॥ "दीड दमडीचे प्रसिद्धी लेलूप कचाकडी विचारवंत "॥
॥ १ ॥
आज प्रसिद्धी मिळवण्याची खूप सारी साधने उपलब्ध आहेत. केवळ प्रसिद्धीतून पैसा मिळवता येतो. पैशातून प्रसिद्धी मिळवता येते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कशाचं ही भांडवल केलं जाऊ शकतं. कोणाचं दुःख, वेदनाही विकली जाऊ शकते. कोणावर झालेल्या बलात्कारच्या विषयतून सुद्धा प्रसिद्धीची पोळी भाजण्यात काही लोक अग्रेसर असू शकतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःचे खाजगी आयुष्य पणाला लावणारी मंडळी असतात. काही लोक आयुष्यभर भाषण विकत राहतात. इतिहासाचे एकांगी मांडणीतून, भावनिकतेतून समाजाच्या हाती काहीच लागत नाही. किंबहुना समाजाचं नुकसान होते. महाराष्ट्रभर भाषण विकणाऱ्या लोकांचा आता एक वर्ग तयार झाला आहे. एके काळी भाषण ऐकणे हे मनोरंजनाचे साधन होते. शिवाजीराव भोसले,व. पु. काळे, पु ल देशपांडे, लक्ष्मण देशपांडे ,शंकर पाटील, द. मा. मिरासदार ,बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या माणसांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांचे कलांचे उपयोजन केले. काहींनी एकपात्री प्रयोग ,काहींनी कथाकथन काहींनी इतिहासाचे गौरवीकरण करून आपले शब्द विकले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या भावनांची भव्य दिव्य स्वरुपातील मांडणी केली. इतिहासातील घटना प्रसंगांना भावनिक रूप देऊन वीरता, कारूण्यमय स्वरूपात मांडणी करून वाह - वाह मिळवण्याचे महाराष्ट्रात थोर थोर प्रयोग झाले आहेत. सुरुवातीच्या काळात लोकांकडे फारशी मनोरंजनाची साधनं नव्हती. वेळच वेळ होता. नुसत्या शिळोप्याच्या गप्पा मारत लोक घंटाभर बसून रहात . या गावगप्पाना आणखीन जोड मिळण्यासाठी लोकांचा टाईमपास करण्यासाठी ,वरील प्रकारचे महान महान खेळ सुरू झाले. ते बहरत गेले.यातून समाजाला काही मिळत होते का ?या प्रश्नाचे उत्तर देणे अतिशय अवघड आहे. काही विचारवंतांनी समाजाचे दिशा दिग्दर्शन केले असेल. काही विचारवंतांच्या मांडणीतून समाजात मूलभूत बदल झाले असतील . त्या महान विचारवंतांना तूर्तास बाजूला ठेवू .
॥ २ ॥
चमकोगिरी करून झोळ्या भरणारांचा विचार येथे अपेक्षित आहे. भाषणांचा, प्रसिद्धीच्या वेगवेगळ्या माध्यमांचा, साधनांचा वापर करून काही लोकांनी चुकीचा इतिहास सांगितला. तरुणांची माथी भडकवली. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे जीवन ,दुःख, वेदना सहजतेने मांडून कष्टकऱ्यांच्या जागण्याचे वरवरचे चित्र मांडून कष्टकऱ्यांना विनोदाचे विषय बनवले गेले. यावर या बऱ्याचं कार्यक्रमातून अभिरूचीचे राजकारण लढवले गेले. कष्टकऱ्यांमध्ये भाषा, मूल्य ,जीवनदृष्टी बाबत न्यूनत्व पेरणारी मांडणी करून कष्टकऱ्यांच्या जगण्याला हास्याचा विषय करून उच्चभ्रू समाजाचे मनोरंजन करण्याचे परंपरा फार सनातन आहे. मुळात व्याख्यानमाला किंवा भाषण ऐकण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात नेमका कोणी सुरू केला. याबद्दल मागोवा घेतला असता काही गोष्टी लक्षात आल्या. महाराष्ट्रातील व्याख्यानमालानां दीडशे वर्षांपेक्षा अधिक जास्त मोठी परंपरा आहे. इसवीसन १८७५ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील पहिली व्याख्यानमाला सुरू केली. न्यायमूर्ती रानडे यांच्या वत्कृत्वोजक सभेने वसंत व्याख्यानमाला सुरू केली. या उपक्रमाचे महाराष्ट्रभर अनुकरण झाले. आज महाराष्ट्रात ४०० च्या वर सार्वजनिक व्याख्यांमलांचे कार्य सुरू आहे. या सर्व व्याख्यानमालांना एकत्र करून संघटना बांधण्याचे कार्य काही लोकांनी केले आहे. वक्तांची विषय वार यादी उपलब्ध व्हावी. व्याख्यांमालांसाठी अनुदान मागण्याचे सुद्धा जोरदार प्रयत्न झाले आहेत. या सगळ्यातून आजच्या घडीला 'महाराष्ट्र सार्वजनिक व्याख्यानमाला समन्वय समिती पुणे ' या संस्थेची स्थापना झालेली आहे. समितीचे मुख्य कार्यालय पुण्यातील 'टिळक स्मारक मंदिर ' हे ठरविण्यात आलेले आहे . या संस्थेच्या अध्यक्षपदी माननीय जयंतराव टिळक, दीपकजी टिळक या लोकांनी आतापर्यंत भूषवले आहे. हा इतिहास सांगण्यापाठीमागे एकूण भाषण ऐकणारा, व देणार्यांचे हेतू स्पष्ट व्हावे ही अपेक्षा आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या गरजेतून, अभिरुचीतून व्याख्यानमालांचा जन्म झाला. या सगळ्या व्यवस्थेवर आजही अभिजनांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व टिकवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था नवनवे रूपे धारण करत आहे. या सगळ्या प्रस्थापित व्यवस्था व अभिजनांच्या अभिरुचीच्या उपक्रमांचा समाज जीवनावर काय परिणाम होतो ? नेहमी समाजातील अभिजनांच्या अनुकरणातून खालचा समाज स्वतःचे अभिजनीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजनांच हुभे हुभ अनुकरण इतर समाजाला करता येत नाही. कोणत्याही क्षेत्रात संख्यात्मक वाढीतून गुणात्मक वाढीकडे दुर्लक्ष होते. जस जसं बहुजन समाज वेगवेगळ्या क्षेत्रात स्थापित होतो तस तसा त्या क्षेत्रातील मूलभूत चौकटीला धक्का पोहोचतो. यातून एक नवीनच अर्धवट व्यवस्था उभी राहते. गेल्या विशेषता पन्नास वर्षातील व्याख्यानमालांचे स्वरूप व त्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करत आहे.
॥ ३ ॥
हळूहळू व्याख्यानमाला मधून ब्राह्मणी टक्का कमी झाला. शहरातील वाढत्या जागतिकीकरणामुळे नव्या साधनांच्या आगमनामुळे ब्राह्मणी व्यवस्थेचा अशा सामाजिक उपक्रमातील सहभाग कमी झाला. ब्राह्मण लोकांच्या रिकाम्या जागांवर बहुजन स्थापित झाले. आणि नव्या विचित्र जुगाडी व्यवस्थेचे पर्व सुरू झाले. महाराष्ट्रातील मुंबई पुणे शहरात दीर्घ परंपरा असणार्या व्याख्यानमाला धडाधड बंद पडत आहेत. पुण्यातील मसापच्या विविध व्याख्यानमालाना किती लोक उपस्थित असतात याविषयी न बोललेलं बरं. शहरातून व्याख्यानमाला हद्दपार होण्याच्या वाटेवर आहेत. अभिजनांच्या व्यवस्थेविषयी आकर्षण असलेल्या बहुजन या क्षेत्रात मोठ्या संख्येने उतरत आहेत. तालुकावजा शहरात मोठ्या प्रमाणात नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे. शिक्षक, बँक कर्मचारी ,डॉक्टर, वकील, प्राध्यापक, छोटे-मोठे व्यवसयिक ज्यांच्याकडे पैसा आहे पण प्रसिद्धी नाही. समाजात ओळख नाही. समाजात ओळख ,प्रसिद्धी निर्माण करण्याची चाह या वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. प्रसिद्धीचे खाज भागवण्यासाठी अर्धशिक्षित समाजात स्वतःला स्थापित करण्यासाठी ही मंडळी जोमाने कामाला लागले आहेत. तालुका वजा शहरात आजही दोन ते चार टक्के ब्राह्मण टाका शिल्लक आहे. हा टक्का इतर बहुजन समाजातील व्यवस्थेला अनुकूल असलेल्या लोकांना सोबत घेऊन व्याख्यानमालांचे ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रभर करत आहे. मुळात ब्राह्मणी वृत्तीतून निर्माण झालेली ही व्यवस्था बहुजनांना वेगवेगळ्या कारणासाठी आकर्षित करत आहे . महाराष्ट्रभर प्रसिद्धीचा हव्यास असलेला वर्ग उदयाला आला आहे . या वर्गाची गरज भागवण्यासाठी व्याख्यानमला, संस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे ठरत आहेत. महाराष्ट्रभर तेच ते वक्ते आणि तेच तेच विषय घेऊन काही मंडळी सार्वजनिक पैशाने प्रवास करत आहेत. काही मंडळींनी व्यवस्थेचे गमक लक्षात घेऊन कार्यक्रम हाती घेतले आहेत. काही प्राध्यापक मंडळी, कलावंत मंडळी, बुजुर्ग विचारवंत, लेखक मंडळी या व्याख्यानमालामधून विचारांची प्रभा पाडत आहेत.काही प्राध्यापक मंडळी आपल्या अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून पैसा ,प्रसिद्धी मिळवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. स्वतःचा व्यासंग, विदवत्ता, कलात्मकताची स्वतः जाहिरात करून समाजा मनावर ठसवत आहेत. समाज माध्यमातून आपली हसरी मुद्रा मिरवून स्वतःला स्थापीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या गावात कुणीचं विचारत नाही. परंतु दूरदूरच्या गावांमध्ये ही मंडळी कला उर्फ सुमार सादरीकरण विकत आहेत. रोजच्या नैमत्तिक कार्याकडे साफ दुर्लक्ष करून, चुकवेगिरी करून मिरवणारे लोक संख्येने वाढत आहेत. बुजूर्ग कलावंत मंडळींना चालू व्यवस्थित कुणी हिंग लावत नाही. अशी मंडळी ढेरपोट्या अवस्थेत विविध कार्यक्रम करत आहेत. साधारण वयस्कर असणारे कलाकार सादरीकरणातून या व्यवस्थेतून थोडा फार पैसा मिळवत आहेत. बुजुर्ग विचारवंत ,लेखक म्हणून घेणारी पिलावळ महाराष्ट्रभर तयार झाली आहे. अत्यंत सुमार कलाकृती लेखन कार्य केलेले सुमार लोक व्याख्यानमालेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून कला सादर करत आहेत. या सगळ्या मंडळींना लोक सहन का करतात ? त्याला कारण आहे या व्याख्यामालांच्या ,सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात राजकारणी मंडळी व त्यांची पिलावळ असते. ही मंडळी संपूर्ण समाजाला वेठीला धरून हे कार्यक्रम घेतात. राजकारणी मंडळी दादागिरी करून गरीब लोकांना पावत्या, वर्गणी देण्यास भाग पडतात. मोठमोठे श्रीमंत उद्योजक ,व्यापारी, प्रतिष्ठित डॉक्टर ,वकील यांच्या बायकांचा समावेश तुम्हाला या उपक्रमात हटकून दिसतो. घरात बसून कंटाळलेल्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या बायका या उपक्रमांमध्ये दिसतात. आबाल वृद्धांना वेठीस धरून हे सगळे कार्यक्रम घेतले जातात. एखाद्या गावातील मोठी शाळा, महाविद्यालयाला केंद्र करून हक्काचे रसिक, प्रेक्षक मायबाप जमवून हे प्रसिद्ध लोलूप वृत्तीचे लोक आपली खाज भागवून घेतात. यामध्ये एखादी शाळा किंवा महाविद्यालय व्यवस्थापनातील मंडळी आणि राजकारणी मंडळी यांच्या एकत्रीकरणातून हा सर्व सांस्कृतिक, वाङ्मयीन ,व्याख्यानमालांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रमातून होणाऱ्या भाषणाचे, कार्यक्रमांचे स्वरूप हे खास टिपिकल असते. गेल्या तीस ते चाळीस वर्षात या प्रसिद्धीचाटू लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे . काही तर स्वतःच्या खर्चाने येतात. पण मला भाषण करू द्या . असं म्हणतात . तुम्ही फक्त बोलवा असा एक सर्वसाधारण गट या मंडळींत असतो. दुसरा गट येण्याजाण्याचे नाममात्र शुल्क घेऊन या भाषणांच्या कार्यक्रमांना हजर राहतो . पण तिसरा गट हा जास्त धूर्त असतो . गाडीचा खर्च, ड्रायव्हराचा वेगळं खर्च, जेवणाचा खर्च वेगळा, वरून मानधन घेणारा हा वर्ग असतो. या वर्गाचे आयोजकांशी लागेबांधे असतात . हितसंबंधातून या लोकांना हे आर्थिक लाभ भेटत असतात. हे लोक भाषणातून काहीच नवीन सांगत नाहीत. इतिहासातील, समाजसुधारकांच्या जीवनातील घटना-प्रसंग अतिरंजितपणे मांडून ही मंडळी वेळ मारून नेतात. शिवव्याख्याते ,भीमव्याख्याते, धर्मव्याख्याते फक्त भावनिक, जोर जोरात बोलून भोळ्याभाबड्या लोकांचे रंजन करतात. समोर बसलेल्या समाजाचे मानसशास्त्र, मानसिक जडण-घडण लक्षात घेऊन महापुरुषांच्या जीवन पट अतिरंजित रूपात मांडले जातो. भावनिक होऊन लोकांना हातबल बनवणारे हे विचारवंत असतात. समाजाच्या भावनांशी खेळून लोकांना पंगू बनवणारे दिडदमडीचे व्याख्याते, कलावंत समाजाचं मोठं नुकसान करत आहेत. समाजातील सदविवेक, सम्यक विचार मारून भावनिक अस्थिरता निर्माण करत आहेत. असमतोल विचार मांडून समाजाला अस्थिर करत आहेत. हा सगळा खटाटोप कशासाठी ? घटकाभर प्रसिद्धीसाठी ? सेल्फीच्या लाईकसाठी ? फेसबुकच्या लाईकसाठी ? आभासी व्हाट्सअपच्या खोट्या अभिनंदनासाठी ? समाजातील विवेकाचा आपण खून करत आहोत. असे या लोकांना वाटत नाही. एक शिव व्याख्याता शिवाजी महाराजांचे मोठेपण सांगण्यासाठी समकालातील घटना ,प्रसंग सांगतो . समकालातील दंगलीचा प्रसंग सांगतो. हा प्रसंग सांगताना तो एखादी अश्लील कथा रंगवून सांगितल्यासारखी ही गोष्ट सांगतो. समोरच्या समाजाच्या भावनांना हात घालून स्वतःचा मोठेपणा मिळवणारे हे भाषण करणारे समाजद्रोही आहेत. काहीतरी भव्य दिव्य आपण कार्य करत आहोत असे बॅनर, जाहिराती 'स्व'मोठेपण मिरवणारी ही वृत्ती अतिशय घातक आहे. संपूर्ण समाजाच्या भावनांशी खेळून प्रसिद्धी मिळवणाऱ्या नतद्रष्ट लोक समाजाचे दोषी आहेत. समाजात असे नतद्रष्ट लोक उजळ माथ्याने फिरत आहेत. या लोकांना कितीही बोला ते लाजत नाहीत. विशेषतः स्री व्याख्याते ,कलावंत सनातनी विचार मांडतात. समाजातील महापुरुषांच्या नावाने प्रसिद्धीचा कटोरा घेऊन गावोगावी फिरणाऱ्या वृत्तींना आवर घालण्याची गरज आहे. महापुरुषांच्या जीवनातील तेच ते प्रसंग, घटना सांगणे. महापुरुषांच्या विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी न करता सोयीने मांडणी करणारे विद्वान समाजद्रोह करत आहेत.
॥ ४ ॥
अनेक वेळा विशिष्ट समाजसुधारकांच्या जातीतील अनुयायी समोर बसलेले असतात. त्यांच्याच जातीतील वक्ता त्यांचेचं दुःख त्यांच्या समोर मांडत असतो. हा सगळा कृतक सोहळा करून काही लोकांना प्रसिद्धी मिळते. ही मंडळी प्रसिद्धीसाठी काहीही करण्यास तयार असतात. स्वतःचे कार्यक्रम, भाषणे स्वतःचं आयोजित करून प्रसिद्धी मिळवणारे काही अल्पसंतुष्ट विचारवंत असतात. हे सगळं प्रस्थापित अभिरुचीला अनुकूल असणारं आहे. प्रस्थापित व्यवस्था कायम करण्यासाठी बिनडोक, प्रसिद्धीला हपापलेले लोक साधन म्हणून वावरत आहेत. या मंडळींना आपला उपयोग केला जातो आहे. यातील जाणीवपूर्वकता लक्षात येत नाही.आभासी वास्तवातील प्रसिद्धीसाठी हे लोक जीव ओवाळून टाकत आहेत. खरं तर ही मंडळी समाजावरून ओवळून टाकण्यासारखी आहेत.
पुरोगामी विचार मांडणारेही चुकीचा इतिहास सांगतात. दाखले आणि तेच ती उदाहरणे देतात. एकांगी मांडणीतून समाजाचे मन जिंकता येते. लोकांना काही वेळासाठी गुंगीचे औषध देणारी भाषणे, कार्यक्रम समाजात विष पेरतात .या विचारातून पेटलेले भूसुरुंग समाजाला उद्ध्वस्त करतात.
॥ ५ ॥
महापुरुषांच्या नावाने सोंग घेऊन काही लोक बोलत राहतात. काही जण माँ साहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, छ.शिवाजी महाराज यांच्या भूमिका घेतात. यातून महापुरुषांचे विटंबन होते. पंरतु अस्मिता टोकला गेल्यामुळे तसे कोणाला वाटत नाही. खोटी वेशभूषा,अलंकार गळ्यात घालतात. लोक त्यांच्या बहूरूपाचा आदर करतात. अर्धा काम तिथेच होऊन जातं.काहीतरी कर्णकर्कश्य, वेगवेगळे आवाज काढून, नकला करून, मुख्यतः भावनिक आवाहन करून समाजातील भावना अंजरत- गोंजरत कार्यक्रम घडू लागले आहेत. महानगरातील ,शहरातील लोक या कार्यक्रमांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तालुक्याच्या शहरात जाती, वर्ग, पंथ यांचे बुरुज पक्के असतात. पब्लिक गोळा करण्याचे करणाऱ्या संस्था असतात. अनेकांच्या प्रसिद्धीची खाज ,शूद्र राजकारणी अशा प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत आहे. राजकारणी लोक मॉब जमवून स्वतः ची छबी निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमांचा वापर करतात.धूर्त राजकारणी प्रसिद्धीसाठी हे सगळं करतात . समाजासाठी, जातीसाठी आपण काही तरी करतो आहोत ,ही भावना प्रबळ होण्यासाठी याचा उपयोग होतो .
पूर्वी लोकांच्या अंगात यायचं. देवी अंगात घुमायची. भीतीपोटी , श्रद्धेपोटी लोक अंगात आलेल्या माणसांचा आदर करत. तसेच आता काही लोकांच्या अंगात महापुरुष येतात. महापुरुषांच्या श्रद्धेपोटी, आदरापोटी या भाषणावाल्या प्रसिद्धीचाटू लोकांना आदर भेटतो. हे लोक या सामाजिक भावनांचं भांडवल करून तुंबड्या भारतात. अशा लोकांना कोणी अडवत नाही. श्रद्धा ,भावना प्रचंड टोकदार झाल्यामुळे या लोकांची दुकानदारी चालते. या सगळ्या प्रवृत्तीमागे प्रसिद्धी आणि अर्थकारण यांचा प्रभाव आहे. या भावनिक भाषणबाजीचा राजकारणातील भाव वधारला आहे. गेल्या बाजारी असे लोक विविध पक्षाचे आमदार, खासदार ,पदाधिकारी बनत आहेत. हे समकालीन वास्तव भीषण आहे. नवीन शाळा ,महाविद्यालयातील पोरं समाज माध्यमांमधून अशा भिकारचोट लोकांचे विचार अवगत करता आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचा या सगळ्यात फायदा आहे. मूळ विचारांची चिकित्सा होणार नाही. यासाठी हे लोक फायदेशीर आहेत . या प्रसिद्धलेलूपांची, सगळ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमाची प्रसिद्धी फार जोरात होते. ते अर्धवट लोक स्वतःची प्रतिमा उजळ करून कार्यक्रमाचे निमंत्रण मिळवण्यात पटाईत झाले आहेत. छोट्या छोट्या पेपरच्या मॅनेज बातम्या, फोटो, व्हिडिओ टाकून समाजात आपण फार थोर कार्य करत आहोत असा समज हे लोक करून देत आहेत. या लोकांनी सांस्कृतिक अभिरुचीचे राजकारण ओळखणे गरजेचे आहे. प्रसिद्धीलोलूप वृत्ती-प्रवृत्तीना वेळीच आळा घलणे गरजेचे वाटते.
----------------------------------------------
धन्यवाद !!!
-------------------
डॉ. गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग ,
श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका रावेर जिल्हा जळगाव
पिन -४२५५०८
मोबाईल नंबर -९४२१०८१२७० ई-मेल-dhembregr@gmail.com
पूर्वी देवी अंगात यायची तसे हल्ली काहींच्या अंगात महापुरुष येतात....क्या बात कही! .... सपशेल लोटांगण!
उत्तर द्याहटवातुमचं मत बळ देते
उत्तर द्याहटवाप्रथमता ब्लॉग चांगला लिहिला आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन पण शाळा महाविद्यालयातील पोरं समाज माध्यमातून आशा भिकार चोट लोकांचे विचार अवगत करत आहेत हे जरा मला खटकले आपण म्हटलेल्या सर्व विषयांवर मार्गदर्शन करणारे व विचार व्यक्त करणारी माणसं अशा प्रकारच्या असतात असं नव्हे त्यामुळे आपल्या या स्फोटक विधानाचा विचार व्हावा व भाषा नम्र असावी हे सांगणे एवढा मी जरी मोठा नसलो तरी जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला
उत्तर द्याहटवाप्रथमता ब्लॉग चांगला लिहिला आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन पण शाळा महाविद्यालयातील पोरं समाज माध्यमातून आशा भिकार चोट लोकांचे विचार अवगत करत आहेत हे जरा मला खटकले आपण म्हटलेल्या सर्व विषयांवर मार्गदर्शन करणारे व विचार व्यक्त करणारी माणसं अशा प्रकारच्या असतात असं नव्हे त्यामुळे आपल्या या स्फोटक विधानाचा विचार व्हावा व भाषा नम्र असावी हे सांगणे एवढा मी जरी मोठा नसलो तरी जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला
उत्तर द्याहटवापरखड. सध्या महाराष्ट्रातील व्याख्यानांचे संस्कृतिक राजकारण. त्यातून राजकीय समीकरणे यांची जुळवाजुळव. प्रसिद्धीसाठी हावरट झालेली माणसे मुळातच चळवळीसाठी कशी घातक असतात.व्यवस्था त्यांचा कसा फायदा करून घेतो. हे वेगळे संस्कृतीक राजकारण आपण मांडलात.
उत्तर द्याहटवाबिनचूक व सडेतोड मांडणी
उत्तर द्याहटवा'आधी तो त्याग पाहिजे केला मग शब्द बोलावा आपला'ही उक्ती विसरलेली माणसे आता समाजात प्रसिद्धीसाठी काहीही विषय काढून माथी भडकवतात... गेल्या पंचवीस वर्षांत वाढलेल्या भुरट्या संघटना आणि त्यांचे दहशतवादी विचारवंत यांनी एकेरी मांडणी समाजात चालविली आहे. सध्या त्या वर एक महाशय कसे चुकत आहेत हा लेख वाचनात आला, तुम्ही अधिक उघडे करून झोडले आहे, धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवा