बुधवार, २४ जानेवारी, २०२४

चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून ! भावी पिढीसाठी चे मार्गदर्शक तत्त्वज्ञान

 " चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!भावी पिढीसाठी चे मार्गदर्शक तत्त्वज्ञान "

 प्रस्तावना : - 

 डॉ. आ.ह. साळुंखे यांची ओळख एक विचारवंत म्हणून आहे. संस्कृत भाषेचे अभ्यासक म्हणून डॉक्टर साळुंखे आपणास परिचित आहेत. भाषा, साहित्य ,तत्त्वज्ञान ,धर्मशास्त्र यांचे गाढे अभ्यासक म्हणून डॉक्टर साळुंखे महाराष्ट्राला परिचित आहेत. संशोधनात मग्न असणारे ,समाज प्रबोधनाला दिशा देणारे साक्षेपी विचारवंत म्हणून डॉक्टर साळुंखे आपल्या सर्वांना परिचित आहेत. कादंबरीकार,इतिहास संशोधक अशा विविधांगी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर साळुंखे यांचा आपल्याला परिचय आहे. परिवर्तनवादी पुरोगामी जीवनवादाचे पुरस्कर्ते हीच डॉक्टर साळुंखे यांची खरीओळख आहे. निरंतरपणे केलेल्या अभ्यासातून गवसलेले शाश्वत सत्य डॉक्टर साळुंखे यांनी आपल्या लेखनातून मांडले आहे. सर्वसामान्य माणसांना दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतील अशी मूल्य, विचार ,सुभाषिते, तत्त्वज्ञान डॉक्टर साळुंखे यांनी चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये , म्हणून!या ललित लेखांच्या पुस्तकातून मांडले आहेत.


 सोलापूर येथील संचार या दैनिकासाठी डॉक्टर साळुंखे यांनी हे लेख लिहिले आहेत. या लेखांचे मूल्य लक्षात घेऊन जुलै 2002 मध्ये लोकायत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाच्या जवळपास दहा वृत्त प्रकाशित झाले आहेत. यावरून या पुस्तकावरील वाचकांचे प्रेम आपल्या लक्षात येते. दैनिकासाठी केलेल्या सदर लेखनाला, ललित लेखनाला अभ्यासक ,समीक्षक स्फूट लेखन मानतात. त्या लेखनाला फुटकळ , हलकेफुलके लेखन मानण्याचा प्रघात मराठी साहित्यात व समीक्षेत आहे. सर्वसामान्य वाचकांना दैनिकातील सदर ,लेख ,लेखमाला विशेष रुचणारी असते. या लेखांचे पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याची परंपरा मराठीमध्ये जुनी आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले,विजया राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ ,माधव गडकरी यांची सदर लेखनपर पुस्तके प्रसिद्ध आहेत.


 श्री.के. क्षीरसागर, अ.ना. देशपांडे ,द. ग. गोडसे ,रवींद्र पिंगे, गंगाधर गाडगीळ, बाळ सामंत,जयवंत दळवी, वि.ग. कानिटकर, राम शेवाळकर,सुरेश भट ,गोविंद तळवळकर ,शरणकुमार लिंबाळे, उत्तम कांबळे ,अर्जुन डांगळे ,नामदेव ढसाळ ,राजन गवस ,अरुण साधू, अनिल अवचट ,भाऊ पाध्ये , दिलीप चित्रे अशी नामवंत आणि यशस्वी स्तंभ लेखकांची यादी मराठीमध्ये आपणास सांगता येईल. 


या परंपरेत डॉक्टर आ.ह. साळुंखे यांचे सोलापूर येथील संचार या दैनिकासाठी केलेले हे ललित लेखन अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे. डॉक्टर साळुंखे या पुस्तकाविषयी लिहितात, "खरं तर या पुस्तकाला 'छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी ' असं काहीतरी नाव द्यावं असा आधी माझ्या मनात होतं. प्रतीक्षा ते नाव दिलेलं नसलं तरी पुस्तकाचा आशय तोच आहे. जीवनाच्या प्रवासात मला आलेले छोटे छोटे अनुभव मी इथं नोंदवले आहेत. पण वरवर पाहता छोट्या वाटणारे या अनुभवांमध्ये बरेच काही महत्त्वाचा असं साठवलेलं आहे , अशी माझी भावना आहे. "  वरील डॉक्टर साळुंखे यांच्या मनोगतातून या पुस्तकाचे मर्म आपल्या लक्षात येते. जीवन जगत असताना काही महत्त्वाच्या नसणाऱ्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. यातून जीवनातील खरा आनंद आपण गमवून बसतो. जीवनातील खरा आनंद कशात आहे ? याविषयीचे मार्मिक चिंतन प्रस्तुत पुस्तकातून अभिव्यक्त होते. चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून ! या पुस्तकात एकूण २९ छोटे छोटे ललित लेख आहेत. या लेखांचे विषय वेगवेगळे आहेत. परंतु सर्व लेखांमधून अभिव्यक्त होणारा आशय हा जीवन समृद्धपणे कसे जगावे याविषयीचा आहे.या प्रत्येक ललित लेखातून डॉक्टर आ.ह. साळुंखे यांचे संस्कृती, साहित्य,समाज या विषयाचे गंभीर तत्त्वज्ञान प्रकट होते. सर्वसामान्य माणसाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून अगदी सहज मिळतात. जीवनाचे महत्त्व लक्षात घेऊन क्षणभंगुर असणाऱ्या जीवनात आपण प्रत्यक्ष मनापासून जीवन अनुभवले पाहिजे. असे लेखकाला वाटते. जीवनातील प्रत्येक क्षणातील माणसाचं असणं, त्या अनुभवामध्ये स्वतःला केंद्रस्थानी ठेवणारे मानवी मनाचे सौंदर्य या पुस्तकातील लेखातून अभिव्यक्त होते. जीवनाचे मोल जाणून आपण प्रत्यक्ष मनापासून जीवन अनुभवलाय पाहिजे. हे अनुभवण्याची ,जगण्याची प्रक्रिया काय असते ? याविषयीचे चिंतन डॉक्टर साळुंखेंनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. जगण्याचे हे सूत्र   लेखातून मांडले जाते.


 या पुस्तकाचे सार विशद करताना , आशुतोष पाटील लिहितात, "अनेकदा एखादं स्वप्न उराशी बाळगलेलं असतं , पण तिथपर्यंत आपण पोहचतच नाही. अशा वेळी ओंजळीत असलेल्या इतर सुखकणांकडे पाहणंही आपण विसरतो. या उलट कधी आपले एक स्वप्न पूर्ण करताना आपण इतर अनेक स्वप्नकळ्यांना कळत- नकळत तुडवत पुढं निघून जातो. कधी जीवनाचा अर्थच नीट समजून येत नाही. आला दिवस मागं टाकत जातो आपण. कधी कधी जीवनाचे मोल ध्यानात येतं,ते अधिक चांगलं जगायला हवं हेही समजतं, पण पुढं .... आपण त्या दृष्टीनं पाऊल मात्र टाकत नाही. "

 आज मानवी जीवन खूप गतिमान झाले आहे. आभासी जीवन आनंद शोधण्यात माणसे गर्क झाली आहेत. आभासी जीवनात सुख शोधण्यापेक्षा मानवी जीवनातील शाश्वत आनंद ,सुख कशात आहे ? याविषयीचे साधं ,सरळ तत्वज्ञान या पुस्तकातून मांडले आहे. भौतिक गोष्टी मिळवण्याच्या नादात माणूस जगण्यातील खरा आनंद गमावून बसतो. साध्य प्राप्त करण्याच्या नादात निर्माण प्रक्रियेतील आनंद माणसं हरवून बसली आहेत. मोठे ध्येय प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु ध्येय म्हणजे संपूर्ण जीवन नव्हे. जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगला पाहिजे. प्रत्येक क्षण अंतिम क्षण म्हणून जगल्यास जीवनाचा खरा आनंद प्राप्त होऊ शकतो. या विचारांवर डॉक्टर साळुंखे यांनी चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये,म्हणून ! या पुस्तकातून भाष्य केले आहे .



चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून ! या पुस्तकातील लेखांचे स्वरूप आणि विशेष :- 


सदर पुस्तकातील पहिला लेख - मालक हे अधी का सांगितलं नाहीत? हा आहे. या लेखात लेखकाने दोन किस्से सांगितले आहेत. एक किस्सा हा उद्योगपतीचा आहे. धनसंपत्ती मिळवण्याच्या नादात आपल्या आपत्याला गमून बसलेला उद्योगपती या लेखातून लेखकाने उभा केला आहे. जीवनात माणसाला स्वतःच्या गरजांचा,सुखांचा क्रम योग्य प्रकारे लावता आल्यास अनेक गोष्टी सोप्या होतात. आपण साधनांच्या प्राप्तीसाठी वेडे होऊन जातो.विवेक हरवून बसतो.आपले अचूक जीवन साध्य काय आहे?याविषयी संभ्रमात जगतो. याबद्दलचे लेखकाचे मत वाचकाला अंतर्मुख करते.याच लेखात एका कुटुंबाला भेटलेल्या बाहुलीचा किस्सा लेखकाने सांगितला आहे.घरातील लहान मुलीला किंमती बाहुली खेळण्यास न देणाऱ्या कुटुंबाची ही कथा आपल्या सोबतही घडताना दिसते.संपत्ती,सत्ता,प्रतिष्ठा यांच्या मागे न धावता वस्तूंचा योग्य वेळी उपभोग घेणे महत्त्वाचे आहे. यावर लेखकाचे मार्गदर्शन वाचकाला विचारप्रवण बनविते.


 या पुस्तकातील दुसरा लेख मी ५९ व्या वर्षाऐवजी १९व्या वर्षी कन्याकुमारीला जायला हवं होतं ! या लेखात जीवनाविषयीचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.केवळ वस्तूंचा संचय करण्यात जीवन व्यतीत करणे.हा मूर्खपणा आहे.जीवन जगताना साधन म्हणून वस्तूंची गरज असते.वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचे विसरून जातो.जीवन जगताना आपण काय मिळवलं पाहिजे? याविषयीचे मार्गदर्शन या लेखातून मिळते.जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी केली पाहिजे.असे लेखकाला वाटते.आयुष्याच्या उतार वयात काही गोष्टी करताना पश्चाताप झालेले घायाळ मन व्यक्तीला केवळ निराशा देते.असे लेखकाला वाटते.


शक्य तितके पैलू ध्यानात घेऊन मतं बनवू या या ! या लेखात विचार प्रक्रिया निर्दोष बनवण्यासाठी काय केले पाहिजे? याविषयीचे सूत्र लेखकाने मांडले आहे. आपण स्वतःची मते तयार करताना ती नेहमी तपासून घेतली पाहिजेत. एकांगी ऐकीव माहितीवर मत बनू नये.विवेक जागा ठेवून आपण मतं ,विचार मांडले पाहिजेत. मत बनवताना आणि मतांना अनुसरून कृती करताना शक्य तितक्या बाजूनी आधी विचार केला पाहिजे.असे लेखकाला वाटते. विचारपूर्वक संयमाने ,संतुलित मनाने निर्णय घ्यावेत.असा मोलाचा सल्ला लेखकाने या लेखातून दिला आहे.


नावाच्या नात्यापेक्षा हृदयाचं नातं जपणं महत्त्वाचं! या लेखात लेखकाने मानवी नात्याच्या गुंत्याविषयी मार्गदर्शन केले आहे. मानवी जीवनातील असंख्य नात्यांची गुढ गुंफण लेखक शोधू पाहतो.नात्याला नाव देणे गरजेचे असते. तसेच नाव नसलेल्या नात्यालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असते.एकच नातं वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात असते. काही नात्याला अनामिकच राहू द्यावे. असे लेखकाला वाटते. नात्यात शेवटी उत्कट भावना असावी. नाती हीच जीवनातील आनंदाचे उगमस्थान असतात. हे सत्य लेखकाने या लेखातून मांडले आहे.


मृत्यूच्या एकेका घावाबरोबर जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळते! या लेखात लेखकाने जगण्याची,जिवंत राहण्याची,आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची इच्छा कशा प्रकारचे असते. याविषयीचे तत्त्वज्ञान मांडले आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी माणसं प्रयत्न करतात. किंबहुना स्वतःच अस्तित्व टिकून ठेवणे हाच खरा मानवी जीवनाचा अर्थ आहे.जीवनावरची निष्ठा क्षीण होऊ न देता माणसाने बुंधा छाटलेल्या झाडाला असंख्य फुटवे फुटावेत त्याप्रमाणे जीवन जगावे. हा संदेश या लेखातून लेखकाने दिला आहे.


पानगळ झालेली झाडं आपल्यामधलं चैतन्य जपून ठेवतात! या लेखात लेखकाने कितीही संकटं,दुःख आली तरी आपली जगण्याची उर्मी कायम ठेवली पाहिजे. असे मत लेखकाने मांडले आहे. ही उर्मी जिवंत ठेवण्याची प्रेरणा आपण पानगळ झालेल्या झाडांपासून घेतली पाहिजे.निराशेने, वैफल्याच्या जाणिवेन ,दुःखाच्या अनुभवानं पिचलेल्या माणसांना धीर न हरता पानगळ झालेल्या झाडाकडून प्रेरणा घ्यावी. निसर्ग हा सर्वात मोठा जादूगार आहे. या जादूगाराकडून आपण तग धरण्याची प्रवृत्ती धारण करावी असे लेखकाला वाटते.


आपली फुलण्याचीही आणि फुलवण्याचीही क्षमता ओळखू या! या लेखात लेखकाने जीवनात यशस्वी होण्यासाठी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. असे विचार मांडले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन नकळत तुम्हाला जिंकण्यासाठी प्रेरक ठरतो. नकारात्मक दृष्टिकोन माणसाला नकारात्मक बनवतो. अपयशाच्या गर्तेत नकारात्मक दृष्टिकोन घेऊन जातो.रवींद्र नावाच्या युवकाच्या उदाहरणातून लेखकाने फुलण्यासाठी आणि फुलवण्यासाठीची क्षमता स्वतःमध्ये असतेच फक्त त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा? याविषयी मार्गदर्शन केले आहे.


कितीही फुललो तरी आणखी फुलण्याला वाव असतोच! या लेखात लेखक अधिकाधिक परिपूर्णतेचा आग्रह धरतो. परिपूर्णतेच्या दिशेने जो प्रवास केला जातो.तो अखंडपणे चालू ठेवावा लागतो. मानवी जीवनात व्यक्ती कितीही चांगले कार्य करत असली तरी त्या कार्यात आणखी सुधारणेला वाव असतोच असतो. असे लेखकाला वाटते. मानवी जीवनात विकासाला पूर्णविराम असत नाही. विकासाला परिसीमा असत नाही. हे तत्व लेखकाने प्रस्तुत लेखातून मांडले आहे.


पानांआड दडलेल्या फुलांवर सुगंध वारा पसरवू या! या लेखात लेखकाने समाजामध्ये अनेक लोक खूप कर्तुत्वान ,सक्षम असतात.परंतु त्यांची उपेक्षा होते. या व्यक्तींच्या वाट्याला सन्मान येत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रतिभा फुलली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे कौतुक झालं पाहिजे. त्या व्यक्तीच्या योगदानाची दखल घेतली गेली पाहिजे. समाज प्रतिभाशाली होण्यासाठी समाजातील जाणत्यांनी प्रयत्न करावे.असे लेखकाला वाटते.


मरणापासून पळणं म्हणजे जीवनापासून पलायन ! या लेखात लेखकाने सॉक्रेटिस या महान तत्त्वत्त्याच्या मरणाचा प्रसंग सांगितला आहे. न्यायालयाने सॉक्रेटिसला मृत्यूची शिक्षा दिली. तुरुंगातून पळून जाण्याची संधी असताना सॉक्रोटिसने ती नाकारली. कायद्याने स्थापित केलेल्या न्यायालयाने दिलेली शिक्षा मी स्वीकारली पाहिजे. असे सॉक्रेटिसला वाटते. जीव वाचवण्यापेक्षा आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून मृत्यू स्वीकारणारा सॉक्रेटिस लेखकाला महान वाटतो. आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून मरण पत्करून त्याच्या जीवनावरील प्रेम त्यांने व्यक्त केले असे लेखकाला वाटते.


पाणिनीचा मृत्यूही आम्हा शिक्षकांना शिकवून जातो! या लेखात लेखकाने पाणिनी या अभ्यासकांच्या ज्ञाननिष्ठेविषयीची आस्था मांडली आहे. पाणिनी आपल्या विद्यार्थ्यांना व्याघ्र या शब्दाच्या उत्पत्ती विषयी माहिती देत होते. ही एक कथा आहे. प्रत्यक्ष वाघ तिथे येतो. आणि पाणीनींचा प्राण घेतो. या कथेतून शिक्षक कसा असावा? याविषयीचा धडा आपणास मिळतो. पाणिनी  सारखी ज्ञाननिष्ठ शिक्षकांमध्ये आली पाहिजे. असा आशावाद लेखक इथे व्यक्त करतो.



एक-एक नवा शब्द जाणणं, म्हणजे एक- एक नवा मित्र जोडणं ! या लेखात लेखकाने शब्दांचे महात्म्य सांगितले आहे. एका विद्यार्थ्याने प्राध्यापक असणाऱ्या लेखकाशी  संवाद केला. यातून विद्यार्थ्याने रोज काहीतरी नवीन शिकावे असे लेखकाला वाटते. एक- एक शब्द जाणणं म्हणजे एक-एक नवा मित्र जोडणं. असे मानायला हवे. नवे शब्द आत्मसात करणे म्हणजे आपला लोकसंग्रह वाढवणं असे लेखकाला वाटते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील उत्तम नात्याची परिसीमा लेखकाने या लेखातून दाखवून दिली आहे.


पोहायला शिकायचं असेल,तर पाण्यात उतरलंच पाहिजे! या लेखात लेखकाने नव्या पिढीचे व्यक्तिमत्व  खुरटण्यामागच्या कारणांची चिकित्सा केली आहे. अनुभवाची समृद्धी मिळवण्यासाठी फायदा तोटा बाजूला ठेवला पाहिजे. असे लेखकाला वाटते. प्रत्यक्ष व्यवहारात उतरून विशिष्ट कृती करण्याचा सराव केल्याशिवाय यश मिळत नाही.हे तत्त्व लेखक स्पष्ट करतो. पाण्यात न उतरता पोहायला शिकणारी व्यक्ती असूचं शकत नाही. ज्ञान,अनुभव मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करावे लागते. असे लेखकाला वाटते.


सर ,आय नॉट लाईक! या लेखात लेखकाने चेन्नई येथे वास्तव्यास असताना भेटलेल्या चिन्नू नावाच्या तरुणाचे व्यक्तीचित्र या लेखातून शब्दबद्ध केले आहे.या चिन्नशी साम्य असणारा जपानी तरुण लेखकाला भेटला. या दोघांचे जगण्याचे सूत्र समान होते. दुसऱ्याच्या वस्तू , दुसऱ्यांच्या कष्टाची फळ आपल्या 'स्व' शी जोडून मोठे व्हायचं नाही.हे सूत्र लेखकाला दोन भिन्न व्यक्तींकडून समानपणे भेटते.आपल्या दैनंदिन आयुष्यातही आपण वरील सूत्राचा अवलंब करावा. असे आवाहन लेखक या लेखातून करतो.



पत्रिकेतल्या कालसर्पयोगाला डॉक्टरनं भ्यावं? या लेखात लेखकाने बहुजन समाजातील एका एम.एस. डॉक्टरची कथा सांगितली आहे. डॉक्टर असूनही पत्रिकेला महत्त्व देणारा माणूस समाजाबरोबर स्वतःचे नुकसान करून घेतो. या डॉक्टरने विज्ञानाचं,वैद्यकीय शास्त्राचं ज्ञान घेतलं आहे. त्या व्यक्तीचं असं वागणं लेखकाला व्यतीत करून गेले.डॉक्टरने ज्ञानाच्या प्रकाशाने समाजातील अंधार दूर करायला पाहिजे होता.असे लेखकाला वाटते. समाजातील वास्तवावर लेखकांनी धीटपणे भाष्य केले आहे.


तीन कुटुंबांची स्वागतार्ह परिवर्तनशीलता या लेखामध्ये लेखकाने तीन कुटुंबांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देऊन परिवर्तनाचा पुरोगामी मार्ग कसा स्वीकारला. याबद्दलचा एक अनुभव मांडला आहे.अविवाहित तरूण आणि विधवा तरुणी यांच्या विवाहाची , परिवर्तनाची गोष्ट या लेखातून लेखकाने मांडली आहे. या तरुण दांपत्याच्या आदर्शाची समाजाला गरज आहे.असे लेखकाला वाटते. विधवा  स्त्रीचे आयुष्य सोपं करणारे या तीन कुटुंबांची दृष्टी समाजातील लोकांनी स्वीकारावी. असा आग्रह लेखक धरतो.प्रतिष्ठेपेक्षा माणसांचे दुःख ओळखून समाजातील व्यक्तींनी कृती करावी. असा आदर्शवाद लेखक इथे मांडतो.



भाषेतली पुरुषप्रधानता बदलणं हे एक आव्हानच ! या लेखात भाषेतील पुरुष प्रधानते विषयी लेखकाने मांडणी केली आहे.भाषेचे संस्कार अंतर्मनात जाऊन खोलवर रुजून बसतात. आपल्या व्यक्तीत्वाचा ,आपल्या विचार प्रक्रियेचा,आपल्या चिंतनाचा अविभाज्य घटक बनून जातात. एका उदाहरणाच्या सहाय्याने लेखकाने हे सूत्र स्पष्ट केले आहे.भाषेतील पुरुष प्रधानता कमी करण्यासाठी लेखक काही उपाय सुचवतो. जाणीवपूर्वक स्त्रीलिंगी शब्द अधिक वेळा वापरून वाक्यरचना करण्यामुळे भाषेच्या क्षेत्रातही समता निर्माण होऊ शकते. असा लेखकाचा आशावाद आहे.


पत्नी गुलाम म्हणून हवी, की मैत्रीण म्हणून ? या लेखात लेखकाने समाजातील स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषप्रधान दृष्टिकोन अभिव्यक्त केला आहे. पती-पत्नी दोघांमधील नातं अतिशय संवेदनशील नातं असतं. प्रतिगामी दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती पत्नीकडे केवळ गुलाम म्हणून पाहतात. पत्नी ही स्त्री स्वातंत्र्याचा आनंद घेणारे असावी. पत्नी ही हृदयाशी संवाद साधणारी मैत्रीण असावी. असा दृष्टिकोन समाजात विकसित होणे फार गरजेचे आहे. तरुण विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून लेखकाने हे चिंतन मांडले आहे.


माझ्या लेखन-भाषणांमुळं माझ्यातच अधिक परिवर्तन झालं ! या लेखात लेखकाने स्वतःमध्ये घडलेल्या परिवर्तनाची प्रक्रिया मांडली आहे. समाजात अनेक लोक पुस्तकातून , भाषणातून परिवर्तनवादी विचार मांडत असतात. मात्र प्रत्यक्षात ते प्रतिगामी भूमिकेत जगत असतात. डॉ.आ.ह. साळुंखे पुस्तकातून जे विचार मांडतात. भाषणातून जे विचार सांगतात. ते त्याप्रमाणे जीवन जगतात. बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे डॉक्टर साळुंखे जीवन जगतात. स्वतःच्या आयुष्यात बदल करण्यासाठी लेखन आणि भाषण कसं कारणीभूत ठरलं. याबद्दलचं चिंतन लेखकाने या लेखातून मांडले आहे.


मानवी मनाची निर्मितीक्षमता थक्क करणारी आहे! या लेखात लेखकाने स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्नांचे पूर्ण आकलन माणसाला अजून झालेले नाही. माणसाच्या अंतर्मनात खूप गुंतागुंत सुरू असते. वास्तव,कल्पना गूढता यांचे मिश्रण स्वप्नात असते. मानवी मन हे न सुटलेलं कोडे आहे.मानवी मनाची निर्मितीक्षमता विशाल आणि अमर्याद असते. लेखकाला ही क्षमता थक्क करणारी विस्मयकारक वाटते.


आयुष्य म्हणजे चढउताराचा एक प्रवास आहे. यात कुणाला चढण महत्त्वाची वाटते. तर कुणाला उताराचा प्रवास आवडतो. 'चढापेक्षा उताराचा प्रवास क्लेशकारक!' या लेखात लेखकाने जीवनाचे सार सांगितले आहे. कोणत्याही क्षेत्रात अफाट यश मिळवल्यानंतर त्या व्यक्तीच्या अधोगतीचा काळ सुरू होतो. यशाच्या शिखरावरील ती जागा त्या व्यक्तीला खाली करून द्यावी लागते. अनेकांना ही परिस्थिती नीटपणे हाताळता येत नाही. अश्यावेळी माणसाने विवेक शाबूत ठेवला पाहिजे. मनाचा संतुलन राखलं पाहिजे. आपली जागा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण आपलचं प्रतिबिंब पाहायला हवं.जीवनाच्या उताराचा प्रवास आनंदाने करता आला पाहिजे. असे लेखकाला वाटते. 'स्व' प्रतिमेच्या प्रेमात पडणारे असंख्य लोक असतात. एखाद्या व्यक्तीची प्रतिमा कशी निर्माण होते ?त्या प्रतिमेसाठी आवश्यक असलेले गुण प्राप्त केल्याने ती प्रतिमा प्राप्त होते. ती व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्वामधनं तो गुण जास्तीत जास्त प्रकट करत राहते. सद्गुण दाखवण्यापेक्षा आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. असे लेखकाला वाटते. 


आपण कसोटीच्या क्षणी कसे वागतो, हेच खरं निर्णयाक असतं! या लेखात लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकातील वेदिका नावाच्या स्त्रीची कथा सांगितली आहे. सद्गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात खऱ्या अर्थाने निर्माण व्हावेत. हे आपलं ध्येय असलं पाहिजे. असा विचार लेखक या लेखातून मांडतो.भारतीय समाजाच्या दारिद्र्याचे आणि इतर दुःखांचे एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे बदल स्वीकारण्याची मानसिकता नसणे.हे होय.असे लेखक वाटते. एकूण भारतीय समाज,संस्कृती यांचे मनोविश्लेषणचं लेखकाने केले आहे. डॉक्टर साळुंखे केवळ मनोविश्लेषण करून थांबत नाही. तर यावर उपाय सुचवतात. समाजाने विकास साधण्यासाठी सम्यक दृष्टी स्वीकारली पाहिजे. जुन्या-नव्याचं संतुलन साधले पाहिजे. पुढे जाणं आवश्यक आहे. असे लेखकाला वाटते. इष्ट हितकारक दिशेने होणारे परिवर्तन समाजाने सहजतेने स्वीकारले पाहिजे. असे लेखकाला वाटते. बाह्यसृष्टीच्या परिवर्तनाची अनेक उदाहरणे लेखक इथे सांगतो.समाजाने ठरवलं तर स्वतःच्या अंतर सृष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते. एका व्याख्यानाच्या निमित्ताने एका डॉक्टरने सांगितलेला अनुभव वरील विश्लेषणावर लागू पडणार आहे. संधी मिळताच गुन्हेगार जमातीतील एक मुलगा डॉक्टर होतो. हा प्रेरणादायी अनुभव परिवर्तन शक्य आहे ! या लेखातून लेखकाने मांडला आहे.


सुरुंगानं पहाड फोडता येतो,पण कळी उमलविता येत नाही! या लेखात लेखकाने प्रेमाचे,मायेचे महत्त्व सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर,महाकवी भवभूती यांच्या काव्याच्या ओळीतून कळी उमलविण्यासाठी काय गरजेचे आहे. याविषयीची उदाहरणे दिली आहेत. माणसाने कर्तव्यासाठी कठोर जरूर व्हावे. परंतु जिथे कठोरपणा आवश्यक आहे तिथेच तो असावा. किंबहुना स्वभावातील कठोरपणा वर्ज्य करणं उचित असतं. असे लेखकाला वाटते. आपल्याला स्वतःचे व इतरांचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदी करायचे असेल तर प्रेम,जिव्हाळा महत्त्वाचा ठरतो. एखाद्या नाजूक कळीचा जबरदस्तीने फुलात रूपांतर करता येत नाही. किंबहुना ही जबरदस्ती त्या कळीचा अस्तित्व संपवून टाकते. कळीला उमलविण्यासाठी अत्यंत पराकोटीचे नाजूकपण जपले पाहिजे. माणसाच्या फुलण्याचा सुगंध अनुभवण्यासाठी नाजूकता,हळुवारपणा,पराकोटीची संवेदनशीलता महत्त्वाची ठरते.


हे स्वादिष्ट द्राक्ष नाही-हे कडू ,पण औषधी कारलं आहे! या लेखात लेखकाने एका लोककथेच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे वर्णन केले आहे. या लोककथेच्या आशयाशी साधर्म्य असणारा अनुभव लेखकांनी या लेखात मांडला आहे. कोल्हापूरमध्ये एका व्याख्यानानिमित्त लेखक गेले होते. लेखकाचा परिचय प्राध्यापक डॉक्टर वसंत मोरे यांनी करून दिला.ते परिचय करताना म्हणाले की , "साळुंखे सर आपल्या शेजारच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगावचे आहेत. तासगाव द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे.हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण हे काही तासगावचे स्वादिष्ट द्राक्ष नाही- हे कडू कारलं आहे. अर्थात,ते औषधी आहे. " वरील परिचयातून डॉक्टर साळुंखे यांच्या कार्याचा,व्यक्तिमत्त्वाचा अचूक वेध घेतला गेला आहे. समाजातील अनिष्टेतेवर डॉक्टर साळुंखे यांनी कडू कारल्यासारखे औषधी उपचार केले आहेत. लेखकाने कडू आणि मीठ यांच्या महात्म्याचा घेतलेला शोध अतिशय उत्कट आहे. शब्दांच्या अस्तित्व,मूळ शोधण्याची पद्धत लेखकाचा अभ्यास प्रकट करते.


जगामध्ये प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो.परंतु कधीकधी व्यक्ती स्वतःला मालक बनवू पाहतो.नाही तर कुणाचं तरी मालकत्व स्वीकारून गुलाम होतो. या दोन्ही अवस्थांबद्दलचे चित्रण लेखकाने मैं किसी का शहा नहीं, मेरा भी कोई शाहा नहीं ! या लेखात केले आहे. वरील दोन्ही प्रवृत्ती माणसाच्या खऱ्याखोऱ्या माणूसपणाला डाग लावणाऱ्या आणि म्हणूनच विघातक आहेत. दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वावर अतिक्रमण करू नये. तितकच दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अतिक्रमण सहन करू नये. असे लेखकाला वाटते. जीवनाच्या प्रवासात आपलं देण्याचा माप आणि घेण्याचे माप एकच असावं. असे लेखकाने नमूद केले आहे. जीवन हे संघर्षमय आहे. प्रत्येक व्यक्ती अनेक गोष्टी कष्टपूर्वक मिळवत असते. मिळालेल्या गोष्टी टिकवून ठेवण्याची व धारण करण्याचे काही व्यवस्थाचं असत नाही.त्यामुळे त्या गोष्टीची गरज असताना त्या आपल्याला मिळत नाहीत. 


जीवनातले उन्हाळेही पावसाळेच होतील! या लेखात लेखकाने मानवी जीवनातील विसंगती शोधण्याचा प्रयत्न केला आहे. विवेकी वागण्यामुळे माणसाला काय लाभ होतात? हे वरील लेखात लेखक सांगतो. ज्ञान,माहिती,अनुभव आणि जीवनमूल्ये ग्रहण करणं महत्त्वाचे असते.वरील सर्व गोष्टी धारण करणं हे खरं महत्त्वाचं असतं. माणसाने धारणक्षमता जाणीवपूर्वक विकसित करणं महत्त्वाचा आहे. हेच लेखकाने या लेखातून दाखवून दिले आहे.


काळजाच्याही काळजात जपून ठेवावं, इतकं हे जीवन सुंदर आहे! या लेखात लेखकाने जीवनाचे मूल्य विशद केले आहे. आपल्या जीवनाचा शोध घेत असताना स्वतःकडे काय आहे? आणि काय नाही? हे तपासले गेले पाहिजे. स्वतःच्या अपूर्णतेवर मात करणे गरजेचे ठरते. जीवनात द्वेष टाळला पाहिजे. आपण कुणाचा द्वेष केल्याने त्या व्यक्तीचे नुकसान होतेच परंतु आपण स्वतःचे मोठे नुकसान करून घेत असतो. आपल्या जीवनातला विकारांचा धूर टाळला पाहिजे. जीवनात प्रेमाची उब आणि ज्ञानाचा प्रकाश वाढवला पाहिजे. असे लेखकाला वाटते. आणि हेच अंतिम सत्य आहे. आयुष्याच्या प्रवासात जर व्यक्तीला वाटत असेल की सर्व काही मिळवलं. पण जीवन जगायचे तेवढे राहून गेलं. असा पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. असे लेखक ठामपणे सांगतो.

अरे, चांदण्यात भिजायचं राहून गेलं असतं ना! या लेखात जीवनाचे सार लेखकाने मांडले आहे. जीवन फार छोटे आहे.या छोट्या जीवनात माणसांची स्वप्ने मात्र अनंत असतात. एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक स्वप्न चिरडून टाकावी लागतात.लेखक या लेखात एका प्रवासाची आठवण सांगतात.जंगलातून निर्मनुष्य रस्त्याने लेखक मोटारीतून चालला आहे. भीतीचं मळभ मनात दाटले आहे.परंतु निसर्ग लेखकाला खुणवतो.भीतीचं, काळजीचं सगळे भास दूर होतात. लेखक निसर्गातील चांदण्यात भिजून निघतो. चांदण्यात भिजायचा अनुभव लेखकाला समृद्ध करून जातो. जीवनातील प्रत्येक क्षण अंतिम म्हणून जगला पाहिजे. त्या क्षणाचा आनंद हृदयात साठवता आला पाहिजे. असे चिंतन लेखकाने या लेखातून मांडले आहे.


डॉक्टर आ.ह.साळुंखे यांच्या ललित लेखांचे विशेष :-

वर्तमानपत्रातून केलेले ललित लेखन हे स्फुटस्वरूपाचे असते. मोठ्या संख्येने वाचकांपर्यंत पोहोचण्याचे ते एक साधन असते. सर्वसामान्य वाचकाला दिशा देणारे हे लेखन असते. डॉक्टर आ.ह.साळुंखे यांनी 'संचार' या वर्तमानपत्रातून केलेले सदर लेखनाचे वाचकांनी खूप स्वागत केले.डॉक्टर साळुंखे सरांची वैचारिक लेखांची मेजवानी सर्वसामान्य वाचकांना मंत्रमुग्ध करते.वाचकांशी संवाद साधण्याची उत्सुकता या लेखांमधून दिसते. मनापासून वाचकांना जेष्ठतेच्या नात्याने मार्गदर्शन करण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो.सरळ,साध्या सोप्या भाषेतून हे लेखन केले जाते.या लेखनाला लेखकाच्या प्रचंड वाचनाचा स्पर्श गंधित करून जातो.साहित्य, कला,तत्त्वज्ञान,भाषा,समाजजीवन आणि अनुभव यांच्या आधारे हे लेखन समृद्ध होत जाते. या लेखनाला लालित्याचा स्पर्श होतो.प्रत्येक लेखाचा विषय स्वतंत्र आहे. सर्व लेखांच्या मांडणीत एक सूत्रबद्धता दिसते. संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर एक समृद्ध ज्येष्ठ व्यक्तीला भेटल्याचा आनंद मिळतो. प्रत्येक लेखातील भाषा लालित्याने नटलेली आहे. वाक्यरचना सोपी,सुटसुटीत आहे. छोटी छोटी वाक्यरचना अर्थपूर्ण आहे.प्रत्येक लेखातून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रगटीकरण होते. व्यक्तिगत भावस्पर्शी अनुभवांची मांडणी या ललित लेखातून येते. सामाजिक वास्तवाची गुंतागुंत लेखक अगदी अलगदपणे उलगडत जातो.



समारोप :-

 चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून! हे डॉक्टर आ.ह.साळुंखे यांचे छोटे पुस्तक आहे. परंतु लेखक म्हणतो तसे,छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.माणसांना आपल्या स्वतःच्या अंतःशक्ती शक्य तितक्या फुलवण्याचा आणि इतरांना त्यांच्या तशा प्रकारच्या शक्ती फुलवण्यासाठी सहाय्य करावं,असा या पुस्तकाचा मुख्य आशय आहे. उत्कट ललित लेखनाची सर्वच गुणवैशिष्ट्ये या लेखनाला लागू पडतात. तरुणांना या पुस्तकातून उचित दिशा दिग्दर्शन प्राप्त होते.असे आपल्याला म्हणता येईल. ज्येष्ठ लेखक डॉक्टर आ.ह.साळुंखे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! 

धन्यवाद !!

 प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे,

मराठी विभाग 

श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,रावेर तालुका- रावेर ,जिल्हा-जळगाव पिनकोड - 425508

  मोबाईल नंबर- 9421081270 ई-मेल- -dhembregr@gmail.com

----------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...