सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय उच्च शिक्षणाचे दालन

 ॥ "श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय उच्च शिक्षणाचे दालन " ॥             ऑगस्ट इ.स. १९७८ मध्ये रावेर शहरामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय सुरू करण्यात आले. आज हे महाविद्यालय सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. हे महाविद्यालय रावेर परिसरातील शेतकरी,मजूर,कष्टकरी, आदिवासी,दलित समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दालन ठरत आहे. रावेर परिसरातील उच्च विचारसरणी असलेल्या, दूरदृष्टीच्या, महत्त्वाकांक्षी व्यक्तींनी या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. स्वर्गीय विठ्ठलराव शंकरराव नाईक हे त्यांच्या अग्रस्थानी होते. त्यांनी लावलेल्या लहान रूपाचा आज ज्ञानवृक्ष झाला आहे. संस्थेच्या संस्थापकांनी स्थापनेच्या वेळी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात अवतरले आहे. " एवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी " अशा प्रगतीशील दिशेने या महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे. रावेर शहरापासून बऱ्हाणपूर रोडवर एक किलोमीटर अंतरावर पंचवीस एकरच्या रम्य परिसरात महाविद्यालय आहे. महाविद्यालयात एकूण २२ प्राध्यापक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. महाविद्यालयाचे प्रशासन प्राचार्य डॉक्टर पी. व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. १२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महाविद्यालयाचे प्रशासन सुरू आहे. एक हजार विद्यार्थी संख्या असणारे रावेर तालुक्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे. पीएच् .डी. पदवीसाठी महाविद्यालयात पाच प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून मान्यता आहे. यात प्राचार्य डॉक्टर पी.व्ही.दलाल डॉक्टर ए.एन. सोनार, डॉक्टर ए.जी.पाटील डॉक्टर जी.आर. ढेंबरे , डॉक्टर बी.जी. मुख्यदल यांचा समावेश आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, मराठी, ग्रंथालय या विषयांचा समावेश यामध्ये आहे. भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र विषयाच्या प्रयोगशाळांना पीएच्.डी. पदवी संशोधनासाठी विद्यापीठाची मान्यता आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे प्रमुख ध्येय महाविद्यालयाचे आहे. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करणारा प्राध्यापकवृंद हा संशोधनप्रिय ,अभ्यासू असा आहे. ११ प्राध्यापकांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. १२ प्राध्यापक एम.फिल. पदवी प्राप्त आहेत. ७ प्राध्यापकांचे पीएच.डी. पदवीचे संशोधन प्रगतीपथावर आहे. ८ प्राध्यापक नेट ,सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. भविष्यकाळातील बदल लक्षात घेऊन महाविद्यालयाने नव-नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमातील गुणवत्ता वाढवण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. बी.एस्सी. कम्प्युटर सायन्स हा विभाग नव्याने महाविद्यालयात सुरू केलेला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत बी.ए., बी.कॉम., बी.एससी. या पदवी अभ्यासक्रमाचे अध्यापन केले जाते. इंग्रजी,भूगोल,अर्थशास्त्र या विषयांचे विशेष स्तरावर अध्यापन केले जाते. विज्ञान विभागांतर्गत रसायनशास्त्र, गणित,भौतिकशास्त्र,संगणकशास्त्र या विषयांचे विशेष स्तरावर अध्यापन केले जाते. वाणिज्य विद्याशाखेचे अध्यापनही या महाविद्यालयात केले जाते. स्वयम निर्वाह तत्वावर महाविद्यालयात नव्याने आठ कोर्स सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी हे कोर्स उपयुक्त आहेत. विद्यापीठाच्या अध्यादेश 181 अंतर्गत हे कोर्स सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयाने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, ,शैक्षणिक ,क्रीडा उपक्रमांमध्ये प्राचार्य डॉक्टर पी.व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त केले आहे. प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने विद्यापीठस्तरीय ,राज्यस्तरीय ,राष्ट्रीय कार्यशाळा व चर्चासत्रांचे,स्पर्धांचे आयोजन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी मंजूर केलेले विविध संशोधन प्रकल्प महाविद्यालयाने पूर्ण केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग व संस्थेच्या आर्थिक योगदानातून महिला वसतिगृहाची इमारत तसेच प्रशस्त प्रशासकीय सभागृह उभारण्यात आले आहे. नुकतेच महाविद्यालयाच्या संपुर्ण इमारतीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. ग्रंथालयाची व्यवस्था स्वतंत्र कक्षात केलेली आहे. संपूर्ण महाविद्यालयाच्या इमारतीचे, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. विद्यार्थिनींसाठी अद्यावत प्रसाधनगृह व स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था महाविद्यालयात करण्यात आली आहे.                महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शेकडो विद्यार्थी अखिल भारतीय पातळीवर विद्यापीठातर्फे विविध खेळांसाठी सहभागी झाले आहेत. कु.गोविंदा महाजन या विद्यार्थ्यांने मागील वर्षी अखिल भारतीय भारतोलन - शक्तीतोलन स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.भारत सरकारच्या वतीने आयोजित  केलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठस्तरीय,राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरा वरील विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभाग घेत आहेत. यश मिळवत आहेत. या विद्यार्थ्यांना प्राध्यापक उमेश पाटील मार्गदर्शन करत आहेत. संगणकीकृत ग्रंथालय अतिशय समृद्ध आहे. ग्रंथालयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० नियतकालिके उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षा संदर्भातील विविध पुस्तके ग्रंथालयात आहेत. महाविद्यालयात ०४ स्मार्ट क्लासरूम उपलब्ध आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा व इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. इंटरनेटसाठी १२ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध केलेले आहेत. विज्ञान विद्याशाखेच्या वेगवेगळ्या विषयांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. यात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र ,प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र ,भूगोल या विषयांच्या विविध साधनांसह अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. अद्यावत जिमखाना महाविद्यालयात आहे. व्यायामाची आधुनिक साधने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग उत्तम प्रकारे चालवला जातो. युवती सभा या एकका मार्फत विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात. महाविद्यालयात वाङ्मय मंडळ ,विज्ञान मंडळ ,वाद-विवाद मंडळ ,कला मंडळ ,वैद्यकीय तपासणी समिती यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयात विविध शिबिरांचे,कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा शिका योजना महाविद्यालयात राबवण्यात येते. शिक्षक पालक विद्यार्थी या घटकांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालयांमध्ये पालक शिक्षक संघ अस्तित्वात आहे. यातून पालक व विद्यार्थ्यांना मोकळेपणाने आपल्या समस्या मांडता येतात.यासाठी हा संघ कार्यरत आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे नोंदणी करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. माजी विद्यार्थी संघटना सक्रिय असून महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी संघटने मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. नाईक महाविद्यालय रावेर आणि सेवासदन महाविद्यालय बऱ्हाणपूर यांच्यात शैक्षणिक विकासासाठी सहकार्य करार करण्यात आला आहे. दोन राज्यातील संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. या दोन महाविद्यालयांनी एकत्र येऊन एक राष्ट्रीय चर्चासत्र घेतले. दोन महाविद्यालयांच्या सहकार्यातून विविध विषयांवरील प्रकल्प ,कार्यशाळा, चर्चासत्र ,साहित्यिक ,सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे नियोजित आहे. या करारासाठी प्राचार्य डॉक्टर दलाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उपक्रमांमुळे दोन राज्यातील विद्यार्थी, प्राध्यापक भिन्नभिन्न संस्कृती, शिक्षण पद्धती यांची ओळख करून घेत आहेत. महाविद्यालयाची गुणवत्ता व दर्जा अबाधित ठेवण्यासाठी,नैतिकमूल्यांच्या संवर्धनासाठी महाविद्यालयातील अंतर्गत व बहि:स्थ उपक्रमांना प्रेरणा व स्फूर्ती व विधायक मार्गदर्शन रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा.हेमंतभाऊ नाईक व सर्व संचालक मंडळ यांच्याकडून मिळत असते.या सर्व लहान थोरांच्या कष्टातून, परिश्रमातून श्री.एस.नाईक महाविद्यालय उच्च शिक्षण क्षेत्रातील ज्ञान वृक्षाप्रमाणे ठाम उभे आहे.                            प्रा.डॉक्टर गणपतराव ढेंबरे                                                    मराठी विभाग                                                                         श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर,                                    मोबाईल क्रमांक : - ९४२१०८१२७०                                            ई-मेल : -dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...