शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्त्व विकासाचे खुले व्यासपीठ

"राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व विकासाचे खुले व्यासपीठ "
 डॉक्टर जी.आर .ढेंबरे
 प्रस्तावना :
 व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना आज रूढ झाली आहे .व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांपर्यंत घेतली जात आहेत . या शिबिरांमधून किती प्रमाणात व्यक्तिमत्व विकास होतो याबद्दल फार चांगले निष्कर्ष काढता येत नाहीत. किंबहुना बाजाराच्या नियमानुसार मागणी तसा पुरवठा असे या व्यक्तिमत्व शिबिराचे स्वरूप दिसते. केवळ पैसा कमावण्यासाठी, गल्ला जमा होण्यासाठीचे एक माध्यम म्हणून या व्यक्तिमत्व विकास शिबिरांकडे पाहिले जाते .आज पालक वर्ग आपल्या पाल्या बाबतीत अत्यंत सजग झाला आहे. हा पालक वर्ग आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पैसा खर्च करण्यास तयार असतो. पालक वर्ग अशा स्वरूपाच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरांमध्ये आपल्या पाल्याला पाठवून भरमसाठ पैसा खर्च करून त्याच्या व्यक्तिमत्व विकासाचे स्वप्न पाहतो .पण अशा शिबिरातून पालकांच्या वाट्याला निराशा येते .व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेतल्यानंतर आपल्या पाल्याचा वाढत्या स्पर्धेमध्ये कसा निभाव लागेल याबद्दल पालक चिंतातुर असतात .पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांची दालने खुली होतात . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना ,युवती सभा, विद्यार्थी विकास विभाग, सांस्कृतिक विभाग यांचा परिचय विद्यार्थ्यांना होतो. या प्रत्येक क्षेत्राची स्वतंत्र वैशिष्ट्य आहेत . तसेच या प्रत्येक क्षेत्राला काही मर्यादाही आहेत . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असणारे क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना हे होय . गेली ५० वर्षे राष्ट्रीय सेवा योजना  विभागने अनेक उद्दिष्टांसाठी कार्य केले आहे .हा विभाग विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाशी जोडल्यामुळे अनेक मान्यवरांचे जीवन आमूलाग्र बदलून गेले .शैक्षणिक, सांस्कृतिक कला, क्रीडा ,उद्योग, राजकारण, समाजकारण ,समाजकार्य, ग्रामीण विकास या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे हजारो व्यक्ती राष्ट्रीय सेवा योजना या विभागामुळे , 'आम्ही घडलो ' असे म्हणतात, तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे व्यक्तिमत्व विकासाचे खुले व्यासपीठ आहे .असे आपणाल ठामपणे म्हणता येते .आज भारतभर अनेक विद्यापीठांचे कुलगुरु, अनेक महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक हे राष्ट्रीय सेवा योजना विभागातून 'आम्ही घडलो ' , आमच्यामध्ये नेतृत्व क्षमता निर्माण झाली .असे म्हणतात तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा केवळ विभाग राहत नाही तर ती राष्ट्रासाठी नेतृत्व घडवणारी चळवळ होते .असे आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा हजारो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडवतो . विद्यार्थ्यांना स्वतःमधील सुप्त गुणांचा ठेवा शोधण्यासाठी हा विभाग उपयोगी पडतो .विद्यार्थ्यांमधील 'स्व ' शोधण्यासाठी या विभागाची मदत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास का? व कसा ?घडतो हे समजावून घेणे महत्त्वाचे ठरते.

विद्यार्थ्यांची कौटुंबिक सामाजिक स्थिती आणि राष्ट्रीय सेवा योजना : -

 विद्यार्थी ग्रामीण विभागातील असो किंवा शहरी विभागातील यातील
70 % टक्के विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या कुंटुबातील  पहिल्या पिढीतील  असतात . शेतकरी, शेतमजूर ,कामगार, छोटे व्यावसायिक, व्यापारी या पार्श्वभूमीतील हे विद्यार्थी पारंपारिक शिक्षण घेत आहेत . अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ,विचारांमध्ये असंख्य न्यूनगंड  परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. या न्यूनगंडमुळे  या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला काहीसे बुजरे स्वरूप स्वरूप प्राप्त झालेले दिसते. आत्मविश्वासाचा अभाव, अनाठायी  असंख्य गोष्टींबद्दलची भीती ,भाषा, संवाद कौशल्याचा अभाव या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे कुंठित झालेली दिसते .या विद्यार्थ्यांमध्ये नवी आशा ,उमेद राष्ट्रीय सेवा योजना या एकका च्या माध्यमातून निर्माण होते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला असणाऱ्या मर्यादा विद्यार्थ्यांना  राष्ट्रीय सेवा योजना या एककात प्रवेश घेतल्यानंतर लक्षात येतात. केवळ आपल्याला काय येत नाही ? हे समजून उपयोग नाही तर आपण आपल्या मर्यादा कशा कमी केल्या पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कार्यप्रणाली मदतशील ठरते. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग महत्त्वाचा ठरतो. मध्यमवर्गीय ,उच्च मध्यमवर्गीय स्थितीतील विद्यार्थ्यांना समाजातील प्रश्न समस्यांचे भान राष्ट्रीय सेवा योजनेत काम केल्यामुळे प्राप्त होते. समाजातील गरिबी ,दारिद्र्य, अशिक्षितपणा ,अंधश्रद्धा याविषयीची नवी जाणीव राष्ट्रीय सेवा योजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते .समाजातील वेगवेगळ्या कौटुंबिक सामाजिक परिवेशातील विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये समायोजन करण्याची क्षमता विकसित होते .वरील सर्व घटकांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक अत्यंत मौलिक कार्य करते असे आपल्याला म्हणता येईल.


 भाषिक कौशल्य आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक

 राष्ट्रीय सेवा योजना एककात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास वेगाने होतो .श्रवण ,वाचन ,लेखन, संभाषण या मूलभूत भाषिक कौशल्यांचा विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातील सहसंबंध परस्परपूरक असा आहे. राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .अनेक अभ्यासकांना, संशोधकांना, समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचे विचार विद्यार्थी ऐकतात. एका जागी बसून शांतपणे एकाग्रपणे विचार ऐकल्यामुळे श्रवण कौशल्याचा विकास होतो.विशेष हिवाळी शिबिरातील विविध व्याख्याने, विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरांमधून विद्यार्थांचे वैचारिक प्रबोधन होते. विचारांच्या श्रावणातून विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास होतो. मान्यवरांच्या भाषणातून अनेक संदर्भ  विद्यार्थ्यांना माहिती होतात.विद्यार्थी नवनवीन पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतात. संदर्भ ग्रंथचाळतात.यातून विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास होतो. राष्ट्रीय सेवा योजना एककात विद्यार्थी शिक्षकांशी , मार्गदर्शन करणाऱ्या अभ्यासकांशी संवाद साधतात. प्रश्न विचारतात .चर्चा करतात. यातून विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्याचा विकास होतो. विद्यार्थी गटचर्चा करतात यातून एखाद्या समस्येबद्दल ,प्रश्नाबद्दल विद्यार्थी मते मांडतात.यातून नकळतपणे भाषण, संभाषण कौशल्य विकसित होते . राष्ट्रीय सेवा योजना एककातील उपक्रमांमध्ये सहभाग घेत असताना वेगवेगळ्या विषयांवरील लेखन विद्यार्थी करतात. विविध निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात. त्यातून विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित होते .भाषिक कौशल्यांचा विकास हा एक व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग आहे .राष्ट्रीय सेवा योजनेतील विविध उपक्रममधील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास होतो. यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. राष्ट्रीय सेवा योजना एकक हे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास करणारे उत्तम माध्यम ठरते. भाषिक कौशल्य प्रयत्नाने सरावाने सर्वांना अवगत करता येतात .राष्ट्रीय सेवा योजना एकक विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या संधी प्राप्त करून देते .विविध कार्यक्रमातील सरावाने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. भाषिक कौशल्य चांगल्या पद्धतीने आत्मसात केली जातात. व्यक्तिमत्त्व प्रभावी बनते. जीवनात यशस्वी होण्यासाठी या कौशल्यांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे .ही सर्व भाषिक कौशल्य एकमेकांना पूरक अशी आहेत .

नेतृत्वगुणांचा विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना

नेतृत्वगुणांचा विकास करता येतो. प्रयत्नांमधून जाणीवपूर्वक नेतृत्व विकसित करता येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला विकसित करण्याची क्षमता असते . राष्ट्रीय सेवा योजना एकक हा एक समूह असतो. या समूहातील काही विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. राष्ट्रीय सेवा योजना एककातील कार्यप्रणालीत नेतृत्व करण्याची विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होते. एखादं कार्य करण्यासाठी  योग्य दिशा देणे महत्त्वाचे असते. नेतृत्व हे दिशा देणारे असते. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी नेतृत्वासाठी सज्ज होतात. छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार असतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला यश मिळते. त्यातून आत्मविश्वास विकसित होतो.

राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि खेळ संस्कृती

राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभाग घेतलेल्या स्वयंसेवकांनामध्ये व्यायामाची आवड निर्माण होते. विशेष हिवाळी शिबिरामध्ये योगासने, व्यायामाची मिळालेले प्रशिक्षण स्वयंसेवकांनीमध्ये शरीर सुदृढ असावे यासाठी प्रेरणा निर्माण करते. विविध खेळांबद्दल स्वयंसेवकांच्या ठिकाणी आवड निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एकक महत्त्वपूर्ण कार्य पार पडते. व्यक्तिमत्त्व विकासामध्ये सुदृढ शरीराचे ,तंदुरुस्त शरीरचे महत्त्व सर्वज्ञात आहे. आकर्षक शरीरयष्टी व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळवून देते .राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यप्रणाली विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना सकारात्मक बाजूंना सूक्ष्मपणे प्रेरणा देते .विद्यार्थ्यांना स्वतःमधील विविध गुण, मूल्य यांचा ठेवा राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्यामुळे सापडतो. विद्यार्थ्यांला 'स्व ' चा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एकक महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांमधील बदल सूक्ष्मपणे घडत जातात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण उत्तम प्रकारे घडत जाते. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांतील सुरवंटाचे एका फुलपाखरात रूपांतर होते. एक सृजनशील शिक्षक म्हणून कार्यक्रमाधिकारी च्या नजरेत विद्यार्थ्यांमधील सकारात्मक बदल लक्षात येतात. शिक्षणप्रक्रियेतील हा सर्वात आनंददायी असा क्षण असतो. शिक्षकांच्या मनातील विचार विद्यार्थ्यांच्या कृती दिसतात, तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना हे एकक सृजनशील कार्य करणारे एकक ठरते. एका शिक्षकाला याचा आनंद असतो. शिक्षक आपल्या संपूर्ण सेवेत राष्ट्रीय सेवा योजनेत केलेले काम लक्षात ठेवतो.

 शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासात रासेयोचे स्थान : -

विद्यार्थ्यांप्रमाणेच कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. आपल्या अध्यापन विषयांबरोबरच जिवंत समाजाशी, सळसळत्या तरुणाईशी कार्यक्रम अधिकारी जोडला जातो. तेव्हा त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची क्षमता सिद्ध करण्यासाठीची एक संधी प्राप्त होते. राष्ट्रीय सेवा योजना एकक या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. आपल्या विषया पलीकडे रासेयोत  काम केल्यामुळे नवनवीन विषयांचे ज्ञान शिक्षकाला मिळते .व्यवस्थापनाचा जिवंत अनुभव मिळतो. समाजाशी, समाजातील विविध घटकांशी अतूट नाते निर्माण होऊन शिक्षकाला जगण्यासाठीचे,आनंदाचे एक साधन राष्ट्रीय सेवा योजनेच्या रूपातून मिळते. औपचारिक शिक्षणपेक्षा, अनौपचारिक शिक्षणाचा वस्तुपाठ शिक्षकाला रासेयोमुळे मिळतो. विद्यार्थ्यांशी नवा संवाद निर्माण होतो. समकालीन तरुणाईच्या भावविश्वात डोकावून पाहण्याची संधी शिक्षकाला मिळते.औपचारिक शिक्षणातील शुष्कपणा, कोरडेपणा, तोचतोचपणा यातून शिक्षणाला रटाळ प्रक्रियेचे स्वरूप येते.यातून चकोरी पलीकडे काहीतरी नवे, कोरे शिकण्याचा अनुभव रासेयेमुळे शिक्षकाला मिळतो. रासेयोमध्ये विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, तरुणाईच्या भावभावनांशी होणारी जवळीक शिक्षकाला समृद्ध जीवन अनुभवविश्व देऊन जाते. शिक्षकाच्या पुढील कार्यासाठी रासेयो हा एक प्रेरणास्रोत ठरतो. त्यामुळे रासेयो हे केवळ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन नाही तर ते शिक्षकांसाठीचे साध्य ठरते. आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये रासेयो हे व्यक्तिमत्त्व विकासाचे दुहेरी खुले व्यासपीठ ठरते.


विविध कलागुण आणि राष्ट्रीय सेवा योजना

राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः मधील कलाकार शोधण्याची संधी प्राप्त होते. स्वतःमध्ये गायक, वादक, उत्तम सूत्रसंचालन करणारा व्यक्ती, उत्तम वक्ता, उत्तम संवादक यांचा शोध घेण्यासाठी रासेयोची कार्यप्रणाली महत्त्वाची ठरते. कलाकाराला एक खुले व्यासपीठ मिळते. चांगल्या कलाकाराला दाद मिळते. कलाकाराला आपले दोष शोधण्यासाठी रासेयो एक कलामंच म्हणून उपयोगी पडतो. कलाकाराला त्याची प्रतिभा सापडते. उत्तम कवी, लेखक होण्याचे विविध गुण ,दृष्टीकोन राष्ट्रीय सेवा योजनेमुळे स्वयंसेवकांना मिळतो. याचा उपयोग स्वयंसेवक आयुष्यभर करतो. यातून समाजाला उत्तम कलाकार देणारा विचारमंच म्हणून आपणाला राष्ट्रीय सेवा योजना कडे पाहता येते.


जीवनातील ध्येयनिश्चिती आणि राष्ट्रीय सेवा योजना

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या भावी जीवनाचे ध्येय निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्याला पुढील जीवनात काय करायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे फार अवघड असते. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्याला द हे ध्येयनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी व्यवस्था अस्तित्वात नाही. विद्यार्थी ध्येयनिश्चिती बाबत चाचपडत राहतो. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवकाला आपल्या स्वतःमधील क्षमता व मर्यादा यांचा बोध होतो. आपल्याला कोणती गोष्ट केल्याने समाधान मिळते ,आनंद मिळतो याचा आत्मशोध लागल्यावर विद्यार्थी ध्येय निश्चित करण्यासाठी सक्षम बनतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ध्येयनिश्चिती महत्त्वाची ठरते. या संदर्भात अभ्यासक म्हणतात "नियमित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो.परंतु शिबिरामध्ये महाविद्यालयीन युवकांना खेडी बघायला ,अनुभवायला मिळतात. दहा दिवसांच्या (आता सात दिवस ) शिबिरांतून विद्यार्थ्यांना स्व कळतो. आपण काय आहोत याची जाणीव होते. त्याच्यातला कवी, नाटककार, वक्ता,नट बाहेर येतो. अशी अनेक व्यक्तीमत्वे महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. त्यात डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर एस.एन.पठाण, डॉक्टर अरुण अडसूळ, मा. बबनराव पाचपुते, स्लमडॉग करणारा राहुल कंधारे, आशुतोष राणा ,डॉक्टर प्रमोद पाब्रेकर, पोपटराव पवार, डॉ.राजन वेळूकर, नीलोफर अहमद, प्राचार्य डॉक्टर नंदकुमार निकम अनेक प्राचार्य, प्राध्यापक तसेच अनेक राजकारणी व्यक्तींची नावं इथं सांगता येतील ". वरील यशस्वी व्यक्तींमध्ये अजून कितीतरी नावांची भर आपल्याला घालता येईल. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील एक घटक म्हणून कार्यरत नाही तर ते व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी चळवळ आहे. लोक या चळवळीत येतात.आणि आयुष्यभर जोडले जातात. आयुष्यभर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून आपली ओळख सांगताना कोणत्याही व्यक्तीला कमीपणा वाटत नाही. वरील मान्यवरांनी आपले ध्येय निश्चित केले व ते पूर्णत्वास नेले .यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वविकासा जडणघडणीतील महत्त्व आपल्या लक्षात येतो.

'स्व 'चा शोध घेणे आणि राष्ट्रीय सेवा योजना : -

 राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्याची स्वतःवर आणि ध्येयावर निष्ठा निर्माण होते. रासेयोतील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत असताना स्वतःवर आणि ध्येयावर आढळ विश्वास निर्माण होतो. विद्यार्थी आत्मसंवाद साधतो. ध्येयप्राप्तीचा आशावाद  विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. स्वतःवरील अढळ निष्ठेमुळे सकारात्मक विचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला नवे पैलू पडतात.   जीवनात वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असते. रासेयोची कार्यप्रणाली विविध ,कार्यक्रम हे वेळेत पार पाडावे लागतात. विद्यार्थ्याला वेळेचे व्यवस्थापन करण्याची सवय लागते. कमी वेळेत, कमी साधनांमध्ये काम करावे लागते. यातून वेळेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करावे लागते. कमी वेळेत दर्जेदार काम करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये रूजते. वेळेचे नियोजन करण्याचे कौशल्य राष्ट्रीय सेवा योजनेत काम केल्यामुळे विद्यार्थ्याला आत्मसात होते. वरील गोष्टी व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणारा विद्यार्थी ताण तणाव मुक्त असतो. काम करत असताना नियोजन कसे करावे याचा वस्तुपाठ विद्यार्थ्यांना मिळतो. यातून विद्यार्थ्यांमध्ये कार्यसिद्धीसाठीची निर्माणक्षमता ,निर्णयक्षमता विकसित होते. विद्यार्थ्याला या गोष्टी आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरतात. व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणे गरजेचे असते. विद्यार्थी विविध गोष्टी चुकचुकत शिकतात. चुकांपासून धडा घेऊन वर्तनात बदल करतात. स्वतःबद्दल, समाजाबद्दल, मित्रांबद्दल वर्तनाचे नवे नियम विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. यातून विद्यार्थ्यांमध्यील आत्मविश्वास दृढ होतो. बदलांना सामोरे जाण्याची इच्छाशक्ती तीव्र होते. हे केवळ राष्ट्रीय सेवा योजनेमुळे घडते. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समूह भावना निर्माण होते. अनेक कामे करत असताना सर्वांना विश्‍वासात घ्यावे लागते. कामाची जबाबदारी विभागून द्यावी लागते. यातून समूहाबद्दलचे आकलन विद्यार्थ्यांचे वाढते. संघ भावना वाढीस लागल्यामुळे विद्यार्थी कितीही अवघड कार्य सुलभतेने करतात. समाजातील ,कुटुंबाशी, सहकाऱ्यांशी समायोजन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वाढते. या सर्व बाबीला राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यप्रणाली जबाबदार ठरते. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधीचा शोध घेता येतो. आपल्याला कोणती संधी उपलब्ध आहे याची जाणीव राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवकांमध्ये निर्माण होते. भविष्यातील अंदाज बांधत राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक संधीचे यश मध्ये रूपांतर करतात. हा वर्तन बदल रासेयोमुळे स्वयंसेवकांत घडतो. व्यक्तिमत्व विकासात वरील पायर्‍या अत्यंत महत्त्वाच्या असतात. यातून एक नेतृत्व, कर्तृत्व, वकृत्व जन्माला येते. राष्ट्रीय सेवा योजनाही नेतृत्व, वकृत्व, कर्तृत्व जन्माला घालणारी चळवळ आहे.

समारोप : -

राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी तरुण असतात. या तरुण विद्यार्थ्यांची मने संस्कारक्षम असतात. चांगली मूल्ये स्विकारून विकृतीला नकार देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सिद्ध होतात. कारण ते यासंदर्भात कृतिशील उपक्रमात सक्रीय सहभाग घेतात. जीवनातील उदात्त मूल्य अंगीकारणे स्वयंसेवकांना महत्त्वाचे वाटते. किंबहुना ही उदात्त मूल्य स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनून जातात. भावी सदृढ समाजासाठी, सशक्त राष्ट्रासाठी अशा उदात्त मूल्यांची पाठराखण करणाऱ्या युवकांची गरज असते. ही गरज राष्ट्रीय सेवा योजना एकक पूर्ण करते. राष्ट्रीय सेवा योजना एकक विद्यार्थ्याला स्वतःमधील गुणदोष पडताळून पाहण्याची संधी बहाल करते. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा कस लावण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होते. किंबहुना सर्वसामान्य विद्यार्थ्याला त्याच्यातील असामान्य बाबींचा जाणीव करून देणारा विचारमंच म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना एकक होय. स्वतःमध्ये दडलेला राजहंस शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना साहाय्य करणारे एकक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेकडे पाहता येते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या महागड्या शिबिरांपेक्षा दोन वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेत काम केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. असे आपणाला म्हणता येते.


संदर्भग्रंथ :-
१.  चाकणे संजय, पाब्रेकर प्रमोद, 'राष्ट्रीय सेवा योजना संकल्पना ' , डायमंड पब्लिकेशन्स पुणे ,जुलै 2010
२ . वाळुंज महादेव , 'व्यासपीठ ' , अक्षर मानव प्रकाशन ,पुणे, मे 2011
३ . नसिराबादकर ल . रा . 'व्यावहारिक मराठी ' , फडके प्रकाशन, कोल्हापूर ,आवृत्ती -2005
४ . पाटणी उज्वल , 'जीत की हार व्हा तयार ', मराठी अनुवाद, यशवंत एकनाथ कुलकर्णी ,डायमंड पाकेट बुक्स प्रायव्हेट लिमिटेड, नई दिल्ली, आवृत्ती ,2014
५ .कमलेश , 'व्यक्तिमत्व विकास आणि अवकाश 'संदर्भ व्यक्तिमत्व संशोधन विकास केंद्र ,पुणे ,आवृत्ती 2009


डॉ.जी.आर. ढेंबरे ,
विभागीय समन्वयक , रावेर,
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , जि . जळगाव
पिन-४२५५०८
मोब .नं. ९४२१०८१२७०
ईमेल -dhembregr@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...