शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

विज्ञान पटकथा स्वरूप आणि महत्त्व

'विज्ञान पटकथा स्वरूप आणि महत्त्व '
डॉ .जी आर ढेंबरे
सहायक प्राध्यापक ,
श्री .व्ही.एस. नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय , रावेर , जि . जळगाव , पिन-425508
मोबईल नंबर -9421081270
ईमेल -dhembregr@gmail.com
 प्रास्ताविक : -
 मराठी चित्रपटाला जवळपास शतकाची परंपरा आहे .किंबहुना भारतामध्ये चित्रपटांची प्रथम निर्मिती मराठी माणसाने केली. मराठी चित्रपटांसाठी मालिकांसाठी वेगवेगळ्या विषयावरील पटकथांचे लेखन केले जाते. आध्यात्मिक , धार्मिक , सांस्कृतिक ,ऐतिहासिक, व्यक्तिगत ,कौटुंबिक, समस्याप्रधान पटकथा मराठी चित्रपट, मालिकांमध्ये सादर केल्या जातात .भावनाप्रधान अशा विषयांची प्राधान्याने निवड केली जाते .चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीमागे एक व्यावसायिक गणित असते .या व्यवसायाच्या गणिताबरोबरच ही एक कला सुद्धा आहे .मुळात आज प्रसार माध्यमांचा विस्फोट झाला आहे. शेकडो विविध चॅनलची निर्मिती व वाटचाल सुरू आहे. मोबाईल , संगणक यांची हाताळणी व उपलब्धता सहज सोपी झाली आहे .नेटच्या वापरा संदर्भातील कमाल मर्यादा संपल्या आहेत. मनोरंजन करमणूक ही आज माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनली आहे .चित्रपट मालिकांचा साधन म्हणून काही लोक उपयोग करत आहेत. विशिष्ट विचारधारा, कर्मकांड, संस्कृती ,संस्कार यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही साधने उपयोगात आणली जात आहेत. कुठेतरी प्रेक्षकांच्या मनावर, बुद्धीवर ताबा मिळवण्यासाठी चित्रपट, मालिकांचा वापर केला जात आहे .या आजच्या महत्त्वाच्या सादरीकरणाच्या कलेचा आत्मा म्हणजे पटकथा होय .उत्तम विषयावरील पटकथाचा अभाव दिसून येतो .लोकांच्या भावनांना ,मनाला जपणारी पटकथा लिहिली जाते .चित्रपट व मालिकांमधून विशिष्ट वर्गाची, विशिष्ट जातीची संस्कृती बहुजन समाजावर लादली जाते. या माध्यमाच्या प्रभावी वापरातून इतर वर्गातील बहुजन समाज या विशिष्ट संस्कृतीला आत्मसात करत आहे .एकूण मराठी चित्रपट व मालिकांमध्ये विज्ञानविषयक व विवेकवादी पटकथाचा अभाव दिसून येतो. विज्ञान पटकथेवर आधारित असणारे मराठी चित्रपट व मालिका निर्मितीची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे.

पटकथेचे स्वरूप : -

 चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या निर्मितीप्रक्रियेत पटकथा हा एक महत्त्वाचा घटक असतो. कथानक, घटना ,पात्रे ,पात्रांचे संवाद ,पात्रांच्या कृती ,वातावरण ,काळ ही पटकथेची अंगे असतात. चित्रपट व मालिकांचे माध्यम दृकश्राव्य स्वरूपाचे असते. त्यामुळे पटकथेचे रूपांतर चित्रीकरणात करता यावे असे तिचे लेखन अपेक्षित असते. ध्वनी ,दृश्य ,प्रकाश, चित्रे ,तक्ते इत्यादी बाबतचा नेमक्या सूचना पटकथाकाराला द्याव्या लागतात. पटकथाकार पटकथा लिहितो. त्या पटकथावरून दिग्दर्शक चित्रीकरण संहिता तयार करतो. पटकथाकाराला चित्रपट, मालिका या माध्यमांचे चांगले ज्ञान असेल तर त्याच्या पटकथेचाच चित्रीकरण संहिता म्हणून उपयोग करता येतो. पटकथा हा एक सृजनशील लेखनाचा प्रकार आहे .पटकथेचे साहित्याशी असणारे नाते स्पष्ट करताना वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशामध्ये अभ्यासक म्हणतात - 'चित्रपट हे माध्यमच दिग्दर्शक छायाचित्रकार आणि संपादक यांचे असल्यामुळे लिखित शब्दाला तिथे फारसे महत्त्व नसते .तथापि उत्कृष्ट चित्रपटांच्या पटकथा अत्यंत वाचनीय असतात. आणि त्यात साहित्याचे गुणधर्म असतात. तांत्रिक तपशील वगळल्यानंतर ती संहिता एखाद्या कादंबरीचा अथवा नाट्य संहितेचा आकार घेते .या दोन्ही साहित्यप्रकारांचे  गुणधर्म लिखित पटकथेत मिसळलेले असतात. शेवटी पटकथा लेखन हे प्रतिभेचे काम आहे .सृजनात्मकतेने आपला अनुभव प्रकट करण्याचे एक साधन म्हणून पटकथाकडे पाहता येते .पटकथाविषयी प्रभाकर पेंढारकर लिहितात - 'चित्रपट या माध्यमात अनेक व्यक्तींचा कलाप्रकारांचा तंत्राचा आणि शास्त्रांचा समन्वय साधावा लागतो .या पसाऱ्याची सूत्रबद्ध रचना करणारा आराखडा म्हणजे पटकथा. पटकथेला अमकेच स्वरूप असावे ,असे काही नियम सांगता येणार नाहीत. '        वरील विवेचनावरून आपणाला असे म्हणता येईल की पटकथेचे लेखन हे विशिष्ट असे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे शास्त्र नाही .पटकथेचे अगदी अचूक असे स्वरूप आपल्याला नमूद करता  करता येत नाही. थोडक्यात पटकथा लेखन हे शास्त्र नसून ही एक कला आहे. ही कला परिश्रमपूर्वक अभ्यासातून आत्मसात केली जाऊ शकते.
३ .समाजाची अभिरूची आणि चित्रपट -
समाज आणि विविध कलांचा परस्पर संबंध हा साध्य आणि साधन या स्वरूपाचा आहे. हे दोन्ही घटक परस्परपूरक असे आहेत .समाजाचे प्रतिबिंब चित्रपट कलेत उमटत असते. चित्रपटाचा चांगला ,वाईट परिणाम समाजावर होत असतो. चित्रपट निर्मिती त्यातील आर्थिक उलाढालीमुळे, कलेच्या धन निरपेक्ष आत्मानंदाच्या कल्पनांपेक्षा व्यापाराच्या लाभ प्रेरणेशी अधिक निगडित असते. भारतीय चित्रपट आणि समाज याविषयी प्राध्यापक समीर दुबळे लिहितात, ' चित्रपटाचा भारतीय समाजाच्या संदर्भात विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात. भारतातील शहरांची निर्मिती ब्रिटिश काळात झाली .शहरात रोजगार मिळत असल्याने तेथील लोकां जवळ पैसा होता .आपापले गाव घर शेती सोडून आलेल्यांचा सरमिसळ समाज असल्याने गावाकडच्या लोक रंजनाच्या पद्धती दूर राहिल्या होत्या .शहर म्हणजे नवे आधुनिक झकपक ऐटबाज अशा कल्पना होत्या. काही प्रमाणात अजूनही आहेत. या शहरी राहणीचा भाग म्हणून सिनेमा आला. त्यात मैफलीत जाण्यासारखा रितीरिवाजाचा प्रश्न नव्हता. तिकीट काढलं की कुणीही बघू शकेल .त्या काळाच्या शेतीनिष्ठ जातिनिष्ठ समाजात कलांचा आस्वाद अन्य प्रयोजनांशी धार्मिक- सामाजिक इत्यादींची जोडलेला होता .कलावंत कलावंतीणीचा वर्ग गृहस्थाने पेक्षा वेगळा होता. त्यामुळे रसिकाची, आस्वादकाची भूमिका घेणे उच्चभ्रू श्रेष्ठ वर्गाला शक्य होते. चित्रपटाने तिकीट विक्रीच्या व्यापारी तत्त्वावर मनोरंजन देऊ केले .त्यामूळे संमिश्र समाज एकाच वेळी चित्रपटगृहात तोच चित्रपट बघू लागला. त्यामुळे सर्व स्तरातील लोक ग्राहक म्हणून एका पातळीवर आले.
 थोडक्यात वरील विवेचनातून भारतीय चित्रपट आणि भारतीय समाज यांचा इतिहास स्पष्ट होतो .या इतिहासातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारतीय चित्रपट आणि समाज यांच्या परस्पर गरजांमधून एकमेकांना घडत-बिघडत दोन्हींची निर्मिती ,विकास झाला. शहरातील माणसाच्या करमणुकीचे साधन म्हणून चित्रपट कलेचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात भारतीय चित्रपटांवर धार्मिकतेचा पगडा असलेला दिसून येतो. किंबहुना आजही धार्मिकतेच्या जोखडातून भारतीय चित्रपट मुक्त झालेला आहे असे म्हणता येत नाही .त्याच त्या धार्मिक कथा नव्या रूपात चित्रपटातून मांडल्या जातात . लोक त्या चवीने बघतात . यामध्ये भारतीय समाजाच्या अभिरुचीचे गमक दडलेले आहे. भारतीय समाज माणसांमध्ये धार्मिक कथांचे गारूड कायम आहे .सरंजामी व्यवस्थेचे समर्थन करण्याची भारतीय मानसिकता चित्रपटातूनही अभिव्यक्त होते. मुळात भारतीय समाजात चित्रपट पाहणारा वर्ग हा आस्वादकापेक्षा ग्राहक जास्त आहे .त्यामुळे ग्राहकाला खूश करण्यासाठी ठराविक फॉर्मुला किंवा मसाला पटांना वाव दिला गेला .कलात्मकदृष्ट्या उत्तम असणारे चित्रपट व्यवसाय करत नाहीत. कारण लोकांना ते चित्रपट आवडत नाहीत. कुठे तरी जातीय अस्मिता कुरवळणारे सरंजामी व्यवस्थेचे समर्थन करणारे चित्रपट, लैंगिक भावभावनांचे उत्तान प्रदर्शन करणारे चित्रपट ,      टिनपाट विनोद निर्मिती करणाऱ्या चित्रपट, हिंसेचे प्रदर्शन करणारी चित्रपट भारतीय माणसांना अधिक आवडतात .मुळातच भारतीय लोकांची अभिरुची ही नेहमी स्वस्त निम्म दर्जाचे राहिलेली आहे .काही अपवाद सांगता येतील .परंतु बहुसंख्य चित्रपटांना वरील विवेचन लागू पडणारे आहे .या पार्श्वभूमीवर भारतामध्ये विज्ञान पटकथेवरील चित्रपट किती यशस्वी होऊ शकतील याबद्दल शंका आहे .परंतु आजच्या आधुनिक भारतीय समाजाला विवेकवादी विज्ञानवादी रसिक गरज आहे असे वाटते.

४ .विज्ञान पटकथा स्वरूप आणि महत्त्व : -
स्टार वॉर्स, क्लोज एन्काऊंटर्स ऑफ द थर्ड काइंट ह्या चित्रपटांच्या भव्य यशानंतर पाश्चात्य चित्रपटसृष्टीत विज्ञान पटकथेवर आधारित चित्रपटांची एक प्रचंड लाट आली. मराठी भाषेतील विज्ञान पटकथांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांची संख्या अत्यंत मर्यादित आहे .हे चित्रपटही परिपूर्ण विज्ञान पटकथेवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही .विज्ञान पटकथा घेऊन चित्रपट निर्माण करणे हे एक आव्हान आहे .विज्ञान पटकथेवर आधारित असणारे चित्रपट मराठी माणसं किती पाहतील याबद्दल शंका आहे. चित्रपटनिर्मितीबद्दल प्राध्यापक समीर दुबळे -लिहितात ' प्रत्येक माध्यमाबाबत अभिरुची घडण्यामध्ये त्यातील कलाकृतींचा अनुभव महत्त्वाचे कार्य बजावत असतो .चित्रपट माध्यमाला व्यापाराच्या शक्यता आहेत. हे चित्रपट उद्योगाच्या वाढीत स्पष्टच दिसते .परंतु कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून त्याकडे पाहणाऱ्या व निर्मिती करणाऱ्या कलाकारांची आणि सामान्य प्रेक्षकांची गाठ पडणे कठीण होते .त्यामुळे चित्रपटाबद्दल एकच एक धंदेवाईक दृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये ग्राहकवृत्ती उद्दीपनाची ओढ आणि विरंगुळ्या  पलीकडे अपेक्षाच न करण्याची वृत्ती असा प्रकार दिसतो '
 वरील विवेचनातून भारतीय प्रेक्षकांची अभिरुची आणि चित्रपटांच्या निर्मितीमागील अर्थव्यवस्था यातील सहसंबंध स्पष्ट होतो .चित्रपटाकडे भारतीय माणूस केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतो. चित्रपटातून नव्या कल्पना, विचारांना बळ मिळू शकते अशी शक्यता फार कमी आहे .या पार्श्वभूमीवर विज्ञान पटकथा असलेले चित्रपट भारतीय माणसाच्या पसंतीला उतरतील का हा खरा प्रश्न आहे.
 आज तंत्रज्ञानात बदल झाला आहे .या बदलत्या तंत्राचा आधार घेऊन मराठीतून उत्तम विज्ञान पटकथेवरील चित्रपटांची निर्मिती होणे महत्त्वाचे वाटते .
संदर्भ : -
१ . प्रभा गणोरकर , वसंत आबाजी डहाके आणि इतर , वाङ्मयीन संज्ञा -संकल्पना कोश , ग . रा भटकळ फाउण्डेशन , मुंबई , पहिली आवृत्ती ,डिसेंबर २००१ , पृ .२५६
२ . प्रभाकर पेंढारकर , ' मराठी वाङ्मय कोश ' खंड चौथा , ( समन्वयक संपादक - विजया राजाध्यक्ष ) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ , मुंबई , प्रथमावृत्ती , २००२ पृ .१८८
३ . समीर दुबळे , ' प्रयोगाधिष्ठित कला , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक , प्रथमावृत्ती -२००० पृ ६१
४ . समीर दुबळे ,तत्रैव , पृ .६२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...