बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

न संपणाऱ्या दुःखाची वाट - डॉ.गणपतराव ढेंबरे, रावेर

 "न संपणाऱ्या दुःखाची वाट"

'आई' हा प्रत्येकाच्या हृदयाचा एक हळवा भाग असते. अनेक लेखक, कवीनी आईवर रचना केल्या आहेत. मराठी साहित्याचा विचार करता अनेक लेखकांनी आईचे महात्म्य सांगितले आहे. साने गुरुजींची 'श्यामची आई' फ.मु. शिंदे यांची 'आई' कविता तसेच माधव ज्युलियन यांची आईवरची कविता आपल्या लक्षात येते. 

" प्रेमस्वरुप आई। वात्सल्यसिंधु आई बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी " यातून आईचे महात्म्य सांगितले गेले आहे. गोविंदाग्रज आई विषयी लिहितात, "ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही। जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई." दलित कवी वामन निंबाळकर लिहितात, "शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो. "  साने गुरुजींनी 'श्यामची आई' लिहून आईच्या मनाचा अचूक वेध घेतला. मुलांच्या मनावर संस्कार करणारी ही कलाकृती मराठी साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली. तसेच मॅक्झिम गॉर्की यांची 'आई' ही कादंबरी सर्वपरिचित आहे. रशियन क्रांतीमध्ये या पुस्तकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. 'आई' या कादंबरीविषयी प्रो.बो. बुर्सोव लिहितात, "प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात ; आणि त्या प्रसंगांना अनुरूप अशी पुस्तकेही त्या देशाच्या वाङ्मयात आढळून येतात.गोर्कीची 'आई' ही कादंबरी, आम्हा रशियनांच्या दृष्टीने अशा पुस्ताकात मोडते. " ग्रामीण जीवनातील माणसांचे जीवन हे नेहमीच उपेक्षित असते. विशेषतः ग्रामीण स्त्री तिचं जगणं तिच्या व्यथा, वेदना जीव घेण्या असतात. आज जीवन झपाट्याने बदलत आहे. या वेगवान बदलांमध्ये सर्वसामान्य माणूस हरवत चालला आहे. त्याचं जीवन शून्यवत झालं आहे. व्यवस्थेने या माणसाचं जगणं नगण्य ठरवले आहे. हा सर्वसामान्य माणूस म्हणजे कोणता माणूस ? यात ग्रामीण भागातील गरीब, उपेक्षित, शोषित, शेतमजूर, शेतकरी, शहरातील मजूर, झोपडपट्टीतून राहणारा माणूस यांचे जीवन किंमतहिन झाले आहे. अशा माणसाच्या जीवनालाही एक अर्थ असतो. 'दुःखातही जीवन फुलत असते ' या सृजनाचा अर्थ शोधणाऱ्या लेखकांची संख्या कमी झाली आहे. अशा वेळी जी स्त्री कधीच प्रकाशात आली नसतो. तिचं जगणं तिचं सोसणं तिचा सकारात्मक स्वाभिमानी संघर्ष लोकांपुढे कधीच आला नसतं. तो मांडण्यासाठी लेखनाच्या रचनाबंधापेक्षा प्रामाणिक आत्मनिष्ठ दुःखद जीवन 'माझ्या हिरकरणीची वाट' या पुस्तकातून मांडले जाते. हे आपल्या वाटयाला का आले ? याची कारणमीमांसा लेखकाने टाळली आहे. समाज, प्रथा, परंपरा, संस्कार, संस्कृती, स्वार्थी नातेसंबंध, अडाणीपणा, यात दुःखाला नेमकं कोण जबाबदार आहे ? याचे उत्तर हे पुस्तक देत नाही, नियतशरणता' हा स्वाभावधर्म या आत्मकथेतून प्रकटतो. दुःखातही सुख शोधणारी माणसं हा या पुस्तकाचा विशेष आहे.

या पुस्तकाला चरीत्र म्हणावे की आत्मचरित्र असा प्रश्न पडतो. कारण पुस्तकावर महादेव वाळुंज हे नाव आहे म्हणजे हे चरीत्र ठरते. पुस्तकाच्या पहिल्या भागात महादेव वाळुंज यांचे निवेदन येते त्यातून हे चरीत्र आहे असा वाचकाचा समज होतो तर दुसऱ्या भागाची सुरुवात आई सांगते, अशी होते. संपूर्ण पुस्तकभर आत्मनिवेदनपर लेखन येते. आत्मचरीत्रात खुद्द लेखक स्वतःच्या गतजीवनाची कथा स्वतःच निवेदन करतो. मूल्यगर्भ दृष्टीने घेतलेला आत्मशोध ही आत्मचरित्राची मूलभूत गरज असते. वर्तमानकाळाच्या विशिष्ट टप्यावरुन भूतकाळाचा वेध घेत जोवनकथेची रचना करणे, स्व-जीवन विषयक विशिष्ट भूमिकेतून घटना प्रसंग इ. घटितांची निवड करणे, स्व-जीवनाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे निगडित असलेल्या व्यक्तींचे चित्रण करणे आणि अर्थातच गतजीवनाचे निवेदन करणे, हे आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या संकेतव्यूहामधील महत्त्वाचे घटक आहेत. या वरील आत्मचरित्राच्या व्याख्याशी या पुस्तकाचा सहसंबंध कसा आहे ? याचा विचार करताना ठळक गोष्ट म्हणजे हे लेखन लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळूंज यांच्या जीवनाचे सलग कथन आहे. या पुस्तकात लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळूंज यांच्या गतजीवनाची मांडणी केलेली आहे. एकूण मानवी जीवनाच्या व्यापक संदर्भात गतजीवनाचे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून होतो. स्त्रीचं जीवन म्हणजे समन्वय, सहयोग, सहकार्य होय. हे पुस्तक वाचताना  कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी आठवतात. " लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" हे खरंच आहे नांदण्यातून जीवन उभे राहते. स्त्रीच्या सोशीकपणातून संसार फुलतो. पण सोशीकपणातून त्या व्यक्तीच्या व्यथेला वेदनेला, दुःखाला परिसीमा राहत नाही. या पुस्तकातून हे दुःख प्रकट होते.

मुळात स्त्रीचे जीवन परावलंबी असते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबीक, मानसिक परावलंबी असणारी स्त्री आणि तिची अगतिकता या पुस्तकातून अगदी समर्थपणे अभिव्यक्त होते. वाचकाच्या मनात हे पुस्तक चीड निर्माण करते. लक्ष्मीबाईनी बंडखोरी का केली नाही ? हा त्रास. दुःख, शोषण त्यांनी का सहन केले ? या प्रश्नाचे उत्तर त्यांचे परावलंबन हे आहे. तसेच त्या काळातील समाज, रूढी, परंपरा, नातेसंबंध या शोषणाला जबाबदार होते. घरातलं वातावरण धार्मिक होत. परंतु या घरातील माणसं स्त्रियाच्या छळाला छळ म्हणतं नव्हते. देव, धर्म, पूजा, कीर्तन करणारी माणसं दुसन्याचं मन जानत नाहीत .आपल्याच घरातील स्त्रीच्या भावना समजून घेत नाहीत, यात ढोंगीपण दिसतो. तसेच त्या काळातील समाजाच्या व्यक्तीच्या मानसिकतेवर ह्या पुस्तकातून प्रकाश पडतो. स्त्रीला त्रास देणे, छळ करणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. असे समाजाचे मन होते. हे या पुस्तकातून मांडले जाते. या पुस्तकातून एका उपेक्षित स्त्रीचे जीवन येते. तिच्या हालअपेष्टा, वेदना, दुःख वाचकाला अंर्तमुख करते. तत्कालिकन समाजातील रूढी, परंपरा, मान, अपमान, कुटुंब यांचे प्रभावी चित्रण येते. सासरे पोथी वाचत बसलेले होते आणि त्यांचा आवाज आम्हाला ठळकपणे येत होता. पण त्यांना माझ ओरडण्याचा आवाज जात असून ते येत नव्हते. त्यांच्या मदतीची आशा संपली होती. कारण माझा ओरडण्याचा आवाज ऐकून मामंजींनी पोथी वाचायची बंद केली. आणि आपल्या खोलीतील चिमणी बंद करून गप्प पडून राहिले. या प्रसंगातून तत्कालीन कालखंडातील मानसिकतेवर प्रकाश पडतो. पुरुषव्यवस्था शोषणव्यवस्था यांचा चेहरा या आत्मकथनातून स्पष्ट होतो.

एकत्र कुटुंब पद्धतीचे गुण-दोष या आत्मकथनातून मांडले जातात. या मांडणीत स्वाभाविकता दिसते. अज्ञानी, आडाणी माणसांच्या जगण्यातील ताण या पुस्तकातून व्यक्त होतात.  ५० वर्षा पूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रीच्या जीवनाचा वेध हे पुस्तक घेते. आज पर्यंत ग्रामीण साहित्यकृतीतून आलेल्या स्त्री जीवनापेक्षा या पुस्तकातील स्त्रीचे जीवनच वेगळे आहे. या मांडणीला वास्तवाचा आधार आहे. प्रांजळपणे जीवन मांडले आहे. या संपूर्ण कलाकृतीत कोणावरही दोषारोप केलेला नाही. आपल्या दुःखाची सहजतेने उभारणी केली आहे. हे दुःख वाचकाच्या मनात पीळ निर्माण करते. त्या स्त्रीच्या वेदना काळजाला हात घालतात. हे पुस्तक वाचत असताना ग्रामीण भागातील माणसाला आपली आई, आजी, काकू, आत्या, मावशी आपल्याशी बोलत आहे असा भास होतो. यापैकी कोणीतरी मनापासून आपला भूतकाळ आपल्याला सांगत आहे. याचे जाणीव मनात निर्माण होते. ही एक संपूर्ण पिढीची आत्मकथा म्हणता येईल. हा मराठी साहित्यातील अभिनव असा प्रयोग आहे. या पुस्तकाच्या रचनाबंधावरुन याला आत्मचरीत्र म्हणता येईल. या पुस्तकातून लक्ष्मीबाई यांचा सलग जीवनप्रवास आत्मनिष्ठेने मांडला जातो. परंतु या पुस्तकाचे निवेदन कथनात्मक स्वरुपाचे आहे. ही कथा सत्य व वास्तव अशी आहे. म्हणून या पुस्तकाला आत्मकथा म्हणता येईल.

देवावर विश्वास ठेवणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या जीवनाचा विचार करता देवावर आस्था श्रद्धा ठेवल्यामुळे जगण्यात एक सकारात्मक भावना येते. आस्था माणसाला स्थिर करते. लक्ष्मीबाई वाळूंज यांच्या जीवनात त्यांची परमेश्वरावरील गाढ श्रद्धा त्यांना विपरीत प्रसंगात जगण्यासाठी प्रेरक ठरते. याविषयी त्या लिहितात, मी देवीचा हवाला देऊन पोरांना धीर द्यायचे. मी म्हणायचे, "आपण आयुष्यात कोणाचं कधीच वाईट केलेले नाही, तर रासुबाई आपलं काहीही वाईट करणार नाही. देवावर भरोसा ठेवा, काही होत नाही.. यातून लक्ष्मीबाई यांच्या श्रद्धेचे स्वरुप आपल्या लक्षात येते. 'मराठा' जातीतील स्त्रियांचे जीवन हे अप्रकाशित दुर्लक्षित असे आहे. कुटुंबातूनच स्त्रीला दुय्यम मानले जाते. घरण्याच्या ,जातीच्या कुटुंबाच्या श्रेष्ठत्वाच्या भावना स्रीच्या वागणे, बोलण्याशी ,अचरणाशी जोडल्या जातात. संस्कार मूल्यं, परंपरा, धर्म, संस्कृती, नाते संबंध हे स्त्रीच्या शोषणाचे केंद्र बनतात. शोषणाला मोठेपणाचा, ढोंगी खानदानीपणाचा मुलाम चढवून माणसाला गुलाम केले जाते. कुणाला सांगताही येत नाही व सहनही होत नाही अशी अवस्था व्यक्तीची होते. या अवस्थेतून व्यक्तीच्या वाट्याला येते ते फक्त दुःख आणि दुःखच .'माझ्या हिरकणीची वाट ' हे लेखक महादेव वाळूंज यांचे पुस्तक अनेक बाजूनी महत्त्वपूर्ण ठरते. यातील एक भाग म्हणजे लेखनाची फारसी पूर्वपरंपरा नसतांना वेगळ्या विषयांवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या व आज वृद्धत्वकडे झुकलेल्या एका स्त्रीची संघर्षपूर्ण कहाणी म्हणजे महादेव वाळुंज यांचे हे पुस्तक होय. ही स्त्री म्हणजे महादेव वाळूंज यांची माता होय. लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांनी आयुष्यभर जे भोगल, सोसलं याचे आत्मकथन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.

लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांचा जीवनप्रवास हा अत्यंत वेदनामय आहे. अनेक संकटांच्या मालिकेला तोंड देत ठामपणे उभे राहण्यासाठी ही कथा प्रेरणादायी दुःखावर मात करणारी आहे. प्रांजळ आत्मनिवेदन हा लेखनाचा आत्मा आहे. या पुस्तकाची भाषा ओघवती आहे. एकदा पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेवावं असं वाटत नाही. एक भावनिक प्रामाणिकपणे ही आत्मकथा साकरत जाते. ही आत्मकथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते. लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या जीवनातील चढ-उतार वाचकाला विचार करायाला लावतात. सतत सकारात्मक जीवनदृष्टी ठेवल्यामुळे हेही दिवस जातील हा आशावाद जिवंत राहतो. काळ बदलतो जीवन बदलते, माणसं बदलतात.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या मुलांचा शिक्षणासाठीच्या संघर्षाचे चित्रण येते. शैक्षणिक फी साठी करावे लागणारे कष्ट, सोसाव्या लागणाऱ्या यातना यांचे अगदी मोजके परंतु महत्त्वपूर्ण चित्रण येते. आज मराठा समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. ती किती सार्थ आहे. याची जाणीव या पुस्तकाच्या उत्तरार्धातून होते. ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. शेतकरी जीवनातील ताण , तणावाचे सूक्ष्मतेने चित्रण येते. काही अतिशय लहान लहान बारकावे या आत्मकथेतून मांडले जातात. शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था या आत्मकथनातून उलगडत जाते. बदलत्या परिस्थितीत शेतकरी कुटुंबाचे होणारे हाल, आबाळ यांचे चित्रण नकळतपणे मांडले जाते. तो संघर्ष जीवघेणा होता. अस्तित्व पुसता पुसता पुन्हा स्वतःला सिद्ध करणारा होता. पुस्तकाच्या शेवटी लक्ष्मीबाई वाळूंज म्हणतात, "माझ्या वाटचालीत आलेल्या काट्याकुट्यांची फुले झाली, अशी बहरलेली वाट सर्वांना मिळत राहो." यातून आपल्या वाट्याला आलेले आयुष्य, मुलखावेगळं जगणं सोसून सर्वांच्या कल्याणाची आस धारणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांची ही आत्मकथा वेधक, सकारात्मक संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारी आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात या पुस्तकाचे एक खास वेगळेपण आहे. ही 'माझ्या हिरकणीची वाट ' या पुस्तकाचे लेखक महादेव वाळूंज हे आहेत. परंतु पुस्तकातील निवेदन हे आत्मनिष्ठ स्वरुपाचे आहे. ही कथा लक्ष्मीबाई वाळुंज सांगतात आणि महादेव वाळुंज लिहितात, तसे पहिले तर एक मुलांने आपल्या आईचे लिहिलेले हे चरित्रचं आहे. परंतु चरित्राचा रचनाबंध टाळून आत्मनिष्ठपणे ही आत्मकथा साकरत जाते. हा जीवनानुभव जसा सांगितला तसा लिहिण्याचे काम महादेव वाळूंज यांनी केला आहे.

वाङ्मयीनदृष्ट्या या पुस्तकात गुणवत्ता निर्माण झाले ती महादेव वाळुंज यांच्या प्रयत्नातून परंतु यातील जीवनकथा ही सरळ  नाही. या आत्मकथेत प्रचंड संघर्ष भरलेला आहे. हा संघर्ष आज आपणाला नाटयमय वाटतो. परंतु तो संघर्ष जगलेल्या लक्ष्मीबाई वाळुंज व त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय खडतर होता.ग्रामीण जीवनातील आई आणि मुलगी यांच्या नात्यातील विविध पदर या पुस्तकातून उलगडतात. हे पुस्तक वाचून झाल्यावर असं वाटतं की, असं जीवन आता राहिले नाही. परंतु त्याकाळातील स्त्रियांच्या स्थितीगतीवर या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो. त्यामुळे या पुस्तकाला एका ऐतिहासिक दस्तऐवजाचं महत्त्व प्राप्त होते. आपल्या पूर्वंजाच्या जगण्याबद्दलचे भान या पुस्तकातून जागे होते. एक ५०/६० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रीच्या जीवनाचे यथार्थ चित्र या पुस्तकातून येते. त्यामुळे या पुस्तकाला ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व आहे. "त्या काळात आम्ही बायका चावडी समोरुन जाताना पायातील वाहना हातात काढून घेत होतो, असा काळ तेव्हा मी काय बोलणार पंचांसमोर ? " हा प्रश्न तत्कालीन समाजाविषयीचे विश्लेषण करण्यास समर्थ ठरतो. ग्रामीण माणसाचं जगण्याविषयीचे शहणपण या पुस्तकातून येते. असं जर आपण जमिनी विकून खायला लागलो तर मुलांना जमीनी राहणार नाहीत. ते भूमिहीन होतील आणि आयुष्यभर त्यांना मोलमजूरी करुन जगावं लागेल." जमीनीविषयीचा लक्ष्मीबाईचा दृष्टीकोन यर्थाथ ठरतो. लक्ष्मीबाई वाळुंज यांचा जीवनप्रवास म्हणजे कष्ट, दुःख, अपमान, पोरकेपण, अकाली वैधव्य ,आश्रिताचं जिणं यातून हिंमतीने केलेला प्रवास होय."

शिरूर परिसरातील बोलीभाषेचे उपयोजन हे पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगता येते. कुणबी कुटुंबातील खास शब्दप्रयोग, बोलीतील म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर या पुस्तकात केलेला आहे. संवादात्मकता हा ही एक विशेष आपणाला नोंदवता येतो. या आत्मकथनातील काही व्यक्तीरेखा, प्रसंग, घटना संवादातून आकार घेतात. संवाद प्रभावी असल्यामुळे ह्या व्यक्तीरेखा प्रसंग, घटना अधिक ठळक होत जातात. वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. हे संवाद शिरूर परिसरातील बोलीभाषेतून आकाराला येतात. ते जिवंत वाटतात. कठीण प्रसंगात धीरानं वागणारी, कसोटीच्या क्षणी आत्मविश्वासाने जगणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांचा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास वाचत असताना त्यांच्या नात्यातील माणसांचा राग वाचकाला येतो. परंतु या माणसांचं चित्रण खलनायकी पद्धतीने येत नाही. जाणीवपूर्वकता, उरबडवेपणा, उग्रता, भावना पेटवणारे, दुःखाचे भांडवल करणारे असे हे लेखन नाही. या लेखनात संयतपणा, सुसंस्कृतपणा जाणवतो. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगता येईल. तसेच संसार दुःखातून फुलतो. सहकार्य, सहयोगातून सुंदर नातं तयार होते. आणि हे ही दिवस जातील हा आशावाद असल्यामुळे लक्ष्मीबाई हा जीवनसंघर्ष चिकाटीने लढतात. आणि त्यात विजयी होतात. हा भाग या पुस्तकात महत्त्वाचा ठरतो. 

माझ्या प्रेमामुळे आणि समाज काय म्हणेल ? या जगरहाटीमुळे, माहेरची माणसं कात्रीत सापडल्यासारखी झाली होतो. तेरा चौदा वर्षांच्या मुलीचा माहेरी कसा निभाव लागेल ? आणि आत्ताच तिचा संसार मोडला तर कसे दिवस जातील ? विचार करून करून आई-आबा थकायचे, चुलत्यांशी, भावाशी बोलायचे; पण मार्ग काही दिसत नव्हता. याबाबत मला कोणी काही विचारत नसे आणि मीही काहीच बोलत नसे, काय बोलणार ? स्वतःच्या जीवनाची ही समीक्षा लक्ष्मीबाई करतात. आज काळ बदलला. समाज बदलला पण आजही मुलीच्या संसाराची व्यथा आणि कथा बदलली आहे का ? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करतो. या पुस्तकातून तत्कालीन स्त्रियांच्या दुःखाचे प्रभावी, विविधांगी चित्रण येते. आपल्याला छळणाऱ्या माणसांबद्दल लक्ष्मीबाई लिहितात, "एका मस्तीत आणि धुंदीतच वादळासारखी सारी माणसं वावरत होती. जगाशी चांगलं वागणारी ही माणसं माझ्यासाठी कर्दनकाळ होती." यातून माणसांच्या वागण्याचं अचूक वेध घेतला जातो. या पुस्तकातून आपल्या दुःखाला, शोषणाला जबाबदार कोण आहे. याचा शोध घेतलेला नाही. या पुस्तकातील मांडणीमध्ये 'आहे हे असा आहे' अशी किनार आहे. अस्वस्थत हे या लेखनाचे वैशिष्टये आहे. आक्रस्थळेपणा, उरवबडवेपणा, नाटकी अभिनिवेशापेक्षा या पुस्तकातील मांडणीत, संयमी, दुःखाची मांडणी आहे. या पुस्तकातून शांतपणे वेदना वाचकाच्या मनात रुतत जाते. व्यक्तीला पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनातील वेदनेचा काटा खूप खोलवर रुतला आहे. याची जाणीव होते. तीव्र ठणक मनात ठेवून हे पुस्तक संपते. ते पुन्हा पुन्हा वाचताना मनाला नवा आशावाद, संयमी, भान देते.

"दोघी देवावरून आलेल्या असूनदेखील वाईट वाईट बोलायला लागल्या. यातून लक्ष्मीबाईंची मूल्य दृष्टी लक्षात येते. देवांवर विश्वास ठेवून चांगलं वागलं पाहिजे असे त्यांना वाटतं. परंतु सख्या नात्यातील माणसं देव, धर्म करतात पण आपणाला समजून घेत नाहीत. ही खंत लक्ष्मीबाई व्यक्त करतात. ग्रामीण जीवनातील स्त्रियांच्या स्वाभावातील बारकावे, वागण्याच्या तऱ्हा, त्यांच्यातील संवाद हे अत्यंत सूक्षमतेने टिपले आहेत. आजवर या विविध नात्यांवरील लेखन ठोकळेबाज पद्धतीने झालेले आहे. याला हे पुस्तक अपवाद ठरते. सासू-सून, वहिनी नणंद ,यांच्या जगण्याचा या पुस्तकातून यथार्थ शोध घेतला आहे. 'माझ्या हिरकणीची वाट' या पुस्तकातून लक्ष्मीबाई वाळुंज यांच्या गतजीवनाची विशिष्ट उद्दिष्टानुसार ,निश्चित सूत्रानुसार रचना केलेली आहे. हे निश्चित सूत्र म्हणजे दुःखाचा, वेदनाचा आत्मशोध मांडणे. लेखक महादेव वाळुंज लिहितात, "आईन भोगलं ते लिहिताना आम्हाला खूप वेदना झाल्या. तिच्या वेदनांची कहाणी लिहिताना क्षणक्षणाला, अक्षरा अक्षराला, शब्दाशब्दाला, वाक्यावाक्याला काळीज तुटलं, काळजाचं पाणी झालं, ते सोसत सोसत आम्ही हे लिहिलं" ही या लेखनामागील प्रेरणा आहे. हेच या लेखनामागील निश्चित असे सूत्र आहे. एखादा दुःखद प्रवास व्यक्ती जेव्हा सांगत असते तेव्हाच तो पुन्हा एकदा जगत असते. त्या यातना, दुःख देतात. त्या एकदा कागदावर उतारल्या की मनातील दुःखाचे सृजनाच्या पावसात रुपांतर होते. या लेखनाचे हेच एक महत्त्व आहे. ग्रामीण जीवनात गरीब असणाऱ्या माणसांना आपली व्यथा कुणाला सांगवीशी वाटते पण सांगण्यासाठी साधन उपलब्ध असत नाही .आज विशेषतः मराठा जातीतील 'स्त्री' ही परिवर्तनाच्या साधनांचा उपयोग करून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आजही ग्रामीण भागातील मराठा जातीतील स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. स्वतः लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज ह्या अशिक्षित असतानाही त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचा नवप्रकाश दाखवला. वाळुंज कुटुंबात शिक्षणामुळे क्रांती घडून आली. परिवाराचा उपजीविकेसाठीचा संघर्ष काहीसा स्थिरावला. जीवन जगत असताना परिस्थिती व्यक्तीला कसं जगण्यासाठी भाग पाडते. या परिस्थितीशी, नियतीशी संयतपणे, धीराने संघर्ष करणारी लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज ह्यांची ही कथा म्हणजे माझ्या हिरकणीची वाट' हे पुस्तक होय. या पुस्तकातून डॉ.महादेव वाळुंज यांचा जीवनप्रवास नकळतपणे ओझरतो येतो. त्यांनी स्वतःचे आत्मकथन लिहिल्यास या पुस्तकाचा पुढील भाग प्रकाशात येईल. आज निराश झालेल्या पराभूत मानसिकतेत जगणाऱ्या ग्रामीण मुलीसाठी लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी, आशावाद जागवणारा ठरु शकतो. आपल्या हातून काहीच होणार नाही असा निराशवाद ठेवणाऱ्या मुलींसाठी हे पुस्तक वाट दाखवणारे आहे.

या पुस्तकातील भाषा सहज साधी सोपी आहे. छोटी-छोटी वाक्यरचना कवितेच्या ओळीसारखी आहे. भावनेचा धागा कायम पकडून ठेवणारी ही भाषा मनाला अस्वस्थ करते. सांगण्यातला प्रामाणिकपणे मनाचा ताबा घेतो. पुस्तकाच्या पहिल्याच भागातील हो वाक्य रचना उदाहरणासाठी लक्षात घेऊ, " गाडीचा वेग कमी करणे म्हणजे आईच्या भेटीचा वेळ लांबणे. तेच मला सहन होत नव्हतं. आईला पाहण्यासाठी लावणारा प्रत्येक क्षण परीक्षा पाहणारा. मनात नाना प्रश्न आणि शंका निर्माण करणारा. सासऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि संवादास प्रतिसाद, होकार नकार यापेक्षा जास्त देणं मला शक्य नव्हतं. मी काही बोलूच शकत नव्हतो. माझ्या नजरेत, मनात, काळजात आणि काळजीत होती फक्त.... आई... आई... आई माझ्या सर्वस्यातून फक्त एकच किंचाळी हंबरडा फोडत होती. आई... आई... आई. या लेखनात आपल्याला काव्यात्मकता जाणवते. वरील परिछेदातील काही ओळी कवितेच्या ओळींची आठवण करून देतात.

"माझ्या हिरकणीची वाट" या पुस्तकातील नायिका लक्ष्मीबाई वाळुंज यांचे जीवन म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर महादेव वाळुंज देतात, ते लिहितात, "मनसोक्त, मनमुराद, भरभरून असं कधीच काही मिळालंच नाही, नाही म्हणायला एक गोष्ट भरभरून मिळाली, ती म्हणजे दुःख, दारिद्र्य, दैना, त्यामुळे तिला जे काही मिळालं ते तिनं नेहमी जिवापाड जपलं, दोन रुपयं रोजानं काम केलेलं त्यामुळे जे मिळाले ते साठवायचं, त्याला जपायचं, सगळं, संपवायचं नाही, ते भविष्यासाठी साठवून ठेवायचं, हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला होता. " लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाळुंज यांच्या जीवन जगण्याची दृष्टी, यातून स्पष्ट होते. सुखातही दुःखाचा विसर न पडणाऱ्या व्यक्ती सजग आयुष्य जगतात. जीवनात हौस, सुख, चैन, चंगळवादापेक्षा उपयुक्तता, गरज, समाधान यांना महत्त्व देणाऱ्या लक्ष्मीबाई वाळुंज यांचे जीवन म्हणूनचं मार्गदर्शक ठरते. या पुस्तकाच्या लेखनामागील प्रेरणा स्पष्ट करतांना महादेव वाळुंज लिहितात, "आईची कहाणी अतिशय वेदनामय आपल्याला खूप वेदना होतात, पण नकळत उभे राहण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच माझ्या आईची ही कहाणी तिनं सांगितली तशी... तर महादेव वाळुंज यांच्या आई लक्ष्मीबाई वाळुंज लिहितात, "कुणाला दुखावण्यासाठी, दोष देण्यासाठी वा कुणाचा अपमान करण्यासाठी नाही. फक्त सगळ्यांच्या ऋणांची दखल घेण्यासाठी, पोरांच्या आग्रहाखतर, माझ्या माणसांनी चाहूबाजूंनी लावलेल्या हातभारामुळेच माझा उद्ध्वस्त झालेला संसार व अनाथ झालेल्या पिलांचे जीवन फुलू शकलं. त्याची ही कहाणी जशी आठवली तशी. "यातून या पुस्तकामागील उद्देश आपल्या लक्षात येतो. आपल्या जीवनाच्या उभारणीत हातभार लावलेल्या माणसांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक निर्माण झाले आहे. या पुस्तकातील जीवनप्रवास अतिशय खडतर यातनामय, दुःखांनी भरलेला आहे. काही माणसांचं जीवन म्हणजे संकटांची मालिकाच असते. या दुःखाच्या मालिकेतही व्यक्ती स्वतःला, आपल्या कुटुंबाला घडवते. याचा प्रवास म्हणजे हे पुस्तक होय.

आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. यात पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक दिसते. स्त्रियांचे आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. या समीकरणाची उकल हे पुस्तक वाचताना होते. स्त्रीचा स्वाभाव हा संघर्षशील असतो. दुःखातून मार्ग काढत जाण्याची उपजत दृष्टी स्त्री मध्ये असते. त्यामुळे स्त्री खचून जात नाही. परिस्थितीशी ,संकटांशी दोन हात करण्याची अधिक शक्ती स्त्रीमध्ये असते. याची जाणीव या पुस्तकातून होते. हे पुस्तक समस्याग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोहचल्यास त्यांना ते नवी उमेद देऊ शकते. त्यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करु शकते. लक्ष्मीबाई वाळुंज यांचा जीवनप्रवास एक प्रेरक, उत्सह वाढवणारा, असा प्रवास आहे. जीवनाविषयी आस्था निर्माण करणारे हे पुस्तक आहे. दुःखात खंबीरपणे उभा राहण्याची आस या पुस्तकातून व्यक्त होते.

डॉ.महादेव वाळुंज यांना पुढील लेखन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !


डॉ. गणपतराव ढेंबरे,

मराठी विभाग

श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर ता. रावेर, जि.जळगांव

ई-मेल dhembregr@gmail.cor

भ्रमणध्वनी : - ९४२१०८१२७०

२ टिप्पण्या:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...