'नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा स्वरूप आणि विशेष '
डॉ. जी.आर. ढेंबरे ,रावेर
दिनांक ७ डिसेंबर 2019
प्रस्तावना
समीक्षा या संकल्पनेत विश्लेषण आणि मूल्यमापन प्रक्रियेला महत्त्व असते. लेखक वाचक आणि समीक्षक या साहित्य व्यवहारातील महत्वपूर्ण घटकांना सांधणारा दुवा म्हणजे समीक्षा होय. लेखक वाचक आणि समीक्षक यांना मार्गदर्शक दिशा दिग्दर्शनासाठी समीक्षा व्यवहाराचे उपयोजन होते .लेखकाच्या ठायी असणाऱ्या विशेष क्षमता व न्यूनता प्रकट करण्यासाठी समीक्षा महत्त्वाची ठरते .वाचकाच्या साहित्य आकलनाला व्यापक करण्यासाठी समीक्षा महत्त्वाची असते .समीक्षकाची साहित्याच्या प्रकृतीची आणि स्थिती गतीची जाण अधिक प्रगल्भ करण्यासाठी समीक्षा व्यवहार महत्त्वाचा ठरतो .वा.ला. कुलकर्णी याबद्दल लिहितात 'साहित्य ही समाजाची एक अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक गरज आहे .ज्या समाजाला त्याचे स्वतःचे असे साहित्य नाही त्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी उणीव निर्माण होते ; म्हणूनच समाजाला त्यांच्या साहित्याबद्दल सोत्साही करणे, त्यात घ्यायला मदत करणे, साहित्य व्यापार हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे याची योग्य जाण त्याच्या ठिकाणी निर्माण करणे हे साहित्य समीक्षेचे अप्रत्यक्ष प्रयोजन ठरते '१ मानवी समाजजीवनातील सांस्कृतिक विश्वातील साहित्य व्यवहार व समीक्षा यांच्यातील परस्पर संबंधावर वरील विश्लेषणातून प्रकाश पडतो. कविता या वाङ्मय प्रकाराची समीक्षा विस्तृत व व्यापक स्वरूपात झालेली आहे. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा संख्यात्मक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे .नव्वदोत्तरी कवितेचे मूल्यमापन करून केवळ न थांबता नव्वदोत्तरी काव्य समीक्षा पूर्वकालीन मराठी कवितेचे पुनर्मूल्यमापन करते. विशेषता नवकविता व साठोत्तरी कवितेचे पूनर्मूल्यमापन नव्वदोत्तरी काव्य समीक्षेने केले आहे .साठोत्तरी कवितेची चिकित्सा करून साठोत्तरी कवींचे सामर्थ्य व खुजेपणा मांडण्याचा प्रयत्न नव्याने झालेला दिसतो. आजही काव्य समीक्षेच्या प्रांतात मूल्यमापन व पुनर्मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे. कवितेच्या समीक्षेचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नव्वदोत्तरी कवींनी केलेली समीक्षा विपुल आहे. कवी स्वतःच्या कवितेची, समकालीन कवी व पूर्वसूरींची तटस्थ समीक्षा करत आहेत.
नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा विविध पद्धतीने झालेली आहे .आस्वादक, मूल्यमापनात्मक , मानसशास्त्रीय, रूपनिष्ठ शैलीनिष्ठ समीक्षा नव्वदोत्तरी कवितेची झालेली दिसून येते. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा अधिक प्रमाणात आस्वादक अंगाने झालेली दिसते .विश्लेषण व मूल्यमापन या प्रक्रियांना नव्वदोत्तरी काव्यसमीक्षेत गौण स्थान मिळालेले दिसते. आस्वादक अंगाने समीक्षा करत असताना मूल्यमापन, विश्लेषण अपूर्ण राहते.
नव्वदोत्तरी काव्य समीक्षेत सैद्धांतिक समीक्षा व उपयोजित समीक्षा कमी प्रमाणात झालेली दिसून येते . रूपनिष्ठ व शैलीनिष्ठ समीक्षाअल्प प्रमाणात झालेली आहे.
नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा स्वरूप आणि विशेष :
१ . ग्रंथ रूपातून केली गेलेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा
२ .वाङ्मयीन नियतकालिकातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
३ . संपादित ग्रंथातील लेख स्वरूपातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
४ .वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
५ . कवितासंग्रहना लिहिलेल्या प्रस्तावना मधील काव्य समीक्षा :
६ . संस्थात्मक पातळीवरील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
७ . वाङ्मयीन प्रवाहांच्या प्रेरणेने झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
८ . विद्यापीठीय संशोधन पदवीसाठी प्रबंध रुपातून झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
अशा बहुविध स्वरूपाची समीक्षा नव्वदोत्तरी कवितेची झालेली दिसून येते .संख्यात्मक दृष्ट्या विपुल असली तरी या समीक्षेला मर्यादा आहेत. यातील बहुतांश समीक्षा आस्वादक स्वरूपाचे आहे. ढोबळ विधानात्मक असे या समीक्षेचे स्वरूप आहे. विस्तृतता ,सूक्ष्मता, मूल्यमापनात्मकता यांचा अभाव ही नव्वदोत्तरी काव्य समीक्षेची मर्यादा सांगता येते .
३. स्वतंत्र ग्रंथ रूपातून केली गेलेली नव्वदोत्तर कवितेची समीक्षा :
यातील काही ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहेत. अक्षयकुमार काळे, किशोर सानप, रवींद्र ठाकूर, वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोतापल्ले, प्रकाश देशपांडे केजकर ,निशिकांत मिरजकर ,वसंत पाटणकर, श्रीधर तिळवे ,चंद्रकांत पाटील ,महेंद्र कदम, किसन पाटील, पी. विठ्ठल, देवानंद सोनटक्के इत्यादी समीक्षकांनी स्वतंत्र ग्रंथरूपाने नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेची साक्षेपी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे .वरील अभ्यासकांच्या काव्य समीक्षेचे वर्गीकरण आपणास करता येते. नव्वदोत्तरी कालखंडातील कवी व कवींचे काव्यसंग्रह आस्वादक अंगाने विचारात घेतले आहेत. मूल्यमापन , विश्लेषण ,सूक्ष्मता या समीक्षेत आढळून येत नाही.
अक्षयकुमार काळे यांनी ' अर्वाचीन मराठी काव्य दर्शन ' या ग्रंथात नव्वदोत्तरी कवींचा धावता आढावा मांडून या कवितेचे विशेष स्पष्ट केले आहेत. त्यांच्या ग्रंथात विशिष्ट कालखंडाचा अभ्यास समग्रतेने मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नव्वदोत्तरी कवितेचे समग्र विश्लेषण येत नाही.
किशोर सानप यांच्या ' युगांतराची कविता 'या ग्रंथातून त्यांनी नव्वदोत्तरी कविता हा समीक्षा विषय केला आहे. नव्वदोत्तरी कवितेतील अजय कांडर, मोहन कुंभार ,अशोक कोतवाल, पी . विठ्ठल, सुनील अभिमान अवचार, फेलिक्स डिसोजा , सुखदेव ढाणके, जयराम खेडेकर, श्रीकांत देशमुख, संतोष पद्माकर पवार, शशिकांत शिंदे, राजीव जोशी, सुरेश सावंत, लोकनाथ यशवंत, वीरधवल परब ,कल्पना दुधाळ , मनीषा साधू, अजीम नवाज राही ,भगवान निळे, वाहरू सोनवणे इत्यादी नव्वदोत्तरी कवींच्या कवितेचे उत्तम विश्लेषण प्रस्तुत ग्रंथात केलेले आहे .या ग्रंथातील समीक्षाही आस्वादकते बरोबरच नव्वदोत्तरी कवींचे विशेष, वेगळेपण ,प्रवृत्ती स्पष्ट करणारी आहे .किशोर सानप यांच्या ग्रंथातील मर्यादा नोंदवताना एक गोष्ट सांगता येते ती म्हणजे नव्वदोत्तरी कवितेतील महानगरीय कवींच्या काव्यसंग्रहाचे विश्लेषण या ग्रंथात येत नाही .हेमंत दिवटे ,मंगेश नारायण काळे ,श्रीधर तिळवे, खांडेकर संजीव, सलील वाघ ,अरुण काळे ,सिद्धार्थ तांबे या कवींच्या कवितांचा विचार केलेला नाही. ही मर्यादा मान्य करूनही किशोर सानप यांच्या 'युगांतरची कविता ' हा ग्रंथ नव्वदोत्तरी कवितेचे विस्तृत, सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, व्यापक समीक्षा करणारा महत्त्वाचा ग्रंथ ठरतो .
निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या 'नव्या वाटा नवी वळणे ' हा काव्यसंग्रह व त्याला निशिकांत मिरजकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही नव्वदोत्तरी कवितेचे उत्तम विश्लेषण करणारी आहे .साक्षेपीपणे कवींची केलेली निवड त्यातून नव्वदोत्तरी कवितेतील महत्त्वपूर्ण कवींचा आपल्याला अंदाज बांधता येतो. ही प्रस्तावना त्रोटक स्वरूपातील आहे परंतु या प्रस्तावने मधून नव्वदोत्तरी कवितेची ओळख आपल्याला होते.
प्रकाश देशपांडे केजकर यांचा 'समकालीन मराठी कविता ' हा ग्रंथ नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ आहे .मुख्य प्रवाहातील कविता, दलित कविता ,आदिवासी कविता, मुस्लिम कविता, ग्रामीण कविता, स्त्रीवादी कविता असे नव्वदोत्तरी कवितेचे वर्गीकरण या ग्रंथात केलेले आहे.
' चौथी नवता : नवनियतकालिके ' हा श्रीधर तिळवे यांचा ग्रंथ आहे. श्रीधर तिळवे नव्वदोत्तरी कालखंडातील महत्त्वाचे कवी आहेत. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा करण्यासाठी कोणते तत्व प्रधान मानले पाहिजे याचे विश्लेषण प्रस्तुत ग्रंथात येते .नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेची सैद्धांतिक मांडणी करण्याचा प्रयत्न श्रीधर तिळवे यांनी केलेल्या समीक्षेत दिसतो .
वसंत पाटणकर यांचा 'कवितेचा शोध ' हा ग्रंथ कवितेचे सैद्धांतिक विश्लेषण करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे . नव्वदोत्तरी काव्य समीक्षेचा विचार करत असताना वसंत पाटणकर यांची सैद्धांतिक मांडणी समग्रलक्षी स्वरूपाची ठरते .
याबरोबरच सुधीर रसाळ यांचा 'कविता आणि प्रतिमा ' हा ग्रंथही काव्य वाङ्मयप्रकाराचे स्वरूप स्पष्ट करणार हा सैद्धांतिक ग्रंथ आहे .
वसंत आबाजी डहाके यांचा 'कवितेविषयी ' हा ग्रंथ समीक्षेतील महत्त्वाचा ग्रंथ आहे. नव्वदोत्तरी कालखंडातील कवितेचे अशय सूत्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न डहाके यांनी केलेला आहे. एकूणच या ग्रंथातील काव्य वाङ्मय प्रकाराची सैद्धांतिक मांडणी महत्त्वपूर्ण अशी आहे.
चंद्रकांत पाटील यांचा ' कवितेसमक्ष ' हा ग्रंथही नव्वदोत्तरी कवितेचे विश्लेषण करणारा आहे. सद्यकालीन मराठी कवितेचे स्वरूप स्पष्ट करणारा असा हा ग्रंथ आहे.
डॉ. किसन पाटील यांचा ' नव्वदोत्तरी कविता : नवी रूपे ' हा ग्रंथही नव्वदोत्तरी कवितेतील काही कवींच्या काव्यसंग्रहाचा आस्वादक अंगाने घेतलेला शोध असे याचे स्वरूप आहे. डॉ. महेंद्र कदम यांचा 'कवितेची शैली ' हा ग्रंथही नव्वदोत्तरी कवितेचा शैलीच्या अंगांनी विश्लेषण करणारा ग्रंथ आहे. ग्रामीण काव्य प्रवाहातील कवींची शैली विशेष डॉ. महेंद्र कदम यांनी मांडले आहेत.
नागनाथ कोतापल्ले यांचा ' मराठी कविता आकलन आणि आस्वाद ' या ग्रंथातही नव्वदोत्तरी कालखंडातील काही काव्यसंग्रहाच्या वैशिष्टयेंवर प्रकाश टाकलेला दिसतो .
याबरोबरच डॉ. रवींद्र ठाकूर यांचा 'प्रवाह आणि प्रतिक्रिया ' हा ग्रंथही इ. स. 1975 नंतरच्या मराठी कवितेचे विश्लेषण करणारा आहे .नव्वदोत्तरी कवितेतील काही कवींवर इ.स. 1975 नंतरचा कवींचा प्रभाव कसा आहे हे स्पष्ट करणारा हा ग्रंथ आहे.
' मराठी कविता समकालीन परिदृश्य ' या ग्रंथात पी . विठ्ठल यांनी नव्वदोत्तरी कवितेची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे. जागतिकीकरणाचे सूत्र केंद्रवर्ती ठेवून नव्वदोत्तरी कवितेच्या मूल्यमापनाचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. नव्वदोत्तरी कवितेतील श्रीकांत देशमुख ,कविता महाजन, संतोष पद्माकर पवार ,श्रीधर नांदेडकर, अजीम नवाज राही, वीरधवल परब, ऐश्वर्य पाटेकर, कल्पना दुधाळ, अभय दाणी , रवी पवार, महेश लीला पंडित, वीरा राठोड, केशव देशमुख, बालिका ज्ञानदेव ,महेश लोंढे, मोहन शिरसाट यांच्या कवितेचे आस्वादक मूल्यमापन असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
देवानंद सोनटक्के यांचा ' .कवितेचा अंत : स्वर हा ग्रंथही आस्वादक स्वरूपात नव्वदोत्तरी कवितेची चिकित्सा करणारा आहे. सुरुवातीच्या तीन लेखांमध्ये कविता प्रकाराची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे .नव्वदोत्तरी कवितेतील महत्त्वाच्या कवींच्या कवितेचे स्वरूप , विशेष विस्तृतपणे या ग्रंथातून विशद केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र ग्रंथ रूपातून केल्या गेलेल्या नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेचा थोडक्यात विचार करता येतो.
४ . संपादित ग्रंथातील लेख स्वरूपातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा:
आज गौरव ग्रंथ मोठ्या प्रमाणात निघत आहेत. अभ्यासकांनी लेख स्वरूपात नव्वदोत्तरी कवितेचा आढावा घेतलेला आहे .
'साहित्य आणि समाज ' संपादक - नागनाथ कोतापल्ले ,गो .म.पवार गौरव ग्रंथ , ' वाङ्मयीन प्रवृत्ती तत्त्वशोध ' , संपादक -केशव मेश्राम, डॉ. दादा गोरे गौरव ग्रंथ , 'मराठी कविता: परंपरा आणि दर्शन 'संपादक -रवींद्र शोभणे, प्राचार्य राम शेवाळकर गौरव ग्रंथ, 'समकालीन साहित्यचर्चा ' संपादक - मनोहर जाधव ,डॉ.नागनाथ कोत्तापल्ले ,गौरव ग्रंथ इत्यादी संपादित ग्रंथांमधून नव्वदोत्तरी कवितेचे समीक्षापर लेख प्रकाशित झालेले दिसतात .वसंत पाटणकर व हरिश्चंद्र थोरात यांचे नव्वदोत्तरी कवितेवरील सैद्धांतिक लेख महत्त्वपूर्ण असे आहेत.
५ . वाङ्मयीन नियतकालिकातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
अक्षर चळवळ (1985 ) ,कवितारती (1985 ),शब्दवेध (1988 )अभिधा (1992 ते 1998 ) , अभिधानंतर (1998 ते 2008 ) , नवाक्षर दर्शन (2004 ) ,खेळ (2004 ) ,उर्मी (2005 ) , ऐवजी (2006 ) सौष्ठव , ' साक्षात अशी काही कविताकेंद्री नियतकालिके सुरू झाली. या नियतकालिकांनी नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेला गंभीरपणे अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला. वाङ्मयीन नियतकालिके आणि कविता यांच्यातील संबंधाविषयी डॉ. आशुतोष पाटील लिहितात " वाङ्मयीन नियतकालिकांची ,विशेषता कविताकेंद्री नियतकालिकांची भूमिका काव्य संस्कृतीला आकार देण्यात सर्वाधिक महत्त्वाची ठरत असते. कारण लिहिली जाणारी कविता ही संग्रहरूपाने कालांतराने पण प्राधान्याने वाङ्मयीन नियतकालिकातून प्रथम वाचावयास मिळते .कविता हा एक स्फुटरचना प्रकार असल्याने त्याच्या चलनवलनासाठी अन्य वाङ्मय प्रकारांच्या तुलनेत अधिक निकडीने नियतकालिकांची आवश्यकता असते. त्यामुळे जुन्या कवींबरोबरच नव्या कवींच्या अभिव्यक्तीला एक मंच उपलब्ध करून देण्याची आणि काव्याभिरुचीची पत व प्रत दोन्हीही उंचावण्याची ऐतिहासिक जबाबदारी नियतकालिकांवर सर्वार्थाने असते. " २
वरील विश्लेषणातून नियतकालिकांचे वाङ्मयीन पर्यावरणातील स्थान स्पष्ट होतो .
वाङ्मयीन नियतकालिके वाङ्मयीन अभिरूचीला वळण देत असतात. कविताकेंद्री वाङ्मयीन नियतकालिकांमुळे नव्वदोत्तरी काव्य समीक्षेला अभिव्यक्तीचे एक साधन उपलब्ध झाले .या नियतकालिकांमुळे कविता हा वाङ्मय प्रकार वाङ्मय विश्वाच्या केंद्रस्थानी आला. या वेगवेगळ्या नियतकालिकांनी नव्वदोत्तरी कवितेविषयी सैद्धांतिक मांडणी उभी करण्याचा प्रयत्न केला. यातील काही नियतकालिकांनी नव्वदोत्तरी मराठी कविता विशेषांक प्रकाशित केले .यामध्ये
१ . अभिधानंतर, दिवाळी, 2003
२ . नवाक्षर दर्शन ,वर्ष तीन ,अंक दोन, जानेवारी मार्च 2007
३ .खेळ, एप्रिल, मे, जून, 2010 सतरावा
४ . सर्वधारा, जानेवारी मार्च 2017 ५ .अतिरिक्त मार्च 2013
६ . अतिरिक्त ऑगस्ट 2014
नव्वदोत्तरी मराठी कविता विशेषाकांमध्ये नव्वदोत्तरी कवितेचे विस्तृत व व्यापक मांडणी अभ्यासकांनी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या नियतकालिकातील समीक्षा मांडणीमध्ये जाणीपूर्वकता, आग्रहीपणा अधिक दिसून येतो. या नियतकालिकातील काही लेखांची मांडणी एकांगी स्वरूपाची आहे. नव्वदोत्तरी काव्य समीक्षेच्या प्रवाहामध्ये या नियतकालिकांच्या कामगिरीला विशेष महत्त्व आहे. वाङ्मयीन नियतकालिकातील नव्वदोत्तर कवितेची समीक्षा करणाऱ्या समीक्षकांनी मध्ये द.गो.काळे ,मंगेश काळे, दिनकर मनवर, नितीन रिंढे, प्रविण बांदेकर ,उदय रोटे, रणधीर शिंदे, हेमंत दिवटे , आशुतोष पाटील, महेंद्र भवरे ,एकनाथ पगार, गोविंद काजरेकर ,श्रीधर तिळवे, देवानंद सोनटक्के, पी.विठ्ठल , महेंद्र भवरे, मनोहर जाधव या नव्या समीक्षकांचा समावेश करावा लागतो. या नव्या दमाच्या समीक्षकांसोबतच वसंत पाटणकर, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके, राजन गवस डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या जुन्या पिढीतील समीक्षकांचा ही आपल्याला समावेश करता येतो .एकूणच या विविध नियतकालिकातील काव्य समीक्षेमध्ये आजच्या काळातील साहित्यविचारांचे प्रतिबिंब आढळते. साहित्याच्या विविध दृष्टिकोनबरोबरच नव्या पिढीचे नवी संवेदनशीलता या नियतकालिकांनी जपलेली दिसते. वाङ्मयीन नियतकालिकांनी काव्य या वाङ्मय प्रकाराला व काव्य समीक्षेला समकाळाशी जोडणारी समग्र विचारदृष्टी दिली.
६ . वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा:
सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या सारख्या वृत्तपत्रांमधून रविवार पुरवणीत नव्वदोत्तरी कवींच्या काव्यसंग्रहाचा परिचय, परीक्षण प्रकाशित झाले आहेत. सर्वसामान्य वाचकाला परिचय व्हावा म्हणून लिहिलेली ही परीक्षणे लेख काव्य समीक्षेत महत्त्वाचे आहेत. विशेष लेखांमध्ये आजच्या कवितेत काय घडत आहे याचा परिचयात्मक मांडणी या समीक्षेत केलेली दिसून येते. सर्वसामान्य वाचकांसाठी हे समीक्षापर लेखन महत्त्वाचे ठरते.
७ . कवितासंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनामधील काव्यसमीक्षा :
मराठी वाङ्मय व्यवहारात काव्यसंग्रह प्रस्तावना लिहिण्याची प्रदीर्घ परंपरा आहे .कवी स्वतःच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहितात या प्रस्तावने मधून कवी आपली काव्यनिर्मिती प्रक्रिया उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतात. आपली भूमिका, दृष्टिकोण अभिव्यक्त करण्यासाठी कवी प्रस्तावना लिहितात. ज्येष्ठ अभ्यासक ,कवींची प्रस्तावना काव्यसंग्रहासाठी घेतली जाते. या प्रस्तावनेत प्रस्तुत कवितेची बलस्थाने मांडली जातात .कवितेची पाठराखण केली जाते. कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा सांगितल्या जातात. प्रस्तावनेमध्ये लेखनात मूल्यमापनाचा अभाव असतो. मर्यादा, दोष न सांगण्याचा प्रघात असतो. त्यामुळे उणिवा दोष कळत नाहीत .त्यांची पुनरावृत्ती होत राहते. एकूण कवितेचे वेगळेपण शोधत असताना परंपरेतील कविते स्थानही निश्चित केले जाते. नागनाथ कोतापल्ले , वसंत आबाजी डहाके, द. ता भोसले, मनोहर जाधव, यशवंत मनोहर, किसन पाटील यासारख्या अभ्यासकांनी नव्वदोत्तरी कवींच्या कविता संग्रह प्रस्तावना लिहिल्या आहेत .या प्रस्तावनांचे स्वरूप मुख्यतः आस्वादक स्वरूपाचे असते . मूल्यमापनाच्या दृष्टीचा अभाव या प्रस्तावनेतील समीक्षेत
दिसतो.
८ . संस्था पातळीवरील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
संस्थात्मक पातळीवर वाङ्मयाचा अभ्यास करण्याची मराठी वाङ्मय विश्वात प्रदीर्घ परंपरा आहे .विशिष्ट लेखकाचा अभ्यास ,विशिष्ट कालखंडाचा अभ्यास ,विशिष्ट वाङ्मय प्रकारचा अभ्यास, विशिष्ट वाङ्मयीन प्रवाहांचा अभ्यास करण्याची परंपरा मराठीत आहे .सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्यावतीने मराठी साहित्यिकांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथ प्रकाशित करण्यात आला . प्रदक्षिणा खंड -दुसरे प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथातील 'स्वातंत्र्योत्तर कविता ' हा रवींद्र घवी यांचा लेख मराठी कवितेचा आढावा घेणार आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा मागोवा या लेखात घेतलेलाआहे .तो मुख्यतः काव्यनिर्मितीच्या अंगाने घेतलेला व नव्या प्रवृत्ती दर्शवणारा आहे. नव्वदोत्तरी कवितेचा अंधुक उल्लेख या लेखात आहे.
ललित मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कविता विशेषांक प्रकाशित करण्यात आला . 'बदलती मराठी कविता व काव्यसंस्कृती: काही परिमाणे ' असे या अंकाचे शीर्षक होते. या अंकात अतिशय गंभीरपणे मराठी कवितेच्या स्थितीगतीचा आलेख मांडण्यात आला आहे . वसंत आबाजी डहाके ,उदय रोटे ,रणधीर शिंदे, वैजंतीमाला जाधव -भोसले , निशिकांत मिरजकर, प्रवीण दशरथ बांदेकर ,आशुतोष पाटील ,निशिकांत ठकार या सर्व मान्यवर समीक्षकांचे लेख नव्वदोत्तरी काव्य समीक्षेला समृद्ध करणारे आहेत . महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी मराठी वाङ्मयाचा इतिहासाचेखंड प्रकाशित केले आहेत .यामध्ये खंड सातवा इ.स. 1950 ते2000 -भाग दुसरा हा अतिशय महत्त्वाचा आहे .यामध्ये 1950 ते 1975 डॉ. प्रभा गणोरकर आणि इसवी सन 1975 ते 2000 हा डॉ.नीलिमा गुंडी यांचे प्रदीर्घ लेख महत्त्वाचा आहे. या लेखात मराठी कवितेचा इतिहास मांडला गेला आहे. या लेखात डॉ. नीलिमा गुंडी लिहितात, ''1975 ते 2000 हा कालखंड म्हणजे मराठी कवींसाठी एक गुंतागुंतीचा वास्तव होते. या वास्तवाचा अनुभव घेणे त्याचे संवेदन जाणून घेणे आकलन व चिंतन या पातळीवर ते संवेदन नेणे आणि त्याला कलात्म रूप देणे ही प्रक्रिया सोपी नाही " ३वरील विश्लेषणातून नव्वदोत्तरी कवितेच्या वास्तवाचे भान आपल्याला येते. नव्वदोत्तरी काव्यची अत्यंत पायाभूत माहिती देणारे असे लेखन प्रस्तुत खंडात डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी केलेले आहे . अभ्यासकांना उपयुक्त माहिती देणारे लेखन असे या लेखाचे स्वरूप आहे .अशा प्रकारे आपल्याला संस्थात्मक पातळीवरील नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेची वाटचाल मांडता येते .
९ वाङ्मयीन प्रवाहांच्या प्रेरणेने झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
नव्वदोत्तरी कवितेचे वर्गीकरण करण्यासाठी कवितेतील वाङ्मयीन प्रवाहांचा आधार घेतला जातो .दलित, आदिवासी, महानगरी, ग्रामिण, स्त्रीवादी, मुस्लिम ,जनवादी अशा स्वरूपात वाङ्मय प्रवाहांचे वर्गीकरण केले जाते. यातील दलित वाङ्मय प्रवाहातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा संख्यात्मकदृष्टया अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते. नव्वदोत्तरी दलित कवितेची समीक्षा ग्रंथ रूपातून प्रकाशित झालेली आहे. नव्वदोत्तरी एकूणच मराठी कवितेची सैद्धांतिक व आस्वादक समीक्षा दलित साहित्याच्या अभ्यासकांनी केलेली आहे. नव्वदोत्तरी दलित कवितेची सैद्धांतिक ,मूल्यमापनात्मक, विस्तृत समीक्षा महेंद्र भवरे यांनी तीन ग्रंथांमधून केली आहे . 'दलित कवितेतील नवे प्रवाह ' , ' मराठी कवितेच्या नव्या दिशा ',
'दलित कविता आणि प्रतिमा ' या तीन ग्रंथातून एकूणच दलित कवितेची साक्षेपी समीक्षा महेंद्र भवरे यांनी केलेली आहे .दलित कवितेतील नवे प्रवाह आणि मराठी कवितेच्या नव्या दिशा या ग्रंथामधून नव्वदोत्तरी दलित कवींच्या काव्यसंग्रहाचे आस्वादक अंगाने समीक्षा केली गेली आहे. आस्वादप्रक्रिया बरोबरच नव्वदोत्तरी दलित कवितेच्या विशेषांवर या समीक्षेतून प्रकाशझोत टाकला आहे. नव्वदोत्तरी दलित कवितेचे स्वरूप, विशेष ,प्रेरणा महेंद्र भवरे यांनी स्पष्ट केले आहेत. नव्वदोत्तरी दलित कवितेचे वेगळेपण त्यातील वृत्ती-प्रवृत्तींचे विश्लेषण महेंद्र भवरे यांच्या समीक्षेतून येते . नव्वदोत्तरी दलित कवितेचा युगधर्म महेंद्र भवरे यांनी स्पष्ट केला आहे .
महेंद्र भवरे यांचा 'दलित कविता आणि प्रतिमा ' हा ग्रंथ नव्वदोत्तरी दलित कवितेच्या समीक्षेतील महत्त्वाचा ग्रंथ ठरतो .दलित कविता ही चळवळीची कविता आहे .या जाणिवेने सामाजिक अभिनिवेश बाळगत या कवितेची आस्वादक अंगाने समीक्षा केली गेली. परंतु या कवितेतील सामाजिक बांधिलकी बरोबरच कवितेतील कलातत्व, सैद्धांतिक वाङ्ममयीन मूल्यांचा शोध महेंद्र भवरे यांनी 'दलित कविता आणि प्रतिमा 'या ग्रंथातून घेतला आहे. हा ग्रंथ एकूणच नव्वदोत्तरी मराठी काव्य समीक्षा क्षेत्रातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. नव्वदोत्तरी दलित कवितेच्या समीक्षाचा विचार करत असताना अनेक अभ्यासकांनी 'अस्मितादर्श 'या नियतकालिकातून नव्वदोत्तरी दलित कवितेची चिकित्सा केलेली दिसून येते. नव्याने कविता लिहिणाऱ्यांसाठी दिशा दिग्दर्शनाचे कार्य अस्मितादर्शने केले. नव्वदोत्तरी दलित कवींच्या काव्यसंग्रहाला अनेक अभ्यासकांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत .त्यांचे स्वरूप आस्वादक स्वरूपाचे आहे. मूल्यमापन न करता कवींच्या चांगल्या बाजू ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. उणीवा ,मर्यादा यांचा ओझरता उल्लेख या प्रस्तावनावजा समीक्षेत केलेला दिसतो.
गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, प्रा.केशव मेश्राम ,अर्जुन डांगळे , सदा कऱ्हाडे ,भालचंद्र फडके , रा .ग .जाधव, दत्ता भगत, डॉ.मनोहर जाधव या अभ्यासकांनी नव्वदोत्तरी दलित कवितेचे विश्लेषण निमित्तपरतत्वे केलेले आहे .प्रस्तावना, नियतकालिकातील काव्यसंग्रहाची समीक्षा ,पुस्तक परिचय या स्वरूपात हे लेखन आहे . यात सैद्धांतिक, विस्तृत ,मूल्यमापनात्मक असे या लेखनचे स्वरूप नाही. केवळ आस्वादकपर ,पाठराखण करणारे असे हे लेखन आहे .एकूण दलित साहित्याची सैद्धांतिक मांडणी अनेक ग्रंथातून केली गेलेली आहे .वरील काही अभ्यासकांनी वेगवेगळ्या काव्यसंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनाची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत .या ग्रंथांनामध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. ते लेखन शेवटी नौमत्तीक ठरते .केशव मेश्राम यांनी संपादित केलेल्या 'विद्रोही कविता ' या पुस्तकाची प्रस्तावना समीक्षात्मक स्वरूपाचे आहे .यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या 'काही कविता संग्रहाच्या निमित्ताने 'या ग्रंथात नव्वदोत्तरी कालखंडातील काही कवींचे काव्यसंग्रह डोळ्यासमोर ठेवून केलेले लेखन समाविष्ट आहे. या लेखनाचे स्वरूप कसे आहे याविषयी या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूरात लिहिलेले आहे की ''या ठिकाणी कवींना प्रोत्साहन देणे हे प्रस्तावनेचे प्रयोजन असले , तरी ते एकमेव प्रयोजन नाही दव्या संग्रहाकडे पाहण्याची एक निश्चित दृष्टी निर्माण व्हावी व त्यांच्या कवितेतील काव्य आणि विचार यांचा वाचकाला आस्वाद घेता यावा हा या प्रस्तावनेच्या उद्देश आहे .यशवंत मनोहर यांच्याकडे स्वागतशील ,साक्षेपी व कलात्मकतेने कवीला व वाचकाला बरोबर घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे .याचा प्रत्यय प्रस्तुत प्रस्तावनेतून येतो .
एकूणच प्रस्तावनापर लेखनातील सकारात्मक बाजू या विचारातून स्पष्ट होते .प्रस्तावनापर लेखनाचे मर्म सांगताना यशवंत मनोहर लिहितात "प्रस्तावना म्हणजे शास्त्रकाट्याची कसोटी लावून केलेली समीक्षा नव्हे. कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून कवितेच्या आकलनाची एक दिशा साकार होते .कविता म्हणून अभिप्रेत असलेल्या मर्माचे प्रकाशन मात्र प्रस्तावना करते .प्रस्तावनेत दोषदिग्दर्शन नसतात असे नाही पण हे दोष दिग्दर्शन अत्यंत सूचक पद्धतीने आपुलकीच्या ओलाव्याने केलेले असते " ४ वरील विवेचनातून काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनापर समीक्षेचे स्वरूप आपल्या लक्षात येते .
डॉक्टर मनोज जाधव यांच्या 'परीवर्तनाचे प्रवाह 'या पुस्तकाचे स्वरूपही वरील यशवंत मनोहर यांच्या विश्लेषणाला लागू ठरणारे आहे. या ग्रंथातील सैद्धांतिक चर्चा महत्त्वाची अशी आहे .वेगवेगळ्या निमित्तांनी लिहिलेले नव्वदोत्तरी कवितेवरील समीक्षा लेख महत्त्वपूर्ण असे आहेत.
नव्वदोत्तरी दलित कवितेचा विचार करत असताना काही अभ्यासकांचे स्वतंत्र ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यात 'मराठी दलित कविता: एक चिकित्सक अभ्यास ' डॉ. सुनील कुमार चंदनशिवे, 'दलित कवितेतील अस्मिता ' डॉ. बिरा पारसे या दोन ग्रंथांचा समावेश करावा लागेल. हे दोन्ही पुस्तके प्रबंधातून ग्रंथरूपात झालेली रूपांतर अशी आहेत .याबरोबरच 'आंबेडकरी कवितेच्या अंतरंग 'हे हरीश खंडेराव यांचा ग्रंथही नव्वदोत्तरी दलित कवितेचे विश्लेषण करणारा आहे. अशा प्रकारे आपल्याला नव्वदोत्तरी दलित कवितेच्या समीक्षेचे स्वरूप सांगता येते .
नव्वदोत्तरी दलित कवितेबरोबरच विकसित झालेला आदिवासी कवितेचा प्रवाह होय. नव्वदोत्तरी आदिवासी कवींचा काही दलित अभ्यासकांनी दलित कवितेचा समावेश केला आहे. डॉ. विनायक तुमराम यांचे 'शतकातील आदिवासी कविता 'हा संपादित काव्यसंग्रह महत्त्वाचा असा आहे. या ग्रंथाला असलेली डॉ.विनायक तुमराम यांची जवळपास शंभर पानांची प्रस्तावना ही अत्यंत विस्तृतपणे आदिवासी कवितेचे सैद्धांतिक मांडणी करणारी आहे . डॉ.तुकाराम रोंगटे यांचे 'आदिवासी कवितेचा उषःकाल आणि सद्यस्थिती 'हा ग्रंथही नव्वदोत्तरी आदिवासी कवितेचे स्वरूप विशद करणारा आहे .
नव्वदोत्तरी स्त्रियांची कविता या प्रवाहाचे सखोल विश्लेषण करणारा विस्तृत असा ग्रंथ उपलब्ध नाही. नियतकालिकांतील लेख हाच काय तो या प्रवाहाचे विश्लेषण करणारा ऐवज ठरतो . ' आधुनिक मराठी कवयित्रींची कविता ' हा रा.ग .जाधव यांचा ग्रंथ स्त्रियांच्या कवितेची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे .या ग्रंथात इसवी सन 1980 ते 1995 या कालखंडातील स्त्रियांच्या कवितेचे विशेष स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नव्वदोत्तरी ग्रामीण कविता या प्रवाहाचे समीक्षा : लेख स्वरूपात, संपादित पुस्तकातून,नियतकालिकातून झालेली दिसून येते. ' मराठी ग्रामीण कवितेचा 'इतिहास - कैलास सार्वेकर यांच्या ग्रंथात 1990 पर्यंतच्या ग्रामीण कवितेचा इतिहास मांडला आहे. याबरोबरच आनंद यादव, नागनाथ कोतापल्ले ,द. ता .भोसले ,वासुदेव मुलाटे ,राजन गवस, माधव पुटवाड, चंद्रकुमार नलगे, भास्कर चंदनशिव, रवींद्र ठाकूर ,गणेश देशमुख यासारख्या समीक्षकांनी मराठी ग्रामीण कवितेची समीक्षा विविध वाङ्मयीन नियतकालिकातून, प्रस्तावना मधून, संपादित ग्रंथातील लेखांमधून केलेली दिसते .वसंत पाटणकर यांनी कवितारती मध्ये ' इंद्रजीत भालेराव यांची कविता 'या विषयी लिहिलेला लेख नव्वदोत्तरी ग्रामीण कवितेची सकस मूल्यमापनात्मक समीक्षा करणारा आहे .
महानगरी संवेदनेच्या नव्वदोत्तरी कवितेवर ग्रंथ रूपातून समीक्षा झालेली दिसून येत नाही . त्रोटक स्वरूपात महानगरी कवितेवर समीक्षा झालेली दिसून येते .जनवादी ,मुस्लिम, ख्रिस्ती अशा प्रवाहांच्या स्वरूपात मूल्यमापनात्मक साक्षेपी समीक्षा नव्वदोत्तरी कवितेची झालेली दिसून येत नाही.
१० . विद्यापीठीय संशोधन पदवीसाठी प्रबंध रूपातून झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये एम.फिल , पीएच्.डी पदवीसाठी प्रबंध रूपातून नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा झालेली दिसून येते .नव्वदोत्तरी कालखंडातील मराठी कविता , कवितेला केंद्र ठेवणारी नव्वदोत्तरी वाङ्मयीन नियतकालिके, नव्वदोत्तरी कालखंडातील कवी, नव्वदोत्तरी कालखंडातील कवितेतील प्रवाह , नव्वदोत्तरी कवितांची शैली, नव्वदोत्तरी कवितेतील मिथके ,प्रतिमा यांची समीक्षणात्मक समीक्षात्मक मांडणी या प्रबंधातून झालेली दिसते. मुख्यत: नव्वदोत्तरी कवितेतील आशयसूत्रे वाङ्मयीन मूल्ये यांचे विश्लेषण या समीक्षेतून झालेली दिसते.
११ . नव्वदोत्तरी काव्य समीक्षेचे विशेष :
१. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा विस्तृतपणे मूल्यमापनात्मक स्वरूपात अल्प प्रमाणात झालेली आहे.
विस्तृता, सूक्ष्मता ,मूल्यमापनात्मकता यांचा अभाव ही नव्वदोत्तरी काव्य समीक्षेची मर्यादा सांगता येते.
२ . नव्वदोत्तरी कवितेविषयी तात्विक, सैद्धांतिक मांडणी करणारी समीक्षा कमी प्रमाणात झाली आहे.
३. नव्वदोत्तरी कवितेचे मूल्यमापन करून केवळ न थांबता नव्वदोत्तरी काव्य समीक्षा पूर्वकालीन मराठी कवितेचे पुनर्मूल्यमापन करते. विशेषता नवकविता व साठोत्तरी कवितेचे पुनर्मूल्यमापन नव्वदोत्तरी काव्य समीक्षा करते .
४. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा विविध पद्धतीने झालेले आहे. आस्वादक समीक्षा विपुल प्रमाणात झालेली आहे. मानसशास्त्रीय रूपनिष्ठ, शैलीनिष्ठ , स्त्रीवादी मूल्यमापनात्मक समीक्षेचा अभाव नव्वदोत्तरी कवितेत दिसतो.
५. कविताकेंद्री वाङ्मयीन नियतकालिकांमुळे नव्वदोत्तरी काव्य समीक्षेला एक अभिव्यक्तीचे साधन उपलब्ध झाले .वाङ्मयीन नियतकालिकांमधून नव्वदोत्तरी काव्य समीक्षा गंभीरपणे प्रकट होताना दिसते. वाङ्मयीन नियतकालिकांनी नव्वदोत्तरी कवितेविषयी सैद्धांतिक मांडणी केली. विविध वाङ्मयीन नियतकालिकांनी नव्वदोत्तरी मराठी कविता विशेषांक प्रकाशित केले. ते अंक नव्वदोत्तरी कवितेची चिकित्सा करणारे आहेत .नव्वदोत्तरी काव्य समीक्षेत या विशेषांकाचे स्थान महत्त्वपूर्ण असेआहे .
६. नव्वदोत्तरी काव्यसंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनांमध्ये मूल्यमापनाचा अभाव दिसून येतो. मर्यादा, दोष न सांगण्याचा प्रघात प्रस्तावना लेखनात दिसतो .केवळ कवितेची बलस्थाने मांडली जातात. त्यामुळे काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतील समीक्षा ही परिपूर्ण ठरत नाही.
समारोप :
थोडक्यात कवितेविषयी प्रत्यक्ष समीक्षणात्मक ऐतिहासिक किंवा सैद्धांतिक समीक्षा अल्प प्रमाणात झालेली दिसते. नव्वदोत्तरी काव्य समीक्षा विपुल प्रमाणात झालेलीआहे. या समीक्षेने कवितेविषयीची जाण विविधांगी व समृद्ध केले आहे. नव्वदोत्तरी काव्य समीक्षाही वाङ्मयीन अभिरुचीला वृद्धीगंत करणारी आहे. समकालीन काव्याभिरूचीला नव्वदोत्तरी काव्यसमीक्षेने आकार दिला आहे .नव्वदोत्तरी काव्यसमीक्षेत काही जेष्ठ समीक्षकां बरोबरच नवोदित समीक्षकांची मांडणीही लक्षवेधी स्वरूपाचे आहे. नव्वदोत्तरी काव्य समीक्षे विविध स्वरूपात अविष्कृत होते .नव्वदोत्तरी काव्य समीक्षा ही नव्वदोत्तरी कवितेचे स्वरूप, विशेष , प्रेरणा यांना प्रकट करते . नव्वदोत्तरी कवितेतील प्रतिमासृष्टी ,प्रतीके ,मिथके, रचनाबंध यांना नव्वदोत्तरी काव्य समीक्षेने स्पष्ट केले आहे.
नव्वदोत्तरी काव्यातील भाषाशैली, संवादात्मक , लयबद्धता , उपरोधिकता , उपहास , सूचकता , संवादात्मकता प्राक्कथा यांना नव्वदोत्तरी काव्य समीक्षेने सैद्धांतिक स्वरूप दिलेले दिसत नाही . नव्वदोत्तरी काव्य समीक्षा आस्वादक स्वरूपात मोठ्या प्रमाणात लिहिली गेली आहे .
संदर्भ टिपा:
१.कुलकर्णी वा.ल .मराठी वाङ्मयकोश, खंड चौथा, (समन्वयक संपादनक-विजया राजाध्यक्ष ) महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई ,प्रथमावृत्ती -2002, पृष्ठ- 391
२. पाटील अशुतोष, लेख -मराठी वाङ्ममयीन नियतकालिके आणि मराठी कविता ,ललित ,फेब्रुवारी 2013 (कविता विशेषांक )
३ . गुंडी नीलिमा ,मराठी वाङ्ममयाचा इतिहास,खंड सातवा : इ.स .1950 ते इ. स. 2000 भाग दुसरा, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ,पहिली आवृत्ती 2010 , पृष्ठ 132
४. मनोहर यशवंत ' काही कविता संग्रहाच्या निमित्ताने ', पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती 2010, पृष्ट- मनोगत
डॉ. जी.आर .ढेंबरे
मराठी विभाग
श्री .व्ही. एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका रावेर जिल्हा जळगाव पिन -4255O8
मोबाईल नंबर -9421O81270 ई-मेल -dhembregr@gmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा