शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

पिढीजात कादंबरी वरील लेख


"राजकारण आणि सहकार व्यवस्थेचे स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात - पिढीजात "

 स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे इमारतीची संरचनात्मक परीक्षण होय. सहकाराची इमारत दूरदृष्टीच्या नेतृत्वाने उभी केली. सहकाराच्या इमारतीमुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणावर ,राजकारणावर, समाजकारणावर ,संस्कृतीवर, उद्योगावर, रोजगारावर मूलभूत असा बदल झाला. लाखो लोकांच्या जीवनावर सहकार चळवळीच्या इमारतीतचा मूलगामी सकारात्मक परिणाम झाला. दिवसेंदिवस ही चळवळ, सहकाराची इमारत नवेनवे इमले बांधताना दिसली. वरवर सारं काही आलबेल वाटणारी ही चळवळ, इमारत आतून मात्र पोखरली गेली. इमारतीचा मूळ पाया ठिसूळ झाला. इमारत धोकादायक स्थितीत पोहोचली. म्हणून या चळवळीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली. निरीक्षक इमारतीची पाहणी करुन नोंदी ,निरीक्षणे आणि चाचण्यांनंतर इमारतीच्या दुरुस्तीची शिफारस करतो. निरीक्षक सर्व चाचण्यांवरून निश्चित स्वरुपाचे अनुमान नोंदवत असतो. या
अनुमनांमध्ये ही इमारत राहण्यायोग्य आहे की नाही? ती तातडीने अंशात किंवा पूर्णतः खाली करावी का? काही धोकादायक भाग पाडून टाकावा का? इमारत तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे का? इमारत धोकादायक आहे का? अशा गोष्टींचा उल्लेख अनुमनामध्ये असतो. निरीक्षक आपला अभिप्राय चार प्रकारात मांडतो. यातील पहिला प्रकार म्हणजे इमारत तातडीने खाली करून पाडून टाकावी. दुसरा प्रकार म्हणजे तातडीने रिकामी करून दुरुस्त करावी. तिसऱ्या प्रकारात इमारत रिकामी करण्याची आवश्यकता नाही पण दुरुस्त करावी. आणि चौथा अभिप्राय म्हणजे किरकोळ दुरुस्ती करावी.

 पिढीजात या कादंबरीचा नायक नवनाथ शेळके याने सहकार चळवळीचे ऑडिट करण्यास घेतले आहे. नवनाथ शेळके हा निरीक्षक आहे. त्याने सहकार चळवळीची पाहणी करुन नोंदी, निरीक्षणे आणि चाचण्यांनंतर इमारतीच्या बाबतीत निश्चित अनुमान नोंदवले आहेत. नवनाथ शेळके स्ट्रक्चरल ऑडिटच्या नियमाप्रमाणे आपला अनुमान चार प्रकारात नोंदवला आहे. कादंबरीच्या वाचनातून घाईने निर्णयप्रक्रिया पार पाडल्यास पहिला अनुमान इमारत तातडीने खाली करून काढून टाकावी. असा अभिप्राय वाचक नोंदवू शकतो. दुसरा अनुमान दुरुस्तीचा आहे. नवनाथच्या सकारात्मक मानसिकतेत अजून वेळ गेलेली नाही. तातडीने इमारत दुरुस्त केली पाहिजे. असा अनुमान नोंदवला जातो.तिसऱ्या प्रकारचा अनुमान म्हणजे इमारतीला काहीच झालेलं नाही. हा भोळा आशावाद सहकारबद्दल काहींच्या मनात असू शकतो. किरकोळ दुरुस्ती करून इमारत आहे तशीच ठेवावी का? हा अनुमान वाचकांना अस्वस्थ करतो. मूळात सहकारी चळवळी विषयीची स्ट्रक्चरल ऑडिट प्रक्रिया हाच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. संपूर्ण कादंबरी वाचकाला अजागळ जगण्याच्या गुंत्यात सोडून भवडून टाकते. भान हरपून, शुद्ध नसलेल्या माणसाच्या मनस्थितीचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते.मन अस्वस्थ होते.मेंदू बधिर होतो. स्वार्था पराकोटीला पोहोचतो. माणसाला माणूस राहू देत नाही. माणसाचे पशुमध्ये रूपांतर होते. याचा जिवंत अनुभव या कादंबरीतून येतो.


स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इसवी सन १९६० नंतर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सहकार चळवळ उदयाला आली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सहकार महर्षी विखे पाटील ,पंजाबराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ ,भाऊसाहेब हिरे, तात्यासाहेब कोरे, नागनाथअण्णा नायकवडी यांनी महाराष्ट्रात सहकार रुजवला, वाढवला. सहकार चळवळीतून सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका ,सहकारी पतसंस्था ,सहकारी दूध संकलन संस्था, सहकारी सूतगिरण्या, मजूर सहकारी संस्था यांचे जाळे महाराष्ट्रभर उभे राहिले. उदात्त ध्येय, विशाल स्वप्न घेऊन ह्या महाकाय संस्थांचा विस्तार सुरू झाला. सहकारातून समताधारी अर्थव्यवस्थेचा जन्म झाला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या महान उद्दिष्टासाठी सुरू झालेली सहकार चळवळ स्वार्थी नेतृत्वाने 'स्व हिताय ' 'स्व सुखायसाठी ' वापरून घेतली . यातून राजकारणातील आपले स्थान बळकट करण्यासाठी सहकार चळवळी, संस्था राजकारणातील एक सोंगट्याप्रमाणे  वापरल्या गेल्या.

 सन १९९० नंतर जागतिकीकरणाच्या पर्वाला आरंभ झाला. स्वार्थी राजकारणी आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी यांच्या अभद्र युतीतून सहकार चळवळ, संस्थांच्या शेवटच्या अस्तित्वावर शेवटचा घाला घातला गेला.शेतकऱ्यांच्या घामातुन, रक्तातुन उभ्या राहिलेल्या सहकारी संस्था कवडीमोल भावाने विकल्या गेल्या. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. हजारो शेतकरी, कामगार देशोधडीला लागले. या सर्व शोषित वर्गाचे दुःख व्यवस्थेला उमजले नाही. या संपूर्ण विनाशकारी व्यवस्थेचा भाग असणारा संवेदनशील अधिकारी नवनाथ शेळके या भ्रष्ट व्यवस्थेतील सूक्ष्म बारकावे प्रस्तुत कादंबरीत अत्यंत वास्तवदर्शी स्वरूपात मांडतो. ती व्यवस्था डोळ्यासमोर उभी करतो.

 इसवी सन २०००  नंतर फायद्यामध्ये असणारे शेकडो कारखाने तोट्यात गेले. सहकारी चळवळीतील संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणून कार्य करत असते. आपल्या भूमिकेची मर्यादा सोडून संचालक मंडळ मालक म्हणून वावरू लागले. मनमानी कारभारामुळे नफ्यात चालणाऱ्या संस्था तोट्यात गेल्या. तोट्यात गेलेल्या पतसंस्था, बँका,सहकारी साखर कारखाने महाराष्ट्र शासनाला स्वतःवरील ओझे वाटू लागले. पद्मश्री सहकारी साखर कारखाना बंद पडलेला का? बंद पडलेला ?याबद्दल संभ्रम निर्माण करणारी स्थिती दिसते. डीडीआर नवनाथ शेळके पद्मश्री सहकारी साखर कारखान्याचा लिक्विडेटर म्हणजेच अवसायक म्हणून काम करतो. कारखान्याचा अवसायक ते कारखाना खाजगी व्यक्तीला विकण्यापर्यंतचा विश्वस्त म्हणून नवनाथ शेळके काम करतो. हे काम करत असताना पद्मश्री सहकारी साखर कारखाना बंद झाल्यामुळे उध्वस्त झालेल्या माणसांची वेदनामय कथा म्हणजे पिढीजात कादंबरी होय.
इ.सन २००० नंतर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी संगनमत करून आपापल्या भागातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावात विकत घेतले. काही ठिकाणी श्रीमंत भांडवलदारांनी हे सहकारी साखर कारखाने पुढारी लोकांच्या मदतीने विकत घेतले. या कारखान्यातील मशनरी त्यातील असेट पेक्षा या कारखान्याची दोनशे ते पाचशे एकर जमीन मिळवण्यासाठी सहकारी साखर कारखाने राजकीय पुढारी व भांडवलदारांनी विकत घेतले. शेतकऱ्यांच्या कडून कवडीमोल भावाने सहकारी संस्थांसाठी दिली गेलेली जमीन पुढाऱ्यांनी फुकटात लाटली. ही संपत्ती मालमत्ता मिळवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी मदतीला धावले. स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी शेतकरी ,कामगारांचा बळी दिला गेला. या व्यवस्थेचा भाग न बनणारा,मूल्यांना जपणारा नवनाथ शेळके सारखा अधिकारी बळी दिला गेला. शेवटी बळी हत्तीचा दिला जात नाही तर  बकऱ्याचा दिला जातो. हे कादंबरीतील वाक्य आजच्या व्यवस्थेचा खरा चेहरा उघडा पाडणारे आहे.


शेतकरी कुटुंबातील नवनाथ शेळके हा अधिकारी आपल्या मूल्यांची प्राणपणाने जोपासना करतो. गरजा मर्यादित ठेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दुर्मिळ होत असलेली संवेदनशीलता नवनाथ शेळकेकडे आहे.प्रशासकीय अधिकाऱ्याकडे वैचारिक प्रगल्भता असणे आवश्यक वाटते. जीवनाचा, जगण्याचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता प्रशासकीय अधिकाऱ्यातअसल्यास तो उत्तम पद्धतीने प्रशासन चालवतो. पंरतु परस्थिती विपरीत आहे.भौतिक सुखांमध्ये अडकून पडलेल्या प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या वर्तनाचे अधःपतन प्रस्तुत कादंबरीतून मांडले जाते. स्थानिक प्रशासकीय अधिकारी ते मंत्रालयातील सचिवापर्यंत सर्व अधिकारी वर्गाच्या वागण्याच्या वर्तनाच्या तऱ्हा प्रस्तुत कादंबरीतून चित्रित होतात. सर्वसामान्य माणसांच्या दुःखाला वेदनेला ही प्रशासकीय यंत्रणा कशी जबाबदार आहे. याचा वेध प्रस्तुत कादंबरी घेते.  व्यवस्था बदलू शकत नाही. शोषण व्यवस्था अधिकाधिक बळकट होत आहे. ती बदलता येणार नाही. या व्यवस्थेचे आपण काहीच करू शकत नाही. हा सर्वसामान्य माणसाचा समज अधिक दृढ होत आहे. व्यवस्थेने मूल्यांना,संवेदनशीलतेला, माणसाला षंढ बनवून टाकले आहे. राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी लोकशाहीला बटिक म्हणून वागवत आहेत.याबद्दलचा रोष, हतबलता प्रस्तुत कादंबरीतून पुढे येते. संवेदनशील वाचकांना पानापानावर अस्वस्थ करणारी ही कलाकृती अभिजात दुःख व्यक्त करणारी उत्तम कलाकृती ठरते.

'पिढीजात ' ही श्रीकांत देशमुख यांची कादंबरी मराठी कादंबरी इतिहासातील एक महत्त्वाचे कादंबरी आहे. अनेक अभ्यासकांनी प्रस्तुत कादंबरीविषयी अत्यंत सखोल व चिकित्सक मत नोंदवली आहे. अभ्यासकांनी पिढीजात कादंबरीबद्दलचे विचार आपल्या लेखांमधून मांडले आहे. यामध्ये अश्विनी धोंगडे, महेंद्र कदम, ऋषिकेश देशमुख यांनी विविध वृत्तपत्रातून लेख लिहिले आहेत.  अश्विनी धोंगडे यांच्या लेखाचे शीर्षक 'भ्रष्ट व्यवस्थेतील शोकात्म नायक ' हे आहे.  आपल्या लेखात त्याम्हणतात -  "आधुनिक साहित्यकृतीतून शोकात्मिका संपलेली नाही. याची ग्वाही देणारी ही खऱ्या अर्थाने महाकादंबरी आहे. '' हे अश्विनी धोंगडे यांचे मत अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कादंबरी केवळ नवनाथची शोकात्मिका दाखवत नाही तर हजारो कामगार, शेतकऱ्यांच्या शोकात्म जगण्याला मुखर करते. पिढीजात शोकात्म जगण्याचा शोध घेणारे ही महाकादंबरी आहे.
 महेंद्र कदम यांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक 'वर्तमानाचा वेध घेणारी राजकीय कादंबरी ' असे आहे. ते म्हणतात -''या कादंबरीचा एकूण अवकाश खूप मोठा आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळाचा मोठा अवकाश आणि गाव ते मंत्रालय असा अत्यंत मोठा प्रदेशावकाश व्यापणारी ही कादंबरी विविध पात्रे आणि प्रसंग उभा करताना कारागिरीत अडकत नाही. मांडणीच्या बाबतीत सलग्ता आहे.शैलीत एक नवेपणा जाणवतो. वरील महेंद्र कदम यांच्या मत कादंबरीचे सत्व प्रकट करणारे आहे. या कादंबरीचा अवकाश केवळ प्रादेशिक, ग्रामीण, महानगरीय असा साचेबंद नाही. गाव ते महानगरीय जीवनातील विविध कंगोरे  ही कादंबरी उलगडून दाखवते. विशेषता प्रशासन आणि राजकारण यातील सहसंबंध त्यांचे स्वरूप ,मानसिकता या कादंबरीतून ठळकपणे चित्रित होते.शांत ,संयतपणे कादंबरीतून विषयाचे गांभीर्य राखत चित्रण येते. या कादंबरीची ही शैली मराठी कादंबरीच्या विश्वात नवी आहे.
 ऋषिकेश देशमुख 'पिढीजात ' कादंबरीविषयी लिहितात -"कादंबरीचा पट हा व्यापक आहे. स्वातंत्र्योत्तर काळाने स्वीकारलेल्या भांडवली अर्थव्यवस्थे पासून ते जागतिकीकरणोत्तर  काळाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थ व्यवस्थेपर्यंतचा असा मोठा कॅनव्हास तिच्यात आहे. ही कादंबरी भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील घडत गेलेल्या स्थित्यंतरांच्या कार्यकारणासह शोध घेत राहते.
 वरील ऋषिकेश देशमुख यांचे 'पिढीजात ' कादंबरी विषयीचे मत महत्त्वाचे आहे. परंतु त्यांनी भारतीय स्वातंत्र्योत्तर काळ असे म्हटले आहे. ते योग्य वाटत नाही.स्वातंत्र्योत्तर कालखंडापेक्षा इसवी सन १९९० नंतरच्या अर्थकारणावर या कादंबरीने प्रकाशझोत टाकला आहे.सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे विश्लेषण व चित्रण या कादंबरीत अल्प प्रमाणात येते. आर्थिक, सामाजिक, राजकीय जीवनाचे चित्रण तपशिलाने या कादंबरीत येते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा अन्वयार्थ लावणारी ही कलाकृती आहे. हे असे का घडले? या स्थित्यंतराचा कार्यकारणभाव या कादंबरीने अचूकपणे लावला आहे. समाजातील काही प्रश्नांचा गुंतवळा ही कादंबरी सोडवते. असे आपल्याला म्हणता येईल.
वरील अभ्यासकांनी या कादंबरीचे महत्त्व सांगितले असले तरी या कादंबरीला काही मर्यादाही आहेत.

 कादंबरीतील निवेदनतंत्र अत्यंत संथ पद्धतीने येते.  कादंबरी वाङ्मय प्रकारातील निवेदनतंत्रातील गतिमानता या कादंबरीत जाणवत नाही.पिढीजात कादंबरीतील निवेदन संथ व रटाळ झाल आहे.तोच तो पणा कादंबरीच्या अशयामधे    जाणवतो.कादंबरीचा नायक नवनाथचे कौटुंबिक चित्रण त्रोटक  स्वरूपात येते. नंदा ही व्यक्तिरेखा ठळकपणे कादंबरीत उभी राहत नाही. कौटुंबिक तपशील व त्यातील अचूकता कादंबरीत जाणवत नाही. कादंबरीचे कथानक एकसूरी ,संथ लयीत आकाराला येते. कादंबरीतील काही भाग अनावश्यक विस्तृत मूळ कथानकाशी विसंगत वाटतो. उगाच कादंबरीतील पाने वाढवण्यासाठी अनावश्यक चर्चा, गहन तत्वप्रधान मांडणी कादंबरी वाङ्मय प्रकाराच्या आकृतीबंधला बाधा आणते. कादंबरीतून अचूक तपशील न पुरवता वरवरचे वर्णन काही विषयाबाबत येते. उदा . राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंधांचा शोध कादंबरी नीटपणे घेत नाही. कादंबरीमध्ये स्त्री पात्रांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. समाजजीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या स्त्रियांचे चित्रण कादंबरीत अल्प प्रमाणात येते. कादंबरीमध्ये एकही प्रधान स्त्री व्यक्तिरेखा नाही. नंदा,आमदार
पद्मजाताई, मॅनेजर रजनी ,आई यासारख्या मोजक्या स्त्री व्यक्तिरेखा प्रस्तुत कादंबरीत येतात. ही कादंबरीची एक मर्यादा आहे.
 कादंबरीतील सर्व दलित समाजातील पात्रे खलनायकी वृत्तीचे रंगवलेली आहेत. दलित समाजात कोणत्याही गोष्टी सकारात्मक नाहीत का? सहकार अधिकारी सुनील कांबळे, दलित पत्रकार सोनकांबळे ,आमदार कांबळे, प्रेमानंद गवई ,बळीराम चंदा पवार, मंत्रालय अंडर सेक्रेटरी चि.म.गवई, कोंडीबा चाबुकस्वार ही सर्व पात्र खलनायक प्रवृत्तीतून येतात. आदिनाथ शंकर इंगळे हे पात्र फक्त याला अपवाद ठरते.
 वरील सर्व मर्यादा मान्य करूनही 'पिढीजात ' ही एक श्रेष्ठ  कलाकृती आहे. इ . सन .2000 नंतर ग्रामीण महाराष्ट्रात सहकारामुळे उभ्या राहिलेल्या वस्तूंचे, वास्तूंचे ,संस्थांचे खाजगीकरण झाले. त्या मातीमोल भावात विकल्या गेल्या. ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, मजूर यांच्या जीवनाचे उध्वस्तकरण 'पिढीजात ' कादंबरीमध्ये ठळकपणे उभे राहते. कादंबरीतील पात्र - रगडे, ढाले पाटील, कारभारी मोरे , सदोबा देसले ही पीडित, शोषित पात्र मनातून जात नाहीत. या माणसांच्या वेदनेचा वळ मनावर कायमचा कोरला जातो. काही पात्र समाजातील जिवंत,मयत व्यक्तीबरोबर नाते सांगतात. नामदार शिंदे ,श्री रावसाहेब आवटे ,शेतकरी संघटनेचा नेता विजय कोरे ,जगनराव, माळी, चोंडेकर, दादासाहेब पगारे, उत्तमरावजी गाडेकर मराठा मित्र संघटना किंवा वेगवेगळे अधिकारी हे समाजातील जिवंत माणसाशी नाते सांगू शकतात. ही समाजवास्तव चित्रण करण्याची लेखकाची सामर्थ्याची बाजू म्हणता येईल.
 प्रस्तुत कादंबरीला श्रीकांत देशमुख यांचे आत्मचरित्र म्हणता येईल का? शेवटी लेखक आपल्या वास्तवाचा आभास कादंबरीत उभा करत असतो. श्रीकांत देशमुख यांनी सहकार अधिकारी म्हणून अनुभवलेले जीवन या कादंबरीतून समर्थपणे उभे राहते. हा जीवनानुभव वास्तवातील व्यक्ती, संस्था यांच्याशी निकटचे नाते सांगतो. यात लेखकाचा दोष नाही. ही वाचकाची समाजाबद्दलची पूर्वग्रह दर्शवणारी बाब आहे. असे म्हणता येईल. 'पिढीजात ' हे कादंबरीचे शीर्षक अत्यंत योग्य आहे. शेतकरी,कामगार, कष्टकरी यांच्या  वेदना ह्या पिढीजात आहेत .एका पिढीकडून पुढच्या पिढीला वारसात संपत्ती मिळते. परंतु कष्टकर्‍यांना केवळ दुःख, शोषण वारसा म्हणून मिळतो.या वास्तवाकडे कादंबरीने लक्ष वेधले आहे. आयुष्याचा भोगवटा संपत नाही. शोषण परंपरेचे निदान करण्याची ताकद नसलेली पुस्तकी परंपरा नाकारून शाश्वत जीवनाचा अर्थ सांगणारी जीवनप्रणाली आपण स्वीकारली पाहिजे याचा प्रत्यय ह्या  कादंबरीतून येतो. नवनाथ शेळके या नायकाच्या संवेदनशीलतेशी पिढीजात नातं निर्माण करत भविष्याचा मार्ग अनुसरणे गरजेचे आहे.पिढीजात हे कादंबरीचे शीर्षक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून योग्य आहे.

कादंबरीतील नायक नवनाथ शेळके रेल्वेने प्रवास करताना एका तरुणाला हिजडे मारहाण करतात. मुळात हिजडे हिंस्त्र झाले आहेत. त्यांना व्यवस्थेचा बदला घ्यायचा आहे. सहकारातील, प्रशासनातील सर्वजण हिंस्त्र झाले आहेत. समाजातील जे काही आहे ते ओरबाडण्याच्या मागे लागले आहेत. आज समाजातील सर्वसामान्य माणसाची अवस्था त्या तरुणासारखी झाली आहे. हतबलता,अगतिकता, आपल्यावर अन्याय, अत्याचार का होतो? या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. लेखकाने अत्यंत कलात्मकरीतीने वास्तव अभिव्यक्त केले आहे. कादंबरीतील शेवट हा विचार करायला लावणारा आहे. नवनाथने आत्महत्या केली असेल का? तो भ्रमिष्ट झाला असेल का?  अत्यंत हुशार,बुद्धिमान असणारा नवनाथ , महापुरुषांच्या विचारांचा वारसा सांगणारा नवनाथ प्रचंड आशावादी आहे. तो आत्महत्या कशी काय करू शकतो ?असा प्रश्न मनात कल्लोळ उभा करतो. प्रस्तुत कादंबरी संपते तेथेचं वाचकाच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहतात . सहकाराचे ,राजकारणाचे स्ट्रक्चरल ऑडिट अजून अपूर्ण आहे . या वास्तवावर ही कादंबरी बोट ठेवते .

संदर्भ _
१ . देशमुख श्रीकांत , 'पिढीजात ', राजहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती फेब्रुवारी २०१९

२ . धोंगडे अश्विनी ,लेखाचे शीर्षक - 'भ्रष्ट व्यवस्थेतील शोकात्म नायक ', दैनिक लोकसत्ता, दिनांक ६ ऑक्टोबर २०१९

 ३ .कदम महेंद्र ,लेखाचे शीर्षक -  'वर्तमानाचा वेध घेणारी राजकीय कादंबरी ', दैनिक- महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १७ नोव्हेंबर २०१९

 ४ .देशमुख ऋषिकेश लेखाचे शीर्षक- 'स्वतंत्र्योत्तर मूल्यव्यवस्थांच्या स्थित्यंतरांची मीमांसा ' दैनिक- दिव्य मराठी दिनांक - १५ डिसेंबर २०१९

 डॉ.गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग,
 श्री.व्ही.एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर, तालुका रावेर ,जिल्हा जळगाव,
 पिन कोड - 4255O8
 मोबाईल नंबर -9421081270
 ईमेल -dhembregr@gmil.com

1 टिप्पणी:

  1. छान.समकालीन कादंबरीतील एका महत्वाच्या विषयावरील मराठीतील या कांदबरीचा विस्तृृृत पट उलगडून दाखविलात.छान प्रयत्न.

    उत्तर द्याहटवा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...