"तणस : एक सकस कलाकृती "
डॉ. गणपतराव ढेंबरे,रावेर
'तणस' ही प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांची लोकवाङ्मयगृहाने जून २०१९ ला प्रकाशित केलेली कादंबरी होय. 'आगळ ' आणि 'धूळपावलं ' या दोन कादंबऱ्यानंतरची 'तणस' ही डॉ.महेंद्र कदम यांची तिसरी कादंबरी होय. इ.स.२००० नंतरच्या मराठी साहित्यविश्वातील एक अभ्यासू, व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून डॉ.महेंद्र कदम यांची ओळख आहे. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारातून नवनिर्मिती करणारे लेखक म्हणून डॉ.महेंद्र कदम आपणास परिचित आहेत. 'तणस' या कादंबरीतून मूळ खेडं असलेल्या तालुकावजा शहराचे चित्रण येते. जागतिकीकरणाने खेडं आणि शहराची नक्कल करणाऱ्या तालुकावजा शहरात काय काय परिवर्तन झाले? याचे चित्रण 'तणस' मध्ये येते . धड शहरही नाही आणि धड गावही नाही; अशा मधल्या मिश्र अवस्थेतील शहराचा अवकाश 'तणस' कादंबरीतून उभा राहतो. हे जसं शहराचे आहे, तसेच ते या कादंबरीतील पात्रांचेही आहे. शहरात राहूनही पूर्ण शहरी न झालेल्या मध्यमवर्गाची कथा म्हणजे प्रस्तुत कादंबरी होय. जागतिकीकरणाच्या पर्वात शिक्षण घेतलेल्या परंतु शाश्वत नोकऱ्यापासून वंचित राहिलेल्या वर्गाचे जगणे या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. योग्य आस्थापनात समायोजन न झाल्यामुळे अस्थिर अशी एक मोठी पिढी उदयाला आली. या शिक्षित पिढीने स्वतःचे समायोजन तात्पुरत्या उत्पादन साधनांमध्ये केले. जागतिकीकरणाचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे गळेकापू स्पर्धा ,गतिशील जीवन, मूल्यहीन समाज या सर्वांचे प्रतिबिंब या कलाकृतीत उमटते. आपण घेतलेले शिक्षण, पदव्या कुचकामी आहेत, यांची व्यवहारात जगण्यासाठी काहीच उपयोगिता नाही हे या पिढीच्या लक्षात येते. यामधून त्यांच्यामध्ये येणारी हतबलता, अस्वस्थता यांचे चित्रण 'तणस'मध्ये येते. जागतिकीकरणाने सामाजिक ठेवण, राजकारण, अर्थकारण, धर्म, व्यवसाय, सांस्कृतिक विश्व ,नातेसंबंध, मूल्यव्यवस्था, अध्यात्म गरजांचे स्वरूप या सर्वांमध्ये अमूलाग्र बदल घडून आला. जागतिकीकरणाने नव्या गरजा जन्माला घातल्या. या गरजांच्या पूर्तीसाठी नवी व्यवस्था उदयाला आली. ही नवी व्यवस्था पूर्णतः मूल्यहीन, बाजारकेंद्री अशा स्वरूपाची होती. वस्तू आणि वास्तूंचा किंबहुना व्यक्तींचा उपभोग घेण्याचा नव जीवन दृष्टिकोन जन्माला आला. वस्तू ,वास्तु, माणसे वेगाने धावू लागली. व्यक्तींचे वस्तूकरण झाले. व्यक्ती मूल्यहीन झाल्या. जगण्याच्या शर्यतीमध्ये आपण मागे पडू नये म्हणून माणूस, समाज वेगाने धावायला लागला. या धावण्यातील अपरिहार्यता 'तणस' कादंबरीतून अभिव्यक्त होते. नव्या गरजांची पूर्ती करण्यासाठी समाजाला पैशांची चणचण जाणवू लागली. समाजाची ही गरज ओळखून पतसंस्थांचा गावोगावी जन्म झाला. नव्या भौतिक सुखाच्या चंगळवादी वस्तूंचा महापूर वाहू लागला. माणसे सुखाच्या शोधात या व्यवस्थेचा तळ गाठू लागली. या माणसांच्या बदलत्या मानसिकतेचा, गरजांचा, मूल्यांचा अन्वयार्थ 'तणस' कादंबरीत लावला जातो. पतसंस्थांच्या स्थापनेमागील अर्थकारण, राजकारण ही कादंबरी उलगडून दाखवते. या कादंबरीतून इ.स. २००० नंतरच्या समाज वास्तवाचा वेध घेतला आहे. कोणताही एकच एक विषय कादंबरीतून मांडला जात नाही. पतसंस्थांची निर्मिती व उपयोजन, वाहन व्यवसायाचे स्वरूप, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार,अध्यात्माचे बाजारीकरण, राजकारण, दोन पिढ्यांमधील मूल्य संघर्ष, बदलते स्त्री-पुरुष नातेसंबंध, मूल्यहीन जगणे, चंगळवाद, देशीवादी मुल्यांची गरज आणि महत्त्व अशा अनेकविध व्यवस्थांचे अवलोकन करणारी 'तणस' ही मराठी कादंबरी विश्वातील महत्त्वाची कलाकृती ठरते. शहराचे बकालपण, माणसांचे एकाकीपण, एकटेपणा, परात्मता, जगण्यातील निरर्थकता यांचा अचूक वेध 'तणस' मधून घेतला जातो. 'तालुकावजा खेड्याचे शहरात होणारे रूपांतर व या रूपांतराच्या प्रक्रियेला ही कादंबरी सूक्ष्मतेने चित्रित करते. महाराष्ट्रातील कुठल्याही तालुक्याचे शहरीकरण कसे झाले? त्यातील व्यावसायिक जाणीवपूर्वकता, लोभी मानसिकता, राजकारण यांचे सकस चित्रण 'तणस'मधून येते. या कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसंस्थांचे अस्तित्व व त्यातील प्रक्रिया व्यवस्था यांचे सूक्ष्म चित्रण येते. केवळ शहराचा विकास होत नाही; तर शहराला साह्यभूत ठरेल अशी मानसिकता कशी जन्माला येते, याचे प्रभावी चित्रण 'तणस' मधून येते.
जागतिकीकरणाने माणसाचे जीवन समस्यामय करून टाकले. सर्वसामान्य माणसे जगण्याचा मूलभूत हक्क हरवून बसली. कधी व्यवस्थेच्या चक्रात तर कधी स्वतः निर्माण केलेल्या कोषात अडकून पडली. या सर्वात माणसाचा श्वास गुदमरू लागला. अस्वस्थ जगण्यातील अपरिहार्यता 'तणस' कादंबरीतून चित्रित होते. मराठी कादंबरीतून वाहनतळ, वाहनव्यवसाय, तेथील व्यवस्था, माणसे व त्यांचे प्रश्न, समस्या कधीच मांडल्या गेल्या नाहीत. सदानंद देशमुख यांच्या काही कथांमधून हे विश्व चित्रित झाले आहे. 'तणस' कादंबरीतून शहरालगतच्या वाहनतळाचा अवकाश ताकदीने चित्रित होतो. वाहनतळावरची भाषा, चालक-मालक संघटनेचे राजकारण, गाडी चालकांची व्यसनाधीनता, वाहन चालवण्याचा नशा या कादंबरीतून चित्रित होतो. या कादंबरीतून पंताच्या रूपाने धार्मिक श्रद्धांचे मार्केटिंग करणारे वास्तव अचूकपणे चित्रित होते. सुशिक्षित लोकांच्या तर्काला आव्हान देणारे , बुद्धीला संभ्रमात टाकणारे विचार शहरातील सुखवासी जणांना आकर्षीत करतात. जगण्यातील ताण, समस्या माणसाला आस्तिक बनवतात. लोकांना श्रध्दांतील गुंगी हवीहवीशी वाटते. धार्मिक कर्मकांड, श्रद्धा यातून सर्वसामान्य माणूस गुंगीत असल्यासारखे वर्तन करू लागतो. श्रद्धेच्या बाजारात समाज विवेक हरवून बसतो. विवेकशीलता हरवून बसलेला समाज गुलाम बनतो. गुलामीतून लाचारी, नियतीशरणता येते. यातून समाज पंगू बनतो. याचे चित्रण 'तणस' या कादंबरीतून येते. खेड्यातून शहरात रूपांतरित झालेल्या शहरांमध्ये धार्मिक कर्मकांडाचे अवडंबर वाढले आहे. धार्मिक कार्यक्रम, गतीविधी वेगाने सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेचा अन्वयार्थ ही कादंबरी लावते. या घटनाक्रमातील कार्यकारणभाव लेखकाने अत्यंत प्रभावीपणे चित्रित केला आहे. प्रस्तुत कादंबरीत चिंतामणी गावडे हे पात्र स्वामींच्या आहारी जाऊन स्वतःचे अस्तित्व पुसून टाकते.
अर्थार्जनाच्या विविध शक्यता शोधणारी माणसे या कादंबरीतून भेटतात. पैसा जगण्याच्या केंद्रस्थानी येतो. माणसे स्वास्थ्य हरवून बसतात. जगणे अस्थिर होते. या जगण्यातील वेदनामय अवस्थांचे विविध कंगोरे कादंबरीतून उभे राहतात. या कलाकृतीतील पात्रे शहरातील आपल्या अस्तित्वाचा शोध घेतात. ते अस्तित्व अत्यंत नगण्य आहे. सर्वसामान्य माणसाला जीवन जगताना त्याची स्वतःची स्पेस आवश्यक असते. परंतु जागतिकीकरणाने सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची स्पेस काढून घेतली. यामुळे ही सर्वसामान्य माणसे सैरभैर झाली. या माणसांचे जगणे विस्कटून गेले. या विस्कटलेल्या जगण्यातील दुःख, व्यथा, वेदना यांना 'तणस' मधून वाचा फुटते.
या कादंबरीतून अनेक ग्रंथांचे संदर्भ येतात. कादंबरीतील वैचारिक चर्चा उच्च दर्जाचा बौद्धिक आनंद देणारी आहे. कादंबरीतील पृष्ठ क्रमांक १०७ व १०८ वरील विजय केळकर यांची गिरीश कुबेर यांनी घेतलेली मुलाखत दिली आहे. यातील आर्थिक चर्चा कादंबरीतील आशयविश्वाला व्यापकता प्राप्त करून देते. प्रा. मोहम्मद युनूस यांचे बचत गटाचे कार्य याचा संदर्भ प्रस्तुत कलाकृतीत येतो. ब्रिटनमधील यॉर्क विद्यापीठातील रिचर्ड विल्किन्सनने मांडलेले विचार कलाकृतीतील समाजवास्तवाला व्यापक बनवतात. प्रशांत दीक्षित यांचे जागतिकीकरणातील स्पर्धेचे स्वरूप व त्यातील अपरिहार्यता मांडणारे विचार कादंबरीच्या आर्थिक विश्लेषणाचा अवकाश विस्तारणारे आहेत. वरील सर्व संदर्भ लेखकाचे अध्ययन, व्यापक अभ्यास स्पष्ट करणारे आहेत. जागतिकीकरणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी वरील संदर्भ महत्त्वाचे ठरतात. सुशिक्षित बेरोजगारीचे चित्रण या कादंबरीतून येते. दिनकर देसाई, मनोज जावळे ही पात्रे पदवीधर असूनही व्यवस्थेत स्वतःची जागा निर्माण करू शकत नाहीत. अस्थिर नोकऱ्यांच्या तणावात जीवन जगणाऱ्या माणसांचे भावविश्व कादंबरीतून चित्रित होते. उर्मिला एम. एस्सी. बी. एड. आहे. तिला डोनेशनचे पैसे भरावे लागतात. सर्व सुशिक्षित तरुणांचा कणा व्यवस्थेमुळे मोडून पडला आहे. स्वाभिमान हरवून बसलेली ही पिढी स्वत्त्वहीन झाली आहे. अगदी कादंबरीच्या शीर्षकासारखी 'तणस' झाली आहे. भुशासारखे जगणे वाट्याला आलेली तरुण पिढी अत्यंत तत्त्वहीन झाली आहे. जगण्याचे मूल्यभान हरवलेल्या वर्गाचे चित्रण कादंबरीतून येते.
ग्रामीण जीवनातून शहरात आलेली माणसे आपला भूतकाळ विसरलेली नाहीत. शहरात येऊन पद ,प्रतिष्ठा मिळवलेली माणसे अजूनही ग्रामीण सरंजामी मानसिकतेत जगत आहेत. या बद्दल लेखक लिहितो, "एका अर्थाने जमीनदारासारखी नवी अर्थदारीच आकाराला आली होती. त्यातून गुंडगिरी जन्माला आली. वसुलीसाठी गुंडांचा वापर केला जाऊ लागला. मग हे गुंडही स्वतःला बॉस समजू लागले. यातून नवंच राजकारण सुरू झालं. ज्यांच्याकडं जास्त उपद्रव मूल्य त्याचा राजकारणातील आणि समाजकारणातील भाव वधारला. त्या भावाची जपणूक करण्यासाठी, मग मोठं होण्यासाठी, त्यांच्यातही स्पर्धा लागली. त्या स्पर्धेत वाळल्याऐवजी अधिक ओलंच जळत होतं. या निमित्तानं आसपासच्या पाचपंचवीस खेड्यात ही नवी जमात जन्माला आली. सगळे संदर्भच बदलून गेले. सत्तेचे आणि शोषणाची नवी वारूळ तयार होत गेली." हे कादंबरीतील समाज वास्तवाचे अत्यंत अचूक निरीक्षण आहे. समाजव्यवस्थेच्या परिवर्तनाची प्रक्रिया लेखकाने उलगडून दाखवली आहे. यातून समाज व्यवस्थेची नवी उतरंड जन्माला आली. श्रीमंतीचे भपकेदार प्रदर्शन, चमचेगिरी, अघळपघळपणा, दिखाऊपणा, घमेंड, मस्तवालपणा हे प्रतिष्ठेचे जगण्याचे मापदंड झाले. या प्रक्रियेला मुळातून मांडणारी ही कलाकृती आहे. समाजमाध्यमांचे स्वरूप बदलले. इलेक्ट्रॉनिक मीडियाने नवमध्यमवर्गाचा ताबा घेतला. बातम्यांचा रतीब सुरू झाला. प्रायोजक जाहिरातींची नवी व्यवस्था जन्माला आली. कार्यक्रमाच्या टी.आर.पी.चे युद्ध सुरू झाले. लाईव्ह कार्यक्रमांचे भरते आले. जीवघेणे मार्केटिंग सुरू झाले. नव्या शहरी व्यवस्थेतील सरंजामी वर्गाच्या प्रतिष्ठेला सुखावणार्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जावू लागले. या बदलत्या सांस्कृतिक विश्वावर लेखक प्रकाशझोत टाकतो. जागतिकीकरणाचे दृश्य-अदृश्य परिणाम समाजावर दिसू लागले. ठराविक लोकांच्या हातात पैसा येत गेला. चंगळवादाने कळस गाठला. गरज नसताना केवळ मानसिक विकृतीतून वस्तू खरेदी केल्या जाऊ लागल्या. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत गेली. एकीकडे श्रीमंत वर्गाचा प्रतिनिधी अमरसिंह पाटील तर सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी दिनकर देसाई यांच्यातील मानसिक, भावनिक, आर्थिक संघर्षाचे चित्रण 'तणस'मध्ये येते. नव्याने आकार घेत असलेल्या शहरांमध्ये एकीकडे उच्चभ्रू वर्गाच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. मध्यमवर्गाने कर्जबाजारी होऊन शहरालगतच्या वसाहतींमध्ये आपले बस्तान बसवले. बिनचेहऱ्याच्या नव्या माणसांचा वर्ग यातून निर्माण झाला. या सर्वसामान्य मध्यमवर्गाच्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव होता. अंतर्गत रस्ता, पाणी, पथदिवे, सुशोभीकरणाचा अभाव या नव्या वसाहतीत होता. या शहराच्या विकासातील सुजेवर बकालपणाचे सावट होते. हा वर्ग या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. याच नव्या शहरात झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मजूर, कामगार, छोटे व्यावसायिक यांचे वास्तव्य झोपडपट्टीतून दिसू लागले. शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांचे प्रश्न उभे राहिले. या समाजवास्तवाच्या अवकाशात कादंबरी आकार घेते.
दिनकर देसाईची व्यवस्थेने कोंडी केली. त्या कोडींची 'तणस' ही कादंबरी आहे. दिनकर देसाई या सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या नायकाची ही शोकांतिका आहे. जीवनात अत्यंत माफक अपेक्षा असणारा दिनकर व्यवस्थित गुरफटतो आणि हतबल होतो. दिनकर देसाईवर प्रेम करणारी उर्मिला हीसुद्धा जीवनात फार अपेक्षा ठेवत नाही. माफक अपेक्षांची पूर्ती न करता आलेल्या दिनकर-उर्मिला या पती-पत्नीच्या ताटातुटीने ही कादंबरी संपते. दिनकर देसाईचे शिक्षण, वाहन व्यवसायातील प्रवेश, यातून माघार ,पतसंस्थेतील मॅनेजर पदाची प्राप्ती आणि अमरसिंह शेंडे पाटलाकडून होणारी कोंडी यातून ही कलाकृती घडत जाते. दिनकरचा स्वभाव हा विक्षिप्त आहे. दिनकरला नर्वस ब्रेकडाऊनचे झटके येतात. हा त्याचा आजार अनुवंशिक आहे की, परिस्थितीतून उद्भवला आहे. याचे धुसर चित्रण कादंबरीतून येते. दिनकरचे आई-वडील काहीसे विक्षिप्त वाटतील इतके वेगळे आहेत. यातून कादंबरीत गूढता येते. पुढे काय होईल?याची उत्सुकता कायम ठेवण्यात लेखकाला यश येते. कादंबरीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचकाला कथानकाविषयी, त्यातील पात्रांविषयी, घटना-प्रसंगाविषयी शेवटपर्यंत अंदाज बांधता येत नाही. हे लेखकाच्या निर्मितीचे यश म्हणावे लागेल.
ग्रामीण जीवनातून मुळे उखडलेला शहरी मध्यमवर्ग शहरी संस्कृतीलाही स्वीकारत नाही. दिनकर देसाई मूळ मातीची ओल हरवून बसला आहे. तो आपली मुळे शोधत राहतो. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतो. परंतु हाती काहीच लागत नाही. खोल निराशेच्या गर्तेत लोटलेला दिनकर देसाई उध्वस्त शहरी मध्यमवर्गाचा प्रतिनिधी ठरतो. 'तणस' ही दोन पिढ्यांमधील मूल्यसंघर्षाची कादंबरी आहे. दिनकर - त्याचे आई-वडील, उर्मिला -पंत, उत्तमराव -अमरसिंह, शिवाजीराव काळे (बाप्पा)-बाजीराव, मनोज- त्याचे आई-वडील या दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या माणसांमध्ये मूल्यांसाठी संघर्ष होतो. जागतिकीकरणाने दोन पिढ्यांमधील संघर्षाला अत्यंत टोकदार केले आहे. या संघर्षाचे प्रभावी चित्रण 'तणस'मध्ये येते . वयस्कर पिढी बचतीला महत्त्व देणारी आहे. गरजा मर्यादित करून जगणारी आहे. भूतकाळाचे स्मरण ठेवणारी आहे. तर दुसरीकडे तरुण पिढी भूतकाळापेक्षा वर्तमानाला अधिक महत्त्व देणारी आहे. वस्तूंच्या उपभोगात,चंगळवादात जीवन जगणारी आहे . बचतीपेक्षा खर्चाला महत्त्व देणारी तरुण पिढी आजचा दिवस जगून घेते. या दोन पिढ्यांमध्ये दृष्टिकोन, मूल्यभान यात मुलभूत फरक आहे. यातून संघर्ष अटळ होतो. हा संघर्ष 'तणस' मध्ये लेखकाने टिपला आहे.
कादंबरीचे शीर्षक अतिशय प्रभावी आहे. धान्य उफणून मागे राहिलेला भुसा म्हणजे तणस होय . शहरी व्यवस्थेतील सर्वसामान्य माणूस हा 'तणस' सारखा आहे. तो शहराचे भरण-पोषण करतो. परंतु हे शहर या सर्वसामान्य माणसाला केवळ उपरेपणाची खोल जाणीव करून देते. या सगळ्या व्यवस्थेत सर्वसामान्य माणूस कचऱ्यासारखा बाजूला पडतो. शहरावरचा आपला हक्क सर्वसामान्य माणसाला सांगता येत नाही. अशा हक्क हरवून बसलेल्या सामान्य माणसाच्या जगण्यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. त्यामुळे या कादंबरीचे शीर्षक अतिशय समर्पक ठरते.
कादंबरीचा शेवट अत्यंत कलात्मक पद्धतीचा आहे. या शेवटातून अनेक शक्यतांची धूसर जाणीव निर्माण होते. दिनकर देसाई जीवनात पुन्हा ठाम उभा राहिला असेल का? दिनकरला उर्मिला कायमची सोडून गेली असेल काय? दिनकर-उर्मिला पुन्हा एकत्र येऊन अमरचा सामना करतील काय? उर्मिलाच्या शाळेतील नोकरीच्या प्रकरणावर पंत काय भूमिका घेतील? दिनकरच्या नर्व्हस ब्रेकडाऊन आजाराचे काय झाले असेल? पतसंस्थांचे पुढे काय झाले असेल? मंदिर, ट्रस्टचे पुढे काय होईल? यासारखे असंख्य प्रश्न वाचकांच्या मनात उभे करून ही कादंबरी संपते. कादंबरीचा शेवट लेखकाने अत्यंत कलात्मक पद्धतीने रेखाटला आहे. प्रश्नांच्या अनुत्तरीत राहण्यातच कादंबरीचे यश आहे.
'तणस' कादंबरीच्या मर्यादा : -
१ . 'तणस' कादंबरीतील समकालीन वास्तवाचे चित्रण उत्तम पद्धतीने येते. लेखकाने अस्तित्वाच्या गूढ, तात्त्वीक मांडणीला अधिक महत्त्व दिले आहे. हे गूढ, तात्त्वीक चित्रण कादंबरीतील समकालीन वास्तवाला हानी पोहोचवते. गूढ तात्विक मांडणी ही लेखकाने उसन्या अवसानाने केली आहे असा भास होतो.
२ . कादंबरीचा नायक दैववादी नियतीशरण असा रेखाटला आहे. समकालीन वास्तवात स्वतःला सिद्ध करणारा नायक कलाकृतीत येत नाही. पराभूत मानसिकतेतील नायकाचे चित्रण निराशावाद मांडणारे आहे. पुरुषत्व गमावणारा नायक व्यवस्थेचा बळी ठरतो. साहित्यकृतीतून समाजवास्तव हे असे आहे व ते अयोग्य आहे याची मांडणी कादंबरीत प्रभावीपणे होते . परंतु मानवी जीवन कसे असायला हवे याबद्दलचे संसूचन कादंबरी करत नाही.
३ . कलाकृतीतून सैद्धांतिक पातळीवर येणाऱ्या देशीवादी मूल्यांचे समर्थन कलाकृतीला तात्त्वीक बनवते. कलाकृतीतील कलात्मकता हरवून घेते.
४ .कादंबरीतून येणारी भाषा कधीकधी अधिक आक्रमक होते. लैंगिकतेचे अनावश्यक प्रदर्शन मांडते. विनाकारण लैंगिक शिव्या, वाक्यांचा उपयोग अनाठायी केल्याची जाणीव होते.
५. 'तणस' कादंबरीतील शुद्धलेखनाच्या चुका चटकन लक्षात येतात. कधी-कधी या चुकांमुळे कादंबरीच्या मूळ आशयाला धक्का पोहोचतो. उदा. पान क्रमांक २८- वडापावचा व्यवसाय करायला तो वाहनतळावर दाखल झाला. येथे वाचकांचा गोंधळ होतो. कमांडर गाडी घेऊन वडापावचा व्यवसाय कसा करणार? वडापाव ऐवजी 'वडाप' असा शब्द तेथे अभिप्रेत आहे. पृ. ४५, ६७, १०२, १५७, १६९ वर चुका आहेत. पृ.१८१ वर निलेशचा मावसभाऊ; तर त्याच पानावर दिनेशचा मावसभाऊ हा उल्लेख वाचकांचा गोंधळ करणारा आहे. नायकाचा कुठे दिनेश तर कुठे दिनकर असा उल्लेख यामुळे ही दोन वेगवेगळी पात्रे आहेत की काय असे वाटते. यासारख्या असंख्य चुका कादंबरीच्या मूळ आशयाला बाधा आणतात. पुढच्या आवृत्तीत मुद्रित शोधनाच्या चुका दुरुस्त केल्यास अधिक योग्य ठरेल.
६ . 'तणस' कादंबरीतील नायक दिनकर देसाई वास्तवातील वाटत नाही. आदर्शवाद जपणारा अंतर्मुख, अव्यक्त नायक कादंबरीच्या मांडणीला हानीकारक ठरतो.
७ .तात्त्वीक सैद्धांतिक चर्चा, मांडणी कादंबरीला मूळ आशयकेंद्रापासून दूर घेऊन जाते. पुस्तकांचे संदर्भ कादंबरीला तत्त्वजड करतात.
८ .अत्यंत वेगवेगळ्या विषयांची मांडणी कादंबरीतून येते. परंतु तात्विक चर्चा, वर्णन, अभिनिवेश ठेवून केलेली मांडणी कादंबरीचा आत्मा हरवून टाकते. कादंबरीतील चर्चा कृत्रीम वाटते. कृत्रिम चित्रणामुळे कादंबरीच्या आशयातील ओल हरवते. खोलवरच्या सूक्ष्म चित्रणापेक्षा कादंबरीत वरवरचे, फोलकट चित्रण येते.
९ . कादंबरीतील वेगवेगळे भाग सुटे वाटतात. वाहनतळ, पतसंस्था, राजकारण, मनोजचे चित्रण, उर्मिला-दिनकर, मंदिराच्या ट्रस्टच्या संदर्भातले चित्रण, उत्तमराव -अमरसिंह यांचे चित्रण, शेवंताबाईच्या माहेराचे चित्रण, शिवाजीराव काळे (बाप्पा)- बाजीराव, चिंतामणी ही सर्व पात्रे, वेगवेगळ्या घटना यांचे चित्रण कादंबरीच्या कथानकाशी एकरूप होत नाही. प्रत्येकाचे स्वतंत्रपण, सुटेपण लक्षात येते. एकजीव सांधेजोड कथानकात जाणवत नाही. एकरूप कथात्म अनुभव कलाकृतीतून येत नाही. लेखकाच्या लेखनामागील सहजतेपेक्षा, परिश्रम, कष्ट कादंबरी वाचनातून लक्षात येतात. कादंबरीच्या कथनात सहजता जाणवत नाही. शिक्षण क्षेत्राचे वर्णन करताना, आर्थिक, सामाजिक, तात्विक मांडणी करताना लेखकाची प्रतिभा अधिक खुलते. कुटुंबातील पात्रांच्या संवादात सहजता जाणवत नाही. संवाद कृत्रिम, कृतक, बाळबोध स्वरूपाचे वाटतात. कादंबरीच्या कथनात सहजता अनुभवाला येत नाही.
१० .कादंबरीचा नायक दिनकर देसाई याचे महाविद्यालयीन लडतर जीवनाचे चित्रण फडकेसदृश्य कादंबरीसारखे वाटते. उर्मिला-दिनकर यांच्यातील प्रेम अत्यंत बेगडीपणे, कोरडेपणाने उपचारार्थ स्वरूपात चित्रित झाले आहे. कादंबरीतून जातवास्तव नीटपणे मांडले जात नाही. केवळ मनोजच्या जातीचे त्रोटक चित्रणातून समाजातील जातवास्तवाला अभिव्यक्त करण्यात लेखकाला अपयश आलेले आहे.
११. शहरातील नव्या उच्च श्रीमंत व मध्यम वर्गाच्या जगण्याला ही कलाकृती केंद्रस्थानी ठेवते. शहरातील गरीब, मजूर, कामगार वर्गाचे विश्व कादंबरीतून चित्रित होत नाही. ही या कादंबरीची मर्यादा वाटते.
वरील सर्व 'तणस' या कादंबरीच्या मर्यादा मान्य करूनही या कादंबरीचे मराठी वाङ्मय व्यवहारात महत्त्व आहे. डॉ. महेंद्र कदम यांची या कादंबरी लेखनामागील मेहनत, परिश्रम उच्च कोटीच्या आहेत. मूळात डॉ. महेंद्र कदम यांचा उपजत प्रकृतिपिंड समीक्षकाचा आहे. त्यावर मात करत सर्जनशील लेखनाच्या वाटा धुंडाळणे हे अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. प्रयत्नपूर्वक प्रकल्पासारखे कादंबरीलेखन करणे हे एक प्रेरक बाब आहे. लेखकाचा व्यासंग, वाचन,भवताल समजून घेण्यातले गांभीर्य संवेदनशील अभ्यासकांच्या लक्षात येते. मुळात जागतिकीकरण ही प्रक्रिया अजून अपूर्ण आहे. या प्रक्रियेच्या अंतरंगातील गंध अजुन शेष आहेत. जागतिकीकरणासारख्या निसरड्या भूमीला कलाकृतीतून मांडणे ही जोखीम आहे. ही जोखीम,आव्हान डॉ. महेंद्र कदम यांनी स्वीकारले आहे. या प्रक्रियेच्या दीर्घ वाचनातून, अनुभवातून 'तणस' ही सर्जनशील कलाकृती आकार घेते. या बौद्धिक व्यवहारातील लेखकाचे ठामपण अनुभवणे हा एक आनंदाचा क्षण आहे. सर्वसामान्य रसिक वाचकांना कलाकृती वाचण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हा पुस्तक परिचयाचा प्रयत्न आहे. श्रेष्ठ वाङ्मयीन व्यूहाने या लेखनाकडे पाहू नये.
डॉ.महेंद्र कदम यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! धन्यवाद !!!
डॉ.गणपतराव ढेंबरे
सहा. प्राध्यापक
श्री.व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव
पिनकोड - ४२५५०८
मोबाईल नंबर - ९४२१०८१२७०
ई-मेल-dhembregr@gmail.com
अप्रतिम लेखन शैली अगदी बारीकसारीक बारकावे समजून सांगितले सर तुम्ही सर्व मुद्यांना अलगद स्पर्श केला खर्च सुंदर लेखन शैली.
उत्तर द्याहटवा