" कोरोना आणि समाज मन "
डॉ . गणपतराव ढेंबरे , रावेर
कोरोनामुळे काही नवे दृष्टिकोन समाजाला मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे २०२० हे महिने कोरोनाच्या दहशतीचे होते. या काळात समाज व्यक्तित्वाचा सिक्स सेंस दहशतीच्या सावटाखाली होता . समाजाने कोरोणाची खूप भीती घेतेली होती. त्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चिथावणीखोर प्रसारणाची अधिक जोड होती. समाजमानसाचा सिक्स सेंस येथे फार गलितगात्र झाला होता. यातून पळापळ झाली. हळूहळू समाजाचा कोरोना आजाराबद्दलचा दृष्टीकोन बदलत गेला. समाज मन थोडं धीट झालं. या आपत्तीकडे लोक उघडे डोळे ठेवून बघायला लागले. दहशतीचे सावट कमी झाले.समाज मन स्थिर होऊ लागले. याला कारण ज्यांना कोरोना झाला होता. ते बरे झालेले वीर सांगू लागले , घाबरण्यासारखे काही नाही . आजार काही विशेष नाही. या वीरांनी समाजात आजाराबद्दल नव्या कहाण्या पेरल्या. माणसं आजाराला सहज मानू लागली. या आजाराने महासत्ता होणाऱ्या या देशाचे डोळे खाडकन उघडले.
गेल्या ७० वर्षात सार्वजनिक आरोग्याचे तीन-तेरा वाजले होते. भांडवलदार वर्गाने सार्वजनिक आरोग्य यंत्रणा साम-दाम-दंड-भेद सगळं वापरून रसातळाला नेली. खाजगी दवाखान्यांचे नवे कारखाने उभे राहिले. ज्याच्याजवळ पैसा त्याला या यंत्रणेचा लाभ मिळू लागला. नवश्रीमंत, मध्यमवर्ग या खाजगी दवाखान्याकडे वाळला. काही वर्गाची ही सुविधा , सेवा वापरण्याची अवकात नसतानाही मरणाच्या भीतीपोटी तो वर्गही या यंत्रणेकडे वळला. राजकारणी मंडळींनी सार्वजनिक आरोग्याचे करता येईल तितकं वाटोळं केले. खाजगी दवाखाने सेवा नव्हती तो उद्योग होता. कुठलेही बंधन मर्यादा नसलेला व्यवसाय होता. सरकारी यंत्रणाच्या नियत्रांणापलीकडचा लुटणारा व्यवसाय होता. या लोकांनी गुंतवलेल्या हजारो कोटी रुपयांतून सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला. हा प्रश्न जाणीवपूर्वक उभा केला गेला. सरकारी दवाखान्याची गरज काय? असा भ्रम तयार करण्यात या यंत्रणेला यश आले. हे सगळं चित्र उभे राहत असताना सरकारी दवाखान्यातील यंत्रणेने बद्दल खरं-खोटं चित्र बनवले गेले. अव्यवस्था, हलगर्जीपणा, अस्वच्छता असे रूप सरकारी आरोग्य यंत्रणेचे बनवण्यात आले. यात काही प्रमाणात तथ्यं होते. मागे डोळ्यांच्या खाजगी डॉक्टरांनी षड्यंत्र करून काही रुग्णांना आंधळे केले. यातून या रुग्णांना डॉ.तात्याराव लहाने यांनी बरे केले. परंतु सरकारी यंत्रणेवरचा विश्वास संपवण्यात या लोकांनाही यश आले होते.पुढील काळातील कोरोनाचीअवस्था कशी असेल? याबद्दल काही शक्यता वाटतात. त्यातली एक शक्यता म्हणजे स्वाईन फ्लूसारख्या आजार हळूहळू नष्ट होईल. समाज पुन्हा पूर्वपदावर येईल. दुसरा अंदाज म्हणजे हाहाकार माजवणारा असेल. रुग्ण वाढतील. सगळी यंत्रणा कोलमडून पडेल. माणसं मुंगीसारखी मारतील. देशात अराजक येईल. यंत्रणा नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही.
तर तिसरी शक्यता म्हणजे सरकार या सगळ्यावरती नियंत्रण ठेवेल. हळूहळू हा रोग आटोक्यात येईल. तीन ते पाच टक्के लोकांचा मृत्यू होईल. समाज पुन्हा पूर्वपदावर येईल. कोरोनाच्या परिणामांची चर्चा आत्ताचं करण्यात काही अर्थ नाही. काही काळ गेल्यानंतर कोरोणाच्या दृश्य-अदृश्य परिणामांची चर्चा करता येईल. लोकांचे खूप हाल झाले. हे मात्र खरं आहे .
कोरोनाचा समाजातील वेगवेगळ्या घटकांवर परिणाम झाले. कोरोनाच्या काळात लोकांचे प्रचंड हाल झाले. यात गरीब लोकांचा अधिक समावेश होता. विशेषतः शहरातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या वाट्याला प्रचंड वेदना आणि अवहेलना आली.चालत जाणारे लाखो मजूर , त्यांची लहान मुले , म्हातारी माणसे , गरोदर महिला यांना या महामारीचा अधिक फटका बसला. प्रशासन आणि राजकीय मंडळींनी या गरीब माणसांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. भीतीतून होणारा गावाकडचा प्रवास जीवघेणा ठरला. काहींचा या प्रवासातच अंत झाला. यंत्रणेकडून परिस्थिती हाताळण्याच्या कुठलेचं सूत्रबद्ध नियोजन दिसले नाही. बेफिकिरी , दुर्लक्ष यातून गरीब माणसाला माणूस न समजणारी असंवेदनशील वृत्ती अधिक ठळक झाली. या कोरोना काळात समाजाच्या मानसिकतेत बदल झाला. प्रेम , सद्भाव , माया , संवेदना यांची जागा संशयाने घेतली. संशयातून माणसं स्वार्थी झाली. आपण , आपले कुटुंब ह्या पलिकडे न जाणारी स्वर्थी वृत्ती या काळात वाढली. समाजातील काही लोक स्वतःच्या मूल्यांवर ठाम होते. त्यांनी संवेदना ठेवून लोकांची मदत केले.पायी , मिळेल त्या वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांना पाणी , अन्नधान्य ,फळे वाटप करून मदत केली. या चांगल्या विचारांच्या लोकांनी माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध केले .
कोरोना आणि शेतकरी या बद्दलचे चित्र वेगळे होते. कोरोनाआल्यामुळे शेतकरी थांबला नाही. शेतीची कामे सुरू राहिली. पिकांची लागवड , कापणी ,काढणी सुरू राहिली. भाजीपाला , धान्य ,फळे , दूध यांचे वितरण शेतकऱ्यांच्या कष्टातून सुरू राहिले. भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे या काळात प्रचंड नुकसान झाले. वाहतूक व्यवस्था कोलमडली. यामुळे नाशवंत भाजीपाला शेतातच खराब झाला. कष्टाने पिकवलेला माल मातीमोल होताना पाहून शेतकरी हतबल झाला. परंतु शेतक ऱ्यांनी उमेद हरली नाही. शेतकऱ्याने नव्या हंगामात पुन्हा कंबर कसली. नव्याने लागवड केली. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. हे शेतकऱ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. भविष्यात पुन्हा समाजाला जिवंत ठेवण्यासाठी धान्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मात्र कुणालाच नाही ? भाजीपाल्याचे नुकसान झाले त्याला काहीच मिळाले नाही . भाव कमी मिळाला तरी त्याला जाबा विचारावासा वाटत नाही . त्याला व्यवस्थेत कुठलेचं स्थान मिळत नाही. शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला कधी कळणार ? हा खरा प्रश्न आहे .
कोरोनामुळे शिक्षणावरही प्रचंड आघात झाला. ज्ञान प्रक्रिया वृद्धीगंत करणारी व्यवस्था कोलमडून पडली. शिक्षण घेणार्या प्रत्येकाचे एक वर्ष वाया जाणार की काय ? असा संभ्रम निर्माण झाला. ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही अल्प प्रयत्न झाले. परंतु त्याला मर्यादा आहेत. सर्वांना परवडेल अशी यंत्रणा कधी अस्तित्वात येणार हा खरा प्रश्न आहे.
सर्व चित्राच्या पार्श्वभूमीवर हे कधी संपेल ? पुन्हा पहिल्यासारखे जीवन रुटीन कधी सुरू होईल ? पुन्हा मित्र एकत्र येऊन गरम गरम चहा घेतील. सोबत गप्पांची मैफिल गावोगाव रंगेल. कोरोना काळावर हिररेन मतमतांरे मांडले जातील.पुन्हा आपले सांस्कृतिक सण उत्सव आपण जोमाने साजरे करू . तो आपणासाठी सुदिन ठरेल. संशयाचे मळभ दूर होऊन आपण पुन्हा मोकळा श्वास घेऊ. पुन्हा अपेक्षांचा आभाळ भरून येईल. विश्वासाचा वारू जोरात दौडेल !! पुन्हा माणसं जवळ येतील. शब्दाशिवाय संवाद पुन्हा जवळीक निर्माण करेल. मनाला पुन्हा नवी उमेद येईल !! पुन्हा आनंदाने गाणे आपण सर्वजण गाऊ !!
देशदूतच्या दर्जेदार विशेषांकांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
डॉ . गणपतराव ढेंबरे ,
रावेर ,
मोबईल नंबर-९४२१०८१२७०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा