बोलीभाषा संशोधनापुढील आव्हाने
डॉ.गणपतराव ढेंबरे ,रावेर
प्रस्तावना : -
भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, तसेच ते संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यमदेखील आहे. भाषा हा मानवाचा अत्यंत महत्त्वाचा आविष्कार आहे. मानवी संस्कृतीत भाषा या संस्थेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या संपर्कक्रियेसाठी व सहकार्यासाठी मानव अनेक प्रकारच्या संदेशवहनाच्या पद्धती किंवा व्यवस्था वापरतो. 'भाषा' ही मानवाची सर्वात महत्त्वाची संदेशवहन पद्धती म्हणावी लागेल. मानवी समाज व संस्कृती यांचा ती एक अविभाज्य घटक आहे. आपण एकाच समाजात वावरत असलो, एकच भाषा बोलत असलो, तरी अनेक कारणांमुळे समाजात वेगवेगळे स्तर निर्माण होतात. शिक्षण, व्यवसाय, नागरी वा अनागर वातावरण, जाती-जमाती, कौटुंबिक वातावरण, देश - विदेशचा प्रवास इत्यादी अनेक कारणांमुळे समाजात लहान-मोठे गट अस्तित्वात येतात. प्रत्येक भाषेत अनेक प्रकारची विविधता असते. भाषेत विविधता निर्माण होण्यामागे अनेकविध कारणे असतात.
मराठी भाषेपुरतेच बोलावयाचे झाल्यास ही भाषा म्हणजे निरनिराळ्या बोलींचा एक संग्रह आहे. भाषा ही शेवटी बोलींचा एक समूह असतो. भाषेला आपल्या समृद्धीसाठी बोलींच्याच शब्द भांडाराकडे लक्ष द्यावे लागते. नवनिर्मिती आणि अभिनव आविष्कार यांची क्षमता बोलीत असते तेवढी प्रमाण भाषेत नसते. दैनंदिन आणि पारंपरिक संस्कृती यात बोलींचे वर्चस्व असते. बोली म्हणजे काय ? 'बोली' हा Dialect या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून आपण वापरतो. Language या शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून 'भाषा' असा शब्द आपण वापरतो. बोली म्हणजे काय ? याविषयी विजया चिटणीस माडगूळकर म्हणतात, “बोली म्हणजे परभाषकांना जवळजवळ पूर्णपणे कमी-अधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या, तर तद्भाषकाना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषांचा समूह होय." यावरून आपणाला असे म्हणता येईल, की काही समान वैशिट्य असलेल्या आणि त्याच भाषेच्या इतर बोलींपेक्षा एकमेकींशी अधिक साम्य असलेल्या बोलींचा एकंदर समूह म्हणजे बोली होय. एकाच प्रदेशात बोलली जाणारी मूळ बोली काळाच्या ओघात त्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बदलते आणि तिच्यातून एकमेकांशी नाते असणाऱ्या पण वेगवेगळ्या अशा नव्या बोली निर्माण होतात.
बोलीभाषा संशोधनाची आज गरज निर्माण झाली आहे. आपले सांस्कृतिक संचित जतन करणे आवश्यक आहे. बोलीभाषा संशोधनाचे महत्त्व सांगताना झाडी बोलीचे अभ्यासक हरिचंद्र बोरकर म्हणतात, “आज नवनवीन क्षेत्रात ज्ञानाचा विस्तार झपाट्याने होत आहे. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादींमध्ये दररोज नवीन शब्दावली आवश्यक वाटत आहे. त्याच तत्परतेने पाश्चात्य शब्दांना योग्य पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भाषावैज्ञानिक व भाषाकोविद यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी संस्कृतचे भांडार वापरून नवे शब्द रचण्याचा आटापिटा भाषावैज्ञानिकांनी सतत चालविलेला दिसून येतो, पण त्याकरिता योग्य शब्द आपल्या बोलीत पूर्वीपासूनच उपलब्ध असतानाही ते माहिती नसल्यामुळे भाषावैज्ञानिकांची फसगत होत आहे, असे दिसून येते. " वरील शब्दात हरिश्चंद्र बोरकर बोलीभाषा संशोधनाचे महत्त्व सांगतात. आज बोलीभाषा संशोधनापुढे वेगवेगळी आव्हाने निर्माण झाली आहेत.
१) बोलीभाषांचे अस्तित्व : -
जग आज एक खेडं बनलं आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमधील अंतर नाहीसे झाले आहे. वेगवेगळ्या देशांतील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. दळणवळणाची, परस्परसंपर्काची साधने मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे संवाद साधणे सुलभ झाले आहे. हा संवाद नेमक्या कोणत्या भाषेत साधला जातो? या प्रश्नाचे उत्तर अर्थात इंग्रजी हे आहे. याचे परिणाम आज ठळकपणे पुढे येत आहेत. वेगवेगळ्या देशांतील बोलीभाषा संपण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रक्रियेविषयी भालचंद्र नेमाडे म्हणतात, “आपल्याला असं दिसेल, की हे जे स्वतःला जागतिकीकरणाचे अध्वर्यू म्हणवतात, त्या देशांमधल्या भाषांची परिस्थिती आपण बघू या. Atlas of World Languages, Dead Languages, Red Book या पुस्तकांमधील आकडेवारी घेतली तर उत्तर अमेरिकेत कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समधल्या भाषा या शंभर वर्षापूर्वी १८७ होत्या, रेड इंडियन, एस्किमो यांच्या धरून आज त्यातल्या ३८ उरल्या आहेत, बाकीच्या नाहीशा झाल्या. अलास्कामध्ये २० भाषा होत्या. आज तिथे २ भाषा राहिल्या आहेत. ही जागतिकीकरण करू इच्छिणाऱ्या गोऱ्या लोकांची कर्तबगारी. लॅटिन अमेरिकेत बरंच युरोपी सांस्कृतिक दडपण अजूनही आहे. तिथे ४०० भाषा होत्या. आता फक्त १०८ भाषा राहिल्यात. पुढील वीस वर्षात झपाट्यानं या पण नाहीशा होतील, अशी भीती आहे." भालचंद्र नेमाडे यांनी दिलेली आकडेवारी लक्षात घेता यापुढील काळात बोलीभाषा नष्ट होणार असतील तर त्यांचे संशोधन कसे केले जाईल, हा प्रश्न आहे. जिवंत स्वरूपात भाषा अस्तित्वात नसेल तर तिचे संशोधन करणे. संशोधनाच्या आधारे निष्कर्ष काढणे अत्यंत कठीण होऊ शकते.
विकासाची प्रक्रिया आज ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागापर्यंत पोहोचत आहे. उपेक्षित मागास, आदिवासी, भटके विमुक्त आज मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. मुख्य प्रवाहापासून कित्येक शतके दूर असणाऱ्या या लोकसमूहाचा शहरांशी, शासकीय यंत्रणांशी संपर्क येत आहे. हे लोक प्रमाणभाषा अवगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी या लोकांसाठी आवश्यक आहेत. ग्रामीण, आदिवासी, दलित, भटके विमुक्त, डोंगरी भागातील लोक मुख्य प्रवाहात सामील झाल्यामुळे आज ते त्यांचे मूळ स्थान सोडून शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पहिल्या पिढीने आपली मातृभाषा व प्रमाणभाषा दोन्हींचा वापर सुरू ठेवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीत हा संवाद केवळ प्रमाणभाषेवर येऊन थांबला. यामुळे बोलींच्या अस्तित्त्वाला धोका पोहोचला आहे. या संदर्भात श्रीधर रंगनाथ कुलकर्णी म्हणतात, "मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा होऊन बसला आहे. शिक्षण आणि प्रसारमाध्यमे यांच्या वाढत्या प्रसारामुळे बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. या दोन्ही बाबी बोलींच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या ठरत आहेत. आणखी काही काळ लोटला तर कित्येक बोली इतिहासजमा होण्याची संभावना स्पष्टपणे दिसत आहे. आजच्याही परिस्थितीत कोणत्याही बोलीची सामग्री गोळा करण्यासाठी दळणवळणाच्या आधुनिक साधनांपासून अंतरावर असलेल्या व लौकिक अर्थाने मागासलेल्या भागांतूनच निखालस सामग्री मिळण्याची शक्यता आहे. याबाबतीत अधिक विलंब लागला तर महाराष्ट्राच्या व मराठी भाषेच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे हे अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार आपल्या हाती लागणार नाहीत, ही जाणीव ठेवून बोलींच्या अभ्यासास अग्रक्रम मिळाला पाहिजे." वरील श्रीधर रंगनाथ कुलकर्णीच्या मताप्रमाणे मराठीच्या बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्यातील अंतर कमी झाले आहे. बोलीभाषेत प्रमाणभाषेतील शब्दांचे प्रमाण वाढले आहे. बोलीभाषेतील अनेक भाषिक लकबी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काळात बोलीभाषा व प्रमाण मराठी भाषा यांच्यातील अंतर सूक्ष्म होत जाईल. तसे बोलींच्या अभ्यासास व बोलींच्या सामग्री जमा करण्यास मर्यादा येतील. बोलीभाषेच्या संशोधकांपुढे हे एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे.
२) बोलींच्या क्षेत्रमर्यादेची निश्चिती : -
बोलींच्या अभ्यासात मूळ साधनाचा संग्रह करणे महत्त्वाचे असते. बोलीतील शब्दसंग्रह, बोलीचे व्याकरण, बोलीभाषेतील विशिष्ट लकबी, बोलींची स्वनिम प्रक्रिया या विविध घटकांचा अभ्यास बोलीभाषेच्या संशोधनात केला जातो. एखादी विशिष्ट बोली संशोधनासाठी निश्चित करण्यासाठी त्या बोलीचे भौगोलिक क्षेत्र अथवा विशिष्ट व्यवसाय किंवा समाज यांची क्षेत्रमर्यादा निश्चित करणे एक अवघड बाब असते. कारण बोली हा जिवंत व्यवहार आहे. बोलींची क्षेत्रमर्यादा अगदी काटेकोरपणे ठरविता येत नाही. बोलींच्या क्षेत्राचे हवाबंद कप्प्यांमध्ये वर्गीकरण करता येत नाही. बोलींचे भौगोलिक क्षेत्र अथवा विशिष्ट व्यवसाय किंवा समाज यांच्या क्षेत्रमर्यादा वस्तुनिष्ठपणे ठरवता येत नाहीत. हे बोलींच्या अभ्यासकांपुढील आव्हान आहे. या संदर्भात कैलास सार्वेकर म्हणतात, “राजकीय नकाशात सीमारेषा अचूकपणे दाखविता येतात तशा बोली भूगोलात दाखविता येत नाहीत. अमूक एक भाषा अमूक एका ठिकाणी संपते आणि अमूक ठिकाणपासून दुसरी भाषा सुरू होते, असे दाखविणे अशक्य असते. मात्र बोलीतील बदल हळूहळू घडलेला दिसतो. तसेच एका भाषेचा प्रभाव तिच्यालगत बोलल्या जाणाऱ्या बोलीवर पडलेला दिसतो. इंद्रधनुष्याचे रंग वेगवेगळे असले,तरी एक रंग कुठे संपतो व दुसरा रंग कुठे सुरू होतो ते स्पष्ट रेषेत दिसत नाही. रंग भिन्नता मात्र स्पष्ट होत जाते. बोलींचेही काहीसे तसेच असते." बोलींची क्षेत्रमर्यादा ठरवत असताना येणाऱ्या अडचणी या मतातून अभिव्यक्त होतात. एकाच बोलीतील उपबोलींच्या क्षेत्रमर्यादा ठरवत असताना अभ्यासकापुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. संशोधन हे वस्तुनिष्ठ, काटेकोर असते. असे गृहित धरल्यास क्षेत्रमर्यादा ठरवत असताना ढोबळ लक्षणे लक्षात घेऊन क्षेत्रमर्यादा गृहित धरावी लागते. हे बोलीभाषा संशोधनापुढील आव्हान आहे, असे म्हणता येईल.
३) संदर्भ साधने : -
मराठी बोलीभाषांचे संशोधन करत असताना मराठीतील दर्जेदार संदर्भ ग्रंथाची उणीव भासते. प्रत्यक्ष मराठीतील बोलींचा अभ्यास करून बोलींच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरतील असे संदर्भ ग्रंथ अत्यंत कमी आहेत. प्रा.अ.का. प्रियोळकर - कोकणी बोली, हरिश्चंद्र बोरकर - झाडी बोली, कैलास सार्वेकर खानदेश - बोली, रमेश सूर्यवंशी - अहिराणी बोली, हरिहर मातेकर - मराठवाडी बोली, कुलकर्णी सु. बा. - पोवारी बोली, भिल्ली बोली, वऱ्हाडपांडे वसंत - नागपुरी बोली, दे. गं. सोटे - वैदर्भी बोली, ए.एम.घाटगे - कोकणी, कुडाळी, कुणबी इत्यादी बोलीभाषांचे अभ्यासक आहेत. याशिवाय भाषाविज्ञानाचे काही अभ्यासक यात मिलिंद मालशे, र. ना. वरखेडे, अशोक केळकर, कृ. पा. कुलकर्णी, कल्याण काळे, अंजली सोमण, श्रीरंग संगोराम, विजया चिटणीस, स. गं. मालशे, दत्तात्रय पुंडे, वसंत स. जोशी, विद्यागौरी टिळक, मु. श्री. कानडे, रमेश धोंगडे, अश्विनी धोंगडे, ना. गो. कालेलकर इत्यादी अभ्यासक व त्यांचे ग्रंथ दृष्टीसमोर येतात. मराठीतून बोलींच्या संशोधनासाठी उपयुक्त असे संदर्भ ग्रंथ मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. हे मराठी बोलींच्या संशोधनापुढील आव्हान आहे.
४) बोलीभाषा संशोधनाचे आव्हान : -
बोलीभाषा संशोधन हे कठीण, किचकट व अधिक वेळ लागणारे कार्य आहे. बोलीभाषांचे संशोधन करत असताना अभ्यासकाला प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्य करून (Field Work) सामग्री जमा करण्यासाठी या भौगोलिक क्षेत्रात प्रत्यक्ष मुलाखती,वेगवेगळी साधने वापरून माहिती संकलित करावी लागते. या माहितीचे संकलन व विश्लेषण करत असताना अभ्यासकाचा वेळ, परिश्रम, पैसा खर्च होत असतो. याचा वास्तवस्थितीत विचार करता नवोदित अभ्यासक बोलीभाषा संशोधनाकडे वळत नाहीत. त्यापेक्षा एका लेखकाचा अभ्यास, विशिष्ट कालखंडाचा अभ्यास, विशिष्ट वाङ्मयप्रकाराचा अभ्यास, समीक्षा- विचार, सौंदर्यशास्त्र, साहित्यप्रवाह यांच्यावर संशोधन करत असताना संदर्भग्रंथ व आधारभूत ग्रंथ संकलित करणे व सर्व ग्रंथांच्या आधारे प्रबंध लेखन करणे ही सर्व प्रक्रिया चार भिंतींच्या आत होते. असा संशोधनाचा सुलभ मार्ग उपलब्ध असताना अभ्यासक उन्हातान्हात, पावसात पायपीट कशासाठी करेल? हा खरा प्रश्न आहे. बोलीभाषांचे संशोधन करून विशेष काही फायदा मिळणार नसेल तर लोक कशासाठी बोलीभाषा संशोधन करतील हे बोलीभाषा संशोधनापुढील आव्हान आहे.
५) बोलीभाषा माहिती संकलनात येणाऱ्या समस्या : -
बोलीभाषेच्या संशोधनासाठी क्षेत्रीय कार्य करत असताना वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. बोलीभाषांचे संशोधन करत असताना प्रत्यक्ष लोकांची भाषा संकलित करणे आवश्यक असते. बोली बोलणारे लोक अभ्यासकांकडे संशयाने पाहतात. माहिती देण्यास टाळाटाळ करतात. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांना हे संशोधन शासकीय योजनेचा भाग वाटते. या लोकांना अभ्यासकांकडून आर्थिक लाभाची अपेक्षा असते. अभ्यासासाठी निवडलेल्या क्षेत्रातील लोक माहिती अचूकपणे, गांभीर्याने देतीलच याची खात्री देता येत नाही. माहिती, सामग्री अचूकपणे जमा न झाल्यास संशोधनास अडथळा निर्माण होऊ शकतो. काही बोलीभाषांची सामग्री
संकलित करत असताना दुभाषिकांची मदत घ्यावी लागते. तसा दुभाषिक मिळणे अवघड असते. मिळाल्यास तो गंभीरपणे मदत करीत याची खात्री देता येत नाही.
एखाद्या बोलीभाषेचे संशोधन करण्यासाठी अभ्यासक तयार झाल्यास त्याला पदरची गुंतवणूक संशोधनासाठी करावी लागते. शासन, विद्यापीठातील भाषा विभाग, शासनाचा भाषा संचालनालय विभाग यांच्याकडून अभ्यासकांना भरीव अशी आर्थिक शिष्यवृत्ती मिळाल्यास बोलीभाषा संशोधन अधिक वेगाने होऊ शकते. परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे अभ्यासक इच्छा असूनही बोलीभाषा संशोधनाकडे वळत नाहीत.
६) संस्थांचा अभाव : -
केंद्रीय भारतीय भाषा संस्थान मैसूर, भारतीय भाषा परिषद कोलकाता, डेक्कन कॉलेज पुणे,विद्यापीठातील भाषा विभाग यांच्यामार्फत बोलीभाषा संशोधनासाठी मार्गदर्शन व साह्य मिळू शकते. परंतु खास मराठी बोलींच्या संशोधनासाठी एखादी संस्था असल्यास बोलीभाषा संशोधनाकडे नवीन अभ्यासक आकर्षित होऊ शकतात. परंतु अशा संस्थांचा अभाव असल्यामुळे बोलीभाषा संशोधनापुढे आव्हान निर्माण होते.
७) बोलीभाषांबद्दल असणारा न्यूनगंड : -
बोलीभाषा या कमअस्सल, कमी प्रतीच्या आहेत, असा न्यूनगंड बाळगल्यामुळे बोलींपेक्षा अवाजवी महत्त्व प्रमाणभाषेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे बोलींच्या संशोधनाकडे अभ्यासक वळत नाहीत. बोलीभाषांचे संशोधन हे कमी प्रतीचे काम नसून, भाषा संशोधनातील मूलगामी कार्य आहे, असा विश्वास अभ्यासकांमध्ये निर्माण होणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून मराठी विषयातून हजारच्या संख्येत लोकांनी पीएच. डी. पदवीचे संशोधन केले आहे. त्यापैकी केवळ ४१ प्रबंध हे बोलीभाषा संशोधनाचे आहेत. ०१ प्रबंध दिल्ली विद्यापीठ व ०१ प्रबंध देवी अहिल्याबाई विद्यापीठातून बोलीभाषा संशोधनावर आहे. "ही संख्या वसंत विष्णू कुलकर्णी यांच्या 'मराठी प्रबंध सूची' या ग्रंथातून घेतली आहे. हा ग्रंथ फेब्रुवारी २०११ ला प्रकाशित झाला आहे." ४३ हा आकडा एकूण मराठी बोलीभाषा संशोधनासाठी फार मोठा आहे, असे म्हणता येणार नाही.
८) बोलीभाषकांचे बोली संचिताविषयी असलेले अज्ञान : -
वेगवेगळ्या बोली बोलणाऱ्या लोकांना आपली बोलीभाषा एक सांस्कृतिक संचित आहे, याची जाणीव नसते. बोली हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. याची जाणीव निर्माण झाल्यास हुषार, बुद्धिमान, तज्ज्ञ अभ्यासक बोलींच्या संशोधनाकडे वळतील.
निष्कर्ष : -
१) जागतिकीकरण, दळणवळणाच्या साधनांचा झालेला विकास यामुळे बोलीभाषांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे.
२) बोलींची क्षेत्रमर्यादा निश्चित करणे कठीण असते. बोलीभाषा संशोधनापुढील ते एक आव्हान आहे.
३) बोलीभाषा संशोधन करत असताना उपयुक्त आणि दर्जेदार संदर्भग्रंथाची कमी जाणवते.
४) तज्ज्ञ मार्गदर्शक व अभ्यासकांची संख्या अल्प असल्यामुळे नवोदित संशोधकांना उपयुक्त मार्गदर्शन मिळत नाही.
५) बोलीभाषा संशोधन हे वेळखाऊ, कठीण, किचकट स्वरूपाचे असते. त्या तुलनेत इतर विषयांवर संशोधन करणे सहज ,सोपे, सुलभ असते. त्यामुळे संशोधक बोलीभाषा संशोधनाकडे वळत नाहीत.
६) बोलीभाषा माहिती संकलनात वेगवेगळ्या समस्या जाणवतात.
७) बोलीभाषा संशोधनासाठी आर्थिक पाठबळ मिळत नाही. शासन, विद्यापीठ, विविध प्रकारच्या संस्था भरीव स्वरूपात आर्थिक मदत बोलीभाषा संशोधकांना करत नाहीत. त्यामुळे संशोधक संशोधनाकडे पाठ फिरवतात.
८) बोलीभाषा संशोधनाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांचा अभाव आहे. त्यामुळे विपुल प्रमाणात संशोधक निर्माण होत नाहीत.
९) बोलीभाषांबद्दल समाजात न्यूनगंड असतो.
१०) बोलीभाषिकांचे बोली संचिताविषयी अज्ञान असल्यामुळे हुषार, तज्ज्ञ, जिज्ञासू बुद्धिमान अभ्यासक बोली संशोधनाकडे वळत नाहीत.
समारोप : -
मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास होणे काळाची गरज आहे. कारण आधुनिकीकरणामुळे बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सीमारेषा पुसट होत आहेत. आज बोलींची सामग्री गोळा करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. दृक - श्राव्य साधनांद्वारे बोलींची सामग्री जमा केली पाहिजे. वेगवेगळ्या बोलींचे नमुने आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे जमा केल्यास दीर्घकाळासाठी अभ्यासकांना ही सामग्री उपलब्ध होऊ शकते. बोलींच्या अभ्यासाचे एक निश्चित ध्येयधोरण ठरविण्याची गरज आहे. शासकीय मदतीवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आणि साहित्य संस्थांनी बोलींच्या अभ्यासाला अग्रक्रम देण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या बोलींचा अभ्यास झाल्यास अनेक बोलींच्या स्वरूपावर प्रकाश पडू शकतो. बोलीभाषा संशोधनापुढे अनेकविध आव्हाने असले, तरी सकारात्मक विचार करून बोलीभाषा संशोधन गांभीर्याने करण्याची गरज आहे.
संदर्भ टिपा : -
१) चिटणीस विजया, वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती, डॉ. कल्याण काळे, डॉ. अंजली सोमण, (संपा.) गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक, प्रथमावृत्ती १९८२ पृ. १६०, १६१
२) बोरकर हरिश्चंद्र, झाडीबोली मराठी शब्दकोश, विजय प्रकाशन,नागपूर, प्रथमावृत्ती - २००० पृ. प्राक्कथन / पंचवीस
३) नेमाडे भालचंद्र, साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मय गृह,प्रकाशन, मुंबई, सहावी आवृत्ती - २००९ पृ. १७
४) कुलकर्णी श्रीधर रं., सामाजिक भाषाविज्ञान, प्रा.डॉ.प्रभाकर जोशी, प्रा.सौ.चारूता गोखले, (संपा.) निराली प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती १९९९, पृ.२१
५) सार्वेकर कैलास, बोली: समाज, साहित्य आणि संस्कृती, प्रतिभास प्रकाशन,परभणी, प्रथमावृत्ती २०१०, पृ. १९.
६) कुलकर्णी वसंत विष्णू, 'मराठी प्रबंध सूची', साहित्य प्रसार केंद्र नागपूर, प्रथमावृत्ती २०११, पृ. २१४, २१५, २१६, २१७
( पूर्व प्रसिद्धी - ग्रंथ - बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा -संपादक प्रा.डॉ. म.सु. पगारे आणि डॉ. आशुतोष पाटील , प्रशांत पब्लिकेशन्स् ,जळगाव ,प्रथमावृत्ती , -२०१२ )
डॉ. गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग,
श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , जि .जळगाव
पिनकोड -४२५५०८
मोबाईल -९४२१०८१२७०
ई - मेल - dhembregr@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा