शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता


डॉ. गणपतराव ढेंबरे 

मराठी विभाग

श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय,

रावेर,ता.रावेर,जि. जळगाव

पिन - ४२५५०८

मोबा क्रं. - ९४२१०८१२ ७०

ई-मेल -dhembregr@gmail.com


प्रस्तावना :-

मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेचे अस्तित्व जाणवते.भाषेद्वारे माणसे एकमेकांशी संपर्क साधतात.माहिती,ज्ञान,विचार,अनुभव,भावना यांची देवाणघेवाण भाषा या माध्यमातून होते.भाषा हे मानवी अस्तित्वाचा आणि अभिव्यक्तीचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे.भाषा केवळ संवाद आणि माहितीच्या देवाणघेवाणीचे माध्यम नाही,तर ती आपल्या विचार आणि भावनांना आकार देते.साहित्य हे भाषेच्या माध्यमातून मानवी अनुभव,कल्पना आणि भावना व्यक्त करण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे.समाजाच्या विशिष्ट अशा प्रगती नंतर त्या समाजात साहित्य निर्मिती होऊ लागते.साहित्य ही एक कला आहे. माणूस नवनवीन क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती करत राहतो. नवनवीन ज्ञान क्षेत्रांचा उदय व विकास होत राहतो.विज्ञानाचे नवनवे शोध माणूस लावत राहतो.नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून मानवी जीवन सतत बदलत राहते.भाषा आणि साहित्य निर्मिती हे मानवी संस्कृतीतील महत्त्वाचे घटक आहेत.भाषा हे मानवी संवादाची आणि विचारांच्या आदान-प्रदानाचे मूलभूत अंग आहे.भाषा केवळ शब्दांचा संच नसून ती संस्कृती,इतिहास,परंपरा,ज्ञान यांचे वहन करणारे साधन आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक अशी तंत्रज्ञानाची ज्ञानशाखा आहे, जी मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते.कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे.जे मानवी जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम करते.कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे.या शाखेमध्ये यंत्र शिक्षण त्यांचे बुद्धिमान आणि परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो.या शाखेतील संशोधन मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे.आजच्या युगात भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून भाषेचे विश्लेषण, अनुवाद,साहित्य निर्मिती आणि अगदी संवाद साधणे ही शक्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग साहित्य निर्मितीमध्ये अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून लेखकांना त्यांचे लेखन सुधारण्यात आणि अधिक सर्जनशील साहित्य निर्माण करण्यासाठी मदत होऊ शकते.

भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील परस्पर संबंध : -


भाषा ही मानवी बुद्धिमत्तेचे एक महत्त्वाचे अंग आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून भाषेचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न सुरूवाती पासून होत आहेत. नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग (एन. एल.पी.) ही याची एक उपशाखा आहे. जी भाषेचे विश्लेषण, समज आणि निर्मिती करण्यासाठी वापरली जाते.(एन.एल. पी.)मधील तंत्रज्ञानाच्या मदतीने मशीनला मानवी भाषा समजणे आणि तिच्याशी संवाद साधने शक्य होते.कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग वाक्यांचे व्याकरण तपासण्यासाठी, शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी आणि भाषेतील भावना ओळखण्यासाठी होतो.भाषाविज्ञानातील सिद्धांत आणि पद्धती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग भाषाविज्ञानातील समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन सिद्धांत मांडण्यासाठी होतो. भाषाविज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकत्रित संशोधनातून भाषेबद्दलचे आपले ज्ञान,समज अधिक विकसित होऊ शकते.भाषांतर,मजकूर विश्लेषण,शिक्षण,सर्च इंजिन आणि सहाय्यक यासारख्या विविध घटकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव पडला आहे. जगात विविध भाषा बोलल्या जातात. आज दळणवळणाची साधने विकसित झाली आहेत. जगातील विविध भागात भिन्न भाषा बोलणारे लोक एकत्र येत आहेत.प्रत्येक व्यक्ती बहुभाषिक असत नाही.यातून संवाद साधण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे या समस्येवर उपाय शोधले गेले आहेत. भाषांतराचे यंत्र विकसित होत आहेत.भाषांतर करणे ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकाची एक महत्त्वाची क्षमता बनली आहे.आजकाल अनेक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर साधने निर्माण झाली आहेत.आपल्याला एका भाषेतून दुसऱ्या भाषेत मजकूर किंवा आवाज सहजपणे रूपांतरित करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परस्पर संबंध :-


कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग साहित्य निर्मितीमध्ये अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता लेखकांना व्याकरण,शब्द आणि वाक्यरचना तपासण्यात मदत करू शकते.कृत्रिम बुद्धिमत्ता लेखकांना नवीन कल्पना शोधण्यात आणि त्यांच्या कल्पनांना विकसित करण्यात मदत करू शकते.कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग स्वयंचलित लेखनात होऊ शकतो.उदाहरणार्थ कथा,कविता,लेख तयार करण्यासाठी मदत होऊ शकते.तसेच कादंबरी,नाटकातील संवाद, पटकथा लेखनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहित्य निर्मितीच्या क्षेत्राला विविध फायदे मिळू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता लेखकांना त्यांच्या लेखनात वेळ वाचवण्यात मदत करू शकते. लेखकांना एक सहाय्यक म्हणून ही यंत्रणा कार्य करू शकते. एका भाषेतील साहित्य जगाच्या विविध भाषांमध्ये एकाच वेळी भाषांतरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते.वेगवेगळ्या भाषेतील साहित्य जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मदत होऊ शकते. कोणत्याही भाषेतील साहित्याचे विश्लेषण करण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे.वेगवेगळ्या भाषेतील साहित्यातील भाषिक वैशिष्ट्ये, भाषाशैली आणि आशियाचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जाते.अभ्यासकांना,संशोधकांना दिशा देण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते.


कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाषा आणि साहित्य निर्मिती क्षेत्रातील उपयोग : -

भाषांतराच्या क्षेत्राचा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विस्तार झाला आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आज अनेक भाषांमधील अडथळे दूर होत आहेत.गुगल ट्रान्सलेट सारख्या साधनांमुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये संवाद साधणे सोपे झाले आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मजकूर विश्लेषण जलदपणे केले जाते.मोठ्या प्रमाणातील मजकुराचे अचूक विश्लेषण करून त्यातील भावना,कल आणि माहिती काढणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य झाले आहे. हे व्यवसाय,संशोधन आणि सामाजिक माध्यमांसाठी उपयुक्त ठरत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यापक क्षमतेचा उपयोग शिक्षण क्षेत्रावरही होत आहे.विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषा शिकण्याची साधने विकसित केली जात आहेत.उदाहरणार्थ ड्यूओलॅंगो सारख्या ॲप्समुळे लोकांना नवीन भाषा शिकणे सोपे जाते. गुगल सारखे सर्च इंजिन मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून योग्य निकाल शोधणे आणि अलेक्सा,सिरा यासारख्या सहाय्यकांद्वारे मानवी भाषेत संवाद साधणे शक्य आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता हे साहित्य निर्मितीसाठी एक शक्तिशाली साधन आहे.त्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. दुर्मिळ साहित्यकृतींचे जतन,संवर्धन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करू शकते. उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जुन्या आणि दुर्मिळ साहित्याचे डिजिटायझेशन होऊ शकते. साहित्य अध्यापन व अध्ययनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होऊ शकते.कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना साहित्यातील कठीण संकल्पना समजावून सांगू शकते. 'वाणी ' नावाचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर उपकरण मराठी साहित्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करू शकते. 'सहज' नावाचे लेखन उपकरण मराठी भाषेत लेख आणि कविता तयार करू शकते.असे विविध उपयोग भाषा आणि साहित्य निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे होऊ शकतात.


भाषा,साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाना पुढील आव्हाने :-

भाषा आणि साहित्य हे दोन्ही क्षेत्र अतिशय गुंतागुंतीचे आहेत.भाषेला,साहित्याला अनेक अर्थ,संदर्भा असतात. भावना,संवेदना मधून या दोन्हीही व्यवस्था उभ्या आहेत.कृत्रिम बुद्धिमत्तेला हे सर्व समजणे आणि योग्य प्रतिसाद देणे.हे आव्हानात्मक आहे.भाषा,साहित्य हे संस्कृतीशी परंपरेशी जोडलेले असते.कृत्रिम बुद्धिमत्तेला सांस्कृतिक,सामाजिक,परंपरांचे संदर्भ समजणे अवघड आहे.  ती सगळी व्यवस्था गुंतागुंतीची आहे.चुकीचे संदर्भ कृत्रिम बुद्धिमत्तेने उपयोगात आणल्यास अर्थाचा अनर्थ घडू शकतो.त्यातून काही सामाजिक प्रश्न उभे राहू शकतात.कृत्रिम बुद्धिमत्तेला भाषा,साहित्य समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा आवश्यक असतो.कमी वापरल्या जाणाऱ्या भाषांसाठी हा डेटा उपलब्ध नसल्याने त्या भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास कमी होतो.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून भाषेचा वापर करताना गोपनीयता,पक्षपात आणि दुरुपयोग यासारख्या नैतिक समस्यांवर लक्ष देणे आवश्यक ठरते.


भाषा,साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील संभाव्यता :-

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा,साहित्य निर्मिती क्षेत्रामध्ये अनेक संभाव्य आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता अजूनही पूर्णपणे सर्जनशील आणि मौलिक साहित्य तयार करण्यास सक्षम नाही.सध्याची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मानवी डेटा आणि अनुभवांवर आधारित असल्यामुळे ती नवीन कल्पना आणि दृष्टिकोन निर्माण करू शकत नाही.माणसांमध्ये भावना आणि संवेदना असतात. ज्या त्यांच्या भाषेत,साहित्य निर्मितीमध्ये दिसून येतात.कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भावना आणि संवेदना नसल्यामुळे ते भावनात्मक आणि संवेदनशील साहित्य निर्माण करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले साहित्य काही वेळा नैतिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण करू शकते.उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले साहित्य जर एखाद्या विशिष्ट गटाला लक्ष करत असेल किंवा त्यांची बदनामी करत असेल तर ते गंभीर समस्या निर्माण करू शकते.प्रत्येक भाषेची आणि संस्कृतीची स्वतःची वैशिष्ट्ये असतात.कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीमधील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे.जेणेकरून ते योग्य आणि समर्पक साहित्य निर्माण करू शकेल.कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले साहित्य अंतिम स्वरूपात मानवी हस्तक्षेपाशिवाय वापरले जाऊ शकत नाही. साहित्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि नैतिक, सामाजिक समस्या टाळण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चुकीचे आणि दिशाभूल करणारे साहित्य निर्माण केले जाऊ शकते.यामुळे समाजाला आणि व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगितेमुळे लेखक आणि साहित्यिकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.भविष्यात मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निकृष्ट साहित्य निर्माण होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेल्या साहित्याचे हक्क आणि मालकी कुणाची असेल याबाबत अजूनही स्पष्ट कायदे नाहीत. यामुळे भविष्यात कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषा शिकण्याची साधने अधिक व्यक्तीचलित आणि प्रभावी होतील.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये संवाद साधणे अधिक सहज होईल.भाषेच्या अभ्यासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन संशोधन,नवकल्पना मांडणे शक्य होईल.



निष्कर्ष :-

भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील एक महत्त्वाचा घटक आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषेचे विश्लेषण,समज आणि साहित्य निर्मिती करणे शक्य झाले आहे. तथापि भाषेची जटिलता, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि नैतिकता यासारख्या आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषेच्या क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.योग्य दिशेने वापर केल्यास भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील सहकार्य मानवी समाजासाठी एक मोठी प्रगती ठरू शकते.भाषा आणि साहित्य निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता खूप मोठी आहे. .कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने, भाषांतर लेखन,संपादन आणि विश्लेषण यांसारख्या अनेक कामांमध्ये मदत करू शकतात.मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता अजूनही मानवी कल्पकता,भावना आणि नैतिकतेची बरोबरी करू शकत नाही.त्यामुळे भाषा आणि साहित्य निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भाषा आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात एक क्रांती घडवून आणत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषेचे संरक्षण,अनुवाद आणि साहित्यिक निर्मिती सुलभ झाली आहे.असे थोडक्यात म्हणता येईल.


संदर्भ ग्रंथ :-

१.शिकारपूर दीपक,डिजिटल युग ( Al २०२५++ ),न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस,पुणे, प्रथम आवृत्ती - २०२४

२.वरखडे रमेश,सायबर-संस्कृती,इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग,नाशिक ,प्रथम आवृत्ती - २०१५

३.मालशे मिलिंद,आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई,चौथे आवृत्ती- २००९

४.कानडे मु.श्री.,मराठीचा भाषिक अभ्यास,स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, तृतीय आवृत्ती- २००४

५.वरखडे रमेश,वरखडे मंगला,संशोधनाचे पद्धतिशास्त्र, ग्रामण्ये इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल एक्सलन्स,पुणे,प्रथम आवृत्ती- २०१९


-- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मंगळवार, ११ जून, २०२४

तसनस चळवळीच्या पराभवाची झाडाझडती

 चळवळीच्या पडझडीची झाडाझडती अर्थात तसनस 



प्रस्तावना : - पत्रकार,कथाकार म्हणून आसाराम लोमटे आपणास परिचित आहेत.शब्द पब्लिकेशन मुंबई यांनी डिसेंबर 2020 मध्ये आसाराम लोमटे यांची तसनस कादंबरी प्रकाशित केली.ही कादंबरी वाचकांच्या पसंतीला अग्रक्रमाने उतरली.म्हणून नोव्हेंबर 2021 मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या चळवळीचा इतिहास एका कार्यकर्त्याच्या मुखातून या कादंबरीतून मांडला गेला. इसवी सन १९८० नंतर स्थापन झालेल्या शेतकरी संघटनेचा इतिहास कादंबरीतून उलगडत जातो. या कादंबरीच्या पटातून वास्तवातील अनेक व्यक्ती ,संघटना यांचे चित्र उभे राहते. कादंबरी हा वास्तव आणि कल्पित यांचा उत्तम मेळ घालणारा वाङ्मय प्रकार आहे.तसनसमध्ये कल्पितापेक्षा वास्तवाचा भार अधिक आहे. वास्तवात घडून गेलेल्या व्यक्ती,घटना,प्रसंग,राजकारण अगदी सत्यपणे कादंबरीतून चित्रित होते.या कादंबरीला वास्तवाचा,सत्याचा गंधीत स्पर्श आहे. प्रत्यक्षात शेतकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जगण्याचा हा इतिहास आहे. शेतकरी चळवळीतील राजकारण या कादंबरीतून सूक्ष्मपणे चित्रित होते.शेतकरी चळवळ उभी करणाऱ्या संस्थापकांचे अचूक मूल्यमापन कादंबरीत केले जाते.सत्यात घडून गेलेल्या संस्थापकांचे पायही शेवटी मातीचे होते. हा निष्कर्ष ही कादंबरी अलगदपणे मांडते. संस्थापकांचे आर्थिक प्रश्नांकडून अध्यात्माकडे झालेली वाटचाल अस्वस्थ करणारी आहे. एखादी संघटना स्थापन होते.तिच्यात निष्ठेने जीव ओतून काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते जोडले जातात. क्रियाशील कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाते. चळवळ बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करते.भरात येते.चळवळ लोकांच्या मनात घर करते.

चळवळ लोकांच्या जगण्याचा श्वास बनते. व्यवस्थेच्या केंद्रस्थानी चळवळ येते.ज्या प्रश्नांसाठी,समस्येसाठी चळवळ उभी राहते.ती प्रश्न ,समस्या काही प्रमाणात सोडवण्यात चळवळीला यश येते.चळवळ अर्थकारण,राजकारण,समाजकारण,संस्कृती,जातीव्यवस्था ,धर्मकारण यांच्या केंद्रवर्ती ठिकाणी कार्य करू लागते.व्यवस्था परिवर्तनासाठी चळवळ कार्य करते.हळूहळू चळवळ प्रस्थापित होते. चळवळीतून काही लाभार्थी उभे राहतात. चळवळीतून काही लाभाची पदे,जागा निर्माण होतात. लाभार्थी होण्यासाठी चळवळीत चढाओढ लागते. राजकारण चळवळीत शिगेला पोहोचते. चळवळीत जुने आणि नवे असा संघर्ष उभा राहतो. निष्ठावान आणि लबाड ,दलबदलू कार्यकर्ते यांच्यात संघर्ष घडू लागतो. चळवळीत गट तट पडतात. मूल्य,निष्ठा,श्रद्धा यांची चाड असलेले लोक चळवळीतून बेदखल होतात.चळवळीतून स्वार्थ साधणारे लोकचं चळवळ चालवू लागतात. चळवळीतील सत्तांतर कधी सहजपणे तर कधी रक्तरंजित होऊन घडते. बेगडी ,झूल पांघरलेले लोक चळवळीचे नेतृत्व करू लागतात. केवळ स्वार्थासाठी चळवळ ,कार्यकर्ते वापरले जातात. मूळ उद्दिष्टांपासून चळवळ भरकटते. साध्यापेक्षा साधनांना मोडून खाण्यात कार्यकर्त्यांना आनंद मिळतो. शेकडो, हजारो ,लाखो लोकांच्या त्यागातून,कार्यातून समर्पणातून उभी राहिलेली चळवळ मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी निकाली निघते. यातील अस्वस्थ रक्ताळलेल्या माणसांची अगतिकता तसनस मधून चोखपणे मांडली जाते. चळवळीसाठी अख्ख आयुष्य उधळलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या दुःखावर वेदनेवर तसनस फुंकर मारते.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या एकाकी, एकटेपणातील चिंतन तसनसला विशेषत्व देते. आपण काय जगलो ? का? कशासाठी? कुणासाठी ? जगलो? भांडलो? याचा आत्मशोध म्हणजे तसनस ही  कादंबरी होय. कादंबरीचा कालपट गेल्या ३० ते ४० वर्षांचा आहे. विशेषतः इ.स.1980 ते इ.स 2020 या वर्षातील ग्रामीण जीवन कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरीतील व्यक्ती,घटना,प्रसंग ,भाषा ही मराठवाड्यातील आहे. मराठवाडा हा चळवळीसाठी सुपीक असलेला प्रदेश आहे. शेतकरी चळवळीच्या वाटचालीतील प्रमुख टप्पे या कादंबरीतून मांडले जातात. शेतकरी संघर्ष समितीने गेल्या पन्नास वर्षात काय मिळवलं? आणि काय गमावलं ? याचा लेखाजोखा कादंबरीतून अचूकपणे मांडला जातो. शेतकरी चळवळीच्या ऱ्हासाची ,पराभवाचे कारणमीमांसा तसनस मधून बेधडकपणे मांडली जाते. या कारणमीमांसाला अतिशय सखोल चिंतनाची जोड आहे. कुठेही उथळपणा जाणवत नाही. 

जीवनातील वास्तव त्यातील विविध बाजूंची तपासणी वाचकाला कथानकाशी जोडून ठेवते. विविध वैचारिक सिद्धांत ,तत्वज्ञान ,परंपरा यांचे विविधांगी दर्शन कादंबरीतून घडते. या मांडणीत अतिशय गांभीर्य आहे. लेखकाचे चिंतन,कादंबरीच्या विषयासंदर्भातील आकलन अतिशय सखोल,परिपूर्ण आहे. कादंबरीतून ते अतिशय सकसपणे मांडले जाते. कादंबरीतून ग्रामीण जीवनाचा पट बहुविध स्तरीय स्वरूपात मांडला जातो. कादंबरीतून खेड्यातील राजकारण ,अर्थकारण ,शेतीचे विविध पैलू उलगडले जातात. समकालीन वास्तवाचे चित्र उभे करण्यात लेखकाला यश येते. कादंबरीचा अवकाश अतिशय व्यापक आहे. जीवनाचे विविध स्तर कादंबरीतून उभे राहतात. गाव खेड्यापासून ते तालुका जिल्ह्यातील जीवनपट कादंबरीतून मांडला जातो. कादंबरीतून शेतकरी चळवळ ,असंघटित मजूर हमाल मापाडी कामगार चळवळ ,शेतकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाचे चित्रण येते. शेतकरी संघटना ,चळवळ मोडीत का निघाली? याचे कारणमीमांसा  कादंबरीचा मुख्य गाभा आहे. कादंबरी केवळ कारणमीमांसे पर्यंत थांबत नाही तर ती चळवळीच्या पराभवाची सैद्धांतिक मांडणी करते. चळवळ का संपली ? याचे उत्तर कादंबरीतील क्षीरसागर वकील हे पात्र देते.ते म्हणतात," तुमच्या आंदोलनांना गर्दी जमते मात्र त्यात ठोस संदेश आणि राजकीय भूमिकांचा अभाव असतो. त्यामुळे अशा आंदोलनांना परिणामांचे टोक येत नाही. तुमच्या समितीची मांडणी प्रभावी असते,आंदोलनतंत्र कल्पक असतात आणि कार्यक्रम प्रतिकात्मक असतो. अशा त्रिवेणी धाग्यातून तुम्ही जो गोफ विणता तो सभेपुरता आकर्षक दिसतो पण तो गोफच राहतो. त्याचा 'शेतकऱ्याचा असूड 'होत नाही. तुमच्या राजकीय भूमिका स्पष्ट असत्या तर कदाचित या आसुडाचे फटके शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या पाठीवर नेमके बसले असते.

वरील विश्लेषण शेतकरी चळवळीच्या अपयशाबद्दल चिंतन मांडणारे आहे. किंबहुना शेतकरी चळवळीच्या अपयशाचे मर्म वरील विवेचनातून उलगडले जाते. सुरुवातीच्या काळात शेतकरी व शेतकरी चळवळी पुढील शत्रू स्पष्ट होते. शासन,प्रशासन,व्यापारी या शत्रूला एक चेहरा होता. इसवी सन 1990 नंतर जागतिकीकरणाच्या पर्वात शेतकऱ्यांच्या शत्रूने बहुविध रूपे धारण केले.धर्म,राजकारण,व्यापार, शासन,प्रशासन,सांस्कृतिक जगत,प्रसारमाध्यमे यातून नानाविध चेहऱ्यांचे शत्रू शेतकऱ्यांसमोर बेसूर रूपात उभे राहिले.

शेतकरी चळवळीला या शत्रूंचा चेहरा नीट ओळखता आला नाही. राजकारणाने पातळीचा निच्चांक गाठला. शेतकरी चळवळ त्यांचे प्रश्न,कार्यकर्ते कसे वापरायचे याचे एक नवेच नीतिशास्त्र विकसित झाले.जाती,धर्म,आर्थिक प्रलोभणे यातून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते फोडले गेले.चळवळीजवळ ठाम राजकीय अजेंडा नसल्यामुळे चळवळीला उतरती कळा लागली. ही सगळी शोकांतिका कलात्मक पद्धतीने तसनस कादंबरीतून उभे राहते.शेतकरी चळवळीबद्दलचे लोकमानस मांडताना कादंबरीत एक विधान येते. ते म्हणजे " हे शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते शेतीमालासाठी भांडायपुरते बरेहेत. कुठं आडल्यानडल्याला धावून येतात. पण बदामरावची सत्ता उलथायची आसंन तर नारायणशिवाय हे काम होणारच नाही."ही मीमांसा कादंबरीला अभिजातपण प्रदान करते. लोकमानस बदलले.चळवळीबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन ठाम बनत गेला.चळवळीच्या हातातून यश सुटत गेले. चळवळीला राजकारणात यश आले नाही. निवडणुकांमध्ये शेतकरी चळवळीला यश मिळवता आले नाही. धूर्त राजकीय पक्षांनी चळवळीला सोयीने वापरले. चळवळीची क्षमता क्षीण होत गेली.हजारो लोकांच्या जगण्याशी निगडित असणाऱ्या चळवळीला अपयश आले. यातून नवीन गुंतागुंत उभी राहिली. या गुंतागुंतीला तसनस सोडवण्याचा प्रयत्न करते.

तसनस कादंबरीचे स्वरूप आणि विशेष :-

तसनस ही कादंबरी एका अल्पभूधारक शेतकऱ्याची कथा आहे. नामा उर्फ नारायण माधव चिलवंत या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे. नामा म्हणजे संपूर्ण जीवन शेतकरी चळवळीला वाहिलेला माणूस होय.चळवळ म्हटलं की ती एकट्याची असत नाही. हजारो लोकांचा श्वास एकाच लईत सुरू राहतो. त्याला पण चळवळ म्हणतो. ही कादंबरी व्यक्तिगत नायकाच्या जीवनापेक्षा काळाच्या कसोटीवर घडलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनाची तडफड व्यक्त करणारी आहे.कादंबरीची सुरुवात भास्कर लुंगारे या पात्रापासून होते. भास्कर लुंगारे सुरज मोरेच्या घरी जातो. घरात सुरजची म्हातारी आई राहते.भास्करला आठवते शेतकरी आंदोलन - शेतकरी संघर्ष समितीच्या पिकांच्या दरवाढीचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. रस्ता अडवला गेला आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तरुण ,वृद्ध यांच्या मनात शेतीमालाच्या दरवाढीचे युद्ध पेटवले आहे. एक स्वप्न उरात घेऊन माणसं रस्त्यावर उतरली आहेत. या जनसमुहापुढे प्रशासन काही वेळे हातबल होते. मग पोलीस प्रशासन गोळीबार करते. या गोळीबारात तरुण  सुरज मोरे बळी पडतो. 30-40 वर्षानंतर भास्कर हा सुरजच्या घरी आलेला आहे. आणि तो आत्मशोध घेतो.आपण काय कमावलं ? आणि काय गमावलं ? यातून या कादंबरीचे कथानक उभे राहते.नामा आत्मशोध घेतो -आमची तरणीबांड पोरं तुम्ही बंदुकीच्या गोळीने टिपली,काय गुन्हा होता त्यांचा?सुरज मोरे एकटा थोडाचयं ?काहींच्या अंगावर आजही जखमांचे वण आहेत.काहींचे पाय जायबंदी झाले.दोन्ही हातांना कुबड्या लावून चालताना खडखड आवाज करीत एखादा भेटायला येतो तेव्हां वाटतं काय मिळालयं माणसांना? या उद्वेगातून आत्मशोधाची सुरुवात होते. शेतकरी चळवळीचे मूल्यमापन सुरू होते. आपण गेल्या 30 ते 40 वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं ? याचा लेखाजोखा तथस्थपणे तसनस मधून मांडला जातो.ही एक चळवळीच्या उभारणीची व लयाची कथा आहे. शेतकरी संघटना मोडकळीला का आली ? या प्रश्नाचा शोध म्हणजे तसनस ही कादंबरी होय. नायक कुठेही भावूक न होता तटस्थ ,वस्तुनिष्ठपणे चळवळीचे,चळवळीतील कार्यकर्त्यांचे,नेतृत्वाचे व स्वतःचे मूल्यमापन करतो.हे मूल्यमापन करताना लेखकाला अनेक कच्चे दुवे सापडतात. काही क्षमतांच्या बाजूही हाती लागतात.शेवटी मानवी वृत्ती प्रवृत्तींचा शोध घेऊन ही कादंबरी संपते.माणसं अशीच का वागत असतील ?याचे उत्तर नामाला स्वतःच्या पातळीवर मिळते.काही प्रश्न,प्रवृत्ती उलगडता येत नाहीत. त्याबद्दलचे काही प्रश्न मागे ठेवून कादंबरी वाचकाला विचारप्रवृत्त बनवते. हे या कादंबरीचे यश म्हटले पाहिजे. ज्यांची इतिहासात कुठेही नोंद सापडत नाही.अशा हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाची गाथा तसनस मधून अभिव्यक्त होते.शशांक धानोरकर शेतकरी चळवळीत काम केलेल्या निवडक लोकांच्या आठवणींचे एक पुस्तक काढतो.सखाराम धानोरकर शशांक धारूरकरचा काका आहे.शेतकऱ्यांना चढया भावात कृषी उत्पादने विकणारा सखाराम शोषक आहे.परंतु तो या शेतकरी चळवळीवर आधारित असलेल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितो.नामा,राम यांनी शेतकरी चळवळीसाठी खरा लढा दिला.परंतु या पुस्तकात साधा नामाचा व रामचा नामउल्लेख ही येत नाही. शोषण करणाऱ्यांच्या नावे इतिहास लिहिला जातो. या सत्त्यावर ही कादंबरी प्रकाश  टाकते. लेखक इतिहासाविषयीचे सत्य फार प्रभावीपणे मांडतो. "एक इतिहास असतो पुस्तकाच्या पानात दडलेला. दुसरा इतिहास सांगितला जातो अगणित जीभांमधून पिढ्यानपिढ्या .... पण अशा इतिहासातले कैक श्वास विरतात हवेतच. तर कधी मिसळले जाते त्यात सांगणाऱ्याची नियत.तुम्ही इतिहास घडवता;पण लिहीत नाही. हळूहळू मग तुमची जागाघेतात तुमची जीभ लावून बोलणारे सगळे अन् मग अगणित जीभांमधून सांगितला जाणारा इतिहासही होऊ लागतो त्यांच्या मालकीचा. "

लेखकाने इतिहास लेखनातील सत्य अतिशय मार्मिकपणे वस्तुनिष्ठपणे व्यक्त केले आहे. अशी शाश्वत विधाने कादंबरीला उच्च कोटीचे श्रेष्ठत्व बहाल करतात.जगण्याच्या लढाईतून,आकलनातून ,शहाणपणातून गवसलेली सूत्रे कादंबरीत मांडली जातात. भारतीय परंपरा,तत्त्वज्ञानातील चांगल्या बाजू व उणीवा लेखक अतिशय अचूकपणे टिपतो. कादंबरीचा नायक म्हणतो, " ज्यांना लिहायचा इतिहास ते लिहीतील ,आपण काम करत राहयलं पाहिजे,आणि आपण एकटेच असे कोण टिकोजीराव लागून गेलो ? आपल्यासोबत इतकी सारी माणसं चळवळीत होती.उद्या त्यांच्यातलाच एखादा तरुण लिहीलसुद्धा.कधी कधी वाटतं जे जिंकतात त्यांचा इतिहास होतो. त्यांच्या सत्तेच्या उजेडात लिहिणारी माणसंही असतात. जिंकणाऱ्यांच्या बाजूने बोललं पाहिजे,लिहिलं पाहिजे असं वाटणारीही माणसं या लिहिण्याच्या धंद्यात आहेतच की.आपण तर कायम हरणाऱ्यांसोबत आहोत. निसर्गासोबत हरणाऱ्या ,व्यवस्थेसोबत हरणाऱ्या, सरकारसोबत हरणाऱ्या माणसांसाठी आपण भांडतो.आपला इतिहास कोण लिहिणार ? राबणाऱ्या, रस्त्यावर उतरणाऱ्या, उपाशीतापाशी असतानाही अवसान गोळा करून मूठ आवळणाऱ्या माणसांना पुस्तकांच्या पानात थोडीच जागा मिळते ?

तसनस ही कादंबरी अशा इतिहासात नोंद नसणाऱ्या माणसांची कथा आहे. ज्यांनी आपल्या घामाने रक्तानं खरा इतिहास घडवला अशा गुमनाम लोकांना सुवर्ण अक्षरांनी सजवणारा ऐवज म्हणजे तसनस ही कादंबरी होय. सगळीकडून पराभूत झालेल्या माणसांचा इतिहास तसनस मधून येतो. प्रस्थापित व्यवस्था,जाती नेहमी कार्यापेक्षा डॉक्युमेंटेशनला महत्त्व देतात.कार्य छोटे असले तरी त्याची लिखित नोंद ठेवणे गरजेचे मानतात. बहुजन समाज डॉक्युमेंटेशनला महत्त्व देत नाही.आळस केला जातो.किंबहुना नोंद करणारी माणसं बहुजनांकडे असत नाही.या गुमनाम लोकांना अक्षररूपात नोंदवण्याचं काम तसनस ही कादंबरी करते.

तसनस या कादंबरीतून ग्रामीण माणसांच्या अस्थेविषयी ,श्रद्धेविषयी मांडणी होते. ग्रामीण भागात आजही देव,धर्म,श्रद्धा,भजन,कीर्तन यांना मानणारा मोठा वर्ग आहे. किंबहुना नियतिशरण जगण्याचे सूत्र या वातावरणातून लोकांना सापडते.आजच्या काळात तर देव ,धर्म,उत्सव,श्रद्धा यांचा बाजार मांडला गेला आहे. राजकारणी लोकांनी देव,धर्म,श्रद्धा ,उत्सव हॅजेक केले आहेत. कादंबरीत आमदार बदामराव निवडणूक जिंकण्यासाठी या सर्वांचा खुबीने वापर करतो. सखाराम धानोरकर,भागचंद पोखरदास ही मंडळी अध्यात्म तेजीत राहण्यासाठी प्रयत्न करतात.या कादंबरीतील त्रिवेणीबाई नंद आणि शेतकरी चळवळीचे संस्थापक भाऊसाहेब महाजन यांचा जीवन प्रवास विरोध दिशेने सुरू होतो. त्रिवेणीबाईंचा जन्म खेड्यात होतो. वडिलांचे धार्मिक ,अध्यात्मिक संस्कारांमुळे त्रिवेणीबाई परमेश्वर भक्तीकडे आकर्षित होतात.भजन,प्रवचन ,कीर्तन या माध्यमांची निवड करतात. परंतु एक दिवस एका गावात प्रवचनाला गेले असता त्यांना गरिबीची ,दारिद्र्याची नव्याने ओळख होते. गरीबीमुळे शेतकरी घरातील मुलाबाळांना दूध प्यायला देत नाहीत. या प्रसंगा नंतर त्यांना प्रचिती झाली. तेच शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात घुमू लागले. त्या सरशी एक पोकळी निर्माण झाली. आणि मंदिरात सांगितलेलं सगळं जणू तवंग आल्यासारखं वरच्या वर तरंगू  लागलं. ज्याला कशाचाच आधार नाही... आपण मोक्षाच्या गोष्टी करतोय. हे तर सगळं पोट भरल्यानंतर आहे. या आत्मज्ञान नंतर त्रिवेणीबाई शेतकरी चळवळीत उतरतात. रस्त्यावरची लढाई लढतात.याउलट भाऊसाहेब महाजन यांचे होते. शेतीचा अर्थशास्त्र ऐन तरुणपणात भाऊसाहेबांनी मांडले. अध्यात्म ही गोष्ट भाऊसाहेबांसाठी फिजूल होती.ते अध्यात्म बद्दल शेतकऱ्यांना सांगतात ," हे सारं तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी आहे. तुमच्या प्रश्नांपासून तुम्हाला दूर नेणारं आहे. दारिद्र्याचा प्रश्न सुटला म्हणजे तुम्हाला माणसासारखं जगता येईल. देवाधर्माचे कोंडवाडे हे माणसाला बधिर करण्यासाठी आहेत. असे स्पष्ट मत मांडणारे भाऊसाहेब विरक्त होतात.अध्यात्मात शांती शोधू लागतात.शेतकरी चळवळीतून निवृत्ती घेतात.या सगळ्या मागील तर्क नामाला सोडवता येत नाही. मानवी प्रवृत्ती का बदलत असतील? असा प्रश्न नामाला व वाचकालाही पडतो. अशा प्रकारे ग्रामीण जीवनाच्या मुळापर्यंत जाण्याचा लेखकाचा शोध हा नाविन्यपूर्ण असा आहे.

कॉम्रेड रुस्तम सत्त्वधर हे तसनस मधील महत्त्वपूर्ण असे पात्र आहे. शेतमजूर ,दलित ,शोषित ,असंघटित कामगारांचे लढे लढणारे डाव्या चळवळीतील संवेदनशील सक्रिय पात्र आहे. नारायण धुळे या दलिताचे शेत जमिनीच्या वादातून डोळे काढले जातात.रुस्तम नारायणची साथ देतात. रुस्तमचे विचार अतिशय परिपक्व आहेत. शेतकरी चळवळीच्या मर्यादा सांगताना रुस्तम म्हणतो, "शेतकरी तितका एक ! हे विधान मला मान्य नाही. हे विधान बरोबर नाही. आणि खरंही नाही. सारे शेतकरी सारखेच आहेत असं नाही. त्यात अनेक भेद आहेत. कोरडवाहू शेतीच्या चार दोन एकरात राबणारा फाटका शेतकरी वेगळा आहे. तीन दिवस स्वतःच्या जमिनीत राबून आणखी तीन-चार दिवस दुसरीकडे शेतमजुरी करणारा शेतकरी वेगळा आहे. तुम्ही साऱ्या शेतकऱ्यांचं एकाचं पारड्यात वजन करताय हे बरोबर नाही. "हे वरील रुस्तमचे विचार शेतकरी चळवळीच्या अपयशाचे मर्म सांगतात. शेतकरी चळवळ महाराष्ट्रातील विविध प्रांतात उभी राहिली. प्रदेशानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न भिन्न आहेत. राज्य, देश पातळीवर संपूर्ण ऐक्य शेतकरी चळवळीत घडू शकले नाही.

डाव्या विचारांच्या ज्या चळवळी आहेत. यांच्याशी शेतकरी चळवळीचे नाते घट्ट झाले नाही. शत्रू एकच असूनही कष्टकऱ्यांच्या चळवळी एकत्र आल्या नाहीत. या वास्तवावर तसनस कादंबरी अचूक बोट ठेवते. संपूर्ण चळवळीची ही चिकित्सा कलात्मकपणे सोप्या पद्धतीने तसनस मधून मांडली गेली आहे. रुस्तमच्या चळवळीतील प्रश्नांबाबत शेतकरी चळवळ अंग चोरून उभी राहते. हे वास्तव कादंबरीतून अचूकपणे येते. तसनस ही कादंबरी मानवी वृत्ती- प्रवृत्तींचे वर्णन करते.नामा,राम,रुस्तम,त्रिवेणीबाई,क्षीरसागर वकील,लक्ष्मण निरस, अनंतराव,भास्करराव लुंगारे,सुरज मोरे,सुभान गरड ही पात्र सदवृत्तीचे आहेत.आमदार बदामराव अस्वले,पिंटू शिंदे,आमदार बजरंग देसाई ,आमदार नारायण सावंत,सखाराम धानोरकर,शशांक धानोरकर ,भागचंद पोखरदास,कांचन थोरात,वल्लभ जयस्वाल,मेहबूब पैलवान ही खलवृत्तीची पात्र आहेत.ही कादंबरी केवळ या मर्यादित पात्रांवर अवलंबून राहत नाही.तसनस मानवी आदिम वृत्ती प्रवृत्तींचा शोध घेते. म्हणून ही कलाकृती विशेष ठरते.

शेतकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून तसनस महत्त्वाची कादंबरी आहे.उपरोध,उपहासात्मक,परभणीच्या भाषेतून ही कादंबरी साकारा होते.तरी संघटनेच्या कार्याचे ,रचनेचे ,कार्यकर्त्यांचे सूक्ष्म आकलन ही कादंबरी मांडते.ग्रामीण जीवनातील कथात्मकता वर्णनामध्ये येते.काही गोष्टी पटवून सांगण्यासाठी कादंबरीत छोट्या छोट्या कथा,किस्से,गोष्टी सांगितल्या जातात. त्या फार रंजक असल्यामुळे कादंबरीच्या कथानकामध्ये रंगत निर्माण होते.भूतकाळ आणि वर्तमानाचे प्रज्ञाचक्षु भान कादंबरीतून अभिव्यक्त होते.गाव खेड्यातील नदी,डोंगर,घाट,रस्ते यांचे वर्णन सूक्ष्मपणे येते.विशेषतः नामाचे एकांतातील स्वागतपर विचार वाचकाला अंतर्मुख करतात. कादंबरीचा शेवट निर्णायक न करता मानवी प्रवृत्तीच्या सम्यक आकलनातून शेवट होतो. तो वाचकाला विशेष भावणार आहे.

तसनस कादंबरीची भाषाशैली :-

तसनस ही कादंबरी मराठवाड्यातील बोली भाषेतून आकाराला येते. विशेषतः परभणी जिल्ह्यातील बोलीचे उपयोजन तसनससाठी केले आहे. बोली भाषेतील असंख्य म्हणी,वाक्प्रचार यांचा वापर कादंबरीत केला आहे. विशेषतः संवादात्मकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्ये सांगता येईल. नामा-राम ,नामा-त्रिवेणीबाई ,त्रिवेणीबाई-अनंतराव,राम-कार्यकर्ते या वेगवेगळ्या पात्रांमध्ये अत्यंत चांगला संवाद घडतो. विशेषतः राम काही वेळा विचार पटवून देण्यासाठी छोट्या छोट्या कथांचा उपयोग करतो. परभणीकडे लोक संवादामध्ये आपले म्हणणे पटवून देण्यासाठी कथांचा उपयोग करतात. या कथांना तर्काची जोड असते. तर्क मांडणीतील भाषा अस्सल ग्रामीण पद्धतीचे असते. ती कादंबरीत रंगत निर्माण करते. छोटी छोटी वाक्य कादंबरीत वापरली जातात. वाचकाला छोट्या वाक्यातून मोठा आशय सापडतो. कादंबरीत अनेक ठिकाणी उपहास,उपरोधात्मक भाषेचा वापर केला गेला आहे. विशेषतः राम आपल्या बाजूने संवाद साधताना उपहास उपरोधाचा अचूक उपयोग करतो.कादंबरीची भाषा शांत,संयत आहे. कधी कधी नकळत तसनसमध्ये आक्रमक भाषा वापरली जाते. उदाहरणार्थ -" हे आभाळ नादी लावणारं अन् डेंगणं दाखवणारं , ही माती पावली तं मावली नाही तं शिंदळभावली अन् ही जिनगानी... वाळूत मुतलं फेस ना पाणी? अशी आक्रमक भाषाशैली कादंबरीत अपवादाने येते. कादंबरीतील आशयातील उद्वेग,राग अभिव्यक्त करण्यासाठी अशी भाषा वापरली जाते.कुठे कुठे तसनसमधील भाषा काव्यात्मक होते. उदाहरणार्थ-

 त्रिवेणीबाई ....

 तू सहजासहजी न उडणारा पळसाच्या फुलांचा रंग

 तळहातात घेतल्यानंतर बोटांना माखावी हळद 

असा पिवळ्या जर्द बाभळीच्या फुलांचा घमघमता वास 

धनगर्द झाडातून थेट डोळ्यांवर आलेली तिरीप

 गोगलगाय निघून गेल्यानंतर मऊ वाळूवर उरलेली ओलसर चमकदार रेघ....

 अशा काही ओळी कवितेचा आनंद देतात. तसनसमध्ये नामा या पात्राचे आलेले स्वागत अतिशय भावस्पर्शी झाले आहे. पात्राच्या मनातील गाळ अचूकपणे कागदावर उभा राहतो. अशा प्रकारे आपल्याला तसनस कादंबरीच्या भाषाशैलीचा विचार करता येतो.

तसनस कादंबरीच्या मर्यादा : -

ही कादंबरी मराठवाड्यातील एका तालुक्यात घडते. केवळ मराठवाड्यापूर्ती ही कादंबरी मर्यादित राहते. विदर्भ,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशातील शेतकरी चळवळीचे संदर्भ कमी येतात. शेतकरी चळवळीचे वर्णन कादंबरीत जे येते ते व्यापकपणे येत नाही. मराठवाड्यातील एका खेड्यात हे घडत असल्याची जाणीव होते. शेतकरी चळवळ व्यापक होती. महाराष्ट्र राज्यभर होती. कधी काळी महाराष्ट्र शासनाला धडकी भरवणारी होती. याचे चित्रण कादंबरीत येत नाही. कादंबरीच्या पटावर व्यापक आशयाचा कॅनव्हास उभा राहत नाही. पार्श्वभूमीला हा कॅनवास घेतला गेला असता तर कादंबरी व्यापक झाली असती. कादंबरीत दलित संघर्षाचे चित्रण नारायण धुळे व दलित तरुणाची आत्महत्या या घटनांपुरते त्रोटक स्वरूपात येते. नामांतराच्या चळवळीचा उल्लेख कादंबरीत येत नाही. कादंबरीच्या अवकाशात नामांतर चळवळ व शेतकरी चळवळीच्या संदर्भात वर्णन येत नाही. कादंबरीत स्त्रीपात्रांची संख्या मर्यादित आहे. त्रिवेणीबाई हे एकच कादंबरीतील ठळक स्त्री पात्र आहे. कांचन थोरात हे पात्र विनोद निर्मितीसाठी येते. तसनसमध्ये शेतकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाचे चित्रण प्रभावीपणे येत नाही.राम,नामा यांच्या घरातील स्त्रिया-पुरुष यांचे चित्रण अल्प प्रमाणात येते. कादंबरीचा नायक नामा याचे व्यक्तिगत जीवन ठळकपणे कादंबरीत येत नाही.त्यामुळे ते पात्र वाचकाच्या मनावर नीटपणे ठसत नाही.जिल्हा,तालुका,गाव यातील विविधता नीटपणे कादंबरीत येत नाही. शेतकरी संघटनेतील नेतृत्व भाऊसाहेब महाजन व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण निरस यांच्यातील संघर्ष कादंबरीत अंधुकपणे येतो.सखाराम धानोरकरचे भाऊसाहेब महाजन सोबत नेमके काय संबंध होते ? ते स्पष्ट होत नाही. कादंबरी ही शेतकरी चळवळीच्या ३० ते ४० वर्षांवर बेतलेली आहे. त्या तुलनेत कादंबरीत कार्यकर्त्यांची पात्र ,उपकथनके कमी येतात. केवळ नामा आणि राम या दोन पात्रांभोवतीचं ही कादंबरी फिरत राहते.निवडणुकांचे चित्रण व्यवस्थितपणे येत नाही.नवीन आमदार नारायण सावंत यांच्या मागे जनमत का गेले? याचे विश्लेषण कादंबरीत येत नाही.शिवसेना व शेतकरी चळवळ यांच्यातील सहसंबंध कादंबरीतून उभा राहत नाही. वरील सर्व मर्यादा असूनही तसनस ही महत्त्वाची कादंबरी आहे.हेआपणास मान्य करावे लागते.

समारोप :-

तसनस ही मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कादंबरी आहे. शेतकरी चळवळी सारख्या विषयाला कादंबरीतून मांडणे हे एक आव्हान होते.ते आव्हान आसाराम लोमटे यांनी अतिशय समर्थपणे पेलले आहे. मराठवाड्यातील शेतकरी संघटनेचा इतिहास तसनसमधून अभिव्यक्त होतो. ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये तसनस ही एक स्वतःची वेगळी दिशा असलेली कादंबरी आहे. आसाराम लोमटे यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

 डॉ.गणपतराव ढेंबरे ,

मराठी विभाग 

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, 

तालुका-रावेर, जिल्हा जळगाव 

पिन 425508,

 मोबईल क्रमांक 942108 12 70 

ई-मेल-dhembregr@gmail.com

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्य स्वरूप आणि मर्यादा

राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्य स्वरूप आणि मर्यादा

 डॉ. जी आर .ढेंबरे  ,रावेर

 प्रस्तावना :

राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोही या संकल्पना अगदी निसरड्या झाल्या I आहेत .कोणती कृती राष्ट्रद्रोही ठरवली जाईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. जगभर राष्ट्र प्रेमाचे भरते आले आहे .सत्तांध  लोकांनी राष्ट्रप्रेमाची नवी व्याख्या तयार केली आहे. धर्मांध मनोवृत्तीच्या नेतृत्वाला ,धोरणाला विरोध केल्यास तुम्ही राष्ट्रद्रोही ठरू शकतात. किंबहुना आसपास राष्ट्रप्रेमाचा दबाव प्रचंड आहे. बेगडी राष्ट्रप्रेम असणाऱ्या झुंडी तुम्हाला राष्ट्रद्रोही ठरवू शकतात. त्यामुळे 'सामील व्हा ' या मनोवृत्तीचा जोर मोठा आहे. सगळ्या क्षेत्रात या वृत्तीने दबदबा निर्माण केला आहे. संस्कृती ,धर्म ,कला, अर्थव्यवस्था ,साहित्य क्षेत्रात या प्रवृत्तीचे विकसन मोठ्या प्रमाणात होत आहे .याला विरोध करणारे जगभर विविध देशात नजरकैदेत ,तुरुंगात, संशयी वातावरणात घुसमटून जगत आहेत .राष्ट्रद्रोही शिक्का बसू नये म्हणून लोक कातडीबचाव धोरण घेत आहेत. या दोन्ही वृत्तीच्या शोषक व शोषित वर्गाला  अस्सल  राष्ट्र भावनेची ओळख होणे अत्यंत गरजेचे  आहे.

  काव्यांकुर मधील  राष्ट्र भावनेची कविता या दृष्टीने महत्त्वाची आहे .भारताच्या इतिहासाचे आकलन करत असताना काही ठळक बाबी आपल्या लक्षात येतात .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वेगवेगळ्या घटकांनी अतुलनीय योगदान दिले आहे .यात सर्वसामान्य जनता, प्रतिभावान कलाकार, शाहीर ,पत्रकार, लेखक यांचे योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते .लेखक कवींनी आपल्या लेखनातून जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग पेटवले होते.केशवसुत, कवी विनायक, वि. दा. सावरकर ,कुसुमाग्रज, वसंत बापट ,कवी गोविंद, सेनापती बापट ,दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, ग दि माडगूळकर ,साने गुरुजी, शांता शेळके ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेतून राष्ट भावना प्रेरणा प्रकट होते. किंबहुना या कवींच्या वेगवेगळ्या कवितांना राष्ट्र प्रेमाच्या गीताचे  स्वरूप प्राप्त झालेले दिसते. स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्वाला, सर्वसामान्य माणसाला या कवितांमधून लढण्याचे बळ मिळाले .यातील अनेक कविता समाजाच्या मुखातील क्रांतिकारी मंत्र म्हणून प्रकट झाल्या .सर्व सामान्यांच्या तोंडातून सहजपणे या कविता बाहेर पडत .यातील कित्येक कविता त्या काळातील पिढीला मुखोद्गत होत्या .या सर्व व्यवस्थेमधून आपल्याला राष्ट्रभावनेच्या कवितेचे महत्त्व लक्षात येते. 


   राष्ट्र भावनेची कविता स्वरूप आणि प्रेरणा

स्वातंत्र्याची जाणीव, राष्ट्रविषयक भक्ती आणि राष्ट्रासाठी वीरांनी केलेले अपूर्व बलिदान हा चिरंतन प्रेरणा देणारा विषय असल्याने राष्ट्र भावनेची कविता कालबाह्य होत नसते . राष्ट्रप्रेम आणि उत्तम वाङ्मयीन रचनातत्त्व  यांच्यातून राष्ट्र भावनेची कविता आकार घेते. भारतीय स्वातंत्र्यलढा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे एक साधन म्हणून राष्ट्रभावना ची कविता आकाराला आली. लोकजागृतीचे माध्यम म्हणून राष्ट्रभावनेच्या कवितेकडे पाहता येते .1885 ते 1947 या कालखंडात उत्कट राष्ट्र प्रेमाची कविता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. क्रांतिकारकांना सर्वसामान्य ,माणसांना स्फूर्ती देण्याचे सामर्थ्य या कवितेत होते . राष्ट्रासाठी त्याग, सर्मपणाची वृत्ती या कवितेतून व्यक्त होते . राष्ट्रविषयक भावनांची उत्कट अभिव्यक्ती या कवितेतून घडलेले दिसते .राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी वाङ्मयाचे नेहमीच साधन म्हणून उपयोजन केलेले   दिसते .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्र भावनेची कविता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात लोकमत घडविण्याचे एक हत्यार म्हणून या कवितेचा वापर झाला .या संषर्घकालातील कविता वीररस प्रधान अशी होती .या कवितेतून अत्यंत ओजस्वी तेजस्वी आव्हान जनसमुदायाला केले गेले . मराठीमध्ये शाहिरी काव्य ची मोठी परंपरा आहे .विशेष पोवाड्यामधून वीररस प्रधान अशी रचना केलेली दिसून येते. राष्ट्रभावनेच्या कवितेला पोवाडा वाङ्मयाची प्रेरणा होती असे म्हणता येईल . राष्ट्रभावनेच्या कवितेतून त्याग ,समर्पण, बलिदान यांचे महत्त्व सांगितले जाते .स्वातंत्र्यासाठी मुल्यांसाठी मरण स्वीकारण्याची वृत्ती या कवितेतून व्यक्त होते. राष्ट्र उभारणीमध्ये या वाङ्मयाचे, कलाकृतीचे एक अपूर्व स्थान असते .म्हणून राष्ट्र भावनेची कविता श्रेष्ठ असते. अशा प्रकारे आपणाला राष्ट्रभावनेच्या कवितेचे स्वरूप सांगता येते.


 काव्यांकुर मधील राष्ट्र भावनेची कविता स्वरूप आणि वैशिष्‍ट्ये


 भारतीय स्वातंत्र्यलढा संपून गेला .आता कुणाच्या विरोधात लढ्याचे ?असा प्रश्न पडू शकतो. राष्ट्र भावनेची कविता आता कालबाह्य झाली आहे. असेही मत मांडले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रभावनेच्या कवितेचे अध्ययन-अध्यापनाची गरज काय ?असा प्रश्न निर्माण होऊ शकतो .स्वातंत्र्य मिळाले राष्ट्रा पुढील सर्व प्रश्न संपले   आहेत .असे मुळीच म्हणता येत नाही .किंबहुना गेल्या सत्तर वर्षात राष्ट्र विघटनाचे पुष्कळ प्रयत्न झाले .फुटिरतावादाने नवे रूप धारण केले आहे. परकीय शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूंनी राष्ट्र  पोखरून टाकले आहे. याला कारण भारत या राष्ट्राची विविधता आहे . राष्ट्राची व्याख्या करताना स्टॅलिन म्हणतो - 'एका समान भूप्रदेशात समान भाषा बोलणारे ,समान इतिहास असणारे ,समान संस्कृती असणारे समान मानसिकता व समान आर्थिक हितसंबंध असणारे त्या भूप्रदेशातील लोकसमूह म्हणजे राष्ट्र ' स्टॅलिनची वरील व्याख्या भारताला लागू करता येत नाही. किंबहुना वरील व्याख्या भारताला लागू करता येत नाही . वरील व्याख्याच्या अगदी उलट बाजू भारतात आहे .भारत हा असमान भूप्रदेश असणारा, विविध भाषा बोलणारा, असमान इतिहास असणारा ,विविधतापूर्ण संस्कृती असणारा ,असमान मानसिकता व असमान आर्थिक हितसंबंध असणारे खंडप्राय भूप्रदेशातील लोकसमूह असणारे राष्ट्र म्हणजे भारत होय .भारताच्या वरील व्याख्येत अनेक प्रश्नांचे उत्तर दडलेले आहेत. विविधतेत एकता हे भारताचे रूप आहे. समता ,बंधुता , न्याय , स्वातंत्र्य, मानवता या मूल्यांची जपणूक करून राष्ट्रउभारणी ही काळाची गरज आहे .भारत हे राष्ट्र म्हणून कसे असावे याचे आदर्श चित्र काव्यांकुर मधील राष्ट्रभावनेच्या तीन कवितेतून मांडले आहे.


 'बलसागर भारत होवो ' ही कविता म्हणजे कवीचे आदर्श स्वप्न आहे . आदर्श, सशक्त, बलवान राष्ट्र म्हणून भारत आकाराला यावे असे कवीचे स्वप्न आहे .जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आव्हान कवी करतो .स्वार्थ सोडून राष्ट्रासाठी प्राण देण्याची तयारी ठेवली पाहिजे असे कवीला वाटते .त्याग आणि समर्पणातून देशाला वैभव प्राप्त करून देण्याचा निश्चय कवी करतो. अंधारामध्ये, अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या देशबांधवांसाठी कार्य करण्यास सज्ज होण्याची भाषा कवी करतो .सर्वांना समान पातळीवर आणण्याची घोषणा कवीने या कवितेतून केली आहे. सर्वांना सोबत घेऊन शाश्वत विकासासाठी वाटचाल करणे महत्त्वाचे आहे .असे मत या कवितेतून मांडले आहे .राष्ट्र कार्य करत असताना प्रयत्नांची शर्थ करावी लागते .या कसोटीच्या क्षणांमधून दिव्य पुरुषार्थ घडेल असे कवीला वाटते .भारत मातेचे वैभव दिव्य शोभेल असा कवीचा विश्वास आहे . ही शक्ती ,ताकद, सामर्थ्य कशासाठी ?तर जगाला शांती देण्यासाठी आहे .एक राष्ट्र म्हणून आम्ही कार्य करू अशी प्रतिज्ञा कवी म्हणतो. प्रस्तुत कवितेतून कवीने राष्ट्राच्या उभारणीचे नवे स्वप्न पाहिले आहे .राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात याची तीव्र जाणीव कवीला आहे .या सर्वांवर मात करण्यासाठीचा मंत्र म्हणून ही कविता श्रेष्ठ ठरते. प्रस्तुत कविता गीताचा रचनाबंध घेऊन आकाराला येते. ही कविता गेय स्वरूपाचे आहे. या कवितेला उत्तम उत्तम चाली लावल्या गेल्या आहेत .प्रस्तुत रचना ही संगीतबद्ध केली गेली आहे .किंबहुना संगीत अनुकूलता हे या कवितेचे वैशिष्ट्य सांगता येईल .सरळ साधी सोपी भाषा या कवितेचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. कवितेतील लय मनाचा ठाव घेणारी आहे .चढत्या क्रमाने कवितेतील  गतिमानता आकार घेते. वीररसप्रधान अशी ही रचना आहे . 'बलसागर भारत होवो ' ही लोकप्रिय, सर्वश्रुत रचना आहे .वेगवेगळ्या पिढीतील लोकांना ही रचना प्रिय आहे .ही रचना अत्यंत लोकप्रिय आहे . ही कविता स्फूर्तीदायी स्वरूपाचे  अशी आहे. यमक रचनाअत्यंत सहज अशी आहे . उपमा अलंकाराचे उचित उपयोजन या कवितेतून दिसते .या कवितेचे पहिले कडवे तीन ओळींचे आहे .बाकी सर्व कडवी दोन ओळींची आहेत .एकूण सहा कडव्यांमधून ही कविता आकाराला येते.


काव्यांकुर मधील

' या भारतात ' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्र भावनेची कविता आहे .भारत हे एक राष्ट्र म्हणून कसे असावे? याबद्दलचा आशावाद या कवितेतून अभिव्यक्त होतो. भारतीय समाज व्यवस्थेचे उत्तम आकलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना होते. या आकलनातून व राष्ट्र प्रेमातून या कवितेची निर्मिती झाली आहे . समता ,स्वातंत्र्य,बंधुता ,न्याय या मूल्यांची मागणी प्रस्तुत कवितेतून करण्यात आली आहे .भारतात विविधतेतुन एकता नांदण्याचे स्वप्न  कवी पाहतो .या राष्ट्रउभारणीत येणाऱ्या अडथळ्यांचे कवीला भान आहे .पंथ, संप्रदाय श्रीमंती, गरीबी ,विविध धर्म यांच्यात बंधुभाव असावा असे कवीला वाटते .मानवता हीच राष्ट्र भावना असावी .सर्वांनी मिळून मानवतेचे गीत गावे. तरुण राष्ट्राचा कणा असतो. हा तरुण शीलवान असावा अशी कवीची धारणा आहे .समाजातून जातीयता नष्ट व्हावी अशी कवीची अपेक्षा आहे .वेगवेगळ्या प्रकारची अस्पृश्यता समूळ नष्ट व्हावी असा कवीचाआशावाद आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांची उभारणी राष्ट्रासाठी आवश्यक आहे .किंबहुना सत्य आणि न्याय या मूल्यांवर राष्ट उभे असते म्हणून कवी सत्य आणि न्यायाची मागणी करतो. घराघरात स्वर्गभाव  निर्माण होवो ,विपत्ती ,भीती नष्ट होऊ दे असा विश्वास कवी कवितेतून व्यक्त करतो .जगाच्या सेवेत आपला देह पडावा असे स्वप्न कवीला पडते .वरील रचनाही गीतात्मक स्वरूपाची आहे .ही कविता चार कडव्यांचे आहे. पहिले कडवे सहा ओळींचे आहे. उरलेले तीन कडवे प्रत्येकी चार ओळींचे आहेत . गेयता हे या कवितेचे प्रधान वैशिष्ट्य आहे .या कवितेला उत्तम चालवता येते .ही कविता उत्तम चालीत संगीतबद्ध केलेली आहे. यमकप्रधानता हे या कवितेचे रचना वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल .वर मागणे आणि स्वर्ग या प्रक्कथांचे  उपयोजन कवीने आपल्या कवितेत केले आहे .सरळ साधी सोपी अशी ही रचना आहे. सर्वसामान्य माणसाला समजेल आवडेल अशी कवितेची भाषा आहे .प्रतिमा प्रतीके यांच्या उपयोजनापेक्षा साधेपणाने काव्यानुभव कवीने कवितेत मांडला आहे .लयबद्धता हा या कवितेचा विशेष म्हणून सांगता येईल .अंतर्गत व बाह्य लय , दोन्हींचा प्रत्यय या कवितेत येतो .


'शूर आम्ही सरदार , ही कवयित्री शांता शेळके यांची कविता आहे . वीर रस प्रधान अशी ही रचना आहे .या कवितेची भाषा अत्यंत ओजस्वी तेजस्वी स्वरूपाची आहे .देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची  भाषा या कवितेतून मांडली गेली आहे. शूर सरदराला मरणाची भीती किती असणार आहे ?मरण हाच त्याचा धर्म आहे .देशासाठी देवासाठी धर्मासाठी प्राण हातात घेतले आहे .कधीही आपला प्राण देण्यासाठी सज्ज झालेल्या सैनिकाचे हे आत्मवृत्त आहे .आम्हाला कुणीही संघर्ष काय आहे ?हे शिकवू नये. आईच्या गर्भातूनच अभिमन्यूसारखी संघर्षाची करण्याची रीत आम्ही शिकलेलो आहोत . या कवितेतील सैनिकाचे आपल्या तलवारीवर प्रेम आहे .त्याचे सर्वस्व ती तलवार आहे .संघर्ष करणे हिच्या सैनिकाची परिभाषा आहे .लाख संकट झेलण्यास पहाडी छातीचा हा सैनिक तयार आहे .मरणाचाही सोहळा होईल असे वीर मरण हा सरदार मागतो आहे .देशापुढे माया ,ममता , नाती सारेशुल्लक आहेत .  ही कविता म्हणत  असताना अंगात वीरश्री संचारते. या कवितेची रचना ही आकलनास साधी सोपी अशी आहे .तीन कडवे असणारी कविता आहे. पहिल्या कडव्यात दोनच ओळी आहेत. उरलेल्या दोन कडव्यात प्रत्येकी तीन ओळी आहेत .गीतात्मक रचना असल्यामुळे यमक प्रधान अशी या कवितेची बांधणी आहे. या कवितेला चाल लावता येते .या कवितेला संगीतबद्ध अशी चाल लावली गेली आहे .ही कविता म्हणजे लोकमानसात अजरामर झालेली गीतात्मक रचना आहे. येडी प्रीत ,पहाडी छाती या प्रतिमांमधून काव्यानुभवाची इंद्रिय संवेदना प्रत्ययाला येते. वरील कविता गीत स्वरूपाची आहे .लयबद्धता हा या कवितेचा ठळक विशेष आहे .ही कविता म्हणजे लोकप्रिय ,सर्वश्रुत असे गीत आहे .



राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या मर्यादा :-

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. एक प्रदीर्घ काळ सुरू असलेला लढा संपला. नवराष्ट्र निर्मितीचे गुलाबी स्वप्न भारतीय जनतेच्या मनात जन्म घेत होते. इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. भारतीय लोक सत्तेत आले. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात फारसा फरक पडला नाही. भ्रमनिरास झालेला समाज दुःखात,कष्टात जीवन जगत होता. मराठी साहित्यात रंगनाथ पठारे यांनी 'ताम्रपट' या कादंबरीतून हे दुःख,व्यथा,अवहेलना अतिशय तरलपणे मांडली आहे. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली 'या कवितेतूनही हे चित्र सशक्तपणे येते. मराठी साहित्यात स्वतंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्रभावनेने प्रेरित साहित्य निर्मिती अल्प प्रमाणात दिसते. केवळ 15 ऑगस्ट ,26 जानेवारीला भारतीय लोकांच्या मनात जाज्वल्य राष्ट्रप्रेम जन्माला येते. परंतु हे दिन संपल्यानंतर राष्ट्र प्रेमाला आहोटी लागते. मराठी साहित्यात राष्टीय भावनेने प्रेरित साहित्यकृती कमी प्रमाणात का निर्माण होतात? यावर चिंतन करण्याची गरज वाटते. राष्ट्र भावनेने प्रेरित असणाऱ्या साहित्यात वीर रस येतो. वीर रसात उत्साह हा स्थायीभाव असतो. राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी वीर रस प्रधान कलाकृती महत्त्वाची ठरते. राष्ट्रीय भावनेने प्रेरित कलाकृती चिरकाल उत्साह देऊ शकत नाही. राष्ट्रप्रेम,मातृभूमी निष्ठा यासारख्या उदात्त्य भावना निरंतर प्रेरित करू शकत नाही. एका विशिष्ट काळानंतर रसिकाला,वाचकाला या भावना कृतार्थ करतात. हे साहित्य निरंतर आनंद देऊ शकत नाही. राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या विषयामध्ये ,आशयात तोच तोपणा येतो. पुनरावृत्तीमुळे हे साहित्य रसिकाच्या अभिरुचीवर परिणाम करते. पुनरावृत्तीमुळे वाचक कंटाळून जाण्याची शक्यता असते. राष्ट्रीय भावना कलाकृतीच्या सतत केंद्रस्थानी ठेवणे अवघड बाब आहे. राष्ट्रीय भावनेच्या अभिव्यक्तीसाठी कथानाकात शृंगार ,विरह ,विनोद या रसभावनांची पेरणी करावी लागते.ही राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याची मर्यादा सांगता येते. राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत सहजता असत नाही. जाणीवपूर्वक राष्ट्रप्रेम,राष्ट्रासाठीचा त्याग यासारख्या भावनांची अभिव्यक्ती करावी लागते. यातील प्रयत्नपूर्वक्ता, जाणीवपूर्वक्ता कलाकृतीच्या अभिजातपणाबद्दल शंका उपस्थित करते. राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या वरील काही मर्यादा सांगता येतील .


डॉ .जी.आर. ढेंबरे

मराठी विभाग प्रमुख

श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर , जि . जळगाव पिन_425508

मोब-9421081270

ई - मेल -dhembregr@gmail.com

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून ! भावी पिढीसाठी चे मार्गदर्शक तत्त्वज्ञान

 " चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!भावी पिढीसाठी चे मार्गदर्शक तत्त्वज्ञान "

 प्रस्तावना : - 

 डॉ. आ.ह. साळुंखे यांची ओळख एक विचारवंत म्हणून आहे. संस्कृत भाषेचे अभ्यासक म्हणून डॉक्टर साळुंखे आपणास परिचित आहेत. भाषा, साहित्य ,तत्त्वज्ञान ,धर्मशास्त्र यांचे गाढे अभ्यासक म्हणून डॉक्टर साळुंखे महाराष्ट्राला परिचित आहेत. संशोधनात मग्न असणारे ,समाज प्रबोधनाला दिशा देणारे साक्षेपी विचारवंत म्हणून डॉक्टर साळुंखे आपल्या सर्वांना परिचित आहेत. कादंबरीकार,इतिहास संशोधक अशा विविधांगी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर साळुंखे यांचा आपल्याला परिचय आहे. परिवर्तनवादी पुरोगामी जीवनवादाचे पुरस्कर्ते हीच डॉक्टर साळुंखे यांची खरीओळख आहे. निरंतरपणे केलेल्या अभ्यासातून गवसलेले शाश्वत सत्य डॉक्टर साळुंखे यांनी आपल्या लेखनातून मांडले आहे. सर्वसामान्य माणसांना दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतील अशी मूल्य, विचार ,सुभाषिते, तत्त्वज्ञान डॉक्टर साळुंखे यांनी चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये , म्हणून!या ललित लेखांच्या पुस्तकातून मांडले आहेत.


 सोलापूर येथील संचार या दैनिकासाठी डॉक्टर साळुंखे यांनी हे लेख लिहिले आहेत. या लेखांचे मूल्य लक्षात घेऊन जुलै 2002 मध्ये लोकायत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाच्या जवळपास दहा वृत्त प्रकाशित झाले आहेत. यावरून या पुस्तकावरील वाचकांचे प्रेम आपल्या लक्षात येते. दैनिकासाठी केलेल्या सदर लेखनाला, ललित लेखनाला अभ्यासक ,समीक्षक स्फूट लेखन मानतात. त्या लेखनाला फुटकळ , हलकेफुलके लेखन मानण्याचा प्रघात मराठी साहित्यात व समीक्षेत आहे. सर्वसामान्य वाचकांना दैनिकातील सदर ,लेख ,लेखमाला विशेष रुचणारी असते. या लेखांचे पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याची परंपरा मराठीमध्ये जुनी आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले,विजया राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ ,माधव गडकरी यांची सदर लेखनपर पुस्तके प्रसिद्ध आहेत.


 श्री.के. क्षीरसागर, अ.ना. देशपांडे ,द. ग. गोडसे ,रवींद्र पिंगे, गंगाधर गाडगीळ, बाळ सामंत,जयवंत दळवी, वि.ग. कानिटकर, राम शेवाळकर,सुरेश भट ,गोविंद तळवळकर ,शरणकुमार लिंबाळे, उत्तम कांबळे ,अर्जुन डांगळे ,नामदेव ढसाळ ,राजन गवस ,अरुण साधू, अनिल अवचट ,भाऊ पाध्ये , दिलीप चित्रे अशी नामवंत आणि यशस्वी स्तंभ लेखकांची यादी मराठीमध्ये आपणास सांगता येईल. 


या परंपरेत डॉक्टर आ.ह. साळुंखे यांचे सोलापूर येथील संचार या दैनिकासाठी केलेले हे ललित लेखन अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे. डॉक्टर साळुंखे या पुस्तकाविषयी लिहितात, "खरं तर या पुस्तकाला 'छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी ' असं काहीतरी नाव द्यावं असा आधी माझ्या मनात होतं. प्रतीक्षा ते नाव दिलेलं नसलं तरी पुस्तकाचा आशय तोच आहे. जीवनाच्या प्रवासात मला आलेले छोटे छोटे अनुभव मी इथं नोंदवले आहेत. पण वरवर पाहता छोट्या वाटणारे या अनुभवांमध्ये बरेच काही महत्त्वाचा असं साठवलेलं आहे , अशी माझी भावना आहे. "  वरील डॉक्टर साळुंखे यांच्या मनोगतातून या पुस्तकाचे मर्म आपल्या लक्षात येते. जीवन जगत असताना काही महत्त्वाच्या नसणाऱ्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. यातून जीवनातील खरा आनंद आपण गमवून बसतो. जीवनातील खरा आनंद कशात आहे ? याविषयीचे मार्मिक चिंतन प्रस्तुत पुस्तकातून अभिव्यक्त होते. चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून ! या पुस्तकात एकूण २९ छोटे छोटे ललित लेख आहेत. या लेखांचे विषय वेगवेगळे आहेत. परंतु सर्व लेखांमधून अभिव्यक्त होणारा आशय हा जीवन समृद्धपणे कसे जगावे याविषयीचा आहे.या प्रत्येक ललित लेखातून डॉक्टर आ.ह. साळुंखे यांचे संस्कृती, साहित्य,समाज या विषयाचे गंभीर तत्त्वज्ञान प्रकट होते. सर्वसामान्य माणसाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून अगदी सहज मिळतात. जीवनाचे महत्त्व लक्षात घेऊन क्षणभंगुर असणाऱ्या जीवनात आपण प्रत्यक्ष मनापासून जीवन अनुभवले पाहिजे. असे लेखकाला वाटते. जीवनातील प्रत्येक क्षणातील माणसाचं असणं, त्या अनुभवामध्ये स्वतःला केंद्रस्थानी ठेवणारे मानवी मनाचे सौंदर्य या पुस्तकातील लेखातून अभिव्यक्त होते. जीवनाचे मोल जाणून आपण प्रत्यक्ष मनापासून जीवन अनुभवलाय पाहिजे. हे अनुभवण्याची ,जगण्याची प्रक्रिया काय असते ? याविषयीचे चिंतन डॉक्टर साळुंखेंनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. जगण्याचे हे सूत्र   लेखातून मांडले जाते.


 या पुस्तकाचे सार विशद करताना , आशुतोष पाटील लिहितात, "अनेकदा एखादं स्वप्न उराशी बाळगलेलं असतं , पण तिथपर्यंत आपण पोहचतच नाही. अशा वेळी ओंजळीत असलेल्या इतर सुखकणांकडे पाहणंही आपण विसरतो. या उलट कधी आपले एक स्वप्न पूर्ण करताना आपण इतर अनेक स्वप्नकळ्यांना कळत- नकळत तुडवत पुढं निघून जातो. कधी जीवनाचा अर्थच नीट समजून येत नाही. आला दिवस मागं टाकत जातो आपण. कधी कधी जीवनाचे मोल ध्यानात येतं,ते अधिक चांगलं जगायला हवं हेही समजतं, पण पुढं .... आपण त्या दृष्टीनं पाऊल मात्र टाकत नाही. "

 आज मानवी जीवन खूप गतिमान झाले आहे. आभासी जीवन आनंद शोधण्यात माणसे गर्क झाली आहेत. आभासी जीवनात सुख शोधण्यापेक्षा मानवी जीवनातील शाश्वत आनंद ,सुख कशात आहे ? याविषयीचे साधं ,सरळ तत्वज्ञान या पुस्तकातून मांडले आहे. भौतिक गोष्टी मिळवण्याच्या नादात माणूस जगण्यातील खरा आनंद गमावून बसतो. साध्य प्राप्त करण्याच्या नादात निर्माण प्रक्रियेतील आनंद माणसं हरवून बसली आहेत. मोठे ध्येय प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु ध्येय म्हणजे संपूर्ण जीवन नव्हे. जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगला पाहिजे. प्रत्येक क्षण अंतिम क्षण म्हणून जगल्यास जीवनाचा खरा आनंद प्राप्त होऊ शकतो. या विचारांवर डॉक्टर साळुंखे यांनी चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये,म्हणून ! या पुस्तकातून भाष्य केले आहे .



चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून ! या पुस्तकातील लेखांचे स्वरूप आणि विशेष :- 


सदर पुस्तकातील पहिला लेख - मालक हे अधी का सांगितलं नाहीत? हा आहे. या लेखात लेखकाने दोन किस्से सांगितले आहेत. एक किस्सा हा उद्योगपतीचा आहे. धनसंपत्ती मिळवण्याच्या नादात आपल्या आपत्याला गमून बसलेला उद्योगपती या लेखातून लेखकाने उभा केला आहे. जीवनात माणसाला स्वतःच्या गरजांचा,सुखांचा क्रम योग्य प्रकारे लावता आल्यास अनेक गोष्टी सोप्या होतात. आपण साधनांच्या प्राप्तीसाठी वेडे होऊन जातो.विवेक हरवून बसतो.आपले अचूक जीवन साध्य काय आहे?याविषयी संभ्रमात जगतो. याबद्दलचे लेखकाचे मत वाचकाला अंतर्मुख करते.याच लेखात एका कुटुंबाला भेटलेल्या बाहुलीचा किस्सा लेखकाने सांगितला आहे.घरातील लहान मुलीला किंमती बाहुली खेळण्यास न देणाऱ्या कुटुंबाची ही कथा आपल्या सोबतही घडताना दिसते.संपत्ती,सत्ता,प्रतिष्ठा यांच्या मागे न धावता वस्तूंचा योग्य वेळी उपभोग घेणे महत्त्वाचे आहे. यावर लेखकाचे मार्गदर्शन वाचकाला विचारप्रवण बनविते.


 या पुस्तकातील दुसरा लेख मी ५९ व्या वर्षाऐवजी १९व्या वर्षी कन्याकुमारीला जायला हवं होतं ! या लेखात जीवनाविषयीचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.केवळ वस्तूंचा संचय करण्यात जीवन व्यतीत करणे.हा मूर्खपणा आहे.जीवन जगताना साधन म्हणून वस्तूंची गरज असते.वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचे विसरून जातो.जीवन जगताना आपण काय मिळवलं पाहिजे? याविषयीचे मार्गदर्शन या लेखातून मिळते.जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी केली पाहिजे.असे लेखकाला वाटते.आयुष्याच्या उतार वयात काही गोष्टी करताना पश्चाताप झालेले घायाळ मन व्यक्तीला केवळ निराशा देते.असे लेखकाला वाटते.


शक्य तितके पैलू ध्यानात घेऊन मतं बनवू या या ! या लेखात विचार प्रक्रिया निर्दोष बनवण्यासाठी काय केले पाहिजे? याविषयीचे सूत्र लेखकाने मांडले आहे. आपण स्वतःची मते तयार करताना ती नेहमी तपासून घेतली पाहिजेत. एकांगी ऐकीव माहितीवर मत बनू नये.विवेक जागा ठेवून आपण मतं ,विचार मांडले पाहिजेत. मत बनवताना आणि मतांना अनुसरून कृती करताना शक्य तितक्या बाजूनी आधी विचार केला पाहिजे.असे लेखकाला वाटते. विचारपूर्वक संयमाने ,संतुलित मनाने निर्णय घ्यावेत.असा मोलाचा सल्ला लेखकाने या लेखातून दिला आहे.


नावाच्या नात्यापेक्षा हृदयाचं नातं जपणं महत्त्वाचं! या लेखात लेखकाने मानवी नात्याच्या गुंत्याविषयी मार्गदर्शन केले आहे. मानवी जीवनातील असंख्य नात्यांची गुढ गुंफण लेखक शोधू पाहतो.नात्याला नाव देणे गरजेचे असते. तसेच नाव नसलेल्या नात्यालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असते.एकच नातं वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात असते. काही नात्याला अनामिकच राहू द्यावे. असे लेखकाला वाटते. नात्यात शेवटी उत्कट भावना असावी. नाती हीच जीवनातील आनंदाचे उगमस्थान असतात. हे सत्य लेखकाने या लेखातून मांडले आहे.


मृत्यूच्या एकेका घावाबरोबर जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळते! या लेखात लेखकाने जगण्याची,जिवंत राहण्याची,आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची इच्छा कशा प्रकारचे असते. याविषयीचे तत्त्वज्ञान मांडले आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी माणसं प्रयत्न करतात. किंबहुना स्वतःच अस्तित्व टिकून ठेवणे हाच खरा मानवी जीवनाचा अर्थ आहे.जीवनावरची निष्ठा क्षीण होऊ न देता माणसाने बुंधा छाटलेल्या झाडाला असंख्य फुटवे फुटावेत त्याप्रमाणे जीवन जगावे. हा संदेश या लेखातून लेखकाने दिला आहे.


पानगळ झालेली झाडं आपल्यामधलं चैतन्य जपून ठेवतात! या लेखात लेखकाने कितीही संकटं,दुःख आली तरी आपली जगण्याची उर्मी कायम ठेवली पाहिजे. असे मत लेखकाने मांडले आहे. ही उर्मी जिवंत ठेवण्याची प्रेरणा आपण पानगळ झालेल्या झाडांपासून घेतली पाहिजे.निराशेने, वैफल्याच्या जाणिवेन ,दुःखाच्या अनुभवानं पिचलेल्या माणसांना धीर न हरता पानगळ झालेल्या झाडाकडून प्रेरणा घ्यावी. निसर्ग हा सर्वात मोठा जादूगार आहे. या जादूगाराकडून आपण तग धरण्याची प्रवृत्ती धारण करावी असे लेखकाला वाटते.


आपली फुलण्याचीही आणि फुलवण्याचीही क्षमता ओळखू या! या लेखात लेखकाने जीवनात यशस्वी होण्यासाठी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. असे विचार मांडले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन नकळत तुम्हाला जिंकण्यासाठी प्रेरक ठरतो. नकारात्मक दृष्टिकोन माणसाला नकारात्मक बनवतो. अपयशाच्या गर्तेत नकारात्मक दृष्टिकोन घेऊन जातो.रवींद्र नावाच्या युवकाच्या उदाहरणातून लेखकाने फुलण्यासाठी आणि फुलवण्यासाठीची क्षमता स्वतःमध्ये असतेच फक्त त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा? याविषयी मार्गदर्शन केले आहे.


कितीही फुललो तरी आणखी फुलण्याला वाव असतोच! या लेखात लेखक अधिकाधिक परिपूर्णतेचा आग्रह धरतो. परिपूर्णतेच्या दिशेने जो प्रवास केला जातो.तो अखंडपणे चालू ठेवावा लागतो. मानवी जीवनात व्यक्ती कितीही चांगले कार्य करत असली तरी त्या कार्यात आणखी सुधारणेला वाव असतोच असतो. असे लेखकाला वाटते. मानवी जीवनात विकासाला पूर्णविराम असत नाही. विकासाला परिसीमा असत नाही. हे तत्व लेखकाने प्रस्तुत लेखातून मांडले आहे.


पानांआड दडलेल्या फुलांवर सुगंध वारा पसरवू या! या लेखात लेखकाने समाजामध्ये अनेक लोक खूप कर्तुत्वान ,सक्षम असतात.परंतु त्यांची उपेक्षा होते. या व्यक्तींच्या वाट्याला सन्मान येत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रतिभा फुलली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे कौतुक झालं पाहिजे. त्या व्यक्तीच्या योगदानाची दखल घेतली गेली पाहिजे. समाज प्रतिभाशाली होण्यासाठी समाजातील जाणत्यांनी प्रयत्न करावे.असे लेखकाला वाटते.


मरणापासून पळणं म्हणजे जीवनापासून पलायन ! या लेखात लेखकाने सॉक्रेटिस या महान तत्त्वत्त्याच्या मरणाचा प्रसंग सांगितला आहे. न्यायालयाने सॉक्रेटिसला मृत्यूची शिक्षा दिली. तुरुंगातून पळून जाण्याची संधी असताना सॉक्रोटिसने ती नाकारली. कायद्याने स्थापित केलेल्या न्यायालयाने दिलेली शिक्षा मी स्वीकारली पाहिजे. असे सॉक्रेटिसला वाटते. जीव वाचवण्यापेक्षा आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून मृत्यू स्वीकारणारा सॉक्रेटिस लेखकाला महान वाटतो. आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून मरण पत्करून त्याच्या जीवनावरील प्रेम त्यांने व्यक्त केले असे लेखकाला वाटते.


पाणिनीचा मृत्यूही आम्हा शिक्षकांना शिकवून जातो! या लेखात लेखकाने पाणिनी या अभ्यासकांच्या ज्ञाननिष्ठेविषयीची आस्था मांडली आहे. पाणिनी आपल्या विद्यार्थ्यांना व्याघ्र या शब्दाच्या उत्पत्ती विषयी माहिती देत होते. ही एक कथा आहे. प्रत्यक्ष वाघ तिथे येतो. आणि पाणीनींचा प्राण घेतो. या कथेतून शिक्षक कसा असावा? याविषयीचा धडा आपणास मिळतो. पाणिनी  सारखी ज्ञाननिष्ठ शिक्षकांमध्ये आली पाहिजे. असा आशावाद लेखक इथे व्यक्त करतो.



एक-एक नवा शब्द जाणणं, म्हणजे एक- एक नवा मित्र जोडणं ! या लेखात लेखकाने शब्दांचे महात्म्य सांगितले आहे. एका विद्यार्थ्याने प्राध्यापक असणाऱ्या लेखकाशी  संवाद केला. यातून विद्यार्थ्याने रोज काहीतरी नवीन शिकावे असे लेखकाला वाटते. एक- एक शब्द जाणणं म्हणजे एक-एक नवा मित्र जोडणं. असे मानायला हवे. नवे शब्द आत्मसात करणे म्हणजे आपला लोकसंग्रह वाढवणं असे लेखकाला वाटते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील उत्तम नात्याची परिसीमा लेखकाने या लेखातून दाखवून दिली आहे.


पोहायला शिकायचं असेल,तर पाण्यात उतरलंच पाहिजे! या लेखात लेखकाने नव्या पिढीचे व्यक्तिमत्व  खुरटण्यामागच्या कारणांची चिकित्सा केली आहे. अनुभवाची समृद्धी मिळवण्यासाठी फायदा तोटा बाजूला ठेवला पाहिजे. असे लेखकाला वाटते. प्रत्यक्ष व्यवहारात उतरून विशिष्ट कृती करण्याचा सराव केल्याशिवाय यश मिळत नाही.हे तत्त्व लेखक स्पष्ट करतो. पाण्यात न उतरता पोहायला शिकणारी व्यक्ती असूचं शकत नाही. ज्ञान,अनुभव मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करावे लागते. असे लेखकाला वाटते.


सर ,आय नॉट लाईक! या लेखात लेखकाने चेन्नई येथे वास्तव्यास असताना भेटलेल्या चिन्नू नावाच्या तरुणाचे व्यक्तीचित्र या लेखातून शब्दबद्ध केले आहे.या चिन्नशी साम्य असणारा जपानी तरुण लेखकाला भेटला. या दोघांचे जगण्याचे सूत्र समान होते. दुसऱ्याच्या वस्तू , दुसऱ्यांच्या कष्टाची फळ आपल्या 'स्व' शी जोडून मोठे व्हायचं नाही.हे सूत्र लेखकाला दोन भिन्न व्यक्तींकडून समानपणे भेटते.आपल्या दैनंदिन आयुष्यातही आपण वरील सूत्राचा अवलंब करावा. असे आवाहन लेखक या लेखातून करतो.



पत्रिकेतल्या कालसर्पयोगाला डॉक्टरनं भ्यावं? या लेखात लेखकाने बहुजन समाजातील एका एम.एस. डॉक्टरची कथा सांगितली आहे. डॉक्टर असूनही पत्रिकेला महत्त्व देणारा माणूस समाजाबरोबर स्वतःचे नुकसान करून घेतो. या डॉक्टरने विज्ञानाचं,वैद्यकीय शास्त्राचं ज्ञान घेतलं आहे. त्या व्यक्तीचं असं वागणं लेखकाला व्यतीत करून गेले.डॉक्टरने ज्ञानाच्या प्रकाशाने समाजातील अंधार दूर करायला पाहिजे होता.असे लेखकाला वाटते. समाजातील वास्तवावर लेखकांनी धीटपणे भाष्य केले आहे.


तीन कुटुंबांची स्वागतार्ह परिवर्तनशीलता या लेखामध्ये लेखकाने तीन कुटुंबांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देऊन परिवर्तनाचा पुरोगामी मार्ग कसा स्वीकारला. याबद्दलचा एक अनुभव मांडला आहे.अविवाहित तरूण आणि विधवा तरुणी यांच्या विवाहाची , परिवर्तनाची गोष्ट या लेखातून लेखकाने मांडली आहे. या तरुण दांपत्याच्या आदर्शाची समाजाला गरज आहे.असे लेखकाला वाटते. विधवा  स्त्रीचे आयुष्य सोपं करणारे या तीन कुटुंबांची दृष्टी समाजातील लोकांनी स्वीकारावी. असा आग्रह लेखक धरतो.प्रतिष्ठेपेक्षा माणसांचे दुःख ओळखून समाजातील व्यक्तींनी कृती करावी. असा आदर्शवाद लेखक इथे मांडतो.



भाषेतली पुरुषप्रधानता बदलणं हे एक आव्हानच ! या लेखात भाषेतील पुरुष प्रधानते विषयी लेखकाने मांडणी केली आहे.भाषेचे संस्कार अंतर्मनात जाऊन खोलवर रुजून बसतात. आपल्या व्यक्तीत्वाचा ,आपल्या विचार प्रक्रियेचा,आपल्या चिंतनाचा अविभाज्य घटक बनून जातात. एका उदाहरणाच्या सहाय्याने लेखकाने हे सूत्र स्पष्ट केले आहे.भाषेतील पुरुष प्रधानता कमी करण्यासाठी लेखक काही उपाय सुचवतो. जाणीवपूर्वक स्त्रीलिंगी शब्द अधिक वेळा वापरून वाक्यरचना करण्यामुळे भाषेच्या क्षेत्रातही समता निर्माण होऊ शकते. असा लेखकाचा आशावाद आहे.


पत्नी गुलाम म्हणून हवी, की मैत्रीण म्हणून ? या लेखात लेखकाने समाजातील स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषप्रधान दृष्टिकोन अभिव्यक्त केला आहे. पती-पत्नी दोघांमधील नातं अतिशय संवेदनशील नातं असतं. प्रतिगामी दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती पत्नीकडे केवळ गुलाम म्हणून पाहतात. पत्नी ही स्त्री स्वातंत्र्याचा आनंद घेणारे असावी. पत्नी ही हृदयाशी संवाद साधणारी मैत्रीण असावी. असा दृष्टिकोन समाजात विकसित होणे फार गरजेचे आहे. तरुण विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून लेखकाने हे चिंतन मांडले आहे.


माझ्या लेखन-भाषणांमुळं माझ्यातच अधिक परिवर्तन झालं ! या लेखात लेखकाने स्वतःमध्ये घडलेल्या परिवर्तनाची प्रक्रिया मांडली आहे. समाजात अनेक लोक पुस्तकातून , भाषणातून परिवर्तनवादी विचार मांडत असतात. मात्र प्रत्यक्षात ते प्रतिगामी भूमिकेत जगत असतात. डॉ.आ.ह. साळुंखे पुस्तकातून जे विचार मांडतात. भाषणातून जे विचार सांगतात. ते त्याप्रमाणे जीवन जगतात. बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे डॉक्टर साळुंखे जीवन जगतात. स्वतःच्या आयुष्यात बदल करण्यासाठी लेखन आणि भाषण कसं कारणीभूत ठरलं. याबद्दलचं चिंतन लेखकाने या लेखातून मांडले आहे.


मानवी मनाची निर्मितीक्षमता थक्क करणारी आहे! या लेखात लेखकाने स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्नांचे पूर्ण आकलन माणसाला अजून झालेले नाही. माणसाच्या अंतर्मनात खूप गुंतागुंत सुरू असते. वास्तव,कल्पना गूढता यांचे मिश्रण स्वप्नात असते. मानवी मन हे न सुटलेलं कोडे आहे.मानवी मनाची निर्मितीक्षमता विशाल आणि अमर्याद असते. लेखकाला ही क्षमता थक्क करणारी विस्मयकारक वाटते.


आयुष्य म्हणजे चढउताराचा एक प्रवास आहे. यात कुणाला चढण महत्त्वाची वाटते. तर कुणाला उताराचा प्रवास आवडतो. 'चढापेक्षा उताराचा प्रवास क्लेशकारक!' या लेखात लेखकाने जीवनाचे सार सांगितले आहे. कोणत्याही क्षेत्रात अफाट यश मिळवल्यानंतर त्या व्यक्तीच्या अधोगतीचा काळ सुरू होतो. यशाच्या शिखरावरील ती जागा त्या व्यक्तीला खाली करून द्यावी लागते. अनेकांना ही परिस्थिती नीटपणे हाताळता येत नाही. अश्यावेळी माणसाने विवेक शाबूत ठेवला पाहिजे. मनाचा संतुलन राखलं पाहिजे. आपली जागा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण आपलचं प्रतिबिंब पाहायला हवं.जीवनाच्या उताराचा प्रवास आनंदाने करता आला पाहिजे. असे लेखकाला वाटते. 'स्व' प्रतिमेच्या प्रेमात पडणारे असंख्य लोक असतात. एखाद्या व्यक्तीची प्रतिमा कशी निर्माण होते ?त्या प्रतिमेसाठी आवश्यक असलेले गुण प्राप्त केल्याने ती प्रतिमा प्राप्त होते. ती व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्वामधनं तो गुण जास्तीत जास्त प्रकट करत राहते. सद्गुण दाखवण्यापेक्षा आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. असे लेखकाला वाटते. 


आपण कसोटीच्या क्षणी कसे वागतो, हेच खरं निर्णयाक असतं! या लेखात लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकातील वेदिका नावाच्या स्त्रीची कथा सांगितली आहे. सद्गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात खऱ्या अर्थाने निर्माण व्हावेत. हे आपलं ध्येय असलं पाहिजे. असा विचार लेखक या लेखातून मांडतो.भारतीय समाजाच्या दारिद्र्याचे आणि इतर दुःखांचे एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे बदल स्वीकारण्याची मानसिकता नसणे.हे होय.असे लेखक वाटते. एकूण भारतीय समाज,संस्कृती यांचे मनोविश्लेषणचं लेखकाने केले आहे. डॉक्टर साळुंखे केवळ मनोविश्लेषण करून थांबत नाही. तर यावर उपाय सुचवतात. समाजाने विकास साधण्यासाठी सम्यक दृष्टी स्वीकारली पाहिजे. जुन्या-नव्याचं संतुलन साधले पाहिजे. पुढे जाणं आवश्यक आहे. असे लेखकाला वाटते. इष्ट हितकारक दिशेने होणारे परिवर्तन समाजाने सहजतेने स्वीकारले पाहिजे. असे लेखकाला वाटते. बाह्यसृष्टीच्या परिवर्तनाची अनेक उदाहरणे लेखक इथे सांगतो.समाजाने ठरवलं तर स्वतःच्या अंतर सृष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते. एका व्याख्यानाच्या निमित्ताने एका डॉक्टरने सांगितलेला अनुभव वरील विश्लेषणावर लागू पडणार आहे. संधी मिळताच गुन्हेगार जमातीतील एक मुलगा डॉक्टर होतो. हा प्रेरणादायी अनुभव परिवर्तन शक्य आहे ! या लेखातून लेखकाने मांडला आहे.


सुरुंगानं पहाड फोडता येतो,पण कळी उमलविता येत नाही! या लेखात लेखकाने प्रेमाचे,मायेचे महत्त्व सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर,महाकवी भवभूती यांच्या काव्याच्या ओळीतून कळी उमलविण्यासाठी काय गरजेचे आहे. याविषयीची उदाहरणे दिली आहेत. माणसाने कर्तव्यासाठी कठोर जरूर व्हावे. परंतु जिथे कठोरपणा आवश्यक आहे तिथेच तो असावा. किंबहुना स्वभावातील कठोरपणा वर्ज्य करणं उचित असतं. असे लेखकाला वाटते. आपल्याला स्वतःचे व इतरांचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदी करायचे असेल तर प्रेम,जिव्हाळा महत्त्वाचा ठरतो. एखाद्या नाजूक कळीचा जबरदस्तीने फुलात रूपांतर करता येत नाही. किंबहुना ही जबरदस्ती त्या कळीचा अस्तित्व संपवून टाकते. कळीला उमलविण्यासाठी अत्यंत पराकोटीचे नाजूकपण जपले पाहिजे. माणसाच्या फुलण्याचा सुगंध अनुभवण्यासाठी नाजूकता,हळुवारपणा,पराकोटीची संवेदनशीलता महत्त्वाची ठरते.


हे स्वादिष्ट द्राक्ष नाही-हे कडू ,पण औषधी कारलं आहे! या लेखात लेखकाने एका लोककथेच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे वर्णन केले आहे. या लोककथेच्या आशयाशी साधर्म्य असणारा अनुभव लेखकांनी या लेखात मांडला आहे. कोल्हापूरमध्ये एका व्याख्यानानिमित्त लेखक गेले होते. लेखकाचा परिचय प्राध्यापक डॉक्टर वसंत मोरे यांनी करून दिला.ते परिचय करताना म्हणाले की , "साळुंखे सर आपल्या शेजारच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगावचे आहेत. तासगाव द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे.हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण हे काही तासगावचे स्वादिष्ट द्राक्ष नाही- हे कडू कारलं आहे. अर्थात,ते औषधी आहे. " वरील परिचयातून डॉक्टर साळुंखे यांच्या कार्याचा,व्यक्तिमत्त्वाचा अचूक वेध घेतला गेला आहे. समाजातील अनिष्टेतेवर डॉक्टर साळुंखे यांनी कडू कारल्यासारखे औषधी उपचार केले आहेत. लेखकाने कडू आणि मीठ यांच्या महात्म्याचा घेतलेला शोध अतिशय उत्कट आहे. शब्दांच्या अस्तित्व,मूळ शोधण्याची पद्धत लेखकाचा अभ्यास प्रकट करते.


जगामध्ये प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो.परंतु कधीकधी व्यक्ती स्वतःला मालक बनवू पाहतो.नाही तर कुणाचं तरी मालकत्व स्वीकारून गुलाम होतो. या दोन्ही अवस्थांबद्दलचे चित्रण लेखकाने मैं किसी का शहा नहीं, मेरा भी कोई शाहा नहीं ! या लेखात केले आहे. वरील दोन्ही प्रवृत्ती माणसाच्या खऱ्याखोऱ्या माणूसपणाला डाग लावणाऱ्या आणि म्हणूनच विघातक आहेत. दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वावर अतिक्रमण करू नये. तितकच दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अतिक्रमण सहन करू नये. असे लेखकाला वाटते. जीवनाच्या प्रवासात आपलं देण्याचा माप आणि घेण्याचे माप एकच असावं. असे लेखकाने नमूद केले आहे. जीवन हे संघर्षमय आहे. प्रत्येक व्यक्ती अनेक गोष्टी कष्टपूर्वक मिळवत असते. मिळालेल्या गोष्टी टिकवून ठेवण्याची व धारण करण्याचे काही व्यवस्थाचं असत नाही.त्यामुळे त्या गोष्टीची गरज असताना त्या आपल्याला मिळत नाहीत. 


जीवनातले उन्हाळेही पावसाळेच होतील! या लेखात लेखकाने मानवी जीवनातील विसंगती शोधण्याचा प्रयत्न केला आहे. विवेकी वागण्यामुळे माणसाला काय लाभ होतात? हे वरील लेखात लेखक सांगतो. ज्ञान,माहिती,अनुभव आणि जीवनमूल्ये ग्रहण करणं महत्त्वाचे असते.वरील सर्व गोष्टी धारण करणं हे खरं महत्त्वाचं असतं. माणसाने धारणक्षमता जाणीवपूर्वक विकसित करणं महत्त्वाचा आहे. हेच लेखकाने या लेखातून दाखवून दिले आहे.


काळजाच्याही काळजात जपून ठेवावं, इतकं हे जीवन सुंदर आहे! या लेखात लेखकाने जीवनाचे मूल्य विशद केले आहे. आपल्या जीवनाचा शोध घेत असताना स्वतःकडे काय आहे? आणि काय नाही? हे तपासले गेले पाहिजे. स्वतःच्या अपूर्णतेवर मात करणे गरजेचे ठरते. जीवनात द्वेष टाळला पाहिजे. आपण कुणाचा द्वेष केल्याने त्या व्यक्तीचे नुकसान होतेच परंतु आपण स्वतःचे मोठे नुकसान करून घेत असतो. आपल्या जीवनातला विकारांचा धूर टाळला पाहिजे. जीवनात प्रेमाची उब आणि ज्ञानाचा प्रकाश वाढवला पाहिजे. असे लेखकाला वाटते. आणि हेच अंतिम सत्य आहे. आयुष्याच्या प्रवासात जर व्यक्तीला वाटत असेल की सर्व काही मिळवलं. पण जीवन जगायचे तेवढे राहून गेलं. असा पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. असे लेखक ठामपणे सांगतो.

अरे, चांदण्यात भिजायचं राहून गेलं असतं ना! या लेखात जीवनाचे सार लेखकाने मांडले आहे. जीवन फार छोटे आहे.या छोट्या जीवनात माणसांची स्वप्ने मात्र अनंत असतात. एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक स्वप्न चिरडून टाकावी लागतात.लेखक या लेखात एका प्रवासाची आठवण सांगतात.जंगलातून निर्मनुष्य रस्त्याने लेखक मोटारीतून चालला आहे. भीतीचं मळभ मनात दाटले आहे.परंतु निसर्ग लेखकाला खुणवतो.भीतीचं, काळजीचं सगळे भास दूर होतात. लेखक निसर्गातील चांदण्यात भिजून निघतो. चांदण्यात भिजायचा अनुभव लेखकाला समृद्ध करून जातो. जीवनातील प्रत्येक क्षण अंतिम म्हणून जगला पाहिजे. त्या क्षणाचा आनंद हृदयात साठवता आला पाहिजे. असे चिंतन लेखकाने या लेखातून मांडले आहे.


डॉक्टर आ.ह.साळुंखे यांच्या ललित लेखांचे विशेष :-

वर्तमानपत्रातून केलेले ललित लेखन हे स्फुटस्वरूपाचे असते. मोठ्या संख्येने वाचकांपर्यंत पोहोचण्याचे ते एक साधन असते. सर्वसामान्य वाचकाला दिशा देणारे हे लेखन असते. डॉक्टर आ.ह.साळुंखे यांनी 'संचार' या वर्तमानपत्रातून केलेले सदर लेखनाचे वाचकांनी खूप स्वागत केले.डॉक्टर साळुंखे सरांची वैचारिक लेखांची मेजवानी सर्वसामान्य वाचकांना मंत्रमुग्ध करते.वाचकांशी संवाद साधण्याची उत्सुकता या लेखांमधून दिसते. मनापासून वाचकांना जेष्ठतेच्या नात्याने मार्गदर्शन करण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो.सरळ,साध्या सोप्या भाषेतून हे लेखन केले जाते.या लेखनाला लेखकाच्या प्रचंड वाचनाचा स्पर्श गंधित करून जातो.साहित्य, कला,तत्त्वज्ञान,भाषा,समाजजीवन आणि अनुभव यांच्या आधारे हे लेखन समृद्ध होत जाते. या लेखनाला लालित्याचा स्पर्श होतो.प्रत्येक लेखाचा विषय स्वतंत्र आहे. सर्व लेखांच्या मांडणीत एक सूत्रबद्धता दिसते. संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर एक समृद्ध ज्येष्ठ व्यक्तीला भेटल्याचा आनंद मिळतो. प्रत्येक लेखातील भाषा लालित्याने नटलेली आहे. वाक्यरचना सोपी,सुटसुटीत आहे. छोटी छोटी वाक्यरचना अर्थपूर्ण आहे.प्रत्येक लेखातून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रगटीकरण होते. व्यक्तिगत भावस्पर्शी अनुभवांची मांडणी या ललित लेखातून येते. सामाजिक वास्तवाची गुंतागुंत लेखक अगदी अलगदपणे उलगडत जातो.



समारोप :-

 चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून! हे डॉक्टर आ.ह.साळुंखे यांचे छोटे पुस्तक आहे. परंतु लेखक म्हणतो तसे,छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.माणसांना आपल्या स्वतःच्या अंतःशक्ती शक्य तितक्या फुलवण्याचा आणि इतरांना त्यांच्या तशा प्रकारच्या शक्ती फुलवण्यासाठी सहाय्य करावं,असा या पुस्तकाचा मुख्य आशय आहे. उत्कट ललित लेखनाची सर्वच गुणवैशिष्ट्ये या लेखनाला लागू पडतात. तरुणांना या पुस्तकातून उचित दिशा दिग्दर्शन प्राप्त होते.असे आपल्याला म्हणता येईल. ज्येष्ठ लेखक डॉक्टर आ.ह.साळुंखे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! 

धन्यवाद !!

 प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे,

मराठी विभाग 

श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,रावेर तालुका- रावेर ,जिल्हा-जळगाव पिनकोड - 425508

  मोबाईल नंबर- 9421081270 ई-मेल- -dhembregr@gmail.com

----------------------------------------------

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा

 इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा 



डॉ. गणपत रामदास ढेंबरे,

मराठी विभाग,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर ,ता.रावेर ,जि.जळगाव,

पिन कोड - ४२५५०८

मोबाईल नंबर -९४२१०८१२७०

ई-मेल-dhembregr@gmail.com

इ.स.१९७५ ते इ.स.२००० या कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पद्मा, इंदिरा संत या जेष्ठ

कवयित्रींपासून आजच्या उषाकिरण अत्राम या आदिवासी कवयित्रीपर्यंतच्या अनेक पिढ्यांच्या, विविध वयोगटांतल्या, विविध वर्गातून आलेल्या कवयित्रींचे काव्यलेखन प्रकाशित झालेले दिसते. या कालखंडात स्त्रियांना कुटुंबाकडून, समाजाकडून विस्तृत परिसर मिळाला. शिक्षण,वाचन भोवतीये सजग होत चाललेले सामाजिक,राजकीय वातावरण यांच्या प्रभावामुळे त्या मुक्तपणे आविष्कार करू लागल्या. आपला आविष्कार निःसंकोचपणे जगापुढे ठेवता यावा असे खुले, मोकळे सांस्कृतिक वाङ्मयीन वातावरण महाराष्ट्रातील स्त्रियांना लाभले. या काळात प्रकाशन व्यवसायही फोफावला. प्रयोगशील आणि संचारी बनला. त्यातील स्पर्धा आणि अहमहमिका वाढली. त्यामुळे काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणात प्रकाशित होऊ लागले.

या कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या कवयित्री कविता लिहित आहेत. परंतु अभ्यासाच्या सोयीसाठी इ.स. १९७५ नंतर ज्यांचे काव्यलेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे अशाच कवयित्रींचा विचार केला आहे. इंदिरा संत, शांता शेळके, अनुराधा पोतदार, शिरीष पै, निर्मला देशपांडे, पद्मा, वृंदा लिमये, संजीवनी मराठे, पद्मा लोकूर, सुहासिनी इर्लेकर,सरिता पदकी,  अंजली ठकार या कवयित्रींचे काव्यसंग्रह इ.स. १९७५ नंतर प्रकाशित झाले असले तरी ते अभ्यासासाठी विचारात घेतलेले नाहीत. इ.स. १९७५ नंतर प्रभा गणोरकर,रजनी परुळेकर,वासंती मुजुमदार, उषा मेहता,सुशीला पगारिया, सुलभा हेर्लेकर,अनुराधा पाटील, मलिका अमर शेख, नीरजा, अंजली कुलकर्णी, आसावरी काकडे, हेमा लेले,अश्विनी धोंगडे,मृणाल चिंचाळकर,ज्योती लांजेवार, अरुणा ढेरे,यशोधरा साठे,हेमा अंतरकर, सुनंदा भोसेकर,प्रज्ञा लोखंडे,संजीवनी खोजे, सुमती लांडे,श्रद्धा पराते, संजीवनी बोकील इ.कवयित्रींचे काव्यलेखन आकार घेऊ लागले. कवितेविषयीच्या जाणिवा,कवितेतून व्यक्त होणाऱ्या वृत्तिप्रवृत्ती आणि कवितेचे स्वरूप या बाबतीत पूर्वी कधीही आढळले नव्हते,एवढे वैविध्य या स्त्रियांच्या काव्यलेखनात आढळते. या काळातल्या कवयित्रींनी आपल्या आधीच्या व समकालीन  कवयित्रींचे संस्कार घेतले.त्याचबरोबर आशय आणि अभिव्यक्ती या बाबतीत आपल्या स्वतःच्या नव्या वाटा शोधण्याचाही मनःपूर्वक प्रयत्न केलेला दिसतो. इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेविषयी प्रभा गणोरकर लिहितात,"स्वातंत्र्योत्तर काळात इ.स. १९६० नंतर आणि पुढे इ.स. १९७५ नंतर भारतीय समाजजीवनात जी स्थित्यंतरे होत गेली,समाजवास्तव बदलत गेले त्यांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या काळातल्या कवितेवर होत गेलेले दिसतात आणि ते नव्या पिढीच्या कवयित्रींच्या कवितेतून दिसतात असे नाही, तर इ.स. १९६० पर्यंतच्या काळात सुप्रतिष्ठित झालेल्या इंदिरा संत किंवा शांता शेळके, शिरीष पै इ. कवयित्रींच्या कवितेतूनही जाणवतात. बदलत्या जीवनजाणिवा आणि कवितेविषयीच्या बदललेल्या कल्पना यांचे कवितेत उमटलेले मुख्य चिन्ह म्हणने पूर्वी कविता व्यक्ती आणि समाज,व्यक्ती आणि निसर्ग,व्यक्ती आणि प्रीती किंवा ईश्वर अशा सुट्या, विलग अनुभूतींमध्ये विभागली जात असे.१९६० नंतर कवितेतील अनुभूतीचे स्वरूप असे एकारलेले दिसत नाही.अनेक बहुपदरी अनुभव एकत्रितपणे व्यक्त करणारी ही कविता आहे. तिच्यातील संवेदनाविश्व नुसते व्यापकच नव्हे, तर गुंतागुंतीचेही आहे. कवितेचे हे बदललेले स्वरूप ज्येष्ठ पिढीच्या कवयित्रींनाही जाणवलेले दिसते. यंत्रयुगामुळे निर्माण झालेली भीषण वास्तवता त्यांना विशेष भेडसावत नसावी. ह्या वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या बीभत्साचेही आवाहन त्यांच्यापर्यंत पोचत नसावे, जीवनात जे सत् आहे व सुंदर आहे, त्याच्यावरील त्यांच्या श्रद्धेला अद्यापि ढळ पोहोचलेला दिसत नाही... आपल्या जीवनाबाहेरील जगताचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न त्या सहसा करत नाहीत...' असे ज्या या ज्येष्ठ कवयित्रींबद्दल रा.श्री.जोग यांनी म्हटले होते त्या कवयित्रींची १९७५ नंतरची  कविता या मर्यादा ओलांडणारी आहे, असे निश्चितच म्हणता येईल. अर्थात आपल्या पिंडधर्माशी,प्रकृतीशी, अनुभवांशी व जीवनजाणिवांशी त्यांची कविता प्रामाणिकच राहिली आहे, तरीही बदलत्या काळानुसार  बदललेल्या वास्तवाचा वेध त्यांनी आपल्या परीने घेतलेला दिसतो. हे वास्तव नेहमीच सामाजिक होते असे नाही. किंबहुना सामाजिक वास्तव एकूण कवयित्रींच्या कवितेतून थेटपणाने क्वचित अवतरले आहे. कवयित्रींच्या कवितेतील वास्तव हे त्यांच्या भावविश्वात प्रतिबिंबित झालेले,अप्रत्यक्ष वास्तव आहे. बदललेल्या सामाजिक वास्तवाविषयीच्या कधी त्या प्रतिक्रिया आहेत. पूर्वीच्या आत्मकोषातून बाहेर पडल्याची ती खूप आहे. "१


इ.स. १९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप वरील विवेचनातून आपल्या लक्षात येते.इ.स.१९७५ नंतरचे सांस्कृतिक पर्यावरण स्त्रीच्या अभिव्यक्तीसाठी पोषक ठरत गेले आणि कविता हे अभिव्यक्तीचे सहज रूप असल्यामुळे स्त्रियांच्या काव्यसंग्रहांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. इ.स.१९७५ हे 'आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष ' म्हणून घोषित झाल्यामुळे विविध गटांमध्ये तसेच विविध देशांमध्ये विखुरलेल्या स्त्रियांचे वैचारिक आदान-प्रदान सुरू झाले. त्यातून स्त्रीमुक्तीच्या तत्त्वज्ञानाचे नवे विचार,नव्या विचारांच्या संदर्भात सामाजिक वास्तवाचे नवे भान अशी जागृतता येऊ लागली.स्त्रियांच्या काव्यामधून नवी संवेदनशीलता व्यक्त होऊ लागली. स्त्रियांसाठीची नियतकालिकेही निघू लागली.इ.स. १९७५ पूर्वीही काही कवयित्रींनी नवी जाणीव अधूनमधून व्यक्त केली होती. पण एक प्रवाह म्हणून लक्ष वेधणारी कविता मुख्यतः इ.स.१९७५ आणि नंतर दिसते.


या कवितेचे स्वरूप प्रभा गणोरकर सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त करतात. त्या लिहितात, "इ.स. १९७५ नंतरच्या कवितांतही आत्माविष्काराची जाणीव अधिक प्रभावी आहे हे स्पष्ट  आहे. तथापि इ.स.१९७५ पर्यंत कवितांमध्ये क्वचितच आढळणारे सामाजिक संदर्भ तीव्र असे सद्य:स्थितीचे भान इ.स. १९७५नंतरच्या अनेक कवयित्रींनी प्रकट केलेले आहे. किंबहुना या काळातली स्त्रियांची कविता जी वैशिष्ट्ये घेऊन अवतरली आहे त्यांचा,त्यांच्याभोवतीच्या समाजस्थितीशी जवळचा संबंध आहे. या कवयित्री आणि त्यांची कविता त्यांच्या अस्तित्वविषयक प्रश्नांशी नाळेने जोडलेल्या आहेत. इ.स.१९७५ नंतरच्या कालखंडातील स्त्रियांच्या कवितेत मानवी संबंधामध्ये आलेले दुरावा, .बदल स्त्री- पुरूषांच्या नात्यांमध्ये झालेला बदल,कवीला हस्तिदंती मनोऱ्यात राहून चालत नसते याचे आलेले भान,अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या विखुरलेल्या, बुजबुजलेल्या, कोरड्या, बुजबुजलेल्या, कोरड्या,अलिप्त मानवसमूहात वावरताना येणारे असह्य एकाकीपण आणि परात्मता ,भोवतीच्या आर्थिक-सामाजिक स्तरांमधल्या मानवी जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती,स्वतःच्या माणूस म्हणून, स्त्री म्हणून असणाऱ्या जगण्याचा, अस्तित्वाचा विचार करताना पडणारे प्रश्न,वाटणारे भय, येणारे नैराश्य आणि उद्वेग, शहरे- महानगरे,खेडी यात जगणाऱ्या माणसांना आलेली अवकळा, अवतीभोवती सतत अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे मनावर उठणारे ओरखडे,दहशत,हिंस्त्रता,दंगली यांनी  ग्रासलेला रक्तपिपासू वर्तमानकाळ, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येऊन सुटू न शकलेले सामाजिक प्रश्न, अशा अनेक पदरी जाणिवांचे संदर्भ सतत येत राहतात. ते प्रकट करताना या काळातील स्त्रीची कविता शब्दांचा, प्रतिमांचा अत्यंत प्रभावी वापर करताना दिसते. " २


वरील विवेचनातून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप थोडक्यात विशद होते.सामाजिक प्रश्नांची जाण असलेली ही कविता आहे.विशेषतः स्त्रियांच्या जीवनाला केंद्रवर्ती ठेवणारी ही कविता आहे. स्वतःचा आत्मशोध घेणारी ही कविता आहे. आत्मभान आल्यामुळे स्वतःच्या जीवनाची उचित समीक्षा ही कविता करते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, अस्वस्थ मनाचे संवेदनशीलपणे प्रकटीकरण करणारी ही कविता आहे. स्वतःचा वेगळा चेहरा असलेली ही कविता स्वतःची भाषाशैली, प्रतीके, प्रतिमांची मांडणी करते. स्त्रियांच्या प्रश्नांबरोबरच स्त्रीविशिष्ट अनुभवाच्या प्रकटीकरणाला ही कविता महत्त्व देते.  आपल्या अस्तित्वाचा विशेष शोध हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपणाला इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप सांगता येईल.


इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेच्या प्रेरणा :-


समकालीन समाजवास्तव, झपाट्याने बदलणारे समाजजीवन,शिक्षणाचा होणारा प्रसार,बदलती आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि जातीय समीकरणे, समाजात असलेले स्त्रीचे स्थान, स्त्री म्हणून येणारे विविध पातळ्यांवरील अनुभव अशा अनेकविध घटकांचा विचार कवयित्रींच्या निर्मितीप्रेरणा मांडताना करावा लागतो. इ.स.१९७५ नंतर आपल्याकडे जी स्त्रीवादी विचारसरणी आढळते ती पाश्चात्य स्त्रीवादी चळवळीतून आणि स्त्रीवादी दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन आलेली असली तरी त्यामागे भारतीय स्त्रीमुक्तीचा वैचारिक स्रोत त्याला बळ देणारा ठरतो.म.फुले,पं.रमाबाई,आगरकर, महर्षी कर्वे,डॉ.आंबेडकर,म.गांधी, यांनी येथील परिस्थितीतून स्त्रियांना गुलामगिरी,शोषण,समाजातील हीन दर्जा यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.भारतीय स्त्रीच्या विकासामध्ये फार मोठा वाटा प्रथम पुरुषांनीच उचलला. पाश्चात्य स्त्रीवादामुळे प्रभावित झालेल्या भारतीय स्त्रीचळवळीचा उगम १९व्या शतकातील समाजसुधारणांमधून झालेला दिसून येतो.एकोणिसाव्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाला महत्त्व

दिले गेले. शिक्षणामुळे स्त्रीला तिच्या सामर्थ्याची जाणीव झाली.आधुनिक मराठी कवितांच्या स्त्रियांच्यासंवेदनशीलतेचा आविष्कार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रूपात झाला आहे.भिन्न प्रकृतिधर्माच्या कवयित्रींवर स्वीवादाचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होणे स्वाभाविक आहे.सर्व स्वीवादी जाणिवेचे प्रकटीकरण करणाऱ्या कवयित्रींच्या लेखनामागे काही समान प्रेरणा असलेल्या दिसतात.या समान प्रेरणा म्हणजे भारतीय समाजसुधारकांच्या चळवळी, स्त्रीमुक्तीची चळवळ,शिक्षणाचा प्रसार,म.फुले यांचे कार्य य विचारधारा, वाङ्मयीन चळवळींच्या उदयाची प्रेरणा इत्यादी प्रेरणा आपणाला ठळकपणे सांगता येतील.

 स्त्रीमुक्ती चळवळ :-

स्वातंत्र्योत्तर काळात युवकांच्या अनेक चळवळी उदयास आल्या. ह्यामध्ये दलित तरुणांच्या चळवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दलितांनी जातीअंताच्या लढ्यासाठी आक्रमक आणि विद्रोही पवित्रा घेतला. समाजातील अनेक स्तर कार्यप्रवण बनले.सन १९६०नंतर स्त्रियांची चळवळ हळूहळू संघटित होऊ लागली. सन १९७५ ते १९८५ ह्या आंतरराष्ट्रीय महिला दशकात स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांविषयी जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. ह्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळीचा पाया रोवला गेला.स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, आपल्या शरीरावर आपला अधिकार असायला हवा, नवऱ्यालाही 'नाही' म्हणण्याचा अधिकार हवा, स्त्रीला एक व्यक्ती म्हणून पुरुषाच्या बरोबरीने, समानतेने वागवले पाहिजे अशा प्रकारचे विचार स्त्रीमुक्ती चळवळीत मांडले गेले. ही चळवळ सुरूवातीला पुरुषांच्या वर्चस्वाविरूद्ध टीका करण्यात गुंतली.परंतु पुढे चळवळ या विचारातून बाहेर पडून व्यापक झाली.


उच्चवर्गीय स्त्रिया व कनिष्ठवर्गीय स्त्रिया त्या-त्या वर्गातील पुरूषांपेक्षा दुय्यम असतात. त्यांचे शोषण होत असते.त्यांच्या शोषणाचे स्वरूप वर्गीय स्थानाप्रमाणे बदलते. कनिष्ठवर्गीय स्त्रीस वर्गीय शोषण सहन करावे लागते.म्हणूनच स्त्री-मुक्ती चळवळीला वर्गसमाज नष्ट करण्यामध्ये रस आहे. त्याचबरोबर पुरुषी वर्चस्व नष्ट करण्यामध्येही रस आहे.हे पुरुषी वर्चस्व केवळ काही दुष्ट बुद्धीच्या बलात्कारी,हिंसक पुरूषांमुळे निर्माण झालेले नसून या समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व रचनेतूनच हे पुरुषी वर्चस्व आपोआप अस्तित्वात येते आणि म्हणूनच ते मानसिकतेचा, संस्काराचा भाग होऊन बसते. जातिव्यवस्था जशी जनमानसात रूजून बसलेली असते तशी पुरुषप्रधान व्यवस्था सुद्धा पुरूषांच्या व स्त्रियांच्याही मनात घट्ट बसलेली असते आणि म्हणूनच ती नैसर्गिक वाटते.वरील विचारांना छेद देण्यासाठी स्त्रीवादी चळवळीचा जन्म झाला. स्त्रियांना व्यक्ती म्हणून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जगभरात स्वीवादी चळवळ आकार घेऊ लागली. स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळावेत या मागणीसाठी काम करणारे स्त्रियांचे गट व संघटना तयार होऊ लागल्या.युरोपात प्रथम स्त्रीवादी चळवळ आकाराला आली.

भारतातील स्त्री-मुक्ती चळवळीची सुरूवात पुरूष समाजसुधारकांकडून झाली.राजा राममोहन रॉय,गोपाळराव हरी देशमुख,महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर,म.ज्योतीबा फुले,म.गांधी, धोंडो केशव कर्वे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांनी स्त्री-मुक्तीचा विचार मांडला.यातून भारतात स्त्रीमुक्ती चळवळीला प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांसाठी अनेक गोष्टी अनुकूल झाल्या.विविध कायदे हे स्त्री सुधारणांसाठी निर्माण झाले.अनेक राजकीय पक्षांनी स्त्रियांना आपल्या पक्षात सामावून घेतले. सामाजिक स्तरावर विविध आंदोलनाचे नेतृत्व स्त्रियांनी केले. यातून स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. आत्मभानातून स्त्रियांनी स्त्रीवादी चळवळीला बळकट करण्यासाठी विविध साधनांचेउपयोजन सुरू केले. या स्त्रीवादी विचारधारेतून, स्त्री-मुक्ती चळवळीतून स्त्रीवादी साहित्याने वैचारिक बळ

प्राप्त केले.स्त्रियांच्या साहित्याला एक निश्चित अशी दिशा स्त्री-मुक्ती चळवळीतून प्राप्त झाली.म्हणून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनामागे स्त्री-मुक्ती चळवळ ही एक प्रेरणा ठरते.काव्यातील आशय व अभिव्यक्तीला या चळवळीतून बळ मिळाले.आत्मशोध घेण्यास या चळवळीमुळे कवयित्रींना प्रेरणा मिळाली.एकूणच इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या साहित्यलेखनामागे स्त्री-मुक्ती चळवळीचा इतिहास, परंपरा,विचारधारा,कार्य ही एक प्रधान प्रेरणा आहे असे म्हणता येईल.


महात्मा फुले यांचे कार्य व विचारधारा:-


महात्मा ज्योतीबा फुले ह्यांनी केलेले स्त्रियांसाठीचे समाजकार्य क्रांतिकारक ठरते.महात्मा ज्योतीबा फुले ह्यांनी इ.स.१८४८ मध्ये पुण्यात मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली.स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांना घरी शिकवून शिक्षिका बनविले.महात्मा फुले ह्यांनी विधवांचे केशवपन केले जाऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणला.अनैतिक संबंधातून गरोदर असलेल्या महिलांसाठी त्यांनी प्रसुतीगृह चालवले.महात्मा फुले यांच्या कार्याविषयी बाबा आढाव म्हणतात, "स्त्री-शिक्षणाबरोबरच जोतीरावांनी स्त्री-स्वातंत्र्याचा कैवार  घेतलेला आहे. काही लोभी पुरूष आपल्यास जास्ती सुख व्हावे,अथवा आपल्या घरात दोनदोन,तीनतीन लग्नाच्या बायका करून नांदतात व त्याविषयी आपण काही हेकड पुरूषांनी केलेल्या धर्मग्रंथांचा आधारही दाखवितात,त्याचप्रमाणे जर काही स्त्रियांनी आपल्या मनःकामना तृप्त करण्याकरिता दोनदोन,तीनतीन लग्नाचे नवरे करून एक घरात नांदू लागल्यास आपणा सर्व पुरूषांस त्याविषयी काही विधिनिषेध वाटणार नाही काय ?"

'तुम्हास जर स्त्रियांचे तसे आचरण आवडणार नाही,तर आपणा सर्व पुरूषांचे त्याच मासल्याचे आचरण स्त्रियांस तरी कसे आवडेल? कारण स्त्री आणि पुरूष एकसारखे.एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र असता स्त्रियांस एकतऱ्हेचा नियम लागू करणे व लोभी,धाडशी पुरूषांस दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. उदाहरण,'स्त्रियांचे ते पुरूषांचे आणि पुरुषांचे ते हुं हुं' त्याचप्रमाणे काही धाडशी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असे आपमतलबी लेख करून ठेविले आहेत.'                                           


(सार्वजनिक सत्यधर्म-जोतीराव फुले) 'मानवाला बुद्धीचे वरदान आहे. स्त्रीपुरूषांच्या बुद्धीमध्ये कमी-जास्त काही नाही.जगातील सर्व धर्मपुस्तके पुरूषांनी लिहिलेली आहेत.त्यांनी 'गोमा' करून स्त्रियाचे नैसर्गिक मानवी हक्क काढून घेतले व स्त्रीला गुलाम बनविले.वास्तविक,स्त्री पुरूषापेक्षा श्रेष्ठ आहे.मानवी संस्कृतीत प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.अपत्यप्रेमाचे वरदान स्त्रीला निसर्गत: मिळाले आहे.ती याबाबतीत पुरूषापेक्षा श्रेष्ठ आहे.'जोतीरावांनी याच भूमिकेवर पुढे पंडिता रमाबाईचा, बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांचा गौरव केलेला आहे.ताराबाई शिंद्यांनी त्या काळात 'स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक खरमरीत भाषेत प्रसिद्ध केलेले आहे. " ३


वरील विवेचनावरून महात्मा फुले यांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार आपल्या लक्षात येतात.समकालीन काळात पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांच्या लेखनाचा पुरस्कार करणारे महात्मा फुले हे इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या साहित्याची प्रेरणा ठरतात. म्हणून १९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणांपैकी महात्मा फुले हे एक प्रधान प्रेरणा आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचारधारा :-


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या समान अधिकाराचा पुरस्कार केलेला दिसतो.हिंदू स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी 'हिंदू कोड बिल'तयार केले. परंतु ते संसदेत मांडले गेले नाही म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.मंगला वरखंडे लिहितात,"म.फुले,म.गांधी,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ.नी भारतीय संदर्भात स्त्रीमुक्तीचा जो विचार केला आहे,तसेच स्त्री मुक्तीच्या संदर्भात ज्या विविध चळवळी झाल्या आहेत,सुधारणावादाचे प्रबोधनाचे जे प्रयत्न झाले आहेत त्यातील सत्यांश घेऊन समकालीन प्रश्नांची सोडवणूक करणारी व भविष्यातील स्त्री पुरुष समरसतेचे स्वप्न साकार करणारी जीवनपद्धती सुचविणारी नवी स्त्रीवादी आचारसंहिता देणे हे भारतीय स्त्रीवादी मांडणीचे उद्दिष्ट असले पाहिजे. "४


 यातूनन आपल्याला असे दिसते की, स्त्रीवादी साहित्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आपल्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे असे मंगला वरखेडेंना वाटते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या हक्कांविषयी लिहितात,"आजच्या जगात संपत्तीच स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे.जोवर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाही,तोवर त्यांची गुलामगिरी संपणार नाही. त्यादृष्टीने हिंदू कोड बिलात मी तरतूदही केली होती,पण ते बिल मंजूर होऊ शकले नाही.यापुढे आता येणारे बिल कोणत्या स्वरूपात येते व त्यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याची,हक्कांची काय तरतूद आहे याकडे महिलावर्गाने फार बारकाईने पाहिले पाहिजे.इतकेच नव्हे, तर आपल्या हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी आपले मनोदौर्बल्य टाकून कंबर कसली पाहिजे,तरच त्यांची सुधारणा व प्रगती होईल. "५


 कोल्हापूर येथे दि.२५ डिसेंबर १९५२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणात वरील विचार मांडले होते. हिंदू कोड बिलाचे महत्त्व बाबासाहेबांनी येथे सांगितले. स्त्रियांच्या प्रती असणारी बाबासाहेबांची संवेदनशीलता व कळकळ आपल्या लक्षात येते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी सौदामिनी राव लिहितात, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जसे दलितांचे नेते,भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, तसेच ते स्त्रियांचे कैवारी होते.डॉ.बाबासाहेब स्वतः दलित असल्यामुळे दलितांप्रमाणेच समाजात हीन वागणूक देण्यात येणाऱ्या स्त्रियांबद्दल बाबासाहेबांना अपार सहानुभूती होती.कुटुंबातील स्त्रियांचे हाल कमी व्हावेत म्हणून,त्यांनी स्त्रियांना घटस्फोट,पोटगी,पुनर्विवाह, वडिलार्जित संपत्तीत वारसा,दत्तक घेणे वगैरे हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला.तर स्त्रियांना ज्ञानसाधनेचा हक्क नाकारून अज्ञानाच्या अंधःकारात खितपत ठेवणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून प्रौढ,कुमारिका,विधवा,परित्यक्ता, पतिता आणि इतर स्त्रियांना ज्ञानसाधनेचा मार्ग उपलब्ध करून देणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला."६


वरील विवेचनावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार व कार्य आपल्या लक्षात येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे इ.स.१९७५ नंतरच्या वाङ्मयीन प्रवाहांच्या निर्मितीची प्रधान प्रेरणा आहेत.स्त्रीवादाला अपेक्षित असणारा स्त्री-मुक्तीचा ध्यास बाबासाहेबांच्या विचारातून व्यक्त होतो.म्हणून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचारधारा ही एक प्रधान प्रेरणा आहे.

शिक्षणाचा प्रसार :-

 महात्मा ज्योतीबा फुले यांनी इ.स.१८४८मध्ये मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली.शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते. शिक्षणातून व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.स्त्रियांच्या शिक्षणाची गरज ओळखणारे डॉ.धोंडो केशव कर्वे आणि त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.कर्वे यांच्या कार्याविषयी विलास खोले लिहितात,"भारतवर्षीय महिला विद्यापीठ (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) हे कर्वे यांच्या स्त्रीविषयक कार्याचे चिरस्थायी स्वरूपाचे स्मारक आहे.ज्या स्त्रीशिक्षणाचा त्यांनी जन्मभर ध्यास घेतला.त्या कार्याचा सर्वोच्च आविष्कार महिला विद्यापीठाच्या रूपाने झाला.भारतातील पहिले आणि प्रदीर्घ काळ एकमेव असे स्थान असणारे हे विद्यापीठ स्थापून त्यांनी ऐतिहासिक महत्त्वाचे शैक्षणिक कार्य पार पाडले.सामाजिक जीवनात स्त्रीला पुरूषाच्या बरोबरीचे जे स्थान आज प्राप्त होऊ लागले आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात स्त्रीने पुरूषांच्या बरोबरीचे जे स्थान आज निर्विवाद प्रस्थापित केले आहे, ते स्थान तिला लाभण्याजोगी परिस्थिती उत्पन्न होण्यासाठी महर्षी कर्वे यांचे कार्य पायाभूत स्वरूपाचे ठरले आहे,हे विसरता येणार नाही. केवळ पाच विद्यार्थिनींच्या आधारे पहिले पाऊल टाकणारे विद्यापीठ आज वयाची नव्वदी पार करून प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. विधवांचे पुनर्विवाह,त्यांचे शिक्षण,एकंदर स्त्रीशिक्षण,अनाथबालिकाश्रमाची उभारणी,निष्काम-कर्म-मठाचा उपक्रम,कन्या विद्यालयाचा प्रारंभ असे स्त्रियांच्या उन्नतीचे क्रमशः पार पाडलेले एकेक कार्यक्रम हे पवित्र धर्मकार्य वा राष्ट्रकार्य आहे,अशा विचाराने कवें यांनी हाती घेतले; आणि या सर्वांवर कळस चढला तो स्वतंत्र महिला विद्यापीठाच्या रूपाने यासाठी निःस्वार्थ भावनेने आणि त्यागी व समर्पणशील वृत्तीने समाजातील विरोधी शक्तींना न जुमानता अविश्रांत कार्य करणारे अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रियांच्या सुस्थितीचे आणि प्रगतीचे जे स्वप्न पाहिले होते,ते विद्यापीठाच्या रूपाने साकार झाले. "७


वरील विवेचनातून महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची आपणाला जाणीव होते.स्त्री-शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्त्रियांना आत्मभान प्राप्त झाले.त्या अधिक सजग झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले.यातून आपण आपले अनुभव साहित्यातून मांडले पाहिजेत असा विश्वास स्त्रियांमध्ये निर्माण झाला.शिक्षणाचा प्रसार ही स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा ठरते.असे आपणाला म्हणता येईल.


इतर प्रेरणा :-

ताराबाई शिंदे यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'स्त्री-पुरुष तुलना'( सन-१८८२) हा निबंध लिहून भारतीय स्त्रीवादी विचारसरणीचा पाया रचला असे म्हणता येईल. या निबंधातून त्यांनी स्त्री-पुरुष विषमतेची चर्चा केली.ही एक इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रीवादी कवितेची प्रेरणा सांगता येईल. त्याचबरोबर इ.स. १८८२ मध्ये पंडिता रमाबाईंनी 'आर्य महिला समाज' ही पहिली स्त्रियांची संघटना स्थापन करून स्त्री- मुक्तीच्या कामाला संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले.रूढी परंपरामुळे स्त्रियांचे शोषण करणाऱ्या बालविवाह, विधवांचे केशवपन इ.जाचक रूढींविरुद्ध जनमत तयार करण्याचे काम त्यांनी केले.त्याचबरोबर 'शारदासदन ' ( इ.स.१८२१) आणि 'मुक्तीसदन ' ( इ.स.१८९६) या संस्थातून स्त्रियांना सुतारकाम, लोहारकाम,चुना मळणे,छपाई, शिवणकाम,भरतकाम, परिचारिकेचे काम शिकवून स्वावलंबनासाठी अर्थार्जनासउपयुक्त ठरणारी कौशल्ये शिकविण्यावर भर दिला.तसेच हंटर कमिशन समोर साक्ष देताना पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची गरज आग्रहाने मांडली.'आर्य महिला समाजात जे पुरुष पत्नीला घेऊन येतील त्यांनाच सभेला बसण्यास अनुमती असे.स्त्री-पुरुष समानतेचा असा नवा आदर्शच त्या रूढ करू पाहत होत्या. हे त्यांचे कार्य व विचार स्त्रीवादी साहित्याला प्रेरणादायी ठरणारे आहे असे आपणाला म्हणता येईल.

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात जे विविध वाङ्मयप्रवाह निर्माण झाले त्यामध्ये ग्रामीण साहित्य,दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य हे प्रवाह महत्त्वाचे आहेत. हे वाङ्मयप्रवाह आपल्या प्रश्नांना घेऊन व्यक्त झालेले दिसतात.हे प्रश्न 'न्याय','समता' आणि 'स्वातंत्र्यासाठी' निर्माण झालेले दिसतात.ह्या प्रवाहात साहित्याइतकेच समाजदर्शनही व्यक्त झालेले आढळते. हे प्रवाह निखळ वाड्मयीन प्रवाह नसून ते सामाजिक स्थित्यंतराचे प्रवाह आहेत,सामाजिक परिवर्तनाचा आशय ह्या प्रवाहांमध्ये व्यक्त होताना दिसतो.हे प्रवाह समकालीन आहेत.त्यांचा एकमेकांवर प्रभाव आहे.

दलित चळवळीतून दलित साहित्याला प्रेरणा मिळाली. ग्रामीण साहित्य चळवळीतून ग्रामीण साहित्याला दिशा मिळाली.तर स्त्रीमुक्ती चळवळीतून स्त्रीवादी साहित्य आकाराला आले. या सर्व चळवळी व साहित्यप्रवाह एकमेकांशी संवादी आहेत.या साहित्यप्रवाहांनी माणसाला 'माणूस' म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली.या सर्व प्रवाहांनी माणसाच्या शोषणाला विरोध केला.'न्याय','समता', आणि स्वातंत्र्यासाठी हे प्रवाह स्वागतशील आहेत.समकालीन साहित्यप्रवाहाची, साहित्य चळवळीची प्रेरणा इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रीवादी साहित्याने घेतली आहे.

अशा प्रकारे आपणाला इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेच्या प्रेरणा सांगता येतात. वरील सर्व प्रेरणा कमी-अधिक फरकाने कवयित्रींच्या लेखनासाठी कारणीभूत ठरतात. या प्रेरणांशिवाय कवयित्रींच्या काव्यलेखनामागे काही व्यक्तीगत गोष्टी,विचार,व्यक्ती ह्या प्रेरणादायी ठरत असतात.स्थूलमानाने कवयित्रींच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या प्रेरणांचा आढावा वरीलप्रमाणे घेता येतो.


संदर्भ टिपा : -


१.गणोरकर प्रभा, 'स्त्री साहित्याचा मागोवा ' खंड -२ इ.स.१९५१ते इ. स. २०००,(संपा. मंदा खांडगे आणि इतर) साहित्यप्रेमी भगिनी मंडळ,पुणे, प्रथमावृत्ती ,डिसेंबर २००२,पृ.६९


२.तत्रैव,पृ.९१,९२


३.आढाव बाबा,'महात्मा फुले गौरव ग्रंथ ',डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले आणि राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती ,मुंबई , ( संपादक - हरी नरके ) ,सुधारित तृतीयावृत्ती - २००६, पृ. ८,९


४. वरखेडे मंगला,'स्त्रीवादी समीक्षा: संकल्पना व उपयोजन ',का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्था,धुळे ,प्रथमावृत्ती,१९९९ ,पृ.४


५. आंबेडकर बाबासाहेब, ' बोल महामानवाचे ' , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे ( खंड एक ) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन , ( अनुवाद आणि संपादन डॉ. नरेंद्र जाधव) , ग्रंथाली प्रकाशन , प्रथमावृत्ती , २०१२ , पृ. ३१९


६.राव सौदामिनी ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ ',(संपा. दया पवार) ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई ,तृतीयावृत्ती ,२००६ ,पृ. ११४


७.खोले विलास ,महर्षी धोंडो केशव कर्वे , (महाराष्ट्र चरित्र - ग्रंथमाला (संच)), श्री.गंधर्व -वेद प्रकाशन,पुणे , प्रथमावृत्ती २०१०,पृ.११२



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

रविवार, ३० जुलै, २०२३

पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या पराभवाची कारण मीमांसा अर्थात : दयन "

 "पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या पराभवाची कारणमीमांसा अर्थात : दयन "

"विद्याविना मती गेली , 

मतीविना नीति गेली

 नीतीविना गति गेली ।

 गतीविना वित्त गेले ,

वित्तविना शूद्र खचले ,

 इतके अनर्थ एका अविद्येने केले" ।

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शुद्रांच्या पराभवाची कारणमीमांसा वरील काव्यपंक्तीतून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडली आहे. आज पारंपरिक शिक्षण घेतलेल्या शूद्रांच्या पराभवाची कारणमीमांसा करणे खूप गरजेचे झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यांच्यात व्यस्त प्रमाण झाल्यामुळे उच्चशिक्षित युवकांच्या वाट्याला अतिशय दयनीय परिस्थिती आली आहे.

"पारंपारिक शिक्षणामुळे मती भ्रमित झाली

 भ्रमित मतीमुळे नीतीची वाट लागली आती गतीमुळे 

होते नव्हते ते वित्त पणाला लागले ,

नोकरी विना शूद्र पुन्हा खचले 

इतके अनर्थ एका अतिविद्याने केले " ।

या ओळींची प्रचिती देणारी 'दयन' नावाची कादंबरी लोक वाङ्मय गृहने जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित केली. या कादंबरीचे लेखक युवराज मेघराज पवार हे आहेत. एम.ए.,बी.एड, एम. फिल.,पीएच.डी. , नेट-सेट या उच्च शिक्षण शिक्षणातील सर्व पदव्या प्राप्त करूनही प्राध्यापकाची नोकरी न मिळालेल्या डॉक्टर गणेश मोहन जाधव या तरुणाच्या शोकात्म अंताची ही कथा आहे.

सी.एच.बी. प्राध्यापक व्यवस्था हे आजचे वास्तव आहे. उच्च शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड म्हणजे सी.एच.बी. प्राध्यापकाची व्यवस्था होय. जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सी.एच.बी. व्यवस्था आणली. हजारो तरुणांच्या जीवनाची राख रांगोळी केलेली ही व्यवस्था दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांवर या व्यवस्थेमुळे अन्याय होतो. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. केवळ पदवीचा कागद हातात घेऊन फिरणारे हजारो तरुण आपल्या आजूबाजूला दिसतात. तर दुसरीकडे सी.एच.बी. प्राध्यापक हा शिक्का पडलेली हजारो माणसं स्वतःच सत्व हरवून बसतात. मानसिक, कौटुंबिक, आर्थिक जीवघेण्या संघर्षात हे तरुण जगत राहतात. या तरुणांच्या वाट्याला अतिशय मानहानीकारक जीवन भोग येतो. या भोगातील विविध पदर दयन कादंबरीतून मांडले जातात. या कादंबरीतील संवेदना ,सूक्ष्मता वाचकाला अस्वस्थ करणारी आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील वास्तवाचे विदारक रूप कोणत्या दिशेने जात आहे. याविषयीचे अस्वस्थ करणारे कथन दयनमधून येते.

या कादंबरीचा संपूर्ण आशय व्यक्त करण्यासाठी लेखकाने कादंबरीच्या सुरुवातीला एक कविता दिली आहे. ही कविता कादंबरीचा आशय नेमकेपणाने मुखर करणारी आहे.एका सी.एच.बी. करणाऱ्या प्राध्यापकाची जीवनकथा मांडताना लेखक लिहितो ,

" एक बायको दोन पोरं , 

पोसण्याचा पडतो घोर ,

 बाप आणेल काहीतरी 

आसुसलेली दोन पाखरं

 बाप दिसतात फोडतात हंबर 

अलवार होतो काळजाचा झुंबर "

सी.एच.बी. प्राध्यापकाचे कौटुंबिक वास्तव या रचनेतून येते. संसार नीट उभा करता येत नाही. प्राध्यापकाची झूल पांघरलेला नायक  नेहमी उघडा पडतो. ही झूल त्याची मानसिक कोंडी करते. पूर्ण वेळ नोकरी मिळत नाही . परंतु समाज प्राध्यापकाच्या झूलीसकट नायकाकडे पाहतो. त्याच्याकडून उच्च नीती मूल्यांची ,राहणीमानाची अपेक्षा करतो. खोटी प्रतिष्ठा मिरवणारा नायक कुटुंबाची दोन वेळेची भूक भागू शकत नाही. यातून पती-पत्नी मधील संघर्ष टोकाला पोहोचतो. नायकाचा काहीच दोष नसताना कुटुंबाचे विघटन होते. शौकात्मक जगणं वाट्याला आलेला नायक भ्रमिष्ट होतो. आणि येथेचं कादंबरीचा शेवट होतो.

आपल्या महापुरुषांनी शिक्षण घेण्याचा आग्रह धरला आहे.' शिका संघटित व्हा ! आणि संघर्ष करा ! ' या शिकवणीपुढे प्रश्नचिन्ह उभी करणारी ही कादंबरी आहे. लेखक लिहितो ,

"मायबाप हो... !

तुम्हीच म्हणतात, 

शिका 

शिकलो ,

 विद्वानांच्या पंगतीत बसा 

बसलो .....

 सांगा ....!

 बोला ,

 मी कुठे चुकलो ....? "

पारंपारिक शिक्षण घेतले. या शिकणातून कुठलेही कौशल्य अवगत झाले नाही. पुस्तकी विद्वान होण्याची प्रक्रिया पार पडली. कुठलाही शिक्षणाचा गंध नसणारी कौटुंबिक पार्श्वभूमी नायकाला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यातून वाट्याला आलेली जीवघेणी होरपळ दयन मधून मांडली जाते.

'कापूसवाडी ' या बंजारा समाजाच्या तांड्यातून गणेश जाधव या नायकाचा जीवन प्रवास सुरू होतो. बंजारा समाज हा एक उपेक्षित समाज आहे.गावकुसाबाहेरील दलित समाजापेक्षा डोंगरदऱ्यातील बंजारा समाजाचे प्रश्न भिन्न आहेत. अतिशय तुटपुंजा साधनांवर गुजराण करणारा हा समाज आहे. या समाजाचे मराठी साहित्यातील चित्रण अतिशय अल्प आहे. दयन या कादंबरीतून 'कापूसवाडी' या बंजारा समाजाच्या तांड्याचे अतिशय सूक्ष्म चित्रण येते. या तांड्यातील माणसांचे स्वभाव, परंपरा,संस्कृती,बोलीभाषा,पेहराव, जगण्याच्या धारणा या कादंबरीतून व्यवस्थितपणे चित्रित होतात. डोंगरदऱ्यातील तांड्यावरून उच्च शिक्षणाचा प्रवाहात येणे हीच एक मोठी बाब आहे . गणेश हा नायक उच्च शिक्षण क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करतो. परंतु त्याच्या वाट्याला अपयश येते.

 इसवी सन १९९० नंतर महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांनी स्वतःच्या राजकारणाचे बस्तान बसवण्यासाठी पारंपारिक पदव्या देणारी बी.ए. बी. कॉम.,बी.एस्सी.चे शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू केली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार झाला. कापूसवाडी सारख्या तांड्यातून पोरं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली. शासनाला आज ही महाविद्यालय,शिक्षक,विद्यार्थी यांचं ओझं वाटू लागला आहे. आर्थिकदृष्ट्या शासनाला ही व्यवस्था झेपत नाही. अशी बोंब मारली जात आहे. यातून अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद आहे. कधी खूपच दबाव आला तर 25% किंवा 40% पदभरती केली जाते. या भरती व्यवस्थेतही प्रचंड भ्रष्टाचार व वशीलेबाजी आहे. जर शासन पगार देत असेल तर ही पदे शासनाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्यास अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. परंतु शासन चालवणारे  हेच संस्थाचालक असल्यामुळे ते बोटचेपी भूमिका घेतात. गुणवत्ता,दर्जा यांचे हनन होत. एक पोटभरून व्यवस्था जन्माला येते. या व्यवस्थेचा पंचनामा दयनमधून मांडला जातो.

मुळात पारंपारिक शिक्षणाचा भाग असणाऱ्या या महाविद्यालयांची समाजाला खरंच किती गरज आहे? कौशल्यहीन,कारकूनी शिक्षण व्यवस्थेतून गणेश सारख्या अनेकांचे केवळ शोषण होत आहे. या व्यवस्थेत अमुलाग्र बदलाची गरज आहे. परंतु शासन,धोरणकर्ते,अभ्यासक या प्रश्नांकडे डोळेझाक करतात. यातून दयन पुन्हा पुन्हा घडत राहते. हे थांबलं पाहिजे. असं कुणालाचं वाटत नाही. परंतु या व्यवस्थेतून भरडल्या गेलेल्या लाखो तरुणांचा विचार कोण करणार? या आजच्या समकालीन शैक्षणिक वास्तवावर दयन अचूक बोट ठेवते. अस्वस्थ करते. झोप उडवते. या कादंबरीतून कलात्मक पद्धतीने प्रश्न मांडले जातात. ते अतिशय बोचरे संवेदनशील असे आहेत.

 महात्मा फुले 'शेतकऱ्यांचा आसूड ' या ग्रंथात लिहितात,"बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कुणाच्या जीवावर ओढावी?व्यापारधंदा करावा, तर मला लिहिता वाचतां मुळीचं येत नाही. आपला देश त्याग करून जर परदेशात जावे,तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही. " अगदी अशीचं अवस्था आजच्या तरुण शिक्षितांची झाली आहे. दयन कादंबरीतून या हातबल तरुणाचे अतिशय तरल संवेदनशील चित्र उभे राहिते. 

उच्च शिक्षण क्षेत्रात अनुदानित, विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित अशी जात व्यवस्था उभी. पूर्णवेळ फुल पगारी ,पूर्णवेळ शून्य पगारी , सी.एच.बी., विनाअनुदानित सी.एच.बी., अर्धवेळ परंतु काम पूर्ण वेळ अशी नवी वर्ग व्यवस्था,जात व्यवस्था उच्च शिक्षण संस्थांमध्ये जन्माला आली आहे. एकीकडे सहा अंकी पगार घेणारा श्रीमंत प्राध्यापक तर दुसरीकडे तासाचे 120 रुपये आठवड्याला केवळ नऊ तास घेऊन महिना 5000 रुपये कमावणारा गरीब प्राध्यापक यातील दरी प्रचंड वाढली आहे. समान काम असमान वेतन हे धोरण सगळीकडे दिसते.

प्राचार्य,श्रीमंत प्राध्यापक,अनुदानित शिक्षकेत्तर कर्मचारी ,संस्थाचालक या सी. एच. बी. प्राध्यापकांकडे अतिशय तुच्छतेने पाहतात. किंबहुना आरक्षणाचा लाभ घेऊन आलेला पेटी बुजुर्वा वर्ग ही या वर्गाकडे तुच्छतेने भावनेने पाहतो. या सगळ्यातून सी.एच.बी. वाल्या प्राध्यापकांची मानसिक घुसमट होते. विद्यार्थी शिक्षक हे अतिशय पवित्र नातं आहे. परंतु सी.एच.बी. वाल्या प्राध्यापकांकडे विद्यार्थी दुय्यमत्त्वच्या भावनेने पाहतात. एकीकडे श्रीमंत प्राध्यापक वर्गाने समाजात श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले आहे. त्यामुळे समाज प्राध्यापक वर्गाकडे चंगळवादी ,कमी काम जास्त दाम घेणारे ,फुकटे, मजा मारणारे , दारूकुट्टा वर्ग म्हणून पहात आहे. परंतु यात भरडला जातो तो सी.एच.बी. वाला प्राध्यापक वर्ग. प्राध्यापकाची झुल या सी.एच.बी. वाल्यांना समाजापासून तोडते. हा वर्ग मुक्यांचा मार खात ससेहोलपट जीवन जगत राहतो. या मानसिक कोंडमाऱ्याची  व्यथा दयनमधून सक्षमपणे चित्रित होते.

 पूर्णवेळ फुल पगारी असलेला प्राध्यापक वर्ग सी.एच.बी. प्राध्यापकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. आपल्याला व्यवस्थेचे सर्व लाभ मिळतात. एकदा आपलं पूर्ण वेळ पगारी पदावर काम झालं की, नव्या येणाऱ्या आपल्याच बांधवांवर काय वेळ आहे? याकडे सहजतेने पाहणारा स्वार्थी, अप्पलपोट्या उच्चशिक्षित प्राध्यापकांचे वर्तन चीड आणणारे आहे. किंबहुना व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे वैचारिक,नैतिक वजन असणारा हा वर्ग स्व केंद्रीत संकुचित झाला आहे. याचे चित्रण दयन कादंबरीतून येते. प्राध्यापक डॉक्टर गणेश जाधव या नायका सोबत काम करणारे फुल टाइम पगारी प्राध्यापक अतिशय बेजबाबदारपणे , असंवेदनशीलपणे वागतात. काही तुच्छतेने वागतात. काही प्राध्यापक केवळ कोरडी सहानुभूती दाखवतात. काही प्राध्यापक पोकळ बड्या बड्या वैचारिक सिद्धांताचा चोथा चघळत राहतात. यातून आजचं समकालीन उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक वर्गाचं येणारं चित्र हे अस्वस्थ करणार आहे.

 जे सी.एच.बी. वाले प्राध्यापक आहेत तेही आपल्या प्रश्नांकडे फार चिकित्सने पाहत नाहीत. केवळ वरच्यावर सोशल  मीडियात हा वर्गही गुंतून पडला आहे. व्हाट्सअप विद्यापीठातून वांझ चर्चा करणाऱ्या प्राध्यापकांचे चित्र दयांमध्ये सूक्ष्मपणे येते. या प्राध्यापकांच्या मानसिकतेचे,वैचारिकतेचे चित्रण लेखक युवराज पवार यांनी अतिशय उत्तमपणे केलेले आहे.

 बंजारा समाजाच्या बोली भाषेचे उपयोजन हे या कादंबरीचे वैशिष्ट्य ठरते. अनेक ठिकाणी संवादामध्ये बंजारा बोली येते. विशेषतः जामनेर परिसरातील तावडी बोलीतून येणारे संवाद ,शब्द म्हणी ,वाक्प्रचार कादंबरीला भाषिक दृष्ट्या समृद्ध करतात. बंजारा समाजातील कुटुंब व्यवस्था ,गावगाडा या कादंबरीतून ताकदीने येतो. तसेच या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अहिराणी बोलीभाषा काही संवादात अतिशय चपखलपणे वापरली आहे. या भाषेच्या वापरामुळे काही पात्र जिवंत झालेल्या आपल्याला दिसतात. या वेगवेगळ्या भाषेतील मिश्र वापरातून कादंबरीच्या भाषिक सौंदर्यामध्ये भर पडलेली दिसते.त्याचबरोबर कादंबरीमध्ये वर्तमानपत्रातील बातम्यांचे उपयोजन उत्तमपणे केले आहे. त्या बातम्यांची भाषा आणि त्यातून उभा राहणारे वास्तव हेही एक  वेगळे परिमाण या कादंबरीला प्राप्त करून देते.शासनाचे विविध जीआर यातून येणारी भाषा ,शब्दछल कादंबरीला भाषिकदृष्ट्या वेगळेपण प्राप्त करून देतो.

बंजारा समाजातील कुटुंब व्यवस्था , गावगाडा या कादंबरीतून ठळकपणे येतो. बंजारा समाजाच्या जातीय धारणांचे प्रभावी चित्रण कादंबरीत येते. आपला जावई गणेश याने वडार लोकांची खोली भाड्याने घेणे त्याच्या सासर्‍याला आवडत नाही. बंजारा जातीचा अभिमान असणाऱ्या सासऱ्याला गणेशचे बटाटे विकणे हा व्यावसाय कमी प्रतीचा वाटतो. कादंबरीचा नायक गणेश याला शिक्षण घेत असताना आपल्या जातीचे भान येते. ' हे लेवा,गुजरायचे पोरं पयशाले काय समजता? हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहतो. यातून समाजातील जातीय दृष्टिकोन समजतो.

विभाग प्रमुख असणारे प्राध्यापक शिंदे सर गणेश जाधव याने मुलींच्या इरेजर ,पेन्सिल ,शॉपनर ,स्टीलची स्केल स्वतःच्या लहान मुलांसाठी घेतो. तेव्हा प्राध्यापक शिंदे म्हणतात , "मुलींनो ते चोर ,गुन्हेगार जमातीतले आहेत. त्या जातीचाच वारसा ते पुढे नेत आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हा प्राध्यापक शिंदे यांचा जातीय दृष्टिकोन अस्वस्थ करणार आहे. गणेश या नायकाचे रेशन दुकानातून भंगी समाजातील स्त्री कडून धान्य स्वीकारणे. हे त्याच्या प्रगल्भपणाचे लक्षण कादंबरीतून दिसून येते. जातीपेक्षा संवेदन जपणारी,वास्तव स्वीकारणारी माणसंही या कादंबरीतून नकळतपणे चित्रित होतात.

 गणेशचा सासरा त्याच्यावर नसाब बसवतो. त्यावेळी त्याची सासू जनसीबाई  म्हणते, " जेंच्या घरचं आपल्याले चालत नि, आश्या वडर भंगीची खोयली या भाड्यानं  भाड्यानं घेल हाये. तेच्यात मह्या पोर्गीला राह्यानं पळू राहलं. मह्या पोर्गीला बाटवलं येनं.  जात पंचायतचे नसाब. हामचं काईच नि  चुकेल. सगळा गुन्हा येचा हाये. भाड्यानं खोयली घेतली नस्ती तं ,  कश्याले मार पळली अस्ती. सांगा. तुमी आता न्याव करा हामचा? "

वडार आणि बंजारा दोन्ही जाती भटच्या विमुक्त मध्ये येतात. परंतु बंजारा समाज वडार आणि भंगी समाजाला कमी लेखतो. या जातीय व्यवस्थेच्या रूपाकडेही ही कादंबरी लक्ष वेधते.  दयन या कादंबरीतील भावजीवन अतिशय ताकदीने उभे राहते. विशेषतः कादंबरीचा नायक गणेश ,त्याची पत्नी अंजू आणि त्यांची मुलं टिल्लू आणि गोलू यांची मनस्थिती ,त्यांच्या भावना अतिशय परिणामकारकपणे या कादंबरीतून चित्रित झाल्या आहेत. किंबहुना हे या कादंबरीचे यश आहे. या कादंबरीच्या यशाविषयी प्रसिद्ध समीक्षा प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे लिहितात , "कादंबरीकराचे निवेदन ,नायक गणेश जाधवचे कथन आणि त्याची बायको अंजूचे स्वगत या तिन्ही गोष्टी बेमालूनपणे एकमेकांत मिसळलेल्या आहेत. हेही या कादंबरीचे मोठे वैशिष्ट्य आहे. गणेशची मुले रडतात, रुसतात ,हट्ट करतात,आनंदी होतात किंवा कधी कधी बापाची गरीबी ओळखून समजतदारपणे वागतात तेव्हा जी भाषा वापरतात ती खास त्यांची आहे. त्या भाषेला स्थळकाळाचे संदर्भ आहेत. तसेच पराकोटीच्या आर्थिक दुरावस्थेत सापडलेल्या नायकाच्या कुटुंबाचे सामाजिक संदर्भही आहेत. प्रसंगाचे निवेदन आणि संवाद यांच्या तळाशी नायकाच्या अगतिकतेचे अस्तर सतत कायम राहते. अनुभवाची तीव्रता आणि भाषिक जाणीव यांचा प्रत्यय असा एकजिनसी होतो,हे या कादंबरीचे यश आहे. "

वरील विश्लेषणातून या कादंबरीचे स्वरूप स्पष्ट होते. कादंबरीचे विविध वैशिष्ट्य या विश्लेषणातून आपल्या लक्षात येतात. लेखकाने कुटुंबाचे भावविश्व,लहान मुलांचे भावविश्व  खूप सूक्ष्मतेने,चित्रमय पद्धतीने चित्रित केले आहे. कादंबरीचे कथानक आपल्या कुटुंबात,शेजारी जवळ कुठेतरी घडत आहे असा प्रत्यय येतो. ते सगळं संवेदनशीलपणे वाचन करणार्‍याला अस्वस्थ करते. हे या कादंबरीचे प्रधान वैशिष्ट्य सांगता येईल. कादंबरीचा शेवट अतिशय कलात्मक विद्रोही स्वरूपाचा आहे. भ्रमिष्ट झालेला नायक गणेश व्यवस्थेवर वार करण्यासाठी  कुऱ्हाड हाती घेतो. ही व्यवस्था आपण बदलू शकत नाही. या व्यवस्थेने आपला बळी घेतला. या व्यवस्थेच्या शोषणाचे सर्व स्तर लक्षात आलेला नायक गणेश अगतिकतेच्या अस्वस्थतेत भ्रमिष्ट होतो. हा या कादंबरीचा शेवट अतिशय कलात्मक स्वरूपाचा आहे. बदलत्या मूल्यवस्थेत अपयशी ठरलेला नायक सगळेच गमावून बसतो. या कादंबरीतून  वाचकाला विषण्य संवेद्य अनुभवाची प्रचीती येते. 

कादंबरीच्या या सकारात्मक बाजू असल्या तरी या कादंबरीला काही मर्यादाही आहेत.आपल्याला त्या नोंदवता येतात. या कादंबरीतील पात्र संख्या अतिशय अल्प आहे. कादंबरीत एकच एक कथानक मांडले जाते. कादंबरी वाङ्मय प्रकारात मुख्य कथानकाला जोडून विविध उपकथनके येत असतात. परंतु दयन या कादंबरीतून उपकथनकेच येत नाहीत. त्यामुळे पात्र संख्या कादंबरीत कमी राहते. नायक स्वतःच्या दुःखात इतका बुडून गेला आहे की,समकालातील विविध घटकांचे जगणे , त्यांचे प्रश्न ,समस्या यावर तो फारसा विचार करत नाही. या कादंबरीतून समकालातील व्यापक संदर्भ , जीवनस्तरसह उभा राहत नाही. कादंबरीतून संस्थाचालक आणि प्राध्यापक यांच्या संबंधाचे चित्रण नीटपणे येत नाही. त्रोटक स्वरूपात हे चित्रण येते. भ्रष्टाचार ,पैशांची देवघेवचे चित्रण येत नाही. महाविद्यालय परिसराचे वास्तव चित्रण कादंबरीतून उभे राहत नाही. सर्व कथानक गणेशच्या मनोभूमीके भोवती पिंगा घालत राहते. कादंबरीतून जातव्यवस्थची विविध रूप सकसपणे उभी राहात नाहीत. अल्प प्रमाणात जातिव्यवस्थेचे चित्रण येते. गणेशचा एम.ए. चा शिक्षणप्रवास , सेंडापच्या दिवसाचा तपशीलवार वर्णन कादंबरीच्या मुख्य कथानकाचा भाग होत नाही. उगाच ठिगळ लावल्यासारखा हा भाग वाटतो. वरील सर्व मर्यादा मान्य करूनही एका ज्वलंत प्रश्नाला ,समस्येला उजागर करणारी ही कादंबरी आहे. आजचे उच्चशिक्षण व्यवस्थेतील वास्तव फार भयानक आहे. याची प्रचिती देणारी ही कादंबरी आहे. लेखक युवराज मेघराज पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!

 धन्यवाद !!!

 डॉ.जी.आर.ढेंबरे 

मराठी विभागप्रमुख 

श्री.व्ही.एस.नाईक कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,रावेर तालुका- रावेर,जिल्हा- जळगाव पिनकोड - 425508

 मोबाईल नंबर -94210812 70 ई-मेल-dhembregr@gmail.com

----------------------------------------------

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...