महानुभाव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य
डॉ.गणपतराव ढेंबरे
सहयोगी प्राध्यापक,
मराठी विभाग,
श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, ता.रावेर ,जि. जळगाव
पिन -४२५५०८
मोबाईल नंबर -९४२१०८१२७० ई-मेल-dhembregr@gmail.com
प्रस्तावना : -
साहित्य कोणत्याही काळातील असले तरी राजकीय घडामोडी सांस्कृतिक पर्यावरण आणि समाजजीवन यांच्या प्रभावापासून ते अलिप्त राहू शकत नाही. महानुभाव संप्रदाय हा एक मराठी सांस्कृतिक पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक होय. महानुभाव संप्रदायाचे तत्त्वज्ञान ,अचारधर्म, विचार प्रणालींचा प्रभाव महाराष्ट्रीय समाज जीवनावर दृढ काळासाठी झाला. किंबहुना आजच्या समाजाच्या धारणा, मूल्य, विचारधारांवर महानुभव संप्रदायाचा प्रभाव आहे. बाराव्या शतकातील एकूण समाजजीवनाच्या सांस्कृतिक विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या महानुभव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य ठळकपणे अधोरेखित करणे. हे या संशोधन लेखाचे उद्दिष्ट आहे.
मध्ययुगीन कालखंडात मराठी समाजाचे समीक्षण केले असता, महानुभव संप्रदाय आणि समाजजीवन परस्परोपजीवी असल्याचे लक्षात येते. भारतावर झालेल्या इस्लामी आक्रमणाने या देशात केवळ राजकीय स्थित्यंतर घडवून आणले नाही. तर भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनावरही या आक्रमणाचे खोलवर परिणाम झाले. इस्लामी सत्ता या देशात स्थिर होण्यापूर्वी कित्येक परकीयांनी या देशात वेळोवेळी निरनिराळ्या भागात आपली राज्य स्थापन केली होती. परंतु या राजवटीमुळे सांस्कृतिक व सामाजिक जीवनात स्थित्यंतर झाले नाही. प्रदेशातून आलेले हे राज्यकर्ते भारतातील जीवन आणि संस्कृती यांच्याशी लवकरच समरस झाले. कालांतराने त्यांचे परकेपण इतिहास जमा झाले. या राजसत्तांपैकी कित्येकांनी भारतीय राजनीतीनुसार 'राजधर्मा 'चे पालन केले. इस्लामी राजवटीचे उद्दिष्ट वेगळे होते. यातून राजकीय संघर्षा बरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक ,सामाजिक क्षेत्रातही संघर्षाचे वातावरण महाराष्ट्रभर निर्माण झाले. या संघर्षप्रवन कालखंडात महानुभव संप्रदायाचे सामाजिक ,सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्य अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
महानुभाव ग्रंथकारांची साहित्य निर्मितीचे स्वरूप : -
तेराव्या शतकातील महानुभवांच्या वाङ्मय निर्मितीने मराठी वाङ्मयाला समृद्ध केले. मराठीत गद्य चरित्र लेखनाचा मुहूर्तमेढीचे श्रेय महानुभाव संप्रदायाचे आहे. म्हाइंभट्टांने स्मरणशक्तीतून आणि सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेऊन लिहिलेले 'लीळाचरीत्र ' हे चरित्रलेखनाचा आदर्श तर ठरलेच, पण उभ्या मराठी वाङ्मयाचा मानदंड बनून राहिले. यादवकालीन सांस्कृतिक जीवनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ एक महत्त्वाची सामग्री ठरला आहे. कवी नरेंद्र, भास्करभट्टासारखे रसिक कवी, दामोदर पंडित, विश्वनाथ पंडित महदंबा, केशिराज व्यास यांच्या साहित्यरचनेतून मराठी वाङ्मयात मोलाची भर पडली. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांची सुदृढता विकसित करण्यात महानुभव संप्रदायाचा मोठा वाटा आहे.
महानुभव संप्रदायातील विविध ग्रंथकारांनी संख्यात्मक दृष्ट्या व गुणात्मक दृष्ट्या सकस अशी ग्रंथ निर्मिती केली. या ग्रंथ निर्मितीचे स्वरूप विविधांगी असे आहे. रचनात्मकदृष्ट्या व आशयदृष्ट्या ही वाङ्मय निर्मिती सकस व बहुकेंद्रीय अशी आहे. महानुभाव संप्रदायातील ग्रंथकारांनी प्रबंधकाव्ये,चरित्रे,दैनंदिनी, प्रवासवर्णन,स्थलवर्णन,आख्याने लापनिका, दृष्टांत,धवळे,पदे,आरत्या, धुवे असे अनेक गद्य व पद्य वाङ्मयप्रकार अतिशय नीटसपणे, कलात्मकपणे हाताळलेले दिसतात. यातील काही ग्रंथांना गीता आणि भागवतग्रंथ यातील विचारांचा आणि विषयांचा आधार आहे. या ग्रंथ निर्मितीच्या केंद्रस्थानी श्रीचक्रधर श्रीगोविंद प्रभू आणि श्रीदत्तात्रेय हे आहेत. मराठी ललित गद्याची मुहूर्तमेढ महानुभावांनी रोवली. यादवकालीन राजकीय,धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे दर्शन महानुभव संप्रदायाच्या साहित्यातून घडते. त्या काळातील मराठी भाषा,बोली,म्हणी, वाक्प्रचार,लोककथा,मिथके यांचे समृद्ध दर्शन महानुभाव साहित्यातून घडते. आजही तेराव्या शतकातील महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी महानुभाव संप्रदायाचे साहित्य एक प्रधान साधन मानले जाते. इतिहास, लोकपरंपरा,लोकभाषा,समाजशास्त्र,
तत्त्वज्ञान,तत्कालीन राजकारण, अर्थकारण यांच्या अभ्यासासाठी महानुभाव संप्रदायाची ग्रंथसंपदा एक महत्त्वपूर्ण ठेवा ठरते. सर्व महानुभाव साहित्य पंथनिष्ठेवरच आधारलेले आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. पंथांच्या प्रवर्तकांची चरित्रे,लीळा,वचने, आख्यायिका,पंथीय तत्त्वज्ञान आणि आचारधर्म जतन करण्यासाठी महानुभाव वाङ्मयाची निर्मिती झाली.
महानुभाव संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य : -
सर्वसामान्य जनतेच्या अध्यात्मिक विकासाचा मार्ग मोकळा करून देणे हे महानुभाव संप्रदायाचे प्रमुख उद्दिष्ट होते.ज्ञान आणि भक्ती या दोन तत्त्वांच्या पायावर महानुभाव संप्रदायाची स्थापना झालेली होती. या संप्रदायाने जनसामान्यांचा आध्यात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. समतावादी महानुभाव संप्रदाय समाजातील सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय ठरला. समत्त्वदृष्टीने सर्वांना योग्य होईल असा आत्मविकासाचा साधन मार्ग उपलब्ध करून देण्याचे महानुभाव संप्रदायाचे कार्य त्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे मानावे लागेल. महानुभाव संप्रदायाची उभारणी ही समन्वयाच्या उदात्त भूमिकेतून झाली होती. त्यामुळे विविध तत्त्वविचार,ग्रंथ,आचारधर्माचा समन्वय साधून हा संप्रदाय लोकप्रिय झाला. नाथ संप्रदायातून विशुद्धारणाचे महत्त्व,समत्वदृष्टी,जनसाधारणांच्या उन्नतीसाठी लोकभाषेचा पुरस्कार इत्यादी गोष्टी महानुभाव संप्रदायाने स्वीकारल्या होत्या. त्याचबरोबर वैष्णव परंपरेतून कृष्णभक्ती,अवतारांची कल्पना,मायाविचार इत्यादी तात्त्वीक गोष्टींचा स्वीकार महानुभाव संप्रदायांनी केला.महानुभाव संप्रदायाने काही गोष्टी जैन परंपरेतून घेतल्या होत्या. या वेगवेगळ्या परंपरेतील उदात्त मूल्य, विचार,ज्ञान यांच्या समन्वयातून महानुभाव संप्रदायाची उभारणी झाली होती.
अहिंसा तत्त्वाचे महत्त्व महानुभाव संप्रदायात विशद करण्यात आले आहे. अहिंसा हे महानुभवीय चतुसूत्रीतील महत्त्वाचे तत्त्व होय. या अहिंसेचे पालन अशा रीतीने करावे की, 'तुमचेनि मुंगी रांड न होआवी' ,आपणास 'मारिता पूजीता समानचि असावा ' ,अशी तत्त्वे महानुभाव संप्रदायातून येतात. ही विचारधारा जैन ,बौद्ध तत्त्वविचारांशी साम्य राखणारी आहे. जगाला अहिंसेचे महत्त्व पटत आहे. लोक हिंसेचा मार्ग टाळत आहेत. महानुभावांनी अहिंसेचे तत्त्व अतिशय काटेकोरपणे सांगून आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता. सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात अहिंसा महत्त्वपूर्ण असते. शांती, अहिंसा या चिरतत्त्वांचा अनुनय महानुभाव संप्रदाय सांगतो.
महानुभाव संप्रदायाने विचार प्रचारासाठी लोकभाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा स्वीकार केला. संस्कृतमध्ये ग्रंथरचना करावी हा शिष्टमान्य संकेत रूढ असण्याच्या या काळात चक्रधरस्वामी व नागदेवाचार्य यांनी आपल्या ग्रंथकारांना कटाक्षाने मराठीतच ग्रंथरचना करण्यास सांगितले.'आपल्या स्वामीचा सामान्यु परिवारू ' नागविला जाऊ नये, काठिन्यात चुकवून त्याला परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी 'महाराष्ट्रीय निरूपिले कीं गा' असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मराठी भाषेला महानुभाव आपली धर्मभाषा मानत होते. सर्वसामान्यांपर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी मराठी भाषेचा जोरदार पुरस्कार महानुभावांनी केला. मराठी भाषेचा त्यांनी आग्रह धरला. महानुभावांना मराठी भाषेचा अभिमान होता. सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी मराठी भाषेचा आग्रह महानुभवांनी धरला. बहुजन समाजाच्या मागासलेपणामागे संस्कृत भाषेचा दुराभिमान कार्यरत होता. हे मर्म महानुभावांनी ओळखले होते. केसोबासांनी नागदेवांना एकदा संस्कृतात प्रश्न विचारला असता 'पंडिता :केशवदेया : तुमचा आस्मात कस्मात मी नेणें गा: मज चक्रधरे निरूपिली मऱ्हाटी : तियाची पुसा ': या शब्दात नागदेवाचार्यांनी मराठी भाषेविषयी आंतरिक कळवळा व्यक्त केला. अशाच एका प्रसंगी संस्कृत अभिमानी केसोबासांना उद्देशून ते म्हणाले, 'नको गा केशवदेया I येणे माझिया म्हातारिया नागवतिल ' हे उद्गार महानुभाव संप्रदायाचे मराठी भाषेवरील प्रेम अभिव्यक्त करणारे आहेत. गद्य आणि पद्य या दोन्ही स्वरूपात महानुभवांनी केलेले कार्य मराठीच्या इतिहासात अद्वितीय आहे. महानुभाव संप्रदायांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आध्यात्मिक पातळीवर त्याग केला. वैचारिक पातळीवर महानुभावांनी जातीव्यवस्था नाकारली. महानुभाव संप्रदाय हा एक ज्ञानमार्ग होता. व्यासंगी असणाऱ्या महानुभावांनी जाती व्यवस्थेतील फोलपण लक्षात घेऊन जातीव्यवस्था नाकारण्याचे कार्य केले. तत्कालीन सामाजिक चौकटीला स्वीकारून धर्म सुधारण्याचा मार्ग महानुभावांनी स्वीकारला होता. तात्त्विक पातळीवर महानुभवांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला. महानुभव संप्रदायांमध्ये विविध जातीतील अनुयायींचा समावेश असल्याचे दिसून येते. संप्रदायातील दीक्षितांनाच केवळ 'चातुर्वर्ण्य चरेद् भैक्ष्यम ' असा विचार मांडून महानुभवांनी आपले पुरोगामीत्त्व सिद्ध केल्याचे दिसून येते. महानुभावांनी स्त्रिया,शूद्र,सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय केली. महानुभाव पंथाने धर्मशास्त्र व साहित्याचे दार समाजातील उपेक्षितांसाठी खुले केले.
महानुभाव संप्रदायांनी स्त्रियांना साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. महदंबा,उमाईसा यासारख्या विदुषी स्त्रिया महानुभाव संप्रदायाच्या उदारमतवादी विचारप्रणालीतून निर्माण झाल्या. उत्तम साहित्यकृती स्त्रियांनी त्या काळात निर्माण केल्या. स्त्रियांना महानुभावांनी विचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले. महानुभाव संप्रदायाचे हे सामाजिक कार्य काळाच्या खूप पुढे होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार कृतीत उतरवणारा महानुभाव संप्रदाय विवेकवादी ज्ञानवादी ठरतो. या योगदानातून महानुभाव संप्रदायाने आद्य मराठी कवयित्री महदंबा घडवली.असे आपल्याला म्हणता येईल. परकीय आक्रमणांनी दूषित झालेल्या पर्यावरणात आपल्या विचारांची साहित्यकृतींच्या संवर्धनासाठी महानुभवांनी लिपींचे उपयोजन केले. चक्रधर स्वामींच्या नंतर ६०-७० वर्षांनी मात्र मराठीतील हे गद्य पद्य भंडार सकळ,सुंदर इत्यादी लिपींच्या माध्यमातून बंदिस्त झाले. सुमारे सातशे वर्षे मराठी समाज या ज्ञान ठेव्यापासून वंचित राहिला. अर्थात अशा बंदिस्तपणामुळे हे वाङ्मय विपर्यस्त बनले नाही. ते मूळ स्वरूपात अभंग,अखंड राहिले. यातून तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे महानुभाव संप्रदायाचे सांस्कृतिक कार्य मोलाचे वाटते.
समारोप : -
प्रस्तुत लेखात महानुभाव संप्रदायाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. एक धार्मिक संप्रदाय म्हणून या संप्रदायाकडे पाहता येत नाही. तर तेराव्या शतकातील एक प्रबोधन चळवळ म्हणून महानुभाव संप्रदायाकडे पाहता येते. महानुभाव संप्रदायाचे मराठी संस्कृतीसाठीचे योगदान भव्य दिव्य आहे. साहित्यनिर्मिती,सामाजिक सुधारणा,धर्म सुधारणा या संदर्भात महानुभव संप्रदायाने उदारमतवादी,विवेकशील, ज्ञाननिष्ठ परंपरा जन्माला घातली. महानुभाव संप्रदायाची सामाजिक, सांस्कृतिक फलश्रुती मोठी आहे. महानुभाव संप्रदायातील ग्रंथकारांनी आपल्या परतत्त्वस्पर्शी प्रतिभेने मराठी साहित्याची थोर परंपरा निर्माण करून महाराष्ट्रातील लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. समूहमनाला आवाहन करणाऱ्या महानुभाव साहित्याची तथा लोकसाहित्याची परंपरा आजही दुःखितांचे,शोषितांचे पतितांचे दुःख कमी करण्याचे कार्य करते. महानुभावांच्या पारमार्थिकृत साहित्याने महाराष्ट्र संस्कृतीची जडण - घडण केलेली आहे.अभिजात वाङ्मयनिर्मितीचे कार्य महानुभावांनी केले. महानुभाव सांप्रदायाचे वाङ्मय हे बहुस्तरीय विविधांगी स्वरूपाचे आहे. वाङ्मयनिर्मितीतील विपुलता,अभिजातपणा लक्षात घेण्यासारखा आहे. महानुभाव संप्रदायाने समन्वयवादी भूमिका ठेवली. विविध विचार,तत्त्व यांचे मनोमिलन महानुभवांनी घडवून आणले. मराठी भाषेच्या उपयोजनातून महानुभवांनी या भाषेला समृद्धता, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. जातीव्यवस्थेला महानुभवांनी नकार दिला. महानुभवानी स्त्री स्वातंत्र्य, प्रतिष्ठा यांचा आग्रह धरला. सांकेतिक लिपींचे निर्मिती कार्य महानुभावांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करते. या ठळक मुद्द्यांच्या आधारे महानुभावांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य विशद करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.
संदर्भ ग्रंथ : -
१. कुलकर्णी श्रीधर रंगनाथ ,मध्ययुगीन मराठी साहित्य एक पुनर्विचार ,राजहंस प्रकाशन ,पुणे, १९९५
२. गोसावी र. रा. पाच भक्तीसंप्रदाय, मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे,आवृत्ती दुसरी,१९९८
३. भावे विनायक लक्ष्मण ,महाराष्ट्र सारस्वत ,पॉप्युलर प्रकाशन ,मुंबई, सहावी आवृत्ती १९८२
४. सरदार गं.बा., संत वाड्मयाची सामाजिक फलश्रृती, लोकवाङ्मय गृह प्रकाशन ,मुंबई ,नववी आवृत्ती २०१४
५. तुळपुळे शं.गो.,स्मृतीस्थळ,अनमोल प्रकाशन ,पुणे ,दुसरी आवृत्ती १९९०
६. नशिराबादकर ल.रा., प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ,फडके प्रकाशन, कोल्हापूर ,सहावी आवृत्ती १९९७
----------------------------------------------
खूप छान सर
उत्तर द्याहटवा