गसन्मुखता, त्यातून निर्माण झालेले लोकमानस हे घटक महत्त्वाचे ठरतात. यातून जगण्याची एक 'रीत' साकार होत जाते. या रीतीचे चित्रण ज्या साहित्यात आढळते, ते ग्रामीण साहित्य असे म्हणता येईल. कृषिजीवनात असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. किंबहुना ही कृषिसंस्कृतीच कुठल्या तरी अर्थव्यवस्थेची अंकित बनून राहिली आहे. इ.स.1975 नंतर ग्रामीण साहित्याच्या प्रवाहाने चळवळीचे स्वरूप धारण केले. त्याची नाळ बहुजन समाजाच्या प्रश्नांशी, त्याच्या भावभावनांशी जोडली गेली. भाषा, विषय यांचे कुठलेही दडपण न घेता ग्रामीण लेखक, कवी आपल्या अनुभवविश्वाला शब्दरूप देऊ लागला. हे जाणीवपूर्वक घडले. ग्रामीण साहित्य सुरूवातीपासून वेगळ्या अनुभवविश्वाबरोबरच आपल्या जीवनवादी जाणिवा आविष्कृत करत आहे. ग्रामीण साहित्याप्रमाणे ग्रामीण कवितेनेही ग्रामजीवनातील वास्तवाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामजीवन अनुभवलेल्या कवींच्या अनुभूतींचे शब्दरूप म्हणजे ग्रामीण कविता होय. ग्रामीण जीवनातील प्रश्न, समस्या यांचा शोध कवींनी ग्रामीण कवितेत घेतला आहे. मराठी ग्रामीण कवितेचा विचार करीत असताना प्रथम कोणत्या स्वरूपाच्या कवितेला आपण 'ग्रामीण कविता' म्हणणार आहोत हे स्पष्ट केले पाहिजे. या संदर्भात विश्वास जहागीरदार यांनी केलेले विवेचन विचारात घेणे उपयुक्त ठरेल. ते लिहितात, ''ग्रामीण कविता म्हणजे ग्रामीण संवेदनशीलतेने घडविलेली कविता. कलावंताची संवेदनशीलता म्हणजे अनुभव घेण्याची त्याची पद्धती बाह्य वास्तव, सभोवताली घडणाज्या घटनांच्याबद्दल विशिष्ट जाणिवा निर्माण करत असते आणि त्या कवितेच्या बुडाशी असतात. ग्रामीण कवितेमध्ये बाह्य वास्तव हे खेडे, निसर्ग आणि पारंपरिक मूल्ये यांतून घडलेले ग्रामजीवन आहे आणि त्यात आकाररूपाला आलेली संवेदनशीलता त्या जीवनातील अनुभवाविषयीच्या प्रतिक्रिया देत असते. अशा कवितेच्या निर्मितीच्या बुडाशी असलेली संवेदनशीलता ही ग्रामीण संवेदनशीलता आहे आणि अशी कविता ग्रामीण आहे, असे स्थूलमानाने म्हणता येईल. हे एकदा निश्चित झाले की केवळ बोलीभाषेत लिहिलेली कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे किंवा केवळ निसर्गविषयक जाणिवा व्यक्त करणारी कविता म्हणजे ग्रामीण कविता नव्हे हे वेगळे स्पष्ट करण्याची आवश्यकता नसावी.''1
वरील विवेचनातून ग्रामीण कवितेची संकल्पना स्पष्ट होते. ग्रामीण संवेदनशीलता ग्रामीण कवितेत महत्त्वाची असते. ग्रामीण कवीचे अनुभवविश्व खेड¶ाभोवती केंद्रीत झालेले असते. ग्रामीण जीवन, निसर्ग, पारंपरिक मूल्ये यांना ग्रामीण कवितेत महत्त्वाचे स्थान असते. ग्रामीण जीवनात घडत असलेल्या परिवर्तनाबद्दलचा अनुकूल, प्रतिकूल दृष्टीकोन ग्रामीण कवितेतून व्यक्त होत असतो. ग्रामजीवनावर प्रभाव असणारे परंपरागत घटक म्हणजे कृषी, निसर्ग व ग्रामीण समाजव्यवस्था या सर्वांच्या प्रभावातून ग्रामीण जीवनाची खास अशी शौली आकाराला येते. अशा जीवनपद्धतीचा आविष्कार हा ग्रामीण साहित्यात झालेला असतो. इ.स.1975 नंतर महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची धुरा ग्रामीण नेतृत्वाकडे राहिली. या नेतृत्वाने ग्रामीण भागासाठी विविध योजना अंमलात आणल्या. याचा परिणाम ग्रामीण भागावर झाला. हरितक्रांतीमुळे शेती व्यवसायाचे स्वरूप बदलून गेले. शेतीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टीकोन बदलत गेला. शेतीचे मोठ¶ा प्रमाणात व्यवसायीकरण झाले. यातून ग्रामीण अर्थकारणाचे नवे पर्व सुरू झाले. यातून नवे गुंतागंुतीचे प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची, गुंतागुंतीच्या जीवनाची मांडणी करणाज्या कवितेला ग्रामीण कविता असे म्हणता येईल.
ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करताना गणेश देशमुख लिहितात ''ग्रामीण-शहरी जीवन व साहित्यातील हा ठळक भेद ग्रामीण साहित्याशी समांतर असणाज्या विशेषणाद्वारे प्रकटत नसल्याने 'ग्रामीण' हे विशेषणच त्यासाठी वापरावे लागते. कारण नागरी व शहरी जीवनपद्धती, मूल्ये, परंपरा, भाषा इ. या सर्वच दृष्टीने, सामाजिक पातळीवरही हा भेद ठळकपणे जाणवतो. कृषिकेंद्रितता, समूहप्रधानता, निसर्गसन्मुखता, स्वाभाविकता, स्वावलंबित्व, कार्य-विभाजनाची प्रवृत्ती, स्थितिशीलता, कुटुंब, ग्रामसंस्थांचा प्रभाव, भाषिक पृथगात्मता, मौखिक साहित्य परंपरा, प्रदेशाविशिष्ट अशी जीवनशौली इ. वौशिष्ट¶ामुळे ग्रामीण समाजाला आपला असा ठळक चेहरा प्राप्त झाला आहे. या सामाजिक व सांस्कृतिक संचिताचा प्रत्यय ग्रामीण साहित्यातून यावा, अशी अपेक्षा असते. या इतिहासकालीन वौशिष्ट¶ाबरोबरच 'आधुनिक' अशी जीवनवौशिष्ट¶े ग्रामीण साहित्यातून प्रकटत असतात. या सर्वांचे दर्शन ग्रामीण साहित्यातून घडत असल्यामुळे ग्रामीण साहित्याची संकल्पना विस्तृत व वौशिष्ट¶पूर्ण मानावी लागते. केवळ 'ग्रामासंबंधी', 'खेड¶ासंबंधी' असे या संकल्पनेचे स्पष्टीकरण त्याचमुळे परिपूर्ण वाटत नाही. 'ग्रामीण' ही संज्ञा व संकल्पना स्वीकारून साहित्याकडे बघत असताना ग्रामीण समाजाची उपरोल्लिखित सर्व वौशिष्ट¶े, ऐतिहासिकता व आधुनिकता इ. संदर्भ अभिप्रेत असतात.''2 वरील विवेचनात देशमुखांनी सांगितलेली सर्व वौशिष्ट¶े ग्रामीण कवितेला लागू पडतात. कृषिकेंद्रितता, समूहप्रधानता, निसर्गसन्मुखता, स्वाभाविकता, कार्य-विभाजनाची प्रवृत्ती, स्थितिशीलता, कुटुंब, ग्रामसंस्थांचा प्रभाव, भाषिक पृथगात्मता, मौखिक साहित्य - परंपरा, प्रदेशाविशिष्ट अशी जीवनशौली इ. वौशिष्ट¶े ग्रामीण समाजाला वेगळेपण प्राप्त करून देतात. या वेगवेगळ्या वौशिष्ट¶ांचा शोध ग्रामीण कविता घेते. या विविध घटकांमुळे ग्रामीण जीवनात निर्माण होणाज्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचे कार्य ग्रामीण कविता करते.
ग्रामीण कविता म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना ग्रामीण कवितेतील महत्त्वाचे कवी इंद्रजित भालेराव आपली साहित्यनिर्मिती प्रक्रिया स्पष्ट करतात. ते लिहितात, ''घरी उपासमार होईल इतकी गरीबी नसली तरी शेतमजूर लावूनच सगळी कामे करून घ्यावीत इतकी तेव्हा श्रीमंतीही नव्हती. माझ्या सगळ्या बहिणीही तेव्हा लग्न होईपर्यंत आणि नंतर माहेरपणाला आल्यावरही शेतात कामं करायच्या. त्यांच्यासोबत मीही तेव्हा राबायचो. त्यामुळे कष्ट इतके स्वाभाविक वाटतात की, त्याचं भांडवल करण्याचं मनातही येत नाही. माझ्या कवितेला मातीचा अस्सल गंध आहे असे जे समीक्षक म्हणतात त्याचेंही कदाचित हेच कारण असावे. प्रत्यक्ष भोगलेलं आणि पाहिलेलं शेतकरी जीवनाचं वास्तव हीच माझ्या कवितेची मुख्य भूमिका आहे असं वाटतं''3 भालेरावांच्या वरील विवेचनातून शेतकरी जीवन ही त्यांच्या काव्याची प्रेरणा आहे हे स्पष्ट होते. शेतकरी आणि माती यांच्यातील संबंधाचा शोध ग्रामीण कविता घेते. ग्रामीण कवितेतील अनुभवविश्वाचे केंद्र विशिष्ट प्रदेशातील शेतकज्यांचे, कुणब्याचे जीवन आणि त्याच्या जीवनाशी निगडित भूमी आहे. हा शेतकरी बहुधा अल्पभूधारक वा शेतमजूर आहे. या शेतकज्याचे भावविश्व, त्याच्या आशाआकांक्षा, स्वप्ने, त्याच्या जीवनातील अनेकविध ताणतणाव, प्रश्न, व्यथावेदना, त्याच्या जीवनातील मूल्यभाव, आध्यात्मिकता इत्यादींचा आविष्कार ग्रामीण कवितेत झाला आहे.
ग्रामीण कवितेत शेतकज्याचे जीवन केंद्रस्थानी असते. शेतकज्याची भूमीची, मातीची ओढ, तिच्याशी निष्ठा, निसर्गाची ओढ, शेतकज्याच्या जीवनातील सुखदु:खे, त्यांतील चढउतार, त्याचे होणारे तज्हेतज्हेचे शोषण, त्याचे शोषण करणारी जागतिकीकरणासारखी आधुनिक व्यवस्था, त्याच्या जीवनातील नातेसंबंध, शेतकज्याच्या जीवनातील प्रेमानुभव, आई-बाप, शेतकरी स्त्रियांचे जीवन, शेतकज्याच्या भोवतालचे गावगाड¶ातील जीवन व त्याचा भोवतालच्या जीवनाशी असलेला संबंध अशी अनेक आशयसूत्रे इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेतून अभिव्यक्त होतात. इ.स.1975 नंतरची ग्रामीण कविता ही शेतकज्यांच्या जीवनावर, तेथील निसर्गावर, मातीवर, त्याचप्रमाणे गावावर, प्रदेशावर, गावाकडील माणसांवर, आई-वडिलांवर श्रद्धा असलेली कविता आहे. ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करताना आनंद यादव लिहितात, ''ग्रामीण विभागाशी संबंधित असे जीवनानुभव ग्रामीण साहित्यातून व्यक्त होतात. 'ग्राम' म्हणजे खेडेगाव, तेथील जीवनपद्धती, तेथील समाज, त्या समाजाची कृषिप्रधान संस्कृती, तेथील विशिष्ट निसर्गाशी, मातीशी त्याचा असलेला वौशिष्ट¶पूर्ण संबंध, त्या संस्कृतीला लाभलेली इतर वौशिष्ट¶े, तेथील मानवी जीवनाला त्या प्रदेशानुसार लाभलेली आर्थिक, सामाजिक, धार्मिक, ज्ञानात्मक, औद्योगिक वौशिष्ट¶े आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्न आणि समस्या, तसेच कालौघात होत जाणाज्या स्थित्यंतराचे तेथील जीवनसंस्कृतीवर होणारे संस्कार यांचा आविष्कार ग्रामीण साहित्यात होत असतो.''4 वरील विवेचन ग्रामीण साहित्याच्या विविध पौलूंवर प्रकाश टाकणारे आहे. ग्रामीण कवितेची संकल्पनाही वरील विषय-सूत्रांच्या आधारे स्पष्ट करता येईल. कृषीप्रधान संस्कृती, मातीशी असलेला वौशिष्ट¶पूर्ण संबंध, विशिष्ट प्रदेशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, ज्ञानात्मक जीवन व त्यासंबंधित असणाज्या प्रश्न, समस्यांची प्रभावी मांडणी करणाज्या कवितेला ग्रामीण कविता असे म्हणता येईल. ग्रामीण कवितेची संकल्पना अचूकपणे व वस्तुनिष्ठपणे सांगता येणार नाही. परंतु तिच्या वेगवेगळ्या वौशिष्ट¶ांचा शोध आपणाला घेता येतो.
इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेचे स्वरूप :-
ग्रामीण संवेदना प्रकट करणाज्या कवितेतून ग्रामीण जीवनातील विविधरूपे थेटपणे अभिव्यक्त झाली आहेत. या कवितेतून इ.स.1975 नंतरच्या महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा शोध मांडला आहे. शेती हा ग्रामीण भागाचा नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भारतातील सुमारे 70% लोकांचा व्यवसाय शेती किंवा शेतीवर अवलंबून असणारे उद्योग हाच आहे. त्यामुळेच भारत 'कृषिप्रधान देश' म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील खेडे हे पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय तेथे उपलब्ध असतो. अशा या शेतीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करणे हाच दिनक्रम तेथील बहुतेक लोकांचा असतो. म्हणूनच आपल्या कृषिप्रधान देशात बहुतेक सण, उत्सव हे कृषी व्यवस्थेशी निगडित असल्याचे दिसून येते. अशा या ग्रामीण भागातील छोट¶ाशा खेडेगावात राहणारा माणूस, त्याची जीवनपद्धती, ग्रामीण समाज इ. चे वर्णन रविकिरण मंडळातील कवींनी अत्यंत कल्पनारम्य असे केले होते. ही परिस्थिती पुढील कालखंडात बदलली. ज्या खेड¶ाचा पूर्वी गौरव होत असे, तीच खेडी आता अंतर्विरोधाचे केंद्र बनली आहेत. खेड¶ातील माणसांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. शेती व्यवसाय हा दिवाळखोरीचा बनत चालला आहे. विशेषत: कोरडवाहू शेती करणाज्या शेतकज्याचे जीवन असह्य व अगतिक झालेले दिसते. लहान शेतकरी, शेतमजूर जीवनाला कंटाळून आत्महत्या करताना दिसतात. त्यामुळे कधीकाळी वौभवसंपन्न असणारी खेडी आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. बदलांच्या रेट¶ात ग्रामीण माणूस होरपळून निघत आहे. वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लहरी निसर्ग, शहरात वाढणाज्या रोजगाराच्या संधी व त्यामुळे शहराकडे धावणारा तरूण वर्ग, रक्त आटेपर्यंत कष्ट करूनही हाती काहीही न लागल्यामुळे उदास झालेला शेतकरी वर्ग शेतीकडे उदास नजरेने पाहू लागला. हरितक्रांतीमुळे बियाण्यांच्या नवनवीन जाती बाजारात आल्या आहेत. त्यामुळे कधी सुकाळ आलाच तर प्रचंड उत्पादन होऊन शेतमालाच्या किंमती घसरत आहेत. व्यापारी व दलाल पिळवणूक करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागला. अशा या बदलत्या खेड¶ाचे, ग्रामीण माणसाच्या जीवनाचे व हतबल बनलेल्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेतून येते.
वर नमूद केलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, मानसिक पातळीवर इ.स.1975 नंतरची ग्रामीण कविता आकार घेते. इ.स.1975 नंतरच्या काळात ग्रामीण कवितेने वौशिष्ट¶पूर्ण वळण घेतलेले दिसते. आरंभापासून इ.स.1975 पर्यंत संख्यात्मकदृष्ट¶ा अल्प असणारी ग्रामीण कविता आधुनिक ग्रामीण साहित्य चळवळीच्या उदयानंतर मात्र विकासाबरोबरच बरीच विस्तारलेलीही दिसते. ग्रामीण साहित्याच्या चळवळीने व आजूबाजूच्या परिस्थितीने निर्माण केलेल्या वातावरणातून आत्मभान आलेली ग्रामीण तरूण कवींची एक पिढीच या काळात उदयाला आलेली दिसते. विट्ठल वाघांची कविता या पिढीची प्रातिनिधिक कविता असली तरी त्यानंतर दमदार अशा ग्रामीण कवितांचे बरेच संग्रह मागील दोन दशकात प्रकाशित झालेले दिसतात. या काळात ग्रामीण कवितेच्या प्रवाहावर ज्यांचा भविष्यात निश्चित असा ठसा उमटेल असे महत्त्वाचे कवी म्हणजे इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, संतोष पद्माकर पवार, शंकर वाडेवाले, नारायण सुमंत, राजन गवस, प्रकाश होळकर, दासू वौद्य, अजय कांडर, केशव देशमुख, प्रकाश किनगावकर इ. कवी सांगता येईल.
इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेचे हे स्वरूप लक्षात घेतल्यास आत्मभान आलेल्या ग्रामीण तरूण पिढीची ही कविता आहे हे सहजपणे लक्षात येते. ग्रामीण जीवनातील दैन्य, दारिद्र¶, शोषण यावरच आपले लक्ष केंद्रित करणारी ही ग्रामीण कविता प्रखर वास्तववादी असल्यामुळे, ग्रामीण साहित्याच्या 'समर्थपणाचा' प्रत्यय देणारी आहे. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप स्पष्ट करताना वासुदेव मुलाटे म्हणतात, ''माणसाचे शोषणकर्ते बदलू लागले आहेत, बदलले आहेत. म.फुल्यांच्या काळात असणारा शोषकवर्ग आता तेवढासा समर्थ राहिलेला नाही. मूळचा खेडूत खेड¶ातून आलेला, लोकशाहीच्या नावाखाली राजकारण करून विविध सत्तास्थाने, अर्थस्थाने बळकावणारा हा शोषकवर्ग आहे. तो अधिक धूर्त, अधिक चाणाक्ष आणि वेळप्रसंगी कोणत्याही मार्गाचा, नीती-अनितीचा अवलंब करणारा आहे. या नव्या शोषकाकडून आपले शोषण, आपली पिळवणूक थांबवणे हे अधिक अवघड काम आहे. कारण अन्याय करणारा हाच मुळी शेतकज्यांच्या घरातला आहे. घरातलाच माणूस जर अन्याय करीत असेल तर दाद तरी कुणापुढे मागायची ? आणि विरोध तरी कुणाला करायचा ? स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याची गोड फळे खायला मिळतील अशा भ्रमात असणाज्या मंडळींचा भ्रमनिरास झालेला होता. अपेक्षाभंग झालेला होता. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली व तारूण्यात पदार्पण केलेली पिढी बेकार बनून दिशाहीन अवस्थेत फिरत होती. या उद्रेकाचा स्वर इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण साहित्यात उमटू लागला. आणि आता इ.स.1990-92 च्या काळातील ग्रामीण साहित्याने गांभीर्याने विद्रोहाचा सूर आळवायला सुरूवात केली आहे. आता रान पेटून उठले आहे.''5
वरील विवेचनात वासुदेव मुलाटे इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप स्पष्ट करतात. इ.स.1975 नंतरच्या मराठी कवितेत समकालीन प्रश्नांचे प्रतिबिंब उमटते. शोषणाचा तीव्र निषेध ही कविता व्यक्त करते. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेत विद्रोह व्यक्त होतो. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, विट्ठल वाघ, इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतून विद्रोहाचा सूर ठळकपणे व्यक्त होतो. इ.स.1975 नंतरच्या ग्रामीण कवितेचे स्वरूप तपासत असताना या कालखंडातील महत्त्वपूर्ण बाबींचे संदर्भही समजून घेणे आवश्यक ठरते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या धोरणांचा प्रभाव समाजजीवनात उमटला आहे. दुष्काळ, नापिकी, शेतीमालाला हमीभाव नाही, यामधून होत जाणाज्या शेतकज्यांच्या आत्महत्या पाहावयास मिळतात. तर दुसरीकडे विज्ञान, तंत्रज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रगतीने गाव-माणसांचा बदललेला चेहरा लक्षणीय आहे. आज शिक्षण खेड¶ापाड¶ापर्यंत पोहोचले आहे, भ्रष्ट व्यवस्थेत सुशिक्षित बेकार तरूणांचे जीवन गुंतागुंतीचे बनले आहे. तसेच अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण, नौराश्य इत्यादींच्या अनुषंगाने ग्रामीण माणूस अस्वस्थ आहे. गावपातळीवरील निवडणूका, नात्यागोत्याचे राजकारण, जातीयता, धर्मांधता, हुंडापद्धती, व्यसनाधीनता, महागाई, निसर्गाचा लहरीपणा, सावकारशाही इत्यादी गोष्टींनी ग्रामजीवन ढवळून निघालेले दिसून येते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माणूस यांच्या प्रश्नांची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामीण कवी आपले अनुभव शब्दांकित करीत आहेत. ग्रामीण कवितेतून ग्रामीण जीवनाचे आकलन करून तेथील माणसांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामजीवनातील संस्कृती, जाणिवा, भावना, प्रश्न, त्यावरील उपाय यांचे वास्तव व भेदक चित्रण या कवितेतून येताना दिसते.
नारायण कुलकर्णी - कवठेकर, उत्तम कोळगावकर, विट्ठल वाघ, सोपान हाळमकर, राजन गवस, जगदीश कदम, इंद्रजित भालेराव, जयराम खेडेकर, प्रकाश होळकर, नारायण सुमंत, सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, शंकर वाडेवाले, केशव देशमुख, अजय कांडर, प्रवीण बांदेकर, महेश मोरे, प्रदीप पाटील, सुरेश शिंदे, एकनाथ पाटील, कैलास दौंड, ऐश्वर्य पाटेकर, संजीव दुधाट, मनोज बोरगावकर, पी. विट्ठल, मधुकर कवडे, गुंफा कोकाटे, प्रमोदकुमार आणेराव, विलास पाटील, रमेश इंगळे उत्रादकर, रवींद्र इंगळे चावरेकर, रमेश चिल्ले, भगवान देशमुख, वसंत सावंत, संजय कृष्णाजी पाटील, ज्ञानेश्वर मुळे, संतोष पद्माकर पवार, प्रतिमा इंगोले, रायभान दवंगे, पुरूषोत्तम पाटील, अशोक कौतिक कोळी, अशोक नीलकंठ सोनवणे, देविदास चौधरी, लक्ष्मण बारहाते, लक्ष्मण महाडिक, कल्पना दुधाळ, रफीक सूरज, दासू वौद्य, संदीप जगताप, प्रकाश किनगावकर इत्यादी कवी ग्रामीण अनुभवविश्व मोठ¶ा सामथ्र्यांनिशी अभिव्यक्त करीत आहेत. या बदलांचा शोध इ.स.1975 नंतरची ग्रामीण कविता घेते.
संदर्भ टिपा :-
1] जहागीरदार विश्वास; 'म.सा.पत्रिका (ग्रामीण साहित्य विशेषांक)', जुलौ - डिसें. 1980, पृ.89
(अंक - 214-215)
2] देशमुख गणेश, 'ग्रामीण समाजजीवन व साहित्य, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, 2008,
पृ.283, 284.
3] भालेराव इंद्रजित, 'पीकपाणी', मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, चौथी आवृत्ती, ऑगष्ट,
2001, पृ.48.
4] यादव आनंद, 'मराठी वाङ्मयकोश', खंड चौथा, (समन्वयक संपादक :- विजया राजाध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती - 2002, पृ.113.
5] मुलाटे वासुदेव, साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह, (संपा.डॉ.शरणकुमार लिंबाळे),
दिलीपराज प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 2007, पृ.80.
डॉ.प्रा. गणपतराव ढेंबरे
(मराठी विभाग)
श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर
ता. रावेर, जि. जळगांव
भ्रमणध्वनी- 9421081270
ई-मेल : dhembregr@gmail.com