॥"मराठी वाङ्मयाचे अध्ययन आणि अध्यापना पुढील प्रश्न ? " ॥
॥ १ ॥
इंग्रजांच्या भारतातील आगमनानंतर त्यांनी स्वतःहून गरजेपोटी भारतीय समाजाला शिक्षण देण्यास सुरुवात केली. काही एक योजना बांधून शिक्षणाचा इंग्रजांनी प्रसार केला. विज्ञानाच्या मूलभूत ज्ञान शाखांचे अध्ययन भारतीय समाज करू लागला. मानव्यविद्याशाखांतील ज्ञान भारतीय समाजाला देणे गरजेचे आहे. असे उदारमतवादी इंग्रजांना वाटले. यातून तत्त्वज्ञान, इतिहास ,भूगोल समाजशास्त्र ,तर्कशास्त्र इत्यादी विविध ज्ञानशाखांचे अध्ययन भारतात सुरू झाले. याबरोबरच इंग्रजी साहित्य आणि भाषा यांचे अध्यापन व अध्ययनला प्रारंभ झाला. एकोणिसाव्या शतकात शिक्षित पिढ्या भारतात तयार होऊ लागल्या. या नवशिक्षित पिढ्यांना इंग्रजी वाङ्मयातील उपरेपणाची जाणीव होऊ लागली .यातून अनुवादित ,भाषांतरित साहित्याची लाट आली. इंग्रजीतून, संस्कृतमधून उत्तम वाङ्ममयीन कलाकृतींचे भाषांतर, अनुवाद घडू लागले. या सगळ्या पार्श्वभूमीतून आधुनिक मराठी साहित्याचा प्रारंभ व विकास झाला. हळूहळू शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले. समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित होत गेला. या साक्षर वर्गाच्या नव अभिरुचीच्या गरजेतून मराठी साहित्याची निर्मिती वेगाने होऊ लागली. या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या वाङ्मय निर्मितीवर इंग्रजांचा त्यांच्या अनुकरणाचा प्रभाव अधिक होता. विसाव्या शतकात शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले होते. मराठी वाङ्मयाची निर्मितीही वेगवेगळ्या प्रेरणामधून संख्यात्मकदृष्टी व गुणात्मकदृष्ट्या वाढत होती. नव्याने अनेक विद्यापीठांची निर्मिती झाली. स्वातंत्र्याच्या टप्प्यावर आपण पोहोचलो होतो.
॥ २ ॥
स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून स्व देश ,स्व भाषा, स्व संस्कृती यांच्याबद्दलच्या गौरवीकरण्याच्या भावना प्रबळ होत होत्या. यातूनच मराठी वाङ्मय आणि भाषा अशा मिश्र अध्यापन, अध्यायनाला सुरुवात झाली. शिक्षण घेणाऱ्या वर्गाच्या भावना लक्षात घेऊन प्राचीन मराठी वाङ्मयातील कलाकृतींचे अध्ययन व अध्यापन केले जाऊ लागले. संस्कृत भाषेच्या प्रभावातून पंडिती परंपरेतील दुय्यम वाङ्मयीन मूल्य असलेल्या कलाकृतींचे अध्ययन व अध्यापन सुरू झाले.शिक्षण घेणाऱ्या आणि देणाऱ्या वर्गामध्ये उच्चवर्गीय जातींचा भरणा अधिक होता. त्यातून पंडिती वाङ्मयातील आंबट कलाकृतींचे मनःपूर्वक अध्यापन, अध्ययन सुरू झाले. विसाव्या शतकातील मराठी वाङ्मयातील कलाकृतीही अध्ययनाला, अध्यापनला होत्या. हळूहळू विज्ञानाचे महत्व वाढत होते. रोजगाराच्या नव्या संधी तयार होत होत्या. अभियांत्रिकी, मेडिकल, विज्ञानाच्या मूलभूत ज्ञान शाखांमधील रोजगारच्या संधी डोळ्यासमोर ठेवून उच्चवर्णीय जातींचे मानव्यविद्याशाखांच्या अध्ययन-अध्यापनकडे दुर्लक्ष होऊ लागले. हळूहळू या समाजाला सिलिकॉन व्हॅलीचे स्वप्न पडू लागले.
महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढत होता.१९६० नंतरच्या काळात महाराष्ट्रभर नवीन महाविद्यालय सुरू झाली होती. ही महाविद्यालय सुरू करण्यात उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचा मोठा वाटा होता. काँग्रेसच्या नव राजकारणामुळे सत्ताकारणामुळे ब्राह्मणापेक्षा संख्यात्मक अधिक असणाऱ्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या जातीतून नवे नेतृत्व उभे राहात होते. या नव्या नेतृत्वाने शाळा-महाविद्यालयांच्या स्थापनेला सुरुवात केली. या महाविद्यालयांच्या स्तरावर मराठी वाङ्मयाचे अध्ययन व अध्यापन सुरू झाले.विसाव्या शतकातील लेखक त्यांच्या कलाकृतींचे अध्ययन ,अध्यापन सुरू झाले होते. या नव महाविद्यालयात अध्यापन करणारा ब्राह्मण वर्ग मोठ्या संख्येने होता. याबरोबरच कृषीक जातीतील श्रीमंत काही लोक अत्यंत कमी प्रमाणात अध्यापनात होते. आता अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अर्ध्या पेक्षा थोडे कमी ब्राह्मण जातीतील तितकेचं कृषीक जातीतील लोक तर १० -२०% इतर उपेक्षित जातीतील लोक होते. वाङ्मयाच्या अध्यापनातील सैद्धांतिक व्यूह अत्यंत स्पष्ट असणारा असा हा आध्यापक वर्ग होता. इसवी सन १९६० ते १९९० या काळात नवशिक्षित सर्व जातीतील वर्ग तयार झाला.लोकसंख्या वाढत होती. त्याला अनुसरून नवे शाळा, महाविद्यालये तयार होत गेले. हळूहळू ब्राह्मण वर्गाने नव्या संधीचा शोध घेतला. नव्या क्षेत्रांचा लाभ व मार्ग दर्शन प्राप्त झाल्याने पारंपारिक क्षेत्राकडे ब्राह्मण वर्गाचा ओढा कमी झाला. नव्या संधीचे मार्ग खुले झाल्यामुळे ब्राह्मण वर्गाचे मोठ्या प्रमाणात स्थांनातर झाले. त्यातून खाली झालेल्या वाङ्मयीन अध्यापनाच्या रोजगाराच्या संधीमध्ये कृषक समाजातील नवशिक्षित वर्ग जोराने शिरू लागला. ब्राह्मण वर्गाने शिक्षणाच्या प्रणालीवर आपले वर्चस्व अजून कायम ठेवले होते. यातून अध्यापनाच्या क्षेत्रातील ब्राह्मणी वर्चस्वाला अजून धक्का पोहोचला नव्हता. ब्राह्मणी अभिरुची लक्षात घेऊन मराठी वाङ्मयाचा अभ्यासक्रम तयार केले जात होते. शिकणारे आणि शिकवणारे संख्येने जास्त कृषक जात समूहातून आले होते. परंतु ब्राह्मणी वर्चस्वाला, अभिरुचीला धक्का देण्याची क्षमता या नवशिक्षित वर्गात नव्हती उरल्यासुरल्या ब्राह्मण वर्गाने कृषीक जातीतील काही लोकांशी युती करून ब्राह्मणी अभिरुची ,वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. केशवसुत ,गोविंदाग्रज ,खांडेकर , फडके ,पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, बोरकर पु. शि . रेगे, व्यंकटेश माडगूळकर ,द मा मिरासदार शंकर पाटील यांच्या बरोबरीनेच कुसुमाग्रज, मर्ढेकर, गाडगीळ यांच्या कलाकृतीचे मराठी वाङ्मयात अध्यापन ,अध्ययन सुरु ठेवलेले दिसते. इसवी सन १९९० नंतर तोंडी लावण्यापुरते ग्रामीण, दलित साहित्यातील एखादी कलाकृती अभ्यासक्रमाला ठेवल्या जात होत्या.
आजही एखाद्या लेखकाला, कलाकृतीला मान्यतेची मोहर हवे असल्यास ब्राह्मणी समीक्षेची, समीक्षकाची पाठीवर थाप हवी असते. कलाकृती, लेखक उत्तम असूनही मान्यतेसाठी ब्राह्मणी नियतकालिकाला शरण जाणारी मनोभूमिका ही खास प्राचीन अशी आहे. आजही काही नियतकलिकात लेख छापून आल्यास लोक भावूक झालेले आम्ही गेल्या बाजारी पाहिले आहेत . असो !
पुण्यातील एका ब्राह्मण जातीचे वर्चस्व असलेल्या महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक १९९५-९६ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना एक वक्ता म्हणाला हा शेवटचा पेशवा सत्तेतून जात आहे. हे विधान वाङ्मय अध्यापनाच्या जातीय मानसिकताकडे लक्ष वेधणारे आहे. याला काही लोक साक्ष आहेत. इसवी सन १९९० नंतर महाराष्ट्रात कृषक जातीच्या राजकारणाचा उदय झाला. या जातींनी सत्तासंबंध राखण्यासाठी शाळा, महाविद्यालय सुरू केली. आता मराठी वाङ्मयाच्या अध्यापनात आणि अध्ययनात अर्ध्या कृषक जातीची संख्या तर अर्ध्याला थोड्या कमी उपेक्षित जाती संख्या तर ५-६% ब्राम्हण वर्गाचे लोक होते. मूळच्या कृषक जातींच्या सत्तासंपादनातून नवी अस्मिता तयार झाली होती. ब्राह्मण वर्गातील ५ - ६ % वाल्यांना कृषक जातीतील लोक शाळा-महाविद्यालयात नोकरीवर घेईनासे झाले. आपल्या जातीतील लोक मिळत असताना दुसरे कशाला घ्या ?असा रोखठोक व्यवहार यामागे होता .
॥ ३ ॥
इसवी सन २००० सालापर्यंत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या मराठी विषयाच्या विभागांमध्ये केवळ ब्राम्हण वर्गाचे वर्चस्व असलेले दिसते . त्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृषक जातींनी या पदाकडे आपला मोर्चा वळवला. इसवी सन २००० सालानंतर महाराष्ट्रातील कृषक जाती व आरक्षणामुळे इतर जातीतील लोक या पदाकडे वळले. किंवा त्यांनी ती पदे मिळवली. इसवी सन २००० नंतर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या मराठी विषयच्या विभागांमधील विभागप्रमुखांची नावे डोळ्यासमोर घ्या.
पारंपारिक पदव्युत्तर व पदवी पातळीवरील शिक्षणात आता बऱ्यापैकी कृषक जाती व उपेक्षित जातीचा टक्का वाढला होता. ब्राह्मणेतर जातींना सत्ता तर मिळाली. पण ती राबवायची कशी ? असा प्रश्न होता. यातून मराठी विषयाच्या अध्यापनात उरल्यासुरल्या ब्राह्मणांनी कृषक जातींना फोडून आपल्या सत्ता वर्चस्वला राखण्याचा प्रयत्न केला. इसवी सन २००० नंतर मराठी विषयाच्या अध्यापनात ,अध्ययनात अर्ध्या कृषक जाती आणि तितक्याचं उपेक्षित जातीतील लोक होते. वाङ्मयाच्या अध्यापनातील ,अध्ययनातील गांभीर्य कमी झाले होते. सांस्कृतिक व्यवस्थेत ब्राह्मणी वर्चस्व राखण्याचे नवे मार्ग निर्माण झाले होते. सुमार विद्यार्थीवर्ग मराठी वाङ्मयाच्या अध्यायनाकडे वळू लागला होता. या पातळीवरही मराठी वाङ्ममयाच्या अध्यापनावर, अभ्यासक्रमावर ब्राह्मणी विचारांचा पगडा होता. महात्मा फुले यांचे पुस्तक अभ्यासक्रमांत लावण्याचे धाडस लोक करू शकत नव्हते. ते धाडस करण्यासाठी कृषक जातीतील नेतृत्व पुढे यावे लागले. २००६-०७ नंतर मराठी वाङ्मयाच्या अध्यापनाचा ,अध्ययनाचा, अभ्यासक्रमाचा दर्जा वेगाने घसरू लागला. संपूर्ण व्यवस्थेत हितसंबंधांचा नवा जन्म झाला. यातून वेगवेगळ्या विद्यापीठातील अभ्यासक्रम निर्माण करणाऱ्या लोकांच्यात हितसंबंधांचा पूल तयार झाला. तुझ्या विद्यापीठात माझे पुस्तक लाव. माझ्या विद्यापीठात तुझे पुस्तक लावतो. असा प्रकार अभ्यासक्रमात होऊ लागला. आणि हा सगळा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादला गेला. काही प्राध्यापक वर्गाने स्वतःची प्रकाशने काढून अभ्यासक्रमातील कलाकृतीबदल ढवळा ढवळ केली. पूर्ण वेळ प्राध्यापकाची नोकरी असताना प्रकाशन व्यवसाय कसा काय करता ? प्रत्येक महाविद्यालयात जाऊन पुस्तके कसे काय विकता ? हा धंदा चालवण्यासाठी अभ्यासमंडळ ताब्येत घेण्यात काही मंडळींना यश आले . या मंडळींना नैतीक वगैरे प्रश्न विचारण्याची सोय कुणाकडे नाही. प्रकाशन व्यवसायातील लाखो रुपयांच्या ऊलाडालीचा अभ्यास मंडळाशी व अभ्यासक्रमाशी जवळचा संबंध आहे.
त्या राजकारणात आपण पडू नये. ती सगळी मोठी माणसं !!
२००० साला नंतर कृषक जातीतील लोक शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाच्या उच्च स्थनावर पोहोचले. भ्रष्टाचारी, निर्ढवलेली माणसे या सत्ता संबंधावर वर्चस्व राखत आहेत. २००५-०६ नंतर कृषक जातीतील विद्यार्थ्यां कलाशाखांमधून कमी होऊ लागले. अर्ध्या पेक्षा खूप कमी टक्यांपर्यंत हा टक्का खाली आला. अर्ध्या पेक्षा खूप जास्त पर्यंत उपेक्षित जातीचा टक्का आला . किरकोळ संख्येत आता ब्राह्मण जातीतील विद्यार्थी मराठी वाङ्मयाचे अध्ययनात शिल्लक राहिले. उपेक्षित, वंचित विद्यार्थ्यांना दुसऱ्या कोणत्याचं संधी नसल्यामुळे हे या कौशल्यहीन शिक्षणात टिकून राहिले.२०००नंतर विद्यार्थींचा वाङ्मयाच्या अभ्यासक्रमाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन गंभीर राहिला नाही. काहीही अभ्यासक्रमाला लावा. आम्ही आपले गाईड बाजारातून घेऊन येऊ . एका रात्रीत गाईड वाचू आणि पास होऊ . हा नवा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये तयार झाला. वाङ्मयाचे अभ्यासक्रम, अध्यापन आणि अध्ययन यांचा दर्जा पार मागणी तसा पुरवठा या बाजाराचे रूपत आला. या सर्व प्रक्रियेतून दिवसेंदिवस मराठी वाङ्ममयाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड घटत आहे. कौशल्यहीन, पदवी प्रमाणपत्र देणारा अभ्यासक्रम तयार होत आहे. अत्यंत सुमार कलाकृती अभ्यासक्रमात येत आहेत. या सुमार कलाकृतींसाठी सुमार संदर्भ ग्रंथ अभ्यासक्रमात येत आहेत .केवळ तू मला खुश कर. मी तुला खुश करतो. यापलीकडे लोक जायला तयार नाहीत. कृषक जातीतील हितसंबंधांना प्राधान्य देणारी नवी व्यवस्था बांडगुळासारखी वाढत आहे. वेगाने मराठी वाङ्मयचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थींची संख्या कमी होत आहे. रोजगार मिळणार नसेल तर तो अभ्यासक्रम शिकून तरी काय फायदा ? असा रोखठोक सवाल विद्यार्थी विचारत आहेत. मराठी वाङ्मयाचे अध्यापन करणारा प्राध्यापक वर्ग केवळ स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी झटत आहे. विद्यापीठाच्या व यूजीसीच्या नियमाला अनुसरून बौद्धिक कृती करणारा प्राध्यापक वर्ग पोटभरू झाला आहे. हा वर्ग समाजाला काहीच देऊ शकत नाही. अशा बिकट काळातही प्राध्यापक वर्ग हेवे-दावे ,कंपूशाहीत गुंतून पडला आहे . समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याची क्षमता नसलेला कूपमंडूक प्राध्यापक वर्ग आत्ममग्न झाला आहे.
॥ ४ ॥
मराठी वाङ्मयाच्या ,भाषेच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी काहीच मौलिक परिवर्तन घडत नाही. किंबहुना कूपमंडूक प्राध्यापक वर्गाला बदल नकोच आहेत. आहे तसे चालू द्या.असं म्हणणारा हा वर्ग फार दिवस ढकलू शकणार नाही असे वाटत. मोठ्या प्रमाणात सगळ्याच पारंपरिक शिक्षणाच हेच होताना दिसत आहे. नोकरीतील बढती , विविध समित्यांवर नियुक्ती,पगारात वाढ यासाठी महाराष्ट्रभर हजारो ग्रंथ निघत आहेत . हजारो शोधनिबंध छापले जात आहेत. यातून कुणाचं भलं होत नाही. वांझोट्या वाङ्मयीन व्यवहारातून समाजाला काहीच मिळत नाही. पुस्तकांच्या कागदासाठी नुसतीच झाडे तोडली जात आहेत.
प्रसिद्धी, मानसन्मान मिळवण्यासाठी छोट्या सावलीचे लोक एकत्र आले आहेत. महाराष्ट्रभर वाङ्मय व्यवहारात वावरणाऱ्या लोकांचे लागेबांधे निर्माण झाले आहेत. तुझ्या गळा ,माझ्या गळा, गुंफू हितसंबंधांच्या माळा .असा वर्ग वाढला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील सुमार रद्दीतून भविष्य शोधणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आपण नुकसान करत आहोत. याबद्दल कुठली खंत ना खेद या वर्गात दिसून येतो.
मराठी वाङ्मयाच्या अध्यापनात, अध्ययनात ,अभ्यासक्रमात जातीय मानसिकतेने कळस गाठला आहे. अभ्यासमंडळातील लोक बहुमताच्या जोरावर आपल्या जातीतील लोकांच्या कलाकृती अभ्यासक्रमाला लावत आहेत. आपल्या जातीच्या अस्मितांचे मोठेपण जपणाऱ्या कलाकृती अभ्यासक्रमाला लावल्या जात आहेत. अभ्यास मंडळातील उपेक्षित वर्गातील प्रतिनिधी हातबलपणे हे सगळं पाहात आहेत. त्यांना खूष करण्यासाठी त्यांचीही एखादी ,दुसरी कलाकृती अभ्यासक्रमाला लावून उपकृत केल्याची, दातृत्वाची भावना ही मंडळी जपत आहेत. वाङ्मयीन मूल्य, विचार मूल्य ,दर्जा यांच्यापेक्षा जातीय अस्मितांना महत्त्व देणारे अभ्यास मंडळातील प्रवृत्ती महाराष्ट्रभर सगळ्या विद्यापीठात सारखीच दिसते.
॥ ५॥
अभ्यासक्रमांच्या अध्ययन , अध्यापनातील जातीय भावना पुढील टप्पावर ही कायम असलेली दिसते. पुढे एम फिल. पीएच.डी पदवीच्या संशोधनातही हीच भावना दिसते. आपल्या जातीचा लेखक संशोधनासाठी घेणे. आपल्या विचारांचा प्रवाह संशोधनासाठी घेणे. यातून वाङ्मयीन मूल्यमापनाची काय अपेक्षा ठेवावी. वाङ्मय व्यवहाराचे गौरवीकरण करण्याकडे सर्वांचा कल असल्याचे दिसून येते. यातून फक्त पदवी पदरात पाडून घेतली जाते. भक्ती सांप्रदायाच्या अध्ययनाबाबतही असाच दृष्टीकोन ठेवणारे लोक दिसतात. मूल्यमापन टाळून महती सांगणारे विद्वान म्हणून वावरतात . माझ्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.म्हणून मी वारकरी संप्रदायावर संशोधन करणार आहे.अशी भूमिका घेणाऱ्यांना संशोधनात फार मौलिक भर घालता येत नाही. उपेक्षित लोक दलित साहित्य ,भटक्या विमुक्तांचे साहित्य संशोधनासाठी घेतात. मुस्लिम समाजातील मुस्लिम समाजाचे, आदिवासी समाजातील आदिवासी समाजाचे साहित्य संशोधन व अध्ययनासाठी घेतात. यातून वाङ्मयीन व्यवहाराचे, संशोधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जातीय, सांप्रदायिक मानसिकतेतून आपण कधी बाहेर पडणार आहोत ? याबरोबरच मार्गदर्शकही आपल्यात जातीतला घेणार आहे. असं विद्यार्थी म्हणतात तेव्हां या मागील मनोभूमिका काय असते ? यातून वाङ्मयाच्या अध्यापनाचे ,अध्ययनाचे ,संशोधनाचे, मूल्यमापनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. समाजातील वेगवेगळ्या सांस्कृतिक ,वाङ्मयीन व्यवहारात आरवणाऱ्या - मिरवणाऱ्यांचा एक वर्गच उदयाला आला आहे .असा राजकारणी लोकांचे जोडे उचलणारा एक वर्गच तयार झाला आहे .नुसती हांजी हांजी करून फायदा लाटणारा एक मोठा वर्ग प्राध्यापकांमध्ये तयार झाला आहे. काही विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्माण करणाऱ्या मंडळींनी एकदम राजकारणी लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी राजकारणातील मंडळींच्या सुमार कलाकृती अभ्यासक्रमात लावून टाकल्या. राजकारणी मंडळीपुढे निष्ठा व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक वर्गात स्पर्धा सुरू असल्यासारखे दिसते. राजकारणी मंडळींची चरित्र-आत्मचरित्र यांचा काही भाग अभ्यासक्रमात लावून त्यांच्याशी जवळीक साधण्याची प्राध्यापक पांढरपेशा वर्गाची वृत्ती अत्यंत लाळघोटी आहे. ही वृत्ती स्वाभिमान विकणारी वृत्ती आहे.
एकमेकांना सहाय्य करू !स्वार्थाची तळी उचलून धरू ! असा वागणारा प्राणी तुम्हाला कुठेही भेटू शकतो. सगळ्याच क्षेत्रात या वर्गाचा दबदबा आहे. या वर्गाला उघडे पाडणाऱ्याला ते खिंडीत गाठून चिमकुरे काढतात.
फायदा, स्वार्थासाठी मिठाची गुळणी धरणारे विद्वान पैशाला पन्नास मिळतात. हे विद्वान अगदी शांत राहून हितसंबंधांचे राजकारण खेळतात. या बोटचेप्या वर्गाच्या वागण्यावर कुणीच काही बोलत नाही. काही मंडळी अगदी शांत ,संयम ठेऊन काटा काढतात . हा वर्ग लय घातक ,बेरकी आहे. एखाद्या ढोंगी महाराजा इतकाच संयम या मंडळीकडे असतो. तुम्ही कितीही आदळ आपट करा ते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू देत नाहीत. राजकारणी कोणत्याही विचारधारेचे, आदर्शांचे सत्तेवर येवो. ही मंडळी त्यांची हुजरेगिरी करण्यासाठी अगदी तयार असतात. मागील भाजपा सरकारच्या काळात प्रत्येक जण लांबून लांबून संघी असल्याचं भासवत होता. त्या काळातील लाळघोटे विद्वान विद्यापीठाच्या व्यवस्थापन सदस्यांसमोर लोटांगण घालताना दिसत होते. सहा महिन्यात सरकार बदलले की लोक सेक्युलर झाले.या बिनलाज्या मंडळींचं काय करावे ? अभ्यास मंडळातील सदस्य निवडीपासून या राजकारणाला रंग भरू लागतात. किती विद्वान,अभ्यासू माणसं अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत जातीपातीवर येतात. मुळात विद्यापीठाचा सत्ताकेंद्रचा परीघ अत्यंत छोटा असतो. या सत्ता केंद्रातील लहान लहान पदे, समित्या, लाभ मिळवण्यासाठी विद्वानांचे, संवेदनशील अभ्यासकांचे खरे पितळ उघडे पडते. त्यांच्यातला खरा माणूस या ठिकाणी उघडा पडतो. या सर्व वृत्ती-प्रवृत्ती शैक्षणिक प्रक्रियेला दूषीत करून टाकतात. या सर्व वृत्ती प्रवृत्तींचा अभ्यासक्रम निर्मितीत सक्रिय सहभाग असतो. माणसे शेवटी मोठ्या मोठ्या गोष्टी करत छोटी होतात. हे मात्र खरं आहे. काही नाठाळ मंडळी तर केवळ एखाद्या विचारसरणीच्या दावणीला स्वतःला बांधून घेतात. असं काही नुसतं दाखवतात. तर काही भक्त असतात. ते सनातनी विचार मांडत राहतात. या विचारधारेला महत्व देणाऱ्या कलाकृती अभ्यासक्रमात कशा लागतील यासाठी लॉबिंग करतात. हे सगळं राजकारण अभ्यासक्रमातील कलाकृतींच्या समावेशाबाबत असते. वेगवेगळ्या लाभाचे पद मिळवून या मंडळींना अमर वगैरे व्हयचं असतं काय ? हे कळण्यास मार्ग नाही. मराठी अभ्यासक्रम निर्मीतीत अशा मंडळींचा भरणा वाढला आहे. सुमार कलाकृती लावून हजारो विद्यार्थ्यांना छळणारे , प्राध्यापकांना शिकवायला भाग पाडणारे लोक संख्येने वाढत आहेत. या मंडळींनी स्वतःचे कंपू तयार करून आपले गट-तट मजबूत केले आहेत. काळ हे गड-तट तोडेल पण तेव्हां वेळ गेलेली असेल. काही अभ्यासक विद्यापीठातील अभ्यासकांशी , अभ्यास मंडळातील सदस्यांशी सलगी करतात .महाविद्यालयातील चर्चासत्रात , वेबीनार मध्ये या मंडळीना बोलवून पाकीट देऊन खूश करतात .मग ज्यांनी बोलवलं होतं त्यांच्या पाकीटाला (मीठाला) जागून त्यांचे सुमार ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून लागतात .वरील लेखातील मते ,विचार अधिक स्पष्ट असले तरी ते कटू सत्य आहेत .
डॉ. गणपतराव ढेंबरे,
श्री.व्ही.एस. नाईक महाविघालय,
रावेर ,ता.रावेर, जि. जळगाव
पिन :-४२५५०८
मोबा : -९४२१०८१२७०
ईमेल -dhembregr@gmail.com
सर उत्तम मांडणी
उत्तर द्याहटवासर खूप छान मार्मिक,जागृत करणारा लेख आहे ;अत्यंत गरज आहे असे प्राध्यापक व विद्यार्थी हित जोपासणारा लेख. आपले अभिनंदन
उत्तर द्याहटवा9689710441
उत्तर द्याहटवाफार दिवसानंतर इतका चांगला सध्या मराठी वाङ्मयाच्या संदर्भात विद्यापीठीय अभ्यासक्रम मंडळ संदर्भात, अध्ययन,अध्यापन आणि एकूणच अभ्यासक्रम निर्मितीच्या संदर्भात हरवलेल्या सर्व गांभीर्याचा वेध फार नेमकेपणे आपण घेतलात. या सर्व गोष्टी मागील कारणांचा वास्तव पूर्ण शोध या लेखात आलेला आहे. सर्व प्राध्यापकांनी वाचलाच पाहिजे. व्यवस्थेतील सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा लेख आहे.
उत्तर द्याहटवाडॉ. गणपतराव इतका अप्रतिम , डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहिल्याबद्दल आणि विशेष म्हणजे तुमच्या धाडसाबद्दल जाहीर अभिनंदन ! महाविद्यालय व विद्यापीठीय दर्जा किती घसरला आहे, याचे सर्व प्रतिबिंब आपल्या लेखातून अभिव्यक्त झाले आहे. शिक्षण क्षेत्राचे झालेले हे अध:पतन शिक्षित गुलामांची पिढी निर्माण करणारे झाले आहे. शिकविणारी पिढीच जर बौद्धिक व व्यवस्थेची गुलाम झाली असेल तर पुढच्या पिढ्या देखील तशाच तयार होत राहणार. कधी कधी वाटतं सारे आभाळच फाटले आहे, पण, आपल्यासारख्या काही व्यक्तीमुळे वाटते की नाही " अजून येतो वास फुलांना, अजूनही माती लाल चमकते ,"
उत्तर द्याहटवाडॉ. शिवाजी एंडाईत , चाकण