निवडक १० कथा -आकलन आणि मूल्यमापन "
प्रास्ताविक -
मराठी साहित्यामध्य अंत्यत कमी लेखन करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या लेखकांमध्ये हमीद दलवाई यांचे नाव आपणाला विचारात घ्यावे लागते. इंधन नावाची कादंबरी व 40 कथा हमीद दलवाई यांच्या नावावर आहेत. संख्यात्मकदृष्ट्या हमीद दलवाई यांचे लेखन अल्प असले तरी त्यांच्या साहित्याचे गुणात्मक वेगळेपण लक्षात घेण्याजोगे आहे. मराठी साहित्याला एका अपरिचित विश्वाचे दर्शन हमीद दलवाई यांच्या साहित्यातून घडले. ग्रामीण मुस्लिम समाज जीवन हा तसा मराठी साहित्याला अस्पर्श असा विषय होय .काही अपवाद वगळता हा विषय मराठी साहित्यातून कमी प्रमाणात चित्रित झालेला आहे. मुस्लिम कुटुंबव्यवस्थेचे सूक्ष्म चित्रण हमीद दलवाई यांच्या कथेतूनbnbbb येते. मुस्लिम कुटुंबातील लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध हमीद दलवाई यांची कथा घेते. मुस्लिम माणसाच्या जगण्यातला संघर्ष हा हमीद दलवाईंच्या कथेचा केंद्रबिंदू आहे .या संघर्षाच्या विविध बाजू , पैलू हमीद दलवाईंच्या कथेतून चित्रित होतात. मुस्लिम जीवनातील वैविध्यपूर्ण विषयांना हमीद दलवाई यांनी आपल्या कथांमधून जोरकसपणे मांडले आहे .कथा विषयांमध्ये विविधता दिसून येते. कोकणातील ग्रामीण मुस्लिम जगण्याचा शोध ही हमीद दलवाईंच्या साहित्याची प्रेरणा आहे . मुस्लिम समाजाविषयीचे अनेक प्रकारचे पूर्वग्रह, तर्क, विचार समाजामध्ये असलेले दिसून येतात. या पूर्वग्रहांना, तर्कांना, विचारांना धक्का देण्याचे काम हमीद दलवाईंची कथा करते. हमीद दलवाईंच्या कथा वाचनातून वाचकाचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा पूर्वग्रह बदलून जातो .एका वेगळ्या प्रकारची संवेदना, कणव, सहानुभूती वाचकाच्या मनात निर्माण करण्यात हमीद दलवाई यांच्या कथांना यश येते आजचा आपला भवताल तपासत असताना अशा विचारांची मूल्यांची किती गरज आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून हमीद दलवाई यांचे कथाविश्व महत्त्वपूर्ण ठरते .साधना प्रकाशनाने जुलै 2018 मध्ये प्रकाशित केलेल्या निवडक दहा कथा हा कथासंग्रह एक महत्त्वपूर्ण असा आहे .या कथासंग्रहामध्ये एकूण दहा कथा आहेत .प्रत्येक कथा ही आशयसूत्र च्या दृष्टीने वेगळी व महत्त्वपूर्ण अशी आहे.कथेच्या आकृतिबंधाच्या दृष्टीने हमीद दलवाई यांनी लघुकथा, दीर्घकथा या दोन्ही आकृतिबंधाचे उपयोजन आपल्या लेखनात केले आहे. निवडक दहा कथा या संग्रहाचा प्रस्तुत निबंधात आकृतिबंध व वैशिष्ट्ये या अंगाने विचार केलेला आहे
२. निवडक१0कथांची आशय सूत्रे _
हमीद दलवाई यांच्या कथांच्या आशयामध्ये आपणाला काही समान सूत्रे आढळून येतात .या समान सूत्रांना आपण आशय सूत्रे म्हणू शकतो. ही आशय सूत्र म्हणजे हमीद दलवाईंच्या कथेच्या अनुभवविश्वाचे वा आशयक्षेत्राचे केंद्रवर्ती किंवा मध्यवर्ती सूत्र होय. हमीद दलवाईंच्या निवडक दहा कथा या संग्रहातील कथांमध्ये मुख्यतः ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण ,बाल मानसिकतेचे चित्रण , मुस्लिम कुटुंबातील गरीबी ,दारिद्र्याचे चित्रण ,स्त्री-पुरुष संबंधांचे विविधांगी शोध, मुस्लिम मानसिकतेतील दुभंगलेपणा चे चित्रण ,धर्मापेक्षा मैत्री जोपासणारी माणसं, मूल्य हरवलेल्या माणसांचे चित्रण इत्यादी प्रधान आशय सूत्र त्यांच्या कथांमधून अभिव्यक्त होतात.
२ .१_ ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा
निवडक दहा कथा या संग्रहातील जवळपास पहिल्या सात कथांमध्ये ग्रामीण मुस्लिम कुटुंबाचे चित्रण येतेे .दहा रुपयांची नोट या कथेतील नायक करीम मुंबई मध्ये नोकरी करत असला तरी कथेचे कथानक तो गावाकडे जातो आणि जी परिस्थिती अनुभवतो यावर बेतलेले आहे . करीम मुंबईत नोकरी करत असला तरी त्याचा प्राण गावांमध्ये अडकला आहे. ग्रामीण भागातील मुस्लिम कुटुंबाकडे जीवन जगण्याची साधने फार कमी आहेत. याचा परिणाम सण उत्सवांवर होतो. गौरी गणपती आणि ईद हे दोन्ही सण नीटपणे लोक साजरे करू शकत नाही. याची खंत कथानायकाला होते. अहमद या कथेमध्ये अहमदच्या कुटुंबाचे चित्रण येते . गरीबीमुळे आई वडील अहमद कडे नीट लक्ष देत नाहीत .यातून त्यांच्या वाट्याला दुःख येते .ग्रामीण मुस्लिम कुटुंबातील मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या कथेतून व्यक्त होतो. माणूस आणि गाढव या कथेचा नायक अब्दुल्ला ग्रामीण भागात राहणारा स्वार्थी माणूस आहे. अधिक पैसे मिळवण्यासाठी वांग्याची शेती करणारा अब्दुल्ला या कथेत आपल्याला भेटतो . छप्पर या कथेतील नायक शिक्षण घेतलेला आहे . त्याला शिक्षणातून आधुनिक दृष्टिकोन मिळाला आहे. शिक्षणातून मिळालेली माहिती प्रत्यक्ष उपयोगात आणण्यात अपयशी ठरलेला नायक कथेत लेखकाने उभा केला आहे . ग्रामीण भागातील माणसं संसर्गजन्य रोगाबद्दल बेफिकीर राहतात. यातून शिक्षण घेतलेला नायक आपल्या कुटुंबाला बाहेर काढू शकत नाही. शिक्षणामुळे श्रम करण्याचा कंटाळा आलेला नायक या कथेत उभा राहतो. ग्रामीण मुस्लिम कुटुंबातील अशिक्षितपणा ,अडाणीपणा यातून घडणारी शोकांतिका या कथेत उभी राहते .कफनचोर या कथेतील रसूल ग्रामीण परि क्षेत्रातून आकाराला येतो . कोल्हाआणि कोकरू या कथेतून ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण येते .आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या बेरकी हैदरचे चित्र लेखकाने अत्यंत वेधक पणे उभे केले आहे. ग्रामीण मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांचे जीवन त्यातील अगतिकता लेखकाने अत्यंत प्रत्ययकारीपणे चित्रित केली आहे. हमीद दलवाई यांनी ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण अत्यंत वास्तवदर्शी रूपात उभे केले आहे. ग्रामीण भागातील मुस्लिम कुटुंब ,त्यांची रहन सहन, बोली, वागण्यातील बारकावे लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने टिपली आहेत.
२.२- मुस्लिम कुटुंबातील गरीबी दारिद्र्याचे चित्रण करणाऱ्या कथा
- हमीद दलवाई यांच्या निवडक दहा कथा या संग्रहातून मुस्लिम कुटुंबातील गरीबी ,दारिद्रयाचे अत्यंत वास्तववादी चित्रण येते. गरिबीमुळे माणसाच्या जीवनातील आनंद, सुख समाधान नष्ट झाले आहे .या वास्तवाचे चित्रण हमीद दलवाई यांनी आपल्या कथांमधून अत्यंत संयमी व संयत पद्धतीने केले आहे . या वास्तवाला कुठेही अतिशयोक्तीची किनार नाही. कथेतील वास्तव हे खरेपणाच्या कसोटीवर उतरणारा आहे. दहा रुपयांची नोट या कथेतील नायक करीम एकशे वीस रुपयात खर्डेघाशी करीत राहतो. मिळवलेल्या पैशात भागणार नाही म्हणून लग्न करायचं टाळीत जातो. यातील वास्तव वाचकाला अंतर्मुख बनवते .गरिबीमुळे लोक आपले सण-उत्सव साजरे करू शकत नाहीत. मुंबईला गेलेली गावाकडील माणसं गावात येत नाहीत कारण त्यांना गावातील गरिबीचा तिटकारा येतो. या कथेतील श्रीराम सांगू लागतो की ,दारिद्र्य _ दारिद्र्यनि दारिद्र्य ! चिंता आर्थिक चिंता ! बेकारी उपासमार ! साऱ्यांनाच आर्थिक चिंतेने ग्रासले होते . दारिद्रयाने काळवंडून टाकले होते. भुकेने अर्धमेले केले होते. हे चित्रण प्रभावी व वेधक आहे. मित्राला दिलेले दहा रुपये पुन्हा प्रवास करण्यासाठी परत घेण्याच्या आलेली वेळ यातून वास्तवाचे चित्र उभे राहते. अहमद कथेतील अहमद या लहान बालकांचे बालपण गरिबी व दारिद्र्यामुळे संपून जाते. आईवडील आपल्या लहान मुलावर प्रेम करू शकत नाहीत. परिस्थितीशरण झालेल्या आई-वडिलांना मुलांच्या भावनांपेक्षा उपयोगिता मूल्य अधिक महत्त्वाचे वाटते .गरिबीमुळे आपली भूक न भागवू शकलेला अहमद वाचकाला विचार करायला लावतो .अहमदला आपण पोटभर खाल्ल्याचे ,शाळेत शिकत असल्याचे ,धार्मिक शिक्षण घेत असल्याचे स्वप्न पडते .परंतु ते गरिबीमुळे दारिद्र्यामुळे अपूर्ण राहते .माणूस आणि गाढव या कथेतील नायक अब्दुल्ला गरिबीमुळे पैशासाठी मूल्य हरवून बसतो. माणसात आणि जनावरात फरक करायला अब्दुल्ला विसरून जातो .छप्पर या कथेतील कुटुंब गरिबी आणि दारिद्र्यामुळे शोकांतिका ओढून घेते . गरीबीतून अज्ञान अडाणीपणाचा जन्म होतो .याचे चित्रण या कथेत येते .कफनचोर या कथेतील रसूलला आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कफनची चोरी करावी लागते. गरिबीमुळे दारिद्र्यामुळे मूल्यहीन काम करण्याची वेळ रसूल वर येते .निषिद्ध असणारे काम करावे लागते .यातून त्याची अगतिकता प्रकट होते . कोल्हाआणि कोकरू या कथेतून लेखकाने गरिबीमुळे मरीयमला आपल्या इच्छेविरुद्ध हैदरशी लग्न करावे लागते.याचे प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे . बेकार (पण कलावंत ) माणसाची गोष्ट या कथेमध्ये एका सृजनशील माणसाची कथा लेखकाने मांडली आहे.शिक्षण घेऊनही नोकरी न मिळालेल्या नायकाची ही कथा आहे .भूक लागलेली असतानाही नायकाला अन्न मिळत नाही. उत्तम कथा लिहिण्याचे कसब असूनही जीवन जगण्यास अपयशी ठरलेल्या कलावंताची गरिबीमुळे दारिद्र्यामुळे काय दशा होते याचे चित्रण या कथेत येते . खुदा हाफिज या कथेत लेखकाने वेगळ्या प्रकारच्या गरिबीचे चित्र उभे केले आहे . उबेदुला या खानदानी माणसाची व्यथा या कथेतून लेखकाने मांडली आहे. पूर्वी श्रीमंतीचे वैभवाचे दिवस होते.आता ते परत कधी मिळणार या चिंतेतून भूतकाळात रमणारा उबेदुला व आपला भूतकाळ पुन्हा मिळवण्यासाठी अयोग्य हिंसेचा मार्ग स्वीकारणारा सुद्रद्दीन यांची शोकांतिका या कथेतून लेखकाने उभी केली आहे.
२ .३ स्त्री - पुरुष संबंधाचे चित्रण करणाऱ्या कथा
हमीद दलवाई त्यांच्या कथांमधून स्त्री -पुरुष संबंधाचे विविधांगी चित्रण येते .हमीद दलवाई यांच्या कथेतील स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण वास्तव स्वरूपाचे आहे. पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या कथांमधून व्यक्त होतो .कफन चोर या कथेतील रसूल पोटाची भूक भागवण्यासाठी प्रेताच्या कफनची चोरी करतो .एकदा कफनची चोरी करत असताना कबर मध्ये चौदा पंधरा वर्षांच्या मुलीचे प्रेत त्याला सापडते .त्या स्त्री देहाकडे पाहून रसूलची वासना पेट घेते . मृत मुलीच्या शरीराशी संग करण्याची भावना त्याला होते. परंतु शेवटी रसूल स्वतःवर नियंत्रण मिळवता. या कथेत लेखक हमीद दलवाई यांनी वेगळा जीवनानुभव मांडला आहे. विकृतीतून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो .याचे प्रभावी चित्रण या कथेतून येते. कोल्हाआणि कोकरू या कथेतील हैदर हा अत्यंत बेरकी आहे .लोकांच्या दुःखातही सुख शोधणारा हैदर या कथेतून लेखकाने उभा केला आहे .मरीय मला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असलेला हैदर लग्नानंतर मात्र मरियम चे शोषण करतो .मरियमच्या मृत्यूनंतर लगेच तिच्या लहान बहीणला उपभोगण्याची तयारी ठेवणारा हैदर हा उपभोगवादी संस्कृतीचा प्रतिनिधी ठरतो .एक अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट या कथेतील नायक आपल्या इच्छेखातर लहानपणी विवाहबद्ध झालेल्या पत्नीला सोडून देतो .केवळ इच्छेखातर कोणत्याही स्त्रीचे जीवन उद्ध्वस्त करण्याची मानसिकता ही खास पुरुषी मानसिकता आहे .यातून स्त्री-पुरुष संबंधाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन कथाकार आपणा समोर उभा करतो .बेकार (पण कलावंत )माणसाची गोष्ट या कथेतील नायक रझाक साहेबांच्या तरुण मुलीकडे वासनामय नजरेने पाहत राहतो. खुदा हाफिज या कथेतील सद्रुद्दीनचाही आपल्या पत्नीकडे पाहण्याचा उपभोगवादी दृष्टिकोन व्यक्त होतो .एकूण हमीद दलवाई यांच्या कथांमधून मुस्लिम समाजातील पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा उपभोगवादी दृष्टिकोन व्यक्त होतो.
२ .४- बाल मानसिकतेचे चित्रण करणाऱ्या कथा
हमीद दलवाईंच्या निवडक दहा कथा या संग्रहातील काही कथांमधून बाल मानसिकतेचे उत्तम चित्रण येते .बाबूखानचा ग्रामोफोन या कथेतून लहान मुलांची ग्रामोफोन विषयीचे ओढ व्यक्त होतो. ग्रामोफोनमुळे बाबू खानशी लहान मुले जोडली जातात . एक बाल सुलभ भावना या कथेतून व्यक्त होते. बालकांमधील ग्रामोफोन विषयीचे अदभूत कुतूहलातून बाबू खानचा भूतकाळा नायकच्या मनात कायमचा कोरला जातो. अहमद या कथेतून अहमदचे बालपण उभे केले जाते. अहमदच्या बाल मानसिकतेचे चित्रण अंत्यत प्रत्ययकारी असे झाले आहे. विशेषत या कथेतील सकाळचे वातावरण लेखकाने अत्यंत जिवंतपणे चित्रित केले आहे .या कथेतील अहमदचे बालपण परिस्थितीमुळे कोमेजून जाते. त्याच्या मनातील अपूर्ण स्वप्नांची मालिका या कथेतून उभी राहते. लहान मुलांच्या मनातील भावना अभिव्यक्त करणे अत्यंत कठीण असते .लेखक हमीद दलवाई यांनी लहान मुलांचे बालविश्व मोठ्या ताकदीने उभे केले आहे.
२.५- मुस्लिम समाजातील दुभंगलेपणाचे चित्रण _ फाळणीपासून मुस्लिम समाजाला पाकिस्तान विषयी एक कुतूहल आहे .हिंदु समाजाबद्दल नेहमी संशयाची भावना आहे.याचे चित्रण हमीद दलवाईंच्या कथांमधून येते .काही कथांमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील नातं खूप घट्ट असल्याचे चित्र येते . बेकार (पण कलावंत ) माणसाची गोष्ट या कथेतील नायक रझाक बोहरी यांच्याकडे नोकरीची शिफारस घेण्यासाठी जातो .तेव्हा ते म्हणतात, आजकाल आपल्या लोकांना (म्हणजे मुसलमानांना ) नोकऱ्या मिळणं फारच कठीण झालंय . सगळीकडे आपले दुश्मन भरलेले आहेत .शब्द तरी कुणाला टाकायचा ?हा प्रश्न मुस्लिम समाजातील काही प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा आहे. नायक रझाक बोहरींशी चर्चा करत असताना त्यांना पाकिस्तानात सर्व काही ठीक चाललेलं आहे असे वाटते .यातून मुस्लिम समाजातील दुभंगलेपणा चित्रण येते .खुदा हाफिज ही कथा या आशय सूत्राचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. मुस्लिम समाजातील उच्चभ्रू व्यक्तींचे चित्रण या कथेत येते .कुठेतरी आपण या देशाचे मालक होतो. राज्यकर्ते होतो .आणि स्वातंत्र्यामुळे आपले पूर्वीचे वैभव लयाला गेले. याविषयीची खंत खुदा हाफिज या कथेतून व्यक्त होते .हैदराबादच्या निजाम राजवटीचे पुसटशी आठवण, भूतकाळ मनात ठेवून जगणारे उबेदुला हे मुस्लिम समाजातील दुबळेपणाचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येतील .खुदा हाफिज या कथेतील उबेदुला आणि त्यांचा मुलगा सद्रुद्दीन यांच्यातील संवाद हा मानसिक दुंभगलेपणावर बेतलेला आहे. सदृद्दिन म्हणतो ,तुम्ही म्हणता ते खरे आहे ,पूर्वीच्या हैदराबाद आता राहिलेली नाही .आमचे नामोनिशाण शिल्लक ठेवायचे नाही असा या सल्तनतने चंग बांधला आहे .आमची कौम, आमची जबान ,आमचे कल्चर_ सारे कसे भराभरा उध्वस्त होत आहे. जाणून बुजून केले जात आहे. पूर्वीसारखे आता एकमेकांचा निरोप घेतांना कुणी खुदा हाफिज देखील म्हणत नाही. या संवादातून मुस्लिम समाजातील काही व्यक्तींच्या मानसिक दुभंगलेपणा चे उत्तम चित्रण उभे राहते .
२ .६- हमीद दलवाई यांच्या कथांमधील इतर आशयसूत्रे
वरील आशयसूत्रांबरोबरच हमीद दलवाई यांच्या कथांमधून वेगवेगळी आशय सूत्रे अभिव्यक्त होतात. धर्मापेक्षा मैत्रीचं नातं जपणारी पात्र हमीद दलवाईंच्या कथांमधून साकार होतात. दहा रुपयांची नोट या कथेतील करीम -श्रीराम एका अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट या कथेतील नायक - शामा ,बेकार ( पण कलावंत ) माणसाची गोष्ट या कथेतील हमीद - मेघा या पात्रांचा उल्लेख करावा लागेल. हमीद दलवाई यांच्या कथांमधून अनेकदा भूतकाळात रमणारी पात्रे भेटतात. भूतकाळ कसा सुखद होता. याचे स्वप्नरंजन करणारे पात्रे निवडक दहा कथांमध्ये भेटतात.
३ . हमीद दलवाईंच्या कथेचा आकृतीबंध -
हमीद दलवाईंच्या कथेचा आकृतीबंध विचारात घेतला असता आपल्या लक्षात येते की हमीद दलवाईंनी लघु व दीर्घ दोन्ही प्रकारात कथालेखन केले. हमीद दलवाईंच्या कथेची सुरुवात ही खळबळजनक विधानाने उत्कंठावर्धक वगैरे अशी असलेली दिसत नाही .कथेचा प्रारंभ साधारणतः संथ , संयमी शांत अशी झालेली दिसते. कथेतील अनुभवांची अभिव्यक्ती चढत्या क्रमाने केलेली दिसते. कथेचा शेवट काहीसा धक्का देणारा अनपेक्षित असा केलेला दिसून येतो .कथेतून काही एक ठोस विचार ,मूल्य मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. नियोजनपूर्वक कथेची मांडणी केलेली दिसते. साध्या सरळ सोप्या पद्धतीने कथेची रचना केलेली दिसते.अनुभवाच्या अस्लतेमुळे कथेमध्ये जिवंतपणा जाणवतो. निवडक दहा कथा संग्रहातील पहिल्या आठ कथा लघुकथा स्वरूपात आकाराला येतात .या कथासंग्रहातील शेवटच्या दोन कथा म्हणजे बेकार (पण कलावंत )माणसाची गोष्ट , आणि खुदा हाफिज या कथा दीर्घकथा आकृतिबंधाचा आकार घेताना दिसून येतात .कथेच्या आकृतिबंधाला साजेशी पात्ररचना हमीद दलवाईंच्या कथेत दिसून येते . पात्रचित्रण अत्यंत मोजके आटोपशीर असे आहे .या पात्र चित्रणाला सजीव करणारी भाषाशैली हमीद दलवाईंच्या कथेमध्ये दिसून येते .हमीद दलवाई कोकणी बोली भाषेचा अत्यंत चपलखपणे वापर करतात. प्रसंग घटना यांना अनुसरून संवाद आकाराला येतात .संवाद छोटे आटोपशीर असे आहेत .अशा प्रकारे आपल्याला हमीद दलवाईंच्या निवडक दहा कथा संग्रहातील कथांच्या आकृतीबंधाचा विचार करता येतो.
४ . निवडक१० कथा या संग्रहातील कथांचे विशेष -
१ कोकणातील ग्रामीण जीवनातील माणसांच्या संघर्षावर या कथा बेतलेली आहेत.
२. मुस्लिम समाजातील उपेक्षित शोषित व्यक्तींच्या दुःखाचे विविध पदर या कथांमधून व्यक्त होतात.
३ . मुस्लिम कुटुंबातील गरीबी, दारिद्र्याचे वास्तवदर्शी चित्रण या कथांमधून येते .
४ .मुस्लिम समाजातील स्त्री-पुरुष संबंधाचा सखोल वेध घेणाऱ्या या कथा आहेत .
५ .मुस्लिम समाजातील असुरक्षितपणाची , दुभंगलेपणाची कारणमीमांसा या कथांमधून येते.
६ .परिस्थितीशरण झालेली व्यक्ती, दुःख ,दारिद्र्य गरिबीमुळे मानवी मूल्यं पासून दुरावत जाते . समाजव्यवस्था मूल्यव्यवस्था नाकारणारी पात्र हमीद दलवाईंच्या कथांमध्ये उभी राहतात. मानवी मूल्य हरवत चाललेल्या समाजाचे चित्रण या कथांमधून येते .मूल्य हरवून बसलेल्या माणसांच्या या कथा आहेत .या कथाच्या वाचनातून एक प्रकारची अस्वस्थता जन्म घेते .
७ .मुस्लिम कुटुंबातील विविधांगी नात्यांचा शोध हमीद दलवाईंची कथा घेते.
समारोप -हमीद दलवाईंचे कथा अनोखे जीवन विश्व चित्रित करणारी कथा आहे .हमीद दलवाई यांनी मुस्लीम समाजातील सामाजिक सुधारणांसाठी जे प्रबोधनात्मक कार्य केले त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमध्ये उमटते .निवडक दहा कथा या संग्रहातील सर्व कथा वाङ्मयीनदृष्ट्या व कलात्मक दृष्ट्या उत्तम अशा कथा आहेत. हमीद दलवाईंच्या कथांमधून पन्नास वर्षांपूर्वीच्या सर्वसामान्य भारतीय मुस्लिम समाज जीवनाचे चित्रण आले आहे.ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासत हमीद दलवाईंच्या कथांची आपणाला विशेष नोंद घ्यावी लागते. यदुनाथ थत्ते म्हणतात, त्याप्रमाणे हमीद दलवाईंचे समाजाच्या वास्तवाचे सम्यक आकलन आहे.याचे प्रतिबिंब निवडक दहा कथा या संग्रहात उमटलेआहे .मानवी जगण्याचा दुःखाचा, मूल्यऱ्हासाचा सम्यकपणे घेतलेला शोध म्हणजे हमीद दलवाईंच्या कथालेखन होय. एकूणच हमीद दलवाई यांच्या कथांमध्ये कुठेही आक्रमकता , भडकपणा ,उरबडवेपणा, आक्रस्ताळेपणा दिसून येत नाही. त्यांच्या कथा लेखनामागे एक संयत ,संयमीपणा दिसून येतो.
_________________________
डॉ .जी.आर. ढेंबरे ,
मराठी विभाग
श्री .व्ही .एस. नाईक कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर ता . रावेर जि. जळगाव पिन-४२५५O८
मोब_९४२१०८१२७०
ई मेल _dhembregr@gmail.com
Nice Katha study fy year
उत्तर द्याहटवाPyare
उत्तर द्याहटवाHiii
उत्तर द्याहटवाNice story all of
उत्तर द्याहटवा