रविवार, १० मे, २०२०

उभं आडवं आकलन आणि मूल्यमापन

"उभं आडवं आकलन आणि मूल्यमापन "

  डॉ. गणपतराव ढेंबरे
                                      ॥१॥

 प्रास्ताविक : -

उभं आडवं हे राहुल कोसम्बी यांचे वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. शब्द प्रकाशनाने जून २०१६ मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आत्तापर्यंत तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यातून या पुस्तकाबद्दल जाणकारांच्या मनात असलेली उत्सुकता दिसून येते. उभं आडवं हे राहुल कोसम्बी यांचे वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. लेखकाने काहीएक निमित्ताने केलेलं हे लेखन आहे. या पुस्तकातील लेखन हे ठराविक साचेबंदपणातून मुक्त आहे. समाजशास्त्र,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र,राजकारण, संस्कृती, साहित्य, समकालीन प्रश्न, चळवळीचा उदय व अस्त यासारख्या विविध विषयांच्या बहुविध पैलूंची उकल करणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक राहुल कोसंबी यांचे प्रगाड चिंतन यातून अभिव्यक्त होते. लेखकाचा वाचनाचा व्यासंग अतिशय दांडगा आहे.संशोधनपर ग्रंथ, प्राचीन संदर्भ ग्रंथ,इंग्रजी संदर्भ ग्रंथांच्या वाचनातून प्रस्तुत ग्रंथातील लेख समृद्ध आहेत. समकालीन समाजातील विविध प्रश्‍नाला थेट भिडण्याची सहज लेखनशैली  प्रस्तुत पुस्तकातून आकाराला येते. कुठलाही अभिनिवेश न ठेवता समस्यांच्या, प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेणारी तटस्थ वस्तुनिष्ठता या लेखनात अनुभवाला येते. पुस्तकाचं शीर्षक काहीसं विचित्र असले तरी लेखकाने समाजातील समस्यांचा उभा अक्ष व त्याचा विस्तारणारा आडवा अक्ष यांच्यातील विस्तृत व्यापक आशयक्षेत्र वाचकांसाठी खुले केले आहे. भोवती घडणाऱ्या घटितांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक,सामाजिक विश्लेषण या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. समकालीन समाजातील विविध समस्या हा लेखकाच्या आस्थेचा विषय आहे. या समस्यांची चिकित्सक मांडणी या लेखनातून येते. शोषितांच्या अवस्थांतराचा ऐतिहासिक, संशोधनात्मक शोध राहुल कोसंबी घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कार्ल मार्क्स यांच्या सैद्धांतिक मांडणीचे अत्यंत सकसपणे केलेले आकलन प्रस्तुत ग्रंथाच्या पाना पानावर जाणवते. समकालीन शोषींतांची अवस्था आणि त्यामागील कारणमीमांसा यांचा सैद्धांतिक व्यूह या पुस्तकातून उभा राहतो. समकालीन वास्तवाचे तीव्र संवेदनशील आकलन या आकलनातील गांभीर्य आणि त्याची सैद्धांतिक व्यूहांशी केलेली जोडणी वाचकाला नवे ऐतिहासिक वास्तवाचे भान देते.समाजशास्त्रीय रुक्षतेतपेक्षा राहुल कोसंबी आपल्या वेगवेगळ्या लेखातून जिवंत संवेदनशील मांडणीचा निखालस आनंद देतात. वैचारिक लेखनाकडे वाचक लवकर आकर्षित होत नाही. परंतु राहुल कोसंबी यांचे लेखन याला अपवाद ठरते. निखळ वैचारिक आनंद देणारे शुद्ध लेखन असे उभं आडवंच्या लेखनाचे स्वरूप आहे.
                                    ॥२ ॥
उभं आडवं या ग्रंथातील लेखांचे स्वरूप आणि विशेष : -

'उभं आडवं 'या पुस्तकात एकूण बावीस लेख आहेत. वेगवेगळ्या विषयांवर, प्रश्नांवर, समस्यांवर हे लेख आहेत. राहुल कोसंबी यांनी वेगवेगळ्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे. या लेखांमध्ये कालानुक्रम आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे लेखकाची वैचारिक दैनंदिनी होय. या दैनंदिनीच्या प्रत्येक पानावर एखाद्या विषयाची ऐतिहासिकता ,समकालीनता त्यांच्यातील गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत आनंद तेलतुंबडे यांचा एक विचार मांडलेला आहे. "विचारमंथन करत राहणे हे आपले कर्तव्य आहे, हा विचारवंताचा संघर्ष आहे असे मी मानतो आणि संघर्ष मग तो कोणाचाही, कशासाठीही असो कधी वाया जात नसतो अशी माझी श्रद्धा आहे. " या विचारांशी स्वतःला जोडून घेत वैचारिक संघर्षाचा प्रत्यय या पुस्तकातून येतो. समकालीन विचारमंथनाला दिशा देणारे असे हे पुस्तक आहे.
                              ॥३॥
या पुस्तकातील पहिला लेख 'देशीवाद नेमाडे आणि जातिव्यवस्था 'हा आहे. या लेखात भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवाद सिद्धांताच्या मर्यादा राहुल कोसंबी यांनी सांगितल्या आहेत. या लेखात देशीवाद या साहित्य सिद्धांताचे स्वरूप, व्याप्ती, मर्यादा स्पष्ट केली आहे. देशीवादाने साहित्यनिर्मितीच्या पातळीवर जरी स्वतःला सिद्ध केले असले तरी सिद्धांताच्या पातळीवर पूर्ण स्पष्टीकरण करण्यास देशीवाला अपयश आल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतो.देशीवाद सिद्धांताच्या पातळीवर जातीसमर्थक ठरतो तर साहित्यिक आविष्कारण्याच्या पातळीवर जाती समर्थक ठरत नाही. असे मत लेखक मांडतो. देशीवादावर अभ्यासकांनी घेतलेले आक्षेप आणि त्यातील सत्यता राहुल कोसंबी वस्तुनिष्ठपणे मांडतात. देशीवादाचे समर्थक व विरोधकांच्या विचार दृष्टिकोनाचा सम्यक लेखाजोखा पहिल्या लेखात लेखकाने मांडला आहे.या पुस्तकातील दुसरा लेख हा 'भ्रामक विजयोन्माद आणि अपूर्ण क्रांती ' असा आहे. मे २००६ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने बहुमत मिळून सत्ता संपादन केले. या विजयातून दलित समाजात सुरू झालेल्या चर्चा, विचारातील भावनिकता, अस्मिता यातील फोलपणा स्पष्ट करणारा हा लेख आहे.या विजयाला लेखकाने भ्रामक म्हटले आहे. संपूर्ण परिपक्व क्रांती अजून अपूर्ण असल्याचे ठाम मत लेखक प्रस्तुत लेखात नोंदवतो. मायावतींनी निवडणूक जिंकली याला काही विचारवंतांनी सामाजिक क्रांती म्हटले परंतु ही सामाजिक क्रांती नसून स्वार्थी, नीतीशून्य, राजकीय तडजोड आहे असा अनुमान लेखक नोंदवतो. सामाजिक क्रांती हा एक अमुलाग्र आणि अपरिवर्तनीय बदल असतो. मायावतींचा निवडणूक विजय हा केवळ तात्कालिक नीतीशून्य, भावनिक, अस्मितावादी बदल आहे. असे लेखकाला वाटते. लेखक मायावतींच्या राजकारणाची भावनिक न होता तटस्थ वस्तुनिष्ठ मांडणी करतो.या पुस्तकातील तिसरा लेख
'नामदेव ढसाळ आणि राजा ढाले ' हा आहे. दलित पँथरच्या शीर्ष नेतृत्वाने दलित चळवळीला कोणते योगदान दिले याची वस्तुनिष्ठ सत्यता तपासणारा हा लेख आहे. दलित पँथरचा उदय आणि अस्त यातील पँथरचे वेगळेपण त्याच्या सकारात्मक बाजू लेखकाने प्रस्तुत लेखातून मांडल्या आहेत. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित चळवळीला काय दिले याचा वस्तुनिष्ठ इतिहास लेखकाने मांडला आहे. लेखक दलित चळवळी बद्दल लिहितो, ''दलित चळवळीलाही इतक्या वर्षांनंतर  स्वतःला मिळालेला तत्त्वज्ञानात्मक धूसरतेचा शाप मिटवता आलेला नाही. विशुद्ध आंबेडकरवादीच का असेना पण दलितांच्या मुक्तीबाबतीत दलितांच्या अवस्थेचे निश्चित आकलन, त्यासाठीचा दृष्टिकोण आणि कृतीकार्यक्रमा बाबत अजूनही संभ्रमता आहे. " असे ठोस निर्णयन दलित चळवळीबाबत लेखक नोंदवतो. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या बद्दल लेखक निर्णयकीपणे लिहितो की, " ढाले आणि ढसाळांनी तत्त्वज्ञान आणि त्यागाच्या बाबतीत जेवढी हेळसांड आणि निरर्थकता प्रसवली तेवढी त्याआधी आणि त्यानंतर कुणीही केलेली नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाच्या सम्मीलनाला काळानेच दिलेल्या मूक होकारालाही त्यांना दुर्लक्षित केले आणि आता तीस चाळीस वर्षानंतर तर या दोन नेत्यांच्या लहरी प्रवाहातूनच दिशाहीनतेच्या अनेक वाटा पसरल्या " या विचारातून राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या दलित चळवळीतील  दिशाशून्यतेचे योगदान लेखक दाखवून देत
                               ॥४॥
चौथा लेख"सर्वव्यापी जनचळवळीच्या शोधात " हा आहे.
 या लेखात २०११ वर्ष संपल्यानंतर २०१२ मध्ये नव्या वर्षात प्रवेश करताना लेखकाच्या मनातील,भविष्यातील सर्वव्यापी जनचळवळ जन्माला यावी असा आशावाद व्यक्त करणारा हा लेख आहे. समकाळातील सर्वसामान्य माणसाचे हित पाहणाऱ्या नव्या सर्वव्यापी चळवळीचा उदय कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावे असे लेखकाला वाटते. लेखक याबद्दल लिहितो ''पण हे सर्व करताना ऊठसूट कॅन्डलमार्च - टोपीमार्च काढणाऱ्या जनतेनेही या साक्षात्कारी जनक्षोभाला आपल्या नवमध्यमवर्गीय जात- वर्ग - लिंग जाणीवेच्या पलीकडे नेऊन एका सर्वव्यापी जनचळवळमध्ये रुपांतरीत केले पाहिजे. "असा ठाम आशावाद लेखक या लेखातून व्यक्त करतो.पाचवा लेख 'ब्राह्मणीकरण आभास आणि वास्तव ' हा आहे. विख्यात समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवासन यांनी ब्राह्मणीकरण ही संकल्पना पहिल्यांदा वापरली. मोतीराम कटारे यांनी मुक्त शब्द नियतकालिकाच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप नोंदवले. सर्व प्रकारचे भेद करणे हे ब्राह्मणीकरण्याचे पहिले लक्षण कटारे नोंदवतात. राहुल कोसंबी यांनी ब्राह्मणीकरण या संकल्पनेची व्याप्ती इतिहास आणि वास्तव त्यांचे विविधांगी कंगोरे प्रस्तुत लेखात मांडले आहेत. मोतीराम कटारे यांनी ब्राह्मणीकरण्याची प्रक्रिया व त्याचे साहित्यातील अधिक्षेप यांची मांडणी केली आहे. या मांडणीचा वस्तुनिष्ठपणे राहुल कोसंबी शोध घेतात. मोतीराम कटारे यांच्या मांडणीतील एकांगीपणा राहुल कोसंबी उघडा करतात.या पुस्तकातील सहावा लेख'एफडीआय :काही निरीक्षणे काही शक्यता ' हा आहे. एफडीआय ही अर्थशास्त्रीय घटना आहे. एफडीआयच्या भारतातील आगमनामुळे दलित शोषितांच्या जगण्यावर, अस्तित्वावर काय परिणाम होईल याचा शोध म्हणजे प्रस्तुत लेख होय. परदेशी गुंतवणुकीचा भारतातील शिरकाव व त्यामागील अर्थकारण लेखक या लेखात स्पष्ट करतो. भविष्यात परदेशी गुंतवणुकीचे कोणकोणते परिणाम होतील ते लेखक सूक्ष्मपणे मांडत जातो. भारतातील भविष्यातील एफडीआयमुळे कुणाच्या वाट्याला काय येईल याचा अंदाज लेखक मांडतो. शहरी ग्राहक व हतबल शेतकरी यांच्या वाट्याला केवळ फसवणूक येणार आहे. दोघांचे प्रचंड शोषण केले जाणार आहे.याचे दिशादिग्दर्शन प्रस्तुत लेखातून लेखकाने केले आहे.सातवा लेख 'डॉ. विलास सारंग यांचे जाति -आकलन वास्तव आणि विपर्यास ' हा आहे .या लेखामध्ये डॉ. विलास सारंग यांच्या 'मॅनहोलमधला माणूस ' या पुस्तकातील विचारांचा एकांगीपणा, जातीय मानसिकता यातील वास्तव राहुल कोसंबी स्पष्ट करतात. लेखकाने डॉ.विलास सारंग यांच्या जाती वास्तवाच्या आकलनाची अपरिपक्वता, अपूर्णता केवळ तर्काने नव्हे तर परिपूर्ण सिद्धांत मांडणीतून स्पष्ट केली आहे. राहुल कोसंबी जात वास्तवाचे स्वरूप स्पष्ट करताना लिहितात, '' हे जातिवास्तव  वेगवेगळ्या गटांवर वेगवेगळा परिणाम परिणाम साधते. अल्पजन गटाला ते मर्यादित करते तर वंचित गटाला ते असंस्कृत बनवते. या दोन्ही अवस्थांची कारणे आपल्याला त्यांच्या सामाजिक - राजकीय -आर्थिक आणि सांस्कृतिक अभावग्रस्ततेत पाहायला हवीत " असे ठाम विचारमंथन लेखक या लेखातून मांडतो.
                               ॥५॥
आठवा लेख'आरक्षण, जातिव्यवस्था आणि जागतिकीकरण ' हा आहे. आरक्षण देण्यामागची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्यापक सैद्धांतिक मांडणी सुरुवातीला स्पष्ट करून आजच्या काळातील आरक्षणाचे वास्तव अत्यंत टोकदारपणे राहुल कोसंबी यांनी मांडले आहे. प्रस्तुत लेखातील निरीक्षणे अत्यंत ठाम व सूक्ष्म आहेत. जागतिकीकरणामुळे जातीव्यवस्थेचे रूप बदलले. जागतिकीकरणामुळे आरक्षण व्यवस्थेचा अवकाश संकुचित झाला. जागतिकीकरणामुळे खाजगीकरणाचा विस्तार झाला. जागतिकीकरणामध्ये आरक्षणला कुठले स्थान उरले नाही. १९९० नंतर आरक्षणाचे राजकारण भारतीय पातळीवर परमोच्च स्थानाला पोहोचले. यातील जटीलता, त्यातील समाजजीवनावरील परिणामकारकता यांचा यथार्थ शोध लेखकाने प्रस्तुत लेखात घेतला आहे. राहुल कोसंबी लिहितात, " दलितविरोधी योजनांमुळे आकसत चाललेला विकासाचा पर्याय आणि मध्यमजातीयांचे विखारी राजकारण यांचा पुरेपूर अनुभव घेऊनही शहरी मध्यमवर्गीय दलितांचा आर्थिक अजेंडा अजूनही आरक्षणापलीकडे जात नाही आणि त्यातही त्यांची वृत्ती मागे राहिलेल्या आपल्या सर्वात गरजू बांधवांकडे जात नाही.याउलट इतर मध्यम जातियांबरोबर तेही बाबासाहेबांच्या आरक्षणापाठीमागच्या मूलभूत तर्काला हरताळ फासण्यास मागेपुढे पहात नाहीत.आकडेवारीवरून हे सिद्धच होते की, दलितांच्या आरक्षणाचा फायदा दलितांमधल्या ठराविक जातीतल्या ठराविक लोकांनाच झाला आणि याचा परिणाम म्हणून या जातीत नवा 'पेटी बुजर्वा ' वर्ग जन्माला आला. ज्याने नंतरच्या दलित चळवळीचे नेतृत्व करून तिला क्रांतिकार्यपासून ढवळून तिच्यातला जातिनिर्मूलनाचा कार्यक्रम बदलवून चळवळीला जाती वापरण्यापर्यंत कलुषित केले. वरील राहूल कोसंबी यांचे मत आरक्षणाच्या समकालीन वास्तवाला अधिक ठळकपणे मांडणारे आहे.नववा लेख'डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ ' हा आहे.दिनांक २४ मार्च २०१३ च्या आणि २५ मार्च २०१३ च्या लोकसत्ता वृत्तपत्रातील डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्याविषयी बदनामी करणारे वृत्त लेखन केले गेले. लोकसत्तातील विचारातील कलुषितपणा स्पष्ट करण्यासाठी राहुल कोसंबी यांनी डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ हा लेख लिहिला आहे. डॉ.आनंद तेलतुंबडे हे दलित आणि डाव्या चळवळीतले एक सुप्रसिद्ध नाव आहे. लेखक लिहितो, " डॉ.आनंद तेलतुंबडे दलितांचे सर्वोच्च आदराचे स्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उगीचच टीका करताना आणि दलितांना मार्क्सवादी खुंटीला बांधण्याचा आग्रह करताना दाखवायचे, त्याच्या पुष्टीकरणासाठी तद्दन अनैतिक मार्ग अवलंबण्याचे त्यांच्या या तथाकथित टीकेने कुठल्या तरी सुशिक्षितांचे कल्पित वर्तुळ नाराज झाल्याची बतावणी मारायची आणि हे कमी म्हणून की काय याला माओवादी वलय द्यायचे यातून चंद्रपूरच्या या खास प्रतिनिधीला नेमकं काय साधायचे आहे? " असा प्रश्न लेखक वाचकांसमोर ठेवतो. यातून जातीयवादी मीडिया कसे? काम करतो ,यातील कार्यकारणभाव लेखक स्पष्ट करतो. दहवा लेख -'संस्कृती,साहित्य आणि सामाजिक बदल 'हा आहे. संस्कृती ,साहित्य आणि सामाजिक बदल यांच्यातील अनुबन्ध स्पष्ट करणारा हा लेख आहे. आपण जे काही विचार मांडतो त्या पाठीमागील वैचारिक मनोभूमिका स्पष्ट करताना लेखक म्हणतो, ''आधुनिक सामाजिकशास्त्रे आणि मी जो एक दृष्टिकोन मार्क्सवाद- आंबेडकरवाद सर्वात परिष्कृत मानून ऐतिहासिक आणि समकालीन सामाजिक प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी वापरतो आहे त्यांचा विकासचा इतिहास पाहता त्यांनी शे- दीडोश वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा वेगवेगळ्या देशातील विविध विचारवंतांनी आपापल्या भोवतालची परिस्थिती समजून घेण्याच्या प्रयत्नात अतिशय समृद्ध केलेली आहे."वरील  विश्लेषणमुळे लेखकाचा संस्कृती, साहित्य यांना तपासून घेण्याचा दृष्टीकोन आपल्या लक्षात येतो. सामाजिक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात कसे उमटते? याचा शोध सखोलपणे घेता येतो. शेवटी सामाजिक बदल आणि साहित्य संस्कृतीचे अंग ठरतात. संस्कृती संकल्पनेचा ऐतिहासिक मागोवा लेखकाने घेतला आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी संस्कृतीची संकल्पना कोणत्या बाजूने मांडली आहे याचा शोध या लेखात लेखकाने घेतला आहे .                                                       ॥६॥

आकरावा लेख -'दलित स्त्रियांवरील 'अदृश्य अत्याचार ' हा आहे. भारतभर दलित स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांच्या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण प्रस्तुत लेखात येते. भारतात दर दिवशी दलितांवर होणारे जातीय अत्याचाराचे आकडे अस्वस्थ करणारे आहेत. लेखक लिहितो, " शिक्षण आणि दलित चळवळीतून मिळालेल्या नव्या भानातून ज्यांनी-ज्यांनी सनातनी अन्याय आणि शोषणाला नकार दिला त्यांना जातीय अत्याचाराला सामोरे जावे लागले "असे निरीक्षण लेखक नोंदवतो. हे निरीक्षण अंतर्मुख होऊन सर्वांना विचार करायला लावणारी आहे. बारावा लेख 'उच्चतर भांडवलशाही आणि भाषा 'हा आहे . उच्चतर भांडवलशाहीमध्ये भाषेचे स्थान बदलत जाते.उच्चतर भांडवलशाहीमध्ये भाषा ही एक क्रयवस्तू ठरते.भाषेच्या सर्वव्यापी भांडवली क्रयवस्तूकरण आणि उत्तर आधुनिक ,उत्तर - संरचनावादी आणि खास करून विरचनावादी सिद्धांतामुळे निर्माण झालेल्या अर्थहीन आणि दिशाहीन पोकळीतून भाषेच्या मूलतत्त्ववादीकरणाची प्रक्रिया वेग घेते  असे निरीक्षण लेखक नोंदवतो. जगात अनेक भाषा मृत्यू पावत आहेत. भाषांमधील ज्ञानसंचय नष्ट होत आहे. याला भांडवली व्यवस्था कशी जबाबदार आहे याचे विश्लेषण प्रस्तुत लेखात येते.  तेरावा लेख -'नामदेव ढसाळ् आणि दलित चळवळ ' हा आहे. नामदेव ढसाळ यांचे दिनांक १५ जानेवारी २०१४ ला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लेखकाने प्रस्तुत लेख लिहिला आहे. दलित पॅंथरची स्थापना ते शिवसेना प्रवेश या संपूर्ण प्रवासाचा, कारकीर्दीचा लेखाजोगा लेखकाने प्रस्तुत लेखात मांडला आहे. भावनिकता टाळून नामदेव ढसाळ यांचे दलित चळवळीतील योगदान लेखकाने स्पष्ट केले आहे  .चौदावा लेख -'कॉम्रेड शरद पाटील : अनन्यता आणि अंतर्विरोध 'हा आहे. या लेखात कॉम्रेड शरद पाटील यांच्या संशोधन कार्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.कॉम्रेड शरद पाटील यांच्या 'मार्क्सवाद- फुले -आंबेडकरवाद ' या सम्मीलित तत्त्वज्ञानाच्या मांडणीतील मर्यादा आणि विशेष स्पष्ट करणारा हा लेख आहे. पंधरावा लेख' दलित अत्याचार : भारतातील दुर्लक्षित बीभत्सता 'हा आहे. दलित अत्याचारामागे कोणती उच्चवर्णीय मानसिकता कार्य करते याचा शोध घेणारा हा लेख आहे. दलित अत्याचारमागील घटनांच्या तळाशी जाऊन लेखक विश्लेषण करतो. दलित अत्याचारमागील राजकीय, अर्थशास्त्रीय संदर्भ लेखक या लेखात मांडतो. भारतभरातील ऑनर किलिंग प्रकरणात दलितांचा बळी घेतला जातो. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील दलित अत्याचारांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण राहुल कोसंबी यांनी या लेखात मांडले आहे.

                            ॥७॥  

 सोळावा लेख -'लोकसभेची निवडणूक आणि राजाची निवड ' हा आहे. इसवी सन २०१४ मध्ये मोदी सरकार सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने निवडले गेले. मोदींची निवड आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय भांडवलदार वर्गाच्या पाठिंब्याने झाली. जादुई इमेज मेकिंग निर्माण करून मोदींनी अभूतपूर्व यश मिळवले. सर्वात कमी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण बहुमत प्राप्त सरकार म्हणजे मोदी सरकार होय.असे निरीक्षण लेखकाने प्रस्तुत लेखात नोंदवले आहे. सतरावा लेख -'कसोटीचा काळ 'या शीर्षकाचा आहे. मोदींच्या सत्तास्थापनेतून सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला कोण कोणत्या गोष्टी येतील ,याबद्दलचा भविष्यातील अंदाज लेखक आपल्यासमोर मांडतो. अनेक स्वायत्त संस्थांवर आर.एस.एसच्या लोकांचा पगडा बसला आहे. धर्मांध राजकारणाच्या स्वतःच्या गतिकीनुसार धार्मिक दंगलींना आणि अल्पसंख्याक आणि जातीय अत्याचार यांमध्ये प्रचंड वाढ होईल असे भाकीत लेखक मांडतो. आठरावा लेख - 'मोतीराम कटारे यांच्या लेखावरील प्रतिक्रिया ' या शीर्षकाचा आहे. मोतीराम कटारे यांनी 'स्वप्नाळू क्रांतीचा बौद्धिक दहशतवादी  शिलेदार 'असा डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्यावर लेख लिहिला. याचा प्रतिवाद करणारा लेख राहुल कोसंबी यांनी मुक्त शब्द मध्ये लिहिला. विचारवंतामध्ये विचारांचे मंथन, संघर्ष कसा असू शकतो याचा प्रत्यय देणारा हा लेख आहे. अत्यंत मुद्देसूदपणे मोतीराम कटारे यांचे विचार लेखकाने साधार खोडून काढले आहेत. मोतीराम कटारे यांनी डॉ. आनंद तेलतुंबडे याची अत्यंत कमीत कमी पुस्तके वाचली आहेत.समग्र डॉ.आनंद तेलतुंबडे यांचे लेखन मोतीराम कटारे यांनी वाचले असते तर त्यांच्या एकांगी मांडणीत समतोल साधला गेला असता.असे निरीक्षण लेखक राहुल कोसंबी यांनी नोंदवले आहे. मोतीराम कटारे यांनी लिहिलेला लेख संदर्भहीन असा आहे. कटारे यांच्या मांडणीतील अपुरेपणा स्पष्ट करताना लेखक लिहितो, " करारेंचा  कोणत्याही भेसळीविनाचा हा विशुद्ध दलितवाद त्यांना सर्वच पूर्वास्पृश्यांपासून तोडून पहिल्यांदा फक्त महार या जातीकडे आणि नंतर त्यांच्यातही फक्त बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अल्पसंख्य शिक्षित शहरी नवमध्यमवर्गकडे घेऊन जातो. कटारे याच अल्पसंतुष्ट- अल्पसंख्य वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना आता जातिनिर्मूलन नको आहे, तर उलट जातीच्या ओळखीवर मिळणाऱ्या फायद्यांवर मक्तेदारी हवी आहे. याचा अल्पसंतुष्ट- अल्पसंख्य वर्गाची मक्तेदारी ! "कटारे कोणत्या मानसिकतेतून लिहितात ,त्यांच्या लेखनाचा दृष्टिकोण लेखकाने येथे स्पष्ट केला आहे.  एकोणावीस लेख' दलित नवमध्यमवर्ग आणि पुरुषसत्ताक दृष्टी 'हा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या उदात्त मूल्यांच्या आधार घेऊन बाबासाहेबांनी दलित समाजाला जगण्याची नवी ऊर्जा दिली. आरक्षणाच्या अल्प अंमलबजावणीतून दलित समाजात नवा मध्यमवर्ग निर्माण झाला. हा समाज बाबासाहेबांच्या विचारांना, बौद्ध धम्माचा मार्ग अनुसरण करणारा आहे . तरी या नव्या मध्यमवर्गाची जीवनदृष्टी पारंपरिक आहे. हिंदू पुरुषसत्ताक व्यवस्थेचे संस्कार या वर्गाच्या मानसिकतेवर खोलपणे झाले आहेत . कुटुंबातील स्त्रियांच्या  समाजातील, साहित्यातील चळवळीतील स्थानाबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या वर्गाचा आहे. या दलित नवमाध्यमवर्गाच्या पुरुषसत्ताक दृष्टीवर चिकित्सकपणे लेखक राहुल कोसंबी बोट ठेवतात .या मांडणीला 'भारतीय जनता ' या मासिकातील प्रज्ञा दया पवार यांच्या 'अफवा खरी ठरावी म्हणून ' या कथासंग्रहा वरील परीक्षणाचा आधार राहुल कोसंबी यांनी घेतला आहे. दलित स्त्रियांना नियंत्रित करणार्‍या पुरूष सत्तेचे स्वरुप, त्यातील व्यापकता लेखक या लेखातून स्पष्ट करतो.
                                 ॥८॥
वीस क्रमांकाचा लेख  -' दलित साहित्य आणि राजकारण ' हा आहे . बाबासाहेबांच्या हयातीतच आधुनिक दलित साहित्य चळवळीला सुरुवात झाली होती. त्या काळात दलित साहित्य चळवळीला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले होते. इसवी सन १९७२ नंतर दलित पँथरच्या चळवळीला सुरूवात झाली . दलित साहित्य आणि राजकारण यांच्यात एक अतूट असं नातं आहे . दलित साहित्य चळवळीत सक्रिय असणारे लेखक आणि कवी यांनी नंतर दलित आंदोलनाचे नेतृत्व केले. हे लेखक, कवी पुढे सक्रिय राजकारणात आले. या एकूण प्रवासात त्यांची भूमिका नीती, मूल्यात्मकता यांच्यात कोणते बदल झाले याची चिकित्सा करणारा हा लेख आहे.दलित साहित्य चळवळीच्या अरिष्टग्रस्ततेची समीक्षा लेखक या लेखातून करतो. या आरिष्टग्रस्ततेचे विश्लेषण लेखकाने या लेखात मांडले आहे. दलित राजकारण, चळवळ, साहित्य चळवळीच्या विविध आरिष्टग्रस्ततेबद्दलची लेखकाने वस्तुनिष्ठ मांडणी केली आहे. ऐतिहासिक आढावा घेऊन समकालीकतेची खोलपणे विस्तृत मांडणी केली आहे. दलित साहित्य आणि राजकारणाचे विविधांगी दृष्टिकोणची वस्तुस्थिती लेखकाने या लेखात मांडली आहे.लेख क्रमांक एकवीस - ' हिंदू डावे ' या शीर्षकाचा आहे. दिनांक ८ मार्चच्या 'मी मराठीच्या ' पुरवणीत राम जगताप यांनी 'गरज हिंदू डाव्यांची ' असा लेख लिहिला होता. या लेखाची वस्तुनिष्ठ चिकित्सा 'हिंदू डावे ' या लेखात लेखक राहुल कोसंबी यांनी केली आहे. डाव्या चळवळीला हिंदू हे विशेषण का ? लावले गेले याचा आढावा लेखक या लेखात घेतो. जागतिकीकरणाच्या विविधांगी प्रक्रियांमुळे डाव्या चळवळीचा अवकाश आक्रसत गेला. डाव्या चळवळीच्या स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. डाव्यानी आपली भूमिका धर्माच्या बाबतीत बदलली का? ती सौम्य झाले का? असे प्रश्न उपस्थित करणारा, या पाठीमागील छुप्या राजकारणाचा वेध घेणारा हा लेख आहे.बावीसावा लेख -'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समाजशास्त्रीय योगदान ' हा आहे. भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू होतो. एतद्देशीय अभ्यासकाने केलेल्या समाजशास्त्रीय अभ्यासला एक विशेष महत्त्व असतो. जातिव्यवस्थेच्या समाजशास्त्रीय अभ्यासाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभ केला. शास्त्रीय दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचे प्रारूप शोधण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या आधी जातीव्यवस्थेचा अभ्यास युरोपीय खलाशी , प्रवासी, व्यापारी राज्यकर्ते यांनी केलेला होता.
 बाबासाहेबांनी ९ मे १९१६ रोजी परिसंवादात वाचलेला 'कास्टस इन इंडिया :देअर मेकॉनिजझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट ' हा शोधनिबंध अत्यंत महत्वाचा आहे. इसवी सन १९३५ ला लिहिलेले भाषण 'जातीव्यवस्थेचे उन्मूलन ' हे ही महत्त्वाचे ठरते. ' शूद्र पूर्वी कोण होते? ' , ' अस्पृश्य मूळचे कोण होते? ' या दोन ग्रंथातून बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेचे स्वरूप विशेष स्पष्टपणे मांडले आहेत. बाबासाहेबांच्या मांडणीतील वेगळेपण आणि त्यांचे महत्त्व लेखक राहुल कोसंबी यांनी या लेखात मांडले आहे.''बाबासाहेबांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या - दुसऱ्या दशकातच येणाऱ्या १०० वर्षांवर कायमस्वरूपी छाप पाडतील असे जातीव्यवस्थेबाबतचे अनन्य आणि मूलगामी सिद्धांत दिले, ज्यांच्या मांडणी आणि आशयाची पुनरावृत्ती पुढे अनेक वर्ष अनेक महनीय समाजशास्त्रज्ञांनीकडून सातत्याने होत राहिली."असे अत्यंत महत्त्वाचे विधान लेखक या लेखात करतो. बाबासाहेबांच्या समाजशास्त्रीय योगदानाचे मूल्यमापन करणे अत्यंत अवघड व कठीण गोष्ट आहे.अत्यंत गंभीरतापूर्वक, प्रचंड वाचन व व्यासंगातून राहुल कोसंबी यांनी या लेखाची मांडणी केली आहे.
                                  ॥९॥
राहुल कोसंबी यांच्या लेखनाच्या मर्यादा : -

१. अत्यंत अवघड समाजशास्त्रीय संकल्पनांची अधिक रेलचेल असलेले  लेखन आहे.  सर्वसामान्य वाचकाच्या आकलनापलिकडचे हे कठीण लेखन आहे.
२. पल्लेदार वाक्यरचना, मोठमोठे वाक्य लेखांमध्ये येतात. कधीकधी संपूर्ण परिछदाचे एकच वाक्य होते. त्यामुळे वाचकाला हे लेखन जड वाटते.
३. वारंवार तेच ते येणारे संदर्भ दिसतात.काही लेखांच्या मांडणीत पुनरावृत्ती दिसते.
४. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले हा लेख आणि नामदेव ढसाळ आणि दलित चळवळ या लेखांमधील विवेचनात खूप साम्य आहे. तीच गोष्ट डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ, आणि मोतीराम कटारे यांच्या लेखावरील प्रतिक्रिया या दोन्ही लेखांमध्ये खूप सारखेपणा दिसतो.
 ५. 'कॉम्रेड शरद पाटील : अनन्यता आणि अंतर्विरोध 'या लेखातून समग्र कॉम्रेड शरद पाटील यांची सैद्धांतिक भूमिका स्पष्ट होत नाही. लेखकाचे कॉम्रेड शरद पाटलांविषयीचे शेरेवजा अभिप्राय या लेखातून मांडला जातो.
६. संपूर्ण पुस्तकाच्या लेखांमध्ये दलित समाजातील मध्यमवर्ग चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नोकऱ्यांमधील आरक्षणातून हा वर्ग जन्माला आला आहे. असे लेखकाचे निरीक्षण आहे. लेखक दलित समाजातील या मध्यम वर्गाची संख्या १० ते २० टक्के गृहीत धरत आहे. मुळात हा वर्ग बौद्ध धम्माचे अनुसरण करणारा वर्ग आहे. हा वर्ग विपश्यनेकडे वाळला आहे. या आत्मकेंद्रित वर्गाने आपल्या जातीतील खालच्या वर्गातील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे. असे आक्षेप लेखक नोंदवतो.
 मुळात हा वर्ग मोठ्या संख्येने तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे.याला वेगळा वर्ग मानताचं येत नाही. मुळात ग्रामीण जीवनाशी नाळ असलेला हा वर्ग आहे. भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण वेळ खर्ची पडणारा असा हा समाज घटक आहे. त्यामुळे या समाज घटकाचा वेगळा वर्ग आपल्याला मानता येत नाही. एक ते दोन टक्का केवळ उच्च नोकरीवर असणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीतून लेखक अंदाज बांधून या वर्गाविषयी काहीएक आकस ठेवून ही मांडणी करतो की काय? असे कधीकधी वाटते. एकूण या संपूर्ण मांडणीमध्ये  लेखकाने स्थूलपणे  समाजाच केलेले निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून मांडलेले निष्कर्ष असे या लेखनाचे स्वरूप वाटते. मुळात भारतात वर्गांचा जन्मच होऊ शकत नाही.जात माणसं विसरत नाहीत. त्यामुळे दलितांमध्ये असा काही वर्ग निर्माण झाला आहे असे आपल्याला म्हणता येत नाही. केवळ असा वर्ग निर्माण झाल्याचा आभास आपल्याला होतो. परंतु तो वर्ग प्रत्यक्षात आहे असे आपणाला म्हणता येत नाही.
                                  ॥ १० ॥
समारोप : -
वरील मर्यादा मान्य करूनही राहुल कोसंबी यांनी केलेल्या लेखनाचे महत्त्व आपणास नाकारता येत नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शोषित, वंचित वर्गाची अवहेलना होते. भांडवली व्यवस्थेने सर्व समस्यांचे संचलन करण्यास सुरुवात केली आहे. मार्क्सवाद आणि आंबेडकर वादाच्या एकत्रीकरणातून या प्रक्रियेला काही पर्यायी व्यवस्था देणे शक्य आहे का? याची सैद्धांतिक मांडणी राहुल कोसंबी करतात. आरक्षणातून दलित समाजात नवा मध्यमवर्ग उदयाला आला आहे. या वर्गाची स्वार्थी, आत्मकेंद्रित, आत्ममग्न अवस्थेचे विशेष राहुल कोसंबी यांनी मांडले आहेत. या वर्गाने जातीअंतापेक्षा भांडवली व्यवस्थित जातीचे भांडवल वापरण्यास सुरुवात केली आहे. या वर्गाची चिकित्सा राहुल कोसंबी करतात. राहुल कोसंबी यांच्या उभं आडवं  या लेखनाबद्दल हरिश्चंद्र थोरात लिहितात, अपारंपारिक आणि निर्भय अशी स्वच्छ, सुस्पष्ट आणि तडजोड न करणारी डावी भूमिका 'उभं आडवं ' च्या केंद्रस्थानी आहे. ती चुकूनही सोयी , गैरसोयी आणि तडजोडी यांचा विचार करीत नाही. यामुळे राहुल कोसंबी यांच्या लेखनात रोखठोक निर्भीड परखडपणा आलेला आहे. वरील विश्लेषणातून राहुल कोसंबी यांच्या लेखनाचे सामर्थ्य आपल्या लक्षात येते.


पुस्तकाचे शीर्षक - उभं आडवं
लेखक - राहुल कोसम्बी
प्रकाशन - शब्द पब्लिकेशन , मुंबई
तिसरी आवृत्ती -डिसेंबर २०१७
पृष्ठसंख्या -३१२
मूल्य -तीनशे पन्नास रूपये

डॉ . गणपतराव ढेंबरे ,
सहायक प्राध्यापक,
श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , ता . रावेर,जि. जळगाव
पिन  -४२५५०८
मोब .नं  -९४२१०८१२७०
ई- मेल  - dhembregr@gmail.com

२ टिप्पण्या:

  1. सर छान मांडणी,
    फक्त मला येवढेच सुचवायचे आहे की तुम्ही पहिला,दुसरा,तिसरा,चौथा लेख असे म्हटले आहे तसे न म्हणता प्रत्येक लेखाचे शीर्षकच बोल्डस्वरुपात घ्या जरा वाचकांना शीर्षकावरुन उत्सुकता वाटेल.तेवढी दूरुस्ती कराच

    उत्तर द्याहटवा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...