“दलित कवितेचा नवा - वारसदार " डॉ. गणपतराव ढेंबरे , रावेर
कवी राजेंद्र राक्षे यांचा ' निळ्या वस्तीची कविता' हा कवितासंग्रह नुकताच १७ मे२०११ रोजी प्रकाशित झाला. स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला. या कवितासंग्रहाचे संपादक - महेंद्र शिंदे हे आहेत.इ.स. १९९० पासून राजेंद्र राक्षे कविता लेखन करीत आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून, दर्जेदार दिवाळी अंकामधून तसेच गुणवत्तापूर्ण वाङ्मयीन नियतकलिकां मधून राजेंद्र राक्षे यांची कविता प्रकाशित झाली आहे. ती नुसती प्रकाशित झाली नसून त्यांच्या कवितेची समीक्षक, अभ्यासक, विचारवंत कार्यकर्ते, चोखंदळ वाचक यांनी जाणीवपूर्वक गांभीर्याने दखल घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, दलित हक्क चळवळीत राजेंद्र राक्षेंचा सहभाग मोलाचा होता. ते एक संवेदनशील कार्यकर्ते होते. इतकं विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे त्यांची कविता या पर्यावरणात घडली त्याचा परिचय करून घेतल्याशिवाय त्यांच्या कवितेची जातकुळी लक्षात येत नाही.
कवी राजेंद्र राक्षे यांचे वयाच्या चाळीसाव्या वर्षे दि. ९ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी श्री.महेंद्र शिंदे यांनी १९९० पासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या कवितांचे संकलन करून हा कवितासंग्रह स्नेहवर्धन प्रकाशनाच्या मार्फत प्रकाशित केला. या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी, विचारवंत, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर याची प्रस्तावना लाभली आहे. कवी राजेंद्र राक्षेंच्या गावी मु.पो. डिकसळ, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे डॉ. यशवंत मनोहर, प्रसिद्ध दलित कवी लहू कानडे यांच्या उपस्थितीत या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. या कवितासंग्रहात एकूण ९९ कविता आहेत. या कविता वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या आहेत. या संग्रहातील कवितांमध्ये प्रेम जाणिवांचा आविष्कार, सामाजिक विषयाची मांडणी, प्रखर विद्रोह, जीवघेणी वेदना, अस्वस्थता प्रकट होते.
एखादी कलाकृती प्रत्ययकारी आणि प्रभावी कधी होते? कलाकृतीमधून अभिव्यक्त होणाऱ्या जीवनाशयाशी तुम्ही किती प्रामाणिक असता यावर कलाकृतीची प्रत्ययकारिता अवलंबून असते. ज्या जीवनाबद्दल तुम्ही लिहित असता. त्या जीवनाबद्दल तुम्हाला किती आस्था आहे, याला फार महत्त्व असते. तुमची त्याविषयीची आस्था कलाकृतीच्या कणकणातून जाणवत असते. कवी 'अस्मिता' कवितेत म्हणतो,
"ते दिवस मुळी आमचे नव्हतेच
होत्या फक्त क्रांतिकारी स्मृती
अस्मिता म्हणून....
आपल्या स्वतःचे अस्तित्व नेमके काय आहे, याचा शोध कवी घेतो. 'अस्मितेचा प्रश्न' अधिक कठीण झाला आहे. पण आपली अस्मिता ही किती तकलादू आहे. याचे भान कवीला आहे. समकालीन वास्तव मांडत असतांना कवी म्हणतो,
"स्वातंत्र्यानंतर माझा देश खूप बदललाय
संस्कार देणारे नेतेही संपलेत
गल्ली बोळात पुढारी झालाय सुधारणारे सुधारलेत"
स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक बदलाचे चित्र कवी उभे करतो. संस्कार देणारे आदर्श वाटावे, असे नेतृत्व आज समाजात नाही. पुढाऱ्यांच पीक जोरात आहे. यातून स्वार्थ साधणाऱ्यांनी स्वार्थ साधून घेतला. कवीची सामाजिक जाणीव अत्यंत विद्रोही आहे. म्हणून कवी म्हणतो, - "आजवरच्या संस्कृतीनं नुसतंचविद्रोही बनवलंय.
"या संस्कृतीत
गुदमरून शिजतोय
कदाचित
या मातीत
जन्म घेतला म्हणून"!
असे यातनाचे काळोखे आभाळ कवीच्या भावविश्वावर ओथंबून आलेले आहे. "अन कुठली संस्कृती आम्हाला स्वातंत्र्य देईल." असा संस्कृतीला अग्निपरीक्षेला बसविणारा सवाल कवीने विचारलेला आहे. “आम्ही मानव कसे?' या कवितेत जातीच्या हरळीचे मानसशास्त्र कवीने मांडले आहे. जातीने गच्च भरलेल्या आमच्या आस्तित्वाच्या अवकाशात मानवत्वासाठी कशी जागाच उरलेली नाही, या वास्तवाची मांडणी कवीने अत्यंत भेदकपणे केलेली आहे.
"आम्ही मानव कसे ?
जातीलाच शोधण्यात आयुष्य हरवून गेलो
मीही थकलो...
स्वातंत्र्यापासून शतकाकडे वळलो मीही संपलो...
जातीयवाद संपला नाही "!
वास्तव मांडत असताना जातीयवादाची खोली कवी मांडतो. आपण संपलो; पण जातीयवाद नाही, हे वास्तव कवी मांडतो. जातीयवाद संपल्याच्या पोकळ घोषणा कवी करत नाही. जातीयवाद संपेल, असा भंकस आशावादही कवीला व्यक्त करावासा वाटत नाही. 'जग हे अस आहे' एवढ्यावरच कवीची प्रतिभा समाधान मानते. 'संकल्प' कवितेत कवी म्हणतो,
"परिवर्तनाचा बुरखा पांघरून
गर्भात गुलामीच्या
जन्मभर आम्ही
निपचित पडतोय
स्वतःच हसतोय
अन् रडतोयही"
आपल्या गुलामीचा बुरखा कवी फाडून टाकतो. या व्यवस्थे आपल्यावर केलेली मात कवीने येथे व्यक्त केली आहे. आपल्या जीवनाला नेमका सूर सापडला नाही, याची खंत कवी व्यक्त करतो. 'आयुष्यभर गात राहिलो, स्वप्नगीत ना निखारे झाले, ना हित!' आयुष्यभर आपण स्वप्नगीत गात राहिलो, तरी त्यातून काहीच कस घडलं नाही, याची खंत कवीला वाटते.
'मी भगवा आहे' या कवितेत कवीने विषमतावाद माणसाला हीन बनविणाऱ्या वर्णवर्चस्ववादी धर्माचे जोखड फेकून दिले आहे. भगवा धर्मवाद संपला पाहिजे, असं कवीला वाटते. कवी म्हणतो,
"याच भगव्यात
फुले पासून आंबेडकर
छत्रपतीपासून सावरकर
डोळ्यात तेल घालून
शोधत आहे."
कवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, बुद्धाच्य करुणेची, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, आणि न्याय ही लोकशाहीवादी जीवनपद्धती स्वीकारली आहे. कवी म्हणून भगव्या विचाराला त्यागाची भाषा सांगतो. कवी म्हणतो 'मीच समतेची गर्जना करतो.' ही समता उद्याच्या मांगल्यासाठी आवश्यक असल्याची कवीची धारणा आहे. माणसं धर्मउन्मादात अडकून पडू नयेत, ती केवळ माणूस म्हणून एकमेकांच्या गळ्यात पडावित, अशी कवीची इच्छा आहे.
इथे माणसाचं हजारो वर्षापासून अविरत शोषण करणार व्यवस्था नेस्तनाबूद करण्यासाठी क्रांतिकारी माणसाला क्रांतीच वाट पकडावीच लागेल. संघर्ष करावाच लागेल. त्याशिवाय त्याला परिवर्तनाच्या दिशेने जाता येणार नाही. 'संकल्प' य कवितेत कवीने उपरोधाची अत्यंत जळती धार धरलेली आहे. खरचं कुणाला परिवर्तन हवे आहे? परिवर्तन हा बोलण्याचा विषय आहे काय ? परिवर्तन अशक्य नसते, पण बराक ओबाम म्हणतात, त्याप्रमाणे 'बट चेंज विल नॉट कम इन वुई वेट फॉर" परिवर्तन ही निर्मिण्याची गोष्ट आहे. कवीने असे परिवर्तन निर्माण न करता केवळ परिवर्तनासंबंधी बोलत राहणाऱ्यांचा तिरकस पद्धतीने समाचार घेतलेला आहे. परिवर्तनासाठी कवीचे वेगळ्या संदर्भातील शब्द वापरून सांगायचे, तर कधी वावटळ व्हावे लागते, कधी वादळ बनावे लागते. कवीच्या सामाजिक भावविश्वाचे एक वर्तुळ येथे पूर्ण होते. या भावविश्वात घुसमट आहे, तगमग आहे,पण पराभव वा माघार कवीला मान्य नाही. जीव देण्याच्या संदर्भात कवीने म्हटले आहे. -
"तुझ्यासाठी नाही निदान
दुसऱ्यांसाठी तरी जगशील ना?"
एकूण कवी लिहितो आहे ती कविता जगण्याची आहे. जगण्याची उमेद देणारी, परिवर्तनासाठी आंदोलन करायला सांगणारी कविता आहे. कवी राजेंद्र राक्षेंच्या कवितेसंदर्भात प्रसिद्ध कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर म्हणतात, "कवी राजेंद्र राक्षे यांना साहित्यिक 'बोले तैसा चाले' या पठडीत नीट बसायला हवा, असे वाटते. ते त्यांच्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भावविश्वात प्रज्वलित केलेल्या मूल्यदृष्टीशी सुसंगत आहे." येथे एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकरूप झाला आहे. या कवितासंग्रहातील अनेक कवितांमध्ये तशा खुणा दिसतात.
"निळ्या वस्तीची कविता” या कवितासंग्रहातून अनेक कविता प्रेमभावनेचा आविष्कार करणाऱ्या आहेत. या प्रेमकवितांमध्ये सुख-दुखाचा नाना छटा साकार झाल्या आहेत. ही प्रेमकविता साधी, सरळ आहे, पण कवीच्या मनाची घुसमट मांडणारी आहे. विवाह हा व्यवहार असतो, हे मान्य करता येईल; पण प्रेम व्यवहारात बसत नाही. प्रेमाला व्यवहारात बसवले जाते, तेव्हा 'प्रेम' 'प्रेत' होऊन जाते कवी म्हणतो,
"अजून हेवा मनाचा
व्याकूळ आज झाला
स्मृतीच्या पाखरांनो
घन निळा नभ झाला."
स्मृती जपणं हे मनुष्यात्वाचं लक्षण आहे. खास प्रेमानुभवाच्या स्मृती कवीच्या मनात जागृत आहेत. प्रेमाच्या नानाविध छटा या संग्रहात व्यक्त होतात.
या कवितासंग्रहातील भाषा साधी, सरळ, सोपी आहे. आपला जीवनानुभव जोरकसपणे व्यक्त करण्यावर कवीने भर दिलेला आहे. कवी नवनवीन प्रतिमांची मांडणी करतो. यामध्ये तारुण्याचा चव्हाटा, ठिसुळती हवा, अंधाराच्या पंक्तीत विद्येचा खोडरबर, तात्त्विक इस्टेटी, एकात्मतेचा कुंचला, ठिगळ,चादर, बदाम, चौकट, इस्पिक, किलवर, चार वर्ण, पावलांचे रांडपण, चाबूक नाग, स्वप्नांची चॉकलेट, पश्चात्तापी आयना, मनाचे ठिगळ, जीवन बचाळे, डिवचलेला वृक्ष, डबक्यातले आयुष्य, मैलांचे घटिंगण, रिती सांज, विद्रोहाची हाक, जलालपण इ. यासारख्या ताज्या प्रतिमांच्या मांडणीतून कवी राजेंद्र राक्षेंची कविता आकार घेते. यातील नवता व सौंदर्य वाचकाच्या मनाला भुरळ घालते.
कवी राजेंद्र राक्षे यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यात नवखेपणाचे अनेक पुरावे आहेत. काही कवींच्या काही कवितांचे स्मरणही काही ठिकाणी होते. कवितांची बांधणी सरळ, साधी असली, तरी उत्कट आहे. कवीच्या मनाची आर्तता अनेक कवितांमधून जाणवते. कवी राजेंद्र राक्षेंना आणखी जीवन लाभले असते, तर त्यांनी आपल्या मर्यादांवरती मात केली असती, यात शंका नाही. आजच्या सर्व प्रश्नांच्या गुहांमध्ये ही कविता शिरली असती; पण आता जे हाती लागले आहे, त्यावर आपल्याला समाधान मानणे भाग आहे. तरी 'निळ्या वस्तीच्या कविता' आपल्याला एक भरघोस आश्वासन देतात.
'निळ्या वस्तीच्या कविता' या परिवर्तनात जगणाऱ्या आणि परिवर्तनाशी बोलणाऱ्या कवीच्या कविता आहेत. समाजाच्या एका सुरम्य स्वप्नांची दीपमाळ कवीच्या नजरेत आहे. प्रत्यक्ष वास्तवात मात्र या स्वप्नाच्या जिवावर अनेक मरणे तुटून पडलेली आहेत हे कवीला दिसते, आणि कवीच्या जिवाची तडफड होते. 'निळ्या वस्तीच्या कवितांना' या तडफडीची उत्कट लय आहे. ही कविता या तडफडीपाशी लोळागोळा होऊन पडत नाही. ती या तडफडीला सर्जनशील करण्याची आणि तिच्यातून मार्ग काढण्याची हिंमत बाळगते. या हिंमतीचे मोल महत्त्वाचे आहे. कवी राजेंद्र राक्षे यांची कविता जनहिताचे भान जपणारी व बुडत्यांच्या हाकेला धाऊन जाणारी आस्थेवाईक अभिव्यक्ती आहे. या अशा प्रभावी कवितेला न्याय मिळण्यासाठी श्री. महेंद्र शिंदेनी कवीच्या निधनानंतर ही कविता प्रकाशात आणली. या चळवळीतील कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छाही देतो.
( पूर्व प्रसिद्धी -सक्षम समीक्षा एप्रिल- मे- जून २०१३ )
डॉ. गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग
श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , जि.जळगाव पिन-४२५५०८
मोबाईल -९४२१०८१२७०
ई-मेल dhembregr@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा